रिकामी जागा

Submitted by फूल on 27 May, 2021 - 21:32

परवा बऱ्याच वर्षांनी आजोळी गेले... चारेक वर्षं तरी झालीच असतील. शाळेत असताना दरवर्षी मे महिन्याच्या सुट्टीत तीन-तीन महिने राहून यायचे. पहिल्यांदा आजोळी तीन महिन्यांसाठी रहायला गेले तेव्हा मी अवघ्या पाचच वर्षांची होते. माझी मावशी... आईची थोरली बहिण... काही कारणाने लग्नं न झालेली आणि म्हणून आजोळी मामाकडेच राहणारी. ती माझी आईच व्हायची त्या तीन महिन्यात.. तिच्याशी नाळ घट्ट जुळली होती. तिच्यामुळे आजोळ म्हणजे माझं दुसरं घरंच झालं. अधिक जिव्हाळ्याचं. मायेच्या माणसांचं.

अश्या या घरात चार वर्षांनी आले होते आणि चारच दिवसांसाठी. काय काय वेचायचं ठरवलं होतं त्या चार दिवसांत...? माझं बालपण समृद्ध करणाऱ्या माझ्या मावशीला तिच्या नेहमीच्या व्यापातून, राम रगाड्यातून पळभराची का होईना पण विश्रांती द्यावी... तिथल्या स्वयंपाकघरात मनसोक्त रमावं... आपल्या हातचं करून-सवरून खाऊ-पिऊ घालावं... तिचे पाय दाबून द्यावे... डोक्याला तेल घालून द्यावं. थोडक्यात काय तर आजोळीच्या या माऊलीचं तिथे जाऊनच आपण माहेरपण करावं.

पण खरी माहेरवाशीण मीच होते. मावशीच्या सख्ख्या धाकट्या बहिणीची लेक. म्हणजे थोडक्यात त्या घरच्या लेकीची लेक. दुधावरली साय. चार वर्षांनी माहेरा आलेली. परत कधी यायची ते ठाऊक नाही. तिचं कोड करायचं सोडून तिला कामाला लावणार थोडंच. माझे सगळे मनसुबे गाश्यात गुंडाळून ठेवून मावशी माझी नाही नाही ती कवतिकं करू लागली. माझ्या डोकी तेल घातलं, अंघोळीला शिकाकाई उकळून दिली, मी अंघोळ करत असताना “पाठ चोळून देऊ काय गंsss” असं म्हणून... नेहमीचं हाकारली.. दुपारच्या जेवणाला मला आवडते म्हणून शेंगांची आमटी, मऊ भात, भरली वांगी, बाजरीची भाकरी आणि हिरव्या मिरच्यांचा पाट्यावर ठेचलेला ठेचा असलं सगळं स्वत:च्या हाताने रांधून वाढू लागली. फक्त भरवायचं बाकी ठेवलं होतं.

ताटावर बसले पण घास काही घशाखाली उतरेना. मला त्याक्षणी दिसत होती ती सत्तरी जवळ आलेली मावशी, आयुष्यभर कष्ट केलेले तिचे हात, उठ-बस करताना अनाहूतपणे गुडघ्यावर टेकला जाणारा तिचा हात, तिचं आधीपेक्षा जास्त वाकून चालणं, पूर्वीच्या मानाने मंदावलेला तिचा स्वयंपाकघरातला वावर. या तिच्या अवस्थेत मी तिला जेवू-खाऊ घालायचं की अजूनही मीच लाड पुरवून घ्यायचे...? असलं द्वंद्व सुरू होतं डोक्यात. मी सहज मावशीकडे बघितलं. ती मात्र खुशीत काहीतरी गुणगुणत लाडू वळत बसली होती... ओल्या नाराळाचे लाडू.. मला आवडतात म्हणून. मनातल्या भावना डोळ्यांवाटे वाहू न देता मी आपली जेवत राहिले. तिच्या करण्याचं कौतुक करत राहिले.

दुपारी सगळे झोपले होते पण मला झोप अशी लागलीच नाही. उठून बाहेर आले तर मावशी नुकती झोपून उठली होती आणि धुणं वाळत घालायच्या तयारीत होती. तिथे जाऊन उभी राहिले... मावशीला असंख्य प्रश्न असणार, पण एकदम कसं विचारायचं म्हणून गप्पं होती. मग मीच सांगायला सुरुवात केली आणि बोलता बोलता बादलीतला एक एक कपडा झटकून द्यायला लागले. तीही मी झटकून दिलेला कपडा वाळत घालायला लागली. बोलण्याच्या नादात सगळे कपडे कधी वाळत घालून झाले कळलंच नाही... शेवटी साड्या आल्या तसं मावशी म्हणाली... “ठेव आता... त्यांची घडी करता येणार नाही तुला.” मी चमकून मावशीकडे बघितलं. माझं लग्नं झालंय आता, मला दोन वर्षांची लेक आहे आणि अजून मला साडीची घडी घालता यायचं नाही असं कसं काय वाटलं हिला. पण तिच्या चेहऱ्यावर काहीच वेगळेपण नव्हतं. आपण भलतं काहीतरी बोलून गेलोय असंही वाटत नव्हतं तिला. ती एका परकराची आत गेलेली नाडी बाहेर काढण्यात दंग होती. चष्मा डोळ्यावर नव्हता म्हणून डोळे बारीssक करून, अगदी गुंग होऊन ते काम सुरू होतं.

त्याक्षणी माझ्या डोक्यात लख्खं प्रकाश पडला. मला जर तिच्यासाठी खरोखरी मनापासून काही करायचं असेल तर ते म्हणजे तिला जे जे म्हणून माझ्यासाठी करायची इच्छा आहे ते ते सगळं करू देणं आणि स्वत:ही ते मनसोक्तं उपभोगणं. मी मोठी झालेय, स्वतंत्र झालेय हे या माऊलीच्या गावीच नसावं. तिला अजूनही मी तश्शीच दिसतेय.. तिने शिवलेला फ्रॉक घातलेली, तिनेच घालून दिलेल्या दोन वेण्या गळ्यात घेऊन तिच्यामागे काहीतरी भुणभुण करत घरभर फिरणारी, तिच्या हाताखाली छोटी छोटी कामं करू जाणारी, हजार शंका विचारणारी अजून पुरती न उगवलेली मी. आजोळी सुट्टीसाठी आलेल्या या लेकीचे लाड करायचे, तिला दुधा-तुपात न्हाऊ-माखू घालायचं आणि धष्ट-पुष्ट करून पुन्हा स्वगृही पाठवणी करायची... एवढं आणि एवढंच माहितीये तिला. माझ्या मगासपासून सुरू असणाऱ्या बडबडीत किंवा एरवी फोनवरल्या बडबडीतूनही आपली लेक सुखी आहे हेच एक जाणून घ्यायचं असतं तिला.

तिला खूप आठवण येते माझी असं म्हणते अनेकदा पण त्या आठवणीही माझ्या लहानपणीच्याच असणार. कपडे वाळत घालताना माझं एक एक कपडा पुरवणं, तिनं भांडी घासली तर मी ती धुऊन घेणं, घासलेली भांडी जागेवर लावून ठेवणं, तिने उंबरठ्यावर काढलेल्या रांगोळीला साजेशी रांगोळी अंगणात काढणं, तिच्या जोडीला पूजेची तयारी करणं अशी असंख्य छोटी छोटी कामं मी तिच्या भोवताली करायचे. आणि तेवढेच प्रश्न विचारून तिला भंडावून सोडायचे. मी नसताना या ज्या रिकाम्या जागा तयार झाल्या असतील तिथे ती आठवण काढत असणार माझी नक्कीच. मग आता माझं काम काय तर त्या रिकाम्या जागा भरून काढायच्या. मावशीसाठी काही करायचं असेल तर या चार दिवसांत शक्य तेवढ्या रिकाम्या जागा भरून काढूया असं मनाशी ठरवून कामाला लागले.

त्या चार दिवसांत तिच्या हाताखाली अनेक कामं करू गेले. अनेकदा... “धांदरट कुठली... पातेलं आदळू नको, पाणी भसाभस उपसू नको जरा जपून वापर, ताक करताना रवी भांड्याच्या तळाला टेकू देऊ नको....” असलं पूर्वीसारखं ओरडूनही घेतलं. “कशाला करतेस राहू दे” असं म्हणायची अधूनमधून पण माझं हे असं तिच्याभोवती बागडणं नक्कीच आवडत होतं तिला. कामाच्या जोडीने ज्या गप्पा रंगल्या त्यात मधली कित्येक वर्षं आपोआप गळून गेली, अनेक वर्षांनी भेटल्यामुळे निर्माण झालेला नात्यातला परकेपणा विरून गेला, नात्याची सुटत आलेली वीण पुन्हा एकदा घट्ट झाली. खुशीत येऊन मला कित्ती काय काय सांगत राहिली ती. तिच्या बालपणीच्या गमती-जमती, मला आजवर न सांगितलेली गुपितं, तिच्या स्वयंपाकघरातल्या खास अश्या कृल्प्त्या, आज्जी-आजोबांच्या आठवणी, कुरवाळून उराशी घट्ट बाळगलेली दु:खं असं किती काय काय बाहेर पडलं त्या चार दिवसात. पुन्हा आम्ही पूर्वीसारख्याच समोरासमोर आलो. ते चारही दिवस भरभरून जगलो.

आजोळाहून परतताना गंगा-जमुना डोळ्यांत उभ्या राहतातच... अजूनही.. काय नव्हेच ते. मावशीही रडली.. मीही रडले. पाया पडायला वाकले तर माझ्या पाठीवरून हात फिरवत एवढंच म्हणाली, “किती मोठी झालीस गं आता....” मला रडतानाही हसू फुटलं. मी चार दिवसांनी माझ्या नवऱ्यासोबत, लेकीसोबत परत जायला निघालेय म्हणून मावशीला हे जाणवलं होतं. आता आपली लेक मोठी झालीये. तरी तिचं मन काही ते मानायला तयार नसावं... कारण त्यानंतर तिने माझ्या डोक्यावरून हात फिरवला... मी लहान असताना फिरवायची अगदी तस्साच..
आजोळाहून निघताना नेहमीसारखीच मावशी घराच्या फाटकापर्यंत सोडायला आली. आम्ही फाटकाबाहेर पडताच ती पुन्हा दाराजवळ उभं रहायला मागे वळली. घर मूळातच टेकडीवर असल्याने त्या घराच्या दारातून बरंच दूरवरचं दिसायचं. जाणारं माणूस अदृश्य होईतोवर दारात उभं राहून पहाणे ही मावशीची नेहमीची सवय. मग आम्हीही पुन्हा पुन्हा मागे वळून पहात असू. तशीच त्यादिवशीही थोडं पुढे गेल्यावर मी पुन्हा एकदा मागे वळले..

समोरचं चित्र बघून डोळे पाझरायला लागले... मावशी एक हात गुडघ्यावर ठेवून वाकत वाकत दारासामोरची एक एक पायरी सावकाश चढत होती. चारच पायऱ्या पण पूर्ण जिना चढून जायला तिला बराच वेळ लागला. मग संथपणे मागे वळून एका हाताने पदर डोळ्याला लावत आणि एका हाताने आम्हाला अच्छा करत उभी राहिली. तिला असं बघून माझ्या अंगावर सरसरून काटा आला... मावशी म्हातारी झालीये हे चारही दिवस डोळ्यांना दिसत होतं. पण माझंही मन ते मानायला तयार नव्हतं. जितक्या असोशीने ती ते जुने दिवस जगू पहात होती तितकीच ओढ मलाही होती त्या जुन्या दिवसांची. खोटं कशाला बोलू...? पण मला अंघोळ घालणारी, माझ्या वेण्या घालणारी, मला रांगोळ्या शिकवणारी, मला माझ्या आवडीचं करून खाऊ-पिऊ घालणारी... माझी तिशी-पस्तीशीतली मावशी मीही त्या चार दिवसात शोधायचा प्रयत्न केलाच की. मावशीच्या रिकाम्या जागा भरता भरता माझ्याच रिकाम्या जागा भरल्या होत्या मी.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साध्यासुध्या अनुभवांतून दिसणारं नितळ निरागस नातं, बालपणाला भूतकाळाच्या वेशीवरच रोखून ठेवणारं..
पुन्हा वाचावासा वाटला हा लेख

किती किती सुंदर. डोळ्यात पाणी आलं शेवटी खूप, हळू हळू पायऱ्या चढणारी मावशी डोळ्यासमोर आली आणि आत कायतरी हलल्यासारखं झालं.

मस्तच. डोळे पाणावले खूप वेळा. माहेरच्या आठवणी खास असतातच. पण अशी जीव लावणारी माणसं असली की मन तिथेच गुंतून राहतं.

निसर्गासमोरची टाळता न येणारी आगतिकता ! स्वीकारतो आपण...नात्यांच्या दोन्ही बाजूला असलेले , आपण आणि समोरचे आप्त , सगळं उमजत असूनही जणु काहीच बदललेलं नाही असं एकमेकाना भासवत...फसवत राहतो आपण....
याला जीवन ऐसे नांव.

Pages