भारत का दिल देखो : तान्हा पोळा, मारबत आणि गोटमार

Submitted by मनिम्याऊ on 2 September, 2019 - 14:18

भारत का दिल देखो : तान्हा पोळा, मारबत आणि गोटमार

इडा पीडा, रोगराई, भ्रष्टाचार घेऊन जाय गे मारबत ...
इबोला, स्वाईन फ्लू, मंदी घेऊन जाय गे मारबत..

काही अर्थ लागतोय का? नागपूरकरांना नक्कीच लागला असेल. Lol

दरवर्षी येतो पावसाळा आणि पावसाळा संपता संपता येतो बैलपोळा.
इकडे विदर्भात बैलपोळ्याच्या दुसऱ्या दिवशी भरतो तान्हापोळा.

प्रत्येक घराची, समाजाची, प्रांताची एक संस्कृती असते. महाराष्ट्राची एक परंपरा म्हणजे बैलपोळ्याचा सण. श्रावणी अमावास्येला साजरा केला जातो. बळीराजा आणि त्याच्या या मित्राचा दिवस कसा साजरा करावा याबद्दल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात. ---

तैसाचि आला पोळा सण ।
हाहि आहे महत्त्वपूर्ण ।
यांत ठेवावें बैलांचें प्रदर्शन ।
शेती-सामानासहित ॥३२॥

उत्तम रांगेंत बैल ठेवावा ।
साजेल तैसा अंगीं भूषवावा ।
त्यांत ज्याची सफल सेवा ।
त्याचा गौरव त्या दिवशीं ||३३||

कोणीं जोडी उत्तम ठेवली ।
कोण बैलास खुराग घाली ।
इनामें द्यावीं त्यांस भलीं ।
सर्व गांवकर्‍यांनी ॥३४॥

कोणाचें उत्तम शेतीसाधन ।
कोणीं ठेवले नोकर प्रसन्न ।
त्याचें वाढवावें उच्च स्थान ।
पोळयाचिया शुभदिनीं ॥३५॥

हे तर झाले मुख्य दिवसाबद्दल पण या सणाचं एक additional feature पण आहे. इकडे विदर्भात दुसऱ्या दिवशी जोर शोर से भरतो तान्हा पोळा. हा उत्सव बालगोपालांचा आणि त्यांच्या लाकडी नंदीबैलांचा.
मोठ्या पोळ्यात लहानग्यांना विशेष भाग घेता येत नाही म्हणून खास बालकांची हौस पुरवण्यासाठी
नागपूरचे रघूजीराजे भोसले यांनी दिडशे वर्षांपूर्वी ही प्रथा सुरू केली आणि बघता बघता पूर्ण विदर्भात मोठ्या उत्साहात तान्हा पोळा साजरा केला जाऊ लागला.

तान्ह्या पोळ्याच्या दिवशी मोहल्ल्यातल्या मारोती मंदिरात आपापले लाकडी बैल घेऊन मुले एकत्र जमतात. तोरण बांधलेले असते.
IMG_20190902_233023.JPG
A
IMG_20190902_233419.JPG
विविध वेशभूषा स्पर्धा, बैल सजावटीच्या स्पर्धा, बैल घेऊन धावण्याची शर्यत असे भरगच्च कार्यक्रम होतात.
नंतर मारूतीची आरती होऊन खाऊ वाटप झाले की तोरण तुटते आणि पोळा फुटतो. मुले आपापले बैल घेऊन घरोघरी जातात.

मुलांचे तोंड गोड केले जाते आणि त्यांच्या बैलांना ओवाळून बोजारा म्हणून काही रुपये देतात.
IMG_20190902_232925.JPG

तान्ह्या पोळ्याच्या खास तान्हा बाजार भरतो. चिमूकल्यांसाठी मातीची भातुकली , मातीचे बैल, लहान मुलांची खेळणी कपड्यांनी बाजार सजला असतो. छोट्या मुलींना भातुकली भेट दिली जाते.
IMG_20190902_233110.JPG

हा आमचा घरचा नंदी ( 3 पिढ्यांनी वापरलेला)
IMG_20190827_220926.JPG

आणि हे त्याचे नैवेद्याचे ताट (घरीच बनवलेले #art attack) Lol
IMG_20190827_221035.JPG

याच दिवसाचे अजून एक खास आकर्षण म्हणजे मारबत. ही अनोखी पद्धत मात्र फक्त नागपूर शहरातच बघायला मिळते. पिवळी आणि काळी मारबत आणि त्यांचा सोबती असतो बडग्या. पूर्वी नागपूरकर भोसल्यांच्या घराण्यातील बांकाबाई नामक स्त्रीने इंग्रजांशी हातमिळवणी केली त्याचा निषेध म्हणून माराबतीची पद्धत सुरू झाली. बांकाबाईच्या नवर्याने तिला पाठिंबा दिला म्हणून मग त्याचाही पुतळा (बडग्या) बनवून त्याचीपण मिरवणूक काढतात.
images (1).jpeg
(source: internet)
काठ्या बांबू आणि पोत्यांचा वापर करून मोठे पुतळे बनवतात. त्याला चिंध्या गुंडाळतात, काळ्या आणि पिवळ्या रंगांनी रंगवतात. टायरच्या माळा घालतात . बडग्याच्या हाती मुसळ देतात आणि वाजत गाजत शहरातून मिरवणूक निघते. त्या त्या वर्षीचे राजकीय मुद्दे, रोगराई, सामाजिक समस्या अश्या चर्चेचा मुद्दा घेऊन बडग्या येतो.
या साऱ्या समस्या आपल्यासोबत घेऊन जा गे मारबत अशी आरोळी दिली जाते आणि मग माराबतींचे दहन होते. समाजातले वाईट घटक, चालीरीती, रोगराई दूर करण्याचे प्रतीक म्हणजे मारबत

थोडं पलीकडे मध्यप्रदेशात डोकावलं तर पांढुरणा शहरात या दिवशी एक वेगळाच 'गोटमारचा मेळा' साजरा होतो. अक्षरशः दगडफेकीचा खेळ खेळला जातो. जाम नदिच्या मधोमध एक पळसाची फांदी रोवली जाते. तिला लाल कापड, नारळ, हार घातले जातात
download.jpeg
(source: internet)
आणि मग सकाळी सुरू होतो दगडफेकीचा खेळ. ढोल ताश्यांच्या ( हल्ली DJ च्या) गजरात आणि भगाव - भगावो च्या ओरड्यात दोन्ही कडचे गडी कुऱ्हाड घेऊन नदीत उतरतात आणि फांदी कापायला निघतात. इकडे
अल्याड आणि पल्याडचे गावकरी एकमेकांवर दगडफेक करतात. प्रतिस्पर्ध्याला फांदी पर्यंत पोचता येऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणात दगडफेक केली जाते. अगदी गोफणीचा वापर करून लांबवर नेम साधला जातो. अखेर जो गट फांदी कापण्यात यशस्वी होईल त्याला विजेता घोषित करून चंडीमातेच्या जयघोषात हे युद्ध संपते. यात कित्येकांची डोकी फुटतात, कित्येकजण जीवाला मुकतात, नागपूरचे दवाखाने दुसऱ्या दिवशी पूर्ण भरलेले असतात. पण
प्रशासनाने कितीही बंदी घातली तरी लोकांच्या आस्थेशी जुळलेली असल्याने ही पध्दत मात्र सुरूच आहे.

[भारत का दिल अर्थात मध्य भारत. काही दिवसांपूर्वी माझ्याच एका पाककृतीच्या धाग्यावर मी मध्य भारतीय समाजरितींचा उल्लेख करून कधीतरी त्यावर लिहिण्याचा विचार व्यक्त केला होता
https://www.maayboli.com/node/67167
आता जरा सवड काढून लिहून बघितलं. इथल्याच एका सणाची काही वैशिष्ट्यं. अशा प्रकारच्या लेखनाचा पहिलाच प्रयत्न आहे. बघा जमतय का. पुढे कधी मध्य भारताबद्दल अधिक लिहिले (सामाजिक/ स्थलवर्णन/ पाककृती) तर याच नावाने (भारत का दिल देखो) प्रकाशित करेन.
आपल्या स्पष्ट प्रतिक्रिया आणि सूचनांच स्वागत आहे
- मृण्मयी ]

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा मस्त
तान्हा पोळा म्हणजे कमाईचे साधन होते. लहान असताना बैल घेउन खूप हिंडायचो पैसे जमा करायचे. गेल्या वर्षी कुणी रुपया दिला होता कुणी फक्त काकडी दिली होती हे लक्षात ठेवून त्यांच्या घरी जायचे. मला तरी मोठ्या पोळ्यापेक्षा तान्हा पोळाच आवडायचा.
पळसाची फांदी मोठ्या पोळ्याच्या आधी दरावाज्यात ठेवायची. लहान बैल मांडायचे त्यांना सांगायचे आज आमंत्रण घ्या उद्या जेवायला या. दुसरे दिवशी मोठ्या बैलांचा नैवेद्य झाला की मग बहीण भावाच्या पाठीवर काकडी फोडनार. दुसरे दिवशी तीच काकडी आणि भिजवलेली दाळ सर्व मुलांना देणार. तान्हा पोळ्याच्या दिवशी मारबत येणार माशा मुरकुटे घेउन जारे मारबत असे म्हणत. ती पळसाची फांदी त्यात द्यायची. बऱ्याच गोष्टी आठवल्या.
मी स्वतः पांढुर्ण्याला जाउन गोटमार बघितलेली आहे. मला ती गोटमार फारशी आवडली नाही. मी दुरुनच परत आलो होतो. मला त्यापेक्षा तिथून जवळच असलेल्या केळवद या गावातला पोळा आवडायचा. उत्सव होता.

तान्हा पोळा म्हणजे कमाईचे साधन होते. लहान असताना बैल घेउन खूप हिंडायचो पैसे जमा करायचे. मला तरी मोठ्या पोळ्यापेक्षा तान्हा पोळाच आवडायचा>> same here.. Happy

या वर्षीची गोटमार
IMG_20210907_202454.JPG

आणि हा नगरपालिकेनी आणून टाकलेला दगडांचा ढीग
IMG_20210907_202100_0.JPG

आमच्या गावात पोळा, तान्हा पोळा होता, मारबत निघायची >> आमच्या गावात पण निघते मारबद..
पोळ्याला गोटमार फक्त पांढुर्णा आणि सावरगाव ला होते.

<<पण त्या दगडगोट्यांनी दुखापत नाही होत?
Submitted by सामो on 7 September, 2021>>

प्रचण्ड प्रमाणात होते. आज रात्रीपासूनच दवाखाने जखमी रुग्णांनी भरतील. गोटमारमधे मृत्यू देखील होतात.

छान लेख.
बापरे दगड मारायचा खेळ लय डेंजर!

गोटमारमधे मृत्यू देखील होतात.>> आणि नगरपालिका गोटे आणून देऊन ते मृत्यू व्हावेत ह्याची योजना करते. खरंच, भारत का (पत्थर)दिल देखो!

(वरच्या फोटोवरून नगपालिकेने मारण्यासाठी गोटे आणून ठेवलेत असं वाटलं. तो ढीग जर पोस्ट-गोटमार गोळा केलेल्या गोट्यांचा असेल, तर माझे शब्द मागे घेतो.)

आणि नगरपालिका गोटे आणून देऊन ते मृत्यू व्हावेत ह्याची योजना करते. खरंच, भारत का (पत्थर)दिल देखो! >>
Submitted by हरचंद पालव...
परंपरा.. Sad
प्रशासनाने अनेकदा बंदी आणली आहे. कित्येक जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रथेविरोधात आदेश काढले आहेत पण प्रथेच्या नावाखाली हे सुरूच आहे

एव्हरेस्ट वर चढाई करताना कित्येक गिर्यारोहक मरतात पण त्यावर कोणी बंदी आणायची मागणी करत नाही, मग या खेळावर बंदी आणायची मागणी का? सगळे धोके समजून उमजून सज्ञान व्यक्तींनी सार्वजनिक रित्या भाग घ्यायचा खेळ आहे.

प्रशासनाने दगड पुरवण्याबरोबरच हेल्मेट पण पुरवावीत म्हणजे मृत्युदर कमी होईल. अगदीच गरज पडली तर "काल माझ्या स्वप्नात देवी आली आणि तिने भक्तांना हेल्मेट वापरायला सांगितलंय" अशी कथा कलेक्टर ला प्रसारित करता येईल

लोक स्वतःहून खेळत असतील तर स्वतःच्या जबाबदारीने खेळू द्यावे प्रशासनाने ना दगड पुरवावे ना हेल्मेट.

वा! छान लेख. इतके वर्षं नागपुरात राहून मी मारबत नाही पहिली. आणि गोटमार पण पहिल्यांदाच ऐकलं. तान्हा पोळा अगदी लहान असताना एन्जॉय केला. आता मेट्रो सिटीस मधल्या डे केअर/ शाळा यांमध्ये पण हॅलोविन साठी पोरं घरोघरी (कधी कधी तर आसपासच्या दुकानांमध्ये) जाताना पाहून जीव तुटतो. तान्हा पोळ्याला घरोघरी जाण्याची लाज वाटते पण हॉलोवीनला मात्र नाही वाटत, हे पाहून वाईट वाटतं.

मनिम्याऊ छानच माहिती. माझा राहून गेलेला हा लेख वाचायचा. बरे झाले वर काढलास.
गोटमारमधे मृत्यू देखील होतात तरीही लोक खेळतात हे वाचुन खरंच वाईट वाटले. बातम्यां मध्ये बघितलेले तेव्हा हि आश्चर्य वाटलेले.
तान्ह्या पोळ्याचा सण इंटरेस्टिंग वाटतोय. मातीची खेळणी आणि बैल छानच आहेत.

अरे वाह !! फारच सुंदर लेख ,

ऑफिस मधील नागपूरकर जनतेला मारबत, बडग्या, संदल, ताजुद्दिन बाबा इत्यादी विषयांवर हळवे होताना बघितले होते, त्याचा कार्यकारणभाव आज कळला,

विलक्षण informative आणि सरळ लेख आवडलाच.

https://www.loksatta.com/photos/news/3096894/photos-a-procession-of-blac...

या वर्शी नागपुरात झोकात व गर्दीत मारबत व बडग्या मिरवणूक साजरी झाली. वर लिंक मध्ये वृत्तांत आहे व फोटो. पिवळी मारबत काय भारी दिसते.

आत्ताच बांकाबाई भोसले यांच चरित्र वाचनात आल. लेखकाच्या म्हणण्यानुसार रघुजीराजांचे पुत्र राज्यकारभार चालविण्यास मनाने सक्षम नव्हते आणी इंग्रज रेसिडेंट वर बांकाबाईंनी अतिशय आंधळा विश्वास ठेवला.
पुस्तकात शेवटी वाड्यातले देव , सोन्याचांदीच्या समया वगैरे जप्त करून नेल्याचे वर्णन आहे ते वाचून फार वाईट वाटलेले.

तान्ह्या पोळ्याला २१६ वर्षे पूर्ण.. काही क्षणचित्रे

नागपुरातील भोसले राजवाड्यात आयोजित तान्हा पोळा
IMG_20220828_091635.jpg
आठ फूट उंच मानाचा नंदी मिरवायला बाहेर पडताना.
IMG_20220828_091728.jpg
त्याच्या पायात चांदीचा तोडा
IMG_20220828_094841.jpg

मानाच्या नंदी पाठोपाठ मिरवणूक
IMG_20220828_091825.jpg

Pages