पुण्याची नवलाई.. (१३)

Submitted by सांज on 28 May, 2021 - 06:37

‘चल रे मीनल, घुमके आते है सिटि में..’

संपीच्या शेजारच्या रूममधली दिव्या आज भल्या सकाळीच संपीच्या रूम मध्ये येऊन बसली होती. ती होती उत्तर भारतीय. तिचं हिन्दी एकदम असं ‘लो एंवइं’ स्टाइल होतं. ते ऐकायला संपीला फारच गोड वाटायचं.

‘हां हां चलो, शनिवारवाडा देखते है. मेरे अप्पा कहते बहुत बडा है..’ संपीचं हिन्दी!!

ही दिव्या दिसायला एकदम गोड आणि वागायला एकदम धाकड. संपीला मनातून अशा मुली फार आवडायच्या. ती आली की मग संपी उगाचच हिन्दी बोलायची. मोडकं-तोडकं. आणि मग दिव्या तिला म्हणायची,

‘हाहा.. संपदा, कितनी क्यूट है रे तू..’

संपीला हे पण खूप भारी वाटायचं.

पण, रविवार असला तरी त्यादिवशी संपी आणि मीनलने आता घालायला कपडेच उरलेले नाहीत हे लक्षात आल्यावर, दोन आठवडे साचलेले कपडे धुण्याचा घाट घातला होता. त्यामुळे त्यादिवशी तरी त्या कुठे गेल्या नाहीत. पण, पुण्यात येऊन महिना-दोन महीने झाले तरी तुम्ही अजून शनिवार वाडा, तुळशीबाग, एफसी रोड किंवा एमजी रोड ला भेट दिली नाही म्हणजे काय! या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गिल्ट पोटी पुढच्या रविवारी मात्र मीनल-संपी-प्राजक्ता-मेघा अशी चौकडी निघाली की पुण पहायला. मेघा त्यांची गाइड. ‘पीएमटी’ नावाच्या अचाट संकल्पनेशी त्या दिवशी त्यांची ओळख झाली. शनिपाराच्या बस मध्ये चढल्यावर बाहेरून अतिसामान्य दिसणार्‍या त्या बसची ‘गर्दी पेलण्याची क्षमता’ पाहून संपी अवाक झाली. आणि त्या दैवी बस चे आपण जणू मालक आणि चढलेले सारे प्रवासी म्हणजे तुच्छ विकारी मानवजात असल्या प्रमाणे वागणारा, अभूतपूर्व आत्मविश्वास घेऊन वावरणारा, कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त अपमान करण्याची क्षमता असलेला तो कंडक्टर पाहून संपीने मुकाट मान खाली घातली. कॉलेजचे पोरं-पोरी म्हटल्यावर तर यांच्या चेहर्‍यावर अति-तुच्छता मिश्रित भाव प्रकट व्हायचे. का ते त्यांनाच ठावूक! गर्दीतून सफाईदारपणे वाट काढत ते कंडक्टर काका पुढे आले आणि त्यांनी नेमकं संपीलाच तिकीट मागितलं. गाडीत शिरल्या-शिरल्या हातात तिकिटाचे सुटे पैसे घेऊन बसायचं असतं हा पीएमटी चा बेसिक नियम संपीला ठावूकच नसल्याने कंडक्टरने तिकीट मागितल्यावर तिने पर्स उघडली. यावर तो कंडक्टर बोललाच त्याच्या स्वभावाप्रमाणे,

‘मॅडम, एक चहा पण मागवु का? चालूद्या तुमचं निवांत. मी आहे इथे उभा.’

पीएमटीमध्ये चहा पण देतात का? संपी मनातल्या मनात म्हणाली. पण जाऊदे काही नको बोलायला म्हणून गप्प बसली. अशावेळी पंधरा वेगवेगळे कप्पे असलेल्या त्या हौसेने घेतलेल्या पर्समधल्या कुठल्यातरी कप्प्यात ठेवलेले पैसे नेमके सापडत नाहीत. संपीचंही तेच झालं. तेवढ्यात प्रसंगाची कल्पना येऊन गर्दीतून वाट काढत मेघा पुढे आली आणि तिने पटकन तिकीट काढलं. कंडक्टरने तिच्याकडेही एक व्यामिश्र कटाक्ष फेकला. आणि हे सगळं झाल्यावर पर्समध्ये खुपसलेलं डोकं बाहेर काढत पैसे पुढे करत संपी म्हणाली,

‘चार शनिपार.’

पण पाहते तो कंडक्टरच्या जागी मेघा उभी. आणि मग स्वत:च्या वेंधळेपणावर स्वत:च हसली. थोड्यावेळाने तिच्या मोबाइलची मेसेज टोन वाजली. पुन्हा पर्सची एक मुक्त सफर करून तिने तो बाहेर काढला आणि पाहिलं. मंदारचा मेसेज!!

आणि मग तिची ट्यूब पेटली. काल ऑर्कूटवर त्यांनी नंबर एक्सचेंच केले होते.

संपीनेही मग त्याच्या ‘हाय’ ला ‘हाय’ केलं. आणि मनातल्या मनात खुश होत खिडकीबाहेर पाहू लागली. तिचे डोळे स्वप्नांनी भरले होते. एक नवं जग ती पहायला निघाली होती. शरीराने आणि मनानेही.

दुसर्‍याच क्षणी पलीकडून रीप्लाय आला,

‘काय करतेयस?’

‘आम्ही तुळशीबागेत जातोय’ संपीचा रीप्लाय.

‘अरे वा! खरेदी का?’ मंदार.

‘नाही. तुळशीबाग पहायला.’ संपीचं प्रामाणिक उत्तर.

‘हाहा.. फनी यू..’ मंदारला वाटलं संपीने जोक क्रक केलाय.

त्याच्यासोबत हसत मग संपीने विचारलं, ‘काय झालं?’

‘अगं, तुळशीबाग पहायला जायला ती काय खरी बाग आहे का. सगळे तिथे शॉपिंगसाठीच जातात. तू sarcastically म्हणालीस ना!’

आता यावर संपीला दोन प्रश्न पडले. तुळशीबागेला ती खरंच एखादी ‘बाग’ वगैरे समजत होती हे त्याला कसं सांगायचं आणि दुसरं, ‘sarcastically’ म्हणजे काय?

पण, मग काहीच न बोलता ती गप्प बसली.

त्यानंतर थोड्यावेळाने ‘हे, यू देअर?’ अशा आलेल्या मेसेजला ‘अरे आम्ही पोचलो. नंतर बोलते’ असा रीप्लाय करून ते संभाषण तिने त्यादिवसा पुरतं तरी थांबवलं.

तुळशीबागेत पोचल्यावर मात्र तिला तो का हसत होता त्याचा उलगडा झाला. बाग सोडा तिथे नुसतेच बोळ होते आणि तेही गर्दीने काठोकाठ भरलेले. इतक्या सार्‍या वस्तु तिने एका ठिकाणी पहिल्यांदाच पाहिल्या होत्या. चौघीजणी एकमेकींचे हात धरून सारं काही न्याहाळत पुढे सरकत होत्या. मीनल काय काय खरेदीही करत होती. संपी मात्र फक्त किमती ऐकत होती आणि मनातल्या मनात आपल्याकडे किती पैसे आहेत, आपण किती खर्च करू शकतो, अमुक-अमुक वस्तु घेतली तर किती उरतील इ.इ गणितं पुन्हा पुन्हा मांडत शेवटी घेत काहीच नव्हती.

संपी खरी हरखली ती मेघाने त्यांना तुळशीबागेमधलं राम-मंदिर दाखवल्यावर. तिथे गेल्यावर बाहेरचा सारा गोंगाट एकदम नाहीसा झाला. आणि तिचं मन प्रसन्न प्रसन्न झालं.

त्यानंतर मग लक्ष्मीरोड-दगडूशेठ करत करतच दिवस मावळला आणि त्यांनी परतायचं ठरवलं.

मोठं शहर, भरपूर गर्दी, धावणारी माणसं, त्यांचा वेग.. एक पूर्ण नवं जग पाहून संपी पुरती हरखून गेली.

हॉस्टेलवर परतल्यावर तिने पहिली कुठली गोष्ट केली असेल तर आधी डिक्शनरी उघडली आणि ‘sarcastically’ चा अर्थ पाहिला. तो पाहिल्यावर जरावेळ स्वत:शीच हसून मग तिने मंदारला मेसेज केला,

‘हाय, अरे मी sarcastically नव्हते म्हणाले. मला खरच तुळशीबाग म्हणजे एक बाग वाटायची Lol हाहा.. फनी मी!’

आणि मग फ्रेश होऊन ती जेवायला गेली. पाहिला घास तोंडात जातो न जातो तोच मंदारचा रीप्लाय आला,

‘अँड नाऊ क्यूट टू..:)’

यावर नाही म्हटलं तरी संपी जराशी blush झाली आणि लगेच कोणी पाहिलं तर नाही याची खात्री करत खाली मान घालून जेवायला लागली.

क्रमश:

सांज
www.chaafa.com

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान!
पण मैत्रिणी अगदीच चांगल्या मिळाल्या आहेत संपीला. Wink