चष्मा... एक बनवून घेणे( स्वत: करता, स्वत:ला नाही)!

Submitted by अदित्य श्रीपद on 5 September, 2021 - 10:59

मला, १९९३ साली, इयत्ता दहावीत असताना चष्मा लागला. त्यानंतर आजतागायत म्हणजे २८ वर्षे मी चष्मा वापरत आलो आहे. हल्ली हल्ली, म्हणजे २-३ महिन्यापूर्वीपासून दिवसभर कम्प्युटरवर काम केल्याने डोळे थकल्यासारखे वाटणे, डोके दुखणे असे त्रास होऊ लागल्याने नंबर तपासून आलो. त्यावेळी आता डोळ्यांना जवळचा नंबर देखिल आला असून बाय फोकल किंवा प्रोग्रेसिव लेन्स असलेला चष्मा घ्यावा लागणार असे निष्पन्न झाले. अनेक जणांकडून ऐकल्यामुळे आणि अगदी घराजवळ लेन्स्कार्टचे शोरूम असल्याने हा काय प्रकार असेल ते एकदा(चे) पाहावे असा विचार करून त्या शोरूम मध्ये गेलो.
तिथे आत गेल्या गेल्या हे प्रकरण आपल्यला झेपणारे (आणि मुख्य म्हणजे परवडणारे) नाही हे जाणवले होते. पण आता आलोच आहे तर बघू तरी काय प्रकार आहे! असा विचार करून पुढे गेलो. तिथल्या बाईने मला चष्म्याच्या फ्रेम्स दाखवायला सुरुवात केली. हल्ली चष्म्याना इंग्रजीत स्पेक्टकल्स म्हणत नाहीत तर आयवेअर असे छान सोपे सुटसुटीत नाव आहे.(हे आवडले आपल्याला – ‘मेल्या! चांगल्याक चांगला म्हणू व्हया.’ असा आमचा मालवणी दोस्त म्हणत असे.) नंबरचे चष्मे म्हणजे प्रेस्क्रीपशन आयवेअर बरका! असो, तर त्या ताईनी( हो बाई म्हणणे कसेसेच वाटते, खरे तर मॅडमच म्हटले पाहिजे) आम्हाला जी माहिती दिली ती अशी-
चष्म्याच्या फ्रेम्स दोन प्रकारच्या आहेत. जॉन जेकब, एअर, विन्सेंट असे विदेशी ब्रँड आणि लेन्स्कार्टच्या स्वत: बनवलेल्या फ्रेम्स. ह्या ज्या विदेशी कंपन्या आहेत, त्यांच्या फ्रेम्स आणि प्रोग्रेसिव लेन्सेस असे मिळून एक चष्मा साधारण २५ हजार रुपयाना पडत होता. अर्थात मला आधीपासून अंदाज असल्याने आणि मुख्य म्हणजे हृदयविकार, उच्च रक्तदाब असे काही विकार नसल्याने (फार)काही त्रास झाला नाही. मी विचारले ह्या चष्म्यात असे काय आहे, कि २५ हजार रुपये किंमत होते? हा प्रश्न विचारल्या बरोबर ताईंच्या मनातली माझी किंमत घसरल्याचे त्यांच्या डोळ्यातून जाणवले. (हा अनुभव काही नवीन नाही म्हणा आम्हाला.)असो तर त्यानी ह्या चष्म्याच्या काचा कशा पातळ असतात चष्मा कसा लाईट वेट असतो शिवाय त्याची काच इतकी उच्च प्रतीची असते कि तुमच्या डोळ्यांचे व्यंग पूर्णपणे सुधारून तुम्हाला अगदी नवदृष्टी कशी देते, त्या काचा अँटी ग्लेअर म्हणजे चकाकी रोधी असून कहर म्हणजे त्या ब्ल्यू लाईट म्हणजे निळाप्रकाश गाळणाऱ्या असल्याने तासंतास कम्प्युटर, मोबाईल स्क्रीन वगैरे बघितल्याने रेटीना, म्याक्युला (हे म्हणे डोळ्याचे आतले महत्वाचे अवयव असतात) ह्यांना होणारे नुकसान टाळतात. डोळ्याचा कॅन्सर(बापरे!) होण्याची संभावना देखिल ५० टक्क्यांनी कमी होते...असे पुराण(इंग्रजीतून) लावले. शिवाय ना सर! हा तुमचा आमच्याकडचा पहिलाच चष्मा असल्याने तुम्हाला एकावर एक चष्मा फुकट सुद्धा मिळेल अर्थात काचा प्रेस्क्रीपशन लेन्सेस असल्याने त्यांचे ९ हजार वेगळे पडतील अशी मौलिक माहिती पुरवली. (अहो म्हणजे दोन चष्मे ३४ हजाराचे झाले कि. एक चांगला कॅमेरा येईल त्यात. हे आम्ही मनात.) बर, म्हटले आज ऑर्डर दिली तर कधी मिळेल? तर म्हणाल्या ८ ते १० दिवस लागतील. अरे! का? एवढा वेळ का लागेल?असे खोटे खोटे चित्कारत विचारले तर म्हणाल्या काचा ज्या आहेत न सरsss! त्या दिल्लीला बनतात. त्यामुळे एवढा वेळ लागतो. म्हटले असे का? पुण्यात काय काचा बनवणारे लोक नाहीत कि पुण्यात पूर्वी चष्मे बनत नसत! तर म्हणाल्या तसे नाही सर! आम्हाला हव्या त्या क्वालिटीच्या काचा फक्त दिल्लीलाच बनतात.
हा सगळा वेळ ताई माझ्याशी इंग्रजीच फाडत होत्या ( माझे इंग्रजी अगदी उत्तम नसले तरी ताई इतके बिनअस्तराचे नाही.पण... असो!)त्यांच्या शर्टाच्या खिशावर नाव होते उर्वी. मी म्हटले तुमचे नाव काय? त्या म्हणाल्या उर्वी. हो ते मी वाचले पण आडनाव काय आहे?(काय अगोचर इसम आहे हा! असे भाव तरळले त्यांच्या डोळ्यात) तर म्हणाल्या साठे. म्हणजे मराठीच कि. तरीही इंग्रजी आणि ते देखिल पुण्यात आणि समोरचा माणूस मराठीत बोलत असताना का फाडायचे, असेल, कंपनीची सक्त ताकीद असेल त्यांना तशी. हल्ली त्याला कार्पोरेट पॉलिसी म्हणतात.
नाही बुवा मला इतके दिवस थांबणे नाही परवडणार (हे आपले एक कारण किंवा पळवाट)असे म्हणून बाहेर पडलो आणि आपल्या नेहमीच्या नाक्यावरच्या चष्मेवाल्याकडून चष्मा त्या ताईनी सांगितलेल्या आणि कौतुकलेल्या सगळ्या वैशिष्ट्यांसकट बनवून घेतला. एकूण किंमत ४७५० पडली. दोन दिवसात चष्मा बनला. शिवाय त्याने जादा ब्रिज पॅड, ते काचा पुसायचे कापड आणि द्रावण फुकट दिले.
जाता जाता एक, हे जे काही ब्ल्यू लाईट म्हणजे निळाप्रकाश गाळणाऱ्या काचांची माहिती सांगितली जाते ना! ते एक थोतांड आहे. खाली दिलेली लिंक टीचकून पहा... अर्थात ही आमची पश्चातबुद्धी/ मागाहून सुचलेले शहाणपण किंवा वरातीमागून नाचवलेलं घोडं
https://www.youtube.com/watch?v=NkJY9bgLyBE
आदित्य

Group content visibility: 
Use group defaults

मी पण तीन महिन्यांपूर्वी या वैशिष्ट्यांसकट चष्मा बनवला 3800 ला. हे निळा रंग फिल्टर बोगस आहे हे नव्हते माहीत.

बरोबर आहे.
मी एकदा नव्या पद्धतीच्या फ्रेमचा ( प्लास्टिक, १५००रु) चष्मा दुकानात बघायला गेलो होतो तेव्हाच दुसरी एक बाई तसल्या फ्रेमची तक्रार घेऊन आलेली. तिला विक्रेती सांगत होती की आता यात काचा बदलता येणार नाहीत, टाकून द्या. मी लगेच तिकडून सटकलो.

कंपनीची सक्त ताकीद असेल त्यांना तशी. हल्ली त्याला कार्पोरेट पॉलिसी म्हणतात.>>>

असले काही नाही! हे इंग्रजी वा हिंदी थेर फक्त मराठी माणूस खपवून घेतो. इथे हैद्राबादेत कोणतेही शोरूम असो वा कोणत्या जाहिरातवाल्यांचा फोन सर्व प्रतिनिधी सुरुवात तेलगुतच करतात मग मी त्यांना मराठी सांगतो प्राधन्याने मराठी जमत नसल्यास हिंदी आणि ती देखिल जमत नसल्यास इन्ग्रजीत बोला. मला तेलगु येत नाही! मग गोंधळून ते तोडक्या मोडक्या हिंदीत बोलतात.

दोन मराठी माणसे भेटली तरी इंग्रजीत सुरुवात करतात. 'मला तर इंग्राजांपेक्षाही ह्या इंग्रजाळलेल्या मराठी माणसांचा जास्त राग येतो' -- इति नारायणाचा पुतण्या.. Wink

मी देखिल मध्यंतरी लेन्सकार्ट मध्ये चौकशी केली आणि साध्या दुकानात जावून २ दिवसांत बनवून घेतला चष्मा..

छान लिहिलंय,
निळा रंग फिल्टर बोगस आहे हे नव्हते माहीत.>>मम

मायबोली चा सदुपयोग

ब्लु लेन्स चा मार्केटिंग मागे काहीतरी 'काळंबेरं' असल्याची शंका होतीच.

फार नविन होती ही टेक्नोलॉजी तेंव्हा आपल्या आवाक्याबाहेरची किंमत असल्याने सटकलो होतो दुकानातून.

मी नुकतंच मला बनवून घेतलं Sad

मोठा ब्रँड नसला तरी लोकल चेन आहे.

दुकान आणि विक्रेता गुजराती असूनही माझ्याशी मराठीत बोलतात.

लेख गूप खुसखुशीत आहे. आवडला. ब्लू लाइट ब्लॉकिंग चष्म्यांचा उगीचच गवगवा आहे. UV लाइट ब्लॉकिंग कोटिंग हे मात्र उपयोगी अहेत. विशेषतः सन ग्लासेस साठी.

निळा रंग फिल्टर बोगस आहे हे नव्हते माहीत>>> +१. पण त्या काहीजणांना खूप कूल दिसतात.स्पेशली कॅट आय फ्रेममधे.
माझा चष्मा बनवून घेताना जास्त किंमत असल्यामुळे घेतल्या नव्हत्या.

७० हजाराचा चष्मा!!!

काचां ऐवजी हिर्‍याची तबकडी आणि काड्या कसल्या गोल्ड प्लेटेड होत्या का?

अर्थात डोळ्यांचा प्रश्न आणि खिश्याचा होकार असेल तर काहीही करता येतं! Happy

मी आताच १६००० चा घेतला. आधीच्या प्रोग्रेसिव्ह चष्म्याला १२ वर्षे झाली होती. नंबर बदलला नव्हता. पण यात वाचायचा नंबर क्लिनिकमध्ये जाऊन नीट अ‍ॅडजस्ट करून घेतला. मला पेपर, फोन चष्मा कपाळाला लावून वाचायची सवय लागली होती. पीसीवर फाँट मोठे करायचो. आता नाही करत.
यातही ब्लू लाईट ब्लॉकिंग सांगून हजार-बाराशे जास्तची लेन्स घातली.

चष्मा घेताच एका मित्राने लेन्सच्या किंमती ऑनलाइन बघायला हव्या होत्या असं सांगितलं.

माझा अनुभव वेगळा आहे की ब्लु ब्लॉक होत त्या लावलेल्या काचेमुळे.
युव्ही वापरुन प्रात्यक्षिक दाखवल चष्मावाल्याने

एका मित्राने ७० हजारचा चष्मा बनवला होता >>> अरे बापरे!
If it was worth that money , then fine .
पण इतका महाग चष्मा घ्यायची माझी हिंमत होणार नाही.

माझ्या बायकोने 2009 मध्ये 14000 चा चष्मा घेतला होता.
त्या काळचे 14000 म्हणजे आताचे विख्खी व्याख्खी व्याख्ख्या??
अन तो वापरलाही नाही.

मी देखील वयाच्या १०व्या वर्षांपासून चष्मा वापरतो आहे, पण फक्त दूरच्या नंबरसाठी (अर्थात !!). मला लेन्सकार्ट गल्लीतील इतर दुकानांपेक्षा नेहेमीच स्वस्त पडलं आहे. गल्लीतील दुकानांमध्ये फ्रेम आणि भिंगांच्या काहीच्या काही किमती सांगतात.

नुकतीच चाळीशी ओलांडली असल्याने मला जवळचा नंबर लवकरच सुरु होणार. ही प्रोग्रेसिव लेन्स ची भानगड मलाही निस्तरावी लागणार आहे. तेव्हा ह्या सूचना नक्कीच उपयोगी पडतील.

मला या चष्म्याने थर्मॉमीटरवरचे आकडेही स्पष्ट दिसताहेत. आधी चष्मा काढून डोळ्याजवळ धरून पहावे लागे.
तेव्हा बाय फोकल /प्रोग्रेसिव्ह चष्मा बनवताना वाचायला व्यवस्थित दिसेल असा नंबर प्रिस्क्राइब करून घ्या.

धमाल लेख आहे.

त्या काळचे 14000 म्हणजे आताचे विख्खी व्याख्खी व्याख्ख्या?? >> Lol Lol

जवळचा नंबर लागला काही वर्षांपूर्वी तर प्रोग्रेसिव चष्मा बनवलेला, काही महिने लागले ऍडजस्ट होण्याकरता. १२००० लेन्स आणि ४००० ची फ्रेम, हळू हळू वेळ वाढवत नेला आणि नंतर जमू लागले वर खाली करत प्रोग्रेसिव चष्मा वापरायला. हाफ रिम असल्यामुळे, नंबर बदलला त्यावेळी लेन्स ची साईझ थोडी मोठी केली, त्यामुळे अड्जस्ट होण्याकरता वेळ कमी लागला.
एकंदरीत तुम्ही चष्मा कुठे बनवता त्यावर किंमत ठरते, टायटन, गंगर मध्ये जास्त आणि जवळच्या छोट्या दुकानात खिशाला परवडेल अशी.

माझ्या बायकोने 2009 मध्ये 14000 चा चष्मा घेतला होता.>>>> बाबौ!

२०१३-१४ मधे ऑफिसमधेच डोळे तपासून कमी रेटमधे फ्रेमची ऑफर होती.मला असल्या प्रकारात अजिबात रस नव्हता.मीच म्हनायचे की असे डोळे तपासून घेऊ नये.तरी मैत्रिणीबरोबर जाऊन फ्रेम पाहिल्या.एक मला फार आवडली.मग प्रोग्रेसिव्ह चष्मा करायला दिला.पहिल्या दिवसापासून काहीही कटकट न होता वापरतेय.फक्त २ की२.५ मधे झाला तो चष्मा!आजही तो चष्मा मला आवडतो.गेल्या वर्षीनंबर ०.२५ ने वाढल्यावर फ्रेम दुसरी घेतली आणि प्रोग्रेसिव्ह लेन्स पण एकदम पातळ आणि ट्रान्स्परंट आहेत.ब्लू नाही घेतल्या.९५०० झाले. मी १०-११ चे बजेट ठर्वून गेले होते.ही फ्रेम छोटी होती म्हणून की काय या चष्म्याने मला फार त्रास दिला. एका डोळ्याने नीट दिसायचे नाही किंवा खाली पहाताना गरगरल्यासारखे व्हायचे.परत नेऊन दाखवला तर अलाईन्मेंट चुकली होती म्हणाला दुकानवाला.नंतर
परत त्याने नीट केला.असं २ वेळा झाले. सध्या चांगले चाललेय.

आपल्या नेहमीच्या नाक्यावरच्या चष्मेवाल्याकडून चष्मा त्या ताईनी सांगितलेल्या आणि कौतुकलेल्या सगळ्या वैशिष्ट्यांसकट बनवून घेतला. एकूण किंमत ४७५० पडली. दोन दिवसात चष्मा बनला. शिवाय त्याने जादा ब्रिज पॅड, ते काचा पुसायचे कापड आणि द्रावण फुकट दिले.
<<
:वर केलेला अंगठा:

प्रोग्रेसिव्ह वि. बायफोकल.

(वि. चष्मा लावणे.)

सर्वात आधी कंस सोडवू.

चष्माच लावायला आवडत नाही, ही बेसीक कंडीशन विशेषतः स्त्री पार्टींची असते. तो लावा वा च लागणार असल्याने शक्य तितकी छोटी फ्रेम घेऊन त्यात वरून बायफोकल बनवणे असले उद्योग करतात. चक्क अर्ध्या साईजच्या 'रिडींग ग्लासेस' फ्रेममधे बायफोकल बनवतात. हे असे उद्योग चष्मेवाले का करतात तेही अगम्य आहे, पण मग तो चष्मा त्रासच देणार असल्याने कपाटात ठेवून देतात.

असा चष्मा त्रास देतो कारण ही अशी छोटीशी बकरीची शेपटी बनवून आणलेली असते, जिच्याने लाजही झाकली जात नाही अन माश्याही हाकलता येत नाहीत.

तेव्हा उत्तर :
१. चष्मा लावा वा च लागणार असल्यास (नेहेमी वापरायचा असो किंवा बायफोकल्/प्रोग्रेसिव्ह) किमान डोळ्याची खोबण आहे त्या साईजची फ्रेम घ्या. (फक्त वाचनाचे अर्धे चष्मे असतात, ज्यात वाचताना चष्म्यातून अन इतर वेळी खडूसपणे चष्म्यावरून पहायचे असते. मी तुमच्याकडे पाहतो आहे अशी कल्पना करा, लक्षात येईल. अश्या चष्म्याबद्दल मी बोलत नाहिये.)

२. गोल चेहर्‍याला चौकोनी फ्रेम अन चौकोनी चेहर्‍याला गोल फ्रेम वगैरे ब्यूटी अ‍ॅडव्हाईस यडपट असतो. डोळा व आपल्या नजरेचा आवाका (विजुअल फिल्ड्स) गोलाकार आहे. चौकोनीच हवा असेल तर पुरेसा मोठा घ्या.

३. चष्मा वजनाला हलका हवा. ७-८ बाळंतपणांना चालेल असा सागवानी लाकडाचा पाळणा बनवल्यागत दडस चष्मा घेउ नका. चाळीशीचा चष्मा उर्फ प्रेस्बायोपिया ग्लासेस (प्रेस्बायोपिया = मराठीत वृद्ध-दॄष्टिता.) चा नंबर सुमारे २-२॥ वर्षांत बदलतो (वाढतोच) तेव्हा २ वर्षे चालेल इतपत चष्मा घेतलेला बरा.
लाईट्वेट चष्मा जास्त वेळ वापरल्यास काढून फेकावा वाटत नाही, नाकावर वळ उमटत नाहीत.

४. चष्मा हे व्यंग नसून "तुमच्या डोळ्याची चप्पल" आहे. 'व्हिज्युअ एड'. तो फॅशन अ‍ॅक्सेसरी म्हणून वापरा. कुबड्या म्हणून नाही. डोळ्याचा दागिना आणलाय, जरा घालून मिरवत जा.

***

आता, प्रोग्रेसिव्ह घेउ की बायफोकल ?

बायफोकल उर्फ "टिक्ली वाला" चष्मा अनेकांना 'टिकली'ची कॉस्मेटीक भीती/तिटकारा असतो, मग प्रोग्रेसिव्ह बनवतात.

रूल ऑफ थंब असा आहे, की पहिलाच ४०शीचा चष्मा असेल, तर प्रोग्रेसिव वा बायफोकल तुमच्या खिसापाकिटानुसार पहा. (ग्रामिण भारतात बायफोकलची चलती आहे.)
पण एकदा बायफोकल सुरू केला, की समहाऊ आपल्या मेंदूला प्रोग्रेसिव्ह चष्म्याच्या वापराची सवय सहसा होत नाही. (मोतीबिंदूच्या 'मल्टीफोकल' म्हणजेच प्रोग्रेसिव्ह लेन्सेसचीही हीच गम्मत आहे, एका डोळ्यात मोनोफोकल असेल, तर दुसर्‍या ऑपरेशनला तोच वापरावा लागतो)
तेव्हा प्रोग्रेसिव्ह चष्मा (अ‍ॅज सेकंड्/थर्ड ग्लासेस, आफ्टर युजिंग बायफोकल्स) चष्मावाल्यांनी कितीही रेकमेंड केला तरी घेऊ नका. घ्यायचाच असेल, तर "सूट" न झाल्यास फेकून द्यायची तयारी ठेवा. हे चष्मे भरपूर महाग असतात. बाफो १००० रुपयाला असेल, तर प्रो ३-४ किमान हजारात जातो.

आता,

"सूट होत" असेल, तर प्रोग्रेसिव्ह सारखा उत्तम चष्मा नाही.

बेसिकली, बायफोकल म्हणजे २ फोकस. एका फ्रेममधे काचेत २ भाग. दोघांचा फोकस वेगवेगळ्या ठिकाणी. वरची काच 'दूर'च्या नजरे साठी, अन खालची टिकली, किंवा इतर आकार ( D किंवा एक्झिक्युटिव्ह) जवळच्या अंतरासाठी.

हे २ पायर्‍यांच्या जिन्यासारखे आहे.

यात "दूर"ची नजर म्हणजे सुमारे १० फुटापलिकडले, अन "जवळची" म्हणजे डोळ्यापासून १४ इंच.

(हे जवळचे सव्वा फूट अंतर हे आपले नॉर्मल वर्किंग डिस्टन्स असते, ते का कसे वगैरे इथे औटॉफ स्कोप आहे. यापेक्षा जवळच्या अंतरावर चष्मा लावूनही दिसत नाही हे लक्षात असू द्या.)

तर मुद्दा हा, की "दूर" अन "जवळ" यांच्या दरम्यानचे अंतर बायफोकलमधे 'स्पष्ट' दिसत नाही. त्यामुळे, उदा. कॉम्प्युटरवर सव्वा फुटावरचा कीबोर्ड दिसतो, पण २ फुटावरचा स्क्रीन पहायला अशी मान वर करून पुढे वाकावे लागते. हे खासकरून ५०शी नंतर होते, जेव्हा डोळ्याची नैसर्गिक फोकसिंग लवचिकता जवळपास शून्यावर आलेली असते.

प्रोग्रेसिव्ह चष्म्यात काचेतील दूर पहाण्याच्या बिंदूपासून जवळ पाहण्याच्या बिंदूपर्यंत काचेची पॉवर, प्रोग्रेसिव्हली, अर्थात पायर्‍यांऐवजी रॅम्प असावा तशी वाढत गेलेली असते. त्यामुळे थोडी मान खालीवर केली तर वेगवेगळे अंतर फोकसमधे येते.

यामुळे हा चष्मा उत्तम. शिवाय जवळचा ठिपका २ स्टेप पुढचा घेतला, तर तो 'वाढत्या मापाच्या चड्डी'सारखा असतो. त्यामुळे २-२॥ वर्षांऐवजी ५-७-१० वर्षेही चष्मा चालवता येऊ शकतो. (वरचा नंबर स्टेबल आहे असे गृहित धरून)

आता यात अडचण एकच असते, की आपल्या डोळ्यांची हलचाल दूर व जवळ बघताना V आकारात होते. त्यामुळेच बायफोकलची टिकली नाकाच्या जवळ आणलेली असते. त्यामुळे प्रोग्रेसिव्ह चष्म्ञातून 'तिरपे' पाहिले तर मग लोचा होतो. कारण रँपचा शेप V आहे, तुम्ही तिरपे पाहिलेत तर दोन्ही डोळ्यांसमोरची पॉवर असंतुलित होते, दोन डोळ्यांत उमटणारी चित्रे वेगळ्या रिझोलुशनची येतात, इमेज मिक्सिंग बोंबलते, पॅरलॅक्स येतो, अन मग 'प्रोग्रेसिव्ह चष्मा सूट' होत नाही.

यापेक्क्षा जास्त विस्कटून सांगता येणे कठीण आहे. तेव्हा, प्रोग्रेसिव्ह की बायफोकल ते तुम्ही ठरवा. प्रोग्रेसिव्ह यायच्या पूर्वी काचेत "ट्रायफोकल" चष्मे देखिल येत, आजकाल ऑप्टिकल क्वालिटी काँप्रोमाईज न करता प्लॅस्टिक शेप मोल्डिंग करता येत असल्याने व असले विकृत टॉरिक शेप्स/ कर्व्हेचर्स कॅल्क्युलेट व मॅन्युफॅक्चर करणे सुलभ झाल्याने आपल्याला प्रोग्रेसिव्ह चष्म्याची देणगी लाभली आहे.

कोणता घ्यायचा ते कसे ठरवावे याची उकल यातून झाली असावी अशी आशा करतो.
असो.

* उपसंहार * (अर्थात शेपूट)

'अँटी ग्लेअर' 'ब्लू ब्लॉक' वगैरे.

दोन्ही मार्केटिंग गिमिक्स आहेत.

अँटी ग्लेअर ही नाईट ड्रायव्हिंगमधे लाईटची ग्लेअर कमी करण्यासाठी आहे. काँम्प्युटर स्क्रीनची ग्लेअर कमी करायला स्क्रीन्ला बटणे दिलेली आहेत.

ब्लूब्लॉक बद्दल मूळ लेखात आलेच आहे.

समोर कॉम्पुटर ठेउन कामे करणार्‍यांना लय पैशे भेटतात, अन त्यांना आम्रविकेतल्या चष्म्यांच्या किमतीह ठाऊक असतात म्हणून ते पैसे त्यांच्या खिशातून काढण्यासाठी आजकाल मेट्रोजमधे २०-३०-५०-७० हजारांचे चश्मे मिळतात..

"ड्राय आईज" नावाचा नवा आजार फार्मा कंपन्यांनी शोधून काढला आहे. त्याच्या मार्केटिंगमधे भरपूर प्रोग्रेसही आहे.

याची बेसिक ट्रीटमेंट २०-२०-२० आहे. जुन्या कोण्या गणेशोत्सवात मी ती आधी सांगितलेलीही आहे.

***

हे माझे २ शब्द आपण शांत चित्ताने ऐकून घेतले त्याबद्दल धन्यवाद!

जय हिंद, जय महाराष्ट्र.

लेन्स्कार्ट इ. ऑनलाईन चष्मे घेताना, "आय पी डी" नामक एक रीडिंग ते लोक मागतात.

तुमच्या चश्म्याच्या प्रिस्क्रिप्शनमधे हे लिहून मिळत नाही.

अन हे रीडिंग नसेल, तर चष्मा सूट होणेबद्दल तुम्ही अन तुमचे नशीब.

अंगठ्याच्या नियमाने तुम्ही २६ वर्षांच्या स्त्री आहात म्हणुन तुमच्या चेहर्‍याची अ‍ॅवरेज साईज इतकी म्हणून आय पी डी इतके असे ठोकताळे ७०% वेळा बरोबर असतात. तुम्ही त्या अ‍ॅव्हरेज प्रकारचे नसलात, तर गुड लक.

बेटर गेट इट टेलर मेड बाय युअर नेबरहुड ऑप्टीशियन.

रच्याकने : आम्रविकेत ऑनलाईन बनवलेले नेबरहुड ऑप्टीशियनपेक्षा स्शियनपेक्षा, म्हणून आपणही ते करावे अशी कविकल्पना आपल्याकडे आहे Happy

पण एकदा बायफोकल सुरू केला, की समहाऊ आपल्या मेंदूला प्रोग्रेसिव्ह चष्म्याच्या वापराची सवय सहसा होत नाही. >>> and vice a versa?
मी आधीचे दोन चष्मे प्रोग्रेसिव्ह असताना तिसरा चष्मा बायफोकल करण्याचा आगाऊपण केला. होईल सवय म्हणुन आठवडाभर काढला. शेवटी लेन्स बदलून प्रोग्रेसिव्ह करून घेतला.

नवीन Submitted by मानव पृथ्वीकर on 13 September, 2021 - 20:23
<<
व्हाइसे वर्सा इज ट्रू ऑल्सो.

It's about brain learning how to mix images to form a 3D image from two verrrrrrry high res cameras that are set a little distance apart from each other.

(BTW This is exactly what a child learns for first almost 10-11 years of its life!0

मी पहिल्या प्रकारे वर्णन केले कारण उत्तम दर्जाचे प्रोग्रेसिव्ह ही गेल्या १०-१५ वर्षांतली प्रगती आहे. माझ्या वयातील लोकांना (ज्यांना ४०शी लागून १५+ वर्षे झालीत) त्यांना मार्गदर्शन व्हावे हा उद्देश.

<< त्यामुळे प्रोग्रेसिव्ह चष्म्ञातून 'तिरपे' पाहिले तर मग लोचा होतो. कारण रँपचा शेप V आहे, तुम्ही तिरपे पाहिलेत तर दोन्ही डोळ्यांसमोरची पॉवर असंतुलित होते, दोन डोळ्यांत उमटणारी चित्रे वेगळ्या रिझोलुशनची येतात, इमेज मिक्सिंग बोंबलते, पॅरलॅक्स येतो, अन मग 'प्रोग्रेसिव्ह चष्मा सूट' होत नाही. >>

------ नाकासमोरचेच बघायचे / वाचायचे.... वस्तू नाकासमोर नसेल तर तिला बघण्याअगोदर नाकासमोर आणायचे. Happy

आ रा रा - नेहेमीप्रमाणे छान माहिती दिली. २० २० २० बद्दल तुम्ही लिहीलेले आठवते.

डॉ , आ,रा,रा , छान समजावून सांगितलंत.
मला नेबरहुड ऑप्टिशियननेच १६००० ला बनवला की चष्मा. ब्लू ब्लॉकचे १०००-१२०० जास्त.

Pages