विश्वाचे आर्त..... !!....

Submitted by Sujata Siddha on 18 June, 2021 - 06:04

विश्वाचे आर्त..... !!....

“डुबुक डुबुक ssss “ वैशाखातल्या टळटळीत दुपारी विहिरीच्या कट्टयावर बसून चिंतू छोटे छोटे दगड पाण्यात टाकत होता , दुपारचं सावलीत खेळा असं सतत कोकलूनही न ऐकल्यामुळे बामनवाडीतल्या मुलांना त्यांच्या आयांनी धपाटे घालून घरात बसवलं होतं , चिंतूला असं मायेचं कोणी नव्हतं , एक आजी होती पण ती आता परतीच्या वाटेला लागली होती , आधीच अंधारलेल्या घरात एका अजूनच अंधारलेल्या कोपऱ्यातल्या बाजेवर ती निपचित पडून राही . शेजार धर्म म्हणून चिंतू ची खेळातली मैत्रीण ‘निमा ‘ हिची आई अधे मधे येऊन तिला लापशी किंवा काहीबाही भरवत असे, ते कधी तोंडातून आत जात असे ,कधी दोन्ही बाजूंनी घरंगळत असे ,उरलेला वेळ ती छताकडे एक टक बघत राही .
चिंतु जन्माला आला तेव्हाच त्याची आई बाळंपणात गेली , आणि काही दिवसांपूर्वी राम्याच्या घरची पूजा आटपून येताना रस्त्यात साप चावून त्याचे आबाही गेले . एकुलत्या एका मुलाच्या आकस्मिक मृत्यूच्या धक्क्याने हाय खाल्लेल्या चिंतूच्या आजीने अंथरूण धरले ते आजवर तसेच . आजी अशी एकाएकी गप्प झाल्यावर सहा -सात वर्षांच्या ‘चिंतन ‘ला एकदम भांबावल्यासारखे झाले .आता काय करायचं हे सांगायला कोणीच उरलं नाही , मग सकाळी जाग येईल तेव्हा उठावं , त्यानंतरचे बाकीचे विधी जशी गरज वाटेल तसे करावेत . आणि गावात हुंदडायला पळावं , खायला कोण देणार हा विचार करायचं त्याचं वय नव्हतं , बऱ्याच वेळा मारुतीच्या , गणपतीच्या देवळासमोर फोडून ठेवलेला नारळ , बत्तासे , साखरफुटाणे असा काही बाही प्रसाद त्याला खाण्याकरता मिळायचा , तर कधी आसपासच्या आया -बाया दया येऊन खायला द्यायच्या ,लहान वयातही कोणापुढे कशासाठी हात पसरायचा नाही हे कळत असल्यामुळे बऱ्याचदा तो अर्धपोटीच असे . निमाच्या आईचा जीव तुटायचा चिंतु साठी पण ती बापडी आपल्या रागीट आणि कद्रू वृत्तीच्या नवऱ्याच्या अधिपत्याखाली होती , चोरून जेवढं जमेल तेवढं करायची , चिंतनचही त्या एवढ्या तेव्हड्या वर भागत नसे , त्याला पोटभर ताट भरून जेवणाची आस होती ,पोळी भाजी, आमटी भात , मऊ साय भात ,आबा असताना आजी द्यायची तसं , गावात भटकून झालं , की रात्री झोपायला घरी यायचं, रात्री घरी येईपर्यंत काळाकुट्ट अंधार पडलेला असे , घरात आल्या आल्या थोडावेळ आजी च्या पुढ्यात बसून तो ,आजी बोल ना , बोल ना चा धोशा लावी , पण म्हातारी पापणीही ना हलवता निपचित पडलेली असे, मग कंटाळून तो बाहेर च्या अंगणात येई आणि त्याच्या वडिलांच्या म्हणजेच आबांच्या साठी पूर्वी टाकलेली , एक मोडकळीला आलेली बाज होती तिच्यावर मुटकुळं करून झोपी जाई . मध्य -रात्री कधी कुडकुडायला लागलं की झोपेतच घरात जाई आणि आजीच्या पांघरूणांत शिरे त्यावेळी आजीच्या कुबट वास येणाऱ्या, अंथरूणातल्या जराजर्जर , सुरकुतलेल्या मुक्या कुशीचा पण केवढा आधार वाटे , तेवढीच मायेची ऊब !..
आता वैशाख ऐन भरात आला असल्यामुळे ऊन्ह वर यायला लागली की जो तो आपापल्या घरात चिडीचूप होऊन पडलेला असे ,शेतावरची मंडळी पण ,हातातली कामं टाकून , जेवण झाल्यावर झाडाच्या किंवा विहिरीच्या आडोशाला जाऊन ,ऊन उतरूस्तवर तोंडावर पदर नाहीतर मुंडासं टाकून निवांत पडत. अशाच एका निपचित क्षणी चिंतु एका विहिरीच्या कट्ट्यावर बसून दगडं टाकत होता , आज सकाळपासून त्याच्या पोटात काहीही पडलेलं नव्हतं, शनिवार , किंवा अवस किंवा पौर्णिमा असा कोणताही विशेष दिवस नसल्यामुळे आज मारुती पुढे नारळ फोडलेला नव्हता , श्रावण नसल्यामुळे शंकरापुढे कोणी शिवामूठ वाहिली नव्हती (नाहीतर कच्चे तांदूळ पण चांगले लागतात ), शेजारच्या आया -बायाही स्वतःच्याच नादात होत्या , दुपारचे दोन अडीच वाजत आले होते , थोडा वेळ दगडांचा खेळ खेळून झाल्यावर फाटक्या चड्डीतून लागणारे चटके सहन होईनासे झाले तसा चिंतू तो नाद सोडून उठला . आत्ता या वेळी नदीवर गाई-म्हशी धुणारे धनगर आलेले असायचे ते चिंतुला कधी कधी आपल्यातली थोडी भाकरी आणि झुणका द्यायचे , कधी शेंगा -गूळ द्यायचे , त्याला एकदम आठवलं ते तसं तो उठला आणि नदीकडे जायला निघाला , जाता जाता वाटेत निमाच्या घरात त्याने आशेने डोकावून पाहिले तर तिच्या घरात खूप लोकांची गडबड दिसत होती , बहुधा कसली तरी पूजा चालू असावी , तितक्यात त्याला हाक ऐकू आली ,ते निमाचे बाबा होते “ … ए चिंत्या इकडं ये , तेवढा नैवेद्य जरा, गाईला घालून ये जा ,’ मग पुन्हा टाकला वरून हात फिरवत आत वळून म्हणाले “ आणि हे बघा निमाची आई , चिंतन ने गाईला नैवेद्य ठेवला रे ठेवला की ईकडे लगेच आमची पानं वाढायला घ्या , फार उशीर झालाय आधीच , पोटात कावळे ओरडायला लागलेत ,ए चिंत्या-भडव्या बघत काय उभा राहिलास ?, जा की पट्कन !. ” . हिरमुसल्या चेहऱ्याने ,हिरव्यागार केळीच्या पानावरचा वाढलेला तो नैवेद्य त्याने अलगद उचलला , त्याबरोबर गरमगरम वरण भात आणि कोशिंबिरीचा वास त्याच्या नाकात शिरला , आणि त्याच्या पोटातल्या भुकेने पुन्हा आकांत मांडला. छोटी गुलाबी रंगाची पावलं चटचट टाकत, हातातला नैवेद्य सांभाळत तो निघाला, त्याच वेळी समोरच्या कोपऱ्यावर असलेली गाय नैवेद्य बघून स्वतः:च पुढे येऊ लागली आणि त्याने सुटकेचा निःश्वास टाकला , गायीपुढे नैवेद्य ठेवून ,ना जाणो निमाचे बाबा ओरडून पुन्हा एकदा हाक मारून कामं सांगतील या भीतीने तो तिथून पळतच नदीकडे आला , पण आज नदीवरही सामसूम होती , म्हशी निवांत पाण्यात डुंबत होत्या आणि धनगर बहुधा लांब टेकाडावर हिरवळीत पहुडले होते , चटके बसून लाल भडक झालेले तळपाय नदीच्या गार गार पाण्यात सोडल्यावर त्याला जरा बरं वाटलं , मग आपल्या हातांची ओंजळ करून तो पोटभर पाणी प्यायला . थोडावेळ नदीकाठच्या ओलसर मातीत उमटलेल्या आपल्याच पायांच्या ठशांचे वेगेवेगळे आकार करण्याचा खेळ खेळत बसला. तितक्यात काळ्या मुंग्याची एक लांबलचक रांग त्याने पाहिली , मग त्यांची रांग मोडायचा खेळ त्याने सुरू केला काहीतरी पांढऱ्या रंगाचे कण तोंडात धरून पलीकडच्या बिळात तुरूतुरू जाणाऱ्या त्या मुंग्यांना कितीही बोट लावून अडवलं तरी त्या दिशा बदलून पुढे चालायच्या , त्यांच्याशी तो खेळत होता खरा पण पोटातली भूक त्याला स्वस्थ बसू देईना , एकदम त्याला आठवलं पलीकडे उंबराच्या झाडाची उम्बर पडली असतील तिथूनच येत असतील या , उठून लगेचच तो झाडापाशी आला जेमतेम दोन उंबर पडलेली दिसली , त्यांतही एक कुणाच्या तरी पायाखाली चिरडलं गेलं असावं त्यामुळे लगदा झाला होता आणि दुसऱ्या फळातूनच त्या मुंग्यांची रांग लागलेली होती . खाण्यासाठी म्हणून त्याने ते उंबर उचललं आणि झटकल त्या बरोबर त्याला लागलेल्या मुंग्या खाली पडल्या आणि सैरावैरा धावू लागल्या . त्यांची पळापळ बघून त्याला हसू आलं आणि तो टाळ्या पिटून नाचू लागला . तोच त्याला आठवलं आजी सांगे “मुंग्यांना त्रास देऊ नये बाळा , ईवलासा जीव किती श्रम करत असतो, त्याला त्रास दिला तर पाप लागतं , देवाच्या असतात त्या . “ दचकून त्याने हातातलं उंबर टाकून दिलं , पुन्हा ते उंबर मुंग्यानी भरलं , मग खाली पडलेलं झाडाचं एक पान उचलून अलगद त्याने ते उंबर त्याच्यावर ठेवलं आणि ते पान झाडाच्या कडेला एका सावलीत ठेवलं , हे केल्यावर त्याला समाधान वाटलं , मग झाडाच्या मागच्या बाजूच्या पायवाटेवरून शेताकडे जाणाऱ्या बांधावर उडी मारून तो पुढे चालत निघाला , शेवंतीची पांढरी शुभ्र फुलं वाऱ्यावर डोलत होती , बांधाच्या कडेच्या हिरवळीवर गाय आणि वासरू चरत होतं , चिंतु ला बघून वासरू त्याच्यापुढे मान करून उभं राहिलं , त्याच्या मानेला थोडावेळ खाजवून तो पुढे निघाला तसं वासरू त्याच्या मागे मागे येऊ लागलं , मग एका हाताने वासराची मान मध्ये मध्ये खाजवत तो बांधावरून उड्या मारत चालू लागला , किती तरी वेळ चालत होताच ,भूक विसरायचा प्रयत्न चालू होता , वाटेत आंब्याच्या झाडाला भरपूर कैऱ्या लागल्या होत्या , दोन -तीन आंबेही दिसले ,ते पाहून त्याचे डोळे आनंदाने चमकले , खाली वाकून त्याने दोन-तीन दगड उचलले , आणि आंबे पाडायला सुरूवात केली , आता वस्तीवरची दोन -तीन लहानगी लेकरं , शेंबूड वर ओढत त्याच्या भोवती येऊन आशेने उभी राहिली. थोडा वेळ नेम टाकून दगड मारल्यावर अखेरीस त्याच्या प्रयत्नाला यश आलं आणि एक -दोन आंबे खाली पडले , पण तो उचलायला जाणार त्याच्या आतच त्या लहानग्या पोरांनी ते उचलले , चिंतु ने त्यांच्या हातातून काढल्यावर त्यांनी भोकाड पसरलं , त्याला कसंतरी झालं ,मग त्या आंब्यांवरची माती अलगद पुसून ,वरचं तोंड उघडून त्यांच्या हातात पुन्हा दिल्यावर ते आपल्या लुकलुकत्या आनंदी डोळ्यांनी चिंतुकडे बघत आंबे चोखू लागले तसा चिंतु पुन्हा वासराशी खेळण्यात रमला पण आई आली तसं ते वासरू आईमागून चालायला लागलं , दुपार उलटत चालली होती ,वाऱ्याच्या झुळकीने आंब्याची पानं सळसळत होती , मधूनच एखाद्या पक्षाचं ओरडणं सोडलं तर ,बाकी निरव शांतता होती बांधावर बसल्या बसल्या चिंतूच्या डोळ्यात पेंग दाटून आली आणि तो झाडाखालीच झोपून गेला . चिंतन ssssss , चिं त ssss न “लांबून निमाच्या हाका ऐकू आल्या तशी त्याला किंचित जाग आली , थोड्याच वेळात निमा पळत त्याच्याजवळ आली आणि धापा टाकत म्हणाली , “चिंतन अरे किती वेळचे सगळे शोधतायत तुला, झोपलायस काय ऊठ .. तुझी आजी गेली .. “
चिंतु आता उठून बसला आणि काहीच न उमजून तिच्याकडे पहात राहिला
“ अरे गेली म्हणजे मेली , देवाघरी गेली .तुझ्या आबा आणि आईसारखी , चिंतू आता तुला कुणीच नाही रे ” रडवेली झाल्यामुळे नाकात बोलत निमा म्हणाली .
“ तुला कोणी सांगितलं ?” चिंतु अजूनही झोपेच्या गुंगीतच होता.
“ कोणी म्हणजे , सगळे तुझ्या घराकडे जमलेत बघ , तुझ्या आजीला आता नेतील “
“कुठे नेतील ? म्हणजे आबांसारखं तिला जाळून टाकतील ? ‘
“ हो “ ,निमा म्हणाली आणि चिंतु वाऱ्याच्या वेगाने पळत घराकडे निघाला , दारात आजीला निजवले होते , तिचा कृश देह त्या पांढऱ्या आणि गुलाबी वस्त्रात दिसतच नव्हता . चिंतू ला पहाताच कुणीतरी त्याच्या हातात मडकं दिलं , सवय असल्यासारखं त्याने ते हातात धरलं आणि स्मशानाच्या दिशेने तो चालु लागला . सगळे सोपस्कार शहाण्यासारखे न बोलता न रडता त्याने पार पाडले , रात्र झाली . लहानग्या चिंतु साठी हळहळ व्यक्त करून सगळे आपापल्या घरी निघून गेले , चिंतु गुडघ्यात मान घालून जमिनीवर रेघोट्या मारत राहिला .
“चिंतन..ए चिंतन … “ रात्री सगळीकडे निजानीज झाल्यावर निमाची आई दबक्या आवाजात हाक मारत आत आली . आजीच्या झोपायच्या जागी सारवून लावलेल्या पणतीच्या उजेडात निमाच्या आईची सावली त्या घराच्या बसक्या छतावरून सरकत सरकत चिंतनच्या सावलीत मिसळून गेली .खाली बसत तिने झाकून आणलेली पत्रावळ त्याच्या पुढ्यात ठेवली , “खा रे लेकरा !.. “ आज सकाळपासून मला यायला जमलं नाही , म्हातारी कड ,तर मरून पडलेली कळली देखील नाही , तु तरी कसा रे असा ? आजीजवळ बसायचं सोडून गावभर हिंडायचा ? खा ,दुपार पासून झाकून ठेवली होती तुझ्यासाठी . “
“घे की, आज घरी कुलाचार होता ना , मी जाते आता , दार लावून घे काय “ पत्रावळ पुढे सारून ती निघून गेली . पणतीच्या प्रकाशात ठेवलेल्या त्या जेवणाकडे चिंतन ने एकवार नजर टाकली ,पुरण पोळी , वरण भात , मेथीची भाजी ,भजी ,आमटी , कोशिंबीर , सायीची वाटी ,...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बापरे ! Sad वाचुनच गहीवरुन आले. बिचारे लहान लेकरु. अतीशय सुंदर कथा. आणी उमलत्या वयाच्या निरागस मुलाचे व्यक्ती चित्रण छान आहे.

चटका लावून गेली गोष्ट. .
भुकेला असूनही गाईचा घास तिलाच देणारा , मुंग्यांना फळ खाऊ देणारा , दुसर्‍या मुलाला आंबा देणारा चिंतन खूप शहाणा मुलगा आहे. .

गलबलून आलं एकदम Sad ज्याचं कुणी नसतं त्याचा देव असतो म्हणे! चिंत्याचा चिंतनराव झाला असा झकास सिक्वेल येऊ देत Happy

गलबलून आलं एकदम Sad ज्याचं कुणी नसतं त्याचा देव असतो म्हणे! चिंत्याचा चिंतनराव झाला असा झकास सिक्वेल येऊ देत Happy >>> +१

रश्मी.,धनवन्ती , श्रवु् , प्रभुदेसाई , जिज्ञासा , निरु ,वावे ,आसा.,रावी ,स्वान्तसुखाय ,धनुडी, हर्पेन , मुरारी  मन:पूर्वक धन्यवाद !.. खरं तर मलाही ही कथा दु:खी  नव्हती करायची , पण खरंच आपल्या हातात काहीच नसतं  , सुरुवात करताना वेगळी थीम डोक्यात असते आणि शेवटाला येईपर्यंत ती पूर्णपणे वेगळी झालेली असते . :-)  @ जिज्ञासा , धनुडी ,हर्पेन , तुम्ही सुचवल्याप्रमाणे सिक्वेल लिहायचा प्रयत्न नक्की करीन

खरं तर मलाही ही कथा दु:खी नव्हती करायची , पण खरंच आपल्या हातात काहीच नसतं , सुरुवात करताना वेगळी थीम डोक्यात असते आणि शेवटाला येईपर्यंत ती पूर्णपणे वेगळी झालेली असते >>>
अगदी खरंं आहे.

ओह्ह! स्पर्शून गेलं लिखाण. डोळे पाणावले. चिमुकल्या जीवाची आर्तता. अपार भूकेतून आलेली. पोटाच्या नी मायेच्या भुकेतून. हीच आर्तता अखेर मनात भरून राहते, त्या पणतीच्या उजेडासारखी!
फार फार पूर्वीचे वातावरण आणि दिवस आठवले. तेंव्हा मराठी कथा आणि सिनेमाविश्व सुद्धा अशाच वातावरणात रमलेलं होतं. अनेक वर्षांनी असे काहीतरी वाचायला मिळाले Happy

गलबलून आलं एकदम  ज्याचं कुणी नसतं त्याचा देव असतो म्हणे! चिंत्याचा चिंतनराव झाला असा झकास सिक्वेल येऊ देत>>>+1111

छान लिहिलं आहेत. वाचताना चिंतू डोळ्यासमोर उभा राहिला आणि मग सारखं वाटत राहिलं कि आता काय होणार ह्याचं. मनाला चटका लावून गेली ही कथा. खरच जमलं तर पुढचा भाग लिहा. पु. ले. शु.