चंबळचे डाकू

Submitted by वीरु on 10 June, 2021 - 08:44

पावसाने चांगलीच ओढ दिली होती. जुलै संपत आला तरी वरुण राजा काही प्रसन्न होईना. सगळेच पावसाची वाट पहात होते. हे संकट कमी होतं की काय म्हणुन पंचक्रोषीत चोरीमारीच्या घटना घडायला लागल्या. त्यामुळे‌ शेतामळ्यांमध्ये वस्ती करुन रहाणाऱ्यांनी आपल्या चीजवस्तु, गुरंढोरं घेऊन गाव गाठलं होतं. गडीमाणसंही सुर्य मावळायच्या आत घरचा रस्ता पकडत होते. सगळीकडे चोरांची दहशतच तितकी पसरली होती. दारं खिडक्या चुटकीसरशी तोडुन घरातला ऐवज लंपास केला जाई. रोज नव्या बातम्या ऐकायला मिळत होत्या. कोणत्यातरी खतरनाक टोळीने धुमाकुळ घातला होता. अफवांना तर नुसता उत आला होता. कोणी सांगायचे चंबळचे डाकु आले तर कोणी 'डाकू पालीसारखे भिंतीवर सरसर चढतात, अंगाला वंगण चोपडुन फिरतात त्यामुळे ते हाताला लागत नाही' असेही छातीठोकपणे सांगायचे.
या सगळ्या बातम्या ऐकुन घोडेवाडी गांगरुन गेली होती. आजपर्यंत या गावाकडे चोरांनी मोहरा वळवला नव्हता. एक तात्या सावकाराचा वाडा सोडला तर होतं काय गावात चोरी करण्यासारखं? पण आपल्या बहादुरीमुळेच चोरांची आपल्या गावाकडे पहाण्याची टाप नाही असं समस्त घोडेवाडीकरांचे म्हणणे होते. या गावाचा इतिहासच तसा होता. कोणे एके काळी या गावाने घनघोर युध्दात रणांगणावर जाऊन राजाच्या भुकेल्या अश्वदळाला चारापाणी, स्वारांना भाकरी पुरवली होती. राजा खुष झाला आणि त्याने गावाचं नावकरण केलं 'घोडेवाडी'. आता तो राजा कोणता, तो कोणाविरुध्द लढत होता, कशासाठी, कोणत्या शतकात होऊन गेला याबाबत कोणालाच काही माहिती नव्हती. पण पिढ्यान् पिढ्या ही गोष्ट ऐकत घोडेवाडीकर लहानाचे मोठे झाले होते. ही गोष्ट सांगितली जाई तेव्हा सांगणाऱ्याचे आणि ऐकणाऱ्याचेही हात शिवशिवत. 'आपण आसतो तर चारापाणी, भाकर देऊन माघारी नसतो फिरलो गड्या. ऊस तोडावा तशे दुश्मनाचे तुकडे पाडुन राजाकडुन मानाचं कडं हातात घालुनच परत आलो असतो.' गोष्ट ऐकुन एखादा मुठी आवळत म्हणायचा. थोडक्यात काय तर इच्छा असुनही घोडेवाडीकरांना पराक्रम गाजवण्याची संधी भेटत नव्हती.
आणि आता चक्क ती संधी चालुन आली होती. पंचक्रोषीत धुमाकुळ घालणारे दरोडेखोर आपल्या गावाकडे वळलेच तर त्यांची कशी गठडी वळायची याबाबत चर्चा करायला सगळी मंडळी जमली होती. तावातावाने चर्चा सुरु होती. सगळेच जोषात होते. काठ्या टेकत आलेले जुनेजाणते वेळ आलीच तर आपल्या काठीचा कसा तडाखा देता येईल याचा हळुच अंदाज घेत होते. तरुण मंडळी तर जागेवरच फुरफुरत होती. बारक्या पोरांनी आतापासूनच दगडगोटे गोळा करायला घेतले होते.
"हे पहा पोरींनो असा मसाला वापरा की पुढचे दहा वर्षे चोरांना याद राहिली पाहिजे" असे सांगत वत्शीमावशी जमा झालेल्या आयाबायांना चोरांच्या तोंडावर फेकायला तिखटाचं पाणी कसं करायचं याबद्दल धडे देत होती.
इकडे नेहमीप्रमाणे आबांनी चर्चेची सुत्र हाती घेत बोलायला सुरुवात करताच "आवो थांबा की आबा. ग्रामपंचायतीचं इलेक्शन लढवणं आणि चोरांशी लढणं न्यारं असतं. तुमाला काय अनुभव चोरांशी लढण्याचा. ग्रामपंचायत सोडत न्हाई., इथं तरी वाव द्या तरुणांना." असे म्हणत पोपटनानाने अडवले.
"आरं तिच्या.. तुमाला वो काय अनुभव चोरांशी लढायचा. तुमाला फक्त समदीकडे इरोध करता येतो बघा." आबा कडाडले.
"अरे असे भांडु नका. इथे कुणालाच अनुभव नाही चोरांशी लढण्याचा. नाना, आबा तुम्ही शांत बसा जरावेळ. आप्पाजी तुम्हीच आमचे सेनापती. तुम्हीच काय ती मोर्चेबांधणी करा." नुकतेच रिटायर होऊन गावाकडे आलेल्या बाळुगुरुजींनी आबा-नानाला शांत करत गावातल्या आप्पा‌ पहिलवानाकडे मोहीम सोपवली.
जरी आबा आणि पोपटनाना एकमेकांचे कट्टर विरोधक असले तरी बाळुगुरुजींच्या शब्दाबाहेर नव्हते.
त्यामुळे त्यांनी गुरुजींच्या सूचनेला फारसा विरोध केला नाही आणि आप्पा पहिलवानाने मोर्चेबांधणी करायला घेतली.
गावाकडे येणाऱ्या महत्वाच्या दोन वाटा, एका पुलावरुन येणारी अन् दुसरी स्मशानभुमीकडुन येणारी. दोन्ही वाटांवर एक एक पथक नेमायचं ठरलं. एक पथक तात्या सावकाराच्या वाड्यासमोर थांबणार होतं आणि दोन पथकं गावातुन गस्त घालणार होती तर काही मंडळी मोक्याच्या घरांच्या छतांवर दगडगोटे घेऊन बसणार होती. बायाबापड्या, वयस्कर मंडळीं आणि शाळकरी पोरंटोरं घरातच थांबणार होती.
इतकी फक्कड रचना केल्यावर कोणी कोणत्या ठिकाणी थांबावे यावरुन‌ वाद सुरु झाले कारण स्मशानाकडच्या वाटेवर थांबायची कोणाचीच तयारी नव्हती.
"घोडेवाडीचे लोकं भुतांना कधीपासुन भ्यायला लागले?" आबा पुन्हा कडाडले.
"खरं हाये आबा तुमचं. आबा थांबतील तिकडे." पोपटनानाने संधी साधली.
"थांबु की. फक्त तुम्ही संगतीला चला म्हणजे झालं." आबांनी नानाचा डाव उलटवला.
शेवटी हो नाही करत आबा, नाना, आप्पा पहिलवान, बाळुगुरुजी आणि एक हिंमतबाज गडी स्मशानाजवळचा मोर्चा सांभाळणार होते. सावकाराच्या वाड्याजवळ थांबायला मात्र प्रभ्या, शऱ्यासारखी तरुणमंडळी फारच उत्सुक होती याचे कारण होते सावकाराची शहरातल्या कॉलेजमध्ये शिकणारी मुलगी रुपा..कॉलेजला सुट्या असल्याने ती नुकतीच घरी परतली होती. पण रुपा काही त्यांना दाद देत नव्हती. म्हणुन चोर आलेच तर त्यांचा मुकाबला करुन रुपाचे मन जिंकावे, नाहीच आले तर तिच्या घराच्या अवतीभोवती तरी रहाता येईल असा सरळ हिशेब होता.
"सगळेच वाड्याजवळ थांबतील तर पुलाजवळ कोणी पहारा द्यायचा आणि गस्त कोणी घालायची" आप्पाजीने काळजीने विचारले.
"तसं नव्हे आप्पाजी. पण गावात चोर घुसले तर वाड्याकडेच वळतील. मग त्यांचा सामना करायला कोणी बहाद्दर पाहिजे ना? तुम्ही गावात नसाल म्हणुन मी थांबतो वाड्याजवळ." प्रभ्या एका दमात म्हणाला.
"तु बहाद्दर आहेस म्हणुनच थांब पुलाजवळ. आणि वाड्याची काळजी करु नकोस सावकाराकडे डबल बारी बंदुक आहे. त्याला गरज नाही आपल्या पहाऱ्याची." आप्पाजी प्रभ्याच्या पाठीवर थाप मारत म्हणाला.
"मला जरा भ्या वाटतो. मी थांबतो वाड्याजवळ" शऱ्या चाचरत म्हणाला.
"नको तु चल आमच्याबरोबर स्मशानाकडे. चार रात्री भुतांबरोबर काढशील तर तुझी सगळी भिती पळुन जाईल." शऱ्याचा कावा‌ ओळखुन बाळुगुरुजी शांतपणे म्हणाले तसे कुठुन तोंड उघडलं अस शऱ्याला झालं.
अशाप्रकारे सगळी व्यवस्था झाल्यावर रात्रीचे जेवणं आटोपून मंडळी मोठ्या उत्साहाने पहारा द्यायला निघाली. 'हुश्शार..जागते रहो..' अशा आरोळ्या देत काठ्या आपटत गस्ती पथकं गल्लीबोळातुन फिरु लागली. त्यांच्या आरोळ्यांनी, टॉर्चच्या प्रकाश झोतांनी बिथरलेली गावातली कुत्री भुंकत सैरावैरा पळु लागली. या सगळ्यामुळे गावात फारच थरार निर्माण झाला होता.
आप्पा पहिलवानाच्या नेतृत्वाखाली घोडेवाडीत मजबुत चौकी पहारे बसले होते. चुकुन जर दरोडेखोर गावाकडे वळलेच तर त्यांना पळता भुई थोडी होईल असा चोख‌ बंदोबस्त होता. कोणी कसा मारा करायचा, बाकीच्या पथकांना कसे इशारे द्यायचे याची रंगीत तालीम अनेकवेळा झाली होती. पण आठवडा होत आला तरी चोर काही फिरकले नाही. गस्त घालणाऱ्या मंडळीचा उत्साह कमी होऊ लागल्याने त्यांची संख्याही रोडावत चालली होती.
अशाच एका रात्री पुलाजवळ पहारा देणाऱ्या प्रभ्याच्या पथकाला पुलावर काही हालचाल जाणवली. सगळे श्वास रोखुन‌ हातातल्या लाठ्या सरसावुन दबा धरून बसले. पुलावरुन दोन आकृत्या तरातरा गावाकडे येत होत्या. ते पुलाच्या मध्यावर येताच प्रभ्याने जोरदार शीळ वाजवत इतरांना इशारा दिला. रात्रीची शांतता चिरत तो आवाज सगळ्यांना स्पष्ट ऐकु गेला. गस्ती पथकांची एकच पळापळ सुरु झाली. जे धाडसी होते त्यांनी पुलाकडे धाव घेतली तर काही लपण्यासाठी सुरक्षीत ठिकाण शोधु लागले. पलीकडे चाललेला गलका ऐकुन पुलावरचे दोघे संशयीत क्षणभर थबकले. ही संधी साधुन पुलाजवळच्या पथकाने झेपावत त्यांना ताब्यात घेतले.
चोर ताब्यात आल्यावर सगळेच बेभान झाले, प्रभ्यासारख्यांचे दोन चार रट्टे देऊन होत नाही तोच तिथे आबा, गुरुजी ही मंडळी येऊन पोहोचल्याने पुढचा अनर्थ टळला. चोरांना पकडुन गावात आणले तेव्हा त्यांना पहायला सारा गाव लोटला होता. चर्चेलातर उधाण आले होते. "हे नक्की पाहणी करायला आले असतील. चेहरा तर बघा कॉलेजच्या पोरांसारखे दिसुन राहिले. चेहऱ्यावरुन तर चांगल्या घरचे वाटतात." एकजण दुसऱ्याला सांगत होता. "असंच असतं बाबा. त्यामुळं संशय येत न्हाई कोणाला." एक माहितीगार लोकांच्या शंकांचे निरसन करत होता.
"शांत व्हा समदे. उगा कालवा करु नका. मी करतो या भामट्यांची चौकशी. यांना पोपटासारखं बोलायला लावतो बघा." आबा पुढे होत म्हणाले.
"आबा बसा की जरा निवांत. मघापासून लई पळापळ केली तुम्ही. गुर्जी हे चोर तुमचेच विद्यार्थी समजा. धडाधडा बाराखडी म्हणायला सांगा त्यांना." आबा पुढे सरसावलेले पहाताच पोपटनानाने चपळाईने बाळुगुरुजींच्या हातात चौकशीची सुत्रं सोपवली.
या सगळ्या गावकऱ्यांच्या कोंडाळ्यात बसलेले ते दोघे लांडग्याच्या पंजात सापडलेल्या सशासारखे भेदरलेले दिसत होते. प्रभ्याने अजुनही एकाची मानगुट पकडुन ठेवली होती. अचानक रुपी आली तर आपला पराक्रम नको का दिसायला, हा त्यामागचा त्याचा विचार.
"हां, तर करा सुरुवात. कोण तुम्ही, तुमचा म्होरक्या कोण, आतापर्यंत किती दरोडे घातले? सगळं काही सांगायचं. काही लपवुन ठेवायचं नाही." गुरुजींनी चौकशीला सुरुवात केली.
"ओ काका, खरं सांगतो. आम्ही चोर नाही हो." दोघांपैकी एकजण कळवळुन म्हणाला तसा "***, त्या भल्या माणसाला काका म्हणतोस" अस म्हणत प्रभ्याने त्याच्या पाठीत सणसणीत गुद्दा मारला.
"अहो मारु नका. सांगतो सगळं" तो पुन्हा कळवळला.
"प्रभाकर थांब आणि सोड त्याला." गुरुजींनी प्रभ्याला दटावले.
हा सगळा प्रकार सुरु असताना तात्या सावकाराबरोबर रुपा येत असल्याचे शऱ्याने पाहिले आणि तो त्वेषाने चोरांवर तुटुन पडला.
'याला काय झालं आता.' असा सगळ्यांच्या मनात विचार येत नाही तोच सावकाराबरोबर रुपा तिथे येऊन पोहोचली.
"अरे सोड त्याला. राज.. तु काय करतोस इथे आणि हा विकी आहे ना?" रुपा किंचाळली.
रुपाचं ओरडणं ऐकुन आपण चोर समजुन दुसऱ्यालाच पकडलेलं आहे
आणि ते रुपाच्या ओळखीचे दिसतात हे प्रभ्याने ओळखलं आणि तो शऱ्यावर धावुन गेला "इतकं मारतात व्हय. गुर्जी चौकशी करुन राहिले ना." असे म्हणत त्याने शऱ्याला दुर ढकलुन दिले.
"रुपाबेटा हा काय प्रकार आहे? तु ओळखतेस का या दोघांना?" गुरुजींनी विचारले.
"हो काका. हा माझा वर्गमित्र राज, जिल्ह्यातले नामांकित वकील पटवर्धन यांचा मुलगा आणि हा त्याचा रुमपार्टनर विकी. पण इतक्या रात्री ते इथे काय करताहेत तेच समजत नाही."
रुपाच्या उत्तरावर त्या दोघांनी 'राजची काही वह्यापुस्तके चुकुन रुपाकडे राहिली होती. ती घेण्यासाठी ते दोघे रुपाच्या गावाकडे मोटरसायकलवरुन येत होते. मध्येच मोटरसायकल बंद पडल्याने ते पायीच निघाले. त्यात रस्ता चुकले म्हणुन पोहचायला इतका उशीर झाला होता.' असे स्पष्टीकरण दिले.
असा सगळा खुलासा झाल्यावर "तर मंडळी, आज सगळ्यांचीच खुप धावपळ झाली आहे. आता जरावेळात पहाट होईल. तरी सगळ्यांनी आपापल्या घरी जाऊन आराम करावा. हे दोघं पाहुणे माझ्या घरी थांबतील. आबा, नाना, आप्पाजी तुम्हीही जरा आराम करा. तात्या तुही जा, मी सोडतो रुपाबेटाला घरी." असे सांगुन गुरुजींनी सगळ्यांना निरोप दिला.
सगळी पांगापांग झाल्यावर राजच्या पाठीवर हलकेच थाप मारत "आता सांगा खरं काय ते. माझी हयात शिकवण्यात गेली. पण इतक्या बेरात्री वह्यापुस्तकांसाठी अनोळखी गावी जाणारा विद्यार्थी मी पाहिला नाही. काय रुपाबेटा." असं गुरुजींनी विचारताच रुपाने लाजुन खाली मान घातली तर राज त्याही परिस्थितीत ओशाळल्यागत कसाबसा हसला.
"मी सांगतो काका. गेली चार दिवस रुपा भेटली नाही म्हणुन हा कासावीस झाला होता. त्यातच या चोरांच्या बातम्या. रुपाच्या काळजीपोटी याचं चित्त लागत नव्हतं म्हणुन हा निघाला. एक से दो भले म्हणुन मीही निघालो आणि इथे फुकट मार खाल्ला." सुजलेला गाल चोळत विकीने माहिती दिली.
"चांगलं आहे. आधी तुम्ही चांगला अभ्यास करुन आपल्या पायावर उभे रहा. पटवर्धन वकील चांगले ओळतात मला. तात्या तर बालमित्रच आहे माझा. मी समजावेल दोघांना." असं म्हणत गुरुजींनी दोघांना मनापासून आशीर्वाद दिले.
इतक्यात जोराचा गलका झाला. "माझ्या कोंबड्या कोणी चोरल्या." असे म्हणत वरच्या गल्लीतला दामुआण्णा ठणाणा करत होता. आता त्याच्या कोंबड्या चंबळच्या डाकुंनी चोरल्या की गावातल्या कोंबडीचोरांनी याचा तपास शेवटपर्यंत काही लागला नाही.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्त लिहिली आहे कथा...
गावात घडणाऱ्‍या मजेशीर घटना छान रंगवल्यात कथेत...
तुम्ही आता माहिर झालात गावच्या गोष्टी लिहिण्यात ..

'हुश्शार..जागते रहो..' अशा आरोळ्या देत काठ्या आपटत गस्ती पथकं गल्लीबोळातुन फिरु लागली. त्यांच्या आरोळ्यांनी, टॉर्चच्या प्रकाश झोतांनी बिथरलेली गावातली कुत्री भुंकत सैरावैरा पळु लागली.>>>>> Rofl

Lol भारी आहे. थोडक्यात मस्त वातावरण निर्मीती. चक्क पूल सुद्धा माझ्या डोळ्यासमोर आला. Proud

रुपालीजी, रानभुलीजी, रश्मीजी आपले मनापासुन धन्यवाद.
कथा फसते की काय ही भीती होती मनात. पण‌ आपले प्रतिसाद वाचुन धीर आला. Happy

छान लिहिलीए.
बिचारा विकी विनकारणच मार बसला, मला हलचल मधला हिरोचा मित्र अर्शद वारसी आठवला..हिरोच्या मित्राचे पात्र मह्त्वाचे असते नेहमी प्रेमकहाणीत Wink Lol

मस्त लिहिली आहे Proud
वातावरण निर्मिती नेहमीसारखीच छान.. कथाही आवडली

मला हलचल मधला हिरोचा मित्र अर्शद वारसी आठवला.>>> मलाही अ‍ॅक्चुअली.. तोच सीन आठवला Lol

आधी तुम्ही ज्याप्रमाणे वर्णन केलं गावातल्या चोरांचं तेव्हा 'सावरखेड- एक गाव' या चित्रपटाची आठवण झाली.
पण नंतर ही कथा प्रेमकथेकडे वळली.राज-रूपा
लव्ह स्टोरी!
कथेचे पैलू छान आहेत आणि त्यांना आकार पण देण्याचा प्रयत्न प्रशंसनीय!
पुलेशु