‘इ टी एफ’ एक चांगला गुंतवणुक पर्याय

Submitted by विलास गोरे on 21 August, 2021 - 10:21

‘इ टी एफ’ एक गुंतवणुक पर्याय
आज भारतातीलच नव्हे तर जगभरातील शेअर बाजार नवीन उंचीवर जाऊन ठेपले आहेत. कोविडच्या साथीनंतर जगभरातील शेअर बाजार कोसळले. भारतीय शेअर बाजाराचे दोन्ही इंडेक्स सेन्सेक्स आणि निफ्टी यांनी मार्च २०२० ला अगदी तळ गाठला होता (सेन्सेक्स २५६३८ आणि निफ्टी ७५११) या काळात सर्वच शेअर्स अगदी कमी भावात उपलब्ध होते पण गुंतवणूकदार मार्केट पासून दुर गेले होते. त्यावेळी ज्यांनी गुंतवणूक केली त्यांना प्रचंड फायदा झाला आहे. आज सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही इंडेक्स दुप्पट झाले असून रोज नवे नवे उच्चांक गाठत आहे. एवढे मार्केट वाढूनही बरेच गुंतवणुकदार तक्रार करतात की इंडेक्स वाढतोय पण त्यांच्या जवळ असणारे शेअर्सच्या भावात विशेष वाढ झाली नाही. शेअर बाजार वाढण्याच प्रमुख कारण विदेशी संस्थांनी भारतीय बाजारात केलेली गुंतवणुक. ही गुंतवणुक प्रामुख्याने सेन्सेक्स आणि निफ्टी मधे अंतर्भूत शेअर्स मधे आली. त्यामुळे हे दोन्ही इंडेक्स दुप्पट होऊन आज पण नवी उंची गाठता आहेत.त्यामुळे ज्यांनी सेन्सेक्स निफ्टी मधील कंपन्यात गुंतवणूक केली त्यांचे पैसे दुप्पट झाले. काही जाणकार लोकांनी फ्युचर ऑप्शन द्वारा इंडेक्स मधे गुंतवणूक करून नफा मिळवला.
सेन्सेक्स/निफ्टी मधील समाविष्ट असलेल्या सर्व कंपन्यांच्या शेअर्स मधे गुंतवणुक करणे सामान्य माणसाला शक्य नाहीये. तसेच फ्युचर ऑप्शन द्वारा इंडेक्स मधे गुंतवणुक करण्यासाठी खुप अनुभव व अभ्यास लागतो. त्यामुळे सामान्य गुंतवणुकदार म्युच्युअल फंड किंवा ETF म्हणजेच एक्चेंज ट्रेडेड फंड च्या माध्यमातून इंडेक्स मधे गुंतवणुक करू शकतो. म्युच्युअल फंड हे आपल्या सर्वांच्या चांगल्या परिचयाचे आहेत आणि फंडाकडे येणारा ओघ दिवसें दिवस वाढतो आहे. ETF म्हणजेच एक्चेंज ट्रेडेड फंड अलीकडे लोकप्रिय गुंतवणुक पर्याय म्हणुन नावारूपाला येतोय. म्युच्युअल फंडांच्या तुलनेत याचा एक्स्पेन्सेस रेशिओ खुप कमी आहे म्हणुनच हा एक स्वस्त गुंतवणुक पर्याय मानला जातो.प्रस्तुत लेखात मी एक्चेंज ट्रेडेड फंड (ETF) हा विषय थोडक्यात सोप्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न करीत आहे.
‘ETF’ म्हणजे थोडक्यात म्युचुअल फंड आणि इक्विटी शेअर याचे एकत्र असे रूप. ज्याप्रमाणे म्युचुअल फंड हाउस लोकांकडून पैसे गोळा करून ते शेअर्स, सोने, रोखे इत्यादी मधे गुंतवतात अगदी तशीच कार्य पद्धती ETF ची आहे मात्र म्युचुअल फंडाचे युनिटची खरेदी विक्री म्युचुअल फंड हाउस कडून केली जाते तर ETF ची खरेदी विक्री ही स्टोक एक्स्चेंज वर अगदी इक्विटी शेअर प्रमाणे होत असते. ETF ही एक सेक्युरीटी बास्केट असून त्यात शेअर्स, सोने, रोखे यांचा समावेश असु शकतो. जसा शेअर्स, सोने, रोखे यांच्या भावात चढ उतार होतो त्याच प्रमाणात संबधित ETF च्या भावात चढ उतार होतात.
विविध फंड हाउस सुरवातीला ऑफर देवून शेअर्स, सोने किंवा रोखे यात गुंतवणुक करण्यासाठी लोकांकडून पैसे गोळा करतात आणि आणि त्या बदल्यात ETF ची युनिट इशू केली जातात. फंडाच्या उद्देशा नुसार गुंतवणुक केली जाते आणि ETF युनिटची नोंदणी स्टोक एक्स्चेंज वर केली जाते आणि अगदी इक्विटी शेअर प्रमाणे खरेदी विक्री सुरु होते. म्युचुअल फंडा पेक्षा ETF चे वेगळेपण आहे ते म्हणजे इथे म्युचुअल फंडाप्रमाणे मोठ्या गुंतवणूक एक्स्पर्टची टीम लागत नाही. कारण ETF हे एक प्रकारे पैसिव्ह म्युच्युअल फंड असतात. गुंतवणुक ही जनरली इंडेक्स किंवा सेक्टर स्पेसिफिक असते. त्यामुळे त्यासाठी तज्ञांची आवश्यकता नसते. संबधित ठरलेल्या इंडेक्स किंवा सेक्टर प्रमाणे गुंतवणूक केली जाते. यामुळेच ETF ही म्युचुअल फंडाच्या तुलनेत स्वस्त गुंतवणूक आहे.
ETF चे साम्य इंडेक्स म्युचुअल फंडाशी आहे म्हणजे शेअर्स मधे गुंतवणुक करताना ती विविध इंडेक्स नुसार केली जाते म्हणजे इंडेक्सला तंतोतंत फोलो केले जाते. ‘सेन्सेक्स ETF’ निफ्टी ETF इत्यादी. ही गुंतवणुक त्या इंडेक्सनुसार केली जाते. म्हणजे ‘निफ्टी ETF’ ची गुंतवणूक निफ्टी कंपनीतच वेटेज नुसार केली जाते त्यामुळे साहजिकच जेव्हा निफ्टी सूचनांक वाढतो तेव्हा संबधित ETF चा भाव पण वाढतो. म्हणजे जेव्हा आपण ‘निफ्टी ETF’ खरेदी करतो तेव्हा एक प्रकारे आपण निफ्टीच्या पन्नास कंपन्यात गुतंवणूक करतो.
आज अनेक जण म्युचुअल फंड गुंतवणुकदार आहेत आणि म्युचुअल फंड ही एक लोकप्रिय गुंतवणूक झाली आहे. आपण ETF आणि म्युचुअल फंड यांच्यातला फरक जाणुन घेतला तर ETF समजायला कठीण पडणार नाही.
 ETF ची खरेदी विक्री ही फक्त स्टोक एक्स्चेंज मार्फत होते. म्युच्युअल फंडा प्रमाणे फंड हाउस युनिट खरेदी करू शकत नाही. त्यामुळे जर स्टोक एक्स्चेंज वर बायर मिळाला नाही तर विक्री होऊ शकत नाही.
 खरेदी विक्री स्टोक एक्स्चेंज वर होत असल्याने दिवसभरात भाव मागणी पुरवठ्यानुसार सतत बदलत असतो. त्यामुळे खरेदी विक्री साठी आपणाला त्या वेळे नुसार भाव मिळतो मात्र म्युच्युअल फंडासाठी दिवस अखेर फंडाचे जे निव्वळ मालमत्ता मुल्य असेल तो भाव ठरतो.
 म्युच्युअल फंडाची युनिट विकताना फंडाच्या नियमा नुसार युनिट विकताना एक्सिट लोड द्यावे लागते तर ETF विकताना ब्रोकरेज पे करावे लागते.
 ETF ची खरेदी विक्री स्टोक एक्स्चेंज वर होत असल्याने डिमेट अकौंटं आवश्यक असते मात्र म्युच्युअल फंडासाठी डिमेट अकौंटं आवश्यक नाही.
 ETF म्युच्युअल फंडापेक्षा स्वस्त गुंतवणुक पर्याय आहे.
आता थोडक्यात भारतात प्रचलित असलेल्या विविध ETF बद्दल जाणून घेऊया.
आपल्याकडे मुख्यतः तीन प्रकारचे ETF प्रसिध्द आहेत.
१. इक्विटी ETF जी गुंतवणुक इक्विटी शेअर मधे असते मग ती इंडेक्स मधे किंवा सेक्टर स्पेसिफिक इक्विटी शेअर्स मधे गुंतवणुक.
२. कमोडीटी ETF – जिथे गुंतवणुक एखाद्या कमोडीटी मधे केली जाते. आज भारतात फक्त सोने ह्याच कमोडीटी मधे गुंतवणुक केलेले ETF उपलब्ध आहेत.(गोल्ड ETF).
३. लील्विड ETF - जे प्रामुख्याने सरकारी कर्जरोखे आणि इतर कर्जरोख्यात गुंतवणुक करतात.
वरील तिन्ही ETF अधिक लोकप्रिय आहेत इक्विटी ETF जिथे इक्विटी शेअर्स मधे गुंतवणुक असते. आज इंडेक्स ETF ज्यास्त वेगाने लोकप्रिय होत आहे. सेन्सेक्स, निफ्टी, बँक निफ्टी, निफ्टी नेक्स्ट फिफ्टी आदि इंडेक्स दिलेले आकर्षक रिटर्न पाहून आज लोक ETF कडे आकर्षित झाले आहेत. समजा जेव्हा आपण निफ्टी चे ETF घेतो तेव्हा त्या प्रमाणात आपली गुंतवणुक निफ्टीच्या पन्नास शेअर्स मधे होत असते. निफ्टी फिफ्टी मधे असणारे शेअर हे ब्लू चीप कंपन्यांचे असतात त्यामुळे गुंतवणुक तुलनेने सुरक्षित असते. कमी पैशात करता येते. आज ICICI Pru चा ‘निफ्टी ETF’ च्या एका युनिटचा भाव १७७ रुपयाच्या जवळपास आहे. म्हणजे एवढ्या थोड्या पैशात आपणाला निफ्टी मधे पैसे गुंतवता येण्याची सोय आहे. मोतीलाल ओस्वाल यांची ‘NASDAQ 100 ETF’ खरेदी केल्यास आपण अमेरिकेतील NASDAQ मधे लिस्ट असणाऱ्या १०० कंपन्या मधे गुंतवणुक करता येतील. या ETF च्या एका युनिटचा आजचा बाजारभाव ११० रुपये आहे. त्यामुळे एवढ्या कमी पैशात आपणाला अमेरिकन बाजारात पण गुंतवणुक करता येऊ शकते. या कारणानेच आजकाल ETF हा गुंतवणूक पर्याय लोकप्रिय होताना दिसत आहे.
ETF मधे गुंतवणुकीचे फायदे खालील प्रमाणे आहेत.
१. ETF द्वारे आपण अगदी कमी पैशात विविध इंडेक्स मधे, गोल्ड मधे किंवा कर्ज रोख्यात (लिक़्विड ETF) गुतंवणूक करू शकतो आणि त्या इंडेक्सचा फायदा मिळवू शकतो.
२. जे शेअर बाजारात नव्याने आले आहेत किंवा ज्या लोकांकडे अभ्यास करून डायरेक्ट शेअर्स मधे गुंतवणुक करण्यासाठी पुरेसा वेळ नसतो त्या साठी ETF मार्फत गुंतवणुक करणे फायदेशीर तसेच सुरक्षित असते.
३. ETF ची खरेदी विक्री स्टोक एक्स्चेंज वर होत असल्याने एक सोपा गुंतवणुक प्रकार समजला जातो. ETF खरेदी केल्यावर अगदी इक्विटी शेअर प्रमाणे आपल्या डीमेट अकौंट मधे जमा होतात.
४. ETF ची गुंतवणुक ही बहुतांशी इंडेक्स मधे असते. इंडेक्स मधे समविष्ट असणारे शेअर्स हे इंडेक्स कमिटीने पारखून घेतलेले असते त्यात वेळो वेळी बदल पण होत असतो. त्यामुळे कमी पैशात ज्यास्त सुरक्षित आणि वैविध्यपूर्ण गुंतवणुक करता येते.
५. ETF ही स्वस्त गुंतवणुक योजना मानली जाते. अनेक वेळा बाजारातून डायरेक्ट कर्जरोखे, शेअर्स घेणे सामान्य माणसाला शक्य होत नाही मात्र ETF च्या माध्यमातून हे शक्य होत असते.
ETF गुंतवणूक फायदेशीर असली तरी त्यात पण काही त्रुटी आहेत त्याचा पण विचार केला पाहिजे.
१. ETF जर विकायची असतील तर शेअर मार्केट मधेच विकता येतात. काही ETF चा मार्केट मधील टर्नओवर खुप असतो. अशा वेळी जर बायर नसेल तर ETF विकण्यास अडचण येऊ शकते. कारण मुच्युअल फंडा प्रमाणे ती फंड हौसला विकता येत नाहीत.
२. ETF ही इंडेक्सला फोलो करत असतात त्यामुळे मिळणारा नफा हा इंडेक्स पेक्षा ज्यास्त होत नाही. मुच्युअल एक्स्पर्ट फंड व्यवस्थापक इंडेक्स पेक्षा ज्यास्त नफा मिळवून देतात.
३. काही कारणाने इंडेक्स खाली आल्यास तोटा होऊ शकतो.

ETF हा गुतंवणूक प्रकार भारतात हळू हळू लोकप्रिय होतो आहे. कोटक, एचडीएफसी,आय आय सी आय, यु टी आय, एक्सिस, एस बी आय, निपोन इंडिया,मोतीलाल ओस्वाल, एल आय सी, आय डी एफ सी आदि फंड हाउस यांची ETF आज लोकांना पसंत पडत आहेत.
सेन्सेक्स आणि निफ्टी च्या ETF मधे SIP करून गुंतवणुक केल्यास फायदा होऊ शकतो. मार्च २०२० मधे ICICI Pru ‘निफ्टी ETF’ च्या एका युनिटचा भाव ८० रुपयाच्या आसपास होता तो आता १७५ रुपये एवढा झाला आहे. त्यामुळे जेव्हा काही कारणाने सेन्सेक्स/निफ्टी हे खाली येतात तेव्हा निफ्टी /सेन्सेक्स ETF मधे गुंतवणुक करणे फायदेशीर ठरू शकते.
आज सेन्सेक्स निफ्टी हे नवीन शिखरावर आहेत त्यामुळे जोखीम वाढलेली आहे. त्यामुळे सेन्सेक्स किंवा निफ्टी काही कारणाने खाली आले तर सेन्सेक्स निफ्टी ETF पण खाली येतील. सेन्सेक्स निफ्टी ETF प्रमाणेच सेक्टर स्पेसिफिक ETF आहेत. उदा. निपोन आणि कोटक यांचे PSU बँक ETF,निपोनचे इन्फ्रा आणि consumption ETF, सरकारी कंपन्यांसाठी CPSE ETF इत्यादी.
NSE च्या साईट वर विविध फंड हाउस च्या ETF ची लिस्ट उपलब्ध आहे. मात्र ETF मधे गुंतवणूक करताना खालील गोष्टींची काळजी घ्यावी. यामध्ये फंड हाउस च्या ETF चा पोर्ट फ़ोलिओ साईझ , नेट असेट व्हैल्यु (NAV). जर पोर्ट फ़ोलिओ साईझ खुप छोटा असेल तर असे ETF एक्स्चेंज वर फारसे ट्रेड होताना दिसत नाही. त्यामुळे ETF विकण्यासाठी बायर मिळणे कठीण पडू शकते. त्यामुळे ज्या मधे पोर्ट फ़ोलिओ साईझ (AUM) मोठा आहे तसेच निव्वळ मालमत्ता मुल्य आणि बाजारभाव मधे विशेष तफावत नाही आहे. अशी ETF ज्यास्त सुरक्षीत मानली जातात.
ज्यांना सोन्यात गुंतवणुक करावीशी वाटते त्यांच्यासाठी गोल्ड बोंड व्यतिरिक्त गोल्ड ETF मधे गुंतवणुक करता येईल. गेले काही दिवसात सोन्याच्या किमतीत घट झाल्यामुळे ETF चे मुल्य खाली आले आहे. HDFC, ICICI PRU, SBI, निप्पोन यांची गोल्ड ETF प्रसिद्ध आहेत.
ETF गुंतवणुकीला डीमेट अकौंट आवश्यक असल्याने जे लोक शेअर्स मधे गुंतवणुक करतात किंवा ज्यांनी डीमेट अकौंट उघडले आहे त्याच्या साठी ETF मधे गुंतवणुक करणे थोडे फायदेशीर ठरेल. कारण केवळ ETF गुंतवणुकीसाठी डीमेट अकौंट उघडणे विशेष लाभदायी होईल असे वाटत नाही.
थोडक्यात ETF या गुंतवणुक प्रकारातून आपण गोल्ड ,शेअर इंडेक्स, रोखे यात गुंतवणुक करू शकतो. नियमित पणे गुंतवणुक करण्याची सवय लावल्यास जोखीम पण कमी होईल. ज्या लोकांना आपल्या कामामुळे शेअर मार्केटच्या अभ्यासासाठी पुरेसा वेळ नसतो पण गुंतवणुक करण्याची इच्छा असते अशा लोकांसाठी ETF हा म्युच्युअल फंडा सारखाच पण थोडा कमी खर्चिक पर्याय उपलब्ध आहे. ETF मधील गुंतवणुक ही इक्विटी शेअर किंवा म्युच्युअल फंडा एवढीच जोखमीची गुंतवणुक आहे हे लक्षात असुद्या....
[ सदर लेख हा ETF या गुंतवणुक पर्यायाची माहिती देण्यासाठी लिहिला आहे. या मधे नमूद केलेले विविध ETF माहितीसाठी दिले असून त्यात गुंतवणुक करावी अशी कोणतीही शिफारस नाही. गुंतवणुक करताना आपण स्वतः अभ्यास करून किंवा आपल्या माहितीच्या तज्ञांच्या सल्ल्याने निर्णय घ्यावा. सदर लेख लिहिताना इंटरनेट वरील विविध गुंतवणूक विषयक साईटची मदत झाली आहे.]
विलास गोरे.
९८५०९८६९३४
Vilsgore59@gmail.com

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

माहितीपुर्ण लेख...

ETF जर विकायची असतील तर शेअर मार्केट मधेच विकता येतात. काही ETF चा मार्केट मधील टर्नओवर खुप असतो. अशा वेळी जर बायर नसेल तर ETF विकण्यास अडचण येऊ शकते. कारण मुच्युअल फंडा प्रमाणे ती फंड हौसला विकता येत नाहीत.>>>

१. प्रत्येक ETF चा एक बास्केट साईझ असतो. त्यात जेवढी युनिट्स आहेत ती घ्यायची तयारी असेल तर आपण सरळ AMC सोबत ETF खरेदी विक्री करु शकतो.

२. जरी आपल्याकडे पुर्ण बास्केट नसेल तरी खालील केसेस मधे AMC ने आपल्याकडून युनिट्स विकत घेते.

Unit holders, other than Authorised Participants and Large Investors, can redeem units in less than Creation Unit Size of the Scheme directly with the Mutual Fund in the following cases:

if the traded price of the ETF units is at a discount of more than 3% to the NAV for continuous 30 days; or
if discount of bid price to applicable NAV is more than 3% over a period of 7 consecutive trading days; or
if no quotes are available on exchange for 3 consecutive trading days; or
when the total bid size on the exchange is less than half of Creation Unit size daily, averaged over a period of 7 consecutive trading days.
In such a scenario valid applications received up to 3 p.m. by the Mutual Fund shall be processed and the Redemption proceeds would be paid in cash and would be as per the NAV of the Scheme declared by the Mutual Fund at the end of the day on which the Redemption request is received. Any redemption as specified above shall be made without any payments of Exit Load.

निफ्टी बिज पण उत्तम पर्याय आहे, माझ्याकडे ८,००,००० चे बिज आहेत जे मी ८५ भाव असताना घेतले हहोते, १६८ /१७० च्या आसपास आत्ता आहे, त्यावर मी काॅल राईट करुन हेजींग मार्फत कमवत असतो

छान माहिती...

गुंतवणूकीचे अनेक पर्याय आता उपलब्द आहेत... फक्त पैसा हवा Happy गुंतवणूक करण्यासाठी.