शेवट! (The End Of Relationship )-भाग ६

Submitted by रिना वाढई on 5 June, 2021 - 02:25

त्या दिवसापासून दोघेही एकमेकांना अगदी न चुकता महिन्यातून एकतरी फोन करायचे .वर्षातून एकदा तरी भेट होत होती. त्या थोड्याश्या भेटीमध्येदेखील वर्षभराची आतुरता मिटून जात होती.पायलला तर अर्जुनचे दिसणे म्हणजेच सगळे सुख आपल्या पदरात पडण्याप्रमाणे होते.खूप वेळ एकमेकांशी बोलताहि आलं नाही तरी , नजरेनेच सगळं ठीक आहे याची शास्वती मिळत होती.

अर्जुनचे लग्न होऊन आता २ वर्षे झाली , त्यालाही देवाने एक गोड मुलगी दिली . पायलही एका मुलाची आई झाली होती . लग्न झाल्यावर माणसाची एक जबाबदारी वाढते , कर्तव्य आपोआपच वाढत जातात . मुलं झाल्यावर त्या जबाबदारीची अजून एक पायरी वाढते . समोर आता आयुष्यभर एक एक पायरी वाढतच जाणार , त्यात मागे वळून बघता तर येते मात्र खाली उतरायला पायऱ्या नसतात. अर्जुन आणि पायल दोघेही आपापल्या संसारात सुखी होते. या संसाराचं सुख एकमेकांसोबत उपभोगता नाही आलं तरी एक निखळ मैत्रीचं सुख त्यांना आनंद देऊन जात होता.

एके दिवशी पायलला ऑफिसमध्ये लवकर जायचं होत कारण सायंकाळला ऑफिसमधून १ तास लवकर निघून अर्जुनला भेटायला हॉस्पिटलमध्ये जायचं होत . त्याचशिवाय हॉस्पिटलमधूनही घरी लवकर पोहचून उद्याची तयारी करायची होती.

ऑफिस मध्ये पोचल्याबरोबर तिने बॉसला वन हवर अर्ली लिवचा मेल टाकला . बॉस काही एवढा सॉफ्ट नव्हता कि तिला एक तास लवकर सोडेल , म्हणून तिने दिवसभरात दिलेले टास्क लवकर आटोपायचा प्रयत्न केला . १ घंटा लंच ब्रेक असतो तरी तिने १५ मिनिटात आपला लंच करून उरलेले काम भराभरा निपटवले.

सायंकाळ झाली तरी बॉसने मेलला रिप्लाय दिला नव्हता , म्हणून मग बॉसच्या केबिनमध्ये जाऊन सुट्टी साठी सांगणार होती तोच बॉस तिच्या जवळ आला .

पायल मॅम , सॉरी फॉर नॉट रिप्लयिंग युवर मेल , बट यू कॅन टेक लिव नॉव मॅम .

पायलच्या बॉसचे एवढे सॉफ्ट शब्द सगळ्यांना ऐकू गेले , तसे सगळेजण पायलकडे बघू लागले .

पायलने हसतच बॉसला थँक यू म्हटलं आणि आजचे सगळे टास्क कंप्लिट झाले हे हि बॉसला सांगितली , त्यामुळे बॉसने तिला ऍप्रिसिएट देखील केलं . दिवसभर कामात असल्याने स्वतःकडे लक्ष्य नव्हतेच . वॉशरूममध्ये जाऊन केसांची पोनी जरा नीट केली , चेहऱ्यावर पाण्याचे फवारे मारले आता तिला जरा बरं वाटत होते . ऑफिसच्या बाहेर पडल्या पडल्या अर्जुनचा कॉल आला .

अर्जुन - झाली सुट्टी ? निघाली का तू ?
पायलने अर्जुनला आधीच सांगून ठेवलं होत हॉस्पिटल मध्ये येणार असल्याचं . म्हणूनच त्याने तिला फोन केला होता.

पायल - हो , झाली आताच .पोहचेल मी थोड्या वेळात .

अर्जुन - मी हॉस्पिटलच्या बाहेर येतो .पोहचल्यावर सांग . बाय !

पायल - बरं ! बाय .
ती कॅबमधून उतरली आणि अर्जुनला फोन केला.
पायल - मी आली आहे , तू येतोस का?

अर्जुन -हो.

अर्जुन बाहेर येताच त्याला पायल दिसली , त्याने तिला हातानेच इशारा केला ,तस तिनेही त्याला पाहिलं .
दोघे मिळून हॉस्पिटलच्या रूममध्ये गेले , जिथे सीमा ऍडमिट होती .

पायल गेल्या दोन-तीन दिवसांपासून अर्जुन आणि सीमासाठी हॉस्पिटलमध्ये डबा पाठवत होती . सीमाची तब्बेत बरी नव्हती त्यामुळे अर्जुनने सीमाला शहरातल्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होत .हा शहर तोच होता जिथे पायल गेल्या ९ वर्षांपासून राहत होती .

पायलला सीमाच्या तब्बेतीबद्दल कळताच ती विवेकसोबत जाऊन सीमा आणि अर्जुनला भेटून आली होती . अर्जुनच्या नाकारण्यावरूनसुद्धा ती स्वतःच त्यांना डबा पाठवत होती . कधी स्वतः जात होती तर कधी विवेक डबा पोहचवत होता . पायलला रोज सायंकाळला जाणे जमत नव्हते कारण ऑफिसमधून घरीच जायला तिला उशीर व्हायचा . दुसऱ्या दिवशी त्यांना डिस्चार्ज मिळणार होत त्यामुळे पायल आज वेळात वेळ काढून भेटायला आली होती .

रूममध्ये आल्यावर पायलने सीमाला हाय केलं .

पायल - कशी आहेस सीमा ?

सीमा - बरी आहे ग आता , तू आज एवढ्या लवकर कशी काय आली ? म्हणजे तुझा ऑफिस उशिरा सुटतो ना .

सीमाच्या बोलण्यातल एक जडपणा पायलला कळत होता पण त्याकडे दुर्लक्ष्य करत तिने सांगितलं कि आज तुम्हाला भेटायचं असल्यामुळे लवकर सुट्टी घेऊन आली .शिवाय उद्या तुमची पण सुट्टी होत आहे ना म्हणून म्हटलं एकदा भेटून यावं .

अर्जुन -उद्या तुम्ही पण गावाला जाणार आहात ? विवेक सांगत होते .

पायल - हो , थोडं काम असल्याने दोन दिवसासाठी जाऊन येणार गावी .

अर्जुन - सोबतच जाऊ या मग , जर आमची सुट्टी लवकर झाली तर ....अर्जुन मधेच बोलला .

पायल- नको असू दे , आम्हाला जरा लवकर निघावं लागेल आणि तसेही तुम्हाला हॉस्पिटलची फॉर्मॅलिटी पूर्ण करायला थोडा वेळ लागेलच आणि विवेकने म्हटलं आहे कि सकाळीच निघायचं आहे आम्हाला . ती काहीश्या नाराजीनेच म्हणाली .अर्जुनच असं पायलला सोबत जाऊ म्हणणं सीमाला खटकलेच , म्हणूनच पायलच्या शब्दांना री ओढतच ती म्हणाली , आपली सुट्टी उद्या होणार कि नाही हे अजून कन्फर्म नाही झालं ना तर आपल्यामुळे त्यांना कशाला थांबवत आहे तुम्ही .

पायलला कळत होतेच कि सीमाला आपले त्यांच्यासोबत जाणे आवडणार नाही . तिनेही सीमाला हो म्हणून म्हटलं .

पायल - उद्या सकाळी जातांना मी डबा आणून देते .

सीमा-अ गं नको उद्या तर आमचे उपवास आहेत , त्यामुळे डब्याची आवश्यकता नाही आणि तुलाही जायचे आहे तर असू दे . अर्जुन देखील तेच म्हणत होता.

पायल - अ गं , आम्ही याच मार्गाने जाणार आहोत , तर मला जास्त त्रास नाही होणार . तुम्हाला डबा देऊन निघून जाणार आम्ही .पायलच्या बोलण्याने अर्जुन बोलला , ठीक आहे पायल . मी तस कळवतो तुला आज रात्री.जर आमची सुट्टी लवकर झालीच तर डब्याची आवश्यकता नाही पडणार.पायलनेही जास्त अधे-वेढे न घेता हो म्हटलं त्याला .सकाळचे खाली झालेले डबे बॅगमध्ये भरून ती निघाली.
तोच अर्जुन तिला मी सोडतो तुला बाहेर , चल.म्हणत तिच्या सोबत आला.

हॉस्पिटलमधून पायलला नेण्यासाठी अंशू येणार होता . अंशू हा विवेकच्या ताईचा मुलगा . तो हि जॉबसाठी विवेक आणि पायलकडेच राहत होता.

पायल - अर्जुन अंशू येणारच आहे मला घ्यायला , तू जा आत . मी थांबते इथे . हॊस्पिटलच्या बाहेर पडल्यावर पायलने अर्जुनला बोलले .

अर्जुन - अ गं तो येतपर्यंत मी थांबतो तुझ्यासोबत , बाहेर बघ अंधार झाला आहे. तुला एकटीला सोडून कसा जाऊ ?

पायलला अर्जुन तिच्या सोबत थांबावं वाटत होते , पण सीमा ला ते आवडणार नाही म्हणून ती जरा संकोच करत होती .

अर्जुन काही ऐकायला तयार नव्हताच म्हणून मग पायलने जास्त बोलणे टाळले.

सीमा आता बऱ्यापैकी ठीक झाली होती , तिच्यासोबत रूममध्ये तिची आई होती त्यामुळे अर्जुन पायलसोबत थोडा वेळ थांबू शकत होता.दोघेही रोडच्या एका काठे ला उभे होते . अंशू च ऑफिस सुटायला थोडा वेळ बाकी होता म्हणून ते तिथे कॉफी घ्यायला जाणार होते पण जवळपास एकही कॅफे दिसत नव्हता , म्हणून चुपचाप अंशू ची वाट बघणेच दोघांनी पसंत केले .

पायल - अर्जुन , मी आलेली आवडणार नाही का तुला .उदयानंतर आपण केव्हा भेटू नाही माहित . म्हणून म्हणते उद्या येऊ दे ना मला .

अर्जुन - आवडायचं प्रश्न नाही ग. पण तुलाहि माझ्यामुळे त्रास होत आहे ना .सकाळी डबा पाठवायचा असते म्हणून तुला हि जरा वेळ मिळत नसेल . त्यात तुझं ऑफिस पण असतो . उद्या तु गावाला जाणार आहेस , तर तुलाही बाकीचे काम राहतील म्हणून म्हणत होतो की राहू दे उद्याच्या दिवस . एक दिवस होईल मॅनेज .

पायल - ठीक आहे .एकदा सुट्टीच कन्फर्म करून सांग मला , आणि तसेही वेळच लागेल रे सगळी फॉर्मॅलिटी करायला सो मी सकाळचा डबा पाठवूनच देते .अर्जुन ठीक आहे म्हणाला .थोड्या वेळाने अंशू पायल ला घ्यायला आला . अर्जुनसोबत अंशूची ओळख करून दिली आणि बाय म्हणून गेली .
घरी आल्यावर तिने भराभरा घरातले काम आटोपले .घरकामात, अंशूची बहीण आर्या सोबतीला होती म्हणून जरा बरे झाले नाहीतर काही खैर नव्हती म्हणून ति स्वतःला नशीबवान समजली .

रात्रीचे जेवणं आटोपायला १० वाजून गेले , आर्याला तिने गाजर धुवून ठेवायला सांगितले होते . पायलला कुठेतरी वाटत होते कि अर्जुन तिला नको येऊ म्हणणार नाही . एवढ्या दिवसांत त्यांना डबा तर देत होती पण काही विशेष करून पाठवायला जमलेच नव्हते .म्हणूनच तिने सकाळी गाजराचा हलवा डब्यात पाठवायचा बेत केला .

उपवासाला पण तो चालत होता आणि तिची इच्छा पण पूर्ण होणार होती .

दुसऱ्या दिवशी सकाळीच गावाला जायचं होत म्हणून त्याची पॅकिंगही तिला रात्रीच करून ठेवायची होती .
लग्नानंतर तिला एवढी धावपळ करणे रोजचेच झाले होते त्यामुळे तिला कामांचा कंटाळा नव्हता . आणि आता तर तिला अर्जुनसाठी हलवा बनवायचा होता त्यामुळे तिला कंटाळा सोडून थकवा देखील जाणवत नव्हता . अर्जुनने स्लॅम बुक मध्ये लिहिलं होत , त्याचा आवडता पदार्थ - "तू देशील ते." आज तिला त्याच्यासाठी पहिल्यांदाच काहीतरी बनवायला देवाने संधी दिली होती .लागलीच तिने गाजर किसून हलवा बनवायला ठेवला . लग्नानंतर ती सगळे पदार्थ बनवण्यात सुगरण झाली होती , तरीही आज तिला हलवा बनवतांना थोडी धाकधूक होतीच म्हणून ती जास्त काळजीने हलवा बनवत होती . फायनली एक छानसा सुगंध पसरला आणि तिने गॅस बंद केला . हलवा थंड झाल्यावर पॅन मधून तो बाउल मध्ये काढली आणि फ्रिजमध्ये ठेऊन दिली .

रात्रीचे ११:३० होऊन गेले , आता तिला पॅकिंग करायची होती , गडबडीनेच ती रूममध्ये गेली .

एकदा मोबाईल बघावं म्हणून तो हातात घेतला , तर स्क्रीनवर अर्जुनचाच मॅसेज होता . तिने पटकन ओपन केला आणि समोरचे अक्षर पाहून नकळत तिच्या डोळ्यातून थेंब बाहेर येत होते ."सीमा ची बहीण उद्या सकाळी भेटायला येणार आहे , सोबत डबा पण आणणार आहे . सो उद्या डबा नको आणू ."
डबा नको आणू , अर्जुन एवढ्या प्रेमाने मी एवढी धावपळ करत हलव्याची तयारी केली आणि तू म्हणतोस कि डबा नको आणू ....याचाच अर्थ मी सुद्धा नाही येऊ शकणार ना ,का असा मॅसेज केलास रे तू ? पायल स्वतःच्या मनाशीच बोलत होती . तू कधी नव्हतासच रे , फक्त मीच तुझ्या आभासासाठी एवढी धावपळ करत असते , नाही कळत का ? पण आजही तुझ्यासाठी काहीही करायला आवडते मला . तुझ्यावर काही एक हक्क नाही रे ,पण माझ्या ...मी केलेल्या प्रत्येक गोष्टीत तुझा हक्क आजही गृहीत धरते मी . पायलला सकाळपासूनची एक एक गोष्ट तिच्या नजरेसमोर दिसत होती . डोळ्यातले पाणी लपवून ती बॅग भरायला उठली पण हात मात्र निर्जीव पडले होते , जणू त्या एका मॅसेजने सकाळपासूनच सगळा थकवा समोर आणला होता .काहीही करायची इच्छा तर नव्हतीच , पण शेवटी आयुष्यच हे , कुणाकडून कितीही दुखावलो गेलो तरी समोरच्या वाटा ह्या आपल्यालाच शोधायच्या असतात . थांबलो कि संपणार आणि चाललो कि काटे हि रुतणारचं !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टिपिकल लव्ह स्टोरी आपण नेहमीच वाचत आलेले आहोत , म्हणूनच एक वेगळी प्रेमकथा लिहिण्याचा प्रयत्न करत आहे.खूप जण असे असतात ज्यांना आपलं प्रेम मिळत नाही.आणि म्हणूनच मग ते समोर लग्न झाले कि एकमेकांशी बोलणे टाळतात.काही जण तर नातं तुटल्यावर एकमेकांचा इतका द्वेष करतात कि , आयुष्यात पक्के वैरी बनतात जणू.

पायल आणि अर्जुनचे नाते आपल्याला गैर वाटू शकते.परंतु त्यांचे नाते प्रेमाच्या अलीकडे आणि मैत्रीच्या पलीकडे दाखवण्याचा माझा हेतू आहे.हि कथा काल्पनिक असून कुणाचे मन दुखावले असल्यास क्षमा असावी.

कथा आवडत आहे की नाही हे नक्कीच सांगा.सगळ्यांच्या प्रतिसादासाठी धन्यवाद !!!

पायल मूर्ख आहे असे वाटते>>>

मूर्ख नाहीये ती, प्रेमात आहे आणि विसरू शकत नाही. असे दुर्दैवी लोक असतात जगात. त्यांचे वागणे आपल्याला मूर्खपणा वाटतो पण त्यांचा ताबा नसतो त्यांना काय वाटते यावर.

पायल मैत्रीच्या पलीकडे आहे व अर्जुन प्रेमाच्या अलीकडे.

पायल स्वतःच्या भावनेशी प्रामाणिक नाही.
जर प्रामाणिकपणे आपली भावना स्वतःशी कबुल केली तर त्यावरचा उपाय दुर जाणे हा तिला लगेच कळेल.
इतकी वर्षे डिनायल फेजमध्ये? स्वतःच्या मुडचा एवढा कन्ट्रोल कोण्या बाहेरच्या माणसाकडे? जवळच्यांना कळते जरी बोलत नसले तरी, ते जास्त दुर्दैवी!

पायल या पात्रासाठी आहे हे!, अशी माणसे असतात जगात. गोष्ट एकदम मस्त लिहिली आहे. आवडली!