भास

Submitted by स्वप्ना_राज on 23 July, 2021 - 10:37

'अमित?'
त्याने लक्ष दिलं नाही.

'अमित?'
तो गप्पच.

'बघ ना माझ्याकडे'
त्याने डोळे गच्च मिटून घेतले.

'अरे, असं काय करतोयस?'
'मुग्धा नाहिये इथे. मुग्धा नाहिये इथे' तो डोळे मिटून स्वतःशी पुटपुटत राहिला.

'मी बसलेय इथे तुझ्यासमोर अमित. हे बघ मी तुला स्पर्श करू शकतेय. तुला जाणवतोय ना माझा स्पर्श?'
'सगळे भास आहेत. मला भास होताहेत.'

'कोण म्हणतं असं?'
'कियाराने सगळं सांगितलंय मला'

'काय सांगितलंय कियाराने?'
'तू सोडून गेली आहेस मला २ वर्षांपूर्वी. नाहियेस ह्या घरात तू आता. कियाराने सावरलं मला तू नसताना'

'खोटं बोलतेय रे ती'
'ती म्हणते की तू खोटं बोलतेयस' अमितच्या आवाजात आता असहायपणा होता.

'हे बघ मी आता चेतनला फोन करते हं तुझ्यासमोर. तू त्याला विचार. तो सांगेल तुला की मी परत आलेय आपल्या घरात. चेतनवर विश्वास आहे ना तुझा?'
अमितने मान हलवली.

'हॅलो चेतन, मुग्धा बोलतेय.'
'बोल मुग्धा, कशी आहेस? अमित कसा आहे?'

'तूच बोल त्याच्याशी. माझं ऐकत नाहिये.'

'हॅलो चेतन....'
'हे हाय बडी....कसा आहेस?'

'चेतन, मला परत मुग्धा दिसतेय. मी डॉक्टरांनी सांगितलेली सगळी औषधं घेतोय. मग हे असं का होतंय?'
'अमित, ऐक माझं ऐक...आठवून बघ बरं नीट. मुग्धा आली होती ना दिल्लीहून परत मागच्या महिन्यात? आपण गेलो होतो एयरपोर्टवर तिला आणायला? मग तिघं मिळून मस्त जेवलो होतो बावर्ची मध्ये? तुझं आवडतं बटर चिकन, बिर्याणी, फिरनी. आठवतंय ना?'

'अं हो, मग आपण दुसर्या दिवशी आईसक्रीम पार्टी केली होती. बरोबर ना?'
'अगदी बरोबर. '

'मग कियारा असं का म्हणतेय?'
'काय म्हणतेय कियारा?'

'ती म्हणतेय की मुग्धा नाहिये. माझा भास आहे नुसता.'
'अमित, कियारा नाहिये रे तिथे. तो तुझा भास आहे. मुग्धा आहे तिथे.'

'असं कसं होईल? ती काय कियारा तिथे उभी आहे....त्या ड्रेसिंग टेबलजवळ'
'तू मुग्धाला फोन दे बघू.'

''हॅलो चेतन....'
'मुग्धा, ह्याला परत अ‍ॅटॅक आलेला दिसतोय. डॉक्टर टिपणीसांना फोन करायला पाहिजे.'

'चेतन....'
'तू करते आहेस का मी करू?'

'चेतन....'
'अग काय चेतन चेतन लावलंयस? मी येऊ का तिथे?'

'चेतन, मलासुध्दा कियारा दिसतेय....त्या ड्रेसिंग टेबलजवळ'

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक अंदाज:-
दोघांना भास होत नसावे. चेतनने कियाराचे काही बरंवाईट केले असावे अशी त्या दोघांची खात्री असावी. म्हणुन चेतनविरुध्द पुरावा गोळा करण्यासाठी हा सापळा लावला असावा.

अमित आणि मुग्धा लवबर्डस् आहेत. कियाराचं अमितवर एकतर्फी प्रेम होतं आणि चेतनचं मुग्धावर. कियारानं मुग्धाला मारण्याचा प्रयत्न केलेला पण चेतननं मुग्धाला कियाराच्या हल्ल्यातून वाचवलं. झटापटित कियारा मारली गेली आणि मुग्धा दवाखान्यात पडली. दरम्यान अमितला कियारा (भूत/हडळ बनून) दररोज भेटून सांगू लागली की मुग्धा वारलीय. इकडे मुग्धा बरी होऊन अमितकडे परतली तर त्याला विश्वास पटेना म्हणून मुग्धानं चेतनला मध्यस्थी घेतलं कारण चेतन; ते आपले चंद्रमा नाहीत का त्यांच्या धाग्यातल्याप्रमाणे मुग्धाच्या सुखासाठी आपल्या प्रेमाची कुर्बानी देतोय. हाकानाका. Proud

छान आहे, शेवट खरेच धक्का देतो. हाडळीचा आशिक यान्चा तर्क बरोबर असणार.. त्यान्च्या इत्का भुत हडळिन्चा अनुभव इतराना कुठुन?

मला 3 पैकी एक वाटलं
एक तर दोघांना भास होईला लागले किंवा किआरा भूत आहे किंवा अमित आणि किआरा मिळून मुग्धाला वेडी शाबीत करायचा यत्न करतायेत

मस्त!