आभाळमाया..!! - (उत्तरार्ध)

Submitted by रूपाली विशे - पाटील on 2 June, 2021 - 12:28

आभाळमाया..!! - (उत्तरार्ध)
____________________________________

https://www.maayboli.com/node/79164#new

दुसऱ्या दिवशी दीक्षाला घेऊन विशाल घरी आला. दोघांच्या येण्याने घर आनंदानं भरून गेलं.

मी कितीही लपवण्याचा प्रयत्न केला , तरी माझ्या चेहर्‍यावरचे भाव माझ्या लेकाने बरोबर ओळखले.

स्वयंपाक घरात येऊन शेवटी विचारलंच त्याने ...!

"काय झालं..आई..?? बरं नाही का तुला ..? चेहरा सांगतो बघ तुझा ..!"

आता काय सांगणार मी त्याला..??

"कुठे काय झालं आहे..?" असं म्हणत मी त्याची बोळवण केली.

हल्ली घराबाहेर पडताना मला भीती वाटू लागलेली.

अवचित ही बाई माझा पाठलाग करत घरापर्यंत आली तर ..??

आयुष्यभर खपून बांधलेल्या माझ्या मायेच्या उबदार घरकुलात, तिचं येणं वादळी तर ठरणारं नाही ना..??

माझं मन खंतावलं होतं. पण बरेच दिवस ती मला दिसली नाही की भेटली सुद्धा नाही.

__आणि अचानक एके दिवशी घरापासून जरा दूर असणाऱ्या पार्कमध्ये मी एकटीच फेरफटका मारायला गेले असताना, ही बया पुन्हा एकदा माझ्यासमोर अवतरली.

मी तिला पाहून तोंड फिरवायचा प्रयत्न केला.

ती माझ्यासमोर आली. माझ्या सोबतीने चालू लागली.

"का तुम्ही माझा सारखा पाठलाग करता..?" मी तुटकपणे म्हणाले.

मला तिचा खरंच आता वीट आलेला...!

"रागावू नका हो सुजाता ताई , माझं ऐका ना..एकदा भेटू द्या ना , मला माझ्या विशालला..त्याला समजावा ना..!! उपकार करा हो माझ्यावर तेवढे..तो कसा बोलतो, त्याचा आवाज कसा आहे... मन भरून ऐकू द्या ना मला एकदा ..!"

"हे पहा, त्याला खरंच तुमचा चेहरा आठवत नाहीये आणि ह्यांना जर हे समजलं ना की, मी तुम्हाला बाहेर भेटतेयं; तर खूप रागावतील ते माझ्यावर..!" मी तिला तोडण्याचा प्रयत्न केला.

"चेहरा आठवत नाही म्हणून काय झालं..? माझ्या पोटी जन्म घेतला आहे त्याने. रक्ताची, पोटातली माया काही असते की नाही, ती तर त्याला वाटणारचं ना...?"

"अहो, मी काही करू शकत नाही या बाबतीत. तुम्ही जा इथून. हे जर ह्यांना समजलं तर__"

माझं वाक्य अर्धवट तोडत ती संतापाने म्हणाली.

" ह्यांना समजलं तर काय होईल ..? त्यांनी माझी बाजू कधी समजून घेतलीचं नाही म्हणून तर माझ्या आयुष्याची ही फरफट झालीये ना ..?" तिच्या ह्या वाक्यावर मला काय बोलावे तेच कळेना.

ती चेकाळली.

" मोठं घराणं पाहून लग्न लावून दिलं माझं ह्याच्यांशी, पण 'बडा घर पोकळ वासा' असं घराणं आहे ह्यांचं... आबांचे नायकिणी बरोबरचे संबंध लपून राहिले नाहीत कुणापासून. मोठ्या अण्णांनी हे नसताना हात धरला माझा..!! सगळ्या जगाला ओरडून सांगेन मी आता, ह्यांचं घराणं स्त्री पिसासू आहे. स्त्रियांना छळणारं आहे..!"

"काय बोलता तुम्ही हे असं...?? जिभेला काही ताळ नी तंत्र..? 'उचलली जीभ नी लावली टाळ्याला'. जरा लाज वाटू द्या मनाची..!! असले लांछनास्पद आरोप ऐकून घेणार नाही मी आमच्या घराण्याबद्दल..'!!" मी सुद्धा संतापाने बेफाम झाले.

"काय खोटं बोलतेयं मी..? खरं आहे तेचं तर सांगते.. असंच घडलं होतं माझ्यासोबत. छळ मांडला सगळ्यांनी माझा. रक्ताचं, मायेचं एकच माणूस आहे माझं तेसुद्धा तोडलंत तुम्ही सगळ्यांनी माझ्यापासून ...!
माझ्याबद्दल नाही - नाही ते भरवून दिलं तुम्ही माझ्या लेकाच्या मनात.. काय पाप केलं होतं मी तुमचं सगळ्यांचं?? का छळता हो असं मला..?" ती संतापाने डोळे गरागरा फिरवू लागली.

मी तिला तसं करताना पाहून प्रचंड घाबरले.

" हे पहा, मला तुमचा भूतकाळ काहीही माहित नाही...!" माझ्या शरीरातलं त्राण कमी होऊ लागलं.

" मी तुमच्या मुलाला नाही तोडलं तुमच्यापासून, उलट पोरक्या झालेल्या तुमच्या लेकराला पदरातचं घेतलं मी..!"

तिला आता चक्कर येऊ लागलेली. मी तिला हाताला धरून बाकड्यावर बसवलं.

ती शांत झाली. मी तिला पाणी प्यायला दिलं.

जरा शांत झाल्यावर तिच्या डोळ्यांना अश्रूधारा लागल्या.

"मला माफ करा सुजाता ताई , पण हल्ली ना असंच होतंय मला..काय करावं तेचं सुचेना.. तुम्ही खूप केलंत हो माझ्या मुलाचं, पण आता आयुष्याच्या संध्याकाळी त्याला भेटावसं वाटतं खूप.. त्याच्याशी बोलावसं वाटतं , त्याचा आवाज ऐकावासा वाटतो...!"

क्षणभर ती थांबली.

"तुम्हांला असं वाटतं ना की, मी आजचं त्याला भेटू पाहतेयं... लहानपणापासून त्याला लांबून पाहतेयं मी.. शाळेत जाताना , तुम्ही खेळायला घेऊन जाताना... सतत पाळतीवर होती मी माझ्या लेकराच्या.. त्याच्यासमोर कित्येक वेळा गेले असेल ; पण त्याच्या डोळ्यातले अनोळखी भाव पाहून मागे फिरलेयं मी...... नाही हिंमत झाली मला पुढे जायची.. त्याला ओळख दाखवायची...पण आता नाही राहवत मला त्याला भेटल्याशिवाय...!"

मोठ्या अण्णांचं दारूचं व्यसन आणि नशेत भान हरवून वागणं सहन करावं लागलं मला. हे घरी नसताना हात धरला त्यांनी माझा. मी विरोध केला तर माझ्यावरचं डाव उलटवला. गलिच्छ आरोप लावले माझ्यावर ..!!

माझ्याबद्दल नाही- नाही ते सांगितलं ह्यांना...मनात विष भरवून दिलं माझ्या विरोधात...हे नोकरी निमित्ताने बाहेर राहत होते. माझी बाजू कमजोर पडली.

ह्यांनीही मला समजून घेतलं नाही. छळ मांडला माझा सगळ्यांनी... आणि शेवटी माझ्या मनाविरुद्ध काडीमोड घ्यायला लावला ह्यांच्यासोबत...!

ह्यांनीही घरातल्या सगळ्याचं ऐकलं. शेवटी घराबाहेर काढलं मला. माझ्या लेकराला माझ्यापासून तोडलं. सगळ्यांनी दावा साधला माझ्याशी...!"

काय करावं कुठे जावं.. अनेक प्रश्न माझ्या पुढ्यात होते. , फरपट झाली माझ्या आयुष्याची...!

माझ्यासाठी तिची ही बाजू नवीन होती. नाण्याला दुसरी बाजू ही असतेचं.. ती बाजू आज मला तिच्याकडून समजली. मी हतबुद्ध झाले.

मी तिला रिक्षात बसवून दिलं. मला तिच्याबद्दल काळजी वाटू लागली.

त्या दिवशीही पुन्हा माझं डोकं भयंकर ठणकू लागलं. घरी आले आणि सरळ बिछान्यावर आडवी झाले. तेवढ्यात विशालचा फोन आला. माझा आवाज ऐकून तो घाबरला. घाई-घाईतच घरी आला मला भेटायला...!

मला पलंगावर झोपलेलं पाहून अगदी घाबरून गेला. डॉक्टरकडे चल म्हणून माझ्या पाठी लागला.

पण मी त्याला माझ्या जवळ शांत बसवलं. त्याला विचारलं.

" विशाल , तुला तुझ्या आईचा चेहरा आठवतो का रे..??"
तो क्षणभर शांत बसला.

"तूच माझी आई आहेस ना..? माझी दुसरी कुणीही आई नाहीये आणि मला दुसरा कुणाचाही चेहरा आठवत नाही...!" तो कावराबावरा झाला.

"तुझी सख्खी आई मला भेटली होती. तुझी भेट घ्यायची आहे असं सांगत होती. एकदा भेट तिला..!"

" मला नाही कोणाला भेटायचं.. तूच माझी सख्खी आई आहेस ..!" माझ्या लेकराच्या डोळ्यात पाणी तरळलं.

तो काहीच न बोलता शांत बसून राहिला. मला औषध देत घरी जायला निघाला.

मी शांतपणे बसून राहिले. मला लहानपणीचा विशाल आठवू लागला.

कावऱ्या-बावऱ्या चेहऱ्याने रडकुंडीला आलेला लहानगा विशाल... मी प्रेमाने दोन्ही हात पुढे करताच माझ्या मिठीत येण्यासाठी झेपावणारा विशाल, माझ्या मिठीत मायेची ऊब शोधणारा विशाल... त्यांची असंख्य रुपं माझ्या डोळ्यासमोर तरळू लागली.

थोड्या वेळासाठी माझा डोळा लागला असेलच अन् तेवढ्यात फोनची रिंग वाजली. दीक्षाचा फोन होता. तिचा फोनवरचा घाबरलेला आवाज ऐकून माझ्या काळजाचा ठोका चुकला.

मोटरसायकल वरून घरी जाताना विशालला अपघात झाला होता. मोटारसायकल घसरून विशाल रस्त्यावर पडला. या अपघातातून तो बालंबाल वाचला, पण अंगाला मुका मार लागलेला...!

मला काही सुचेना , काय करावं ते.???..जीव तडफडू लागला माझा. मलाच माझ्या थोबाडीत फडाफडा मारून घ्याव्यात असं वाटू लागलं.

मी जर हे असं काही त्याला सांगितलं नसतं, तर असं काही घडलं नसतं. त्याच्या जवळ हा अप्रिय विषय मी काढायला नको होता. मला माझा प्रचंड राग येऊ लागलेला. सगळा दोष मी माझ्या माथ्यावर घेऊ लागले.

का ही पीडा माझ्या लेकाच्या मागे लागली आहे??

तिचं हे असं आमच्या आयुष्यात वादळासारखं येणं मला भयंकर मनस्ताप देणारं ठरू लागलं.

माझ्या मनातल्या भावना मी कुणासमोर व्यक्त ही करू शकत नव्हते. तिचं माझ्या आयुष्यात अशाप्रकारे येणं म्हणजे अवघड जागेवरचं दुखणं बनलं होतं.

कुणाला सांगताही येत नाही आणि कुणाला दाखवता सुद्धा येत नाही...!!

पुन्हा जर ती डोळ्यासमोर आली तर तिला पूर्णपणे झिडकारून टाकायचं असं मी ठरवलं.

बरेच दिवस गेले, पण तिचा कुठेही मागमूस नव्हता. नंतर कधीही माझ्या डोळ्यासमोर ती आलीच नाही. मला वाटलं, चला, म्हणजे माझ्या पाठची ब्याद टळली एकदाची...!!

एके दिवशी मार्गशीष मासातल्या एका गुरुवारी मी महालक्ष्मी मातेच्या मंदिरात गेले होते.. महालक्ष्मी मातेची ओटी भरण्यासाठी..!

देवीचे दर्शन घेऊन निघतच होते, तर मंदिरा बाजूच्या पिंपळाच्या पारावर ती बसलेली.

मी तिला पाहून न पाहिल्यासारखं केलं, पण तिने मला माझ्या नावाने आवाज दिलाचं...!

शेवटी न राहवून मला तिच्या जवळ जाणं भाग पडलं. मला मुळी असं वागताच येत नाही.. एखाद्याला तोडून तोकडं करणं जमतच नाही मला..!!

ती शरीराने जरा खचलेली दिसली. तिला पाहून मला तिची दया आली. ती शांतपणे, भक्तिभावाने मंदिराच्या आवारात बसलेली. आज ती शांत वाटत होती.

माझ्या छातीत जरा धाकधूक वाढली, कारण हिने जर पुन्हा इथे नको तो विषय काढला , तर काय उत्तर देणार मी....?

मंदिर म्हटलं म्हणजे ओळखीचं कोणी तरी भेटेलचं, मग हिची काय ओळख करून देणार आपण भेटणार्‍या परिचिताशी..? माझ्या डोक्यात नुसते प्रश्न फिरत होते.

"महालक्ष्मी मातेची ओटी भरायला आले होते. देवीकडे एकच मागणं मागितलं.. तुमचं सगळ्यांचं भलं होऊ दे.. तिचा आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी असू दे..!"

मी तिला काहीही न विचारता सुद्धा तिने मला हे सांगितलं.

तिच्या ह्या बोलण्यावर मात्र मी दिलखुलास हसले.

मग तिला मी मागे विशालचा अपघात झाला होता ते सांगितलं. घाबरुन गेली बिच्चारी..!!

ती पळतच पुन्हा एकदा मंदिरात गेली.

मी तिच्याकडे पाहतच राहीले.

"महालक्ष्मी मातेला नवस बोलून आले.. माझ्या विशालला काहीही होऊ देऊ नकोस... त्याच्या आयुष्यात नेहमीच सुख आणि आनंद भरभरून दे..!" डोळे पुसत बाहेर येत ती मला म्हणाली.

आज तिने कुठलाही मनस्ताप देणारा विषय माझ्याजवळ काढला नाही. फक्त तिचा पत्ता आणि फोन नंबर देत,
मला म्हणाली, एकदा मला भेटायला या, जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा..!!

मी होकारार्थी मान हलवली.

"नक्कीच येईन ..!" असं म्हणत मी तिचा निरोप घेतला.

काही दिवसांचा अवधी गेला असावा.

__ आणि एके सकाळी दीक्षाचा फोन आला. फोन वरचा तिचा आवाज खूप आनंदी होता.

"आई, तुम्ही आता आजी होणार आहात ..!" तिने अगदी एका दमात मला आनंदाची बातमी देऊन टाकली.

ही गोड बातमी ऐकून मला इतका आनंद झाला सांगू तुम्हांला..??

देवापुढे जाऊन मी पहिल्यांदा साखर ठेवली.

मला चटकन ती आठवली. मंदिरात जाऊन देवापुढे आपल्या लेकाच्या जीवनात आनंद भरभरून मागणारी.. विशालची सख्खी आई...!

मला ही आनंदाची बातमी तिला द्यावीशी वाटली, पण म्हटलं जाऊ दे.. एकदा दीक्षाचे बाळंतपण व्यवस्थित पार पडू दे... मग मी स्वतः तिच्या घरी जाऊन तिला सांगेन. आम्ही दोघीही आजी बनल्याचा आनंद तिच्यासोबत वाटून घेईन..!!

गोड बातमीने आमच्या घरातलं वातावरण खूप आनंदी बनलं. मी दीक्षाचे डोहाळे पुरवण्यात मग्न झाले.
यथावकाश दीक्षाचं बाळंतपण व्यवस्थित पार पडलं. गोंडस नात आमच्या पदरी आली. कोण आनंद झाला म्हणून सांगू तुम्हांला..??

आपली वंशवेल पुढे वाढत जाताना, इवलीशी परी राणी पाहून आम्ही दोघेही विलक्षण आनंदाने भारावलो. आजी- आजोबा झाल्याचा आनंद शब्दांत व्यक्त करता येत नव्हता.

इवलीशी नात पाहून मला चटकन 'ती' आठवली. आमच्या नातीने तिच्या सख्ख्या आजीचा तोंडवळा उचलला होता. तिला ही गोड बातमी कळवून, तिला ह्या आनंदात सहभागी करून घ्यायला हवं होतं. आमच्या एवढीच ती सुद्धा हक्कदार होती त्या आनंदाची.. कदाचित माझ्यापेक्षा जास्तच हक्क होता तिचा..!! तिला कळवायला हवं होतं.

मिठाई घेऊन मी तिला न कळवता भेटायला निघाले. मी स्टेशनवरून गाडी पकडली. तीन स्टेशन सोडून पुढे तिचा पत्ता असलेलं गाव होतं. रिक्षा स्टॅन्डवरून मी रिक्षा पकडली. रिक्षा रस्त्याला लागली. समुद्राच्या कडेने असणारं ते गाव शांत होतं. गार हवेने तिथलं वातावरण आल्हाददायक जाणवू लागलेलं. तिने दिलेल्या पत्त्यावर रिक्शावाल्याने मला आणून सोडलं.

ती घराच्या अंगणातच होती, झाडांना पाणी घालत. मला पाहताच तिला आश्चर्य वाटलं असावं, हे तिच्या चेहऱ्यावरून मी ताडलं.

माझं तिच्याकडे येणं कदाचित तिला अनपेक्षित असावं, पण मला पाहताच आनंदाने; हसऱ्या चेहऱ्याने ती मला सामोरी आली.

" बरं झालं सुजाता ताई तुम्ही आलात.. नाहीतर मी येणारचं होते एकदा तुम्हांला भेटायला..!" अतिशय आनंदाने ती म्हणाली.

मला घेऊन ती घरात आली.

घर नुसतं नावाला म्हणावं ... जुन्या काळातलं लाकडी बांधकाम असलेली एक लहानशी हवेली होती ती. घराच्या आजूबाजूचा परिसर जवळ-जवळ एक एकरात पसरलेला असावा. नारळ, चिकू, आंब्यांची झाडे दिमाखात घरासमोर उभी होती.

अंगणातल्या कुंपणावर सुगंधी फुलांच्या वेली मोहरलेल्या होत्या. तिथलं वातावरण मनाला विलक्षण प्रफुल्लित करणारं होतं.

आज बऱ्याच महिन्यांनी तिची माझी भेट घडली होती. तिला पाहताच जाणवलं की, शरीराने ती खंगत चाललीयं..

"या सुजाता ताई ... बसा इथे!" तिच्या स्वरात मंजुळ माधुर्य नसलं, तरी तिचा स्वर आर्जवी, प्रेमळ आग्रहाने ओथंबलेला होता.

मी माझ्या येण्याचं प्रयोजन तिला सांगितलं. तुम्ही आजी झालात, असं तिला सांगितल्या बरोबर तिचे निस्तेज भासणारे डोळे विलक्षण तेजाने उजळले.

" चेहरा अगदी तुमचाचं घेतलायं बरं तुमच्या नातीने..!" माझ्या ह्या वाक्यावर एक-दोन क्षण ती आनंदाने बेभान झाली. तिला काय बोलावं तेच सुचेना. माझे दोन्ही हात आपल्या हातात घेत, तिने तिच्या कपाळाला लावले. तिच्या उष्ण अश्रूंचे दोन थेंब माझ्या हातावर ओघळले.

मी तिला मिठाई दिली. तिने मिठाई देव्हाऱ्यात देवापुढे ठेवली. देवापुढे तिने निरांजन लावले.

मी घराचं निरिक्षण करत होते. आतून घर प्रशस्त होतं. लांबलचक मोठा हॉल. हॉल मधूनच वरच्या माळ्यावर जायला लाकडी जिना होता. जुन्या धाटणीचे ते घर एखाद्या पारशी कुटुंबाचं असावं, असं मला पाहताक्षणी जाणवलं होतं. तसा तो भाग पारशी लोकांच्या वस्तीचा ओळखला जात होता, हे मला माहित होतं.

समोरच्या भिंतीवर माझी नजर गेली. पारशी वेशभूषेत असलेल्या एका दांपत्याचा फोटो तिथे लावलेला होता. म्हणजे माझा अंदाज खरा ठरला तर..!! पण मग हिचा त्यांच्याशी काय संबंध..??

" हो, हे पारशी व्यक्तींचेचं घर आहे..!" आतून सरबताचे ग्लास घेऊन ती बाहेर आली.

मनकवडी आहे का बरं ही..?? हिला कसं समजलं की, मी काय विचार करते ते....??

" फोटोमधले दोघं म्हणजे रोहिंटन तारापोरवाला आणि त्यांच्या पत्नी आहेत. त्यांचं घर आहे हे .. आहे म्हणजे होतं..!" ती माझ्या हातात सरबताचे ग्लास देत म्हणाली.

"ज्याचं कुणी नसतं , त्याचा देव असतो असं म्हणतात. माझ्यासाठी हे दोघे देवा समान होते. घर सोडल्यावर ह्यांनीच आधार दिला मला. आई-बापाच्या मायेची फुंकर घातली त्यांनी माझ्या वेदनेवर. नि:संतान होते दोघे... मी ही त्यांना मुलीसारखं प्रेम देण्याचा प्रयत्न केला, शेवटपर्यंत त्यांची सेवा केली; पण माझी सेवा त्यांनी बिल्कूल फुकटात घेतली नाही. भली माणसं होती दोघे पती-पत्नी..!! त्यांच्या पश्चात घर आणि समोरची जागा माझ्या नावे करून गेले, मी न मागता, अपेक्षा न धरता सुद्धा ..! काही माणसं खरंच मुलुखावेगळी असतात. त्यांना तसं देवाने बनवलेलं असतं..!" तिच्या बोलण्यातून त्यांच्याविषयी अतिशय आदर आणि डोळ्यांतून कृतज्ञतेचे भाव झळकत होते.

माझी नजर घरात भिरभिरत होती.

_आणि अचानक टेबलाजवळ ठेवलेल्या एका लहान तसबिरीतल्या फोटोवर माझी नजर स्थिरावली. माझी नजर त्या फोटोवर बांधली गेली.

घशात गेलेल्या सरबताचा जबरदस्त ठसका मला लागला.
गोड सरबत तोंडात जाऊन सुद्धा माझं तोंड अक्षरशः कडू- कडू झालं.

लहानग्या विशालला खुर्चीत मांडीवर घेऊन बसलेली ती..
__ आणि तिच्या खांद्यावर हात ठेवून उभे असलेले माझे हे.. तिचे पूर्वाश्रमीचे पती..!!

म्हणजे अजूनही आपल्या हृदयात संसाराच्या हळव्या भावना तोलून धरून आहे तर ही..?? का...?? मला प्रश्न पडले.

विशाल हिच्या पोटचा मुलगा आहे , हे मी समजू शकते; पण ह्यांच्यावर अजून हिची श्रद्धा असावी, हे मला सहन झालं नाही. का तिने ह्यांच्या सोबतचा फोटो अजून जपून ठेवावा..??

जरी हे तिचे पूर्वाश्रमीचे पती असले, तरी तो तिचा भूतकाळ होता. पण आता हे माझा वर्तमान आणि भविष्यकाळ होते...कसं सहन होणार मला ते..??

माझ्या मनात तिच्याबद्दल वाटणारी जी आपुलकी, तिच्या भरकटलेल्या आयुष्याबद्दल वाटणारी कणव जागी झाली होती; ती क्षणात अंतर्धान पावू लागली. तिच्याबद्दलचं माझं मत विरोधी बनू लागलं.

"सुजाता ताई, माफ करा मला. तुम्हांला राग आला असेल ना हा फोटो पाहून..?? मी समजू शकते की, हा फोटो पाहून तुम्हाला काय वाटलं असेल..!" माझ्या चेहऱ्याचे निरीक्षण करत ती म्हणाली.

ती खरंच मनकवडी असावी हा माझा कयास आता खरा ठरू लागला. माझ्या मनातलं कसं काय जाणते ही..?? ... माझा चेहरा पाहून ..???

खरंच, आपला चेहरा म्हणजे आरसाच आहे.... आपल्या मनातल्या विचारांचं प्रतिबिंब परावर्तित करणारा..!!!

"नाही असं काही नाही..!" मी जराशी खजील झाले.

" हा फोटो म्हणजे माझ्या जगण्याचा निखळ आनंद आहे.
भूतकाळातल्या सुखद गतस्मृतींना उजाळा देणारा आणि त्या स्मृतींसोबत जगण्याची आशा दाखवणारा. तुम्ही मनात माझ्याबद्दल जराही वाकडा विचार करू नका. माझ्या विशालचे जन्मदाते म्हणून मला त्यांच्याविषयी आदर आहे. माझ्या लेकाचे पिता म्हणून तो फोटो मी तसाच ठेवला आहे. बस एवढंच...!" ती शांतपणे म्हणाली.

"खूप वाटतं हो लेकाचा संसार पहावा, नातीला मन भरुन पहावं.. तिच्या बाळलीला पहाव्यात !" ती आपली बोलतंच होती.

मी गप्पच होते. मी तरी काय बोलणार ह्या बाबतीत...?? काय करू शकणार होते मी....?? माझ्या हाती काहीच नव्हतं.

" तुम्ही काळजी नका करू, मी विशालला समजावेन. ऐकेल तो माझं. एकदा घेऊन येईल त्याला इथे त्याच्या बायको मुलीसह तुम्हांला भेटायला!" मी तिला दिलासा देण्याचा प्रयत्न करू लागले.

"नको... नको.. नका आणू त्याला इथे.. माझं नाव ऐकून सुद्धा मागे त्याच्या बाबतीत असं घडलं. माझ्या नशिबात नाही माझ्या पोटच्या पोराचा आनंद, त्याचा संसार पाहण्याचं सुख.. मी लांबूनच आशिर्वाद देईन त्याला..!" तिचं ओशाळवाणं हसू पाहून माझ्या पोटात तुटलं.

"तुम्ही बसा हं एक मिनिट , मी आलेचं..!" असं म्हणत ती आत गेली.

आतून एक पिशवी घेऊन येत , माझ्या बाजूला बसत, हातातल्या पिशवीतले कागद माझ्या समोर ठेवत म्हणाली,

"सुजाता ताई , हे कागद आहेत.. ह्या घराचे आणि समोरच्या जमिनीचे; तेवढे विशालच्या हाती सुपूर्त करा आणि त्याला म्हणावं; हे तुझ्या आईने तुला भेट दिलेत.!"

" अहो, काय म्हणताय तुम्ही..?? विशाल नाही घेणार हे कागद. तसंही त्याला आणि मला सुद्धा पटणारं नाही हे घेणं...!" मला तिच्या बोलण्याचा विलक्षण धक्का बसला.

ती थोडावेळ धीर- गंभीर झाली.

"विशाल नाही घेणार..?? का..?? मी आई आहे ना त्याची..?? माझं जे काही आहे ते त्याचचं तर आहे ना..?? तुम्ही समजावा ना त्याला. तुमचं ऐकेल तो ..!" तिचा स्वर व्याकूळ झालेला.

"पण मी काय समजावणार त्याला..?" माझाही नाईलाज होता.

थोडा वेळ ती शांत बसली.

" बरं , ठीक आहे; विशाल नाही घेणार तर माझ्या नातीच्या नावाने करते हे सगळं. तेवढा तरी अधिकार द्या हो मला.... तेवढा तरी हक्क नाकारू नका माझा..!" तिच्या शब्दांतली व्याकूळता मला समजत होती.

ती माझ्या हातात ते कागद जबरदस्तीने खूपसू लागली.

मला काय करावं ते सुचेना.

" मी प्रयत्न करते, पण प्रयत्न यशस्वी होतीलचं ह्याची काही खात्री नाही..!" मला काय म्हणावं तेच सुचेना.

" पुढच्या आठवड्यात वाराणसीला जातेयं मी ..!" अचानक ती म्हणाली.

माझा चेहरा प्रश्नार्थक झाला.

"आता पुढचं आयुष्य गंगेच्या घाटावर घालवायचं ठरवलं आहे मी. तिथे एका मठात राहणार आहे. सगळी सोय झालीयं माझी.. तसं पण हे शरीर साथ देत नाही आताशी... व्याधींनी पोखरलंय सगळं आतून... कधी साथ सोडेल त्याचा भरवसा नाही...!!" ती उदास हसली.

"हे काय असं अपशकुनी बोलता हो... असं नका बोलू ..!" माझ्या घशात हुंदका दाटून आला.

" आहेच मी अपशकुनी..! जन्माला येताच आई - बापाला खाल्लं. त्यांच्या मायेला पारखी झाले. तरुणपणी पती आणि लेकाची माया नशिबी आली नाही माझ्या.... माझ्यामुळे अजून विघ्न नको यायला माझ्या लेकाच्या आणि तुमच्या सुखी आयुष्यात..!"

तिने लाख प्रयत्न केले , आपल्या डोळ्यातले अश्रू लपवायचे; पण माझ्या नजरेतून ते अश्रू काही सुटले नाहीत.

" अरे देवा, बोलता-बोलता विसरूनच गेले की मी ...एक मिनिट थांबा हं...!" असं म्हणत ती पुन्हा आत गेली.

हातात एक लहानशी डबी घेऊन येत, माझ्या हातात त्या डबीतले चांदीचे जुन्या घाटणीचे पैंजण काढून देत म्हणाली,

"हे पैंजण आहेत, माझ्या आईने बारश्याच्या दिवशी माझ्या पायात घातले होते. वंश परंपरेने तिला तिच्या आईने दिलेले..! हे पैंजण बारश्याच्या दिवशी आठवणीने तेवढे माझ्या नातीच्या पायात घाला हं...! तेवढं कराल ना तुम्ही माझ्यासाठी..???"....

माझे डोळे अश्रूंनी भरून आले.

" हे काय विचारणं झालं का..?? घालेन ना मी तुमच्या लाडक्या नातीच्या पायात हे पैंजण.. तिच्या आजीने एवढ्या प्रेमाने दिलेत ना..!" मी असं म्हणताच तिच्या चेहऱ्यावर विलक्षण समाधानाचे भाव तरळू लागले.

" हा पत्ता घेऊन ठेवा माझा तिथला आणि मला कळवा बरं इथली सगळी ख्याली-खुशाली. मी वाट पाहीन बरं..!"

" हो नक्की कळवेन ना...!" माझा आवाज कापरा झालेला. मला आता कुठल्याही क्षणी रडू कोसळेल असं वाटू लागलेलं.

थोड्या वेळाने हातात अजून एक पिशवी घेऊन, हातात हळदी कुंकवाचा करंडा घेऊन ती आली. तिने अगदी भक्तिभावाने माझी साडी - नारळाने ओटी भरली. केसात माळायला बागेतल्या वेली गुलाबांची फुले दिली.

__ आणि माझ्याही नकळत तिला मी हळदी कुंकू लावलं.. ती नको नको म्हणत असताना सुद्धा...!

" अखंड सौभाग्यवती भव: ...!" असं म्हणत तिने मला तोंड भरून आशीर्वाद दिला.

तुम्ही विचार कराल की, ही बाई पूर्वाश्रमीच्या सवतीला भेटायला जाते, तिला हळदी कुंकू लावते म्हणजे किती बावळट स्त्री आहे ; पण खरं सांगू का ..?? मला ना इतरांसारखं वागता येत नाही... तोडून तोकडं करणं जमतंच नाही मुळी.. माझ्या रक्तातच नाही ते!

"निघते मी आता.. काळजी घ्या आपली..!" जड अंत:करणाने मी तिचा निरोप घेऊ लागले.

मी घराच्या पायऱ्या उतरू लागले.

तशी मागून हाक आली.

" सुजाता ताई..!"

माझी पावलं क्षणभर जागेवरच थबकली.

"एक शेवटचं सांगायचं होतं..?"

" सांगा ना ..!"

" माझ्या लेकराला सांगा की , तुझी आई कधीच चुकीची वागली नव्हती. जे घडलं त्याला तिचा काही इलाज नव्हता. सगळा परिस्थितीचा दोष आहे. तू जरी तिला आपलं मानलं नाही तरी , तिच्या पोटातली तुझ्याविषयीची आभाळमाया कायमच राहील. त्या आभाळमायेला किंचितही धक्का लागणार नाही. माझे आशिर्वाद कायमचं तुझ्या पाठीशी असतील .. मी असले तरीही आणि नसले तरीही..!" तिच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागले.

मग मलाही माझं रडू आवरेना. मी तिचे हात हातात घेत तिला स्पर्शाच्या भाषेतून; तिच्या दुःखावर , वेदनेवर उतारा देण्याचा प्रयत्न करु लागली. पण फक्त प्रयत्नचं...! प्रयत्नां शिवाय मी तरी काय करू शकणार होते ..??

" माझ्यासाठी तुमच्या डोळ्यातून अश्रू आले हे खूप आहेत माझ्यासाठी. सुजाता ताई, नका रडू तुम्ही... !" उलट तिनेच मला सावरलं.

हृदयात भलं मोठं ओझं घेऊन मी तिच्या घरून निघाले.
मनात ठरवत होते की, विशाल समजवायला हवं की, भेटून ये एकदा आपल्या आईला. तिच्यातल्या 'आईची' तगमग, तडफड नाही पाहवत मला... राग, तिरस्कार, द्वेष विसरून भेट घे तिची एकदा.... मनभरून ' याचि देही... याचि डोळा ' पाहू दे तिला आपल्या लेकराला, आपल्या सुनेला, आपल्या नातीला...!!

तुझ्या नजरेस न पडणाऱ्या, पण मला जाणवणाऱ्या तिच्या क्षितिजा पलीकडल्या आभाळमायेला ठोकरून देऊ नकोस. एकदा स्वीकार कर तिच्या आभाळमायेचा.. जन्मांतराची तृषा क्षणार्धात भागेल तिची.... तृप्त होईल ती माऊली....!!

नक्कीचं ऐकेल तो माझं.. गुणी आहे माझं लेकरू...!

कुणी काहीही म्हणू दे, ह्यांनी जरी मला विरोध केला ना तरीही, कुणाला पटो ना पटो ... पण मला जे पटतेयं, ते मी करणारचं; कारण मला असं तोडून तोकडं करणं जमतचं नाही मुळी...!!

तुम्हांला तरी पटतंयं ना माझं म्हणणं..??

___________________ XXX__________________

समाप्त..!

धन्यवाद...!

©रूपाली विशे - पाटील
rupalivishepatil@gmail.com
__________________________________________

( टिप - सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेचा वास्तविक जीवनाशी कुणाचा काहीही संबंध नाही. कथेत साध्यर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. सदर कथेद्वारे कुणाच्याही भावना दुखाविणे हा कथा लेखिकेचा उद्देश नाही..).

_________________XXX_________________

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

दोन्ही भाग वाचले. वाचताना 'पुढे‌ काय' अशी उत्सुकता जाणवत राहिली, कथा जराही कंटाळवाणी झाली नाही. शेवट सकारात्मक केल्याने आनंद वाटला.

सुंदर कथा...मनाला स्पर्शून गेली...तुझ्या कथेची वाट पाहत असते मी...छानच लिहतेस...पुढील लेखनास तुला शुभेच्छा..!

वीरूजी धन्यवाद, कथा जरा मोठी असली की, मनात धाकधूक असते की, कथा कंटाळवाणी, निरस तर होत नाहीये ना..?? पण तुमचा प्रतिसाद वाचून शंका मिटली. छान वाटलं तुमच्या नेहमीच्या प्रतिसादाने..!

दिपक - धन्यवाद तुम्हांला कथा आवडल्याबद्दल...!

राणी - धन्यवाद, तुझ्या नेहमीच्या सुंदर शुभेच्छांसाठी...!

रश्मीजी - धन्यवाद.. नेहमी प्रोत्साहन देता तुम्ही..!

मृणाली - धन्यवाद आणि तुझे विशेष कौतुक ..
नेहमीचं सगळ्यांना प्रोत्साहन देतेस..!!

फारच भावनाप्रधान लेखन
हृदयाला स्पर्श करणारं .
'तिचं ' पात्र डोळ्यात पाणी उभं करणारं .

बिपिनजी - तुमच्या सारख्या संवेदनशील लेखकाच्या नजरेतून मिळालेल्या प्रतिसादासाठी खूप आभार..!!

प्रविणजी - धन्यवाद, छान वाटलं तुमचा प्रतिसाद वाचून..!!

पुत्र हा कुपुत्र होऊ शकतो पण माता ही कधीच कुमाता नाही होऊ शकत! स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंतकाळाची माता आहे.कधी-कधी जरी ती परखड भासत असली तरी ती फणसाच्या गराप्रमाणे गोड आहे.
छान हृदयस्पर्शी होता उत्तरार्ध!
पुलेशु

धन्यवाद चंद्रमा..!!
कथेच्या दोन्ही भागांवर अतिशय सुंदर प्रतिक्रिया दिलीतं तुम्ही..!

दोन्ही भाग खरंच खूप छान झाले आहेत, हृदयाला स्पर्श करणारी आणि सरळ भावनेला हात घालणारी कथा होती,
आपल्या पुढील लेखनाच्या प्रतिक्षेत आहे.