वजनदार (चित्रपट) : लूज युअर माइंड

Submitted by वावे on 12 June, 2021 - 09:17

(हा चित्रपट पहिल्यांदा टीव्हीवर बघितला, तेव्हा वाक्यावाक्यांना धक्के बसले तरी विषय चांगला वाटला आणि प्रमुख कलाकारांचा अभिनय चांगला वाटला त्यामुळे शेवटपर्यंत बघितला. गेल्या आठवड्यात परत लागणार होता, तेव्हा फारएण्ड, मी_अनु, श्रद्धा, पायस वगैरे मायबोलीवरच्या महारथींचं स्मरण करून खास वेगळ्या प्रकारचं मनोरंजन करून घेण्यासाठी परत बघितला. त्यातून झालेली ही फलनिष्पत्ती!)

पाचगणीत राहणार्‍या दोन मैत्रिणी, शादीशुदा कावेरी (सई ताम्हणकर) आणि बॅचलर पूजा (प्रिया बापट) एका क्लबमधे डान्स करायला जातात, त्या टेबलावर चढून नाचताना टेबल मोडतं आणि त्या खाली पडतात. याचा कुणीतरी व्हिडिओ बनवून यूट्यूबवर टाकतं. तो व्हिडिओ बघून ’आपण जाड आहोत’ असं त्या दोघींना वाटायला लागतं ( म्हणजे आधीपासून वाटत असतंच, पण आता तीव्रतेने वाटतं) आणि त्या बारीक व्हायच्या मागे लागतात अशी या पिक्चरची थोडक्यात स्टोरी. शेवट गोड (खाण्यात) होतो.
कावेरी ’पुण्यात मोकळ्या वातावरणात’ वाढलेली, पण आता लग्न करून पाचगणीत स्ट्रॉबेरीच्या शेतीचा व्यवसाय असणार्‍या जुन्या वळणाच्या, गडगंज श्रीमंत असलेल्या, मोठ्ठ्या बंगल्यात राहणार्‍या जाधव कुटुंबाची सून बनलेली. या घरात सगळ्या बायकांनी साडीच नेसली पाहिजे असा नियम आहे. बाहेर जायला पुरुषमाणसांसाठी घोड्यांची व्यवस्था आहे. कदाचित स्ट्रॉबेरीच्या शेतातून फिरताना त्यांना स्ट्रॉबेरी खाव्याशा वाटत असतील आणि त्यांनीच बर्‍याचशा स्ट्रॉबेरी खाऊन टाकल्यामुळे उत्पन्न कमी होत असेल. घोड्यावरून फिरलं की वाकून स्ट्रॉबेरी काढणं अवघड. शिवाय घोड्यांना स्ट्रॉबेरी आवडत नसणार, त्यामुळे स्ट्रॉबेरीच्या शेतातून घोड्यावरून फिरणं सेफ असेल. मग घरातून शेतापर्यंत कारने जा, तिथे घोड्यावर बसा, असं करण्यापेक्षा ते सगळीकडे घोड्यावरूनच फिरतात. शिवाय इको-फ्रेंडली. साडी आणि डोक्यावरचा पदर सावरत घोड्यावर बसणं बायामाणसांना तसं कठीणच, त्यामुळे बायकांसाठी सायकल ठेवलेली आहे. एकंदरीत इको-फ्रेंडली वाहनं वापरण्याकडे जाधवांचा कल आहे असं दिसतं. कावेरीला लग्नाआधी साडीही नेसण्याची सवय नसली तरी आता साडी नेसून सायकल चालवण्याची मात्र चांगलीच सवय झालेली आहे. तर,अशा या घरात जिलेबी, श्रीखंड, समोसे, कचोर्‍या असे पदार्थ सर्रास केले जातात. शिवाय रोज दुपारचं जेवण झालं की घरातली सगळी माणसं पडदेबिडदे बंद करून, पांघरुणं घेऊन दोन तास झोपतात. नोकरचाकरही झोपत असावेत. घरात पाच-सहा वर्षांची दोन मुलं आहेत, तीही दुपारी दोन तास झोपतात. (अशी शहाणी मुलं आजकाल फारशी दिसत नाहीत.)

तो जो नाचताना पडण्याचा यूट्यूबवरचा व्हिडिओ आहे ना, तो पाचगणीतल्या भाजीवाल्यानेही पाहिलेला आहे, पण कावेरीच्या घरच्यांपर्यंत तो पोचत नाही. कारण कावेरीच्या दिराने काही कारणाने घरातलं वाय-फाय बंद केलेलं आहे. किती सोप्पं. फोर जी डेटा खर्च करून ते व्हिडिओ वगैरे बघत नसावेत. स्ट्रॉबेरीची शेतं, साग्रसंगीत चहा-जेवण-दुपारची झोप यात त्यांना एवढा वेळही मिळत नसणार म्हणा. त्यांचे सगळे मित्र आणि नातेवाईकही जुन्या वळणाचे आणि सालस असल्यामुळे सुनेचा व्हिडिओ त्यांना पाठवून चोंबडेपणा करत नाहीत.

कावेरी ’पुण्यात मोकळ्या वातावरणात’ वाढलेली असल्यामुळे ती लग्नाआधी डान्स करायची. डान्सचा प्रमुख फायदा म्हणजे वजन कंट्रोलमध्ये ठेवणं. लग्नानंतर या जुन्या वळणाच्या घरात आल्यामुळे तिचा डान्स बंद झाला आणि वजन वाढून सत्तर किलो झालं. आता ’सत्तर किलो’ हे ’सत्तर रुपये’ च्या चालीवर परत परत म्हटलं असतं तर हे वजन जास्त वाटलंही असतं कदाचित. सई ताम्हणकरच्या उंचीसाठी सत्तर किलो वजन आपल्याला अजिबातच प्रचंड जास्त वाटत नसलं तरी ते खूप जास्त आहे असं आपल्याला परत परत सांगितलं जातं. त्यामुळे तिला म्हणे आई होता येत नाहीये. आता या व्हिडिओ प्रकारामुळे ती (सुरुवातीला सगळे जसं करतात तसं) वेड्यासारखं डाएटिंग करायला लागते. म्हणजे एकतर काहीच खात नाही आणि मग एकदम समोसे वगैरे. जुन्या वळणाच्या प्रेमळ सासूबाईंना नातवंड बघायची फारच घाई आहे. त्यामुळे तिला एकदा चक्कर काय येते, सासूबाई लगेच ’गोड बातमी आहे’ असा निष्कर्ष काढून मिठाई मागवून मोकळ्या होतात. त्यांनी बहुतेक लहानपणी ’ मुबारक हो, ये मां बननेवाली है’ वाले भरपूर हिंदी चित्रपट पाहिलेले असावेत (आणि नंतरचे हिंदी चित्रपट अजिबातच पाहिलेले नसावेत, कारण मधल्या काळात हिंदी चित्रपटसृष्टीत बरीच प्रगती होऊनही ती त्यांच्यापर्यंत पोचलेली नाही.) मिठाई मागवण्यापूर्वी कावेरीला एकही बेसिक प्रश्न विचारावासा त्यांना वाटत नाही. मग रीतसर डॉक्टरला बोलावलं जातं. डॉक्टर हुशार असल्यामुळे ’गोड बातमी नाही’ हे ते लगेच सांगून टाकतात. कावेरीचा तो जग (मायनस जाधव घराणं )प्रसिद्ध व्हिडिओ त्यांनीही बघितलेला आहे. मग ते तिला ’वजन योग्य प्रकारे कमी कसे करावे’ हे शिकवण्यासाठी आपल्या क्लिनिकमध्ये बोलावतात. डॉक्टर फावल्या वेळात कोचिंग क्लास चालवण्याचा आणि पिझ्झा विकण्याचा साईड बिझनेस करत असावेत. क्लिनिकमध्ये बसून पिझ्झा खात खात ते ’वजन कमी कसे करावे’ हे व्हाईटबोर्डवर मार्करने पॉइंट्स वगैरे लिहून शिकवतात. त्याबरहुकूम कावेरी घरच्यांपासून लपूनछपून जिम जॉईन करते. तिने यापूर्वी आयुष्यात कधीही जिम लावलेली नसूनसुद्धा जिमसाठी लागणारे अंतर्बाह्य कपडे, शूज वगैरे तिच्याकडे तयारच असतात. मग दुपारी घरातली जनता पांघरुणं घेऊन झोपल्यावर कावेरी सायकलवरून जिममध्ये जाते, तिथे जाऊन कपडे बदलते, व्यायाम करते, परत साडी नेसते (हातातल्या बांगड्यांपासून ते पायातल्या जोडव्यांपर्यंतच्या दागिन्यांचीही प्रत्येक वेळी काढघाल करते!) आणि सायकलवर बसून घरची जनता उठायच्या आत घरीही येते. हे सगळं बघून मी म्हटलं, " त्यापेक्षा ती साडीतच सरळ तासभर सायकल का चालवत नाही? त्यानेही वजन कमी होईलच की!" कपडे बदलण्याचा कंटाळा असला की असे उपाय सुचतात! पण कावेरी कंटाळत नाही आणि जिम चालू ठेवते.

दोन मित्रांची गोष्ट असली की त्यातला एक आळशी आणि दुसरा कष्टाळू किंवा एक लबाड आणि दुसरा प्रामाणिक वगैरे असतो, तशी या गोष्टीतसुद्धा कावेरी सेन्सिबली व्यायाम वगैरे करत असल्यामुळे पूजा वजन कमी करण्यासाठी अघोरी आणि आक्रस्ताळे उपाय करणार हे ओघाने आलंच. पूजा (प्रिया बापट) कंप्युटर इंजिनिअर होऊन आता उच्च शिक्षणासाठी कुठल्यातरी अमेरिकन युनिव्हर्सिटीच्या फेलोशिपची (असिस्टंटशिप वगैरे नाही बरं का) वाट पहात असते. याचा अर्थ ती बुद्धिमान असावी. पण आपला व्हिडिओ कुणीतरी यूट्यूबवर अपलोड केलाय ही तक्रार सायबर सेलला केली पाहिजे हे मात्र तिला कळत नाही. उलट पोलिसाने इमानदारीत तसं सांगितल्यावर ती रागाने पोलिस स्टेशनमधल्या टेबलावर चढून नाचते !

आलोक (सिद्धार्थ चांदेकर) पूजाच्या प्रेमात पडण्याच्या आणि तिला आपल्या प्रेमात पाडण्याच्या जय्यत तयारीनेच आलेला आहे. माऊथ ऑर्गन वाजवत तो तिला कॉफी प्यायला येण्यासाठी विचारतो, त्याचा बिघडलेला (आणि दुरुस्त होण्याची शक्यता नसणारा) कंप्युटर दुरुस्त करायला तिला बोलवतो. त्याला ट्रेकिंग, इतिहास आणि सुदृढ फिगर असणार्‍या नट्या आवडतात अशी मौलिक माहिती आपल्याला मिळते. बाकी त्याचं शिक्षण, करिअरचे प्लॅन्स वगैरे बिनमहत्वाच्या गोष्टींवर बोलण्यात पूजा आणि आलोक वेळ वाया घालवत नाहीत.

पुढे मग ’सहा महिन्यात वीस किलो वजन कमी करा’ टाईपच्या स्लिमिंग सेंटरच्या जाळ्यात पूजा अडकते, त्यांच्या औषधं-गोळ्या घ्यायला लागते, अमेरिकेतली ती फेलोशिप तिला मिळाली, तरी आपला तो व्हिडिओ आलोकनेच यूट्यूबवर टाकला होता हे कळल्यावर ती अधिकच दु:खी होते आणि त्याच भरात ती लिपोसक्शन सर्जरी करून घ्यायला जाते. हॉस्पिटलमध्ये तिने डेबिट कार्डने पैसे भरल्यावर तिच्या आईच्या फोनवर एसेमेस ॲलर्ट येतो. मग आई आणि आलोक घाईघाईने पुण्याला हॉस्पिटलमध्ये पोचतात. आई तिला शोधायला गेल्यावर आलोक कॅंटीनला जातो तर तिथे एक वडापाव खाता खाता अजून एक वडापाव, बर्गर, मिल्कशेक आणि कोल्ड कॉफी अशी ऑर्डर देणारी पूजा त्याला दिसते. दोन मित्रांमधला आळशी, लबाड किंवा ढ मित्र जसा शेवटी सुधारतो, तशी पूजालाही आपली (स्लिमिंग सेंटरवाली) चूक समजलेली असते ( आणि ही भलीमोठी ऑर्डर देऊन ती त्या चुकीचं परिमार्जन करते !) पण अजूनही आलोकला तिने माफ केलेलं नसतंच. मग आता आलोक काय करणार म्हणता? सोप्पं आहे. तो तिथल्या टेबलावर चढून नाचत नाचत तिला सॉरी म्हणतो! आता पुण्यातल्या एका पंचतारांकित हॉस्पिटलच्या कॅफेमध्ये जर एखादा तरुण मुलगा अचानक टेबलावर चढून नाचायला लागला तर तिथे असलेल्या डॉक्टर्स आणि नर्सेसच्या काय प्रतिक्रिया येतील? अगदी सभ्यात सभ्य म्हणजे " ओ खाली उतरा!" पण नाही. ते सगळे कौतुकाने आपापले फोन काढून त्याचा व्हिडिओ शूट करतात. नंतर यूट्यूबवरही टाकला असेलच. पूजाही त्याला माफ करून टाकते. कित्ती छान ना!

हा सगळा फ्लॅशबॅक आहे. आता याला तीन वर्षं होऊन गेलेली आहेत. कावेरीला बाळ झालेलं आहे. पूजा आणि आलोकचं लग्न झालेलं आहे. एकंदरीत सगळा आनंदीआनंद आहे. एका पंच किंवा सप्ततारांकित हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्ये बसून साधारणपणे पाचजणांना पुरेल एवढा ब्रेकफास्ट दोघींमध्ये खात खात पूजा आणि कावेरी सक्सेसफुल वेट लॉस स्टोरी एका होतकरू, फॉरिन रिटर्न्ड दिग्दर्शकाला सांगत असतात.

पण म्हणजे आपण नक्की काय समजायचं? एकदा आपलं वजन कमी झालं की मग वाट्टेल ते वाट्टेल तेवढं खाल्लं तरी चालतं? अशी जादूची कांडी पाचगणीच्या पिझ्झा खाणार्‍या डॉक्टरांकडे मिळते का? की साडी नेसून सायकल चालवली तरच मिळते?

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वावे अगदी बरोबर. गंध मध्ये निना कुलकर्णीयांची कथा वास्तवात घडते असे पटते. बाकी दोन जरा काल्पनिक. त्यातील पहिल्या कथेवर तर राणी मुखर्जीला घेऊन आख्खा चित्रपट बनवला.

मस्त लिहिलेय
टीव्हीवर लागेल तेव्हा बघेन . मुद्दामहून बघायची हिंमत नाही

चांगले लिहिलेय.
एकदा ट्राय केला होता पाहायचा पण नाही सहन करू शकले. Lol

अतुल, हो, सिनेमेटोग्राफी चांगली आहे. ते घोडेही बहुतेक 'हिरव्या गवतावर चरणारे घोडे छान दिसतात' या कारणाने घेतले असावेत!
सियोना, इथेच दुसऱ्या एका धाग्यावर त्या हिंदी सिनेमाबद्दल वाचून त्याचा ट्रेलर बघितला होता. भयंकर आहे!

Pages