आई ग, मला यायचंय !

Submitted by Arundhati Joshi on 25 May, 2021 - 23:32

मध्यरात्र उलटून गेली होती.आशाताई आणि बाबी गाढ झोपल्या होत्या.एव्हढ्यात आशाताईंना जाणवले की गेटच्या वरच्या बाजूवर चढून एक छोटा मुलगा आत डोकावतो आहे. कोण असेल बरे हा मुलगा असा विचार करत आशाताई उठून बघायला जाणार एवढ्यात त्यांना जाग आली आणि हे स्वप्न आहे हे त्यांच्या लक्षात आलं. उठून थोडेसे पाणी पिऊन त्या परत झोपी गेल्या. दुसऱ्या दिवशीही त्याच वेळी तोच प्रकार घडला.या वेळी आशाताईंनी पुढे जाऊन पाहिले तर तो त्यांचा दिवंगत मुलगा ,आनंद होता. ”का रे बाळा, तू का आला आहेस? काय इच्छा आहे तुझी?”
तो म्हणाला, “आई ग, मला परत यायचंय. तुझ्याच पोटी परत यायचे आहे ग.”
“अरे पण ते आता कसे शक्य आहे? माझी चाळीशी उलटून दोन वर्ष झाली आहेत. बाईपण संपत चालले आहे आणि आतातर एका नातवंडाची मी आजीही झाले आहे. अशा परिस्थितीत तू मला आई व्हायला सांगतोस. त्यापेक्षा मी ताई ला सांगते ती ऐकेल माझे.”
“नाही आई , ताई मला तुझ्या एव्हढीच प्रिय आहे पण ... तिने निवडलेला जोडीदार ...ताई कॉलेज मध्ये असतांनाच बाबांचे दोन तीन मित्र त्यांना विचारत होते.चांगले घरंदाज, श्रीमंत स्थळे सुचवत होते, ती मुलेही चांगली शिकलेले, उत्तम नोकरी करणारी होती. बाबांना विचारात होते की का रे मुलीचे लग्न करणार आहेस का? आपला बडा घर पोकळ वासा असला तरी पैश्या मुळे लग्न मोडले नसते.ताई देखणी होती.पण बाबा म्हणाले की ती शिकते आहे, हुशार आहे तेंव्हा तिचे लग्न करून देवून त्यात विघ्न आणू इच्छित नाही. खरंतर तिने आय. ए एस ,आय. सी. एस. व्हावे असे बाबांना वाटत होते.कलेक्टर मुलीचे वडील म्हणून मानाने मिरवायचे होते.परंतु तिनेच स्पष्ट सांगितले की तिला या मधे आजीबात रस नाही. कितीही अभ्यास करायला तिची ना नव्हतीच.ती पास ही झाली असती परंतु मुळातच तिला त्या मधे इंटरेस्ट नव्हताच. तिचे शिक्षण पूर्ण झाले. अगदी पि.एच.डी. सुद्धा मिळवली तिने. चांगली नोकरी करायला लागली.तिने तिचा जोडीदार पण निवडला. तुम्ही त्यांचे लग्नही लावून दिलेत. त्यानंतर बाबा आजारी पडले. काही केल्या त्यांना गुण येत नव्हता, बरे वाटत नव्हते. ताई तुला म्हणाली ,” तुम्ही दोघे मुंबईला स्पेशालीस्ट डॉक्टर ना दाखवून या. आपल्या गावात तितक्या चांगल्या वैद्यकीय सेवा नाहीत. अगदी आठ दिवस लागले तरी चालेल पण योग्य उपाय झाले पाहिजेत. मी बघेन आनंदकडे. माझे दिवस भरले की नंतर तुला जाता येणार नाही. काकू डॉक्टर आहे. तिच्या सल्ल्याने काय ते बघा. तुला ही ते पटले,आणि तुम्ही मुंबईला गेलात. हा डॉक्टर, तो डॉक्टर, वेगली वेगळ्या तपासण्या, औषधं करताना आठ दिवसाच्या जागी तुम्हाला परत यायला पंचवीस दिवस लागले. तुम्ही आलात तर बाहेरच्या दाराला कुलूप! कोणाला तरी बोलावून बाबांनी मागचे दार उघडण्याची खटपट चालवली होती. आई तू बाहेर उभे राहून मला समजावत होतीस.म्हणत होतीस,”आनंद बाळा ,मी आलेय ,दार उघडले की मी तुझ्याकडे येतेच. तहानलेला,भुकेला,उपाशी मी तुझीच वाट बघत होतो ग आई ,अगदी डोळ्यात प्राण आणून .तुझा आवाज ऐकून मला इतका आनंद झाला .मी अंथरूणावर पडून होतो, चालता येत नव्हते , बोलताही येत नव्हते, साधा हात ही हलवता येत नव्हता.फक्त काढता येईल तेव्हढा तोंडाने जोरात आवाज काढून मी तुझ्या हाकांना प्रतिसाद देत होतो.माझ्या अस्तित्वाची जाणीव करून देत होतो.शेवटी एकदाचे दार उघडले आणि तू धावत माझ्यापाशी आलीस. मला उचलून पोटाशी धरलेस.म्हणालीस,” रडू नको बाळा, मी आता तुला सोडून कुठेही जाणार नाही. भुकेजला असशील ना,पटकन पोळी भाजी करून खायला देते हा तुला.”
माझे डोळे पुसून मला खाली ठेवून तू स्वयंपाक घरात गेलीस. पोळी भाजी केलीस आणि मला खाऊ घातलेस. खातांना पण माझ्या डोळ्यात पाणी येत होते आणि तू ते पुसत होतीस.
दुपार होऊन गेली. बाहेरचे दार उघडत असल्याचे तुझ्या लक्षात आले. ताईचे मिस्टर आले होते.तू त्यांना विचारले ताई कशी आहे. “ मुलगी झाली आज थोड्या वेळा पूर्वी. उद्या मी दहा वाजता येईन. दवाखाना दाखवेन. पुढचे तुमचे तुम्ही पहा.”
न राहवून तू विचारले त्याला, ”तुम्ही याला काही पाणी वगैरे पाजले का?”
कमालीचा त्रासिक चेहरा करून त्याने म्हटले, ”हा काय प्रश्न झाला?” खांदे उडवून टेबल वर किल्ली ठेवून तो निघून गेला.
तुला किती संताप आला असेल. अरे बायको तुझी, बाळ तुम्हाला झाले आहे आणि तुमचे तुम्ही बघा म्हणजे काय? आई, त्या वेळी तुला खूप काही विचारायचे होते.ताई कशी आहे,किती त्रास झाला,बाळ कसे आहे? किंवा तो विचारू शकला असता की तुम्ही मुंबई च्या डॉक्टरना भेटलात तर ते काय म्हणाले? आता बाबांची तब्बेत कशी आहे. काही चौकशी केल्या शिवाय त्याला जाववले कसे? आणि हे म्हणे कॉलेज मध्ये कम्युनिकेशन स्किल्स शिकवतात! हसलीस न आता सुद्धा आई? पण ताईला त्रास होऊ नये म्हणून तू सर्व राग गिळला.ताईला आपण काही उपाशी ठेवू शकत नव्हतो .अश्या अनंत गोष्टी तू गिळल्या. आई मला बोलता येत नव्हते तरी सगळे काही कळत होते. लहानपणापासून फक्त त्रासच सहन करावा लागला तुला. त्या प्रसंगा नंतर आई मी ठरविले की हे लुळे पांगळे आयुष्य आता बस्स झाले.जगाचा निरोप घ्यायचा आणि याच घरात , तुझ्याच पोटी परत जन्म घ्यायचा. आणि तुला सुखी करायचे. ठरविल्या प्रमाणे मी वागलो. मी गेल्यावर तुला खूप वाईट वाटले, ते साहजिकच होते. पण परत येण्याच्या निश्चयाने मी गेलो होतो ग.”
“आई,मला तुला खूप सुख द्यायचे आहे.मला तुझ्याच पोटी यायचे आहे.नाही म्हणू नकोस. लोकं काय, चार दिवस हसतील,पाचवे दिवशी सर्व विसरतील.”
सतत पंधरा दिवस आनंद त्याच वेळेला आशाताईंच्या स्वप्नात येत होता. थोडे थोडे जास्त बोलत होता. शेवटी त्या म्हणाल्या,”ये राजा,तुझे स्वागत आहे!” त्यानंतर रोज रात्री पडणारे हे स्वप्न पडायचे बंद झाले.
आशाताईंनी संमती दिली. बाबा तेथेच असल्यामुळे तेही हे ऐकून गप्प झाले. नव्या औषधांमुळे त्यांना बरेही वाटू लागले होते.
आशाताईंनी ठरवले की मागे केलेल्या चुका आजीबात करायच्या नाहीत.कोणतीही काटकसर करायची नाही. चांगल्यातले चांगले हॉस्पिटल निवडायचे. स्वतःची काळजी घ्यायची.”ये बाळा ये,तुझे स्वागत आहे.” त्या मनातल्या मनात कितीदा म्हणाल्या असतील!
आशाताईंना एकदम यमुताईंची आठवण आली. त्यांचा नवरा अकाली गेला, त्यांनी पुनर्विवाह नाही केला. नवऱ्याची सरकारी नोकरी असल्यामुळे यमुताईंना थोडीशी फॅमिली पेन्शन मिळत होती. राहायला छोटेसे घर होते. तशी फारशी काळजी नव्हती. पण दिवसभराचा रिकामा वेळ खायला यायचा.त्या नेहेमी आशाताईंना म्हणायच्या –काहीतरी सुचवा. त्यांचे शिक्षणही फार झाले नव्हते. तशी कोणती कलाही नव्हती अंगात त्यांच्या. एक मात्र नक्की की त्यांना स्वयंपाक छान करता यायचा. आशाताईंनी ठरवले की त्यांनाच घरी आणून ठेवायचे. तसे त्यांना भेटून त्यांच्याशी बोलून त्यांनी सगळे ठरवून टाकले. आशाताईंना नववा महिना लागला की यमुताईंनी त्यांच्या घरी येऊन राहायचे. ताई ज्या हॉस्पिटल मधे गेली होती तेथेच जायचे त्यांनी ठरवले. एक दिवस त्या हॉस्पिटल मधे गेल्या. त्यांना तिथे बघून डॉक्टर मॅडम जरा गडबडल्या. त्या म्हणाल्या,” आशाताई तुम्ही इथे? आपली ताई आणि बाळ बरे आहेत नं?”
“हो,हो. उत्तम आहेत दोघेही. मी माझ्यासाठीच आले आहे. “ त्यांनी मग त्यांच्या मनात घोळत असलेले विचार मॅडमना सांगावे कि नाही याचा त्या विचार करत होत्या. शेवटी म्हणाल्या,” मला तपासा आणि योग्य ते औषधोपचार करा.”
स्वतःला सावरत मॅडमने त्यांना तपासले आणि त्या एकदम ओरडल्या,” आशाताईं तुम्हाला तीन महिने होऊन गेलेत. अशी कशी चूक झाली? आता काय करायचे?”
“ मॅडम अहो ही चूक वगैरे नाही झालेली.मला हे व्हायला हवेच होते.तुम्हाला तर माहित आहेच की माझा मुलगा अकाली गेला. सतत पंधरा दिवस तो माझ्या स्वप्नात येत होता. मला घरी यायचे आहे म्हणून हट्टच करत होता.शेवटी त्याला हो म्हणावे लागले. आणि म्हणून आज मी तुमच्याकडे आले आहे. हे बाळ मला हवे आहे.तेंव्हा योग्य ते औषधोपचार सांगा. काय औषधं, टॉनिक ,डाएट, लिहून द्याल ते मी व्यवस्थित घेईन.
डॉक्टर आता बऱ्याच सावरल्या होत्या.त्यांनी आशाताईंना नीट तपासले. सगळे अगदी उत्तम आहे असे त्या म्हणाल्या.त्यांनी औषधं, टॉनिक ,डाएट सर्व लिहून दिले आणि दर महिन्याला नियमित चेकअप करायला येण्या बद्धल बजावले.
आशाताईंना यावेळी फारसा त्रास होत नव्हता.आधीच्या दोन्ही खेपांना त्या उलट्यांनी अगदी हैराण झाल्या होत्या.आता तसा काही त्रास होत नव्हता. ठरल्या वेळी औषधं, टॉनिक घेत होत्या. आठवा महिना लागला. तेंव्हा त्यांनी यमुताईंना बोलावून घ्यायचे ठरवले. म्हणजे चार दिवसात त्यांना घरातले नीट समजावून सांगता आले असते. पुढे त्यांनाच करायचे होते ना सगळे. ठरल्या प्रमाणे यमुताई आल्या.त्या दिवशी आशाताईंनी त्यांना जेवू खाऊ घातले. दुसऱ्याच दिवशी त्यांनी स्वयंपाकघराचा ताबा घेतला. कुठे काय ठेवले आहे ते त्यांना काही सांगावेच लागले नाही.त्यांनी छानसा रुचकर स्वयंपाक करून ओटा स्वच्छ केला.सांड नाही लवंड नाही. अगदी नीट नेटके सगळे. आशाताईंना चार घास जास्तच गेले. फार दिवसांनी आयते जेवायला मिळाले होते.बाबांना पण सर्व आवडले. ”तुम्ही बसा, मी मागाहून जेवेन असे यमुताई म्हणत होत्या पण दोघांनीही त्यांना खोडून काढले . “तिघांनी एकदमच जेवायचे हे ठरलंय आणि ते फायनल आहे”, आशाताई म्हणाल्या. तिघांनीही सोबत जेवण केले. बाबांनाही जेवण आवडलेले दिसत होते. आशाताईंच्या मानत आले,’ देव केंव्हा केंव्हा असे का करतो काही कळत नाही.या बाईंनी कसा छान संसार केला असता. दोन मुलांचे छान संगोपन केले असते.पण तो तिच्या नवऱ्यालाच घेऊन गेला!” वाईट वाटले त्यांना. नशीब एखाद्याचे, दुसरे काय म्हणणार ?’
आशाताईंचे दिवस भारत आले .त्यांना डॉक्टरने दिलेली तारीख उलटली. काळजीने त्यानी डॉक्टरना विचारले. त्या म्हणाल्या आजून एक दिवस वाट बघूया. त्यानंतर ठरवू या काय करायचे ते. त्यांनी सर्व तयारी करून ठेवलीच होती. पण ती वेळ आलीच नाही. आशाताईंना कळा सुरु झाल्या मुळे त्यांना दवाखान्यात जावे लागले. फार त्रास न होता अगदी सुलभ प्रसूती झाली. डॉक्टरना खूप आनंद झाला. गोरेपान, सुंदर बाळ बघून त्यांना खूप समाधान वाटले. आशाताईंनी बाळ पाहिले. आनंदने आपला शब्द खरा केला होता!
दवाखान्यात असेन तोवर इथलेच जेवण मी घेते असे आशाताई म्हणत होत्या पण यमुताईंनी त्यांचे म्हणणे साफ धुडकावून लावले. त्या म्हणाल्या, तुम्ही फार तर दोन्ही वेळचा चहा घ्या इथला पण जेवण घरचेच असेल.एक वेळेस मी येईन, एक वेळेला बाबा येतील. त्या प्रमाणे त्यांनी सर्व दिवस पथ्याचे पण रुचकर जेवण पुरवले. एक छोटा तुपाचा डबा आणून त्यांच्या स्वाधीन केला. हे सगळे संपवले पाहिजे म्हणून बजावले. घरी आल्या वर अंगाला लावायला, आंघोळ घालायला, रोज बाई येत होती. यमुताई लक्ष देत होत्या. चार दिवस बाळाला घेऊन ताई आली. माहेरवाशीण आली म्हणून त्यांनी तिचे खूप लाड केले. तिला वेगवेगळे पदार्थ करून खाऊ घातले. तिच्या बाळाला न्हाऊ माखू घातले, चिऊ काऊ चा घास भरवला.ताई ने बाळाला पाहिल्या पाहिल्या ती म्हणाली, “आई हा किती हुबेहूब त्याच्या सारखा आहे.तोच गुलाबी गोरा वर्ण ,काळेभोर कुरळे जावळ, सुंदर डोळे अगदी काहीसुद्धा फरक नाही.
“अग तोच तर आला आहे परत. हट्ट करून जन्माला आला आहे.तसाच असणार ना!”
एक दिवस बाळाला पाळण्यात ठेवले. पांच सुवासिनी बोलवल्या. नावही तेच ठेवले -’आनंद’. बाबां बरोबर ताईला पाठवून तिच्या आवडीची साडी घ्यायला लावली आणि यमुताईंसाठी पण एक छानशी साडी आणवली. यमुताईंनी बाळाच्या गळ्यात एक सोन्याची चेन घातली आणि काळ्या गोफात एक ताईत गुंडवून आणला.तोही त्याच्या गळ्यात घातला.नंतर घालायला म्हणून त्यांनी तांब्याचे वाळे मुद्दाम करवून आणले. आशाताई म्हणाल्या,”काय हे यमुताई? या सगळ्याची काय गरज होती?”
चार दिवसांनी ताई परत जायला निघाली. यमुताईंच्या पाया पडून म्हणाली,”तुम्ही आहात म्हणून मला काळजी नाही.”
आनंद वाढत होता.त्याची प्रगती फार झपाट्याने होत होती.वर्षाचा झाला नाही तोच चालायला ,बोलायला लागला. शाळेतही त्याची प्रगती उत्तम होती. घरात मराठीचा वापर आणि इंग्रजी माध्यमाची शाळा असल्यामुळे सात आठ वर्षाचा असतांनाच त्याला मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषा उत्तम येऊ लागल्या. खेळातही तो चांगला होता. असे छान दिवस चालले होये.आनंद शाळेतून आला की ‘ आई, आई’ असे ओरडतच घरात शिरायचा. दोघीही त्याच्या दिमतीला तत्पर असायच्या. काही महिन्यांसाठी आलेल्या यमुताई परत जायचे विसरल्याच होत्या. आणि आशाताईंना पण त्या राहायला हव्या होत्या.आनंदचा यमुताईंनाही फार लळा लागला होता. आशाताई कधी कधी या विचाराने अस्वस्थ व्हायच्या की आनंद उद्या मोठा झाल्यावर माझे ठीक आहे पण या बाईंचे काय? सारा जन्म आपल्या घरी यांनी खस्ता का खाव्या? पण त्यांना उपाय सुचत नव्हता.
एक दिवस बाबा बाहेरून घरी आले. आशाताईंना म्हणाले,” अग तुला माधव आठवतो का? माझ्या मित्राचा मुलगा? तो आज भेटला होता. त्याच्या घरी कोणी नाही. बाहेरचे खाऊन वैतागला होता. त्याला मी उद्या आपल्या घरी जेवायला बोलावले आहे.”
“बरं बरं.येऊ दे की.” आशाताई म्हणाल्या.
दुसऱ्या दिवशी तो जेवायला आला. वरण,भात, आमटी ,त्यावर साजूक तूप ,खमंग काकडी,बटाट्याची भाजी आणि पोळी -अगदी साधा बेत त्याच्याच सांगण्याप्रमाणे केला होता. जेवणे झाली. कित्येक दिवसांनी असे साधे सुधे जेवण जेवलो .खूप समाधान वाटले. असे तृप्त होत तो म्हणाला .
“अरे, मनात आणलेस तर असे जेवण रोज मिळेल की, लग्न कर म्हणजे झाले.” बाबा म्हणाले.
“परत नशिबाची परीक्षा घ्याविशी वाटत नाही.” तो म्हणाला.
“अरे पूर्वी जे झाले ते झाले. नेहेमी काय तसेच घडणार आहे का?” बाबा समजावणीच्या सुरात म्हणाले.” हे बघ, आज ज्यांनी स्वयंपाक बनवला होता ना त्या यमुताई. त्यांचे लग्न झाले आणि वर्षभरातच त्यांचा नवरा वारला. आमच्या ताई पेक्षा फारतर तीन एक वर्ष मोठ्या असतील.आनंदच्या वेळी मदतीसाठी म्हणून आशाने त्यांना घरी आणले. आनंदचा त्यांना इतका लळा लागला की चार, सहा महिन्यांसाठी घरी आलेल्या त्या, परत जायचे विसरल्याच आहेत. आम्हालाही त्या काही जड नाहीत. पण सगळे आयुष्य त्यांनी असेच काढायचे का? अशी टोचणी आम्हा दोघांना लागली आहे. तू विचार कर, त्यांचे शिक्षण काही फार झालेले नाही. विधवेने साधेच राहिले पाहिजे अशी आपल्या समाजाची अपेक्षा म्हणून त्या नेहेमी सध्या धुवत कपड्यात असतात आणि पोक्त वाटतात. तू विचार करुन सांग. आशाताईंनी यमुताईंना विचारले तेंव्हा त्यांनी साफ धुडकावून लावला तो विचार. तरी आशाताईंनी त्यांची समजूत घातली, त्यांना राजी केले. एक चांगला दिवस पाहून घरातच छोटासा कार्यक्रम करून दोघांचा विवाह लावून दिला. यमुताईंचे सालंकृत कन्यादान केले. आपल्या हातून एक चांगले काम घडले हे समाधान आशाताई आणि बाबांना झाले.
दिवस जात होते.आनंदचे शिक्षण उत्तम तऱ्हेने सुरु होते.त्याने आधीच जाहीर केले होते की मी शास्त्रज्ञ होणार. जगाला सतावणाऱ्या कॅन्सरवर संशोधन करणार. त्याप्रमाणे तो संशोधक झाला ही. त्याचे काम सुरु होते.
एक दिवस दुपारचा चहा घेत गप्पा मारत तिघेच बसले होते. चहा झाला. बाबांना थोडा खोकला आला. पाणी आणायला आशाताई किचनमध्ये आल्या. त्यांना पाणी दिले. परंतु त्यांनी एक घोट घेतला आणि मान टाकली. जोरदार हार्ट अटॅक येऊन क्षणार्धात सर्व काही संपले होते. आनंदला लगेच लक्षात आले की बाबा गेले आहेत. त्याचे अवसानच गळाले. मोठा गळा काढून रडावे असे त्याला वाटले परंतु त्याने स्वतःला सावरले. आता असे वागून चालणार नव्हते. त्याने आईला हाताला धरून आत बेडरूम मध्ये नेऊन बसवले. बाबांना मोठ्या कष्टाने कॉटवर निजवले.डोळ्यातून अश्रू वाहत होते. डॉक्टर ना फोन केलें, नातेवाईकाना फोन केले. सर्वजण आले,सर्व विधी पार पडले. दुसऱ्या दिवशीची दुपार झाली तरी आशाताई तशाच बसून होत्या. डोळे उघडे होते पण त्या काहीच पाहात नव्हत्या. अन्न पाण्याचा थेंबही त्यांनी घेतला नाही.रड नाही,कड नाही, बोलणे नाही. अगदी निश्चल बसून होत्या.आनंदने हरप्रकारे त्यांची समजूत काढली पण काही उपयोग झाला नाही.स्वयंपाकघरात जाऊन आनंदने थोडा वरणभात तूप मीठ लिंबू घालून कालवला आणि आईला खाऊ घालायचा प्रयत्न करू लागला. त्यांनी तोंड उघडले नाही. मग आनंद चिडला, रागावला. आईला म्हणाला, ”तू खाल्ले नाहीस तर मी उपोषण करणार. आमरण! मी शब्दाचा किती पक्का आहे हे तुला माहित आहेच आई.” माझा जन्मच तुझ्या सुखासाठी ,माझ्या हट्टाखातर झाला आहे.तू हे जाणतेसच. तुलाच जर दुःख वाटत असेल तर मी तरी जगून काय करू? माझे पण आमरण उपोषण!”
त्याचे बोलणे ऐकल्यावर आशाताई एकदम भानावर आल्या. त्याच्या तोंडावर हात ठेवून त्या एकदम ओरडल्या,” नाही रे बाळा, तू असा विचार सुद्धा करायचा नाहीस.” आणि त्यांनी स्वतःला जमिनीवर लोटून दिले. एखादा बांध फुटावा तसे त्यांच्या डोळ्यातून अश्रुंचे लोट वाहू लागले, त्या धो धो रडत राहिल्या. आनंदने त्यांना कवेत घेतले. सावरून बसवले. तो आईच्या पाठीवरून हलकेच हात फिरवत राहिला. थोड्या वेळाने आशाताई उठल्या, स्वच्छ तोंड धुतले, डोळे कोरडे केले. आनंदने आणलेला भात खाल्ला आणि उठून बेडरूम मध्ये जाऊन पडल्या. आनंदने त्यांच्या अंगावर शाल पांघरली.
दिवस जात होते.काळ पुढे सरकत होता. बाबां शिवाय जगण्याचा ती दोघे सवय करत होती.
एके दिवशी आनंद खूप आनंदात घरी आला.” आई आज मी खूप , खूप आनंदात आहे. मी करत असलेले संशोधन सहा महिन्या पूर्वी सहा कॅन्सर रुग्णांना दिले. आज सहा महिने झाले तरी त्या एकाचाही कॅन्सर वाढलेला नाही. त्यांना किती महिने दिलासा मिळतोय ते बघायचे आहे. आता पुढचे पाऊल म्हणजे हा रोग होऊच नये म्हणून प्रयत्न करायचे आहेत.”
“तुझे यश पाहून खूप आनंद झाला. आज तुझे बाबा असायला हवे होते.तुला कुठे ठेवू आणि कुठे नको असे झाले असते त्यांना. असो. आनंद आता तुझ्या लग्नाचा विचार करू या असे मला वाटते. तुला कोणी आवडली आहे का? की मी मुली पाहायला लागू?”
“आई, माझी एक सहकारी आहे. मी तुला तिच्या बद्धल सांगणारच होतो. ती दिसायला छान आहे, गोरी आहे पण माझ्या इतकी नाही. साधी आहे, पण बावळट नाही. अत्यंत अभ्यासू आणि हुशार आहे. तशी मितभाषी आहे पण मला नेमके काय हवे आहे ते तिला अचूक समजते. तिचे डोळे खूप सुंदर आहेत,बोलके आणि बुद्धीचे तेज असलेले. ती माझी सहकारी तर आहेच पण आयुष्याची जोडीदार म्हणूनही चालेल मला. अर्थात तुला पसंत असली तरच!”
“अरे उद्याच तिला आपल्या घरी घेऊन ये ना. मग बघू पुढे काय करायचे ते.”आशाताई त्याला म्हणाल्या. दुसऱ्या दिवशी आनंदने तिला घरी आणले.आशाताईंनी पाहिले. आनंदने वर्णन केल्या प्रमाणेच होती ती. छानशी साडी नेसली होती.तिचे डोळेही खरोखरच सुंदर,बोलके होते.” ये बाळ” आशाताईंनी तिचे हसून स्वागत केले. तिने त्यांना वाकून नमस्कार केला.” या घरात कायमचे यायला आवडेल का तुला?” त्यांनी विचारले. तिने लाजून होकारार्थी मान हलवली. छानसे खायला केले होते. नंतर त्यांनी तिला एक मस्त साडी दिली आणि अंगठीची डबी आनंदकडे देत म्हणाल्या “घाल तिच्या बोटात.आणि दोघेही देवाला आणि बाबांच्या फोटोला नमस्कार करा. त्यांचे आशिर्वाद घ्या.
आनंद आणि सुमनने वाकून देवाला आणि नंतर बाबांच्या फोटोला नमस्कार केला. ”ही बघा तुमची सून. हिला घरी आणतो आहोत. तुमचे आशिर्वाद हवेत.” आशाताईंनी गहिवरलेल्या आवाजात म्हटले.
थोड्या वेळाने सुमनला पोहोचविण्यासाठी आनंद निघाला तेंव्हा आशाताई म्हणाल्या,” आनंद उद्या यमु मावशीला भेटून या रे दोघे. तिचा खूप जीव आहे तुझ्यावर.”
“हो आई, माझ्या ते लक्षात आहे.” आनंद म्हणाला.
आशाताईंनी यमुताईंना फोन करून आनंदला मिळालेल्या यशाबद्धल आणि त्याने निवडलेल्या मुली बद्धल कळवले. तो दुसऱ्या दिवाशी त्यांच्याकडे जाणार हेही सांगितले.
आशाताईंचा फोन आला आणि यमुताईंची अगदी गडबड उडाली. काय करू आणि काय नको असे त्यांना होऊन गेले .त्याच्या आवडीचे सर्व काही करून ठेवून त्या वाट पाहात होत्या. इतक्यात त्याची आरोळी आलीच, ”मावशी मी आलोय ग. सोबत तुझी होणारी सून पण आणली आहे. सांग तुला पसंत आहे का?”
मावशीनी त्यांचे स्वागत केले.सुमनला गळ्यात सोन्यात गाठवलेली मोत्यांची माळ घातली.त्यावर आनंद म्हणाला ,”आणि मावशी माझ्या साठी ग?”
“तुला हा पेढा आणि तोंडभरून आशिर्वाद” मावशीच्या पाया पडून जोडी हसत हसत ,आनंदाने घराबाहेर पडली.

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
ही कथा माझ्या दिवंगत पुत्राला श्रद्धांजली आहे. (मूळ लेखिका)
*******

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मूळ लेखिका : माझी आजी , प्रतिभा पटवर्धन

Group content visibility: 
Use group defaults

खर तर पुत्र वियोग काय असतो हे त्या मातेलाच ठाऊक असते!
मायेची ओढ ही मनाला हेलावून टाकते! त्या मायेच्या स्पर्शात एकप्रकारची वेगळीच जादू असते.नात्यांचे हे बंधन अतूट असते.
कथेची छान मांडणी,कारूण्याची किणार असलेले आशाताईचे पात्र आणि जिव्हाळा लावणारी यमू! खूप छान आणि मनाला आनंद देणारे आहे आपले लेखन!
पुलेशु!

वेगळी कथा आहे.
आवडली.आजींना आम्हा सर्वांचा अभिप्राय नक्की कळवा.