"समानांतर!"

Submitted by चंद्रमा on 29 May, 2021 - 05:48

...... 'अर्हंत' 'अवंतिका' चा हात हातात घेऊन थिरकत होता. 'तुम मिले दिल खिले और जीने को क्या चाहिये' या रोमँटिक गाण्यावर! ते दोघेही टेरेस वर होते.'अर्हंत' टेरेस फ्लॅटला राहायचा तेराव्या माळ्यावर. 13 बी नंबरच्या फ्लॅटमध्ये! अमावस्येची ती रात्र होती. त्यामुळे आकाशात सर्वत्र काळोख होता.'शशी' ढगांच्या आड कुठेतरी गडप झाला होता. मंद वारा वाहत होता. त्या मंद वाऱ्याची गार झुळूक दोघांच्याही मनाला स्पर्शून जात होती.जणू सौहार्दाचे नाते जडले होते त्या दोन जीवांमध्ये! आज अर्हंत चा वाढदिवस होता. रविवार 13 एप्रिल. अर्हंतने अवंतिका चा हात हातात घेतला आणि म्हणाला.
"अशी एक रात्र हवी,
जीला पहाट जोडलेली नाही!
अशक्यातली गोष्ट आहे;
पण आशा मी सोडलेली नाही!!"
....आणि अचानक वातावरण पूर्णतः बदलले. सोसाट्याचा वारा वाहायला लागला. आकाशात 'सौदामिनी' कडाडली. काळेकुट्ट ढग जमायला लागले. जवळजवळ रात्रीचे बारा वाजले होते. 'अवंतिका' भीतीने अर्हंतच्या बाहुपाशात विसावली. एक वादळ निर्माण झालं होतं सभोवताली आणि क्षणातच दोघेही मूर्छित होऊन पडले.

........सकाळचे आठ वाजले होते. खिडकीतून तांबुस सोनेरी रंगाची किरणे अर्हंतच्या चेहऱ्यावर पडली आणि तो जागा झाला. त्याला रात्रीचे काही आठवत नव्हते. फक्त एकच आठवण त्याच्या डोक्यात होती की तो बेशुद्ध झाला होता. त्याचे डोके जड झाले होते. त्याला आपल्या फ्लॅटमधील वस्तू थोड्या बदललेल्या वाटत होत्या. ज्या नेहमीच्या बेडशीटवर तो झोपत होता. ती दुसऱ्या रंगाची होती. खिडकीचे पडदे पण वेगळ्या रंगाचे भासले आणि टीपॉयवर ठेवलेल्या वस्तू पण निराळ्या होत्या.अर्हंत
ला काही कळेनासे झाले.अरे असं का भासत आहे. त्याच्या डिजिटल घड्याळात आज तारीख 13 एप्रिल आणि दिवस रविवार दाखवत होता. अरे आज तर तारीख 14 असायला हवी. कदाचित घडयाळ्यामध्ये काही बिघाड निर्माण झाला असेल. दार उघडून त्याने न्युज पेपर घेतला तर त्यावरही तारीख 13 एप्रिलच होती मग त्याने मोबाईल बघितला तिथेही डेट 13 एप्रिल, संडे दाखवत होते. मग त्याने 'टेलिव्हिजन' ऑन केला तर तो आश्चर्यचकित झाला खरच आज तारीख 13च होती.
......अचानक त्याला 'अवंतिका' ची आठवण झाली. 'अवंतिका' माझ्यासोबत काल होती. ती कुठे दिसत नाही त्याने तिला आवाज दिला. मग टेरेसवर जाऊन बघितले तिथे ती नव्हती. मोबाईल घेतला आणि तिला कॉल करायला लागला तर तिचा नंबर सापडतच नव्हता हे काय होत आहे. अवंतिका चा नंबर गेला कुठे?अर्हंतला काही सुचेना! ऑफिसला जायची वेळ झाली.तो फटाफट फ्रेश झाला आणि कपाट उघडले. कपाटामध्ये त्याचे नेहमीचे कपडे दिसत नव्हते. तरीही त्यांने जे दिसेल ते घातले. भराभर आवरले आणि ऑफिसमध्ये पोहोचला तर त्याला सुरक्षारक्षकाने दारावरच अडवले. ,"आपण कोण? विजिटर आहात का? असा प्रश्न त्याने केला.अर्हंत म्हणाला, "विजिटर! अरे मी इथेच काम करतो मागील चार वर्षांपासून आणि तू कोण आहे? संतोष कुठे गेला?" "संतोष! कोण संतोष? कित्येक वर्षांपासून मीच सुरक्षारक्षक आहे आणि आज संडे आहे. ऑफिस बंद आहे. तुम्ही उद्या या! ज्याला कोणाला भेटायचं असेल त्याला!"

........अर्हंतला तर धक्काच बसला. अरे खरंच आज 'संडे' आहे. मग मी कसा आलो इथे आणि हे सगळे वातावरण अनोळखी का वाटत आहे मला! अशा विचारांच्या तंद्रीत तो घरी परतला त्याला काही सुचत नव्हते. नंतर त्याचा फोन खणाणला 'अनन्या' "हॅपी बर्थडे" आवाज ऐकुन तो दचकला कारण अनन्यापासून ब्रेकअप होऊन सहा महिने झाले होते आणि अचानक तिचा कॉल. थँक्यू अनन्या! "आपल्या ब्रेकअपनंतरसुद्धा तू माझा वाढदिवस लक्षात ठेवला","ब्रेकअप अरे कुणाचा? कधी झाला? आपला ब्रेकअप! काही काय चेष्टा करतो! तिच्या या विधानाने खरच अर्हंत बुचकळ्यात पडला.तिच्यासोबत तो थोडावेळ बोलला आणि नंतर फोन ठेवला. मग त्याने आपले फेसबुकचे अकाउंट ओपन केले. तिथे पण सर्व मित्रांनी त्याला विश केले होते ते पण आज!
.....नंतर त्याला 'अवंतिका' चा विचार आला पण तिच्या घरचा किंवा कुठल्याही मित्र मैत्रिणीचा कॉन्टॅक्ट त्याच्याकडे नव्हता. केवळ सहा महिन्यांची ओळख होती तिच्यासोबत!तो रात्रीची घटना खूप आठवण्याचा प्रयत्न करत होता पण त्याला काही आठवेना तशातच तो कधी झोपी गेला हे कळले सुद्धा नाही. दुसऱ्या दिवशी तो ऑफीसला आला तर सगळे एंप्लाॅयी त्याला नवीन दिसले आणि तो ज्या केबिनमध्ये बसत होता तिथे कोणीतरी दुसरेच बसले होते. त्याने लगेच ऑफिस एंप्लाॅयी ची लिस्ट चेक केली. त्याचे नाव होते पण तो दुसऱ्याच विंग मध्ये 'सेल्स डिपार्टमेंट' मध्ये अपाॅईंट होता.अरे मी तर 'रिसर्च अँड डेव्हलपमेंट' मध्ये काम करतो ना! तो मॅनेजरच्या केबिनमध्ये गेला तर मॅनेजरही वेगळाच होता.त्याने आपले नाव आणि एंप्लाॅयी आयडी त्यांना दिला पण त्यांनी सांगितले की तुम्ही इथे अपॉईंट नाही.मग मॅनेजरने त्याला घरी जाऊन रेस्ट करायला सांगितले.

‌......अर्हंतचे डोके आता गरगरायला लागले होते. एका रात्रीत एवढं कसं काय चेंज होऊ शकतं! त्याला खूप प्रश्न पडले. 'अवंतिका' कुठे गेली? माझा जॉब! मी दुसऱ्या डिपार्टमेंट मध्ये कसा आलो? फ्लॅट मधल्या वस्तू! आणि एक दिवस मागे कसा काय गेला? ह्या विचारांनी त्याच्या डोक्याचा पार भुगा झाला.तो मानसोपचार तज्ञाकडे आला आणि त्या दिवशीची सर्व हकीगत त्यांने डॉक्टरांना सांगितली. 'डॉक्टर' त्याला म्हणाले, "तुमच्या मेंदुवर स्ट्रेस आलेला आहे त्यामुळे तुम्ही काही गोष्टींची कल्पना करीत आहात. जसे तुमची कुणीतरी 'अवंतिका' नावाची गर्लफ्रेंड होती. तुम्ही 'आर अँड डी' मध्ये काम करीत होता आणि एक दिवस मागे गेलेला आहे. या सगळ्या तुमच्या कल्पना आहेत. मी तुम्हाला काही औषधे देतो. दोन दिवस रेस्ट करा नंतर तुमच्या मनातील संभ्रम दूर होईल."

.......पण अर्हंतला माहीत होते तो पूर्णपणे ठीक आहे पण तरीही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रेस्ट करण्यासाठी तो आपल्या गावी आला. आईला नमस्कार केला. "'आई' कशी आहे! आणि आता तुझे डोळे कसे आहेत. बरं वाटतं ना ऑपरेशन झाल्यानंतर!" आई म्हणाली, "माझे डोळे! माझे डोळे तर ठीक आहे आणि कधी झालं माझ ऑपरेशन? तुला कोणी सांगितलं? माझं ऑपरेशन झालं म्हणून! काही काय बोलतो!'अर्हंत' तर आता बोल्डच झाला. त्याला काही सुचेना तो गप्पच बसला. त्याला आता पूर्णपणे कळून चुकले होते की काहीतरी घोळ झाला आहे त्याच्या आयुष्यात! मग त्याने 'गुगल' सर्च केले. आपल्या सोबत घडणार्‍या घटनांशी काही मिळत्याजुळत्या घटना त्याला दिसून आल्या आणि त्याला आश्चर्याचा धक्का देणारी माहिती त्याच्या डोळ्यासमोर आली 'पॅरेलल युनिव्हर्स' 'समानांतर ब्रह्मांड' पण हे कसे शक्य आहे? हे असे होऊ शकते! ही गोष्ट तर फक्त कल्पनेतच शक्य आहे. मग त्याने या गोष्टीच्या मुळापर्यंत जाण्याचा निश्चय केला.

......अर्हंत कॉलेजमध्ये असताना एक फिजिक्सचे प्रोफेसर होते प्रोफेसर 'रॉबर्ट मुगाबे' ते 'खगोल वैज्ञानिक' पण होते.'अर्हंत' त्यांना येऊन भेटला. त्यांनी अर्हंतचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकून घेतले आणि नंतर त्याच्या सगळ्या गोष्टींचे अवलोकन करून निष्कर्षाअंती त्यांनी सांगितले की, "हो हे शक्य आहे. तू समानांतर ब्रह्मांडातून आलेल्या अर्हंतचे 'प्रतिरूप' आहे."काय?अर्हंत तर अवाकच झाला.
पण हे कसं होऊ शकतं? मग प्रोफेसरने बोर्डवर एक संख्या लिहिली 1 2 नंतर त्यांनी या संख्येचे किती पॅटर्न होऊ शकतात. अर्थातच 1 2,2 1 या दोन पॅटर्न नंतर ती संख्या पुन्हा रिपिट होते म्हणजेच 1 2, 2 1,1 2,2 1 आपण ज्या ब्रह्मांडात राहतो त्या प्रमाणेच दुसऱ्या ब्रह्मांडामध्ये पण आपल्यासारखेच हुबेहुब दिसणारे आपले प्रतिरूप तिथे जीवन जगत असते! सर्वकाही सारखंच असतं. सर्व वस्तू, माणसे, झाडे, प्राणी फक्त त्यांनी जे निर्णय घेतलेले असतात ते दोन पर्यायांमध्ये विलग होतात. एक बाजू एका ब्रह्मांडामध्ये घडत असते आणि दुसरी बाजू दुसऱ्या ब्रह्मांडामध्ये घडते. तुम्ही जितके जास्त पर्याय निवडाल तितके ब्रम्हांड जन्म घेत जातात.जेव्हा तू कंपनी जॉईन केली तेव्हा तुझ्याकडे दोन पर्याय होते 'आर अँड डी विभाग' आणि 'सेल्स विभाग'तू 'आर अँड डी' निवडलं आणि तुझ्या प्रतिरुपाने दुसऱ्या ब्रह्मांडात 'सेल्स' निवडले. हे सगळं घडलं त्या दिवशी झालेल्या खगोलीय घटनेमुळे! त्या दिवशी अमावस्या होती.सागरामध्ये ओहोटीची ती रात्र होती आणि तुझी जन्मतारीख 13 आहे म्हणजेच 4 नंबर! हा ब्रह्मांडाचा पूर्ण नंबर आहे. तो स्वतःला आपल्यामध्येच सामावून घेतो. त्या टेरेसवर 'टाईम स्लिप झोन' आहे. त्या झोनमध्ये तू आला आणि त्या वादळामध्ये एक 'वर्म होल' तयार झाले आणि त्यातून तू दुसऱ्या ब्रह्मांडामध्ये प्रवेश केला.अशी घटना शेकडो वर्षानंतर होते कदाचित अशी वेळ पुन्हा येण्यासाठी शेकडो किंवा हजारो वर्षे लागतील तेव्हा पर्यंत तू जिवंत नसणार."'अर्हंत' म्हणाला, "म्हणजे मी आपल्या मूळच्या ब्रह्मांडामध्ये कधीच जाऊ शकणार नाही!" या जन्मात तर नाही. "आता तुला जे नवीन जीवन मिळालं आहे त्यातच तुझा आनंद शोध!"
....हताश होऊन अर्हंत आपल्या फ्लॅटच्या टेरेस वर आला आणि आकाशाकडे टक लावून बघू लागला की कुठे असेल दुसरे ब्रह्मांड? माझे मूळ जग! कुठे हरवलो आहे मी? मी जर अर्हंतचं प्रतिरूप आहे तर मग या ब्रम्हांडातला 'अर्हंत' कुठे गेला?
प्रश्न अनुत्तरितच राहिला................................................

(अर्हंतच्या आयुष्यात जी घटना घडली खरच ती तुमच्या आयुष्यात घडली तर काय! विचार करूनच अंगावर शहारा येतो ना! प्रिय मायबोलीकर आपले यावर काय मत आहे ते व्यक्त करावे ही नम्र विनंती!)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रभूजी आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद! कथेमध्ये काही त्रुटी असल्यास त्याचं योग्य ते मार्गदर्शन करावं ही अपेक्षा!

नाही नाही तस काही नाही सोनाली! मी फक्त आधार घेतलेला आहे ४ क्रमांकाचा! ४ हा नंबर स्वयंपूर्ण आहे!
उदाहरण घ्यायच झालच तर तुम्ही कोणताही नंबर घ्या just for ex: we take 1 आता "one'1 मध्ये किती alphabet आहेत three आणि three मध्ये 5 आता five मध्ये ४ अक्षरं आहेत तर नं.४
Just take 2nd one आता आपण ७ घेऊ ७ म्हणजेच seven मध्ये पांच अक्षर आहेत म्हणजे five आणि five मध्ये 4 alphabet आहे.
तुम्ही 1ते 9 कोणताही नं.घेतला तरी त्याच्या अक्षरांची total 4च येते करुन बघा!
आपल्या अभिप्रायासाठी धन्यवाद!

इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे... पण असे parallel युनिव्हर्स किती असतील.. कारण आपल्याला रोजच पर्याय मिळत असतात आणि आपण एक निवडतो... आता बघा माझ्याकडे 10 मिनिटे वेळ होता, माझ्याकडे दोन पर्याय होते.. मी ही निवडली आणि इथे प्रतिसाद दिला...

मस्त कल्पना आहे...

तसा मी सुद्धा बरेचदा विचार करतो की नोकरीबाबत वा लग्नाबाबत जेव्हा आपल्याकडे एकापेक्षा जास्त पर्याय उपलब्ध होते तेव्हा आपण दुसरा पर्याय निवडला असता तर लाईफ काय असते...

म्हणजे अगदी नोकरीबातत म्हणायचे झाल्यास, फर्स्ट जॉब चेंज केला तेव्हा एल एण्ड टी मध्ये सिलेक्शन झालेले, पण ऐनवेळी रिलायन्स जास्त पगार देत होते म्हणून तिथे गेलो. पुढे मला या निर्णयाचा पश्चातापही झाला. पण तिथे गेलो म्हणूनच आता जी माझी बायको आहे ती भेटली, अन्यथा ती नसती भेटली. आणि आता जशी दोन गोड पोरे आहेत ती सुद्धा नसती. मग हे पाहता ते करीअरला बसलेला छोटामोठा फटका तितका महत्वाचा होता का असा विचार मनात येतो.. उत्तर मी नाही देतो.. जे आहे तेच आयुष्य मस्त आहे

पण मग तुम्ही लिहिलेली शेवटची ओळ....
अर्हंतच्या आयुष्यात जी घटना घडली खरच ती तुमच्या आयुष्यात घडली तर काय! विचार करूनच अंगावर शहारा येतो ना!...
खरेच.. म्हणजे त्या समांतर विश्वात एलएण्डटी मध्ये जॉबला लागल्यावर आज करीअरमध्ये वेगळ्यच पोजिशनला, वेगळेच मित्रमैत्रीणी, वेगळीच बायका पोरे... अंगावर शहारा येण्यासारखाच विचार आहे हा Happy

ऋन्मेशजी आपल्या अमूल्य प्रतिसादाबद्दल धन्यवाद! आणि हो आपले वैयक्तिक मत मांडल्याबद्दल आपले विशेष कौतुक! बार कमी लेखकांमध्ये आपले विचार बेधडक मांडण्याची हिम्मत असते!

आपल्या अमूल्य प्रतिसादाबद्दल धन्यवाद च्रप्स!
खरतर तर शेवटची ओळ ही एक संभावना आहे‌.काही वर्षानंतर आपण मानवजातीचे मॅट्रीक्स सिमुलेशन करु शकू! आणि आपल्याला त्या व्यक्तीच्या दोन पर्यायाबद्दल जीवनानुभव घेता येईल!

आभारी आहे आपल्या प्रतिसादाबद्दल! मृणाली
अर्हंत: ज्याने आपल्या शत्रूंवर विजय प्राप्त केलेला आहे.
दुसऱ्या अर्थाने बघायचे झाल्यास सिद्धी प्राप्त केलेला
पौरुष!

अमावस्येची ती रात्र होती. त्यामुळे आकाशात सर्वत्र काळोख होता.'शशी' ढगांच्या आड कुठेतरी गडप झाला होता.---अमावास्येची रात्र असेल तर चंद्र नसेलच ना आकाशात.ढगात गडप कसा होईल?

छान! बारकाईने निरीक्षण केल्याबद्दल आभार आपले अनिरुद्ध! हो इथे थोड़ी कल्पनाशक्ती विस्कटली!