अगं अगं म्हशी......

Submitted by Dr. Satilal Patil on 8 June, 2021 - 23:46

अगं अगं म्हशी...

एके दिवशी मित्राचा फोन आला. तो जरा टेन्शन मध्ये होता. म्हटला 'अरे म्हशीला रासायनिक कीटकनाशकाची विषबाधा झालीये, तु काही करू शकतोस का?' काय झालंय विचारल्यावर 'म्हशीवर रासायनिक कीटकनाशक, रोगार फवारलंय' असं उत्तर मिळालं. काय? मी उडालोच! अशी काय आणीबाणीची परिस्थिती आली होती की त्याला हे जहाल विष, म्हशीवर फवारावं लागलं होतं? असं विचारल्यावर, 'काय करू साहेब, या गोचिडांपासून सुटण्यासाठी सगळे उपाय करून पहिले, पण काहीही फायदा नाही, शेवटी कंटाळून रोगार फवारलं'. त्याने लगोलग व्हाटसप वर विडिओ पाठवले. म्हशीच्या तोंडातून फेस येत होता, तीची तळमळ पाहवली जात नव्हती. तिला विष देणाराच तिच्या अंगावर पाण्याचे सपकारे मारून अंगाची लाही कमी करण्याचा प्रयत्न करत होता.

गोचीड, उवा, पिसवा, गोमाश्या यां परोपजीवी किड्यांचा मोठा उपद्रव जनावरांना होतो. हे रक्तपिपासू किडे प्राण्याचं रक्त पितात. त्यामुळे जनावर खंगतं, त्यांची तब्बेत ढासळते, वजन आणि पर्यायाने दुध कमी होतं. गोचीडामुळे होणाऱ्या गोचिडतापामुळे प्राणी दगावतोसुद्धा. यावर उपाय काय? तर डॉक्टरांकडून इंजेक्शन मारून घेणे किंवा कीटकनाशकाचा फवारा मारणे. शेतकरी दुकानात जातो आणि गोचीडाच औषध द्या असं म्हणतं रसायनांची बाटली घेऊन येतो. किडे नियंत्रणात येत नाहीत म्हणून दोन मिलीलिटरचा डोस मारुतीच्या शेपटासारखा वाढत जाऊन पाच दहा मिलीपर्यंत पोहोचतो. मग या रासायनिक पाण्याने गाईम्हशींना दर आठवड्याला हे विषारी अभ्यंग स्नान घातलं जातं.

डेल्ट्रामेथ्रीन अमीट्राज, साईपरमेथ्रीन, अव्हरमेक्टीन यासारखे रासायनिक कीटकनाशके सध्या मोठ्या प्रमाणात वापरले जातात. पण हे गोचीड इतके चिकट असतात की जा म्हणता जात नाहीत. कितीही फवारलं तरी पुढच्या आठवड्यात मतं मागायला येणाऱ्या पुढाऱ्यासारखे ते परत हजर होतात. अतिवापरामुळे त्यांच्यात कीटकनाशकांविरुद्ध प्रतिकारशक्ती आलीय. म्हणून त्यांच्या नियंत्रणासाठी अगदी गोठ्यात आग लावण्यापर्यंत बात पोहोचते. पूर्वी बीएचसी, डीडीटी या सारखे ऑरगॅनोक्लोरीन प्रकारातले कीटकनाशके वापरले जायचे,त्यांचे दुष्परिणाम समोर आल्यावर ऑरगॅनोफॉस्पेट या पर्यायाने कमी घातक कीटकनाशकांचा वापर सुरु झाला. त्यामुळे दगडापेक्षा वीट मऊ झाली खरी, पण शेवटी विष ते विषच.

मी या विषयात अजून खोल जायचं ठरवलं. भारतात वापरल्या जाणाऱ्या प्राण्यांवरील कीटकनाशकांचा एमएसडीएस, म्हणजे मटेरियल सेफ्टी डेटा शीट तपासलं. एमएसडीएस म्हणजे ते औषध किती सुरक्षित आहे? फवारणाऱ्या माणसाने काय काळजी घ्यावी? यासाठीची माहितीपत्रिका. कोणतेही रसायन हाताळण्या आगोदर हे माहितीपत्रक वाचणं आवश्यक असतं. काही शोधनिबंध वाचल्यावर समजलं की हे कीटकनाशकं गाईम्हंशींच्या त्वचेत शोषले जातात, लिव्हर मध्ये साठतात, त्वचा, डोळ्याची आग, ऍलर्जी होते, असं त्यात स्पष्टपणे लिहिलंय. कीटकनाशक फवारल्यार दोन दिवस दूध काढू नये, मटणासाठी तो प्राणी असल्यास वीस दिवस तो प्राणी मटणासाठी मारू नये असंही नमूद केलंय. पण गुटख्याच्या पुडीवर किंवा सिगारेटच्या पाकिटावर कॅन्सर होतोय हे स्पष्ट लिहलेले असूनसुद्धा त्याकडे दुर्लक्ष करून टपरीकडे पावलं वळतात तशीच डोळेझाक या प्राण्यांच्या कीटकनाशकांकडे केली जातेय. बरं फवारून झाल्यावर 'उरलेलं कीटकनाशकाचं पाणी गोठ्यात फवारा म्हणजे तिथं लपलेला गोचीड सुद्धा मरेल' असं सांगितलं जातं. मग हे विषारी तीर्थ आजूबाजूला गोमुत्रासारखं शिंपडलं जात. चाऱ्यावर, गव्हाणीवर ते उडतं आणि गाईम्हशींच्या पोटामार्गे दुधात जाऊन बसतं.

गुणधर्मानुसार रसायनं दोन धर्मात विभागले गेलेत. पाण्यात विरघळणारे आणि तेलात विरघळणारे. रसायनं माणसासारखे दलबदलू नसतात त्यामुळे ते आपला धर्म स्वतःहून बदलत नाहीत. बहुनांश रासायनिक कीटकनाशके, तेलात विरघळणाऱ्या धर्माचे असतात. दुधातील फॅट म्हणजे तेलच. त्यामुळे हे कीटकनाशके आणि त्याचे तुकडे सरळ दुधात उतरतात.

जगभरात प्राण्यावर वापरलेले कीटकनाशक दुधात किती प्रमाणात उतरतं यावर बरंच संशोधन झालंय. ऑस्ट्रेलियात केल्या गेलेल्या संशोधनानुसार प्राण्याच्या शरीरावर फवारलेल्या कीटकनाशकांचे अंश दुधात सापडले, एवढंच काय पण ते लोण्यामार्गे पार तुपापर्यंत पोहोचलेत. या कीटकनाशकांचे माणसाच्या तब्बेतीवर दूरगामी परिणाम होतात. यामुळे उलटी, डायरिया, पोटाचे, किडनीचे आजार, मज्जासंस्था आणि मानसिक स्वास्थावर विपरीत परिणाम होतात. लिव्हर खराब होणे, रोगप्रतिकार क्षमता कमी होणे यासारखी दुखणी मागे लागू शकतात.

हे कीटकनाशकं विघटित होऊन त्यांचे तुकडे होतात. बऱ्याचदा हे कीटकनाशकांचे तुकडे, मूळ कीटकनाशकापेक्षा जास्त घातक असतात. या तुकड्यांचेही तुकडे होतात आणि तेही विषारी असतात. जगभर कंपन्या आणि प्रयोगशाळा दुधात कीटकनाशकाचे अंश शोधातात, पण या रासायनिक सापाने आपल्या तुकड्यांच्या रूपाने विषारी पिलावळ जन्माला घातलेली असते तिच्याकडे कोणी लक्ष देत नाहीये.

रोज लाखो गाईम्हशींसारख्या प्राण्यांवर हा विषप्रयोग होतोय. अगदी गाईच्या पोटातील तेहतीस कोटी देवांनाही हा जहरी नैवद्य दिला जातोय. सर्वजण फळे, भाजीपाला आणि धान्यातून येणाऱ्या कीटकनाशकांबाबत चिंतीत आहेत. त्यांवर उपाय म्हणून सेंद्रिय शेतीच्या मार्गावर तारेवरची कसरत करतोय. पण रोज सकाळी ओठाला लावला जाणारा हा विषाचा प्याला मात्र दुर्लक्षित राहिलाय. जागोजागी जैविक आणि सेंद्रीय चा नारा देणारे आपण, प्राण्यांच्या आणि पर्यायाने आपल्या सुरक्षिततेसाठी सेंद्रिय कीटकनाशक आणि रसायनविरहित दुधाचा आग्रह धरायला हवा. भाजीपाल्यावर औषध फवारायचे असल्यास सेंद्रिय कीटकनाशक आहे का? असा प्रश्न विचारतो, मग गाईम्हशींसाठी औषध घेतांना औषधाच्या दुकानात 'साहेब, गोचीडासाठी काही जैविक पर्याय आहे का?' असा एक प्रश्न विचारायला हवा.

माणसाच्या पोषणासाठी दूध देणारी म्हैस, रसायनांचे हलाहल पचवायचा प्रयत्न करतेय. तिचा अन्नदाताच, दर आठवड्याच्या विषाच्या माऱ्याने तीचं रूपांतर विषकन्येत करतोय. आणि हा विषारी आहेर आपल्या दुधातून साभार परत करणाऱ्या म्हशीला म्हणावसं वाटतंय ... अगं अगं म्हशी... मला कुठं नेशी?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भयानक वास्तव आहे. एवढे सखोल आणि माहितीपुर्ण लिहिलं आहे की दूध्/मटण वगैरे बंद करावं की काय असं वाटू लागलं Uhoh

धन्यवाद डॉक्टर पाटील ही वस्तुस्थिती मांडली त्याबद्दल!
मुळात गायी म्हशींवर गोचिडीचा प्रादुर्भाव होण्याची कारणे काय असतात? त्या गोष्टी टाळता येतील का?

चांगली माहिती. दूध / मांस वाढण्यासाठी इंजेक्शन देणे वगैरे वाचले होते.
अंगावर कीटकनाशक फवारणे इतक्या तपशीलात नव्हते माहिती.
मुळात हे परजीवी (parasites) होऊ नयेत किंवा प्रमाणात रहावेत यासाठी काही मार्ग नाही का?
आणि झाल्यावर मारण्यासाठी / आटोक्यात ठेवायला निसर्गात काही योजना नसते का (biological control)?
(पारंपरिक ज्ञान) झाडपाला किंवा दुसरे जीव जे यांना काबूत ठेवतील आणि दुभत्या जनावरांना त्रास होणार नाही.

बापरे, भयंकर वाटले वाचून. रोगोर अतिजहाल आहे, ते कसे काय फवारले यांनी...

दूध वाढण्यासाठीची इंजेक्शन्स माहिती होती, हे आता नवीन कळले.

कीटकनाशके आहेत म्हणून भाज्या बाद, आता दूध बाद... काय खायचे मग??

हि नवीन माहिती.
दुध आणि दुग्धजन्य पदार्थ खाल्ले नाही पाहिजे का मग? दुधवाल्या कडून विचारून घेते ते लोक काय करतात याबाबतीत.

यावर विचार करत होते तेव्हा लक्षात आलं की जेव्हा गुरं रानात शेतात चरायला जातात तेव्हा त्यांच्या अंगावर बरेचदा पक्षी बसलेले दिसतात. बहुधा हे पक्षी गोचिडी खात असावेत. Symbiotic relationship असणार ही गुरं आणि पक्ष्यांची. पक्ष्यांना खाद्य आणि गुरांना गोचिडीपासून संरक्षण!

हो जिज्ञासा. तुम्ही सांगता ते खरंच आहे. लहानपणी मी गुरं राखायला जायचो तेव्हा हे बघितलं आहे की बगळे, मैना क्वचित प्रसंगी कावळे असे पक्षी येऊन म्हशींच्या पाठीवर बसून किडे खायचे.

बरेच पक्षी, गुरं चरताना गवतातून उडणारे किडे मटकावतात.
बगळे, मैना, कावळे हे गोचीड खातात हे माझ्या ऐकिवात नाही.

बापरे
वाचून फार भयंकर वाटलं. रोगर डीडीटी सारखी अतिशय तीव्र रसायनं त्वचेवर, वासात, डोळ्याजवळ रोज घेणार्‍या त्या म्हशींची दयाही आली.
इतके अघोरी उपाय करावेच लागतात का? या गोठ्यात काम करणार्‍यांना ही त्याचा त्रास.आणि आपण मुलांना हौसेने 'प्रोटिन व्हिटामिन हवीच' म्हणून सकाळी दूध देतोय.
नुसते ग्लोव्ह घालून त्या गोचीड रोज साफ नाही करता येत का? (खूप असतील, आणि लहान असतील.) किवा नीम पावडर गोमूत्र वगैरे काही नॅचरल आणि सहज उपलब्ध असलेले प्रकार काम नाही करणार का?

डॉ पाटील मनकवडे दिसतायत. Proud माझे आणी माझ्या मुली चे याच विषयावर मागच्या आठवड्यात बोलणे झाले. आम्ही दोघीही यु ट्युब वर कायम कुत्रे, मांजरी आणी बाकी सार्‍या प्रा॑ण्यांचे व्हिडीओज सारखे बघतो. नेमके गोचीडासारखा किडा तिने पाहील्याने मला यावर विचारले.

पूर्वी गायी गुरे शेतात, पडक्या जागी, माळरानावर चरायचे. आता बहुतेक बंदिस्त जागेत त्यांना एका जागी उभे करुन ठेवत असल्याने कुठले पक्षी येतील ते किडे खायला? ते निसर्गचक्रच जर भेदले गेले, तर बिचार्‍या प्राण्यांसाठी पर्याय काय? तो शोधला पाहीजेच.

उत्तम लेख!
पूर्वी म्हशींसाठी सीताफळाचा पाला, करंज तेल, कडूलिंबाचे तेल वगैरे पारंपारीक उपाय करत असत. आता तसे करत नाहीत का? करत नसल्यास त्या मागचे कारण काय?

Submitted by स्वाती२ >>>>> म्हणजे पारंपरिक उपाय आहेत.
साधारणपणे उवांवर चालणारेच इलाज दिसतायत. मग का वापरायची कीटकनाशके.
किडे खाणारे पक्षी गेंडा की पाणघोडा यांच्या अंगावर बसलेले चित्र पाहिलेय. पाळीव प्राण्यांसाठी असलेले असे पक्षीही पाळता येतील. अगदी मोकळे सोडले तरी इथे खाद्य आहे कळल्यावर येतील ते रोज टिपायला.

दुधवाल्या कडून विचारून घेते ते लोक काय करतात याबाबतीत. >>>>
नको mrunali.s, एकतर खोटे बोलतील किंवा आम्ही विष-फ्री / टीक-फ्री म्हशींचे दूध देतो म्हणून भाव जास्त लावतील. आतमध्ये काय कारभार तो तसाच राहील. काय माहिती काढायची ती न बोलता. माणूस हा प्राणी सगळ्यात किडका (आदरणीय अपवाद सोडून).

ते हि खरं आहे.कितपत खरं सांगतील शंकाच आहे.
मागे एकदा दुधाला दोन दिवस भयंकर वास येत होता, अक्षरशः फेकून दिले होते दुध.महिनाभर दुध बंद केलं होतं.दुधवाल्याला विचारले तर कसलेसं इंजेक्शन दिलं होतं गाईला,त्यामुळे असेल असं सांगितले होते.

बघा म्हणून मी व्हिगन बनू शकतो का असा केवळ चाचपणी धागा काढला होता तर आगपाख् ड झाली माझ्यावर. आता भोआक फ.

दुधाचे व्यसन सोडा त्या ऐवजी क्यालिशिअम च्या गोळ्या घ्या.

@dj, मीरा, हर्पेन, जिज्ञासा, कारवी, रुपाली विशे.. पाटील, साधना, mrunali.samad, जिज्ञासा, व्यत्यय, mi_Anu, राणी, रश्मी, स्वाती, भ्रमर,
धन्यवाद,
सेंद्रिय अन्नाची चळवळ जगभर जोर धरतेय. आपण रसायनविरहित खाद्यपदार्थांचा आग्रह दुकानदाराकडे करू शकतो. लगेच बदल होणं कठीण आहे. पण ग्राहकाच्या दबावामुळे हळुहली मार्केट बदलते. भारतात इंडिया ऑरगॅनिकचा लोगो, ते उत्पादन सेंद्रिय आहे असं दर्शवते. त्यामुळे आपल्याला प्रॉडक्ट निवडणे सोपं जाईल.

@mi_anu,
सध्या भारतात फारसे सेंद्रिय पर्याय उपलब्ध नाहीत. पण बरेचजण यावर संशीधन करतायेत. हाताने गोचीड उपटून काढणे, कडुलिंब, करंज वगैरे तेलाची मालिश याचा वापर होऊ शकतो. त्या मुळे किती नियंत्रण मिळेल याची गॅरंटी नसते आणि ते वेळखाऊ काम आहे. पण २-३ प्राणी असतील तर ते शक्य आहे. जास्त प्राणी असतील तर रसायनाच्या फवाऱ्याचा झटपट मार्ग वापरला जातो.

@ swati_2
पूर्वी म्हशींसाठी सीताफळाचा पाला, करंज तेल, कडूलिंबाचे तेल वगैरे पारंपारीक उपाय करत असत. आता तसे करत नाहीत का? करत नसल्यास त्या मागचे कारण काय?
..........हे मेहेनतीचं काम आहे. सध्या सर्वांना झटपट निकाल हवा असतो. मालक मुळी नसतोच गोठ्यावर. मग मजूर रसायनं वापरणं पसंत करतात.

त्यांना कॅन्सर किवा इम्पोटेन्सी ची भिती (सारखं ही रसायनं फवारताना/रसायनं फवारलेल्या म्हशींजवळ वावरुन) दाखवली तर नैसर्गिक उपायांना तयार होतील का?

@mi_aanu
.. बऱ्याच लोकांना कळतं पण वळत नाही. गेली २३ वर्षे काम करतोय सेंद्रिय विषयात. बऱ्याच गोष्टी बदलताहेत, बदलल्या आहेत. प्रबोधन करत राहणे हाच उपाय दिसतोय Happy

दुर्दैवी आहे.
माहितीबद्दल धन्यवाद
दोनचार गाई म्हशी असणारे पारंपारीक ऊपाय वापरतही असतील. पण जे व्यवसाय म्हणून मोठाले गोठे बांधून आहेत ते आपल्या सोयीनुसार नोकरांकरवी हेच करत असतील.
परवाच वेगन म्हणजे काय, आणि जगात प्राण्यांपासून मिळणारे दूधही न पिणारे लोकं असतात या संदर्भाने मुलीशी बोलणे चालू होते. पण दूधासाठी प्राण्यांना मारले कुठे जाते या तिच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांची पिळवणूक कशी केली जाते हे तिला सांगितले. आता या रसायनांच्या फवार्‍याबद्दलही सांगता येईल. अर्थात यावर दूध न पिणे हा काही पर्याय नाही. पण जेवढी जनजागृती होईल तेवढे ज्यांना शक्य आहे ते तरी सेंद्रिय उत्पादने, खाद्यपदार्थांचा हट्ट धरू लागतील.

डॉक्टर पाटील, सेंद्रिय शेती विषयी एक मोठा आक्षेप असा असतो की याने एकूण उत्पादन कमी होते आणि त्यामुळे आपण जगाच्या लोकसंख्येला आवश्यक ते अन्न पुरवू शकणार नाही. यावर तुमचे मत ऐकायला आवडेल. इथे हे अवांतर चालणार असेल तर इथे लिहा नाहीतर वेगळा धागा काढून लिहीलेत तरी चालेल. किंवा माझ्या या धाग्यावर लिहिलेत तरी चालेल. लिंक: https://www.maayboli.com/node/79221

Pages