इंजिनिअरींगच्या शेवटच्या वर्षाच्या प्रोजेक्ट साठी मदत कशी मिळवावी?

Submitted by प्रगल्भ on 2 September, 2021 - 02:54

प्रिय मायबोलीकर,
सा. न. वि. वि.

मी सद्ध्या इंजिनिअरिंग च्या शेवटच्या वर्षात नुकताच प्रवेश केलेला आहे. लगोलग final year project बद्दलच्या अनाउन्समेंट आणि एक दोन मीटिंग देखील झाल्या आहेत.

दोन आठवड्यांत आम्हाला group formation & subjects list ह्या गोष्टी करायला सांगितलेल्या होत्या.

मी आणि माझ्या तीन वर्ग मैत्रिणी असा आमचा चार जणांचा ग्रुप तयार झालेला आहे.

एक दिवस सहज बोलता बोलता मला आपल्या भारतीय मिलिटरी / डिफेन्स साठीच्या project बद्दल एक Hot concept सुचली होती. ती आम्ही discuss केली.

तातडीने आमच्या Relations maintain करणाऱ्या शिक्षकांना ही गोष्ट फोनवर सांगितली. त्याच्या सोबत अजून दोन विषय देखील दिले. पण ते सर म्हणाले की "तुम्ही तिन्ही विषयांचे powerpoint presentation तयार करून ठेवा. पण हा दोन नंबरचा च मिलिटरी / डिफेन्स साठीचा तुमचा विषय selection committee तुमच्यासाठी मंजूर करेल. विषय अलौकिक आहे. आणि तुम्ही आता (प्रोजेक्ट साठी काय काय लागेल, कुठे आणि कसे मिळेल यांची) माहिती मिळवायच्या कामाला लागा."

तर,
मला आपणा सर्वांना याबाबत काही प्रश्न विचारायचे आहेत.

१) मिलिटरी/ डिफेन्स साठीच्या या प्रोजेक्ट साठी मला Indian Government कडून कशा प्रकारे मदत मिळू शकेल?

२) कोणत्या सरकारी/निमसरकारी वेबसाईट वर मी apply करू शकतो?

३) शिवाय याचे पेटंट कसे आणि कुठे registration करून मिळेल?

४) सरकार कडून आर्थिक मदत हवीच आहे पण त्यासोबतच ते प्रॉडक्ट Military men च्या वैयक्तिक (for individual work in operations) वापरावर आमचा भर असल्याने फक्त एक प्रॉडक्ट बनवून थांबता येणार नाही. सरकार कडून ‘मागणी तसो पुरवठो’ प्रमाणे भविष्यात काम करावे लागणार आहे. आम्ही मेन पॉवर उभी करू शकतो. पण ह्याबद्दलचे होणारे communication कोणाच्या through साधायचे?

वरील सर्व गोष्टींची माहिती मिळाली तर आमचे खूप मोठे ओझे हलके होईल.

त. टी. :-

१) आमची प्रोजेक्ट idea "Hot concept" प्रकारातील असल्याने मी आत्ताच अशी आपणापुढे Revel करू शकत नाही.
पण एक गोष्ट फक्त सांगतो की मी काही दिवसांपूर्वी (Netflix UK ची) एक वेब सीरिज बघत असताना त्यातल्या एका सीन वरून मला ही गोष्ट अस्तित्वात आणविशी वाटली आणि ती ही आपल्या देशाच्या च सैनिकांसाठी!!

२) आम्हाला या प्रॉडक्ट चा वापर बिलकुलही Commercially होऊ द्यायचा नाहीये असे आमचे ठाम मत आहे. त्यामुळे भारत सरकार पर्यंत कसे पोहोचता येईल याचे शक्य ते सर्व मार्ग कळवावेत ही विनंती.

आपला नम्र,
प्रगल्भ कुलकर्णी

Group content visibility: 
Use group defaults

@ प्रगल्भ, असे काही तुम्हाला सुचलेय याबद्दल, अभिनंदन आणि पुढील कामाला शुभेच्छा.

आमची प्रोजेक्ट idea "Hot concept" प्रकारातील असल्याने मी आत्ताच अशी आपणापुढे Revel करू शकत नाही. >>>>>
अगदी योग्य आहे. तो नेटफ्लिक्सचा उल्लेखही नसावा माझ्या मते.

आम्हाला या प्रॉडक्ट चा वापर बिलकुलही Commercially होऊ द्यायचा नाहीये असे आमचे ठाम मत आहे. >>>>>
शक्य होणारही नाही. defence purposes किंवा atomic energy याच्याशी संबंधित संशोधन + पेटंट अर्ज यासाठी पेटंट कायद्यात वेगळ्या तरतुदी / नियम आहेत. हे विषय जगजाहीर होत नाहीत.

जोपर्यंत योग्य व्यक्ती / संस्थेशी गाठ पडत नाही तोवर कमीत कमी disclosure ठेवा.
चौघांनीही. Strictly.
मुली जास्त बोलघेवड्या असतात. तुमच्या सहकारी कदाचित नसतील.
पण सोबत शिकणारे, घरी, नातेवाईक, फेसबुक, ट्विटर, इतरत्र.... लेखी / तोंडी स्वरूपात काही न बोलणे गरजेचे.

गाईड / शिक्षकांशी लेखी संपर्क करा, जेणेकरून कल्पना मूळ तुमची आहे याचा पुरावा राहील. शिक्षकांनी संकल्पना परस्पर विकल्याच्या / पेटंट केल्याच्या केसेस आहेत.
selection committee समोर मांडण्या आधीच पेटंटविषयक खबरदारी घेतल्यास चांगले.
पैसे / infrastructure / lab यासाठी कोणाशी बोलताना Non Disclosure Agreement करणे गरजेचे. किंवा इतक्यात त्यासाठी बोलणी करू नका.

इथे संपर्क करता येईल.

DRDO Students Corner
https://www.drdo.gov.in/scheme-internship-students

किंवा जास्त योग्य --- ER&IPR Cell, DRDO

Directorate of Extramural Research & Intellectual Property Rights (ER&IPR)
Defence Research & Development Organisation (DRDO)
Room No. 348, DRDO Bhawan
Rajaji Marg, New Delhi-110011

Phone : 011 - 23017661
Fax : 011 - 23017582
Email :erip_er[at]hqr[dot]drdo[dot]in

पूर्ण संकल्पना त्यांना कळवण्याआधी, अधिकारी / योग्य व्यक्तीशीच संपर्क झाला आहे याची खात्री करा, कृपया.

तुमच्या चौघांच्या संगणकावरील/ लेखी नोंदी अन्य कोणाला सहज चाळता येतील अशा न ठेवणे इष्ट.
गुगल सर्च करताना तुमचा कन्सेप्ट / सर्च स्टॅटेजी आपोआप मॉनिटर होत असतो. आणि कन्सेप्ट आकर्षक असल्यास तुम्ही 'रडार'वर येता. त्याबाबत आवश्यक ती सुरक्षा सेटींग फोन/ लॅपटॉपवर बदलून घ्या.

शुभेच्छांसह.

तुम्हाला खूप चांगले शिक्षक मिळाले आहेत.तुम्ही खूप चांगला विषय निवडला आहे.वरती कारवी यांनी उपयुक्त माहिती दिली आहे.तुम्हाला प्रोजेक्ट साठी शुभेच्छा.

तुम्हाला नाउमेद करत नाहि, पण नेफिवर वेबसिरीज बघुन आय्डिया आली म्हणजे ती बाब ऑलरेडि अस्तित्वात आहे किंवा कुठेतरी होउ घातलेली आहे. अर्थात, तुम्हि प्रयत्न करुन त्यात काहि इनोवेशन आणलंत तर उत्तम. पेटंट घेण्या आधी एकदा सर्च करुन बघा, कुणी ऑलरेडि पेटंट घेतलंय का ते...

तुमच्या टीमला शुभेच्छा!

तटि: कॉलेज प्रोजेक्ट करता आय्डिया चांगली आहे; ती इंप्लिमेंट करता आली तर जॅकपॉट... Wink

तुम्ही गुगल सर्च करायचा प्रयत्न केलात का? पेटंट कसे आणि कुठे रजिस्टर करायचे याची खुप माहीती उपलब्ध आहे. खुप यु-ट्युब व्हिडीओ देखिल आहेत. निव्वळ "हॉट कन्सेप्ट" आहे म्हणुन पेटंट नाही मिळू शकत, त्यासाठी वर्किंग प्रोटोटाईप तयार लागेल.

पेटंट, कमर्शियलायझेशन, एन-डी-ए, मास प्रॉड्क्शन इत्यादींची चिंता आतापासुन करण्यापेक्षा सध्या फक्त तुमची कल्पना वास्तवात उतरवायचा (working prototype) प्रयत्न करा. वेगवेगळ्या तुम्हाला माहितही नसलेल्या सरकारी खात्यांमधुन योग्य अधिकार्‍याशी संपर्क होउन तुम्हाला आर्थिक मदत मिळायला किती वेळ लागेल याचा अंदाज घ्या. तुमचा प्रोजेक्ट सबमिट करायला जास्तीत जास्त ८-९ महिने शिल्लक आहेत हे विसरू नका. "Ideas are easy; execution is everything" या वाक्याला ठळक अक्षरात प्रिंट करुन झोपुन उठल्याबरोबर नजरेस पडेल अशा जागी लावा.

मनात आलंच तर "should i keep my great idea secret or not" ही गुगल सर्च पण करा.

तुम्हाला प्रोजेक्ट साठी शुभेच्छा.

व्यत्ययच्या सगळ्या पोस्टला +१. त्याच्या वाक्यावाक्याला मनात कोरुन ठेवा.
पुढचा फुकटचा सल्ला आहे. विचार करा, पटला नाही तर सोडून द्या.
नाऊमेद करत नाही, पण आयडिआ बसल्या बैठकीला डझनावारी सुचतील. त्या आपल्याला जशा सुचतात तशा जगात अनेकांना सुचतात, सर्च केलेत तर त्या बहुतेक कुणालातरी आधी सुचलेल्या दिसतील. त्यावर त्यांनी पेटंट घेतलं नसेल तरी ती आयडीआ कुठे डॉक्युमेंट केलेली असली तर प्रायरआर्ट होते. बरं आपली आयडीया अगदी संपूर्ण नाविन्यपूर्ण असेल आणि फार भारी असली आणि त्याचं लगेच पेटंट काढलं तरी जो पर्यंत ते पेटंट डिफेंड करायची मसल पॉवर नसते तोवर रेझ्युमे मध्ये एक फ्लॅश पॉईंट यापेक्षा त्याला फार किम्मत नसते.
त्यात भारतात (डेव्हलपिंग बर्‍याच देशांत) प्रोसेस पेटंट मिळते. 'प्रॉडक्ट' पेटंट होत नाही. तर युएसपीटीओ आणि इतर पुढारलेल्या देशांत प्रॉडक्टचं पेटंट देतात. यातील फरक माहित नसेल तर तो गूगल करुन समजेल, आणि त्यामुळे भारतातील पेटंटच्या मर्यादाही समजतील. अर्थात त्या तशा करायला काय कारण आहे हे ही समजेल. भारतातून युएसपीटीओ अप्लाय करता येतं, फक्त त्यासाठी सरकारी परवानगी (जी डिफेंस इ. असेल तर मिळणं कठीण आहे) लागते.
थोडक्यात तुम्हाला जे सुचलं आहे ते एक्झिक्युट करायच्या मागे लागा. त्यात जो अनुभव मिळेल तो सगळ्यात जास्त शिकवुन जाईल. पेटंट हे उद्दिष्ट न ठेवता बायप्रॉडक्ट म्हणून बघा.
इंजिनिअरिंग/ टेक क्षेत्रांत तरी आयडिआ सिक्रेट ठेवणे आणि त्याबद्दल बोलणे यात यशाच्या दृष्टीने भरभरून बोलणे/ फीडबॅक कायमच श्रेयस्कर असतो. अगेन फु.स. आणि तुमची मर्जी.

राज, कारवी, व्यत्यय, अमितव यांनी छान सल्ले दिले आहेत.

आयडिआ खरोखरच चांगली असेल तर पेटंट / सिक्रेट इत्यादीची तुम्ही आताच काळजी करु नका, त्यासाठी DRDO (त्यांच्या पर्यंत पोहोचता आले तर) कडे काम करणारी मोठी फळी आहे. DRDO मधे योग्य व्यक्ती पर्यंत पोहोचेपर्यंत आयडिआ सिक्रेट रहाणे अशक्य आहे. मुळ कल्पनेची चोरीमारी होण्याची शक्यता असतेच (नव्हे तसे ते होणार नाही असे मानणे भाबडे पणा ठरेल), पण मेंदू कल्पक असेल तर दर तासाला कल्पक आयडिआ बाहेर पडतील.

तुम्हाला शुभेच्छा.

नमस्कार सर्वांना,
तुमच्या सगळ्यांचे सल्ले अनमोल आहेत. प्रथमत: त्यासाठी मनापासून धन्यवाद.
कारवी यांची माहिती खरच खूप 'आतली' आहे. आणि त्यांच्या सुचना देखील!

@राज आणि इथले सर्वजण यांना मी आणखी एक गोष्ट सांगू इच्छितो.
मी ज्या विषयी बोलतोय ते प्रोडक्ट आधीपासून दोन-एक फॉरेनर साईट्स व अ‍ॅमेझॉन वर विक्रीसाठी उपलब्ध आहे.
फॉरेनर सईट्स वर त्या 16, 18, 20 आणि 21 हजार रुपये यांच्या रेंजमधे उपलब्ध आहेत. आणि त्या प्रॉडक्ट सम आणखी एक प्रॉडक्ट अ‍ॅमेझॉन वर 7 हजार ते आठ हजार मध्ये भारतीय केरळ येथील कंपनी कडून उपलब्ध आहे. (पण लो फिचर्स आणि कानाला लावायच्या ब्लुटूथ चा वापर त्यात केलेला आहे जो आम्ही टाळणार आहोत.)

पण हे सगळं जे झालं ते कमर्शिअली म्हणून झालं. हेच आम्हाला 'देशासाठी' म्हणून आणि अजून कमी खर्चात बसवता आलं तर त्यासाठी प्रयत्न करायचे आहेत.

मग यात पेटंट नक्की कशासाठी घेणार? तुम्ही बनवणार ती अगदी पूर्णपणे वेगळीच कन्सेप्ट/प्रोसेस आहे का? त्यावर?

माझा एक मामा आहे (आईच्या सख्ख्या मामाचा मुलगा) तो भारताच्या मिलीटरी मध्ये होता. कारगील च्या युद्धात देखील होता. मिलीटरी मधून रिटायर झाल्यावर त्याला सैनिक कल्याण कार्यालय या सरकारी विभागात काम मिळाले. तर त्याची ट्रान्सफर गेले 2 वर्ष पासून सोलापूरात झाली आहे. सोमवार ते शुक्रवार तो इथे असतो आणि शनिवार, रविवार गावाकडे जात असतो.

मी काल त्याला फोन करून "माझ्या इंजिनीअरिंग च्या फायनल ईअर च्या प्रोजेक्ट बद्दल बोलायचे आहे घरी येशील का?" विचारल्यावर तो संध्याकाळी घरी आला. मी त्याला त्या वेब सिरीज मधील तो भाग दखवला.
ते बघून त्याला विचारलं की आपल्या भारताच्या मिलीटरी मधे असे मशीन आहे का?

त्यावर मामा म्हणाला की "मशीन तर नाहीये. पण तू जे काम सांगतो आहेस ते मशीन कडून न करवून घेता, मिलीटरी मधली माणसेच करतात.
तुझी आयडिया युनिक आहे. बघ त्यावर जरा अजुन रिसर्च कर."

आणि जाता जाता,

अजून एक 'युनिक आयडिया' देऊन गेला. Proud
पण ती अशी Confidential / Defence कॅटेगिरी मधली नसून लोकाभिमुख अशी Precision farming या क्षेत्राशी ती मेळ खाते.

मानव,
पेटंट फक्त एवढ्यासाठीच की आपण त्याचा वापर कमर्शिअली होऊ द्यायचा नाहीये. ते फक्त भारतीय सैन्यासाठी 'राखीव' ठेवायच्या दृष्टिनेच मी पेटंट बद्दल बोललो जे सरकार मार्फत असेल तर अजून चांगले.
आणि हो! फिचर्स संपूर्ण वेगळे नसले तरी साठ ते सत्तर टक्के वेगळे फिचर्स असल्याने, प्रोसेसिंग हे वेगळे आलेच की.
आणि किंमत देखील कमी ठेवण्याचा हेतू असल्याने आतल्या स्टफ वरती प्रोसेसिंग आलेच की.

काल माझा मामा एवढेही म्हणाला की,
"सरकार अश्या गोष्टींना बनविण्यासाठी म्हणून मदत देणार नाही. पण पुढे तुला प्रोडक्ट म्हणून याचा सप्लाय सुरू ठेवायचा असेल तर लोन मिळेल फार फार तर. कसं आहे की ज्या काही मिलिटरी किंवा डिफेन्स ओरिएंटेड गोष्टी आहेत ते सरकार DRDO कडून हव्या त्या पद्तिइने डायरेक्ट करवून घेत असते. तरीही तू प्रयत्न कर ना! आणि त्याकडे निव्वळ एक 'प्रोडक्ट' म्हणून बघ. फक्त या - या साठीच म्हणून नको विसंबून राहूस. तुझे प्रॉडक्ट आल्यावर मग ठरव की त्याचा वापर कसा असावा ते!"

अरे, मानव जे विचारत आहेत, त्याचा अर्थ ते पेटंट कशासाठी - म्हणजे कोणत्या गोष्टीसाठी घेणार? जर प्रोडक्ट आधीच अस्तित्वात आहे, ते बनवायची प्रक्रियाही अस्तित्वात आहे, तर मग पेटंट प्रॉडक्ट किंवा प्रक्रिया दोन्हीसाठी नाही मिळू शकणार. कमी खर्चात बनणारे डिझाइन असेल तर त्यात काहीतरी जगावेगळे इनोवेशन हवे.

वरती व्यत्यय ह्यांच्या सर्व वाक्यांना अनुमोदन. तुम्ही सध्या ती आयडिया कागदावरून प्रत्यक्षात कशी उतरेल ह्यावर फोकस करा. पाहिजे तर गुप्तच ठेवा सध्या. ती प्रत्यक्षात उतरली की मग त्यावर पेटंट घ्यायचे की रिसर्च पेपर छापायचा, ह्याचं मार्गदर्शन तुमचे महाविद्यालयातले गाईड, परीक्षक किंवा अन्य अनुभवी प्राध्यापक करतील. तुमचा ब्रॉड एम चांगला आहे, पण जोपर्यंत तुम्ही ती वस्तू त्यांना प्रत्यक्षात दाखवत नाही तोपर्यंत तिची पेटंट साठी उपयुक्तता कशी सिद्ध होणार?

लक्षात ठेवा, अभियांत्रिकी प्रकल्प ही एक मोठी प्रक्रिया आहे. त्याची सुरुवात हायपोथिसिसने होते. तुमच्या डोक्यात सध्या जे विचार आणि कन्सेप्टस आहेत, ते ह्याचा भाग म्हणता येईल. परंतु पुढे लिटरेचर रिव्ह्यु, बेंचमार्किंग इत्यादी करून तुम्हाला त्या विषयावर झालेलं काम आणि तुमच्या कल्पनेचं नावीन्य तपासावं लागेल. पुढे कन्सेपचुल डिझाईन आणि मग डिटेल डिझाईन ह्यातून तुमचं अभियांत्रिकी ज्ञान पणाला लागेल. आपण कधी विचारही न केलेल्या छोट्या छोट्या गोष्टी अश्या वेळी ध्यानात येतील. पुढे त्याबरहुकूम फॅब्रिकेशन केल्यावर संगणकावरील डिझाईन आणि प्रत्यक्ष मॉडेल ह्यातले फरक लक्षात येतील. ते मॉडेल जर तुमचं हायपोथिसिस सिद्ध करणारं ठरलं, तर मग पेटंट किंवा अन्य पब्लिकेशनचा विचार करावा.

@ प्रगल्भ,
राज, व्यत्यय आणि अमितव यांनी छान आणि महत्त्वाचे प्रॅक्टिकल मुद्दे लिहीले आहेतच.
फक्त, पेटंट फाईल करताना वर्किंग प्रोटोटाईप हवाच असे नाही. कन्सेप्ट concrete झाल्यावरही ते करता येईल.

डीआरडीओ कडे गेलात तर प्रोडक्ट बनवणे + पेटंट या सर्व गोष्टी त्यांच्या मार्फतच होतील.
सरकार assignee (= पेटंटसंबंधी कायदेशीर + आर्थिक निर्णय घेण्याचे अधिकार असणे) असेल.
तुमचे श्रेय inventor + त्यांची IPR Policy आणि तुमचे करारपत्र यानुसार आर्थिक incentives वगैरे
तुम्ही वैयक्तिक प्रकारे केल्यास प्रोडक्ट बनवणे + पेटंट यासाठी फंडिंग नाही मिळायचे.

व्यत्यय म्हणतात तसे वेळ एकच वर्ष आहे. त्यात तुमचा नेहमीचा अभ्यास, प्रोजेक्टचे टेक्निकल काम आणि सरकार दरबारी फॉलोअप बसवणे आणि प्रोजेक्ट यशस्वी करणे कठीण होईल.

पेटंटसाठी सुद्धा literature search (prior art search) करणे, त्याचा analysis, मग drafting, मग patent office बरोबर पत्रव्यवहार यासाठी वेगळा वेळ द्यावा लागेलच.

तुम्ही बोललात --- परवानगी मिळाली --- फंड मिळाला --- इतक्या वेगाने सरकारी हत्ती हलेलसे वाटत नाही.
+ तुमची कल्पना ही सामान्य माणसाची कल्पना आहे. 'त्यांची' प्रत्यक्ष on field गरज काय आहे आणि lacuna काय आहेत त्याचा अभ्यास करणारी टेक्निकल टीमही असेलच जी तुमची कल्पना refine करेल.

तेव्हा जर इतर विषयात प्रोजेक्ट करून डिग्री पूर्ण करायची. सोबतच या कल्पनेवर काम + चर्चा + संस्थेशी संपर्क सुरू ठेवायचा आणि परीक्षेनंतर पूर्णवेळ त्यावर काम करायचे असे करता येईल का बघा.

प्रगल्भ, पेटंट हे नविन (नॉव्हेल) आणि इन्व्हेंटिव्ह प्रॉडक्ट किंवा बनवण्याची पद्धत यासाठी मिळत. जर तुमच्या डोक्यात असलेल्या कल्पनेच्या जवळ जाणारं प्रॉडक्ट आधीच बाजारात असेल किंवा जगातील कोणत्याही देशात अशा प्रकारच्या कल्पनेचं पेटंट अ‍ॅप्लिकेशन आधीच फाईल झालं असेल, किंवा कोणत्याही जर्नल/पुस्तक/ ब्लॉग मधे ही कल्पना उघड झाली असेल तर तुमची कल्पना नविन (नॉव्हेल) म्हणता येणार नाही. अशा केसमधे तुम्हाला पेटंट मिळण्याचे चान्स कमी आहेत.
जर तुमची कल्पना कमी खर्चात प्रॉडक्ट बनवणं ही असेल, तर खर्च कमी करण्यासाठी तुम्ही नक्की कोणते टेक्निकल बदल केले ही तुमच्या कल्पनेची नॉव्हेल्टी आणि इन्व्हेंटिव्ह स्टेप ठरेल. इथे टेक्निकल बदल हा सगळ्यात महत्वाचा शब्द आहे.
वर सगळ्यांनी सुचवल्याप्रमाणे एकदा पेटंट सर्च करुन बघा.
पेटंट सर्च साठी एस्पेसनेटची वेबसाईट चांगली आहे.
https://worldwide.espacenet.com/advancedSearch?locale=en_EP
गुगल पेटंटही वापरता येइल.

अजुन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे, पेटंट अ‍ॅप्लिकेशन फाईल झाल्यावर दीड वर्षाने पब्लिश होतं आणि ते जगभरात कोणालाही बघता येत. पण त्याचबरोबर पेटंट ग्रँट व्हायला अनेकवेळा बराच वेळ लागतो. जोपर्यंत पेटंट ग्रँट होत नाही, तोपर्यंत तुम्ही इतरांना तुमची कल्पना वापरण्याबद्दल रोखु शकत नाही. जर दुर्दैवाने (म्हणजे पेटंट ऑफिसला कल्प्नना नॉव्हेल आणि इन्व्हेंटिव्ह न वटल्याने) पेटंट ग्रँट झाल नाही, तर तुमची कल्प्नना उघड तर झाली असते, पण तुम्हाला त्याचे अधिकार मिळत नाही. त्यामुळे पेटंट अ‍ॅप्लिकेशन फाईल करण्याआधी हा विचारही करा. अर्थात, पेटंट ग्रँट झाल्यावर तुम्ही अशा कंपनी/लोकांविरोधात केस करुच शकता, पण वर अमितव यांनी लिहिल्याप्रमाणे त्यासाठी तेव्हढी मसल पॉवर हवी. ए

तसच पेटंट हा त्या त्या देशापुरता हक्क आहे. तुम्ही भारतात पेटंट फाईल केल, ते ग्रँटही झालं तरी तुम्ही इतर देशातल्या लोकांना वापरण्यापासुन, उत्पादन करण्यापासुन रोखु शकत नाही. त्यासाठी तुम्हाला त्या त्या देशात पेटंट फाईल केलं पाहिजे, जे फार महाग जातं.
मग परत या केसमधे तुमची कल्पना उघड तर झाली असेल पण तुम्ही त्या देशात पेटंट केलच नसल्याने तुम्ही त्या देशातील कंपन्या, गव्हर्नमेंट यांना तुमची कल्पना वापरण्यापासुन रोखु शकणार नाही.
याच कारणासाठी कारवी यांनी वर लिहिल्याप्रमाणे आर्मी रिलेटेड पेटंट अ‍ॅप्लिकेशन उघड केले जात नाहीत. पण हे सरसकट सगळ्याच पेटंट अ‍ॅप्लिकेशनसाठी होत नाही. जेव्हा सरकारसाठी फाईल केलेलं पेटंट अ‍ॅप्लिकेशन मह्त्वाच असेल तेव्हाच असा निर्णय घेण्यात येतो.
याबद्दलची तरतुद इथे वाचता येइलः https://ipindia.gov.in/writereaddata/Portal/ev/sections/ps35.html

पेटंट फाईल करण्यासाठी प्रोटोटाईप असायची गरज नाही पण तुमच प्रॉडक्ट नक्की कसं असेल, हे डिटेलमधे माहिती पाहिजे आणि ते पेटंट अ‍ॅप्लिकेशनमधे खर खर लिहायलाही पाहिजे. जर आता तुमच्या डोक्यात एक रफ आयडीआ असेल आणि तुम्हाला पेटंट अ‍ॅप्लिकेशन फाईल करायचच असेल तर तुम्ही प्रोव्हिजनल पेटंट अ‍ॅप्लिकेशन फाईल करा असं मी सुचवेन. शक्य तेव्हढी या अ‍ॅप्लिकेशनमधे लिहा. प्रोव्हिजनल फाईल केल्यापासुन तुमच्याकडे पुर्ण अ‍ॅप्लिकेशन (कंप्लिट स्पेसिफिकेशन) फाईल करण्यासाठी एक वर्ष मिळेल. त्या एका वर्षात तुमची प्रॉजेक्ट पुर्ण होइलच. मग आपल्याला नक्की कंप्लिट अ‍ॅप्लिकेशन फाईल करायच आहेच का, करायच असेल तर आपलं प्रॉडक्ट नक्की कसं आहे, ते कसं काम करत याबद्द्ल क्लॅरिटी आली असेल. यासाठी पेटंट ऑफिसचा १६०० रु खर्च येइल.

https://ipindia.gov.in/writereaddata/Portal/Images/pdf/Final_FREQUENTLY_... या साईटवर तुमच्या पेटंटसंदर्भातील सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळावीत.

@ प्रगल्भ, आजचे प्रतिसाद ---
'देशासाठी' म्हणून / अजून कमी खर्चात / वापर कमर्शिअली होऊ द्यायचा नाहीये --- हे भावनिक मुद्दे झाले. त्यासाठी पेटंट मिळणार नाही.

पेटंटसाठी Novelty, Inventive step, Non-Obviousness, Technical applicability, हे निकष असतात.
आपल्या सामान्य भाषेत म्हणायचे झाले तर --
पूर्णतः नवीन संकल्पना हवी ( जगभरात )
त्या क्षेत्रातील जाणकारांना trivial / obvious वाटेल अशी नसावी. म्हणजे संकल्पना A, B जुन्याच आहेत. तुम्ही फक्त त्याची सरळसोट सांगड घालताय. जे कुणीही करू शकतो. ज्यात तुमचे खास बौद्धिक कौशल्य काही नाही. असे नको.

माहीत असलेली संकल्पना बदलून वापरताना परिणामस्वरूप मिळणारे फायदे ( efficiency, cost-effectiveness वगैरे ) श्रेय देण्याइतपत मजबूत असावेत. उदा --- तुम्हाला माहिती असलेली यंत्रे १० किमी रेंजमध्येच चालतात किंवा प्रभावी असतात, हवामानानुसार / signal availability नुसार त्यांची अचूकता बदलते / कमी जास्त होते इत्यादि त्रुटी दूर करून तुम्ही खूप कमी किंमतीत, प्रदीर्घ रेंजमध्ये उत्तम परिणाम देणारे यंत्र बनवले तर तुम्हाला बौद्धिक कौशल्य वापरल्याचे श्रेय मिळेल.

या गोष्टी तुमची संकल्पना जशी आहे तशी + prior art च्या तुलनेत तपासून ठरवतात. पेटंट ऑफीस त्यांचे मुद्दे / प्रश्न पुराव्या सहित उपस्थित करते, ज्याची उत्तरे / समाधान तुम्हाला करावे लागते.

Technical applicability हा इतका अडथळ्याचा मुद्दा नाहीये.

तुम्ही बघितलेली प्रोडक्ट आणि तुमच्या कल्पनेतले यंत्र यांची तुलना करून तुम्ही हे निकष पूर्ण करताय का हे टेक्निकल बारकावे फक्त तुम्हीच सांगू शकाल. तर थोडा अभ्यास यासाठीही करावा लागेल पेटंटसाठी जाण्यापूर्वी.

अधिक महत्त्वाचे --- जी प्रोडक्ट विक्रीसाठी उपलब्ध आहेत म्हण्ताय, त्यांची पेटंट / डिझाईन इत्यादि रजिस्टर केलेले असेल तर infringement ची शक्यताही (दुसर्‍याची बौद्धिक संपदा त्यांच्या कायदेशीर परवानगीशिवाय वापरणे) लक्षात घ्यावी लागेल. कारण हा गुन्हा आहे. त्यासाठी त्या कंपन्या, त्यांची पेटंट वगैरे नीट तपासून बघावे लागेल. जरूर तर त्यांच्याकडून लायसेन्स घेणे वगैरे पायर्‍या वाढतील.

तेव्हा भावना नेक आहे पण रस्ता दूरचा आहे आणि चेकपॉईंट खूप आहेत.
शुभेच्छांसह,