दिशा उजळल्या होत्या

Submitted by निशिकांत on 30 May, 2021 - 10:25

हरवले हुंदके  कळ्या उमलल्या होत्या
ती येता दाही दिशा उजळल्या होत्या

पर्णहीन वठल्या झाडासम मी होतो
दुष्काळी आटल्या आडासम मी होतो
नयनातुन झरझर सरी बरसल्या होत्या
ती येता दाही दिशा उजळल्या होत्या

ही सतार येथे मूक उभी का आहे?
कृष्णाविन जैसी उभी राधिका आहे
विरहाने जखमा पुन्हा चिघळल्या होत्या
ती येता दाही दिशा उजळल्या होत्या

सोडून पाय मी नदीकिनारी बसलो
पाहून जळी तुज मनात माझ्या हसलो
आठवणी पुरान्या उरी उसळल्या होत्या
ती येता दाही दिशा उजळल्या होत्या

चाहूल लागता उत्तररात्री मजला
काळोख संपला प्रकाश होता सजला
नक्षत्र तारका नभी चमकल्या होत्या
ती येता दाही दिशा उजळल्या होत्या

हा भूतकाळ मी विसरुन आता गेलो
तुजसवे सुखाने चार थेंब मी प्यालो
नवनीत मिळवण्या व्यथा घुसळल्या होत्या
ती येता दाही दिशा उजळल्या होत्या

निशिकांत देशपांडे, पुणे.  
मो.क्र.  ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users