श्रीभगवानुवाच...

Submitted by गीतानंद on 26 May, 2021 - 02:29

अंदाजे ५००० वर्षांपूर्वी महाभारत हे महाकाव्य व्यासांनी जन्माला घातले. त्यामागे त्यांचा काय उद्देश असेल? युध्द, कलह, मतभेद, हेवेदावे यांचा समावेश करून कादंबरी अधिक रंजक करणे आणि तिचा खप वाढवणे हा नक्कीच नसावा. महर्षींना लढायांमध्ये रस नाही. त्यांना ज्ञानामध्ये रस आहे. ते तत्वज्ञान स्वत: आचरणात आणून जिज्ञासूंना शिकवण्यामध्ये रस आहे.

महाभारत आणि त्यातही गीतेचा विचार केला की तत्क्षणी एक प्रतिकात्मक चित्र आपल्या मनात तयार होते. ते चित्र म्हणजे अर्जुन रथात बसलेला आहे. कृष्णाच्या हातात घोड्यांचे लगाम आहेत. तो सारथी म्हणून रथ हाकत आहे. आणि मागे वळून अर्जुनाला उपदेश करतो आहे.

हे अतिशय अर्थपूर्ण आणि सांकेतिक चित्र आहे. अर्जुन किती भाग्यवान! त्याला सल्ला द्यायला भगवंत होते. तुमच्या-आमच्यासारख्या सामन्य जनांना कोण सल्ला देणार? असं वाटणं सहाजिक आहे. पण ते तसं अजिबात नाही.

आपल्यापैकी प्रत्येकाच्या आत घडणारा मन आणि बुद्धी यांचा संवाद म्हणजे अर्जुन आणि भगवंत यांचा संवादच आहे. बुद्धी ही विवेक करणारी आहे. मनाला हा विवेक नाही, मन त्याच्या मनास येईल ते करत असतं. त्या मनाला जर विवेकाची जोड दिली तर मनाला थोडी परिपक्वता येते. विवेचक बुद्धी आपल्या आयुष्याचा सारथी आहे. विवेचक बुद्धी नेहमी आपल्याला इशारे देत असते धोक्याच्या सूचना देत असते. आतून काय कर आणि करु नको ते सतत सांगत असते. महात्मा गांधीनी जिला inner voice म्हणजे आतला आवाज असे म्हटले आहे तीच ही विवेचक बुध्दी! मन बहिर्मुख असल्यामुळे मनाचे विवेचक बुध्दीकडे लक्षच जात नाही. मनाला एक वाटते आणि बुध्दी एक सांगते. हाच कृष्णार्जुनसंवाद आहे. कृष्ण इथे विवेचक बुध्दीची भूमिका पार पाडतोय.

गीतेच्या सुरुवातीला अर्जुनाची अवस्था काय होती? गांडीव हातातून गळून पडलंय, अंगावर रोमांच, भीतीने शरीराला कंप सुटला आहे, काय योग्य काय अयोग्य ते कळत नाही. अश्या संभ्रमित अवस्थेत अर्जुन असतना या युध्दजन्य परिस्थितीकडे किती दृष्टीने पहावे लागेल ते सर्व दृष्टीकोन भगवंताने दुसऱ्या अध्यायात ११व्या श्लोकापासून ३६व्या श्लोकापार्यंत अर्जुनासमोर मांडले आणि ३७व्या श्लोकांत त्याला सांगितले ‘तस्मादुतिष्ठ कौन्तेय युध्दाय कृतनिश्चय: |’ आता शस्त्रासह उठ आणि युध्द करण्याचा निश्चय कर. याचाच अर्थ विवेचक बुध्दी संकल्प विकल्पात्मक मनाला सांगतेय उठ, युध्द कर आणि यशस्वी हो. हा संवाद ५००० वर्षांपूर्वी नाही तर त्यानंतरही अनेक वर्षं नित्य चालू आहे. हेच तर व्यासांना सुचवायचे नसेल?

हा भगवंत उपनिषदाने खऱ्या अर्थाने सुचविल्याप्रमाणे सारथी झालेला आहे. हे कृष्णार्जुनाचे चित्र अमूर्त अशा कल्पनेने साकारले आहे. आपली विवेचक बुध्दी सहसा आपल्या दृष्टीपथात येत नाही. ती आपल्याला आपल्या अंतिम ध्येयाकडे नेण्यास समर्थ आहे. पण आपण तिचे महत्वच अजून ओळखलेले नाही. अर्जुनानेही ते ओळखले नाही. अर्जुनाने फक्त भावनात्मक विचार केला. ‘माझे काका, माझे मामा, गुरुजन, चुलत बंधू यांना माझ्या राज्यसुखलोभासाठी मी कसे मारू?’ हा नि:संशय एकांगी विचार होता. त्याने सांस्कृतिक विचार केला नाही, सामाजिक विचार केला नाही की नैतिक विचार केला नाही. तो केवळ भावनेच्या आहारी गेला. असा एकांगी विचार फक्त मनच करू शकते. अशा वेळेला विवेचक बुध्दीचा काय आवाज आहे ते ऐकणे महत्त्वाचे असते. संपूर्ण गीतेमध्ये श्री भगवानुवाच असे जेव्हा म्हटले जाते त्यावेळेला हे विवेचक बुध्दीचे बोल आहेत हे समजावे. आपल्याबरोबर आत श्रीकृष्ण नाही असे म्हणण्याचे मुळीच कारण नाही. कठोपनिषदानुसार आपल्या आयुष्याचा रथ यशस्वीपणे आपल्या गन्तव्यापर्यंत नेणे हे विवेचक बुध्दीचे कार्य आहे. म्हणून तिला सारथी म्हटले आहे. ही विवेचकबुध्दी म्हणजे श्रीकृष्णच आहे.

कठोपनिषदामध्ये २ अध्याय आहेत. प्रत्येक अध्यायात तीन वल्ली म्हणजे प्रकरणे आहेत. एकंदर सहा वल्ली आहेत. सदर विचार पहिला अध्याय तृतीय वल्ली मंत्र ३,४ मध्ये आहे.

आत्मानं रथिनं विध्दि शरीर रथमेव तु |
बुध्दिं तू सारथिं विध्दि मन: प्रगहमेव च ||३||

अन्वय - आत्मानम् रथिनम् विध्दि| शरीरम् रथम् एव तु| बुध्दिम् तु सारथिम् विध्दि| मन: च प्रगहम् एव विध्दि|
अर्थ - आत्मा रथाचा स्वामी आहे, शरीर रथ आहे, बुध्दी सारथी आहे आणि मन लगाम समज.

इन्द्रियाणि हयनाहुर्विषयांस्तेषु गोचरान्|
आत्मेन्द्रियमनोयुक्तं भोक्ते त्याहुर्मनीषिण: ||४||

अन्वय - मनीषिण: इन्द्रियाणि ह्यान् आहुः | तेषु (इंद्रियेषु) गोचरान् विषयान् | आत्मा – इंद्रिय - मन युक्तम् भोक्ता इति आहुः ||
अर्थ - विद्वान लोक इंद्रियांना अश्व म्हणतात. इद्रीयांना विषयवस्तू समज. शरीर, इंद्रिय आणि मन यांनी युक्त अशा जीवाला भोक्ता असे म्हणतात.

हे दोन मंत्र या रूपकाचे संपूर्ण वर्णन करतात. आत्मा या रथाचा मालक आहे त्याला स्वत:ला प्रवास करावयाचा आहे. मार्गावरून धावणारे घोडे इंद्रिय आहेत. घोड्यांना मनाचा लगाम आहे. लगाम भगवंताच्या हातामध्ये असून तो मागे वळून अर्जुनाला सांगत आहे.

सारथी जर प्रशिक्षित असेल तर तो घोड्यावर नियंत्रण ठेवेल. घोडे त्याच्या ताब्यात असतील. सारथी जर अशिक्षित असेल तर घोडे चौखुर उधळतील आणि रथ खड्ड्यात घालतील. त्यामुळे हा रथसारथ्य करणारा सारथी सजग, सुजाण, समर्थ असायला हवा. त्याच्या ठिकाणी शास्त्र काय सांगते, संस्कृती काय सांगते, सामाजिक प्रथा काय आहेत, चालीरीती काय आहेत या सर्वांचे भान असणे आवश्यक आहे.

जीवामध्ये प्रविष्ट झालेला हा आत्मा सोपाधिक आत्मा आहे. हा देह म्हणजे रथ आहे. वाहन आहे. सारथी बुध्दी आहे. मन म्हणजे सारथ्याच्या हातातील लगाम आहेत. ते घोड्याची गती आणि दिशा यावर नियंत्रण ठेवतात. पंच ज्ञानेंद्रिये हे घोडे आहेत. शब्द, स्पर्शादि पाच विषय हे या पाच घोड्याचे मार्ग आहेत असे विद्वान लोक म्हणतात. (मनीषिण:) या सोपाधिक आत्म्याला भोक्ता असे म्हटले आहे.

शास्त्र पुराणात या रूपकाची चर्चा अनेकवेळा झालेली आहे. गीतेमध्ये आत्मा हा शब्द देहासाठी, मनासाठी, बुध्दीसाठी, प्रत्यक्ष आत्म्यासाठी किंवा व्यक्तीसाठीही वापरलेला आहे. इथे आत्मा हा शब्द देहासाठी वापरलेला आहे.

हा आत्मा; देह-इंद्रिय-मनाने युक्त आहे. या आत्म्याला या प्रवासात अनेक बरे-वाईट अनुभव येणार आहेत. लगाम मन:संयम सुचवितो. मन संयमित असेल तर ते घोड्यांना व्यवस्थित नियंत्रित करू शकेल. मन नियंत्रित तर इंद्रिय नियंत्रित. Sensory control is essentially a thought control. विचारांवर आपले नियंत्रण असेल तर इंद्रियेही आपोआप नियंत्रित होतील. विचार आपली जागा सोडून बाहेर गेला नाही तर इंद्रियांना बाहेर जायला वाव मिळणार नाही.

स्थूल देह रथासारखा आहे. पण जोपर्यंत याला घोडे जुंपलेले नाहीत तोपर्यंत तो रथ तेथेच उभा राहणार. रथाला गति हवी असेल तर त्याला घोडे जुंपणे आवश्यक आहे. नुसता स्थूल देह जड आहे, ज्ञानेंद्रिय असल्यामुळे ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून या देहाचा बाहेरच्या जगाशी संपर्क होतो. व्यवहार होतो. आणि त्यातून आपल्याला सुख- दु:खाचा अनुभव मिळतो. म्हणून आत्म्याला भोक्ता म्हटले आहे. प्रत्येक जन्मामध्ये आपल्याला देह-इंद्रिय-मन-बुध्दी मिळणार आहे. यांच्यासह वावरणारा जो जीव आहे त्याला इथे भोक्ता असे म्हटले आहे. याठिकाणी देह-इंद्रिय-मन हा एक गट आहे. बुध्दी स्वतंत्र आहे. बुध्दीला या खालच्या तिघांशी काही देणे-घेणे नाही. बुध्दीला निर्णय करणे आणि विवेक करणे महत्त्वाचे आहे. ती आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करणार आहे. आपल्याला फक्त देहेन्द्रीय-मन व्यवस्थित ठेवावे लागणार आहे. या देहरूपी रथाची डागडुजी, ज्ञानेंद्रिय घोड्याचे आरोग्य आणि मनरूपी लागामाची परिपक्वता इत्यादी सर्व व्यवस्थित ठेवावे लागणार आहे. हा देहरूपी रथ flight worthy म्हणजे प्रवासाला योग्य असला पाहिजे. हा भाग या रूपकामध्ये बघता येईल आणि कठोपनिषदामध्ये याची सविस्तर चर्चा आहे.
महर्षि व्यासांना गीता लिहिताना निश्चितपणे त्यांच्या डोळ्यासमोर हे रूपक असले पाहिजे. ऐतिहासिक मेळ त्यात व्यवस्थित बसला आहे.

कृष्णासारखी एक अधिकारी व्यक्ती जी विचारी आहे, ज्ञानी आहे, ज्याने अनेक राजांना मदत केली आहे, अनेकांना मार्गदर्शन केले आहे. अशा भगवंताला अर्जुन शरण गेला. शरणागती म्हणजे भक्त आणि भगवंत अशा तऱ्हेची शरणागती इथे गीतेमध्ये अपेक्षित नाही. अहंकारी जीवाने स्वरूपाशी केलेली शरणागती नाही. एक पायरी खाली फक्त मन-बुध्दीचा संवाद आहे. भगवद्गीतेतील अर्जुन हा ज्ञानाचा अधिकारी नसून कर्माचा अधिकारी आहे. पण ज्ञानप्राप्तीसाठी उपाय म्हणून जो योग आहे. त्या योगाविषयी विवेचन भगवंताने केलेले आहे. ज्यामध्ये मन बुध्दीचे ऐक्य आहे. यात सर्व योग आले. गीता हे योगशास्त्र आहे. अर्जुन ज्ञानाधिकारी व्हावा यासाठी उपाय म्हणून योग आहे. ज्ञानाचा अधिकारी झाल्यावर मग स्वरूपाशी योग शक्य आहे.

हे महाभारत युध्दाचे चित्र घरामध्ये लावू नये असे अनेकांचे मत आहे. हे चित्र लावल्याने घरात भावा-भावांमध्ये भांडण, वाद निर्माण होतील असा समज आहे. पण हे महाभारत युध्द म्हणजे केवळ भावा-भावातील कलह नसून सत्प्रवृत्ती आणि दुष्प्रवृत्ती यामधील युध्द आहे. हे आपल्या आतमध्ये नित्य चालू आहे. त्यामुळे चित्र लावण्याने कलह निर्माण होणार नाहीत उलट हे चित्र आपल्याला आत्मपरीक्षण करण्यास उद्युक्त करेल. आपल्यातील सत्प्रवृत्तीने दुष्प्रवृत्तीवर मात करणे आवश्यक आहे हे सुचवित राहील.

Group content visibility: 
Public - accessible to all site users