पाहुणा (सरुची गोष्ट)

Submitted by _तृप्ती_ on 30 March, 2020 - 05:13

सरूला माडीसमोरच्या पत्र्यावर घातलेलं वाळवण दिसत होतं. हळूच जाऊन त्यातल्या २-३ तरी सालपापड्या पळवाव्यात असं केव्हापासून तिच्या मनात होतं. पण बाहेर इतकं ऊन होतं की पायाचाच पापड झाला असता आणि पत्र्यावर जरा जरी पाय पडला तरी आई, आजी सगळी कामं सोडून धावत वर येतील हे तिला पक्क माहिती होतं. एकदा तिने हळूच काठीने वाळवणाची चादर आत ओढता येते का पाहिलं पण तरी आईचा खालून आवाज आला, “अगं बाई, मांजर आली का काय पत्र्यावर? या मांजरींचा काही तरी बंदोबस्त केला पाहिजे." मग सरू तिथे पटकन लपून बसली म्हणून वाचली. वाळवण, कैरीची वेगवेगळी लोणची, आंबा, फणसाच्या पोळ्या असल्या सगळ्या कारणांसाठी सरूला उन्हाळा फार म्हणजे फारच आवडायचा. एक तर शाळा नाही, त्यामुळे अभ्यास नाही. दिवसभर गावात फिरायचं, मित्रमैत्रीणीचे घोळके जमवायचे. कैऱ्या पाडा, झाडावर चढून बसा, नदीवर फिरून या आणि कसले कसले खेळ खेळत रहा. संध्याकाळी घरी निवांत गप्पा. आजी तर म्हणायची, "सरूला विचारा, सगळ्या गावात कुणाकडे काय केलंय आज. नुसती गावभर फिरत असते. अगं, जरा घरातली चार काम शिकून घे." पण मग सरू आजीला सांगायची, “अगं, त्या कोपऱ्यावरच्या यमुआजी आहेत ना, त्यांचे म्हणे पापड बिघडले आहेत.”, "हो का ग?” " अगं, त्या म्हणत होत्या, ललूवहिनींना विचारायला हवं. एवढ्यात मी दिसले. तर म्हणाल्या, सरू, आजीला पाठवशील का? म्हणावं पापड बिघडले आहेत. मदतीला याल का?" आजीला सगळ्या गावाला असली मदत करायला भारी आवडतं. "आणि हे आत्ता सांगतेस होय. मी आधी नसते का गेले. कुसुम, मी जरा यमूवहिनींकडे जाऊन येते ग." आजी काही २-३ तास तरी परत येत नाही. मग सरूला घरात इकडे तिकडे करायला रान मोकळं. उन्हाळ्याच्या सुट्टीतली अजून एक मजा म्हणजे मामाकडे भरपूर दिवस रहायला मिळतं. सरूला मामाकडे फार आवडायचं. पण काही दिवस झाले की घराची आठवण यायला लागायची. मग मामा घरी सोडायचा. सरूला तर वाटायचं तिला कधी तिचं घर सोडून दुसरीकडे कुठे राहताच येत नाही. पण आज सरूला काही म्हणजे काहीच उद्योग नव्हता. एक तर खूपजण सुट्टीला आजोळी गेले ते अजून आलेच नव्हते आणि आमच्या घरी म्हणे कोणीतरी पाहुणे येणार होते. त्यामुळे आई आणि आजी खूप कामात होत्या. सरूशी गप्पा मारायला कुणाकडे वेळचं नव्हता. सरू मागच्या माडीत बसून, शालू आली की तिला काय सांगायचं, काय खेळायचं, कुठल्या झाडाला कैऱ्या जास्त आहेत, गण्याला घेऊन जायचं का नाही? आणि पलीकडच्या गल्लीतल्या, कानिटकर आजींना त्यांच्या अंगणातल्या मोगऱ्याची फुलं मागावी की तशीच पळवावीत, असे फारच महत्वाचे विचार करत बसली होती. असले प्रश्न काही सुटता सुटले नाहीत पण बघता बघता उन्हं उतरायला लागली.
अचानक खालून खूप आवाज यायला लागले. सरूला वाटलं आजी आणि आई दोघीच आजकाल फारच गप्पा मारत असतात आणि आपल्याला घेतच नाहीत. पण मग मधेच एका पुरुषाचा पण आवाज आला. अरे, हे काय या दोघी आता नाटकतल्या सारखे वेगवेगळे आवाज काढून बोलायला लागल्या की काय? आता तर ८-१० माणसं हसण्याचा आवाज. काय हे? आमच्या घरात कुठलं मंडळ वगैरे घुसलं की काय? सरू जिन्यावरून धावत धावत खाली आली. बघते तर काय? आत्तापर्यंत रिकाम्या असलेल्या सगळया खोल्या अचानकपणे माणसांनी आणि त्यांच्या सामानांनी भरून गेल्या होत्या. क्षणभर सरूला वाटलं, हे आपलं घरच नाहीये. ती हळूच आधी मधल्या घरात आली. तिथे आजी आणि तिच्याच वयाच्या अजून दोन आज्या. सरू यांना ओळखत होती. एक होती मामीआजी आणि दुसरी ताईआजी. एक आहे बाबांची मामी आणि दुसरी आजीची ताई. ताईआजी आली की आमची ही खाष्ट आजी सुद्धा फार काही बोलत नाही. सरूला आत्ता प्रकाश पडला की पाहुणे येणार होते ते हेच. पण मग बाहेर ओसरीवर कोण आहे अजून? सरू ओसरीवर डोकावली. आप्पांशेजारी बसले होते ते मामाआजोबा. त्यांच्या शेजारी कोण आहे ते काही कळत नव्हतं. इकडच्या खुर्चीवर बाबा आणि त्यांच्यासमोर कोणीतरी. सरूला काही त्यांना कधी पाहिल्याचं आठवतं नव्हतं. ते दोघं गप्पा मारण्यात अगदी बुडून गेले होते. इकडे आजीचं पण अजिबात लक्ष नव्हतं. कसं असणार? तिची ताई आली आहे ना. सरूला बाहेरून चिंत्याचा आवाज आला. तो कोणाशीतरी बोलत होता. म्हणजे याचा पण कोणीतरी मित्र आला आहे खेळायला. माझेच सगळे मित्रमैत्रिणी कुठे हरवले आहेत? एवढ्यात बाबांचं लक्ष सरुकडे गेलं. "सरू, अगं अशी दारामागून काय बघते आहेस? जा आईला विचार, चहा झाला का?” सरूचा मोर्चा आईकडे. "आई, अगं केवढे लोकं आपल्या घरात. काय हे सामान सगळीकडे. केवढा आवाज. घर हलतंय अगं सगळं. “आईला खरं म्हणजे हसू आलं होतं. पण ती आपली हळू बोल, अश्या खुणा करत होती आणि उगाचच डोळे मोठे करून बघत होती. "घर किती छान भरलंय आता. तुलाच हवं असतं सारख गप्पा मारायला. आता खूपजण आहेत." “जसं काही आपल्या घरात कमीच लोकं आहेत? हे अजून." "सरू, बास आता. चल चहा दयायला मदत कर मला."
मी आणि आई आधी ओसरीवर. सगळयांना चहा दिला. बाबा त्या काकांकडे वळून म्हणाले, "हिला ओळखलंस का?" ते जे कोणी आले होते ते म्हणाले, "सरस्वती का? किती मोठी झाली आहे." मी वाकून नमस्कार केला. "शहाणी आहे रे मुलगी". मला खरं तर विचारायचं होतं, मला कोणी सांगेल का हे कोण आहेत ते? पण ते सगळे आपापल्या बोलण्यात गुंगले होते. आम्ही आत येऊन सगळ्या आज्यांना चहा दिला. आमच्या आजीबाई काय खुश होत्या. ताईआजी माझ्याकडे बघून म्हणाली, "सरस्वती, अगं ये इकडे बस जरा." आणि मग आजीकडे वळून म्हणाली, "ललू, श्रीधर आणि सरू अगदी बरोबरीचे ना गं." "अगं श्रीधर थोडा मोठा असेल." त्यांच्या ह्या आणि असल्या काहीतरी गप्पा सुरू झाल्या. आता हा श्रीधर कोण? हा एक नवीन प्रश्न. मी त्या आज्यांच्या तावडीतून सुटून बाहेर आले. एक तर मला हे सगळे आमच्याकडे का आले आहेत हे माहिती नव्हतं? किती दिवस राहणार तेही माहिती नव्हतं? आणि त्यांनी आल्यापासून हा जो काही पसारा घातला होता, तोही आवडत नव्हता. आमचं घर म्हणजे आमचं घर मुळी राहिलंच नव्हतं. माझ्याकडे तर कुणाचंच लक्ष नव्हतं. मी विचार केला, घरातून बाहेर कुठेतरी फिरून यावं. पण आई आणि मुख्य म्हणजे आजी यांना पाहुणे घरात आणि मी बाहेर, हे अजिबात चाललं नसतं. मी तशीच तंद्रीत बाहेर आले. तर ते मगाचचे काका म्हणाले, “सरस्वती, तू कुठल्या शाळेत?" मला आता यापुढचे नेहमीचे कंटाळवाणे पाहुणी प्रश्न माहिती होते. मग तरी न राहवून मी मधेच विचारलं,” काका, तुम्ही कोण?" मग आमच्या बाबांच्या लक्षात आलं." अगं, हा अशोक. अशोककाका तुझा. तू अगदी छोटी होतीस तेव्हा आला होता. त्यानंतर आत्ताच आला. तू कसा ओळखशील? आपल्या ताईआजीचा मुलगा." मी म्हटलं चला, कोण आहे ते तर कळलं. पण ते इथे कशाला आलेत? हा प्रश्न मी मनातच दाबून टाकला. नाहीतर मी फारच आगाऊ आणि आजीच्यामते बोलण्याचा काही पाचपोच नसलेली मुलगी आहे, असंच सगळयांना वाटलं असतं. एवढ्यात अंगणातून चिंत्या आणि त्याच्याबरोबर साधारण माझ्याच वयाचा एक मुलगा ओसरीवर आले. चिंत्या धावत घरात. हा जो कोण मुलगा होता तो बहुतेक काय करायचं ते न कळून तिथेच थांबला. त्याचे कपडे तर साधेच होते आणि डोक्याला जरा तेल पण जास्तच होतं. कपाळावर गंध होतं. काय माहीत, पण मला तो जरा येडछापच वाटला. एवढ्यात अप्पा म्हणाले, "श्रीधर, इकडे ये बाळा." आता इथे श्रीधर कोण? तर तो येडछापच श्रीधर असावा, कारण तो आता अप्पांच्याशेजारी उभा होता. त्याने आप्पाना नमस्कार केला. "यशस्वी हो. श्रीधर, तुला शिकायचं आहे ना पुढे? त्याची सोय करू. पण आधी २९ चा पाढा म्हणून दाखव." मला मनातल्या मनात खूपच हसू येत होतं. आप्पा नेहमी काहीतरी अवघड प्रश्न विचारतात. आता ह्या श्रीधरचं काही खरं नाही. मी अगदी नीट लक्ष देऊन त्याच्याकडे बघत होते आणि मनातल्या मनात २९चा पाढा आठवत होते. कारण त्याला आला नाही की आप्पा मला सांगणार आणि मला येतच नाही. ह्या येडछापला तर येईल असं मला वाटत नव्हतं. श्रीधरने सुरु केलं. "२९ एके २९, २९ दुणे ५८, २९ त्रिक ८७....” आणि सगळा पाढा न चुकता म्हटला की. आप्पा एकदम खुश. "शाब्बास! आता इथेच राहायचं. इथल्या शाळेत चांगलं शिकायचं. घर तुझंच आहे. अशोक, मुलाची काही काळजी करू नकोस. हुशार आहे आणि आम्ही सगळे आहोत." मला तर मी काय ऐकतेय ते कळतंच नव्हतं. हा इथे का राहणार आहे आणि इथल्या शाळेत म्हणजे? आमच्या घरातल्या कुणाला म्हणजे कुणालाच मला हे आधी सांगावसं नाही वाटलं. कोण आहे हा २९चा पाढा म्हणणारा श्रीधर? आप्पा म्हणाले, “सरू, हा तुझा भाऊ. चिंत्या जसा तसाच हा. अशोककाकाचा मुलगा. आपल्या इथे शिकायला आला आहे. आता जरा त्याच्याकडून पाढे शिक. येतोय का २९चा पाढा? हिला शिकव रे“ काय? हा माझा भाऊ. असा अचानक कुठून आला माझा भाऊ. हा मला शिकवणार? छे, छे. मला काहीतरी केलंच पाहिजे. बाबा म्हणाले, “सरू, अगं फार हुशार आहे श्रीधर. शाळेत नेहमी पहिला येतो. तुझ्याच शाळेत नाव घालणार आहे. मुख्याध्यापकांशी बोलणं झालं आहे. तू असं कर. याला आधी घर दाखव आणि मग शाळा पण दाखव. श्रीधर, तुझं सगळं सामान वरच्या माडीत ठेव. सरू, घेऊन जा त्याला वरच्या माडीत." आता काय म्हणणार मी? सगळी काम मला सांगून हे गप्पा मारत बसले. केवढं कौतुक ह्या श्रीधरचं. श्रीधरने दोन पिशव्या उचलल्या आणि माझ्याकडे बघून हसला. मी काही बघितलंच नाहीये असा मक्ख चेहरा करून उभी.
आजीने आतून हाक मारली, "सरस्वती, दडपे पोहे केले आहेत. खायला या तू आणि श्रीधर." हुश्श. मी पटकन आत गेले. चिंत्याने माझ्या वेण्या इतक्या जोरात ओढल्या ना. "काय हे, चिंत्या. आई, याला आता पोहे देऊ नकोस." मी त्याला एक जोरात चिमटा काढला. “सरू, तू मोठी आहेस ना. जरा शांत बसा दोघं. “एवढ्यात श्रीधर पण आला. आईचंच लक्ष गेलं. “ये रे श्रीधर. बस पाटावर. पोहे देते हं." आईने आम्हाला पोहे दिले. आई श्रीधरला म्हणाली, "पोटभर खा रे. आवडतात ना तुला दडपे पोहे? तुला काय काय आवडतं ते सांगत जा सगळं." त्याने फक्त मान डोलावली आणि पोहे खायला लागला. "सरू, हा किती शांत आहे बघ. तुझ्यापेक्षा एक वर्षानेच मोठा आहे. आल्यापासून शांत आहे. श्रीधर, तू पण बोलायला शिक बरं. नाहीतर आमच्या चिव चिव चिमणीपुढे तुझा आवाज यायचाच नाही" मला तर वाटायला लागलं आईला आता माझ्यापेक्षा जास्त हा श्रीधरच आवडणार आहे. आता दुसऱ्या कोणाच्या घरी मी पण शांतच बसते, त्यात काय एवढं मोठं. पण आमच्या घरच्या सगळयांना या येडछापच फार म्हणजे फारच कौतुक. चिंत्या श्रीधरला काय काय सांगत होता आणि पुन्हा माझ्याशी बोलायला कोणीच नाही.
पोहे खाऊन मी, चिंत्या आणि श्रीधर वरच्या माडीत. चिंत्याच्या खोलीत, त्याच्याबरोबर श्रीधर. त्याने त्याच्या पिशव्या ठेवल्या. त्यातलं काय काय सामान काढलं आणि लावायला लागला. चिंत्या इकडून तिकडे उड्या मारत त्याला मदत करत होता. मला तसं काहीच काम नव्हतं म्हणून मी आता खालीच जाणार होते. एवढ्यात श्रीधरने हाक मारली, “सरस्वती, तू शाळा दाखवशील मला? मला शाळा फार आवडते. नवीन शाळा बघायची आहे मला." शाळा मला पण आवडते आणि खरं म्हणजे आता सुट्टीचा कंटाळा पण आला आहे. पण मला याला शाळा दाखवायची नाहीये आणि मुळात मला हा आमच्या शाळेत, घरातच नको आहे. सारखं काय याचंच कौतुक. मी म्हटलं, “आता थोड्या वेळात अंधार होईल. उद्या बघु. ““खूप लांब नसेल तर जाता येईल का पटकन?" मला इतका राग आला होता ना. “पटकन मला जाता येत नाही. उद्या जाऊ म्हटलं ना मी." त्याचा चेहरा पडला बहुतेक. बोलता बोलता त्याने सगळी वह्या, पुस्तकं जागेला लावली होती. कपडे पण नीट घडी करून ठेवले होते. नाहीतर आमच्या चिंत्याचा पसारा खोलीभर होता. किती वेळा चिंत्याची खोली मीच आवरते. बरं झालं, आता हा श्रीधर इथे राहिला की चिंत्याला सगळं नीट ठेवावं लागेल आणि मला खोली आवरायला लागणार नाही. हे काय? आता मी पण ह्याच कौतुक करते आहे की काय? श्रीधरने परत हाक मारली, "सरस्वती….", “आता काय आहे? उद्या जाऊया म्हटलं ना मी." “तुला कैरी आवडते. अगं हे बघ. गावाहून येताना वाटेत कैऱ्या पाडल्या. त्यातली एक या पिशवीत राहिली. तुला हवी आहे का?" माझ्या तर तोंडाला पाणीच सुटलं. मी पटकन कैरी काढून घेतली. “श्रीधर, चिंत्याला सांगू नकोस. मी त्याला अजिबात देणार नाहीये. चल, आपण शाळेत जाऊ आणि जाताना कैरी खाऊ." “अगं उशीर होईल ना?”आपण पळत पळत जाऊ. ए, तुला पळता येत ना?" आता श्रीधर पहिल्यांदा हसला. तसा काही अगदीच येडछाप नाहीये हा. "सरस्वती, मला कैरीच्या झाडावर पण चढता येतं." मी मनातल्या मनात याला कुठल्या झाडावर उद्या चढवायच ते ठरवायला लागले. नदीच्या रस्त्याला एक झाड आहे. त्याला खाली खूप फांद्या नाहीयेत. पण वरच्या एका फांदीवर जर चढता आलं ना, तर त्याच्यावर खूपच कैऱ्या आहेत. मला आणि शालूला तिथे चढताच येत नाही. म्हणून गण्याला घेऊन जावं लागतं आणि त्यातही तो आधी त्याच्या कैऱ्या काढणार मग आम्हाला देणार. आता सांगते गण्याला माझा पण भाऊ आहे.
आम्ही लगेचच माडीवरून खाली आलो. मी श्रीधरला म्हटलं तू बाहेर थांब मी आलेच. मला स्वयंपाकघरातून तिखट-मीठ घ्यायचं होतं. मधल्या खोलीत सगळे बोलत बसले होते. मी हळूच आत गेले. मी तिखट-मीठ घेऊन बाहेर पडतच होते, तेवढ्यात मला ताईआजीचा आवाज आला. ती आप्पांना म्हणत होती, “तुमच्यामुळे आता श्रीधरचं सगळं चांगलं होईल. त्याला सांभाळून घ्या. आई कधी पाहिलीच नाहीये त्याने. मीच केलं त्याच सगळं. मला पण होतं नाही आता." आमची आजी म्हणाली, "ताई, आम्ही परके आहोत का ग? जशी सुरू, चिंत्या तसाच श्रीधर. नको काळजी करुस." आणि हे काय आमच्या आजीच्या डोळ्यात पाणी होतं. मला तर वाटलं आता माझ्या पण डोळ्यात पाणी येतंय की काय? मी तिथून पटकन निघणार एवढ्यात आईच लक्ष गेल. आईला पण ना बरोबर नको तेव्हा मी नक्की म्हणजे नक्कीच सापडते. “काय ग सरू, काही हवं आहे का? “आता काय सांगणार? "अगं, मी श्रीधरला शाळा दाखवायला घेऊन जाते. तेच सांगायला आले होते. ““बरं. लवकर या पण. अंधार होईल. नाहीतर त्याला घेऊन गावभर फिरशील. आता इथेच राहणार आहे तो. हळूहळू सगळं दाखव." आता काय माहीत पण मला फार म्हणजे फारच छान वाटत होतं की श्रीधर आता इथेच राहणार आहे. मीच जरा येडछाप आहे.
मी आणि श्रीधर शाळेच्या रस्त्यावरून चाललो होतो. मला त्याला किती दाखवू आणि किती नको असं झालं होतं. गल्लीतली सगळी घरं, मग वळणावरच ते किराणाचं दुकान, आजीची देवळं, गण्याचं घर, शालूचं घर, शाळेजवळच गोळ्यांचं दुकान, कोपऱ्यावरचा फुलवाला, नदीकडचा रस्ता, पण तिकडे आत्ता जाता येणार नव्हतं. माझं काही संपतच नव्हतं. शाळा आली. पण बंदच होती. मग आम्ही खेळतो ना त्या बाजूच दार पण श्रीधरला दाखवलं. आम्ही दोघांनी उड्या मारून पाहिलं पण नीट काही दिसेना. श्रीधरला शाळा पाहायचीच होती. मी म्हटलं, "श्रीधर, शाळा काही उद्या पळून नाही जाणार. आपण उद्या परत येऊ." आणि आत्ता माझ्या लक्षात आलं, बोलत बोलत मी सगळी कैरी एकटीनेच खाल्ली होती. श्रीधर चिंत्या सारखा माझ्याशी भांडला पण नव्हता. "श्रीधर, कैरी संपली. म्हणजे हा एकच अर्धा तुकडा आहे. तुला चालणार असेल तर घे." तो हसला. "मी आज येताना खूप खाल्ली आहे. मला नकोच होती." असं कसं? मला तर हवीच असते. म्हणजे आता नको असेल तर ठेवून देऊन मी दुसऱ्या दिवशी खाते. "ए, तू नेहमी इतकाच शहाण्यासारखा वागतोस?" मला पण ना कधी कधी आजी म्हणते तसं बोलण्याचा काही पाचपोचच नाहीये. मनात आलं की बोलायचं. काही म्हणून विचारच नाही. श्रीधरला पण बहुतेक काय बोलायचं ते कळत नव्हतं. मग मीच म्हटलं, "म्हणजे आमचा चिंत्या आहे ना, तो इतका त्रास देतो मला. मी असं त्याला न देता, कैरी खाल्ली तर तो किती भांडेल माझ्याशी. ए, तुमच्या गावातल्या घरी तू, अशोककाका, ताईआजी आणि अजून कोण असतं? तुला पण बहीण आहे का रे? “श्रीधर एकदम शांतपणे म्हणाला, "आम्ही तिघंच राहतो म्हणजे आता ते दोघंच. मला बहीण-भाऊ नाहीयेत. पण मला ना आमचं गावातलं घर खूप आवडतं. आणि माझ्या मित्रांना बहिणी आहेत ना. ते माहितेय मला. माझं मित्रांशी भांडण होतं पण घरी भांडायला कोणीच नसतं." मला जरा हसूच आलं. आमच्या घरी बघा भांडायला कितीजणं आहेत. “अरे, एवढंच ना. उद्यापासून मी रोज तुझ्याशी भांडेन. तसंही आजी म्हणतेच, भांडण्यात आमच्या सरूचा कोणीही हात धरू शकत नाही. आणि नाही म्हणजे नाहीच." आम्ही दोघं इतके हसलो. मग तिथेच बसून आम्ही काय काय गप्पा मारल्या. श्रीधरच्या एका मित्राचं नाव जिलेबी आहे. कारण त्याला जिलेबी फार आवडते. ते सगळे सुट्टीत डोंगरावर धावण्याची स्पर्धा पण लावतात. श्रीधर कधी कधी तळ्यातले छोटे मासे मोजत बसतो आणि घरी जायलाच विसरतो. सगळ्यात भारी म्हणजे श्रीधरला गाईचं दुध काढता येतं. मला पण शिकायचंय. त्यामुळे ना आमचं ठरलंय. पुढच्या सुट्टीत मी मामाकडे जाणार नाहीये. श्रीधरच्या गावाला जाणार आहे. आता इतका अंधार झाला होता की घरी जायलाच हवं होतं. मग आम्ही उठलो आणि घरच्या रस्त्याला लागलो. शालूच्या घरच्या रस्त्यावरून तो चाफ्याचा वास, मग पुढे रातराणी नाकात भरून घेऊन आम्ही घरी पोचलो. पायावर पाणी घेऊन घरात, देवासमोर. आज शुभंकरोती म्हणून देवाला नमस्कार केला ना, तेव्हा मी गणपतीला म्हटलं, "बरं झालं मला असला भाऊ दिलास. इतके दिवस आमच्या घरी कोणाला म्हणजे कोणाला मी काय बोलत असते ते कळतच नव्हतं. आता श्रीधर रोजच असेल नं गप्पा मारायला."

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

सुंदर!
>>मी मनातल्या मनात याला कुठल्या झाडावर उद्या चढवायच ते ठरवायला लागले.>> एका उन्हाळ्याच्या सुट्टीतली 'मी' आठवली.

छान लिहिले आहे. Happy
पण मध्येच तृतीय पुरुषी ( 'सरू'), मध्येच प्रथम पुरुषी ( 'मी' ) लिहिल्याने जरा रसभंग होतोय.
काही कारणाने तसे लिहिले असल्यास मला कळले नाही. माबुदो. Sad

छान लिहिले आहे. Happy

पण सुरूवात तृतीय पुरुषी ( 'सरू'), मध्येच प्रथम पुरुषी ( 'मी' ) लिहिल्याने जरा रसभंग होतोय. >>>> + १

वावे, पुरंदरे शशांक, निरू, आदू, हिरा, maitreyee, स्वाती२, प्राची, धनि ,आसा, किट्टु२१, गोष्ट वाचून अभिप्रायदिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद!

@प्राची आणि आसा, तुमचा म्हणणं बरोबर आहे. ही technical चूक झाली आहे Happy पण correct करताना लिखाणाचा flow जाईल असं वाटलं. पुढच्यावेळेस सुधारणेला वाव Happy

@जयश्री, मन्या S,अतरंगी, मराठी कुडी, अज्ञातवासी, बिपीन सांगळे, खूप छान वाटतं आहे सगळ्यांचे प्रतिसाद वाचून. मनापासून आभार. काही सुधारणा हवी असेल तर नक्की कळवा.

वाह!! काय सुंदर निरागस कथा आहे. मस्त वातावरणनिर्मिती केलेली आहे. अगदी सरुच्या डोळ्यातून जग दिसतं.