विली

Submitted by फूल on 11 June, 2021 - 00:11

तीन-चार वर्षांपूर्वी आम्ही मेलबर्नात रहायला आलो. इथं आल्या आल्या काहीच महिने मॉर्डीत रहात होतो. मॉर्डीयालक(Mordialloc) असं या गावाचं नाव पण सगळे सर्रास मॉर्डी म्हणतात. समुद्राकाठचं एक टुमदार गाव. एक प्रमुख रस्ता आणि एक छोटं दोन फलाटांचं रेल्वे स्टेशन, त्याच्या पुढं मागं रेल्वे फाटक... रेल्वे स्टेशनच्या पुढ्यात मुख्य रस्ता आणि त्याच्या पुढं समुद्रच... एवढ्यातच गाव संपलं. शांत, तसं मनमोकळं पण साधं-सोप्पंच... एकदा फिरून आलं की कळून जावं असं गाव. बघाव्या तिकडं जुन्या टुमदार बंगल्या, त्याच्या आधेमध्ये एखादं चर्च पेरलेलं... आमच्याही रस्त्याला लागून अनेक जुन्या जुन्या टुमदार बंगल्या होत्या. जुन्या असल्या तरी अतिशय नेटक्या, झाडूनपुसून लख्खं ठेवलेल्या... बऱ्याचश्या पांढऱ्याशुभ्र... प्रत्येकाच्याच दारात भलीथोरली झाडं पण तीही legoच्या खेळात मांडल्यासारखी नीटस मांडून ठेवलेली...

आमचं घर ज्या रस्त्याला लागून होतं त्या रस्त्याच्या कोपऱ्यावरच एक घर होतं. अगदी जुनं पुराणं... खूप खूप जुनं! घराला चिमणी असलेलं कौलारू घर...! त्या घराच्या पुढल्या अंगणात भला थोरला मेपल. तोही त्या घराइतकाच जुना. आम्ही मेलबर्नात आलो तेव्हा स्प्रिंग ऐन रंगात आला होता.. त्यामुळं हिरवीगार पानं सळसळ वाजवत दारात मेपल उभा असायचा. आणि त्याच्याकडे बघत किंवा कधी डोळे मिटून सकाळची उन्हं अंगावर घेत पुढल्या सोप्यामधल्या आराम खुर्चीत विली बसलेला असायचा. डोक्याला पडलेलं टक्कल, वयोमानानुसार बारीक झालेले डोळे, भलं मोठं नाक, गालावर दाढीचे खुंट वाढलेले, उभा चेहरा पण आताशा गळलेला, टिपिकल यॉर्कशायरी बुटकी आकृती, आदल्या रात्रीचा पायजमा अजून तसाच अंगावर असायचा, हातात एखादा कॉफीचा मग कुरवाळत विली आराम खुर्चीत एका लयीत झुलत बसलेला असायचा... असा तो खुर्चीत बसलेला विली.. त्याच्या आरामखुर्चीच्या पायाशी बसलेला त्याच्याइतकाच म्हातारा चार्ली, अंगणातला मेपल आणि ते घर हे सगळं एखाद्या चित्रासारखंच दिसायचं. ते चित्र बघून मला गदिमांचं “झोपाळ्यावर अभंग कातर, सवे लागती कड्या कुरकुरू... खेड्यामधले घर कौलारू’ आठवायचं...

मी आणि माझी लेक एखादा लखलख उन्हाचा दिवस बघून चालायला बाहेर पडलो की हे आरामखुर्चीतले आजोबा बघणे हा आमचा नित्याचा कार्यक्रम असायचा. नुकतंच घराबाहेर चालायला लागलेलं पिल्लू पुचूक पुचूक वाजणारे बुटू घालून मजेत चालायचं... त्या बुटूमुळे आम्ही रस्त्यानं चाललोय हे सगळ्या मॉर्डीला कळायचं. विलीच्या घराजवळ आलो की माझ्या दोन वर्षांच्या पिल्लाकडे बघून तो नियमाने हात हलवायचा... पिल्लू फ्लाईंग कीस द्यायचं मग तोही ती शिताफीने परतवायचा. वाजणारे बुटू ऐकून चार्ली उठून उभा रहायचा... आणि पिल्लाकडे जमेल तितकी तिरकी मान करून बघायचा. पिल्लू त्याच्याकडेही एक फ्लाईंग कीस टाकायची. तीही फ्लाईंग कीस विलीच झेलायचा. badmintonसारखी सर्व्हिस करून ती फ्लाईंग कीस आमच्याकडे पुन्हा फेकायचा आणि यॉर्कशायर बोलीतल्या जड आवाजात म्हणायचा “you really rock lil lady..” आणि माझ्याकडे बघून “g’day mumma” मीही हसून त्याचा दिवस चांगला जावो म्हणायचे आणि आम्ही चालू पडायचो. असं साधारण महिना-दोन महिने तरी चाललं.

एक दिवस मी स्ट्रोलर घेऊन घाईत जात असताना पिल्लूचा आवडता बनी स्ट्रोलर मधून कुठतरी पडला. मला तेव्हा कळलच नाही. पिल्लू झोपलेलं होतं. घरी येऊन पोचलो आणि आमची चिमणी उठली. बनी दिसेना म्हणून रडारड... मी बऱ्याच लांबून चालत आले होते.. बाहेर ऊनही रणरणत होतं.. वाटेतच बनी कुठंतरी सांडला असणार ही तशी खात्री होती.. पण आता तेवढ्यासाठी बाहेर पडणं फार जीवावर आलं... दोघीनाही भुका लागल्या होत्या.. म्हटलं जेवून जरा उन्हं उतरली की बाहेर पडावं... चिमणीची कशी-बशी समजूत घालून दोघी जेवलो आणि दुपारची छान झोप काढून उठलो. उठताच पिल्लूची पुन्हा बनीसाठी भुणभुण सुरु... नाईलाजाने बाहेर पडले... इथं रस्त्यानं चालताना अनेकदा लहान बाळांचे बुटू, खेळणी, मिटन्स, टोपडी असलं काही बाही फुटपाथवर पडलेलं दिसतं पण त्याला सहसा कुणी हात लावत नाहीत त्यामुळे बनी मिळेल असं वाटत होतं... पण लांबवर कुठं पडला असेल तर तेवढी पुन्हा पायपीट व्हायची असलं गणित डोक्यात सुरु असताना विलीच्या घराशी येऊन पोचलो. अंगणातल्या खुर्चीत विली झुलत बसला होता.. जणू आमचीच वाट बघत असल्यासारखा तो आम्हाला बघताच तत्परतेने उठला आणि त्याच्या गेटशी येऊन थांबला. मिश्कील हासत पिल्लूला म्हणाला,
“Someone is waiting for you since afternoon… guess who?”
पिल्लूला कळलं नाही पण मला कळलं...
“Thank you so much… you don’t know how much I owe you for this…!”
विलीने हातातला बनी पिल्लूला दिला आणि तिच्याकडे बघून म्हणाला...
“Yes girl you owe me a lot of flying kisses…”
पिल्लूने बनीला घट्ट मिठी मारली... तिचे डोळे चमकले... म्हाताऱ्याला कोण आनंद झाला... माझ्याकडे बघून म्हणाला,
“Mumma, is she allowed to have a lolly?”

माझ्याच्याने नाही म्हणवलं नाही... आलोच म्हणाला.. आणि येताना एक भला मोठ्ठा लॉली जारच घेऊन आला. त्याची नात पिल्लाएवढी असताना हा लॉलीजार आणला होता... आता ती नात माझ्याएवढी झाली होती आणि तिला एक मुलगा होता... त्या पतवंडासाठी तो लॉलीजार हा पणजोबा नेमाने भरून ठेवत असे... तो येतो म्हणाला अधूनमधून आणि त्यातल्या लॉली खाऊन नाहीतर बरोबर घेऊन जातो.

“I am 87 yrs old… I am not allowed to eat these now… but you know I love to be naughty sometimes…”
असं म्हणताना बारीक डोळे करत आजोबा इतका गोड मिश्कील हसला... पिल्लूलापण या naughty आजोबाचं naughty हसू गमतीशीर वाटलं. कळलं काही नाही पण ती मोठ्याने हसली...

डोक्याला कशी बशी अडकवलेली कानटोपी, जाड भिंगाचा डोळ्यावर चष्मा, वाढलेली दाढी, जुना पुराणा जाडसर सदरा अंगात अडकवला होता आणि त्यावरचा भलामोठा ओवरकोट. तो ओवर कोट निळ्या रंगाचा होता. तो जर लाल रंगाचा असता तर विली म्हणजे साक्षात सांता क्लॉज... पिल्लू तिच्या दोन वर्षाच्या आयुष्यात हे असं काहीतरी पहिल्यांदाच अनुभवत होती.. तिला सगळ्याचीच गंमत वाटत होती... त्यामुळं चार्लीसारखी मान तिरकी करून पिल्लूही त्या आजोबाकडे बघत होतं... एका हातात लॉलीपॉप आणि एका हातात बनी गच्चं धरून ठेवला होता.. अश्या अवस्थेत आजोबाने हाय फाय मागितला... लॉलीपॉप इवल्या मुठीत गच्च धरून पिल्लूने तसाच हाय ठोसा आजोबाला दिला...

विली खळखळून हसला आणि म्हणाला, “माझं नाव विली आणि हा माझा जुना मित्र चार्ली. तुझं नाव काय?” इतपत इंग्रजी पिल्लूला कळत होतं... त्यावर ती, “मिन्गा” एवढंच म्हणाली... मी गडबडीने किमया म्हणून सांगायला गेले पण त्याचा काही उपयोग नव्हता... बिली आणि मिन्गा ची जोडी जमून गेली...

मला म्हणाला “she (पिल्लू) is the first Indian child I have ever met in my life… and probably the last one…”

क्षणभर त्याची नजर हरवली... मी म्हटलं.. “ and you are the very first 87 yr old Australian I have ever seen”

दोघेही भरभरून हसलो...

त्यानंतर जाता-येता विलीच्या घराशी थांबा ठरलेला... खूप खूप बोलत रहायचा... सगळंच मला कळायचं नाही पण तरी एखाद्या एखाद्या शब्दाचा धागा पकडून मीही बोलत राहायचे काही बाही... म्हातारा फार प्रेमळ, वयोमानाने सायीसारखा मऊ झाला होता... आजवरलं अनुभवलेलं काय काय त्याला सांगायचं असायचं... त्याच्या गेटशी उभं राहून सुरुवातीला वीसेक मिनिटं आणि मग नंतर नंतर तास-तासभरही आमच्या गप्पा चालायच्या...
विलीची नात हे एकमेव जवळचं नातं उरलं होतं त्याच्या आयुष्यात... नाही म्हणायला थोडेफार मित्र होते पण तेही असंच कुठं कुठं आरामखुर्च्यात बसलेले... एकुलता एक मुलगा व्यसनी होऊन चाळीशीतच गेला... सुनेनं या व्यसनी नवऱ्याला सोडून केव्हाच निराळा घरोबा थाटला... राहती राहिली नात... तिला मग विलीनंच वाढवलं.. सून अधूनमधून लेकीला भेटायला यायची... सुट्टीत कधी आठ-पंधरा दिवस घेऊनही जायची लेकीला.. पण नातीला विलीचा लळा होता... विलीलाही तिचं खूप खूप कौतुक... तिच्याबद्दल भरभरून बोलत रहायचा... ती किती सुंदर आहे?, कशी स्वत:ची काळजी घेते?, मेंटेंड आहे... वगैरे वगैरे... या नातीप्रेमाचा कडेलोट म्हणजे तिचं बाळंतपणही त्यानंच केलं... त्यामुळं त्यासंबंधीची सगळी माहिती होती त्याला... किमया रात्री झोपते का? डायपर जास्त वापरू नको, ब्रेस्ट मिल्क भरपूर दे तिला, सॉलिड फूड काय काय देतेस? मारत नाहीस ना? ओरडत नाहीस नं? असलं काय काय विचारत आणि सांगत रहायचा...

मला नेहमीच एवढं बोलायला वेळ नसायचा मग कधी कधी मी वेगळ्या वाटेने जायचे... दोन-तीनदा त्याला चुकवून जायच्या प्रयत्नात असताना चार्लीने भुंकून भुंकून त्याला बोलावलं आणि आम्ही त्याच्या तावडीत सापडलो असंही झालंय... कधी कधी नको म्हणून सांगितलं असताना त्याच्या घराजवळ आलो की पिल्लूच जोरात हाक मारायचं... बिलीssss म्हणून... मग तोही ‘हे मिन्गाsss’ म्हणून आलाच बाहेर... की झालं... घाईत आहे म्हणून सांगितलं तरी पंधरा मिनिटं मोडलीच... आणि विशेष म्हणजे पिल्लूही त्या बागेत छान रमायचं... चार्लीबरोबर बॉलशी खेळ, कुठं बागेतली फुलं, पानं गोळा कर... विलीच्या आरामखुर्चीत बसून बघ असल्या खेळात तिचा मस्त वेळ जायचा... ऑटम मध्ये तर विलीच्या बागेतल्या लाल पानांचा आमच्या घरात भरपूर साठा झाला.. त्याच्या बागेत त्याच्या नातवाची काही खेळण्यातली बागकामाची लहान मुलांची हत्यारं होती... पिल्लू ती घेऊनही चिक्कार खेळायची... एरवी कुणाकडे गेलो की “घीsss”(घरी) म्हणून धोशा लावणारं हे लेकरू पण त्याच्या बागेतून पाय निघायचा नाही तिचा... अनेकदा तिला उचलूनच चालू पडावं लागायचं... हे सगळं सगळं त्या मेपलच्या साक्षीनं घडायचं... तो भला थोरला मेपल बघून मला विलीच्या घराचा हेवा वाटायचा... ते कौलारू घर, त्या घरासमोरची नेटकी बाग आणि बागेतला तो मेपल अनेकदा माझ्या स्वप्नात आलाय, अजूनही येतो...

पण हा हेवा मात्र पानगळीपर्यंतच... एकदा पानगळ सुरु झाली की त्यानंतर मेपल बघावा... त्याआधीचं रक्तवर्णी रूप जितकं देखणं तितकच रुक्ष कोरडं त्यानंतरचं रूप... त्याच्या इतकं रुक्ष झाड नाही... पान अन पान गाळून हा उभा संन्यस्थ योग्यासारखा... ती गळलेली पानं गोळा करत बसणं हा मोठाच उद्योग होऊन बसतो... एक जुनाट गंजलेलं रेक घेऊन विली रोज पानं गोळा करताना दिसायचा... पण त्याचा तो आवडीचा विरंगुळा होता... आजवर कित्येक वर्षं तो ही पानं गोळा करत होता... हा त्याचा आणि झाडाचा ऋणानुबंध कैक वर्षांचा...

विलीनं स्वत: ते घर बांधलं होतं... अगदी स्वहस्ते...पण त्याही आधीपासून हा मेपल त्या जागी होता... त्याच्या बायकोला आणि त्याला ही जमिन त्या मेपलमुळेच आवडली....पन्नास-साठ वर्षांपूर्वी मॉर्डी म्हणजे तसं खूपच मूळ मेलबर्न शहराबाहेरचं गाव... पण तरी या मेपलच्या प्रेमात पडून तो इथं शहराबाहेर रहायला आला... त्याच्या बायकोला मेपलची लाल लाल पानं फार आवडायची... ऑटम आला की ती सगळ्या घरभर मेपलची लाल पानं सजवून ठेवायची... सगळं घरच पिवळ्या, लाल, तपकिरी रंगाचं व्हायचं आणि शिवाय अंगणात हा लालेलाल सडा... त्यानंतर त्याचा मुलगा याच अंगणात पानं गोळा करत फिरला, मग नात आणि आता पणतू.... किती आठवणी त्या झाडाशी जोडलेल्या... हा इतिहास त्याच्याकडून जाणून घेणं फार मजेशीर वाटायचं... मुलगा तीस वर्षाचा झाला आणि बायको कॅन्सर होऊन गेली... त्यामुळेच मुलगा व्यसनी झाला असं म्हणायचा विली... मुलगा जाऊनही वीसेकवर्षं लोटली...पण तरी त्याचं दु:खं थोडीच अटणार आहे? काळाचं औषधहि लागू होत नाही अश्या या जखमा कश्या भरून निघायच्या..?

एक गोष्ट मात्र मला जरा विचित्र वाटायची... नातीचं एवढं कौतुक सांगायचा पण तिला मी कधीच त्याच्या घरात येऊन राहिलेलं पाहिलं नव्हतं... ना कधी या आजोबाला तिनं तिच्या घरी घेऊन गेलेलं पाहिलं नव्हतं... नाही म्हणायला अधून-मधून एखाद्या संध्याकाळी पणतू या पणजोबाकडे सोडून कुणा पोराबरोबर बाहेर गेलेली बघितली होती आम्ही... तशी तरुणच होती.. आणि विली म्हणाला तसं दिसायला सुरेख...! पण तेवढंच... अशी संध्याकाळीच दिसायची आणि पाचेक मिनिटात नाहीशी व्हायची... आम्हाला तिथं येऊनही तीन-चार महिनेच झाले होते म्हटलं नसेल आली या तीन-चार महिन्यात...

तुझी एकदा तिच्याशी ओळख करून देतो असं अनेकदा म्हणाला होता पण तो योग कधी आलाच नाही... विली मात्र भेटत राहिला, दिसत राहिला... मी तिथं रहात असताना सहाएक महिने तरी नियमित भेटत राहिलो आम्ही... आणि त्याचं खूप खूप ऐकून घेतलं मी.. त्याबद्दल कधी कृतज्ञता व्यक्त करायचा... ‘माझं बोलणं कंटाळवाणं असलं तरी तू ऐकून घेतेस कारण you have good manners’, असं म्हणायचा... मी आपलं जांभई आवरत आणि उभं राहून कंटाळलेल्या पायांकडे दुर्लक्ष करत, “नाही आला रे कंटाळा” असं म्हणायचे... त्या मऊ मुलायम आजोबाला मला अजिब्बात दुखवायचं नव्हतं...

पण त्यानंतर काहीच दिवसात भारतात आईचं आजारपण निघालं... कॅन्सर.. मला भारतात जाणं भागच होतं. पिल्लूला घेऊन आईकडे भारतात काही महिन्यांसाठी जाऊन रहायचं ठरलं. तीन-चार दिवसातच निघायचं होतं... थंडीचे दिवस होते... उन्हाचा मागमूस नव्हता... तीन-चार दिवस जाता-येता बघितलं पण विली काही अंगणात दिसला नाही... मेपल सगळी पानं संपवून बसला होता त्यामुळे आता पानं गोळा करायचंही काम नव्हतं... अगदी निघायची वेळ उद्यावर आली तेव्हा वाटलं जाऊन सांगून यायला हवं...

त्या संध्याकाळी विलीला सांगायला गेले... इथं हिवाळ्यात उन्हं लवकरच कलती होतात... गार वारं सुटलं होतं... आणि पूर्वेकडून अंधार पसरत होता... दारात उघडा बोडका मेपल... विली आरामखुर्चीत नव्हता... म्हणून आत घरात डोकावले... जुनी रेकोर्ड ऐकत बीअर पीत बसला होता... मला बघताच उठून दाराशी आला... आम्हाला आत बोलावलं... त्याच्या घरात जाण्याची माझी पहिलीच वेळ... घर तसं यथातथाच होतं... ८७ वर्षांचा आजोबा आवरून आवरून किती आवरणार...? तरी त्यामानाने खूपच नेटकं होतं... आईच्या आजारपणाचं सांगितलं तर म्हणाला, “केमोला घाबरू नको म्हणावं तिला... केस महत्वाचे नसतात त्याच्या आत जे असतं म्हणजे डोकं, ब्रेन तो महत्त्वाचा... त्याचं ऐकायचं आणि ट्रीटमेंट पूर्ण करायची... केस कुणालाच आयुष्यभर पुरत नाहीत... कॅन्सर झाला काय आणि नाही झाला काय... आता माझंच बघ“ असं म्हणून स्वत:च्या टकलावरून हात फिरवला... मला त्यावेळी हसूच फुटलं... माझ्या चेहऱ्यावरलं हसू त्याच्या जाड भिंगानी टिपलं असावं... तोही बारीकसा हसला... किमयाला चिक्कार लॉली दिल्या... तिनं त्या फ्रॉकमध्ये भरून घेतल्या... बाहेर अंधार पडायला लागला तशी मी निघाले... भेटू पुन्हा... नवऱ्याकडून खुशाली कळवत रहा वगैरे झालं आणि बाहेर पडले... तो दारातला रुक्ष मेपल, दाटून येणारा अंधार, त्या जुन्या पुराण्या रेकोर्डवरचं दुखरं गाणं आणि आईच्या आजारपणाने दुखावलेलं मन... अगदी अशुभ वेळा... नको नको ते विचार मनी दाटून येण्याची वेळा... त्याच्या गेटातून बाहेर पडले आणि उगाच डोळ्यात पाणी आलं... वाटलं हा म्हातारा परत दिसेल का नाही...

भारतातून नवऱ्याशी बोलायचे तेव्हा पहिल्या दोनएक महिन्यात विली भेटला की नियमित आमची चौकशी करतो, परत कधी येणार म्हणून विचारतो असं नवरा सांगायचा... ते ऐकून हायसं वाटायचं...

पण एक दिवस नको ते फोन वर ऐकायला मिळालंच... विली गेला... घरातच... किती दिवस मृतावस्थेत होता कुणालाच कळलं नाही... दोनेक दिवस फोन उचलत नव्हता म्हणून नात शेवटी एका वीकेंडला शनिवारी सकाळी बघायला आली आणि हा बेडमध्येच झोपलेला होता... नातीला वाटलं झोपलाच आहे पण ती चिरनिद्राच...

मला खूप वाईट वाटलं.... त्यानंतर महिन्याभरातच मी परत मेलबर्नात आले... विलीच्या दारावरून जाताना मेपल दिसला... अनेक इवली पानं फुटत होती त्याला... आरामखुर्ची नव्हती आणि चार्लीही नव्हता... घर बंद होतं... बाग अस्ताव्यस्त वाढली होती... गवत वाढलं होतं... माझे डोळे नकळत पाणावले... पिल्लूनेही सवयीने बिsssली म्हणून हाक मारली... पण ती हाक ऐकून पलिकडल्या घरातून जून बाहेर आली... ही जून म्हणजे... अजून एक आमच्याच रस्त्याला राहणारी आज्जी... तिची आणि आमची सुध्दा बरीच ओळख होती.. मला तिच्याशीही गप्पा मारायला मज्जा यायची... तिनं हाक मारली... तशी मला बरं वाटलं... अशीच घरी गेले असते तर खूप एकटं एकटं वाटलं असतं असं वाटून गेलं...

अर्थातच विलीचा विषय निघाला... तिचा तर तो कैक वर्षांचा शेजार... बरंच काही सांगत राहिली... नात चांगली नव्हती... मूल असंच झालेलं... त्याच्या बापाचा पत्ता नाही... पैसे मागायला सारखी विलीकडे यायची... आणि तोही पुरवत रहायचा... शेवटी आई-बापाशिवाय वाढलेली पोर... या आजोबाला शेंड्या लावणं सोपच होतं तिला... त्याचं निम्मं पेन्शन आणि शिवाय त्याची काळजी घेतेय असं दाखवून तिनं त्याच्या नावाने त्याची काळजी घेण्यासाठीचा भत्तासुद्धा सरकारकडून मिळवला.. पैसे लागले की भेटायला यायची... घरातल्या कितीतरी जुन्या दुर्मिळ वस्तू विकून पैसा केला तिने... आजोबा लाडका नव्हता पण या घरावर डोळा तिचा... चार्लीला कुठं टाकलं देव जाणे.. जून असं खूप काही सांगत राहिली... मला अजूनच वाईट वाटलं... त्या दारातल्या मेपलसारखं स्वत:जवळचं सगळं सगळं गमावूनही थंडी वाऱ्यात ताठ उभं रहाणं जमलं होतं विलीला...

त्याच्या दुसऱ्याच दिवशी विलीच्या दरवाज्यासमोर घर तोडणारी गाडी आली... घर पाडून भुईसपाट केलं... नातीचे उद्योग... दोनेक महिन्यातच आम्हीही तिथला आमचा मुक्काम हलवला... आमच्या घरमालकाला आमचं घर विकायचं होतं... आम्ही नव्या घरात रहायला गेलो आणि गम्मत म्हणजे आमच्या या घराच्या शेजारच्या घरात भला थोरला मेपल उभा...पण “फुले का पडती शेजारी?” या नियमानुसार त्या मेपलची पानं सगळी आमच्या मागल्या अंगणात आणि ती गोळा करायचं काम आम्हाला लागलं... ते एकन एक पान गोळा करताना पानापानागणिक विली आठवायचा... शिवाय तो मेपल एकन एक पान गाळून थंडी – पावसाशी झुंजत समोर उभा... नवरा म्हणाला तू ऑस्ट्रेलियात राहतेस जिथं तिथं मेपल असायचाच... पण मला मात्र तो निव्वळ योगायोग नाही वाटला...

आता विली जाऊन तीन वर्षं झाली... आमची मिन्गा मोठी झाली, शाळेत जायला लागली... बिली आजोबा तिला फारसा आठवतही नाही.. तीनच वर्षं पण मॉर्डी झपाट्याने बदललं... जुनी घरं पाडून एकतर नव्याने बांधून काढत होते किंवा त्याजागी तीन-तीन रो हाऊसेस बांधून झाली होती... विलीच्या घराच्या जागीही अशीच तीन छोटी छोटी दुमजली रो हाऊसेस बांधलीयेत... एकात त्याची नात रहाते म्हणे.. आणि दोन भाड्याने देऊन त्या भाड्यावर जगतेय... तिच्या दारासमोरच तो भला-थोरला मेपल... परवा तिथून जाताना सहज लक्ष गेलं... एक गार्डनर ती मेपलची पानं ब्लोअरने उडवताना दिसला... पण भवताली इतकी उलथापालथ होऊनही.... मेपल मात्र तसाच... सगळी आवरणं त्यजून उभा ठाकलेला योगी... अलिप्त... समाधिस्त.... आरामखुर्चीत डोळे मिटून झुलत बसलेल्या विलीसारखा...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला दीर्घायुषी झाडांबद्दल नेहेमीच कुतुहल, कौतुक, आदर असे बरेच कायकाय वाटते.
गोष्टीचे नाव विली असले तरीही माझ्यामते ती तितकीच मेपलच्या झाडाची देखील आहे.

लिखाण आवडले हे वेसांनल

क्या बात हैं. खूप आवडलेत विली आजोबा.

गोष्टीचे नाव विली असले तरीही माझ्यामते ती तितकीच मेपलच्या झाडाची देखील आहे. +100

किती सुरेख आणि तरल लिहिता तुम्ही!
आजोबा डोळ्यासमोर उभे राहिले
Mepal च्या ऐवजी का कोण जाणे पिंपळ imagine झाला मला Happy

सुरेख ! फूल, तुझे लिखाण नेहेमी या नावा प्रमाणेच टवटवीत आणी तजेलदार असते. छोटसं ललित पण एकदम छा गया या टाईपचे असते.

विली आजोबा म्हणले की डोळ्यासमोर एक टिपीकल गोरा, उंच, घारे निळे डोळे असलेला माणुस उभा राहीला. वाईट वाटले त्यांच्या विषयी सगळे वाचुन.

खूप छान लिहिले आहेस फूल. .
विलीबद्दल वाईट वाटले. असे एकाकी म्हातारपण कोणाच्या वाट्याला येऊ नये.

बाकी तुम्ही पुन्हा इथे लिहू लागलात याचा आनंद झाला.

हृदयस्पर्शी कथा, सुरवातीपासून अंदाज आला तरी कथेच्या ओघात गुंतत गेले आणि डोळे पाणावले. खूप सुंदर लिहिता तुम्ही.>>>> +१

मस्त ! एकदम भिडले. आमच्या घराच्या शेजारी एक मॅगोनोलिया लावले होते एका व्हेटरन शेजार्‍यांनी - तो गेला त्या वर्षी मॅग्नोलिया फुलला तेंव्हा ती एव्हढे फोटो काढलेले झाडाचे ते आठवले. त्यांचाच किस्सा लिहिलाय असे वाटले - विशेषतः पोरांच्या ईंटरअ‍ॅक्शनबद्दल.

या लेखातून नवीन काही नाही मिळालं. अशा प्रकारची व्यक्तिचित्रणं विरळा नाहीत. झाडाचं वर्णनही. अर्थात तुम्ही लिहिलं सुंदरच आहे.

विलीच्या नातीबद्दल जजमेंटल न होता लिहिता आलं असतं का?
पूर्णविरामाच्या जागी तीन टिंबं का आहेत?

@भरत तुमची प्रतिक्रिया आवडली...

विलीच्या नातीबद्दल जजमेंटल न होता लिहिता आलं असतं का? >>> हो तेच करायचं होतं खरं.
आम्हाला तिथं येऊनही तीन-चार महिनेच झाले होते म्हटलं नसेल आली या तीन-चार महिन्यात... >>> इथं हाच प्रयत्न आहे. नंतर आलेली नातीबद्दलची मतं जूनची आहेत.

जे दिसलं ते लिहिलं इतकंच. अंतू बर्वे लिहिताना पु लं नी हा तोल फार छान सांभाळला आहे. अंतूचा मित्र पु लं ना त्यांच्या मुलाबद्दल सांगतो पण लेखक म्हणून पुलं स्वतः कुठलीही टीका टिप्पणी त्यावर करीत नाहीत. हा तोल सांभाळता यायला हवा. मीही हा प्रयत्न केलाय पण विलीबद्दलच्या अतीव जिव्हाळ्यापोटी माझा थोडा जजमेंटल सूर लागला असावा... Sad

पूर्णविरामाच्या जागी तीन टिंबं का आहेत? >>>> कुणीतरी कधीतरी हे विचारेल हे ठाऊक होतं. पूर्वी दाद म्हणून एक माबो वर लिहीत असत. फार सुरेख लिहायच्या त्या. त्यांचे लेख अजूनही आहेत माबो वर. त्यांच्या लेखात संवादात कधी कधी पूर्ण विरामाच्या जागी तीन टिंबं असायची. मग ते संवाद अधिक ओघवते वाटायचे असं आपलं मला वाटलं. त्यांच्या लिखाणाने इतकी भारावून गेले की मीही तसं काही ठिकाणी करायला सुरुवात केली. पण ते इतकं हातात बसलं की सगळीकडेच ते होतंय आता. सवय मोडायला हवीच. Happy

इंग्रजीत एलिप्सेस (...) वापरले तरी शेवटी स्पेस देऊन पूर्णविराम देतात. पूर्णविराम व एलिप्सेस अदलाबदली केली तर अर्थ बदलतो. मराठीतले नियम माहिती नाही. एलिप्सेस म्हणजे काही तरी वगळले असा अर्थ असतो किंवा बोलताना व्यक्ती रेंगाळली. वाक्याच्या शेवटी असेल तर वगळले असा अर्थ. उदा: I missed him .... . (इथे लेखिके/लेखकाने शेवटी काहीतरी सांगितले नाही जसे I missed him that evening. I missed him everyday etc. वाचकाने सोयीने अर्थ लावायचा. पहिली तीन टिंबे एलिप्सेस आहेत व शेवटचा पूर्णविराम).
I missed him. (इथे लेखिकेने सर्व सांगितले आहे.)
सॉरी फूल, थोडा ग्रामरनाझीपणा झाला पण भरत यांचा चांगला प्रश्न होता.

हे वर्णन पण छान आहे.

नातीचे वागणे विचित्र वाटले असेल. पण विना आइ वडिलांची ऑर्फन मुलगी मुलाच्या बापाचा पत्ता नाही मुल असेच झाले हे तुम्हाला पटले नाही का? पण ते तिचे जीवन आहे. प्रत्येकाला चौकट मिळत नाही. व तो तिचा प्रश्न असेल. सिंगल पेरेंट असेल तर आर्थिक परिस्थिती नाजूक असते वि शेष् तः मुल लहान अस्ताना त्याला बेबी केअर ची गरज असते व पैसे मिळवायला नोकरी मूल बाजूला ठेवुन करावी लागते. अगदी काळीज तुटणारी फेज असते ही म्हातार्‍या आजोबांकडे पैसे असतील दिले थोडे नातीला काय बिघडले.

घरातल्या म्हातार्‍यामागे उरलेल्या वस्तू डिस्पोज ऑफ करा व्याच लागतात किती धरून बसणार. हे तर मी पुण्यातही केले आहे. शेवटॅ वडिलोपार्जित वास्तू विकून तिला स्थैर्य मिळाले आता मूल नीट वाढवू शकेल असा विचा र मी केला.

नवी जनरेशन फार बंध ठेवून वागत नाही. त्यांच्या समस्या वेगळ्या असतात. लेक टीन एजर झाली की तुम्हला अनुभव येइलच.

नात चांगली नव्हती... मूल असंच झालेलं... त्याच्या बापाचा पत्ता नाही... पैसे मागायला सारखी विलीकडे यायची... आणि तोही पुरवत रहायचा... शेवटी आई-बापाशिवाय वाढलेली पोर... या आजोबाला शेंड्या लावणं सोपच होतं तिला... त्याचं निम्मं पेन्शन आणि शिवाय त्याची काळजी घेतेय असं दाखवून तिनं त्याच्या नावाने त्याची काळजी घेण्यासाठीचा भत्तासुद्धा सरकारकडून मिळवला.. पैसे लागले की भेटायला यायची... घरातल्या कितीतरी जुन्या दुर्मिळ वस्तू विकून पैसा केला तिने... आजोबा लाडका नव्हता पण या घरावर डोळा तिचा... चार्लीला कुठं टाकलं देव जाणे.. जून असं खूप काही सांगत राहिली..>> हा वैचारिक चौक टीत राहणार्‍या लोकांचा दृ ष्टिकोण आहे. चुकीचा नाही.

Pages