कॉन्स्टॅन्टिनोपल ते इस्तंबूल - ०४

Submitted by Theurbannomad on 7 June, 2021 - 16:31

भाग ०१- https://www.maayboli.com/node/79178
भाग ०२ - https://www.maayboli.com/node/79203
भाग ०३ - https://www.maayboli.com/node/79211

१४५१ साली सम्राटपदावर बसल्यावर मेहमतने सगळ्यात आधी एक महत्वाचं काम हाती घेतलं - ऑटोमन सैन्याचं आधुनिकीकरण आणि बळकटीकरण. त्याच्या मनात कॉन्स्टॅन्टिनोपल काबीज करण्याचं ध्येय होतंच, पण त्यासाठी पूर्वतयारीही तशीच करणं अत्यावश्यक होतं. त्याने सैन्यदलाबरोबर आरमारही सुसज्ज करायला सुरुवात केली. त्याच्या आजोबांनी म्हणजे सम्राट बायझीद पहिला याने बोस्फोरसच्या समुद्रधुनीच्या काठावर आशियाच्या बाजूला ' अन्दोलूहिसरी ' नावाची किल्लेवजा गढी बांधून काढली होती. या गढीला दणकट तटबंदी होती. त्या तटबंदीवर तोफा होत्या आणि त्या गढीतून ऑटोमन सम्राट बोस्फोरसच्या समुद्रधुनीवर नजर ठेवत होता. मेहमतने त्या गढीच्या जवळच रुमेलिहिसरी नावाचा प्रचंड मजबूत किल्ला बांधून काढला - पण युरोपियन बाजूला. त्या दोन किल्लांच्या तटबंदीवरच्या तोफा आता अक्ख्या बोस्फोरसच्या समुद्रधुनीवर वाचक ठेवू शकत होत्या...मेहमतने त्या सामुद्रधुनीतून आत येणाऱ्या प्रत्येक जहाजाला आणि गलबताला कर भरण्याची सक्ती केली. ही जहाजं असायची युरोपियनांची...कॉन्स्टॅन्टिनोपलला रसद आणि इतर मदत पुरवणारी. हे सगळं एकीकडे सुरु असताना मेहमतने ऑटोमनांच्या अंकित असलेल्या युरोपच्या सरदारांशी मात्र मधुर संबंध ठेवले. मेहमतसारखा पोरगेलासा सम्राट अशा प्रकारे वागतोय हे बघून त्यांची खात्री झाली, की ऑटोमन साम्राज्याला मवाळ आणि अप्रगल्भ सम्राट लाभलेला आहे. त्यांच्या या दिवास्वप्नाला मेहमतने धूर्तपणे खतपाणी घातलं.

१४५३ साली अखेर मेहमतने आपल्या मोहिमेची आखणी करायला सुरुवात केली. त्याच्या दरबारात त्याचे अनेक खासे सरदार जमले होते. या सगळ्यात होता मुरादच्या मंत्रिमंडळात वजीर म्हणून काम केलेला हलील पाशा. या पाशाला मेहमत खटकत होताच, पण ऑटोमन साम्राज्याची धुरा आपल्या हाती यावी ही त्याची सुप्त महत्त्वाकांक्षाही होती. मेहमत आपल्या शब्दात राहावा यासाठी त्याने बराच काळ प्रयत्न केले होते, पण त्यालात्यात यश मिळालं नव्हतं. शेवटी मेहमतला सतत त्याच्या चुकांची जाणीव करून देत राहायची आणि त्याच्याविषयी इतरांच्या मनात संभ्रम निर्माण करायचा असा गनिमी कावा त्याने स्वीकारला. मेहमतला हा वजीर पाशा आवडत नसला. तरी त्याने त्याला तडकाफडकी दूर केलेलं नव्हतं. जुन्या लोकांमध्ये उगीच अविश्वास निर्माण व्हायला नको, हा त्यामागचा त्याचा उद्देश होता.

मोहिमेची प्रत्यक्षात आखणी सुरु व्हायच्या आधी मेहमतने बोस्फोरसच्या दोन्ही अंगांना असलेल्या किल्ल्यांच्या तटबंदींवर भरपूर दारुगोळा जमवला होता. बुरुजांवर नव्या तोफा ठेवून त्या चालवायला नवे प्रशिक्षित गोलंदाज रुजू केले होते. बायझेंटाईन सम्राट कॉन्स्टंटाईन अकरावा याला हे सगळं बघून धोक्याची जाणीव व्हायला लागली. त्याने लगोलग रोमच्या चर्चच्या दिशेने आपले दूत धाडले. खरं तर अशा मोक्याच्या क्षणी फक्त ख्रिस्ती धर्माचा विचार करून पोपने जर कॅथॉलिक - ऑर्थोडॉक्स मतभेद बाजूला ठेवले असते, तर कदाचित भविष्य वेगळं दिसलं असतं, पण तसं होणार नव्हतं. गेल्या तीन शतकांमध्ये दोन्ही पंथांमध्ये झालेल्या सततच्या झटापटींमध्ये बराच रक्तपात झालेला होताच....पोपने ही संधी साधून लॅटिन चर्चचं ग्रीक चर्चवर वर्चस्व प्रस्थापित करायचा कोता विचार केला आणि तिथेच माशी शिंकली.

एकीकडे रुमेलिहिसरी अधिकाधिक मजबूत होत होतं आणि दुसरीकडे सम्राट कॉन्स्टंटाईन अगतिकपणे युरोपकडे मदतीची याचना करत होता. पोप पाचवा निकोलस अखेर बोलणी करायला राजी झाला, पण त्याच्या समोर यक्षप्रश्न होता इतर युरोपियन सत्तांचा. तिथे इंग्लंड आणि फ्रांस यांच्यात शंभर वर्षांचं युद्ध नुकतंच कसंबसं शांत झालेलं होतं. मध्य, दक्षिण आणि पूर्व युरोपात ऑटोमन प्रबळ झालेले होते. अशा परिस्थितीत कॉन्स्टॅन्टिनोपलला सैन्य पाठवायचं ते कसं, हा त्याच्यापुढचा पेच होता. सैन्याची मदत नाही, तर ख्रिस्ती धर्माच्या दोन पंथाचं एकत्रीकरण करण्याचा आपला प्रस्ताव कशाच्या जोरावर कॉन्स्टंटाईनच्या गळ्यात मारायचा हे पोपला समजत नव्हतं. कॉन्स्टंटाईनकडे स्वतःचं ७०००च्या आसपास सैन्य होतं. शिवाय कॉन्स्टॅन्टिनोपलची तटबंदी स्वतःच हजारोंच्या सैन्याइतकी मजबूत होती....पण ऑटोमन प्रबळ असल्यामुळे कॉन्स्टंटाईनला मदतीची गरज वाटत होती. १३४६ ते १३५० या तीन वर्षांमध्ये काळ्या प्लेगच्या साथीमुळे युरोप आणि कॉन्स्टॅन्टिनोपलच्या भागात थैमान घातल्यामुळे वीस कोटी लोक मृत्युमुखी पडलेले होते, ज्याचा परिणाम ख्रिस्ती सैन्यसंख्येवरही झालेला होता.

कॉन्स्टॅन्टिनोपलची ही तटबंदी हा युद्धशास्त्राच्या दृष्टीने अजूनही कुतुहलाचा विषय ठरतो.वीस किलोमीटर लांबीची ही भिंत अतिशय मजबूत होती. या भिंतीला थिओडोशियन भिंत असं नाव आहे. दगडात बांधलेल्या जाडजूड भिंतींचे तीन थर एकापुढे एक रचून ही तटबंदी तयार केलेली होती. या भिंतीला तेव्हाच्या तोफगोळ्यांनी फारसा फरक पडत नसे. जी काही थोडीफार पडझड होई, ती डागडुजी करून पूर्ववत करायला विशेष वेळ आणि श्रमही पडत नसत. बायझेंटाईन लोकांनी या भिंतीखाली पाण्याच्या काठाशी मोठमोठाले दगड रचून शत्रूचं सैन्य उतरू शकणार नाही अशी रचना तयार केलेली होती. याशिवाय त्यांच्या खास रोमन पद्धतीच्या आणखी एका ' तटबंदीमुळे ' या शहराला शत्रूपासून संरक्षण मिळत असे...

बोस्फोरसच्या खाडीच्या टोकाशी जिथे मार्माराचा समुद्र सुरु होतो, तिथे भूभागाची एक विशिष्ट रचना तयार झालेली आहे, जिला ' गोल्डन हॉर्न ' म्हणतात. एखाद्या खंजिराच्या आकाराचा हा टोकेरी भूभाग म्हणजे बोस्फोरसच्या खाडीत शिरायचा दरवाजा. रोमन युद्धशास्त्रातल्या विशिष्ट सागरी युद्धतंत्राला अनुसरून इथे बायझेंटाईन सैन्याने एक चतुर रचना केलेली होती. त्यांनी या गोल्डन हॉर्नच्या टोकाशी खाडीकिनाऱ्याच्या एका बाजूकडून दुसऱ्या बाजूपर्यंत लोखंडाच्या मजबूत साखळ्यांचे ' दोरखंड ' पाण्यात बुडलेल्या अवस्थेत बांधून ठेवले होते. कोणत्याही जहाजाला आत शिरायच्या आधी या दोन्ही किनाऱ्यावरच्या सैनिकांना आपल्या आगमनाची वर्दी आगाऊ द्यावी लागे...सगळं काही आलबेल असल्याचा इशारा मिळाला की ते या साखळ्या सैल करून पाण्यात खोलवर बुडवत आणि येणाऱ्या जहाजांना आत येण्यासाठी रस्ता खुला करून देत. साखळ्या खेचून घेतल्या की त्या पाण्याच्या पातळीवर येत आणि अशा अवस्थेत कोणत्याही जहाजाला खाडीत प्रवेश करणं अशक्य होई...पूर्वीच्या लाकडी बुडाच्या जहाजांना या साखळ्या सहज फोडून काढत असल्यामुळे बळजबरीने आत येऊ पाहणाऱ्या जहाजांना जलसमाधी मिळत असे. तरीही कोणी आपलं सैन्य खाडीत घुसवायचा प्रयत्न केलाच, तर थिओडोशियन भिंतींवरचे गोलंदाज तोफांचा मारा करून त्या सैन्याला यमसदनाला पाठवत. एकूणच काय, तर जमिनीवरची आणि पाण्याखालची अभेद्य तटबंदी बायझेंटाईन साम्राज्याच्या अस्तित्वाची राखणकर्ती होती.

वझीर पाशा हे सगळं जाणून होता. मेहमतने आपल्या महत्वाकांक्षी योजनेबद्दल चर्चा सुरु केल्यावर त्याने सर्वप्रथम आपल्या बाजूने निषेधाचा सूर आळवला. मेहमतने दुस्साहस करून आपल्या अति-महत्वाकांक्षी स्वभावामुळे ऑटोमन साम्राज्याला हानी पोचवू नये अशा राजकारणी शब्दात त्याने आपल्या मनातली मळमळ बोलून दाखवली...त्या शब्दांमागचा मतितार्थ इतकाच, की मेहमत राजकारणात अजून प्रगल्भ झालेला नाही. मेहमत काही कच्च्या गुरूचा चेला नव्हता. त्यानेही आपल्या सरदारांना स्पष्टपणे आपल्या मनातली योजना बोलून दाखवली. त्याने आपल्या आईला तिचे युरोपमधले लागेबांधे वापरून तिथल्या आघाडीवर ऑटोमन सैन्याला दुसरं युद्ध सुरु करायची वेळ येऊ नये याची काळजी घ्यायला सांगितली. आपल्या गुरूला - अक्षमसद्दीनला त्याने आपल्या योजनेत खाजगीत सामील करून घेतलं....आपल्या सैन्याची जमवाजमव करायला सुरुवात केली आणि त्यात त्याने अनेक महत्वाची माणसं आपल्या आजूबाजूला जमवली.

या सगळ्या लोकांमध्ये होता ' ओरबान ' नावाचा गोलंदाज. हा तोपची खरं तर बायझेंटाईन साम्राज्याच्या चाकरीत जाण्याच्या तयारीत होता, पण तिथे त्याचं वरिष्ठांशी बिनसलं. हा मूळचा हंगेरियन ( की जर्मन ) वंशाचा मनुष्य अतिशय खटपट्या होता. आपल्या मेहेनतीने त्याने तोफदलात बराच वरचा पल्ला गाठलेला होता. त्यानेच ' बॅसिलिका ' नावाची तब्बल सत्तावीस फूट लांबीची भली प्रचंड तोफ तयार करण्याचा घाट घातलेला होता, जिच्यातून उडालेला तोफगोळा जिथे पडेल तिथल्या जागेच्या ठिकऱ्या उडवण्यासाठी पुरेसा ठरू शकणार होता. बायझेंटाईन साम्राज्याला आपली ही संकल्पना विकायचा असफल प्रयत्न केल्यावर त्याने अखेर ऑटोमन साम्राज्याकडे मोर्चा वळवला. हा महत्वाचा मोहरा नेमका मेहमतच्या गळाला लागला आणि मेहमतने लगोलग त्याला आपल्या सेवेत रुजू केला - बॅसिलिका तोफेच्या संकल्पनेसकट. मेहमतला माहित होतं, की या तोफेमुळे पुढे युद्धात थिओडोशियन तटबंदीला भेदणं शक्य होऊ शकेल...त्याने ओरबानला सगळी मदत केली आणि अखेर त्याने ईदीर्ने येथे तीन महिन्यात तशी तोफ बनवून ऑटोमन तोफदलात रुजू केली. त्याने ' आपली ही तोफ बॅबिलोनियन साम्राज्याच्या सुप्रसिद्ध तटबंदीलाही जमीनदोस्त करेल ' अशी बढाई मारत मेहमतला खुश करून टाकलं.

त्यांच्या व्यतिरिक्त त्याचे खास जॅनिसेरी सैनिक दिमतीला होतेच. त्यांच्याशिवाय सैन्याच्या एका मोठ्या तुकडीचा नेतृत्व करणारा आणि मेहमतचा खास विश्वासू जुना ऑटोमन सरदार झाग्नोस पाशा आणि दुसऱ्या तुकडीचा सरदार इशाक पाशा हेही मेहमतबरोबर उभे राहिले. त्याशिवाय मेहमतच्या नौदलातली चारशे जहाजं समुद्रात उतरून चढाई करायला तयार झालेली होती.

या सगळ्यात गोल्डन हॉर्न भागातल्या एका स्वायत्त प्रांताकडे मेहमतची नजर वळली. या प्रांतात - पेरा येथे जेनॉईज वंशाचा ' पोदेस्ता ' नावाचा धनाढ्य व्यापारी प्रांताच्या प्रमुखपदी होता. हा मनुष्य जराही विश्वास ठेवण्याच्या लायकीचा नाही, हे मेहमतने ताडलेलं होतं. शिवाय व्यापाराच्या निमित्ताने युरोपीय लोकांशी याची बरीच चुंबाचुंबी चालत असे. याने बायझेंटाईन साम्राज्याशी चांगले संबंध प्रस्थापित केलेले होते...पण तरीही याच्या प्रांतावर ऑटोमन साम्राज्याचा वरचष्मा निर्माण झाला तर तो मेहमतच्या पथ्यावर पडणार होता. या पोदेस्तानेही मेहमतला सतत ' नरो व कुंजरो वा ' च्या भूमिकेत राहून झुलवत ठेवलं. कॉन्स्टॅन्टिनोपल आपल्या ताब्यात आल्यावर आपल्या साम्राज्याशी खुला व्यापार करण्याची सूट मेहमतने या बनियाला देऊन पहिली, पण अखेर त्याने बायझेंटाईन सम्राटाच्याच बाजूने आपलं वजन उभं केलं. वजीर पाशाने पुन्हा मेहमतला मोहिमेपासून परावृत्त करण्यासाठी चुचकारून बघितलं, पण तरुण वयातल्या मेहमतला आता काहीही करून आपली मोहीम फत्ते करून दाखवायची प्रेरणा मिळाली होती. त्याने अखेर आपल्या सुसज्ज ऑटोमन फौजेला आणि आरमाराला मोहिमेचा मुहूर्त काढून दिला....६ एप्रिल १४५३ या दिवशी म्हणजे ख्रिस्ती लोकांचा ईस्टरचा सण झाल्या झाल्या मोहिमेला सुरुवात होणार होती.

मोहिमेच्या दिवसाआधी महिनाभर मेहमत आपली व्यूहरचना करण्यात गर्क होता. आपल्या प्रचंड तोफदलाला आणि विशेषतः बॅसिलिका तोफेला महत्प्रयासाने मेहमतने तटबंदीच्या समोर वायव्य दिशेच्या बाजूला आणलं. ईशान्येला त्याने झाग्नोस पाशाला बोस्फोरसच्या खाडीचा मोर्चा सांभाळायची कामगिरी आखून दिली. नैऋत्येला इशाक पाशाच्या मोर्चाची जागा निश्चित झाली. प्रत्यक्ष समुद्रात गोल्डन हॉर्नच्या समोर त्याने आपल्या चारशे लढाऊ गलबतांना आणून उभं केलं. सगळ्या बाजूने जय्यत मोर्चेबांधणी झाल्यावर मिहमातने परिस्थितीचा आढावा घेतला आणि ६ एप्रिलच्या दिवशी प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात झाली....पण त्याविषयी पुढच्या भागात. तोवर अलविदा.

1280px-Siege_of_Constantinople_1453_map-fr.svg_.png

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला ही सिरिज सुरु झाल्याचं माहितच नव्हतं. आवडत्या लेखक-लेखिकांचे लेख आले की सूचना देणारी एखादी सोय हवी मायबोलीवर. काल रात्री एकदा सहज चक्कर टाकली आणि एकदम चार लेख समोर दिसल्यावर लगेच फडशा पाडला Happy मस्त मालिका.