अमृतवेल

Submitted by ज्येष्ठागौरी on 8 May, 2021 - 02:01

अमृतवेल

मधले दोन तीन महिने बरे गेले म्हणायचे आणि परत एक झंझावात आलाय.ऑफिसात बसल्या बसल्या सतत ambulance चे आवाज घोंगावताहेत.ऑफिसमध्ये रोज कोणीतरी positive असल्याच्या बातम्या येताहेत आणि जवळच्या माणसांना आणि त्यांच्या जीवलगांना गिळून टाकल्याच्या जखमा भरायचं नावच घेत नाहीयेत. उन्हाळा जास्त प्रखर वाटतोय.. तसा ह्या वर्षी पावसाळा आणि थंडीही जास्त वाटली कारण मन स्वस्थ नाहीये.बाहेर जाता येत नाही, अनेक बंधनं आहेत ह्याचं काही वाटत नाही, तो समजूतदारपणा आहे जवळ पण प्रत्येक माणसाभोवती आणि वस्तूभोवती आपोआप एक अदृश्य असं असुरक्षिततेचं वलय येतंय त्याचं काय करु?मी स्वतःला काही मर्यादेपर्यंत वाचवीन पण बाकीच्यांचं काय करु. माझ्यामुळे कोणालाही त्रास होऊ नये असं वाटतं आहे, त्याबद्दलची अनिश्चितता भेडसावतीये त्याचं काय करु?मुलांचे आयुष्याचे पुढचे बेत डोळयांसमोर ढासळताहेत त्याचं कसं काय करु? माझ्या खूप खूप जवळची माणसं ह्या लढाईत प्रत्यक्ष आहेत त्यांची जी काळजी मला सतत भेडसावते आहे त्याचं काय करु? ती सगळी दमली आहेत हे जाणवतंय पण मदतीला जाऊ शकत नाही ही भावना खोल बोच देतीये.रोज समाज माध्यमांवर माझ्या ह्या जवळच्या व्यक्तीसाठी प्रार्थना करा म्हणणारे संदेश येताहेत.तिथे मनापासून प्रार्थना संदेश पाठवते आहे.स्वतःला काही होईल ही भीति मागे पडून आपल्यापासून दुसऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून आटोकाट जपताना कठीण जातंय.मास्क घालून काम करताना तक्रार करुच शकत नाहीये कारण PPE घालून काम करणाऱ्यांचं विचार सतत मनात आहे.हा शत्रू छुपा आहे आणि अक्राळविक्राळ रूप धारण करतोय शरीरात गेल्यावर आणि मनात तर ठाण मांडून बसलाय सगळ्यांच्याच. कोणाच्याही बोलण्यात ह्या घडीला दुसरा विषय असणं शक्य नाहीये.तरीही कोणीतरी अजून बेफिकीरपणे रस्त्यावर थुंकतं आहे त्यांच्याशी भांडून मला थकायला होतंय, साध्या गोष्टी लोक पाळत नाहीयेत त्याचा संताप होतोय, समारंभाला गेलं नाही तर अति काळजी ह्या अन्वये टोमणे येताहेत त्यांना मागे टाकलं तरी जे तरीही जमताहेत त्यांचं काय करू?कोणीतरी मास्क खाली करुन बोलतंय, त्यांना काय सांगू.मी घरात बसू शकतेय पण माझ्या डोळ्यासमोर रस्त्यावर पिशव्या हातात घेऊन चालत जाणारी कुटुंबच्या कुटुंबं दिसताहेत त्यांना नजरेआड केलं तरी मनाच्या आड कसं करु आणि का करु?ज्यांची भरमसाठ नुकसानं झाली आहेत,ज्यांना खूप मदतीची आवश्यकता आहे तिथे तिथे करते आहे.
मला खूप मदत करावीशी वाटते आहे,जिथे शक्य आहे तिथे करते आहे पण अजून खूप क्षमता आहे आणि हात बांधलेत ह्या भावनेतून बाहेर कशी येऊ?
आपण बरं आणि आपलं कुटुंब बरं ,केवळ एवढाच दृष्टिकोन ठेवावा असे संस्कार नाहीयेत मनावर आत्तापर्यंतचे पण आता नेमकं तेच करावं लागतंय,ही मनाची चिरफाड कशी थांबवू?
एक बेखाँफ निर्भय वावर कधी सुरु होणार आहे ,तो होणार आहे का याबद्दल साशंक आहे, धास्ती आहे.कोणी म्हणतं हे अजून खूप काळ चालेल ते खरं मानू का आजचा दिवस आपला म्हणून जगू की ढकलू?एकदिलाने काम करणं गरजेचं आहे हे माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला जे समजतं आहे ते भल्याभल्या राजकारणी लोकांना का समजत नाहीये हे अनाकलनीय आहे. राजकारण करणाऱ्या लोकांच्या कोडगेपणाची लाज मला वाटते आहे.माणसांचा सामान्यपणे जगण्याचा आणि आता तर सामान्यपणे मरण्याचाही हक्क नष्ट झालाय.
माझी जिवलग मैत्रीण सुचू (डॉ सुचेता करंदीकर अय्यरआणि तिचा नवरा शिवा,डॉ शिवकुमार अय्यर)हे दोघे गेले पूर्ण वर्षभर कोविड च्या लढाईत स्वतःला झोकून दिलेले सैनिक आहेत आणि डॉ अस्मिता बोधे ही माझी अगदी जवळची मैत्रीण महापलिकेच्या दवाखान्यातून अथक काम करते आहे.ही तीन फक्त प्रातिनिधिक नावं आहेत, कारण ह्या तिघांना मी खूप जवळून ओळखते म्हणून ह्या तिघांची नावं! विचित्र लढाईत जराही विश्रांती नाही आणि स्वतःच्याही किंवा घरच्यांच्या आजारपणाना मागे टाकत, ओळखीची, रक्ताची,स्नेहाची नाती असणाऱ्या आणि अनोळखी, असं कुठलंही नातं नसणाऱ्या, नावाच्या आणि बिन नावाच्या रुग्णांची सेवा करताहेत.
ह्या तीन नावांबरोबर माझी असणारी अनेक जवळची माणसं ह्यात सैनिक आहेत, माझी भौतिकोपचार करणारी लेक तिच्या पेशंट्सची प्रगती थांबू नये म्हणून,ते मागे जाऊ नयेत म्हणून न घाबरता उपचार करत राहतीये आणि ज्यांना मी ओळ्खतही नाही असे लाखो अदृश्य हात माझ्या कुटुंबाला मदत करायला सरसावले आहेत. लाखो हात त्यांची बुद्धी,शारीर क्षमता आणि मन हे तिन्ही कस लावून रुग्णांना आणि त्यांच्या माणसांना बाहेर काढताहेत,ह्यात त्यांच्या वैयक्तिक लढाया वेगळ्याच आहेत.
सर्व नियम काटेकोर पाळणे हीच ह्या मंडळींना आणि त्यांच्यासारख्या परमेश्वरी हातांना मदत असं मी समजते. त्यांची काळजी घेणं हे ह्याच पद्धतीनं आहे असं मी समजते.
कोविड वरचे कुठलेही विनोद मी फॉरवर्ड करु शकत नाही.त्याच्यावर मला कणभरसुद्धा हसू येत नाही.खूप अस्वस्थता आली आहे मनात. एक अनामिक भीति, दुःख,असुरक्षितता, कोंडमारा, सगळं सगळं!
आत्ताच्या या काळामध्ये इतक्या अवांछित गोष्टी कानावर येत आहेत ,मनात राहत आहेत, घडत आहेत त्यामुळे मन अगदी उदास उदास साचून राहिले आहे.सगळ्या जगाच्या चांगल्या अर्थानं उठाठेवी करणारे आपण आज आपण बरे आणि आपले कुटुंब बरं ह्या चालीवर,छोटं योगदान देत बसलोय पण फार सुखदायी नाहीये ते. Sometimes we need someone to simply be there, not to fix anything or do anything in particular, but just to let us feel we are supported and cared about.
आज सकाळी शुष्कपणे हातात कप घेऊन बाहेर बसले होते , हिरव्या कंच पोपटांचा थवा कलकलाट करत उडला, त्यांचा रंग आणि आवाज आत शांत करून गेला.
घरातल्या स्पायडर लिलीला ह्या वर्षात तिसऱ्यांदा भरभरून फुलं आली आहेत.आता मोगरा खुश झालाय.
ऑफिसातल्या कोणाच्यातरी जाण्यानं गदगदून आलं आहे,एका, रोज जिच्याशी बोलल्याशिवाय करमत नाही अशा मैत्रिणीशी बोलल्यावर थोडं ओसरलं मनातलं.
अमावस्येच्या गर्द रात्रीत दिसणारी नक्षत्रं,आणि तसाच झाडामागचा पौर्णिमेचा चंद्र,अचानक येणारा दांडगट वळीव सुखावह आहेतंच..
दुपारी बेल वाजली आणि शेजारी राहणारा आमचा नवीन सोनेरी शेजारी निको शेपटी हलवत दारात उभा,दार उघडताच सरळ आत घुसला, तशीही त्याला कधी परवानगी लागत नाही.चेहरा आनंदी, कानात वारं. धूमशान केलं अर्धा तास!किती ते प्रेम त्याचं.काहीही अपेक्षा न ठेवणारं..
काल बाहेर जाताना जवळजवळ वठलेल्या एका बहाव्याच्या झाडाला भरपूर पिवळी पिवळी फुले आलेली पाहिली. प्रसन्न वाटलं.
लास्य नावाचा अनुष्का शंकरची वादनाची क्लिप आहे, लास्य म्हणजे शिवपार्वती नृत्य करताना, श्री शंकरांचं तांडव आणि पार्वतीचं लास्य, नाजूक आणि लयबद्ध नृत्य.अनुष्का शंकरनी ते इतकं सुंदर वाजवलं आहे.फार प्रसन्न वाटतं ऐकलं की.तिच्या चेहऱ्यावरचे भावही वेगळे एक सूक्ष्म वेदना तरीही आतून आलेली प्रसन्नता.आज परत ऐकायला हवं!
किकी बेलो नावाच्या electric harp नावाचं वाद्य वाजवणाऱ्या मुलीनी despacito जे वाजवलं आहे ना त्याला तोड नाहीये. तिची आणू अनुष्काची बोटं वाद्यांवर फिरल्यावर जे स्वर्गीय सूर उमटतात त्याचा आनंद फार खोल जातोय.ऑफिसमध्ये कोणाच्या कोणासाठी बेड किंवा प्लाजमा किंवा लस मिळण्यासाठी निरपेक्ष भावनेनं मदत करणारी मंडळी आठवताहेत.कोणी कोणाला डबे देतंय, कोणी काही इतर मदत करतंय!त्या सगळ्याची आठवण येतीये.धीर येतोय थोडा थोडा..आजच एका मैत्रिणीनं इतकं छान लिहिलं आहे. ती नवीन गावात रहायला गेली आणि तिला कोविड झाला ,हे तिथं कळल्यावर अनोळखी शहरात,अनोळखी वस्तीत,तिला आणि तिच्या लेकाला रोज नाश्ता आणि दोन वेळचं जेवण ताबडतोब यायला लागलं.मैत्रीण म्हणते कोणाच्या घरुन येत होतं माहिती नाही पण अगदी गरमागरम, चविष्ट आणि बरोबर एक छोटीशी, लवकर बरे व्हा अशी गोड चिठ्ठी.त्या डब्यांचे आणि शुभेच्छापत्रांचे फोटो आणि तिचं लिहिलेलं वाचेपर्यंत मी रडायला लागले. तिला कळवलं म्हणलं,तुझ्या पुढच्या पिढ्यांसाठी ठेव हा खजिना,सांग त्यांना 'माणूसपण' असं असतं.. अक्षय्य पुरेल इतका चांगुलपणा तिच्या पदरात बांधला गेलाय.. असं काहीतरी आजूबाजूला सापडतंय अलगद, पुढे बघावं असं नाही पण मागच्या आठवणींबरोबर वर्तमानातही काही चांगलं घणसर आणि कणखर माझ्यासोबत आहे.मला निराश नाही व्हायचंय,हतबलता जायला हवीय.मला स्वतःला पुढच्या अज्ञात गोष्टींसाठी न घाबरता काहीतरी कणाकणानी साठवायला हवंय.
सापडताहेत काही अशा गोष्टी त्यानं मला शांत राहायला मदत होईल.हे दिवस मला काय काय शिकवून गेलेत.मला अजून जास्त संवेदना, सहवेदना,जास्त दयाळू व्हायला पाहिजे हे कळलं,दुसऱ्यांप्रति आणि
स्वतःप्रतिही! मला स्वतःला सांभाळायला हवं, शारीर आणि मुख्य मानसिक.तोल जातोय असं वाटलं की लगेच सांभाळायला हवं.मदत घ्यायला हवी.वेळीच! आपल्याकडे मदत मागणं हे कमीपणाचं का मानतात कोण जाणे.फार भारदस्तपणा लागतो,मदत करण्यात आणि मदत मागण्यातसुद्धा! आपल्याला एखादी गोष्ट नाही येत आहे सांभाळता ,तर माणूसपणाच्या हक्कानं ती मागायला हवी.एखाद्या गोष्टीची कमतरता हा अपराध,चूक किंवा गुन्हा नाही.
ह्या काळात अजून एक गोष्ट कळलं की गरजा कमी ठेवणं आवश्यक आहे आणि एक खूप खोल जाणीव होणं आवश्यक आहे मला,कीसगळं सगळं असून निरंक असणं हेच खरं!पण ह्या निरंक असण्यात कुठलीही कडवट भावना नाही तर आपलं ह्या जगातलं स्थान काय आहे ह्याची जाणीव इतक्या प्रखरपणे झालीये किंवा करुन दिली गेलीये.count your blessings वारंवार मनात येऊन पटतंय....
काल सुचूशी बोलायची तीव्र इच्छा झाली, तिची ख्याली खुशाली विचारावी असं प्रकर्षानं वाटलं.इतर वेळी तिचं सगळं रुटीन बघून पण तसाही कधीही फोन करु शकणारी मी आणि माझ्या पहिल्या रिंगला फोन उचलणारी ती!ह्या दिवसात भेटणं दुरापास्त झालंय..कष्टाला न घाबरणारी, न डगमगणारी, कायम डोकं शाबूत असलेली तरीही मानवी भावभावनांची गुंतागुंत समजून घ्यायचा प्रयत्न करणारी.त्यातले कंगोरे हळुवारपणे निरीक्षण करणारी.ह्या सगळ्याचा प्रत्यक्ष आयुष्यात विचारपूर्वक अवलंब करणारी माझी सखी! ह्या तांडवात तिच्यासारख्या हुशार आणि तितक्याच संवेदनशील कविमनाच्या व्यक्तीच्या आणि तात्विक आणि आध्यात्मिक बैठक शक्तिशाली असणाऱ्या मनात काय काय होत असेल असं वाटलं आणि तिला भेटायची इच्छा तीव्र झाली पण भेटता न येण्यानं तगमग झाली जीवाची आणि अचानक
सुधीर मोघेचं गाणं आठवलं विषवल्ली असता सभोती, सखये तू अमृतवेल!
ती कोविड ड्युटीवर असणारआहे माहिती होतं म्हणून फक्त ह्या दोन ओळी तिला मेसेज म्हणून पाठवल्या.ड्युटी संपल्यावर तिचा फक्त एक हार्ट इमोजीचा मेसेज आला.ह्या हृदयीचं त्या हृदयी पोचलं.तिच्या बाबतीत बहुतेकदा असं होतं की काही बोलावं लागत नाही , माझ्या मौनाची भाषा पोचत राहते ह्या माझ्या अमृतवेलीपर्यंत! अत्यंत कवी मन असलेली ही मुलगी किती खंबीर मनानं ह्या लढाईत आहे.माझ्या आजूबाजूला असणाऱ्या अनेक सजीव आणि निर्जीव वस्तूंमध्येही अमृतवेली आहेत.फक्त मला त्या जाणवायला हव्या.मनातून दिसायला हव्यात.कधी मीही ती अमृतवेल बनायला हवं कोणासाठीतरी!पण आत्ता स्वतःला सावरायला हवंच हवं.
मला कधी भीति,हुरहूर, असुरक्षितता,काळज्या असं काही अनावर झालं की मनातूनच मी सुचूबरोबर चार पावलं चालते आणि पुष्कळ निचरा होतो.देवळातली घंटा कानात आणि 'त्याचा' पावा मनात वाजतो. बहुतेकदा मळभ दूर होतं, तक्रारी पळून जातात,दृष्टी अगदी साफ निरभ्र व्हायला मदत होते.स्वच्छ दिसतं आजूबाजूला.आजूबाजूच्या अमृतवेलीही दिसतात मग सुस्पष्ट...
ज्येष्ठागौरी

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर लिहिलं आहे!
सुरुवातीच्या भावना अगदी मनातल्या.
डॉक्टर, नर्सेस , रुग्णवाहिकांमध्ये काम करणारे, होम डिलिव्हरीवाले, भाजीवाले, केमिस्ट, पोलिस आणि इतर असंख्य माणसं, जी जीव धोक्यात घालून आपापली कामं निष्ठेने करत आहेत त्यांना विनम्र अभिवादन!

लेख सुरेखच!

शेजारी राहणारा आमचा नवीन सोनेरी शेजारी निको शेपटी हलवत दारात उभा,दार उघडताच सरळ आत घुसला, .चेहरा आनंदी, का>>>>>>> हे अगदी डोळ्यांसमोर आले.भाग्यवान आहात.

सुरेख लिहिलंय
आतपर्यंत पोचलं..
हेही दिवस जातील.
तोवर एकमेकांचे अदृश्य हात घट्ट धरून ठेवुयात.

सुंदर लेख...

हा अविरत लढा लवकर थांबुदेत.. आणि निरोगी आयुष्याचा प्रकाश येऊ दे..