अजरामर वटवृक्ष

Submitted by सामो on 26 July, 2021 - 10:19

अन्यत्र पूर्वप्रकाशित
--------------------------------------------------------
सळसळणारा, विशाल आणि डेरेदार असा तो वटवृक्ष, वार्‍या पावसाला थंडीला तोंड देत युगानुयुगे मोठ्या दिमाखात ऊभा होता.किती युगे लोटली तो जन्मून ते एक तो जाणत होता किंवा मग ब्रह्मदेवाच. त्याची पाळेमूळे जमिनीत खोलवर आणि दूरदूरवर पसरली होती तर शाखाविस्तार दूरदूरवर तसेच ऊंचच ऊंच असा आकाश भेदून विस्तारला होता. त्याचा पसाराच इतका मोठा होता की अनेक पक्षी-पोपट, बुलबुल, चंडोल,चक्रवाक, चिमण्या, कोकीळांनी त्याचा आसरा घेतला होता.
आजूबाजूच्या वनवृक्षांशी, शालवृक्ष, वेनवेलींशी गूज करण्यात, त्याचा कालापव्यय होत असेच परंतु तो त्याचे कर्तव्यदेखील अतिएकाग्रतेने, जबाबदारीने पार पाडत असे. पक्ष्यांचे, वानर, खारी, ढोलीतील घुबड व तत्सम प्राण्यांचे रक्षण करण्यात त्याचा हात कोणीही धरु शकत नव्हते. एकदा पक्ष्यांच्या जोडीने त्याच्यावरती घरटे केले की ती जोडी संपूर्ण निश्चिंत होत असे. आपले घरटे पिसाट वार्‍या पावसापासून सुरक्षित राहील, आपली पिल्ले कधीच बेवारशी उघड्यावरती पडणार नाहीत हा सार्थ विश्वास त्यांना वाटे. अनेक साधूनीदेखील या वृक्षाच्या शीतल छायेत आश्रय घेतला होता, त्यांच्या तपश्चर्येचे स्थान या वृक्षाच्या सावलीस बनविले होते.
वृक्षास एकच खंत होती की त्यास फळे येत नसत. क्षुधार्तास त्याचा उपयोग शून्य होता. परंतु त्याचे सत्जीवन पहाता ही उणीव फारच क्षुल्लक होती.एके दिवशी एक तेजस्वी मुनी त्याच्या सावलीत घटकाभर विसावले. घटका दोन घटका विश्रांती घेतल्यानंतर ते ध्यानस्थ झाले असता त्यांनी तूर्यावस्थेत, वृक्षाचे दु:ख जाणले. आणि वृक्षाच्या उपकाराची परतफेड म्हणून त्यांनी त्याचे भविष्य जाणून घेऊन ते वृक्षास सांगीतले. मुनी म्हणाले, "हे सदैव हरीस्मरणात दंग रहाणार्‍या आणि सत्जीवन कंठणार्‍या उत्तम वृक्षा, मित्रा, मिथ्या दु:ख का करतोस? तू तुझे पूर्वसंचित घेऊनच भूतलावरती आलास. भूलोक असा आहे जिथे सुखाबरोबर दु:ख हे अटळ आहे. जीवाची कर्मभूमी असा हा लोक आहे. आणि हरीस्मरण हेच इथल्या सर्व व्यथांवरचे औषध आहे. मी हे सर्व सांगण्याची गरजच नाही, तू स्वतः हे जाणतोसच. पण तरीही मी तुला तुझे दु:ख कमी व्हावे म्हणून तुझ्या भविष्यातील न भूतो न भविष्यति अशा अतिसुदैवी घटनेची तुला सूचना देतो. काही काळातच मानवास अभूतपूर्व असा मदतीचा योग तुझ्या भविष्यात लिहीलेला आहे. जर तुझ्या कर्तव्यदक्ष, सुस्वभावानुसार तू त्या जबाबदारीत यशस्वी झालास तर तुझ्या स्तुतीचे गोडवे साक्षात ऋषीमुनी, देवदेवादिक, मानव, गंधर्व, किन्नर गातील. तू अजरामर होशील. तू कृतार्थ होशील. हा नक्की काय प्रसंग आहे ते जाणण्यास माझे तप तोकडे आहे किंबहुना ती घटना गुप्त रहावी हीच हरी इच्छा असावी. परंतु मला तपःसामर्थ्याने इतके कळते की हा योग केवळ अभूतपूर्व, दैदीप्यमान आहे." इतके बोलून मुनींनी तेथून प्रयाण केले.
वृक्ष मात्र कोड्यात पडला. त्याला कल्पना करता येत नव्हती, उगाच हुरहूर मात्र लागुन राहीली होती.
असेच ऋतुमागुन ऋतु जात राहीले, वृक्ष नित्यकर्मांत, हरीस्मरण आणि अन्य कर्तव्यांत बुडून गेला. इतका काळ लोटला की वृक्ष हे देखील विसरुन गेला की त्याच्याविषयी असे काही भाकीत कोणी केले आहे. पावसाळा लागला. यावेळेस काही वेगळाच पाऊस पडत होता. प्रथम प्रथम रिमझिम पडणार्‍या पावसाने हळूहळू उग्र रुप धारण केले. ढगांचा गडगडाट , वीजांचा लखलखाट थांबेना.संततधार लागली. अशी की जणू ढगफुटीच झाली. काळोख तर इतका पडला की डोळ्यात बोट घातले तरी, एक बोटभर अंतरावरचे दिसेना. सतत महीनाभर पाऊस लागला. पृथ्वी तर जलमय झालीच पण वटवृक्षाचे जवळजवळ सर्वच स्नेही, लता-वृक्ष-झाडे-रोपटी-वेली धराशायी पडले. अतिऊंच आणि भक्कम असा तो वट वृक्ष रोज इंचा इंचाने पाण्यात बुडू लागला, ताकदहीन होऊ लागला. त्याच्यावरची जीवसृष्टीने केव्हाच जलसमाधी घेतली होती. आता तर वृक्षाची जेमतेम एक शाखा पाण्याबाहेर होती आणि अजुनी पावसाला खळ नव्हती. शेवटच्या घटका मोजणार्‍या वृक्षास हरीवेध लागले. पण त्याचबरोबर वैफल्यग्रस्त त्याला आयुष्यातील महत्त्वाचे क्षण आठवु लागले. त्याला मुनींची भविष्यवाणी आठवली आणि खिन्नतेने हसत तो मनाशी विचार करु लागला खोटीच ठरली तर! पावसाचा जोर काही थांबत नव्हता आणि त्याबरोबरच वृक्षाचा विष्णुधावाही. शेवटी एक पान उरले आणि तेही बुडता वृक्षाचे प्राण पूर्ण जाणार होते.
पण आश्चर्य म्हणजे, एका उग्र डोंगरलाटेने कुठुन ते केवळ ती जाणे, पण एक चिमुकले तेजस्वी बाळ वहावत आणून त्या वटवृक्षाच्या पानावर ठेवले. काळेशार डोळे असलेले, श्यामल वर्णी ते बाळ भुकेजुन, स्वतःच्याच पायाचा अंगठा चोखत पानावर शांतपणे पहुडले. सभोवती उग्र लाटांचे तांडव चालू असतेवेळीही वडाच्या पानाने, स्वतःचा द्रोण करुन त्या बालकास अगदी सुरक्षित ठेवले इतके की जणू काही मातेने छातीशी घ्यावे. आणि ते पान लाटांवर हेलकावत राहीले. पानात अजुनही जीव असलेल्या त्या वृक्षास साक्षात्कार झाला, त्याला त्याच्या जीवनाचे ध्येय कळो आले. त्याची जबाबदारी आणि पुण्यघटीका त्याला कळून आली. शेवटी तपस्वी मुनीचे शब्द खरे झाले होते.
पुढे याच घटनेवरती कविंनी स्तोत्रे रचली, कविता केल्या, अनेक तत्वज्ञांना या दृष्यातून अध्यात्मिक अर्थ शोधण्याची स्फूर्ती मिळाली. त्यापैकी आदि शंकराचार्यांच्या बालमुकुंदाष्टकातील या ओळी -

करारविन्देन पदारविन्दं मुखारविन्दे विनिवेशयन्तम् ।
वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि ॥

अर्थात, कमळासम करांनी, कमळासम सुकुमार पावलांचा अंगठा, आपल्या कमळमुखात चोखत, वटवृक्षाच्या पानावर शांतपणे पहुडलेल्या बाळ मुकुंदाचे मी ध्यान करतो.

https://lh3.googleusercontent.com/pw/AM-JKLVUXozygK76Y0HcgnKeh8Z8vd7NCx9-OzodQZo6Fskle0Ub6SfJsCO7IPJCk5U92xVaVUS5dtbdBIfwJscCaYjGmMhijlpLAV5PFODUjV1iMuLeklWjxSqMowx7z3EfBGcMleuhEbDrKOTnsS5puN1TjA=w618-h824-no?authuser=0

चित्र साभार - नेट(http://www.harekrsna.de/bala-mukunda-astakam.htm)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बन्या खूप धन्यवाद.

वन ऑफ माय फेव्हरेटस. खूपसं अस्ताव्यस्त आणि क्वचित प्रक्षोभक, चाळवणारे लेखन केलेले आहे परंतु ज्या लिखाणाबद्दल स्वतःबद्दलच अभिमान वाटावा त्यामध्ये हा लेख येतो.