वंडर वूमन आणि ग्रीक पुराणातील व्यक्तिरेखा!

Submitted by निमिष_सोनार on 27 July, 2021 - 05:06

मार्वल कॉमिक्स किंवा डीसी कॉमिक्स असो, ते त्यांच्या सुपरहीरो चित्रपटांमध्ये ग्रीक पौराणिक कथांचा स्मार्ट वापर करतात. मार्व्हलच्या थॉर प्रमाणेच, डीसीने वंडर वुमन सुपरहीरो तयार करण्यासाठी झ्यूस आणि एरेस या ग्रीक देवतांच्या कथेचा वापर केला.

मार्वलमध्ये कॅप्टन अमेरिका हा सुपरहिरो आहे ज्याचा संदर्भ इतिहासातील युद्धामध्ये आहे आणि तसेच काहीसे वंडर वूमनमध्ये पण आहे. परंतु तरीही दोन्ही व्यक्तिरेखा तोडीच्या आहेत आणि दोन्ही कथेत एकमेकांची कोणतीही कॉपी नाही (ढाल आणि सैनिकांचे आयुष्य किंवा ताकद वाढवणे यासारखे वैज्ञानिक प्रयोग वगळता!)

काही ठिकाणी माझे मन वंडर वूमन मधल्या काही दृश्यांची तुलना क्रिश 3 शी करत होते. तुम्हालाही ते जाणवेल. पेन मध्ये सूर्यकिरणे एकत्र करून विवेक ओबेरॉयला हृतिक मारतो ते दृश्य किंवा हृतिक विवेकचे शेवटचे हवेतले तीव्र उत्कट द्वंद्वयुद्ध (फाईट).

कुणी कुणाची कॉपी केली?

तसे पाहिले तर हनुमान उडतो हे आपल्या पुराणात खूप आधीपासूनच आहे मग डीसीचा सुपरमॅन उडतो हे हनुमानापासून प्रेरणा घेतली असे म्हटले जाऊ शकते. तसे पाहिले तर ग्रीक आणि भारतीय पुराण कथांमध्ये बरेच साम्य आहे, बऱ्याच देवतापण सारख्या आहेत.

क्रिश 3 सिनेमा जरी वंडर वूमनच्या आधी आला असला तरीही डीसी कॉमिक्समध्ये वंडर वूमनची कथा सर्वप्रथम 1941 मध्ये आली. असो. तुलना बाजूला ठेऊ, अन्यथा मूळ सिनेमा बाजूला राहील.

गॅल गॅडोट हिने अर्थातच लढाई, मारामारी आणि साहस दृश्ये अप्रतिम पद्धतीने साकारली आहेत. स्पेशल इफेक्ट्स जरी असले आणि हिरव्या/निळ्या पडद्यासमोर जरी काही युद्धाचा भाग शूट होत असला तरीही अशा भूमिकेसाठी लवचिक बॉडी पण हवी असते. वंडर वूमन या सुपरहिरो(इन) पात्राला योग्य न्याय देऊन ते पात्र जिवंत करण्यात ती यशस्वी ठरली आहे.

गॅल गॅडोट ही अभिनेत्री कमालीची सुंदर दिसते. तिचा चेहरा आणि डोळे खूप बोलके, भेदक आहेत तसेच तिचे एकूणच व्यक्तिमत्व खूप मनमोहक, आकर्षक असून शरीर खूप लवचिक आहे.

अर्थात आपणांस एव्हाना कळले असेल की, मी अमेरिकन डीसी कॉमिक्सच्या वंडर वूमन या पात्रावर आधारित 2017 मध्ये रिलीज झालेल्या चित्रपटाबद्दल बोलत आहे, जो मी नुकताच पहिला. याचे दिग्दर्शन आणि एडिटिंग खूप चांगल्या दर्जाचे आहे. वंडर वूमन थीम एकदा ऐकल्यावर त्वरित माझी आवडती झाली.

यात निर्माते आणि लेखक यांनी एक ग्रीक पौराणिक कथा वास्तविक जीवनातील युद्धकथेशी कुशलतेने जोडली आहे. याच धर्तीवर "डॅन ब्राऊन" ("दा विंसी कोड" या पुस्तकाचे लेखक) सारखेच भारतीय इंग्रजी पुस्तक लेखकांनी अशाच प्रकारचे अनेक प्रयत्न केले आहेत ("इश्वाकूचा वंशज" पुस्तक सिरीज आणि शिवा ट्रायलॉजी- अमिश त्रिपाठी, चाणक्य चांट आणि कृष्णा की- अश्विन संघी वगैरे).

परंतु भारतीय चित्रपट निर्मात्यांनी सुद्धा आपल्या पौराणिक, ऐतिहासिक व्यक्तिरेखांतून प्रेरणा घेऊन अशा कल्पनारम्य चित्रपटांची निर्मिती केली पाहिजे, असे वाटते. पौराणिक आणि ऐतिहासिक व्यक्तिरेखा न घेता आधी नुसते सुपरहिरो पडद्यावर जिवंत केले तरी चालेल. जसे मध्यंतरी मी ऐकले होते की, रणवीर सिंगला घेऊन "नागराज" नावाच्या भारतीय राज कॉमिक्स मधील सुपरहिरोवर चित्रपट बनणार आहे. असो. मागे श्रेयस तळपदेचा असाच एक मराठी चित्रपट "बाजी" आला होता?

मी वंडर वूमन व्यक्तिरेखा साकारणाऱ्या गॅल गॅडोटबद्दल अधिक माहिती मिळवली तेव्हा कळाले की ती एक इस्त्रायली अभिनेत्री, निर्माती आणि मॉडेल असून वयाच्या 18 व्या वर्षी म्हणजे 2004 साली तिला मिस इस्त्राईल म्हणून गौरविण्यात आले. त्यानंतर तिने सैनिक म्हणून इस्राईल संरक्षण दलात दोन वर्षे सेवा केली. मला असे वाटते की यामुळेच या भूमिकेसाठी ती योग्य ठरली, नाही का?

मी वाचकांना सांगू इच्छितो की तुम्ही नक्की हा सिनेमा बघा. ऍमेझॉन प्राईम वर आहे. सबटायटल उपलब्ध आहेत.

(मार्वल आणि डीसी ही सुपरहिरो कॉमिक्स बनवणाऱ्या कंपन्यांची नावे आहेत जे आपल्यापैकी अनेकांनी लहानपणी वाचले असतील. जसे भारतात अमर चित्रकथा, डायमंड कॉमिक्स, राज कॉमिक्स, इंद्रजाल कॉमिक्स वगैरे आहेत. मार्वल वाले त्यांचे सगळे सुपरहिरो एकत्र करून त्याची अवेंजर्स नावाची चित्रपटांची सिरीज बनवतात तर डीसी वाले जस्टीस लीग नावाची सिरीज बनवतात. असो. हा आणखी पूर्ण वेगळा विषय होईल.)

- निमिष सोनार, पुणे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बोकलत यु नॉटी.

मी बघितला आहे हा सिनेमा व मस्त आहे. पण गॅल गॅडोट ही पॅलेस्टाइन लोकांच्या स्वातंत्र्याच्या विरोधात आहे. म्हणून ती सध्या आव डत नाही. तिची ट्विटर विधाने तपासा. दिसायला सुरेख आहे बाकी . डोक्यात गोंधळ आहे.

वंडर वूमन चित्रपटाचा पहिला भाग (नाव: वंडर वूमन) हा २०१७ साठी रिलीज झाला असून यातील कथा १९१८ सालात घडते.
वंडर वूमन चित्रपटाचा दुसरा भाग (नाव: वंडर वूमन १९८४) हा २०२० साठी रिलीज झाला असून यातील कथा १९८४ सालात घडते.
दोन्ही चित्रपट ऍमेझॉन प्राईम वर उपलब्ध आहेत.

@बोकलतजी: माझा चेहरा गॅल गॅडोट शी मिळता जुळता आहे? अरे वा! Happy
आपणही आपला प्रोफाईल फोटो मायबोलीवर लावावा. काय सांगावे तो फोटो स्कार्लेट जोन्सन (ब्लॅक विडो) सारखा दिसेल?

@अमा: तुम्ही बोकलत यांना ओळखता का? त्यांना नॉटी म्हणालात म्हणून विचारलं!
गॅल गॅडोट च्या राजकीय सहभागाविषयी मला काही माहिती नाही. फक्त एक अभिनेत्री म्हणून तिचे या चित्रपटातले काम तसेच तिचे सौंदर्य मला खूप आवडले!