कॉन्स्टॅन्टिनोपल ते इस्तंबूल - अन्तिम

Submitted by Theurbannomad on 9 June, 2021 - 13:57

२९ मे रोजी प्रचंड रक्तपात सुरु असताना मेहमत आपल्या खास जॅनिसेरी अंगरक्षकांसह शहरात शिरला. त्याने आपल्या आजूबाजूला सुरु असलेल्या विजयी उन्मादात जेव्हा शहराच्या भूमीवर पाहिलं पाऊल ठेवलं, तेव्हा त्याच्या मनात अनेक भावना उचंबळून आल्या. त्याने जे काही करून दाखवलेलं होतं, ते त्याच्या आधीच्या एकही मुस्लिम सम्राटाला जमलेलं नव्हतं. ऑर्थोडॉक्स ख्रिस्ती पंथाचा मेरुमणी, जगातल्या महत्वाच्या श्रीमंत शहरांपैकी एक आणि भौगोलिक दृष्ट्या अतिमहत्वाच्या शहरावर अवघ्या विशीत त्याने ताबा मिळवून दाखवलेला होता. शहरातल्या ' चर्च ऑफ द होली अपॉसल्स ' या ऑर्थोडॉक्स ख्रिस्ती धर्मियांच्या अतिशय पवित्र प्रार्थनास्थळाला हातही लावायचा नाही असा आदेश देत त्याने धूर्तपणे ऑटोमन सैन्यातल्या ख्रिस्ती सैनिकांच्या भावना जपल्या. शहरातल्या प्रत्येक गल्लीत, रस्त्यात, चौकात आणि मैदानात रक्तामांसाचा खच पडला होता. ऑटोमनांनी लहान मुलांनाही सोडलं नव्हतं.

तेव्हाच्या परिस्थितीचा ' आँखो देखा ' हाल लिहून ठेवलेल्या काहींनी कॉन्स्टॅन्टिनोपलच्या पाडावाआधी घडलेल्या काही विचित्र घटना नोंदवून ठेवल्या आहेत. २७ मे रोजी आकाशात दिसलेल्या चंद्रग्रहणामुळे अनेक नागरिकांचा आणि ख्रिस्ती धर्मप्रमुखांचा धीर सुटलेला होता, असं त्यांनी नोंदवून ठेवलं आहे. शिवाय चंद्रग्रहणाच्या वेळचं धुकं विरल्यावर आया सोफ्याच्या मुख्य ऑर्थोडॉक्स चर्चच्या घुमटावरून एक प्रकाशाची शलाका आकाशापर्यंत गेलेली सगळ्यांनी पहिली होती. याचा अर्थ ' आपला देव आपल्याला आणि आपल्या शहराला सोडून गेला ' असा घेऊन नागरिकांनी आणि सम्राट कॉन्स्टंटाईननेही धीर सोडलेला होता. खरं खोटं तो येशूच जाणे, पण लोकांचा धीर खचण्याच्या या घटना कॉन्स्टॅन्टिनोपलचा पाडाव व्हायच्या अगदी दोन दिवस आधीच्या होत्या आणि त्याही पेंटेकॉस्ट सणाच्या आसपास घडलेल्या होत्या हा विचित्र योगायोग इथे लक्षात घेण्यासारखा होता.

मेहमतने ' चर्च ऑफ द होली अपॉसल्स ' ला धक्का लावला नसला, तरी सर्वप्रथम त्याने ' आया सोफ्या ' मध्ये मात्र दिमाखात प्रवेश केला. तिथल्या सम्राटासाठी आणि सर्वोच्च ख्रिस्ती धर्मगुरूंसाठी ठेवलेल्या सिंहासनावर तो दिमाखात बसला आणि त्याने ती वास्तू डोळ्यात भरून घेतली. त्यानंतर त्याने तिथल्या भूमीवर गुडघे टेकून नमाज पढला आणि एका झटक्यात ती वास्तू मुस्लिम झाली. या घटनेनंतर त्याने आपल्या सैन्याला तीन दिवस मनसोक्त रक्तपात करू दिला आणि अखेर तिसऱ्या दिवशी सैन्याला आवरतं घेण्याचा आदेश दिला. उन्माद ओसरल्यावर त्याने एखाद्या पोक्त सम्राटाप्रमाणे काही महत्वाचे आदेश दिले.

त्याने वाचलेल्या सगळ्या नागरिकांना अभय दिल्याची घोषणा केली. कोणताही नागरिक, मग तो कोणत्याही धर्माचा, वयाचा अथवा पंथाचा असेल, तो ऑटोमन साम्राज्याचा नागरिक म्हणून स्वीकारला जाईल अशा शब्दात त्याने सगळ्यांना आश्वस्त केलं. गेनेडीयस स्कॉलॅरियास या ऑटोमन ऑर्थोडॉक्स ख्रिस्ती मनुष्याला त्याने ऑर्थोडॉक्स पंथीयांच्या नवा धर्मगुरू नेमलं. आया सोफिया यापुढे मुस्लिम धर्मियांची मशीद म्हणून ओळखली जाईल असा महत्वाचा निर्णय त्याने जाहीर केला. युरोपच्या ख्रिस्ती धर्मियांसाठी हा धक्का अतिशय मोठा होता...पण हा धक्का म्हणजे उशिराने आलेल शहाणपण होत. वजीर हलील पाशाला ' योग्य ' ती शिक्षा मिळालीच, पण मेहमतच्या विरोधात छुप्या कारवाया करणाऱ्यांच्याही मनात मेहमतबद्दल भीती बसली. पंचवीस वर्षं वयही पूर्ण न झालेल्या या नव्या ऑटोमन सम्राटाच्या हाताखाली खऱ्या अर्थाने ऑटोमन साम्राज्य एकवटलं आणि एकसंधही झालं. पुढे ऑटोमनांनी अनेक ख्रिस्ती संस्थानांना आणि साम्राज्यांना आपलं अंकित करून घेतलं, आणि ख्रिस्ती धर्मियांना आपण केलेल्या घोडचुका ठळकपणे जाणवायला लागल्या. खुद्द पोप पायस दुसरा याने धर्मयुद्धाची हाक देऊनही त्याला प्रतिसाद मिळाला नाही. जेमतेम डझनभर युद्धनौका युरोपमधून या ' धर्मयुद्धासाठी ' पूर्वेकडच्या भागाकडे वळल्या, पण त्यांची दाणादाण उडवण्यात ऑटोमनांना कसलीच अडचण आली नाही...अखेर पोपने तो नाद सोडून शांतपणे पश्चिमेकडे लक्ष केंद्रित केलं.

या घटनेनंतर पूर्वेच्या ऑर्थोडॉक्स ख्रिस्ती लोकांनी पश्चिमेला युरोपियन देशांमध्ये आसरा घेतला आणि तिथे या दोन संस्कृतींचा संगम घडला...यातून पुढे युरोपभर पसरलेली रेनेसाँसची लाट निर्माण झाली. मुस्लिम धर्माच्या क्षितिजावर ऑटोमन साम्राज्याने आपलं अस्तित्व इतकं प्रबळ केलं, की अरबांकडून खलिफापद ऑटोमनांकडे सरकलं. ऑटोमनांनी मक्का - मदिनासुद्धा आपल्या ताब्यात आणलं. मुस्लिम जगतात अरब दुय्यम स्थानावर आले. लेव्हन्ट, पूर्व युरोप, वाळवंटी आखाती प्रदेश ते थेट पर्शियाच्या काही भागांपर्यंत ऑटोमन साम्राज्याने पुढे हातपाय पसरले. ऑर्थोडॉक्स ख्रिस्ती पंथाला या घटनेनंतर जी घरघर लागली, ती पुढे रोमन कॅथॉलिक पंथाच्या पथ्यावर पडली आणि जगभरातल्या ख्रिस्ती लोकांचं एकमेव केंद्र म्हणून रोम उदयाला आलं.

मुस्लिम आणि त्यातही सुन्नी मुस्लिम जगतात तोवर अनेक महत्वाची केंद्र होती - मक्का, मदिना, बसरा, दमास्कस, जेरुसलेम....ज्यात आणखी एका नावाची भर पडली. कॉन्स्टॅन्टिनोपल मेहमतच्या आगमनानंतर ' इस्तंबूल ' म्हणून ओळखलं जाऊ लागलं. पौर्वात्य आणि पाश्चिमात्य संस्कृतीचं संगमस्थान, मुस्लिम सुन्नी धर्मियांचं महत्वाचं शहर, ऑटोमन साम्राज्याचा मेरुमणी, पुढे भरभराटीला आलेल्या ऑटोमन साम्राज्याच्या अतिशय प्रगत ज्ञानाचं उगमस्थान म्हणून इस्तंबूल पुढची अनेक शतकं जगाच्या नकाशावर दिमाखात मिरवत राहिलं.

साठा उत्तरांची ही कॉन्स्टॅन्टिनोपलची कहाणी, इस्तंबूलच्या पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण होतं आहे. इतिहासाच्या पानांवरच्या अनेक महत्वाच्या घटनांमधली ही ठळक घटना अजूनही अनेक इतिहास संशोधकांना खुणावते. अनेक अभ्यासक अजूनही या घटनेवर संशोधन करून या घटनेचे प्रकाशात न आलेले परिणाम लोकांसमोर आणत असतात. इस्तंबूल आजही नव्याने प्रबळ होऊ बघत असलेल्या तुर्कस्तानचा मेरुमणी आहे....तुर्कस्तानची राजधानी असलेल्या अंकारा शहरापेक्षाही आज इस्तंबुलचं आकर्षण जनमानसात जास्त आहे. हे शहर जितकं प्राचीन, तितकंच अर्वाचीन असल्यामुळे शतकानुशतकं चालत आलेल्या सगळ्या घटनांच्या खुणा आपल्या अंगाखांद्यावर बाळगत एकीकडे काळ्या समुद्राकडे आणि दुसरीकडे मार्माराच्या समुद्राकडे बघत शांतपणे पहुडलेलं आहे.

खुद्द नेपोलियन बोनापार्ट याने या शहराला उद्देशून काढलेले उद्गार इथे उद्धृत करत या शहरावरची ही लेखमाला संपवणं संयुक्तिक ठरेल....
' If the earth were a single state , Istanbul would be its capital ! '

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतिशय सुंदर, उत्कंठावर्धक लिखाण!
मध्य - पूर्व आशियातील ऐतिहासिक घडामोडींवर तुमचा अभ्यास वाखाणण्याजोगा आहे. खूप आभारी आहोत!

खूप छान झाली लेखमाला. शेवटच्या भागाचा पूर्वार्ध वाचताना तिथल्या स्त्रियांचे काय झाले असावे हा विचार डोक्यात आला आणि विषण्ण करून गेला. कुणाचे कुणाशी काहीही कारणामुळे युद्ध झाले तरी होरपळणाऱ्यांमध्ये अग्रभागी स्त्रीया व मुलेच असतात....

नकाशा काढून इस्तंबूल पाहिले. तुर्कस्तानाबद्दलही लेखमाला येऊ द्या. दोन खंडात पसरलेल्या या देशातील लोकांची भाषा या धर्म मध्यपूर्वेतील आहे आणि वेष व दिसणे युरोपियन.

सगळेच लेख आवडले. तुमच्यामुळे ह्या विषयांवर आपसूक वाचलं जातं. नाहीतर कोण कशाला हे गुगल करून पाहील? पण लेखमालेच्या शेवटच्या लेखात पुस्तकांची संदर्भसूची जोडलीत तर अभ्यासूंसाठी त्याचा उपयोग होईल असं सुचवावंसं वाटतं. पुढच्या लेखमालेच्या प्रतिक्षेत Proud

छान लेखमाला!!!
जेरुसलेमच्या ही लेखमाला छान होती.
Netflix वर Rise of Empire म्हणून हया विषयावरच एक docu- ड्रामा आहे..तो ही खास बघण्यासारखा आहे.

पुलेशू!!!!

आवडली लेखमाला
विषय आणि लेखनशैली दोन्हीही रोचक !

पुढच्या लेखमालेच्या प्रतिक्षेत - मी ही असेच म्हणतो

देवभूमी वर चा क्रॅश कोर्स चक्क ! अप्रतिम लेखमाला. संग्रही राहील. तुमच्या अभ्यासावर माझ्यासारखे बरेच आंतर राष्ट्रीय राजकारणावर काही बोलून भाव खाऊन जातील गप्पा रंगल्या की ! अनंत शुभेच्छा ! आता पुढील विषय कोणता?

@ jpradnya

धन्यवाद! नवीन विषय घेऊन लवकरच येईन.