गाईड ( धक्कथा)

Submitted by ------ on 13 May, 2021 - 16:49

"जीव द्यायला गडच सापडला का ?"

स्वतःच्याच नादात असलेली ती या प्रश्नाने थबकली. आवाजाच्या रोखाने तिने पाहीले. जवळपासच्याच गावातला कुणीतरी खेडूत होता. रापलेला वर्ण, पस्तिशीच्या घरातले वय पण केस मागे गेलेले. धारदार नाक, पाणीदार डोळे मात्र अतिशय गबाळा वेष.

मी काहीही करीन याला काय करायचं असा विचार येऊन ती जमेल तितकं उर्मट उत्तर देणार होती. पण त्याच्या नजरेत असं काही होतं की ते उत्तर आवंढ्यासोबत गिळलं गेलं.

" मरण्याची हौस आहे ?"
" तुम्हाला कुणी सांगितलं मी इथे जीव द्यायला आलेय म्हणून ?"

गबाळा इसम हसला.
" नावालाच गड आहे हा. वर ना कुणी रहायला, ना आडोसा, ना आजूबाजूला वस्ती. पायथ्याला गाव नाही. चढायला धडक्या पाय-या नाहीत. इथपर्यंत चढून हे कड्याचं टोक गाठायचं काम कोण करणार ? त्यातून चांगल्या घरची बाई दिसतेस तू. घर सोडून इथे कशाला आलीस ? मरायलाच ना ?"

ती चुळबूळ करत राहिली. पायाच्या अंगठ्याने जमीन खोदू लागली.
" तुम्ही काय करताय इथे ?"

तो गडगडाटी हसला.
" कात्रीत पकडायला बघतीस का बाय ? मी पण जीव द्यायलाच आलोय. "
" मग दे की जीव "
" देईन की. पण एकट्यानं बरं असतं. दोघं म्हटल्यावर जीव द्यायला बरं वाटत नाही. तू असं कर. आताच्याला घरी जा. माझा जीव देऊन झाला की परत ये "
" तू जा कि घरी. "

त्याने तंबाखू काढली. मळली.

" चुना राहिला. असं कर जीव द्यायचाच आहे ना ? मग घरी जाऊन चुना घेऊन ये माझ्यासाठी "
" शहाणाच आहेस. घरी गेल्यावर परत येता येईल का मला. तू जाऊन घेऊन ये. तू इथं असेपर्यंत मला पण जीव देता येणार नाही "
" बरं. चल तू दे आधी जीव "
" तुझ्या समोर ?"
" काय झालं ? जीव नकोसा झाला असंल तर जीव द्यायला अटी लागत नाहीत "
" तू जा इथून. माझं मी बघून घेईन "

तुम्ही वरून तू वर कधी आले ते दोघांनाही समजले नाही.

" भीती वाटते का ?"
" कशाची ?"
" जीव द्यायची ?"
" मला का भीती वाटावी ?"
" मग दे की जीव "
" तू का माझ्या मागे लागलास जीव दे म्हणून ? माझं मी ठरवीन "
" तुझं काम सोप्पं करत होतो "
" तुझं तू बघ "
" माझं ठरलंय "
" माझं पण ठरलंय "
" मग दे जीव "
" अरे हा खेळ आहे का ? तू सांगायचं आणि मी जीव द्यायचा ?"
" तुला भीती वाटतेय. माझ्यासमोर जीव देताना कच खायची शरम वाटतेय "
" आत्ता ? मान ना मान , मै तेरा मेहमान ? माझ्याशी बोलू नकोस. तू इथून जा "
" मी गेलो आणि जीव देता नाही आला तर ?"
" तर काय ?"
" निर्मनुष्य गड आहे. आजूबाजूला कुणी नाही. अंधार व्हायला आला आहे. परत कशी जाणार ? सोबत नको का ?"
" काही गरज नाही. मी परत जाणार हे कुणी सांगितलं ?"
" तुझ्या डोळ्यातल्या भीतीनं "
" तुला बरी माझ्या डोळ्यात भीती दिसली ? आणि कसली भीती रे ?"
" मरणाची. माझ्या डोळ्यात बघ. जगायची भीती आहे. मला जगणं नको झालंय. तुझ्या डोळ्यात जगण्याची भीती नाही."
" हे कुणी सांगितलं ?"

तो गंमतीशीर नजरेने पाहू लागला. काय नव्हतं त्या नजरेत ? किंचित उपहास, थट्टा आणि वास्तवाची जाणीव असं सगळंच होतं.
ती गप्प बसली. हा कुठून आला कडमडायला ?
" थोडा वेळ हिंमत येईपर्यंत गप्पा मारू"
" मला नाही गरज "
" मरण्यापूर्वी आपलं दु:खं सांगावं कुणाला तरी. खूप कुढत बसली आहेस. मन हलकं होईल. मेल्यावर आत्मा भटकत राहणार नाही. थेट मुक्ती मिळेल "
त्याच्या बोलण्याचा आता राग येईनासा झाला होता, माणूस गबाळा होता, भोचक होता पण मजेदार होता,
या क्षणी का भेटलाय हा ? हा माझा निर्धार डळमळीत करतोय का ? नाही. मी आपल्या निश्चयापासून मागे हटणार नाही.

पुन्हा जाऊन काय करू ? कुणी नाही माझं. कुणी समजून घेत नाही. किती केलं सर्वांसाठी कुणाला कदर नाही. मूल होत नाही म्हणून अजून किती काळ सहन करायचं सगळं ?

" तुझी सांग की स्टोरी "
" माझी ? सांगतो. पण खूप मोठी आहे. माझी स्टोरी ऐकत बसशील तर मरायचा इरादा बदलशील. तुला का मरावंसं वाटतंय ? "

तिने विचार केला. नाहीतरी मरायचंच आहे. याला सांगितलं तर काय फरक पडणार आहे ? नाहीतरी पोटात घेऊन कसं जायचं ?
तिने मूल न होण्यावरून होणारा जाच, टोमणे हे सगळं सगळं सांगितलं. कितीही चांगलं वागलं तरी शेवटी विषय तिथेच येत होता. दुस-या लग्नाबद्दल सुचवलं जात होतं.

"इतकंच ?"
" इतकंच ? बाप्या माणसाला सांगून तरी काय फायदा ? समजणार नाही काय वाटतं ते "
त्याने काडी उचलली. कान साफ केला.
" मूल होईल ना आज उद्या. गप्प होतील सगळे. अजून बरंच आयुष्य आहे "
" मी आता आशाच सोडलीय. आणि त्या आशेवर किती वर्ष हे सहन करू ?"
" नव-याला सोड "
" ए मेल्या ! जीभेला हाड काही ?"
" नाही. तुझा आयुष्यावर विश्वास नाही. प्रत्येकाला एक तरी संधी मिळते "
" मग तू का आलास जीव द्यायला ?"
" सांगणं सोपं असतं. नियती संधी देते पण आपलीच अक्कल गहाण पडलेली असते. ती ओळखता येईपर्यंत उशीर झालेल असतो "
" तुला काय झालं ?"

त्याने शून्यात नजर लावली.
" माझी एकुलती एक बायको ! बाहेरख्याली निघाली. तिच्यासाठी जे नाही ते केलं. पण तिने ना माझी, ना समाजाची पर्वा केली. इज्जतीशिवाय पुरूषाने कसं जगायचं ? माझी इज्जत बायकोच्या पदरात होती. आख्खं गाव मला हसतंय. जे ते बोलतंय. तिला समजून सांगितलं. झालं गेलं विसरून जाऊ , दुस-या गावाला जाऊ. चुका सुधारून इज्जतीनं जगू . पण तिनं ऐकलं नाही. ज्याच्याशी संबंध ठेवलेत त्याच्याकडं सत्ता आहे. निरोप देऊन बोलवण्याइथपर्यंत त्याची भीड चेपली. हे सगळं सहन होत नाही म्हणून जीव द्यायचं ठरवलंय. माघारी फिरायची भीती वाटते "

" तूच म्हणाला ना पुन्हा संधी मिळते ? तुला कुठली संधी मिळणार होती ? "
" राग येऊ देऊ नकोस बाय. तू भेटलीस इथं. तुझी समस्या आणि माझी समस्या एकमेकीचं उत्तर नाही का ? "
" म्हणजे ? काय म्हणायचंय तुला ? नीट बोल "
' मी म्हटलं ना राग नको येऊ देऊ. तू तुझा नवरा सोड. मी बायको सोडतो. जीव द्यायला लावणारे मजेत राहतील. आपण का जीव द्यायचा ? असे होऊ शकले असते हा विचार आला. तुला असे कर असे म्हणायचे नाही मला. तुला दुसरा कुणी भेटल. आधीचा कुणी असल त्याच्याकडं जा. जीव देऊन काय होणार ? "
" आणि तू ?"
" मी इथं पहिला आलो. शेवटी जाणार. तू नीघ आता. तुझ्यात आता जीव द्यायसाठी तिडीक नाही उरली "
त्याने मानेनेच तिला निघायची खूण केली.

" एकटी कशी जाऊ? "
" तू पुढं हो. काही झालंच तर मागून येईन मी "

तिची चुळबूळ चालू झाली. अंधार दाटून यायला लागला, दोन्हीतलं एक काहीतरी करणं गरजेचं होतं.
जीव काय कुणाला साक्षी ठेवून द्यायची गोष्ट आहे का ?
याला बसू दे इथंच. हा हलणार नाही. नंतर येऊ पुन्हा.

या विचारानिशी ती निघाली.
मघाशी तो बोलत असताना तिला लग्नाच्या आधीचा तो आठवला. त्याला हसून उडवून लावला.
त्याच्या बरोबर गेले असते तर सुखी झाले असते. एकदा विचार आला आणि मग या गबाळ्या माणसाचा राग आला.
टिपकागदावर शाईचा थेंब पडावा आणि तो पसरत जावा तसा त्याने पेरलेला विचार तिचा ताबा घेऊ पाहत होता.

" येते "
ती उठत म्हणाली.
पंधरा वीस पावलं गेल्यावर तिने वळून पाहीलं.
पाठीमागे त्या पठारावर कुणीही नव्हतं

समोर कातळकडा आणि उंचावर पसरलेलं पठार. वर आकाश आणि त्याखाली ती एकटी होती. अगदी एकटी.
तिला कड्यावरून खाली बघावंसं वाटलं. पण प्रचंड भीती दाटून आली.
आणि सगळ्याचा अर्थ लक्षात येताच ती उसनं बळ आणून पळत सुटली.

खाली येताना ती घामाघूम झाली होती.
एक धनगर जोडपं मेंढ्या घेऊन निघालेलं तिला आवाज देत होतं .

" वर कशाला गेलती या वक्ताला ?" बाई विचारत होती.
तिने फक्त बोट दाखवलं वरच्या दिशेने.

बाईने कपाळावर हात मारून घेतला.
" तुला बी दिसला व्हय त्यो ? बये त्यानं जीव दिलाय तिथून "

शुद्ध हरपत चालल्याची जाणीव तिला होत गेली.
(समाप्त)

टीप : एक वेगळ्या धाटणीची अरब कथा आहे. नीट लक्षात नाही. पण त्यावरून प्रेरीत आहे. (ढापलेली नाही).

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Dhakatha lihu Naka na shirshakat.
Tyamule andaj bandhala jaun maja jatey..
Katha chan ahe.

वपुंची एक कथा आठवली. येत नसताना बासरी वाजवणारा, आत्महत्या करणाऱ्याला शर्ट वगैरे मागणारा माणूस.

मित्रहो.
कथा आवडली याबद्दल आभार. मी अनेक वर्षांपूर्वी कथा, कविता इत्यादी लिहीणे सोडून दिले आहे. आता फक्त चंमतग लिहीतो.
ही कथा मूळच्या अरेबियन / पर्शियन भाषेतल्या आत्महत्येची टेकडी कि अशाच एका कथेवरून घेतलेली आहे. काल ही कथा टाकण्याचे प्रयोजन शेवटी स्पष्ट करतो.

मूळ कथा अशी आहे..
सैतानाचा दूत लोकांना आत्महत्येस प्रवृत्त करत असतो. लोक एका टेकडीवर आत्महत्येसाठी रांग लावत असतात (याचे एक विनोदी प्रहसन सुद्धा वाचले होते. पण आता अजिबातच लक्षात नाही ते.) तिथे एक मनुष्य रांगेतल्या माणसाला कुठली तरी खाण्याची एक गोष्ट मागत असे. कदाचित खायचा कात असेल.

त्यामुळे लोक त्याच्याशी बोलू लागत आणि तो त्यांना आत्महत्येच्या विचारापासून परावृत्त करत असे. ही त्याची ट्रीक होती. कात कि अन्य काही मागण्याची. त्यामुळे ते सैतानाच्या प्रभावातून बाहेर येत. त्याच क्षणी तो त्यांच्याशी सतत बोलून जीवनाबद्दल आसक्ती निर्माण करत असे. त्याची नेमणूक अर्थातच देवाने केलेली असते. अशा प्रकारे तो सर्वांना आत्महत्येच्या विचारापासून दूर नेतो.
या कथेवरून बेतली असल्याने मी ती कितीही खुलवली तरी ती कथा माझी नाही. तिच्यात नावीन्य नाही.

हीच गोष्ट काल एका तरूण मित्राला सांगितली. तेव्हां त्याने आपली कथाच डिलीट केली. मी त्याला हे ही सांगितले की ज्या कथा मी सांगतोय त्या तू वाचल्या असतील हे शक्यच नाही. कारण तू तरूण आहेस. या कथा तुला माहीत असणेही शक्य नाही. मात्र तुझ्या कथा भिन्न असल्या तरी बीज कुठे आधीच लागलेले असेल तर त्यात नावीन्य नाही. त्यासाठी तू वाचन वाढव. कदाचित रिपीटेशन टाळता येईल.
त्याने डिलीट करण्याचे कारण माझे म्हणणे पटले हे आहे की त्याला आवडले नसावे कि तो दुखावला गेला हे समजले नाही. हे प्रात्यक्षिक त्यासाठी केले. आज ही कथा कदाचित नवीन वाटेल. खपेल. पण मूळ कथा सांगितल्यावर तिच्यात नावीन्य नाही हे पटेल. वाचन त्यासाठी असायला हवे हा मुद्दा होता. आभार.

बोकलत - मी कथा लिहीणे सोडून दिल्याला जमाना झाला आहे. माझी शैली तेव्हां जी होती ती आज आहे.
पद्य - हा व्हिडीओ आताचा असेल. मूळ कथा कोणती हे काल सांगितलेले आहे.
धन्यवाद सर्वांचे.

आवडली.
वाचन हवं हे अगदीच मान्य!

मुराकामीचं वाक्य आठवलं..“If you only read the books that everyone else is reading, you can only think what everyone else is thinking.”

पद्य - हा व्हिडीओ आताचा असेल. मूळ कथा कोणती हे काल सांगितलेले आहे.>> गैरसमज नसावा... मी कथा वाचली आणि तो video आठवला म्हणून त्याची link दिली... Please don't take my previous comment in negative way.

अरे अरे पद्यसर ! तुम्ही उगीच रागावला आहात माझ्यावर. मी तुम्हाला इतकेच म्हणालो कि तुम्ही जो व्हिडीओ दिला आहे तो अलिकडचा आहे, मूळ कथा खूप जुनी आहे. तसे मी कथेत आधीच म्हटलेले होते. याचा अर्थ तुमचा व्हिडीओ सुद्धा तिथून घेतला असेल. तुम्हाला ही कमेण्ट नकारात्मक वाटली आणि त्रास झाला त्याचे मला खूप दु:ख होते आहे. तुमचा हेतू कितीतरी उदात्त आणि पवित्र होता हेच मला सांगायचे होते. बास तेव्हढी कथा कुठून घेतली हे वाचले असते तर तुम्हाला कष्ट पडले नसते असे मला वाटते.तुम्हाला झालेल्या मनःस्तापाबद्दल व त्रासाबद्दल दिलगीर आहे. आपण म्हणाल तसे.