दिलीप कुमार - ०५ - अंतिम.

Submitted by Theurbannomad on 8 July, 2021 - 13:38

दिलीप कुमार हे नाव जगाला माहित झालं, ते त्यांच्या कर्तृत्वामुळे...पण हे नाव त्यांना दिलं बॉम्बे टॉकीज या कंपनीच्या भागीदार असलेल्या देविका राणी यांनी. या त्याच देविका राणी, ज्यांनी ' त्या ' काळात हिमांशू रॉय ( जे पुढे तिचे खरे पतीसुद्धा झाले ) यांच्याबरोबर दीर्घ चुंबनदृश्य देऊन खळबळ माजवलेली होती. त्यांनी मोहम्मद युसूफ खान याला ३६ रुपये महिना अशा भक्कम पगारावर नोकरीवर रुजू केलं. ( त्या काळी नटांना पगारी नोकरीवर ठेवलं जाई आणि त्यांना महिना ५ ते २५ रुपये असा पगार त्यांच्या कुवतीनुसार मिळे...त्या मानाने ३६ रुपये मोठी रक्कम होती. आजच्या तुलनेत ही रक्कम कमीत कमी ३६००० नक्कीच असेल...) आणि या पगाराबरोबरच त्या २१ वर्षीय काटकुळ्या गोऱ्यागोमट्या पठाणाचं देविकारानी यांनी नामकरण केलं ' दिलीप कुमार '. ज्वार भाटा हा दिलीप कुमार यांचा पहिला चित्रपट.

दिलीप कुमार यांनी अभिनयाचं शास्त्रशुद्ध शिक्षण कुठेही घेतलं नसलं, तरी आपल्या अंगभूत चिकित्सक आणि अभ्यासू वृत्तीने त्यांनी अभिनायकलेबद्दल खूप सखोल अभ्यास केला होता. स्तानिस्लावस्की, ली स्ट्रासबर्ग अशा अभिनयकला शिकवणाऱ्या ' ऍक्टिंग युनिव्हर्सिटी ' तेव्हा नव्हत्या. भारतात मूकपट ते टॉकी हा प्रवास नुकताच झालेला होता आणि रंगभूमीवर वावरलेले नट या नव्या माध्यमात नशीब आजमावत होते...पण तरीही दिलीप कुमार यांनी ' मेथड ऍक्टिंग ' नक्की कशा प्रकारे आत्मसात केली हे अनेकांना न सुटलेलं कोडं आहे. दस्तुरखुद्द सत्यजित रे यांनी दिलीप कुमार यांच्या अभिनयाला ' अभिनयाची कार्यशाळा ' अशा शब्दात गौरवलेलं आहे. अमिताभ बच्चन, संजीव कुमार, शाहरुख खान , इतकंच काय पण अगदी कमल हसन यांनाही त्यांच्या अभिनयातून खूप काही शिकता आलेलं आहे आणि त्यांनी ते अनेकदा बोलूनही दाखवलेलं आहे.

त्या काळी अनेक नट आपल्याला कॅमेऱ्यासमोर सतत कशा पद्धतीने राहता येईल याचा अट्टहास करत. पुढे अभिनयाचं प्रशिक्षण घेऊन आलेला असूनही शत्रुघ्न सिन्हा असले प्रकार सर्रास करायचा. आपला पाठमोरा ' शॉट ' असला तरी मुद्दाम मागे वळून आपली ' साइड प्रोफाइल ' कॅमेऱ्यासमोर दाखवणं , ' हाय अँगल ' शॉट असला तर काहीही गरज नसतानाही मुद्दाम वर बघून कॅमेऱ्यात चेहरा दाखवणं , फोटो ज्या बाजूने चांगले दिसतात ती बाजू सतत कॅमेऱ्यासमोर येईल असा हट्ट करून ' शॉट ' साठीचा आवश्यक ' अँगल ' बदलायला लावणं असले प्रकार राज कपूरसारख्यानेही केले आहेत. दिलीप कुमार मात्र या सगळ्यात वेगळा ठरला तो त्याच्या अभ्यासू वृत्तीमुळे. त्या शॉटसाठी जे महत्वाचं, त्यानुसार नटाने स्वतःला ' मोल्ड ' करावं हा त्याचा विचार म्हणून मोठा ठरतो. दिग्दर्शक काय चीज आहे हे त्याला माहित असल्यामुळेच त्याने ' अंदाज ' नंतर राज कपूर जेव्हा ' संगम ' घेऊन आला, तेव्हा राजला दिग्दर्शनापासून लांब राहण्याची अट ठेवली. त्रयस्थ दिग्दर्शक भूमिकेला न्याय देईल, राज कपूर स्वतःला हे त्यांना पक्कं माहित होतं.

नटाने व्यावसायिक असणं नक्कीच वाईट नाही....पण पैशांच्या हव्यासापायी वाट्टेल ते काम करणं नटाला शेवटी संपवून टाकतं. दिलीप कुमारने कारकिर्दीच्या पूर्वार्धात चित्रपट अतिशय विचारपूर्वक निवडले. सिनेमा रंगीत झाल्यावर त्या अनुषंगाने आपल्याला काय काय बदल आपल्यात करावे लागतील हे त्याने अचूक ओळखलं होतं. आक्रस्ताळा किंवा आचरट अभिनय करणाऱ्या नटांसमोरही त्याने आपल्या अभिनयाची पातळी सोडली नाही. जिथे एखाद्या दृश्यात समोरचा नट अथवा नटी महत्वाची आहे, तिथे त्याने उगीच आपलं अस्तित्व जाणवून देण्याचा अट्टहास कधीच केला नाही. ' मुघल - ए - आझम ' च्या वेळी मधुबाला आणि तिच्या खवट बापाबरोबरच्या वैयक्तिक कुरबुरी त्याच्या पडद्यावरच्या प्रणयात कधी प्रतिबिंबित झाल्या नाहीत. ' प्यार किया तो डरना क्या ' हे वास्तविक मधुबाला आणि पृथ्वीराज कपूर यांचं द्वंद्व , पण त्यात त्याने शेहेनशाह अकबराकडे दिलेला एक जबरदस्त ' लुक ' कायम लक्षात राहतो तो केवळ त्यांच्यातल्या त्या अभिनयाच्या ताकदीमुळे.

बाळासाहेब ठाकरे आणि दिलीप कुमार अतिशय जवळचे मित्र होते. अनेकदा ते जुन्या मातोश्रीच्या गच्चीवर गप्पा मारत बसायचे. बाळासाहेबांसारख्या दिलदार पण मनस्वी कलावंत कदाचित पुन्हा होणार नाही, तसाच दिलीपकुमारांसारखा नटसुद्धा पुन्हा जन्माला येणार नाही....पण या दोघांच्या मैत्रीत वितुष्ट आलं ते दिलीप कुमार यांनी पाकिस्तानचा ' निशान - ए - इम्तियाझ ' हा सर्वोच्च नागरी सन्मान स्वीकारल्यामुळे. बाळासाहेबांनी बाणेदारपणे दिलीप कुमार यांची कानउघाडणी करून त्यांना या कृत्याबद्दल चार शब्द सुनावले होते....दिलीप कुमारही आपल्या मतावर ठाम राहण्याइतके पक्के होतेच...पण त्यामुळे दोघांचाही एकमेकांबद्दलचा आदर कमी झाला नाही. तात्विक मतभेदांना गलिच्छ पातळीवर न नेता एकमेकांपासून चार हात लांब राहण्याचा सुसंस्कृतपणा दोघांनीही दाखवला. शरद पवारही दिलीप कुमार यांचे जवळचे स्नेही.

लतादीदी आणि दिलीप कुमार यांच्या नात्याला एक वेगळीच भावनिक किनार होती. लतादीदींचे उच्चार ' दाल - चावल की बू ' येणारे असल्याची दिलीप कुमारांची टिप्पणी दीदींनी मनावर घेतली आणि हिंदी - उर्दू भाषांच्या उच्चारांवर दीदींनी हुकूमत मिळवून दाखवली, तेव्हा दिलीप कुमार यांनी त्यांचं भरभरून कौतुक केलं होतं. दीदी त्यांना राखी बांधत असत. ' मला एकच खंत आहे, की दिलीप कुमार माझे अतिशय आवडते नट असूनही मला त्यांच्यासाठी कधी पार्श्वगायन करता आलं नाही ' अशा शब्दात दीदी त्यांच्याबद्दल व्यक्त झालेल्या आहेत. दिलीप कुमार यांनीही चित्रपट सृष्टीच्या रागालोभापलीकडची ही निखळ मैत्री आणि भाव-बहिणीचं हे जगावेगळं नातं आयुष्यभर जपलं. एकमेकांच्या चुकांवर बोट ठेवूनही त्याचा राग न येऊ देता उलट त्या वैगुण्यावर मेहनत घेऊन स्वतःला पैलू पडणारे हे असे लोक आज दुर्मिळ झालेले आहेत.

नौशाद यांनी शास्त्रीय संगीताच्या बाजाचं ' मधुबन मे राधिका नाचे रे ' तयार केलं, तेव्हा दिलीप कुमार यांनी तासंतास आपल्या ' लिप मूव्हमेंट ' वर काम करून पडद्यावरच्या गाण्यात आपला अभिनय त्या त्या उच्चारानुसार चोख होईल याकडे कटाक्षाने लक्ष दिलं होतं. सतारीच्या पीससाठी तीन महिने शास्त्रशुद्ध पद्धतीने सतारीवर हात बसवूनच दिलीप कुमारांनी गाण्याचं शूट केलं. नौशादसारख्या खडूस आणि तत्वनिष्ठ संगीतकारानेही या सगळ्याचं भरभरून कौतुक केलेलं आहे.

माझ्या मते हिंदी सिनेमाच्या सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्यांमध्ये किशोर कुमार आणि मेहमूद यांचा अग्रक्रम वादातीत असेल...यांच्याबरोबरीने मुक्री, धुमाळ, केश्तो मुखर्जी, जॉनी वोकर ते थेट जॉनी लिव्हर, परेश रावल असे अनेक जण जबरदस्त विनोदी अभिनेते म्हणून प्रसिद्ध झाले...अमिताभ बच्चनने काही मोजक्या प्रसंगातून खळखळून हसवलं....तसे प्रसंग दिलीप कुमार यांच्या वाट्याला फारसे आले नसले, तरी जेव्हा जेव्हा आले तेव्हा त्यांनी अप्रतिम अभिनय केला आहे. राम और श्याम या चित्रपटात श्याम जेव्हा राम बनून अंजना ( वहिदा रेहमान ) च्या घरी येतो आणि त्याला घेऊन जायला गजेंद्र ( प्राण ) येतो, तेव्हाच त्यांच्या अभिनय अप्रतिम.

बैराग या चित्रपटात त्यांनी तिहेरी भूमिका केली. त्यांनी सायरा बानोबरोबर एकमेव बंगाली चित्रपट केला, तो ' सागीना महातो ' ...या चित्रपटाशिवाय त्यांनी इतर भाषेत काही काम केल्याचं ऐकिवात नाही. ' लॉरेंस ऑफ अरेबिया ' या गाजलेल्या हॉलिवूडपटात ओमर शरीफ यांनी केलेला ' शरीफ अली ' आधी डेव्हिड लीन यांनी दिलीप कुमार यांना देऊ केला होता, पण त्यांनी ती भूमिका नाकारली. पुढे डेव्हिड लीन यांनीच दिलीप कुमार आणि एलिझाबेथ टेलर ( हो, एलिझाबेथ टेलर ) यांना घेऊन ' ताज महाल ' चित्रपट करण्याचा घाट घातला होता, पण काही कारणाने तो चित्रपट सुरु झालाच नाही, अन्यथा आपल्याला दिलीप कुमार यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या एका मोठ्या चित्रपटात बघता आलं असतं.

असं म्हणतात की ' गंगा जमुना ' आणि ' दिल दिया दर्द लिया ' हे दोन चित्रपट खरं तर दिलीप कुमार यांनी दिग्दर्शित केले होते....पण अनेक वर्षांनी त्यांनी पहिल्यांदा 'कलिंगा ' द्वारे दिग्दर्शक म्हणून पदार्पण करण्याचं ठरवलं, तेव्हा त्यांचं ते स्वप्न काही पूर्ण होऊ शकलं नाही. ' मदर लँड ' या चित्रपटात सुभाष घई यांनी दिलीप कुमार, अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांना एकत्र आणण्याचा भव्यदिव्य घाट घातला होता, पण तोही चित्रपट पुढे गेला नाही.

२००० ते २००६ च्या काळात ते काँग्रेसकडून पाठवले गेलेले राज्यसभेचे खासदार होते. बांद्रा बॅण्डस्टॅण्ड भागाच्या सुशोभीकरणाच्या आणि नूतनीकरणाच्या कामासाठी त्यांनी या काळात बराच पुढाकार घेतला. इम्रान खान यांच्या ' शौकत खानम कर्करोग इस्पितळाच्या ' उभारणीसाठी त्यांनी पैसे जमावल्याची जाण इम्रानने कायम ठेवली आहे. उर्दू, हिंदी, पशतो, पंजाबी, इंग्रजी, मराठी, बंगाली, गुजराथी, हिंदको, पर्शियन, अवधी, भोजपुरी अशा अनेक भाषांवर त्यांचं प्रभुत्व होतं.

दोन वर्षांपूर्वी आलेल्या कोरोनाव्हायरसने दिलीप कुमारांचे दोन भाऊ त्यांच्यापासून हिरावून घेतले. त्यांच्या चौथा लहान भाऊ नासिर खान ( सध्या छोट्या पडद्यावर लहानमोठ्या भूमिका करणाऱ्या अयुब खानचे वडील असलेले नासिर खान स्वतःही अभिनेते होते ) १९७४ सालीच वारला होता. काही वर्षांपासून प्रोस्टेटच्या कर्करोगामुळे त्रस्त असलेले दिलीप कुमार अखेर ७ जुलै २०२१ या दिवशी अल्लाच्या घराकडे निघून गेले आणि एका पर्वाची समाप्ती झाली....स्वर्गात आज कदाचित ' देवदास ' , ' मुघल - ए - आझम ' , ' दाग ' , ' अंदाज ' चे हाऊसफुल शो लागले असतील !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लीच वारला होता. काही वर्षांपासून प्रोस्टेटच्या कर्करोगामुळे ट्रस्ट असले

त्रस्त

चांगली झाली लेखमाला.
दिलीपकुमारच्या अधिकतर चित्रपटांना नौशादचं संगीत आहे का?

दिलीप कुमारनी स्वतः गायलेल्या या गीताची नोंद घ्यायला हवी.
https://www.youtube.com/watch?v=uXLXIs2Sx8k
सोबत लता आहे.

कारकीर्दीच्या उत्तरार्धात दिलीपकुमारही स्वतःच्या प्रेमात पडले होते बहुधा. निळू फुलेंच्या एका मुलाखतीत वाचलं होतं की त्यांच्यासोबतच्या सीनमध्ये संवाद आपल्या तोंडी नसतानाही कॅमेरा आपल्या चेहर्‍यावरच असला पाहिजे असा त्यांचा हट्ट होता.
तरीही ते योग्य वेळी थांबले हे चांगलं झालं.

लेखमाला समयोचित होती याबद्दल आभार. उद्देश चांगला होता.
मात्र चुका टाळता आल्या असत्या तर दाताखाली खडा लागल्यासारखे झाले नसते. अनेक गोष्टी नावांच्या प्रभावाखाली येऊन लिहील्याप्रमाणे वाटत आहेत. श्रीराम लागू हे मराठीत मोठं नाव आहे. पण हिंदीत त्यांनी दुय्यम भूमिका केल्या. विधाता मधे त्यांचा रोल फार तर एक दोन मिनिटांचा आहे. त्यात अभिनयाला विशेष वाव नाही. तीच गोष्ट शक्ती मधे स्मिता पाटीलच्या बाबतीत झाली आहे. दोन तीन मिनिटाचा नाही पण अमिताभच्या अनेक चित्रपटांप्रमाणे नायिकेला या चित्रपटात वाव नाही. शक्ती मधे दिलीपकुमार आणि अमिताभ बच्चन दोघांनाही सारखाच वाव आहे. अमिताभच्या बाजूने सहानुभूती आहे. सलीम जावेद यांची जादू या चित्रपटात संपली असे दिसले. कारण त्यांच्याच जुन्या चित्रपटातले प्रसंग यात दिसत राहीले. त्या सिनेमाचा युएसपी अमिताभ विरूद्ध दिलीपकुमार असाच राहिला होता.

अमिताभ बच्चन द अमिताभ झालेला नव्हता अशा वाक्यांची गरज नव्हती. दिलीपकुमार माझ्या आधीच्या पिढीचे म्हणून त्यांच्याबद्दल आदर वाटतो. त्या आदरापोटी त्यांच्या चुका काढायला भय वाटतं. ते अमिताभच्या बाबतीत होणार नाही. कारण त्याचा स्टार बनण्याचा प्रवास जाणतेपणी पाहिलेला आहे. हे स्वाभाविक आहे.

आपण दखल घेऊन पुढच्या लिखाणात त्याचा अंतर्भाव कराल ही अपेक्षा.

अमिताभ द अमिताभ 1975 मधेच झाला होता...
आणि राजेश खन्ना तोपर्यंत संपला होता... राजेश खन्नाचा सुवर्णकाळ म्हणजे 1969 ते 1972...
1973 मध्ये जंजिर आला आणि गेम पलटायला सुरुवात झाली होती..

एखादी जुनी अत्तराची कुपी अलगद उघडावी आणि तिच्या घमघमाटामुळे जुन्या स्मृती जाग्या व्हाव्यात, तसे एका जुन्या कालखंडाची कुपीच तुम्ही उघडी केलीत या लेखमाले द्वारा. हा संपूर्ण काळ डोळ्यासमोर उभा ठेवणारी लेख मालिका. वाचता वाचता रोचक संदर्भ येतील तसे गुगल करून अधिक माहिती मिळवत त्यासंबंधित जालावरचे इतर लिखाण वाचून पुन्हे इथे येऊन पुढे वाचत गेलो. त्यामुळे या जुन्या काळात हरवायला झाले Happy राज कपूर सोबत मधुबालाने काम केलेल्या १९४७ च्या नीलकमल पासून ते अगदी काल-परवा पर्यंत किती काय काय पाहून वाचून झाले या लेखमालिकेमुळे!

मधुबाला आणि दिलीपकुमार यांची प्रेमकहाणी वाचली. १९४४ पासून १९५६ पर्यंत असा तिचा दीर्घ प्रवास आहे. १९५५ मध्ये नया दौरच्या शुटिंगसाठी बी आर चोप्रा यांचे युनिट बाहेरगावी चालले होते. प्रमुख भूमिकेसाठी मधुबाला यांना साईन केले होते. करारानुसार चोप्रांकडून त्यांना अनामत रक्कमसुद्धा दिली गेली होती. पण शुटिंगसाठी बाहेरगावी जाण्यास मधुबालाचे वडील अताउल्लाह खान यांनी तीव्र हरकत घेतली. शुटींगच्या निमित्ताने या दोघांना रोमान्स करता यावा म्हणून बाहेरगावी जाण्याचा घाट घातला आहे असा थेट आरोप त्यांनी चोप्रांवर केला. चोप्रा भडकले. त्यांनी तडकाफडकी मधुबाला ऐवजी वैजयंतीमाला यांना करारबद्ध केले व चित्रपटाचे शुटींग पुढे सुरु ठेवले. पण केवळ इतके करून ते थांबले नाहीत. निर्माताच तो. एकीकडे शुटींग सुरु असतानाच इकडे त्यांनी न्यायालयात मधुबाला व त्यांच्या वडिलांविरोधात खटला दाखल केला. अनामत रकमेचे पैसे घेऊन काम करायला नकार दिला म्हणून! हा खटला माध्यमांतून सुद्धा तेंव्हा खूप गाजला होता. कोर्टात दिलीपकुमार यांनी अर्थातच चोप्रांच्या बाजूने अताउल्लाह खान यांच्या विरोधात साक्ष दिली. वडिलांवर निरतिशय प्रेम असलेल्या मधुबाला यांना हे आवडले नाही. दोन्ही बाजू ऐकून कोर्टाने चोप्रांच्या बाजूने न्याय दिला. हे सगळे एकीकडे सुरु असतानाच तिकडे चित्रपट बनून प्रदर्शित झाला व हिट सुद्धा झाला. नंतर कोर्टाने शिक्षा सुनावण्यापूर्वीच चोप्रांनी मधुबालाविरुद्धची केस काढून घेतली. पण तोवर या सगळ्यात या दोघांचे प्रेमाचे संबंध होरपळले. कोर्टात विरोधात साक्ष देताना बोललेल्या शब्दांमुळे अताउल्लाह खान यांच्या मनातून दिलीपकुमार कायमचे उतरले होते. अखेरचा प्रयत्न म्हणून मधुबाला यांनी मध्यस्ती करत दिलीपकुमार यांना आपल्या वडिलांची माफी मागायला लावली. पण दिलीपकुमारनी यास साफ नकार दिला. आणि दहा बारा वर्षाचे प्रेमप्रकरण संपले. पुढे ते केवळ कामानिमित्त एकत्र आले. मुघल-ए-आझम मधली दोघांची एकत्र असलेली अनेक दृश्ये ते दोघे एकमेकांशी व्यक्तिगत बोलतसुद्धा नसताना शूट केली गेली आहेत.

>> राम और श्याम या चित्रपटात श्याम जेव्हा राम बनून अंजना ( वहिदा रेहमान ) च्या घरी येतो

हा चित्रपट मी पाहिलेला नाही. पण या वाक्या संदर्भात हा खालील सीन पुढे पाच-सहा मिनिटे पाहिला. खूपच छान Lol
https://youtu.be/CzOtEtuqwgA?t=5246

एक अतिशय वाचनीय अशी लेखमाला लिहून माहितीत भर घातल्याबद्दल आपले आभार Happy

बहुतेक मायबोलीवरच वाचलेय हे. दिलीपकुमार यांना शाहरूखकानकडून अभिनयाची प्रेरणा मिळाली. असेल पण..
हा व्हिडीओ बघून वाटतंय का ?
https://www.youtube.com/watch?v=hbNOrB8vHCY

अतिशय सुन्दर लेखमाला ..

दिलिपकुमार एकेकाळी माझा आवडता नट होता.. तो जाड बेढब व्हायच्या आधी..

त्याच्या कित्येक भुमिका आवडत्या आहेत तरी सर्वात जास्त् आवडलीय ती आझाद मधली विनोदी भुमिका.. अजून असे काहि रोल केले पाहिजे होते..

मुसाफिर मधले दिलिपकुमारने गाय्लेले लागी नाही छुटे रामा, चाहे जिया जाय हे मी हल्ली हल्ली पर्यन्त रफीने गाय्लेय असे समजत होते.. खुप सुरेख गाय्लेय.

छान लेखमाला, आवडली.
चित्रपट आणि अभिनेत्यांवर लिहिले की मतमतांतरे होतातच. कारण प्रत्येकाची वैयक्तिक आवड असतेच. पण प्रत्येकाची मते वाचायला आणि विविध दृष्टीकोन जाणून घ्यायलाही मजा येते. त्यामुळे प्रतिसादही वाचायला आवडले. अर्थात एकाच लेखात थोडेसे संक्षिपात हे आले असते तर चर्चाही एकाच जागी राहिली असती. ते असो..

बहुतेक मायबोलीवरच वाचलेय हे. दिलीपकुमार यांना शाहरूखकानकडून अभिनयाची प्रेरणा मिळाली. असेल पण..
हा व्हिडीओ बघून वाटतंय का ?
>>>>
माझ्या जनरेशनच्या बहुतेकांना दिलीप कुमार हे नाव शाहरूखखानवर त्याची नक्कल केल्याच्या आरोपामुळेच पहिले माहीत होते.
अर्थात मला तरी कधी तसे वाटले नाही, आणि शाहरूखनेही माझ्यावर दिलीप कुमार यांचा नाही तर अमिताभचा जास्त प्रभाव होता असे म्हटल्याचे आठवतेय. याऊपर दिलीप कुमार ट्रॅजेडी किंग म्हणून ओळखले जायचे तर शाहरूख किंग ऑफ रोमान्स. त्यामुळे त्यांच्या इमेजमध्येही हा फरक होताच.

दिलीप कुमार, अमिताभ बच्चन आणि शाहरूखखान यांचे एक फेमस फोटोशूट होते. थ्री जनरेशन थ्री सुपर्रस्टार थीमवर आधारीत. तिघे छान काळ्या सूटबूटमध्ये होते. कोणाला आठवतेय का ते?