सिरीयल किलर

Submitted by करभकर्ण on 7 June, 2021 - 23:54

सिरीयल किलर

या काही दिवसात शहरात एकामागे एक घडलेल्या पाच हत्येने बरीच खळबळ माजून गेली. दोन-तीन लाख लोकसंख्या असलेल्या या शहरात, एकामागून एक असे पाच खून म्हणजे, खूप मोठी गोष्ट होती. शहरात काही मोजकीच रहदारीचे ठिकाणे होती. हेरून त्याच ठिकाणी खून होणे, म्हणजे खुनी शहरातीलच असावा. आणि त्याला शहराची इत्यंभूत माहिती असावी. हत्या करताना प्रत्येक हत्येमागे एक काहीतरी विचारमालिका लपलेली असावी. कारण हत्यारा मानेच्या पाठीमागून सुरा फिरवून तो गळ्यापर्यंत आणायचा. म्हणजे गळा पूर्णपणे गोल भागात चिरलेला असायचा. त्यामुळे खून झालेल्या इसमाचे डोके केवळ कंठाच्या हाडावरच टेकलेले असायचे. बाकी सगळा भाग कापला गेलेला असायचा.  या हत्यांमागे  दुसरा एक पॅटर्नही दिसून आला होता. ते पाच खून झाले ते साधारण तरुण व्यक्तींचे होते. बर्‍यापैकी सुखवस्तु कुटुंबातील होते. त्यापैकी दोन महिला आणि तीन पुरुष होते. पण त्यांच्यात साधारणता कुठलेच साम्य नव्हते. आणि त्या पाचही जणांचा कुठलाच परस्परसंबंध जुळून आला नव्हता. म्हणजे प्रत्येक जण वेगळा होता. प्रत्येकाचे क्षेत्र वेगळे होते. खुन्याची मानेवरून सुरा फिरविण्याची पद्धत अतिशय सूत्रबद्ध आणि घातकी वाटत होती. सूरा फिरविन्याच्या खुणावरून खुनी क्रूर, पाशवी आणि तेवढाच निर्दयी असावा असे भासत होते. बरं खुनांचे कारणही समोर येत नव्हते. ज्या महिलांचे खून झाले त्यांच्या अंगावर बलात्काराच्या कुठल्याही खुणा आढळून आल्या नाहीत. अथवा अलंकार चोरून नेल्याचा काही पुरावा सापडला नाही. सगळ्या चीजवस्तू आहे त्या जागेवर होत्या. एकदम स्थिर. ज्या पुरुषांचे खून झाले त्यांचेही अगदी तसेच. आणि याचमुळे पोलिसांचा जास्त गोंधळ वाढला होता. बलात्कार, चोरी,बदला, वाद या कुठल्याच जाणीवा खुनामागे नव्हत्या. मग प्रश्न हा उरला होता की, हे खून झाले का? मग त्याचे काही उत्तरे समोर आले. खुन करणारा माथेफिरु असावा. केवळ मनातील खदखद, पाशवी इच्छा थंड करण्यासाठी तो खून करत असावा.
तो सिरीयल किलरचा प्रकार असावा. अगदी हेच समर्पक उत्तर असावे.

बर्‍याचदा खून करण्यामागे वैयक्तिक भांडणे, हेवेदावे किंवा मग मालमत्तेवरून वाद, प्रेम प्रकरणातील अपयश, दोन कुटुंबातील जुने वैर किंवा मग इतर कारणे असतात.
पण प्रत्येक वेळी असे कारणेच असतील असेही नाही. काही खून केवळ मानसिक विकृतीतून घडतात. मनातील अशांती शांत करण्या हेतू, काही विकृत मानसिकतेचे व्यक्ती असे एकामागून एक खून घडवून आणतात. एक खून, दोन खून असे करत करत त्यांना त्या गोष्टीची सवय होते. मग त्या सवयीचे रूपांतर व्यसनात होते. या अशा खुनातून त्यांना मानसिक विकृत आनंद मिळतो. तो आनंद पुन्हा पुन्हा मिळावा या हेतूने त्यांचा तो खूनाचा खेळ सुरु होतो. इथेही अगदी तीच स्थिती असावी. पाच खून झाले होते .अजून किती होतील? कुठे होतील? कसे होतील? केव्हा होतील? हे सगळे उत्तरे अनुत्तरित होती.

पावसाळ्यातील दिवस असल्याने, कधीही आणि कोणत्याही वेळी आभाळ दाटून येत होते. भर दुपारीही अंधार पडल्याचा भास जाणवत होता. काळेकुट्ट ढग आकाशात जमले की, दुपार काय आणि संध्याकाळ काय, वातावरण सारखेच वाटायचे.
संध्याकाळची वेळ झाली होती. शहरातील मध्यवर्ती भागात शंकराचे एक मोठे देऊळ प्रसिद्ध होते. श्रावण महिन्यातील सोमवार असल्याने लोक दर्शनासाठी येऊ लागले होते. खरतर मंदिरात एरवी खूप गर्दी असायची. पण आज वातावरण ढगाळ, काळेकुट्ट असल्याने आणि पावसाचे चिन्ह दिसु लागल्याने, ती गर्दी चोपल्यासारखी जाणवली. मोजकीच लोकं दर्शनासाठी दिसू लागली. कदाचित शहरात घडणाऱ्या खुनांमुळेही गर्दीवर परिणाम झाला असावा.
मी आज दिवसभर  खोलीवर लोळत पडलो होतो. दिवसभर आराम केल्याने संध्याकाळी फिरत फिरत सहज मंदिराकडे आलो. वातावरण काळेकुट्ट झाल्याने जरासा उदास झालो होतो. त्यात शहरातील खुनांच्या सत्रामुळे मीही थोडा भीतीच्या सावटाखालीच होतो. शेवटी भीती ही सांसर्गिक होती. ती सगळ्यांपर्यंत जात जात माझ्यापर्यंतही आली होती.
मंदिराजवळ  पोहोचेपर्यंत थोडे अंधारुन आले होते. आता कुठेतरी बसावे म्हणून मंदिराच्या पाठीमागे एक छोटेसे मोकळे मैदान होते तिकडे निघालो. मैदानातील एका लाकडी बाकावर मी आरामशीर बसलो. मैदानात मोजकेच लोकं दिसत होते. काही मैदानावर शॉर्ट घालून रनिंग करत होते, काही फोनवर हसत-खिदळत बोलत होते, काही माझ्यासारखे आरामशीर बाकावर बसून होते. प्रत्येक जण व्यस्त होता. केवळ स्वतःवर लक्ष ठेवत. स्वतःच्याच विश्वात मग्न. मोबाईल घरीच राहिल्याने, इतर गर्दी न्याहाळण्यात मी व्यस्त झालो. इकडे तिकडे बघून जरा मन रिझवू लागलो. सहज डावीकडच्या बाकावर लक्ष गेले. तेव्हा काहीतरी वेगळे जाणवले. एक तिशीतला तरुण बाकावर एकटाच बसलेला दिसला. चेहरा देखना पण तेवढाच क्रूर भासला. त्याची शरीरयष्टी देखण्या चेहर्‍याला शोभणारी होती. पिळदार शरीर कष्टाने कमावलेले दिसत होते. करड्या रंगाचा टी-शर्ट. खाली निळ्या रंगाची जीन्स. टी-शर्ट वरून एक लेदरचे महागडे जॅकेट. हा सगळा पोषाख त्याच्या शरीराला शोभून दिसू लागला. अशा व्यक्तीला पाहिले की मला त्यांच्याविषयी नेहमीच हेवा वाटतो. तसा मीही चांगला सुदृढ आहे. जीम वगैरे केल्याने शरीर चांगले दणकट आहे. परंतु शरीरयष्टी पाहिजे तेवढी आकर्षक नाही. अगदी जेमतेम. तुटपुंजी. त्यामुळे असे देखणे तरुण पाहिले की,मला उगाचच एक हुरहुर जाणवते. आपल्यात काहीतरी कमी असल्याची जाणीव मनाला बेचैन करते.
पण थोडा वेळ तसेच त्याच्याकडे पाहिल्यावर, तो तरुण काहीतरी विचित्र जाणवायला लागला. चेहऱ्यावरचा एक अर्धा इंचाचा व्रण एवढ्या लांबूनही दिसू लागला. त्याच्या छोट्या छोट्या हालचाली जरा अधीरतेच्या भासू लागल्या. इतर एवढ्या व्यक्तीत तो वेगळा जाणवला होता. आजूबाजूच्या वातावरणापासून तो पूर्णपणे विभक्त होता. तो सारखा इकडे तिकडे बघत होता.
काही वेळा एखाद्या माणसावर नजर स्थिर करायचा. थोडा वेळ बघायचा, मग काहीतरी विचार करून नकारार्थी मान हलवून, पुन्हा दुसर्‍या माणसावर नजर स्थिर करायचा. त्याच्या हालचाली मला जरा खटकू लागल्या. आता मी जरा सावध होऊन त्याच्यावर नजर ठेवू लागलो. पण अगदी सावधपणे. कदाचित त्याला शंका येऊ नये याची खबरदारी घेऊन. अंधार पुढे सरकून गेला होता. आता थोडे थोडेच दिसू लागले. रात्र हळू हळू चढू लागली. मात्र तो तरुण तसाच बसून होता. नजरा एका एका माणसावर ठेवून. माझी नजर मात्र त्यावरच होती. त्याच्यावरच बारीक लक्ष ठेवून होतो मी. मला आता त्याची शंका आली. त्या खुनांच्या पार्श्वभूमीवर मला त्याची हालचाल ताडून पहावी लागणार होती. त्याच्यावर लक्ष ठेवण्याच्या नादात, माझ्या ती गोष्ट लक्षात आली नाही की, आता मैदानात केवळ मी आणि तोच उरलो होतो. त्याची नजर आता फीरत फीरत अगदी माझ्यापर्यंत आली. आता त्याची आणि माझी अगदी नजरानजर झाली. आता तो टक लावून माझ्याकडे बघत होता. आणि माझीही नजर त्याच्यावर होती. परंतु त्याच्या नजरेत जरब होती. एक मंत्रमुग्ध करणारी जाणीव होती. माझी नजर  त्याच्या नजरेत कैद झाली. क्षण दोन क्षण यंत्रवत मी त्याच्या डोळ्यात खोलवर पाहत राहिलो. अचानक भीतीची एक सणक माझ्या मेंदूपर्यंत गेली. मी झपकन त्याच्या डोळ्यातून माझी नजर बाजूला काढली. आणि इकडे तिकडे बघू लागलो. अचानक मी त्याच्यावरून नजर काढल्याने तो जरा विचलित झाला.  परंतु माझा घाबरा बुजरा चेहरा पाहून त्याला हसू आले. ते एकदम साधे हसू! पण त्यामागे कितीतरी क्रूर विचार असतील? याची जाणीवही मला भीती देऊन गेली. मी आता खाली जमिनीकडे बघू लागलो. मला वर बघण्याची हिम्मतच होईना. तो अजूनही माझ्यावर नजर रोखून आहे ही जाणीव मला झाली. त्याची ती नजर टोकदार बाणासारखी मला टोचू लागली. आता त्या क्षणी मला त्या बाकावर क्षणभरही बसवेना. परंतु उठताही येईना. त्याला बघून मी घाबरून गेलो, ही जाणीवही मला  दुबळेपणाची वाटली असती. स्वतःच्याच नजरेत मी भीत्रा, पळपुटा ठरलो असतो. काय करावे? मला काहीच कळेना. मनात काहीली माजली होती. मी हलकेच मान वर करून त्याच्याकडे पाहीले. तो माझ्याकडेच बघत होता. आणि कधी नकारार्थी तर कधी होकारार्थी मान हलवत होता. आता भीतीने एक सरकन काटा माझ्या शरीरभर उमटून गेला. एखाद्या श्वापदाने शिकारीवर हल्ला करू की नको? अशा तऱ्हेने  त्याच्या मानेची नकारार्थी, होकारार्थी हालचाल मला जाणवू लागली.
हळूहळू त्याच्यावरच्या शंकेचे रूपांतर मला खात्री होऊ लागले. माझे मन सावध होऊ लागले. शहरातील त्या पाच खूनांमागे हाच असू शकतो? आता मला काहीतरी करावे लागणार होते. स्वतःचा जीव वाचावा लागणार होता.
त्याची नजर अजूनही माझ्यावर स्थिर होती. माझी असहायता आता क्षणाक्षणाला वाढु लागली. मनावरचा ताण मना मनाने वाढत जाऊ लागला. आता उठने भाग होते. नाहीतर त्याने मारण्या अगोदर इथेच हृदय बंद पडून मेलो असतो. पण मैदानाच्या बाहेर पडण्यासाठी एकच रस्ता होता. आणि नेमके त्या रस्त्यावर जाण्यासाठी त्याला ओलांडून जाणे भाग होते. आता तर माझ्यापुढे मोठा यक्षप्रश्न पडला. त्याची नजर अजूनही माझ्यावर स्थिर होती. मी जरा विचारात पडलो. आणि तडक उठलो. आणि वेगाने त्याला ओलांडून पुढे जाऊ लागलो. पाय लडखडत होते. नजर खाली जमिनीकडे होती. आता पावले दोन पावले ओलांडून गेले की मैदानाचे गेट होते. मी त्याच्यापासून वेगाने निघालो आणि अचानक नेमका, तो ज्या बाकावर बसला होता. त्या बाकाच्या पायाला धक्का लागून खाली पडलो. मी गडबडीत उठायच्या प्रयत्नात होतो. तेवढ्यात  मला कोणाचीतरी हात लागला. तो तरुण मला हाताने धरून उठवायचा प्रयत्न करू लागला. त्याची नजर अजूनही  माझ्यावरच होती. मी अचानक त्याच्या हाताला झटका मारला. आणि वेगाने मैदानाच्या बाहेर पळू लागलो. बाहेर अंधार पडायला सुरुवात झाली होती. मी मेन रोडवर आलो. धापा टाकत टाकत  रोडवर थोडा वेळ थांबलो. पाठीमागे पावलांचा आवाज आला. मी पाठीमागे वळून बघितले. तो तरुण पाठीमागून येताना दिसला. त्याचे हात जॅकेटच्या खिशात होते. तो खिशातून काहीतरी वस्तू बाहेर काढत असावा! असा क्षणभर मला भास झाला. आता मी पूर्णपणे भीतीने ग्रासलो होतो. तो जॅकेटच्या खिशातून कधी सुरा बाहेर काढून माझ्या गळ्याभोवती गोलाकार फिरवीन, याची शाश्वती उरली नव्हती. मी आजूबाजूला पाहण्याचा प्रयत्न केला. पण रोडवर बराच वेळ झाल्याने कोणाचा मागमूस जानवेना. घनघोर अंधार, सुनसान रस्ता, एक सामान्य जीव आणि त्याच्या पाठीमागे एक संशयित माथेफिरू.
मैदानापासून माझ्या खोलीचे अंतर जवळपास एक दीड किमी असेल. आता तेवढे अंतर मला पार करणे होते. मी जरा जोरात पाय उचलून चालू लागलो. त्या वातावरणात माझ्या चपलांचा चपक चपक आवाज मला स्पष्ट ऐकू येऊ लागला. परंतु त्याहीपेक्षा जास्त ठळक आणि स्पष्ट आवाज, त्याच्या पाठीमागून येणार्‍या बुटांचा येऊ लागला. आता मी पळायच्या तयारीत होतो. त्याच हिशोबाने आता मी पावलांचा वेग वाढवला. मी जोरात चालू लागलो. माझ्याबरोबर त्यानेही पावलांचा वेग वाढवला. आता मी पळायला सुरुवात केली. जेवढा कस लागेल तेवढा कस लावुन मी पळू लागलो. आता तोही माझ्या पाठोपाठ पळू लागला. माझ्या चपलांचा आणि त्याच्या बुटांचा आवाज शांत वातावरणात विचित्र वाटू लागला. माझ्या मनात आता भीतीची जाणीव वेगाने वाढू लागली. आता आज सहावा खून होणार आहे का? होय नक्कीच होणार आहे. आज पुन्हा एकदा शहर सहाव्या खुनाने गाजणार आहे. मृत्यूच्या भयाने माझा वेग पुन्हा वाढला. ही बला आपल्याच पाठीमागे का लागावी? कुठून दुर्बुद्धी सुचली आणि इकडे फिरायला आलो. असे मला झाले. दुःख, राग, आवेश,पश्चताप या सगळ्या भावना एकाच वेळी पळताना चेहर्‍यावर दाटून आल्या. डोळ्यात अश्रू दाटून आले.

" ऐ थांब."
पाठीमागून आवाज आला. वाहनाला रोधक लागावा त्याप्रमाणे माझ्या पायांना रोधक लागला. पाठीमागून त्याने आवाज दिला. आता मात्र माझा धीर गळाला. तो पाठीमागून जवळ येत होता. मी द्विधेत अडकलो. थांबावे की पळावे? हा प्रश्न समोर होता. मी आजूबाजूचा कानोसा घेतला. आजुबाजूला अजूनही शांतताच होती. मी पुन्हा वेगाने पळायला सुरुवात केली.
आता मात्र तोही बिथरल्यासारखा वाटला. तोही माझ्या मागून पळू लागला. मी खोलीजवळ पोहोचलो. खोली तळमजल्यावरच असल्याने मी ताबडतोब खोलीच्या दाराजवळ पोहोचलो. खिसे चाचपून खोलीची चावी शोधू लागलो. अशा ऐन वेळी लगेच चावी सापडण्या एवढे माझे दैव बलवत्तर थोडीच होते? चावी लवकर सापडलीच नाही. एव्हाना तो माझ्या जवळ येऊन थांबला होता. खिशातून मी हातात घेतलेली चावी हातातच राहीली. तो आता जवळ येऊन माझ्याकडे काहीशा क्रोधित नजरेने बघू लागला. त्याचा चेहरा धापा लागल्याने फुललेला होता. त्याने दोन तीनदा श्वास आत बाहेर केला. नजर माझ्यावर रोखून  माझ्याकडे खुनशीपनाने बघू लागला. मी दरवाजाला पाठ लाऊन त्याच्याकडे भित्र्या नजरेने बघू लागलो. त्याने अचानक जॅकेटच्या खिशात हात घातला. आता मात्र मी हतबल झालो. जागेवरच गलीगात्र झालो. आता तो सुरा बाहेर काढून आपल्या गळ्यावरुन फिरवणार याची खात्री मला होऊ लागली. मी आजुबाजूला पाहण्याचा प्रयत्न केला. पण सगळा परिसर निपचित पडलेला दिसला.
      त्याने जॅकेटच्या खिशातून हात बाहेर काढला. मी गपकन डोळे बंद केले. डोळे झाकले म्हणजे बाहेरची भीती पण कदाचित झाकली गेली असावी. असे क्षणभर जाणवले. क्षण दोन क्षण निघून गेले. त्याची काहीच हालचाल जानवेना. मी हळूच डोळे उघडले. त्याच्या हातात माझा बटवा होता. तो पाहून मला आश्चर्य वाटले. माझा बटवा त्याकडे कसा? परंतु त्याहीपेक्षा या गोष्टीचे समाधान वाटले की, त्याच्या खिशातून सुरा बाहेर आला नव्हता. त्याने हात पुढे करत बटवा माझ्याकडे दिला.
" तुम्ही जेव्हा माझ्यासमोरून वेगाने जात होता, तेव्हा बाकाला पाय लागून खाली पडलात. तेव्हाच तो बटवा खाली पडला होता. तो देण्यासाठी मी तुमच्या मागून धावत होतो. परंतु तुम्ही मला बघुन पुढेच पळत होता."
तो माझ्याकडे बघत म्हणाला.
आता मात्र मला सगळ्या गोष्टींचा उलगडा झाला.
आपण विनाकारण त्याला घाबरलो. त्याला संशयित समजून आपण पार आतून घाबरलो. मला स्वतःचेच हसू आले. आता मनातील भीती हद्दपार झाली. मी जरा सैल झालो. मी त्याचे आभार मानले.
"तुमचे मनापासून आभार मानतो. आणि तुम्हाला बघुन पुढे पळालो त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो."
मी हलकेच हासत त्याला म्हणालो. त्याने प्रति हसत मला अनुमोदन दिले
"तू मला बघून पुढे का पळत होतास?"
त्याच्या या प्रश्नावर मात्र मी मनमुराद हसलो. त्याला शहरात घडलेल्या पाच खूनांची हकीकत मी सांगितली. तीच ती गोष्ट मनात घोळत, मैदानात बसलो असताना, अचानक तुम्हाला पाहिले. तुम्ही प्रत्येक माणसावर नजर रोखून नकारार्थी, होकारार्थी मान हलवत होता. मग तुमची नजर माझ्यावर पडली. मला जरा तुमच्यावर संशय आला. त्यामुळे तुमच्यापासून दूर पळत होतो.
माझ्या या स्पष्टीकरणाने तो खळखळून हसला. माणसावर अशी नजर फिरवायची त्याला सवयच आहे. असे त्याने सांगितले. आम्ही दोघे समवयस्क असल्याने, त्या थोड्याच अवधीत आम्ही परिचयाचे झालो. त्याचे नाव राघव परदेशी होते. तो बांधकाम अभियंता होता.
मी खोलीचा दरवाजा उघडला. त्याला चहासाठी आमंत्रित केले. तो बिनधास्त आत येऊन सोफ्यावर बसला.
एव्हाना अंधार खूप दाटला होता. बाहेर पावसाची रिपरिपही सुरू झाली होती. पाच दहा मिनिटातच पावसाने रौद्ररूप धारण केल्यासारखे वाटु लागले. विजांच्या कडकडाटात ढगांच्या गर्जनांचा आवाज मिसळून जात होता. एकून सगळे वातावरण भयानक झाले होते. वातावरण असे अचानक बदलले होते. काही वेळापूर्वी सौम्य असणारा परिसर आता एकदम भितीदायक झाला होता. बाहेरून पावसाचा रपरप आवाज खोलीत स्पष्टपणे शिरत होता. त्या आवाजाने एक भेसुरता मनाला वाटत होती.

तो सोफ्यावर पाय पसरून आरामात बसला होता. मी किचनरूम मधून त्याचा तो सोफ्यावर पाठमोरा बसलेला देह न्याहळत होतो. त्याचा तो देखना देह पाहून पुन्हा एकदा माझ्या मनाला हेवा वाटून गेला. त्याच्या देहावरून नजर मी माझ्या देहावर आणली. त्याच्या देहासमोर माझा देह एकदम नगण्य आणि शूद्र भासला मला. त्याची उंची काय?आणि माझी काय?
त्याची उंची एकदम सहा फुटाच्या आसपास आणि माझी सवा पाचच्या अंतरात. एकदम बुटकी आणि खूजी. त्याचा चेहरा नितळ आणि सतेज. एकदम  पाहणार्‍याच्या मनात प्रेमाची लालसा उत्पन्न करणारा. आणि माझा  एकदम निस्तेज. काहीसा बेढब. गाल फुगलेले. त्याच्या जोडीला थोडे मोठे आणि बसके नाक. कोणाला कधीही आकर्षण न वाटलेला माझा चेहरा. त्याची एकूण सगळी शरीरयष्टी सुडौल आणि बांधेसूद, आणि माझी एकदम ओबडधोबड. कुठलाच अवयव योग्य रीतीने शरीरावर बसलेला नाही.
एकाच निर्मात्याने दोन्हीही शरीरे बनविली. दोन्हीही शरीराच्या मूर्त्या घडविल्या. पण त्याची मूर्ती घडविताना त्याने आपले सगळे कौशल्य वापरले. आणि एक मूर्तिमंत, आदर्श देह घडविला. आणि दुसर्‍या बाजूला माझी मूर्ती कशीतरी अल्पावधीत ओबडधोबड बनविली. जणू अकुशल कामगाराने माझ्यावर टाकीचे घाव दिले. आणि असा ओबडधोबड देह बनविला.
   हळूहळू माझ्या मनात नकारार्थी विचार असेच घुमू लागले. त्याचा हेवा वाटू लागला. आता त्याच्या विषयीचा मत्सर शरीरभर भीनू लागला. आपणच का बेढब, ओबडधोबड म्हणून राहावे? इतरांनी देखणेपणाने का मिरवावे. माझा क्रोध उफाळून वेगाने बाहेर आला. अंगातील रक्त तापले. मी आता बदललो. मी पूर्णपणे परावर्तित झालो. माझ्यातला मत्सरी रूप धारण केलेला तो दूसरा जीव जागा झाला. ज्याला माझ्या या ओबडधोबड देहाचा राग होता. आणि इतरांच्या देखणेपणाचा प्रचंड तिरस्कार होता.

     किचनच्या फरशी खालचा तो दीड फुट लांबीचा सुरा माझ्या हातात होता. माझे दहा पंधरा पाऊले सोफ्याकडे हळूच पडले. तो अजूनही तसाच सोफ्यावर पाठमोरा बसलेला होता. क्षण दोन क्षण झटापटीत गेले. शेवटी त्याचा गळा गोलाकार वर्णात चिरला गेला. अगदी शहरात घडलेल्या इतर पाच खूनांसारखा. एकदम तसाच तंतोतंत. त्याचे मुंडके केवळ कंठाच्या हाडावरच आधारलेले राहिले. शहरात पुन्हा सहावा खून झाला. पुन्हा एक देखणा तरुण मृत्यूमुखी पडला.

आता मी शांत शांत झालो. अगदी पूर्ववत. एकदम साधा सरळ. ओबडधोबड. पण पुन्हा कधीतरी अशांत होऊन येईल. अगदी सहा खूनांसारखा सातवा खून करायला.

समाप्त.
वैभव देशमुख

टीप- रत्नाकर मतकरी यांची एक कथा काहीशी याच शैलीची आहे,परंतु दोनही कथा पूर्णपणे भिन्नआहेत.

Group content visibility: 
Use group defaults

छान!
रत्नाकर मतकरींची कथा मी वाचलेली नाही. आता वाचायची गरजही नाही.

मी चिन्मयी ,
बॉडीचा काहीतरी बंदोबस्त करणार तो.
घरात नाही ठेवणार.
सातवा खून करायचा आहे.

खूप छान...

मतकरींची कथा मी वाचली आहे. कथेचा मुळ ढाचा सारखाच आहे त्यामुळे दोन्ही कथा सेम वाटतात. व सुरूवातीलाच कल्पना आली होती की कथानायकच खूनी असणार. पण तुम्ही केलेले पाठलागाचे वर्णन एकदम छान आहे.

तुमची शैली ओळखीची झाल्याने अगदी नॅरेटर शंकराच्या मंदिरात गेला तेव्हाच अंदाज आला.
पण लिहिता छानच. पुलेशु.

मतकरींची कथा मी नाही वाचलीय.
पण सुरूवातीलाच कल्पना आली होती की कथानायकच खूनी असणार. Happy

ओघवत लिहिलय तुम्ही, आवडलं

सामी,
मिसळपाव वर टाकलेली आहे.
बहुतेक तिथे वाचली असेल.

वैभव: रहस्यकथा, गूढ कथा स्पेशॅलिस्ट! उत्तम!
वैभव तुमची शैली छान आहे लिखाणाची! पुढे काय होणार याची उत्कंठा असते मनामध्ये!
पुलेशु

चंद्रमा,
खूप खूप आभार.
असेच कथेवर प्रेम करत रहा.

छान

कथासूत्र, मांडणी, घटनाक्रम कथन खूपच चांगले. उत्तम सादरीकरण.
"हत्येमागे एक काहीतरी विचारमालिका लपलेली असावी." च्या पुढील दोन तीन वाक्ये फारच Gore वर्णन वाटले. (अगदीच "पोलीस टाईम्स" स्टाईल). अशी वर्णने आवश्यक आहेत असे वाटत नाही. avoid केली तरी चालतील.

अतुल,
हो बरोबर बोललात.
मलाही ते जाणवले होते.
मी कथा संग्रहासाठी ही कथा eidt करणार आहे.
कथा लेखनाला नेमकीच सुरुवात केली होती, तेव्हा लिहिल्याली कथा आहे ही, त्यामुळे अशे कच्चे दुवे राहून जातात.
बाकी तुमचा अभिप्राय खूप प्रामाणिक असतो.
असाच लोभ असू द्या.

लगेचच समजले होते,की नॅरेटरच खुनी असणार, हजारो कथांमध्ये ही पद्धत वापरून झालि आहे, जरा वेगळा प्रयत्न करा, शुभेच्छा