पुनश्च गेट-टुगेदर! (भाग २८)

Submitted by सांज on 22 July, 2021 - 08:56

संपीची आई सकाळपासून कामात व्यस्त होती. कधी नव्हे ते आज लवकर उठलेल्या संपीने चहा पित पित तिची ती लगबग पाहून आईला विचारलं,

‘काय गं.. काही आहे का आज?’

संपीकडे एक कटाक्ष टाकून आई म्हणाली,

‘वटपौर्णिमा आहे आज..’

संपीची ट्यूब पेटली. आता पूजा, वड, नैवेद्य, पुरणाचा स्वयंपाक इ.इ. टिपिकल सीन तिच्या डोळ्यांसमोर उभा राहिला. सोवळयातल्या स्वयंपाकात गुंग असलेल्या आपल्या आईकडे पाहून ती म्हणाली,

‘काय गं आई, दरवर्षी तेच तेच करून कंटाळा नाही का येत तुला? तेच सणवार.. कुळाचार.. स्वयंपाक.. तोही सोवळ्यात.. देव-धर्म.. बरं स्वयंपाकाचा मेनू पण तोच-तोच.. पुरणपोळी-आमटी-भजी-भाज्या-पंचामृत.. वगैरे वगैरे.. देव बोअर नाही का होत तेच तेच खावून.. चेंज ऑफ टेस्ट म्हणून थोडं वेगळं आणि चटपटीत काहीतरी नैवेद्य म्हणून दाखवायला हवं.. बघ लगेच खुश होईल तो.. तुम्ही लोक पिढ्या-अन-पिढ्या तेच-तेच खाऊ घालताय त्याला..’

पुरण वाटता-वाटता आईने एकवार लेकीकडे पाहिलं आणि ‘महितीयेत हो हे सगळे विचार, या सगळ्यातून जाऊनच इथवर पोचलोय आम्हीही..’ अशा टाइपचे expressions चेहर्‍यावर आणत ती म्हणाली,

‘काही गोष्टी नियम-व्रत म्हणून करायच्या असतात संपे.. आवड-निवड-कंटाळा वगैरे आहेच की इतरवेळी. मनाला आणि शरीरालाही थोडं वळण हवं. तरच वाकड्या वाटेने जाण्याची मजा कळते. आणि बरोबर आहे तुझं तसं.. कंटाळाही येतो कधी कधी.. पण आता या सार्‍याची आम्हाला इतकी सवय झालीये ना की सगळं नीट केल्याशिवाय मनाला चैन पडत नाही. आणि काय गं, तोच-तोच मेनू म्हणतेस आणि दरवेळी मिटक्या मारून खातेस पण की.. तेव्हा कुठे जातं हे चेंज ऑफ टेस्ट वगैरे.. बरं त्यालाही ना नाही. तू जेव्हा या सगळ्यात पडशील ना तेव्हा काय हवा तो नैवेद्य दाखव देवाला. काही म्हणणं नाही माझं. तेव्हा देवासोबत आम्हालाही घडेल चेंज ऑफ टेस्ट का काय ते.. आमचं वळण मात्र आम्हाला हेच सगळं करायला सांगतं बरं!’

यावर नेहमीप्रमाणे संपी आईसमोर गप्प झाली. आईकडे नेहमीच कसं सगळ्याच अगदी चपखल उत्तर असतं?

‘तू जेव्हा यात पडशील..’ या शब्दांनी मात्र संपी विचारात पडली. आणि नाही म्हटलं तरी मनातल्या मनात ‘बापरे.. हे सगळं आणि मी??’ असं तिचं झालं.

पुरणपोळी खावून सकाळची झोप संपीने दुपारी भरून काढली. काही वेळाने फोन वाजल्याचं निमित्त झालं आणि तिला गाढ वामकुक्षीतुन बाहेर यावं लागलं. फोन मधुचा होता. आज पाच वाजता सगळे जुन्या कॉलेज मध्ये जमणार होते. संपी जराशी निरुत्साहीच होती. पण, हो-नाही करता करता ‘जायचंय’ असंही तिच्या मनाचं कधीतरी ठरलेलं होतं. तशी ती तयार झाली. साधासा पंजाबी ड्रेस आणि मोकळे केस. मधु आल्यावर दोघी कॉलेजच्या दिशेने निघाल्या.

कॉलेज प्रशासनाकडून परवानगी काढून त्यांच्या जुन्या क्लासरूमचा अॅक्सेस सगळ्यांनी मिळून मिळवला होता. आणि वर्गात सारे जमाही झालेले होते. आठवणी जागवत जो-तो आपआपल्या पूर्वीच्या जागेवर बसलेला होता. सगळ्यांनाच शक्य झालं नसलं तरी जवळपास पन्नास टक्के पब्लिक जमलेलं होतं. श्रीनिवास अर्थातच आघाडीवर होता. बाकी मयूर, मंदार, निखिल, मृणाल, श्वेता, अनिरुद्ध, निखिल इ इ सगळेचं आलेले होते. शिवाय मधु सारखे इतर शहरात असलेलेही बरेचजण हजर होते. संपी आणि मधु पोचल्या (नेहमीप्रमाणे उशिरा) तेव्हा श्री डाएस वर उभा राहून काहीतरी बोलत होता आणि सारे त्याच्या विनोदावर हसत होते. त्याचं लक्ष दारात उभ्या संपीकडे गेलं आणि मग त्याने सार्‍यांचं लक्ष दाराकडे वेधत,

‘तर मित्रहो, आपल्या कॉलेजचं सदाबहार व्यक्तिमत्व, कायम हसतमुख, उशिरा येण्यात ज्यांचा वकुब आहे.. मनाने अगदी निरागस आणि बोलण्यात आजकाल बुलेट ट्रेन असलेल्या, संपी उर्फ संपदा जोशींचं आगमन झालेलं आहे.. टाळ्या होऊन जाउद्या..’

श्री हे असं नक्कीच वागू शकतो हे माहित असल्याने संपी त्याच्याकडे पाहत हसत-हसत आत आली. आणि तिच्या ठरलेल्या बेंच कडे ती जात असतानाच श्री तिला उद्देशून म्हणाला,

‘संपदा मॅडम, एक-एक मिनिट.. इथे येऊन तुम्ही तुमचे मौलिक विचार जर आज उपस्थित जनांसोबत शेअर केले तर सगळ्यांना खूप आनंद होईल..’

त्याच्या या sarcastic बोलण्याने संपी सकट पूर्ण वर्ग पुन्हा खलखळून हसला. मग ‘फारचं बोलतोयस, थांब.’ म्हणत संपीही डाएस वर येऊन उभी राहिली. सगळ्यांवरून तिने एक नजर फिरवली. समोरच्या बेंच वर बसलेला मंदार, दोन रांगा सोडून मागे असलेला मयूर तिला ठळकपणे दिसले. मंदार नेहमीप्रमाणे किंचित हसत तिच्याकडे पाहत होता. त्याच्या त्या पाहण्यात तिला दरवेळी एक वेगळीच चमक मात्र नेहमी जाणवायची. आजही ती जाणवली. तिने हसून त्याच्याकडे पाहिलं. मयूरकडे पाहून मात्र एक अवघडलेल स्मित तिच्या चेहर्‍यावर उमटलं. आणि मग श्री कडे एकदा पाहून ती सर्वांना, नेहमीसारखी हसत,

‘हॅलो.. everybody..’ म्हणाली.

‘हॅलो..’ सगळ्यांचा समूहस्वर वर्गात घुमला.

मग श्री कडे आणि बाकी सगळ्यांकडे पाहत संपी म्हणाली,

‘तर, तुम्हाला सगळ्यांना माहित असल्याप्रमाणे आपले परममित्र, खरतर जगन्मित्र, कायम फुल्ल ऑफ लाइफ असलेले, कोणत्या गल्लीत कोणती मुलगी राहते याची चालती-फिरती डायरेक्टरी असलेले, वर त्या-त्या मुलीच्या ‘इतिहास-भूगोलाचीही’ मेमोरी डिस्क कायम सोबत बाळगणारे, भावी इंजीनियर, श्रीनिवास राव यांनी आज हे आपलं गेट-टुगेदर अरेंज करून आपल्या सगळ्यांची एकमेकांशी गाठ घालून दिल्याबद्दल सगळ्यांच्या वतीने मी त्यांचे जाहीर आभार मानते..’

यावर वर्गात एकच हशा पिकला. श्री तर प्रत्येक वाक्याला हसत होता.

एवढ्यावर न थांबता, संपी श्रीला म्हणाली,

‘तर श्रीनिवास माझ्यापेक्षा तूच तुझे ‘मौलिक’ विचार आज सगळ्यांपुढे मांडलेस तर सगळ्यांच्याच ‘जनरल नॉलेज’ मध्ये कमालीची भर पडेल’

संपीने आपला गेम आपल्यावरचं उलटवलेला पाहून श्री तिच्यापुढे हात जोडत हसत म्हणाला,

‘मॅडम.. माझं चुकलं. आपण प्लीज आपलं आसन ग्रहण करून मला उपकृत करा. मला आज माझीच ‘हिस्टरी-जॉग्रफी’ धोक्यात आल्यासारखी वाटतेय’

पुन्हा वर्गात जोराचा हशा पिकला.

हसत हसत संपी खाली उतरली आणि पाहते तर काय मधु आणि मंदार एकमेकांशी तिच्याचकडे पाहत हसत काहीतरी बोलत होते. मनातल्या मनात ‘बरं!!’ म्हणत संपी जाऊन समोरच्या एका बेंचवर बसली..

क्रमश:

सांज
www.chaafa.com

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

किल्ली, आसा.. Thank you Happy

आंबट गोड, काही ठिकाणी उपवासाची पद्धत नसते. आमच्याकडे नाहीये