महन्मंगला माऊली हिंदूभूमी

Submitted by पुरंदरे शशांक on 17 September, 2021 - 01:42

महन्मंगला माऊली हिंदूभूमी
तिये पादपद्मी नमामी नमामी

हिमाद्री शिरी जो महाधीर योगी
गिरीकंदरे काननी सर्वभागी
असीमा कृपा जान्हवी तोयदानी
महा सागरे रक्षितो सर्वथेनी

प्रभू राम श्रीकृष्ण पुत्रादी सारे
ऋषी तत्वज्ञाना वरी जाणणारे
गुणी शास्त्रवेत्ते कलाकार जेथे
इहा ऐहिका मान देती समस्ते

ऋषि थोर अर्वाचिने ते समर्थे
जनाकारणे वेची जन्मा समस्ते
समाजा तरी थोर संस्कार द्याया
अति कष्टले मातृभू सावराया

जिये अर्पिले देह मातेकरोनी
वीरा त्या ऋणासी मनी आठवोनी
हिता सर्वथा देशकार्या स्मरोनी
पुढे वारसा चालवू आचरोनी

जिये पोशिले देह आणि मनासी
विशेषे तरी थोर संस्कार देसी
मिळो जन्म ते सर्वदा मातृलागी
ऋणा अंशता फेडण्या योग्यतेसी

महन्मंगला अशा या हिंदूभूमीच्या चरणकमली मी पुनः पुन्हा वंदन करतो.
अतिशय धैर्यवान योगिराज असावा असा हिमालय पर्वत जिच्या शिरोभागी आहे.
जिच्या सर्वांगावर भल्याथोरल्या पर्वतरांगा, दर्‍याखोरी व अरण्ये आहेत.
असीम कृपा प्रदान करणारी जलदानात विशेष अशी गंगामैया (व इतर नद्याही) आहेत.
व जिच्या तिन्ही बाजूंचे रक्षण करणारे महासागरही विद्यमान आहेत.

प्रभू श्रीराम, भगवान श्रीकृष्णादी अवतारांनी पवित्र झालेली अशी ही भूमी.
अध्यात्मशास्त्र जाणणार्‍या अतिशय ज्ञानसंपन्न ऋषिमुनींची ही भूमी.
त्याचबरोबर भौतिकाचा सर्वांगीण विकास करणारे अतिशय गुणवान शास्त्रज्ञ, विविध विषयातील गुणी कलाकार, साहित्यिक, इ.दिकांची ही भूमी.

अर्वाचीन ऋषितुल्य व्यक्तीमत्वांनी आपली जीवने या भूमीच्या कल्याणाकरता वेचली.
समाजावर उत्तम संस्कार करण्याकरता अनेक थोर समाजसुधारकांनीही इथे अतोनात कष्ट घेतले.

या मातृभूमीचे रक्षण करण्याकरता असंख्य शूरवीरांनी आपले प्राणही वेचले आहेत. त्या सर्वांच्या ऋणांचे आदरपूर्वक स्मरण करणे आपले पवित्र कर्तव्यच आहे. त्यांच्यासारखा अत्युच्च त्याग आपल्याला करता आला नाही तरी देशकार्यात काहीबाही हातभार लावून त्यांचा वारसा आपण सारे उत्तम नागरिक बनून पुढे चालवूयात.

या मातृभूमीची थोरवी काय व किती वर्णन करणार ! कारण या मातेने माझ्या देहाचे जसे पोषण केले तशीच मन..बुद्धीही उत्तम संस्कारित केली आहे.
अशा या महन्मंगला मातेचे अंशतः तरी ऋण फिटण्यासाठी इथेच पुन्हा पुन्हा जन्म यावेत व हे ऋण फेडण्याची योग्यताही माझ्या ठिकाणी यावी.
(ही या मातेचरणी प्रार्थना)

जय हिंद.

वंदे मातरम

जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरियसि

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

आवडली. छानच आहे.

खूपच छान आणि प्रेअरणादायी!
विवेकानंद केंद्र किंवा तत्सम संस्थेच्या प्रार्थनेत समाविष्ट व्हावी अशी कविता...!!

अपि स्वर्णमयी लंका न मे लक्ष्मण रोचते ।
जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसि ।।

(सेड राम व्हाईल रिटर्निंग फ्रॉम अ फॉरेन कंट्री)