भटकंती २

Submitted by deepak_pawar on 7 May, 2021 - 02:06

मंदिराच्या समोर बांधलेल्या चौथऱ्यावर आम्ही तिघे मी, दया आणि रवी आकाशाकडे तोंड करून असेच पहुडलो होतो. एकदम निरभ्र आकाश, एक सुध्दा काळा ढग नव्हता. निळीतून काढलेल्या सफेद कपड्यासारखं निळसर पांढरं, कुठे कुठे शेवरीच्या झाडाखाली पडलेल्या कापसासारखे पांढरे शुभ्र ढग, त्यावर अगणित चांदण्याचा अंधुक प्रकाश, या सौंदर्यात भर घालण्यासाठी नुकताच उगवलेला पूर्ण चंद्र. दृष्ट लागावी असं ते दृश्य. क्षणभर वाटलं कुणाची नजर लागू नये म्हणून तरी, एखादा काळाकुट्ट ढग हवा होता,. लहान भावाला कुणाची दृष्ट लागू नये म्हणून, आई त्याच्या गालावर काजळाचा टिळा लावायची. गोऱ्या गालावर तो टिळा खूपच सुंदर दिसायचा. पण नकोच, कारण थोड्या वेळानं भाऊ आपल्या हातानं तो टिळा पुसायचा, अन् ते काजळ गालावर पसरून तो विचित्र दिसायचा. तसाच इथे एखादा काळा ढग असता, अन् पसरत गेला असता तर? त्या पेक्षा काळा ढग नाही तेच बरं झालं. नाहीतर आमचे भूगोलाचे सर नेहमी सांगतात, या विश्वात माणूस म्हणजे धुळीचा कण सुध्दा नाही. धूलिकणांपेक्षा लहान असणाऱ्या माणसाची नजर त्या दृश्याला लागूच शकत नव्हती. त्या आकाशभर पसरलेल्या चांदण्याकडे नुसतं बघत राहावं असंच वाटत होतं. जणू आम्ही त्या चांदण्यामध्ये हरवून गेलो होतो. अशा बऱ्याच चांदणराती आम्ही अनुभवल्या होत्या. एकदा का पावसाळा संपला कि अंगणाची जमीन केली जायची. अंगण तयार झाल्यावर आमचा बिछाना घरातून अंगणात येत असे. बिछान्यात पडल्या पडल्या चांदण्या बघत राहायचं. चांदण्यांनी भरलेल्या आकाशाकडे बघता बघता कधी झोप लागायची कळायचं सुध्दा नाही. आमची तंद्री लागलेली असताना, कुणीतरी गुपचूप येऊन जोराने भो SSS करून ओरडले. आमची तंद्री भंग पावली. डोक्यात एक सणक उठून गेली. वाटलं, जो कुणी ओरडला त्याला चांगलाच बदडून काढावा.
तो रमेश होता! आम्ही त्याला मारला नाही, कारण तो आमच्यापेक्षा दोन तीन वर्षांनी मोठा आणि हट्टा कट्टा होता. आम्ही मनातल्या मनात शिव्या देत नुसते चरफडत राहिलो.
रमेश आमच्याच गावचा पण, मुंबईत राहायचा. आता शाळांना सुट्ट्या असल्यानं गावी आला होता. तसा तो आम्हाला आवडायचा सुध्दा नाही, कारण दिवसभर आमच्याबरोबर फिरणार, आमच्या बरोबर खेळणार आणि घरी येऊन आमच्याच चहाड्या सांगणार. त्याच्यामुळे आम्हा सगळ्यांनाच कधी ना कधी बोलणी खावी लागलेली. काही जणांना रट्टे सुद्धा पडलेले. आम्ही उठून बसलो. चांदणं असल्यानं दुरून येणारा माणूस सुध्दा ओळखता येत होता, मग हा आला ते आम्हाला कसं कळलं नाही? एवढी कशी आमची तंद्री लागली?. कुणीच काही बोलत नाही पाहून, रमेश म्हणाला," चला रे, शिकारीला जाऊ या, मस्त चांदणं पडलंय."
मला तरी आता कुठेही जाऊ नये वाटत होतं. आज खूप दमलो होतो. सकाळी क्रिकेट खेळायला गेलो ते दुपारी परतलो, जेवण उरकून गप्पा मारत बसलो इतक्यात खालच्या घरातले अण्णा, त्यांच्या थोरल्या मुलाच्या लग्नाच्या पत्रावळ्यांसाठी वडाची पानं आणायला घेऊन गेले, ते संध्याकाळीच घरी परतलो. घरी येऊन अंघोळ वैगेरे उरकून आता कुठे, इथे येऊन पडलो होतो तेव्हढ्यात रमेश टपकला.
" मी नाही येत, मी खूप दमलोय आणि मला भूक पण लागलेय, मी जेवायला चाललोय," मी म्हणालो.
दयानं सुद्धा माझ्या सुरात सूर मिसळला. आम्ही नकार देत असलेलं पाहून, रमेश आम्हाला चिडवण्याच्या उद्देशानं म्हणाला," अरे, तुम्ही गावची पोरं म्हणजे एकदम डरपोक, आम्ही बघा कसे रात्री अपरात्री न घाबरता फिरतो." आम्हाला माहित होतं तो आम्हाला चिडवतोय, म्हणजे चिडून आम्ही त्याच्यासोबत जाऊ, पण आम्ही काहीही न बोलता तसेच बसून राहिलो.
असाच एकदा, रमेश आम्हाला जबरदस्तीने आमच्या नदीतील दुरेतलीच्या डोहाकडे घेऊन गेलेला. तशी ती आमची स्वतःची नदी नव्हती, म्हणजे आमचा गाव आणि बाजूचा गाव दोघांच्या मधून वाहायची.दोन गावांची सीमा म्हणजे ती नदी, तशी ती दोन्ही गावची नदी होती, पण आम्ही तिला आमची नदी म्हणायचो. त्या नदीमध्ये एक डोह आहे त्याच नाव दुरेतली हे ठिकाण वाडी पासून दीड-दोन किलोमीटर दूर गावच्या सीमेवर, सगळा भाग जंगलाने व्यापलेला, आजूबाजूला कुठेही मानवी वस्ती नाही. हा डोह खुप खोल असून, डोहाचा तळ अजिबात दिसत नाही. वडीलधाऱ्या मंडळींच्या सांगण्यानुसार तो चार पाच पुरुष खोल, म्हणजे चार पाच जण एकाच्या डोक्यावर एक असे उभे केले तरच तळापर्यंत पोहचता येईल. डोहातील पाणी एकदम काळेशार. डोहात गावातील दोन चार जणांनी जीव दिलेला. आम्ही मुलं चुकूनसुद्धा त्या ठिकाणी जात नसू. ह्या डोहाबद्दल जुन्या जाणत्या लोकांकडून एक गोष्ट सांगितली जायची. खूप खूप वर्षांपूर्वी म्हणजे आमचे आजोबा पणजोबा पण जन्मले नव्हते तेव्हा, ह्या डोहामध्ये आसरा राहायच्या. आसरा म्हणजे जलपऱ्या. त्या उगाचच कुणाला त्रास देत नसत. पण कुणी तिथे घाण केली किंवा त्यांना कुणी अभद्र बोललं तर त्याच्या मानगुटीत बसायच्या. म्हणजे एकप्रकारे ते भूतच पण, चांगल्या स्वभावाचं. त्या काळी कुणाकडे मोठी भांडी नसायची. त्यामुळे कुणाकडे लग्न असेल किंवा दुसरा काही मोठा कार्यक्रम असेल तर, त्या घरातील कर्ता माणूस त्या डोहाजवळ जायचा, डोहाची पूजा करायचा आणि डोहाकडे पाठ करून आपल्याला हवी असणारी भांडी मागायचा. अजिबात पाठीमागे वळून पाहायचं नाही. थोड्या वेळाने खडखड खडखड आवाज करत आपल्याला हवी असणारी भांडी आपल्या पाठीमागे जमा व्हायची. ती भांडी घेऊन यायच. आपलं काम उरकलं कि पुन्हा त्याच प्रकारे नेऊन द्यायची. पण एकदा काय झालं एका माणसानं त्यातील काही भांडी परत केलीच नाही. तेव्हा पासून भांडी येणं थांबलं ते आज तगायत. पुढं त्या माणसाचं सगळं खानदान संपलं. लहान असताना हि गोष्ट आम्ही मन लावून ऐकायचो आणि ती खरी सुध्दा वाटायची. पण, आता या गोष्टीच्या खरेपणाबद्दल शंका वाटू लागलेली. त्या डोहाजवळ जाऊ नये म्हणून अनेक भूता-खेताच्या कथा सांगितल्या जायच्या त्यामुळे, त्या डोहा विषयी आमच्या मनात भीती निर्माण झालेली. तसे आम्ही भुताला घाबरणारे नव्हतो, कुणी सांगितलं त्या ठिकाणी जाऊ नका; तिथे भूत आहे तर, आम्ही मुद्दाम त्या ठिकाणी जाणार पण, अजून तरी आम्हाला भूत दिसलं नव्हतं. पण, त्या डोहाकडे आम्ही जात नसू कारण तो खरोखरच खूप खोल होता. तिथे जाऊन बुडून मेलो तर काय करायच.
तर रमेश आम्हाला तिकडे घेऊन गेला आणि वाडीत येऊन सांगून टाकलं, सगळ्यांना घरी ओरडा पडला काहींना रट्ट्टेसुध्द्धा.

रमेशने जास्तच तगादा लावल्यामुळे अखेर आम्ही जायला तयार झालो. दयानं रवीला चार्जिंगचा टॉर्च आणायला पाठवलं.
"जरा घरी जाऊन येतो," मी म्हणालो.
घरी जायचं कारण, एकतर घरी काहीतरी सांगावं लागणार होतं आणि दुसरं मला चप्पल बदलायची होती. तसं मी कुणाला सांगितलं नव्हतं पण मला रात्री फिरताना जनावरांची खूप भीती वाटते. आमच्याकडे सरपटणाऱ्या सगळ्या प्राण्यांना जनावर म्हणतात, मग तो नाग असुदे नाहीतर फुरसे. म्हणून मी रात्री फिरायला जाताना बूट घालायचो. बूट घातल्यामुळे एखादं जनावर पायाखाली येऊन चावलं, तरी त्याचे दात लागणार नव्हते.
मी परतेपर्यंत रवी टॉर्च घेऊन आला. मी सुद्धा टॉर्च आणला होता, पण तो छोटा होता. प्रत्येकाजवळ टॉर्च असल्यानं कुणी धडपडणार नव्हतं. वाडीतून बाहेर जाईपर्यंत टॉर्च पेटवायचा नव्हता, कारण रात्री पोरं कुठं निघाली म्हणून लोकांनी गोंधळ घातला असता. नाहीतर रास्ता चांगला दिसत होता. आम्ही पऱ्या ओलांडून पलीकडे आलो.आता टॉर्च पेठवणं भाग होतं. रस्त्यालगत असणाऱ्या झाडामुळे रस्त्यावर काळोख पसरला होता. रस्तासुद्धा ओबडधोबड. मोठ मोठे दगड डोके वर काढून बसलेले. कधी दगडावर पाय पडून अडखळायला व्हायचं. उगाच ढोपरे फुटायला नको म्हणून आम्ही टॉर्च पेठवले. रस्ता संपवून कातळावर आलो. ह्या कातळाचं मला नेहमी आश्चर्य वाटत आलेलं. कुठे कुठे जमिनीचा भाग होता नाही असे नाही, पण त्या ठिकाणी वीतभर जरी खोदलं तरी खाली कातळच लागणार. मला कधी कधी वाटायचं, हा सगळा कधी काळी समुद्राचा भाग असणार; पुढेमागे पृथ्वीच्या पोटात उलथापालथ होऊन हा भाग वर आला असणार म्हणून जिकडे पाहावे तिकडे कातळच कातळ आणि दगड धोंडे.
आता चार्जिंग चा टॉर्च माझ्याकडे घेण्याची वेळ आली. प्रत्येकाला वाटायचं हा टॉर्च आपल्याजवळ असावा. कारण त्याचा प्रकाशच एवढा जबरदस्त होता कि ज्याच्याकडे तो असणार, तो कधीही धडपडणार नाही. सुरवातीला रवी टॉर्च द्यायचा नाही. म्हणून मी त्याच्या चुका काढू लागलो. बघा रे, कसा भलतीकडेच टॉर्च मारतो, व्यवस्थित मारला असता तर शिकार मिळाली असती. एखाद्या बांधावरून अडखळला कि लगेच दाखवून द्यायचं, त्यामुळे दया चिडायचा. दया चिडला कि सारे गप्प. तसं कुणीही तो टॉर्च पकडला असता तरी तेच घडणार होतं. असाच एकदा चिडून दयानं टॉर्च माझ्याकडे द्यायला सांगितला.
'माझा टॉर्च आहे, मी नाही देणार", रवी म्हणाला.
"जर का तू टॉर्च दिला नाहीस तर, उद्यापासून तुला आणणार नाही आणि खेळायला पण घेणार नाही", दयानं रवीला तंबी दिली.
तसं पाहिलं तर आम्हाला रात्री फिरताना रवीच्या टॉर्चची जास्त गरज होती.रवी आला नसता तर टॉर्च मिळाला नसता, पण रवीनं मागचा पुढचा विचार न करता नाईलाजानं टॉर्च माझ्याकडे दिला. तेव्हापासून तो टॉर्च माझ्याकडे आणि माझा फडतूस टॉर्च रवीकडे.
वारा चांगलाच सुटला होता. वाहणाऱ्या वाऱ्याचा आवाज कानात गुंजत होता. दिवसभर तापलेला कातळ थंड झाला होता. दूरवर कुठेतरी कुत्र्याचे भुंकणे चालू होते.
"दीपक टॉर्च खाली मार" दया म्हणाला.
मी टॉर्चचा झोत जमिनीवर मारला. दयानं चिमटीत दगड पकडून जमिनीवर चांगला ठोकून घेतला. दगडाला चिकटून एखादा विंचू असेल तर पडून जावा हा त्यामागचा उद्देश. ह्या कातळावर दहा बारा दगड उचलले तर एखादा तरी विंचू सापडणारच. तशाच प्रकारे अजून एक दगड उचलला. रवीने सुद्धा एक दगड उचलला. दगडाने शिकार मिळणार नव्हती, पण हातात काहीतरी हत्यार असणं गरजेचं होतं.
आम्ही आता देवळाजवळ आलो. हे गावचं मुख्य देऊळ. आसपास कोणतीही वस्ती नाही. देवळाच्या समोर स्मशान. मेलेली माणसं जाळण्यासाठी ओळीने चार पाच चौथरे बांधलेले. जाळलेल्या माणसाच्या अस्थी देवळाच्या बाजूने वाहणाऱ्या पऱ्यात सोडल्या जायच्या. पण, पऱ्याला आता पाणी नव्हतं, एकदम सुखा खटखटीत. कुणीच कुणाशी बोलत नव्हतं. मनात थोडी भीती दाटून आलेली. नाही म्हटलं तरी सगळेच घाबरलेले असणार. पण कुणी तसं दाखवत नव्हतं. तशी आम्ही घाबरणारी मुलं नव्हतो, पण अशा ठिकाणी आल्यावर आपोआप मनात भीती दाटून येते. आम्ही पऱ्या ओलांडून पलीकडे आलो, कातळावर असणाऱ्या करवंदाच्या, आजनीच्या जाळ्या वाऱ्यामुळे सळसळत होत्या. कुठेतरी एखादं शेवरीच झाड उभं होतं. म्हणावी तशी मोठी झाडं कुठेच नव्हती. समोर असणाऱ्या शेवरीच्या झाडाखाली कुणीतरी बसल्यासारखं वाटत होत. आम्ही बऱ्याचदा इथे येऊन गेल्यानं आम्हाला माहित होत तो एक मोठा दगड आहे, जो अंधुक प्रकाशात गुडघ्यात मान घालून बसलेल्या माणसासारखा दिसत होता.
थोडं पुढं आल्यावर काहीतरी चमकताना दिसलं. ते कुणाचे तरी डोळे होते, टॉर्चच्या प्रकाशात चमकत होते. आम्ही लक्ष देऊन पाहिलं, तो ससा होता.
सश्याचा पाठलाग करावा लागणार होता. दगड लागला तर ठीक नाहीतर, नुसतच दमायचं होतं.
"रम्या, धावायला जमेल ना?" दयानं रमेशला विचारलं.
"नको, मी त्या शेवरीच्या झाडाखाली थांबतो, पण जास्त लांब जाऊ नका,' रमेश म्हणाला.
दोघांनी आपल्या हातातील दगड सश्याच्या दिशेने भिरकावले,पण एक सुद्धा दगड लागला नाही. अजूनपर्यंत एका जागी उभा असणारा ससा जमिनीवर पडणाऱ्या दगडाच्या आवाजानं दचकून पळू लागला. ससा ज्या दिशेने पळाला त्या दिशेला आम्ही धावलो. थोड़ा पुढे जाऊन ससा एका जाळीमध्ये अदृश्य झाला.आम्ही जाळी जवळ पोहचून तिघे तीन दिशेला उभे राहिलो. दयानं हातातला दुसरा दगड जाळीत फेकला. लाव्यांचा एक थवा पंखाचा फडफडाट करत उडाला. अचानक झालेल्या आवाजानं छातीत धडधडू लागलं. रवीनं जाळीला पकडून जोराचे हाचके दिले,पण त्या पक्षांशिवाय कुणीच बाहेर आलं नाही. ससा हूल देऊन सटकला होता.
चला डुगीकडे जाऊन येऊ,' दया म्हणाला.
"रम्याला हाक मारू?" रवीनं विचारले.
राहू दे त्याला तिथे, टरकू दे जरा, आपण खाली जाऊन येऊ," दया म्हणाला.
आम्ही मुकाट्यानं चालू लागलो. कातळ संपून चोंडे लागले. या वर्षी हि जमीन ओसाड सोडली होती. खालच्या बाजूला तिळाची शेती केलेली. ओसाड जागेत गवत चांगलच वाढलं होतं. सुकलेलं गवत शाळेत ओणवे केलेल्या मुलासारखं वाकले होते, त्यामुळे मध्येच पोकळी तयार झालेली. रात्रीचं अशा गवतातून चालणं धोक्याचं होतं, म्हणून पायवाट कुठे दिसते का पाहिलं. थोडा पुढं गेल्यावर पायवाट सापडली. आम्ही वाटेवरून डागेच्या दिशेने निघालो. डाग उतरली कि खाली डुगीच रान. आम्ही डागेच्या जवळ पोहचलो. वरून झाडं भीतीदायक वाटत होती. माझ्या छातीत धाकधूक होऊ लागली.
"चला परत जाऊ या," मी म्हणालो.
"जरा पुढं जाऊ या, त्या दगडावरून रान लय भारी वाटतं," डागेच्या तोंडाजवळ एक भलामोठा दगड होता, त्याकडे बोट दाखवत रवी म्हणाला.
आता इथपर्यंत आलो आहोत, तर थोडं पुढं जाऊ, म्हणून आम्ही त्या दिशेने निघालो. चालता चालता मी आजूबाजूला टॉर्च मारत होतो. एखादा प्राणी दिसला तर दिसला! रस्त्याच्या उजव्या बाजूला टॉर्च मारला आणि जागीच थांबलो. "ये तिकडे बघा," मी दोघांना उद्देशून म्हणालो.
टॉर्च च्या प्रकाशात निखाऱ्यासारखे दोन डोळे लखाकत होते. तो बिबट्या होता.
"अरे, बिबट्या हाय," दया हळू आवाजात म्हणाला.
तो आमच्याकडेच रोखून पाहत होता. दोन दिवसापूर्वी खालच्या वाडीतील गाय बिबटयानं मारली म्हणून ऐकलेलं, पण कुठे ते कळलं नव्हतं. म्हणजे इथेच कुठेतरी गाय मारली असावी. माझी छाती जोरजोरात धडधडू लागली. पायातील सगळी शक्ती निघून गेल्यासारखं वाटू लागलं. मी धावू शकेन कि नाही याचीच काळजी वाटू लागली. ते दोघेसुद्धा काही बोलत नव्हते, म्हणजे ते सुद्धा घाबरले असणार. दयानं खाली वाकून एक भलामोठा दगड उचलला.

"अरे, दगड मारू नको," मी म्हणालो.

तेवढ्या वेळात रवीनं सुद्धा दगड उचलला.
"आता काय करायचं?" रवीनं विचारलं
"धावायचं," दया म्हणाला.

"तरी नशीब यांना शहाणपण सुचलं." मी मनातल्या मनात म्हटलं, नाहीतर या दोघांचा काही भरोसा नाही.

"खालच्या चोंढ्याना ह्या वर्षी तीळ पेरले होते, तिकडे धावू या. तिकडे तो येणार नाय," मी सुचना केली.

कापलेल्या तिळाच्या शेतात बिबट्या जात नाही. तिळाचं रोप करंगळी एव्हडं जाड, अर्ध्यातून कापलेल्या ढोपराएवढ्या उंच टोकेरी काट्या तशाच जमिनीत राहतात, त्यामुळे बिबट्या, जर का तिळाच्या शेतात शिरला तर, त्या टोकेरी काठ्या त्याच्या पोटाला टोचतात, त्यामुळे त्याला धावता येत नाही. असं मला ऐकून माहित होतं.
"तिकडे नाय, बिबट्याच्या पाठी धावायचं ," दया म्हणाला.
"काय? येडाबिडा झाला नाय ना!" रवी घाबरून म्हणाला.
" मी सांगतो तसं करा, काय होत नाय, मी तीन म्हटलं म्हणजे दगड मारायचा आणि त्याच्या दिशेने जोरात ओरडत धावायचं ," दया म्हणाला. आमच्या वाडीकडे कधी बिबट्याची स्वारी आली कि सगळे जण जोरजोरात ओरडू लागायचे आणि बिबट्या पळून जायचा

पण ती वाडी आमचं घर होतं, आज इथे त्याच्या घराजवळ आम्ही उभे होतो.
"ठीक आहे!" मी आणि रवीनं होकार दिला.
एक, दोन, तीन... दयानं आकडे मोजून आपल्या हातातील दगड बिबट्याच्या दिशेने भिरकावला. रवीनं सुद्धा आपल्या हातातील दगड भिरकावला. आम्ही तिघेही जोरजोरात ओरडत बिबट्याच्या दिशेने धावलो. बांधावरून उडी मारून बिबट्या क्षणार्धात अदृश्य झाला.
" बघितलं, पळाला ना!," दया म्हणाला.
"आता खालच्या बाजूने जाऊ या, नाहीतर कुठूनतरी गुपचूप येऊन आपल्यावर झडप घालायचा," मी सूचना केली.
आम्ही तिळाच्या चोंढ्यात उतरलो, रम्याला जिथे उभा केला होता त्यादिशेने चालू लागलो.
अचानक दया आवाज बदलून ओरडू लागला, " एकटाच गावलाय... पकड... पकड... पकड, कोण उभं हाय ... धर त्याला,”
आमच्या लक्षात आलं, रम्याला घाबरवण्यासाठी तो आवाज बदलून ओरडत होता. आता रवीला हि चेव चढला, तो भू.. भू .. करून कुत्र्याचा आवाज काढू लागला. जरी तो कुत्र्याचा आवाज वाटत नव्हता तरी त्याला फिकीर नव्हती. कारण आम्हाला माहित होतं रम्या नक्कीच घाबरला असणार. कुणीही एकटा माणूस घाबरला असता. एकतर बाजूला स्मशान, रात्रीची वेळ, ओरडलं तरी कुणी मदतीला येणार नाही अशी ओसाड जागा. आम्ही जवळ येईपर्यंत दोघांचं ओरडणं चालू होतं. नजरेच्या टप्प्यात आल्यावर दोघे ओरडायचे थांबले. आम्ही रमेश जवळ येऊन पोहचलो. तो चांगलाच घामाघूम झाला होता. आम्ही फिरून सुद्धा आम्हाला एवढा घाम आला नव्हता. त्याच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. आम्हाला पाहून एका दमात पाच सहा शिव्या देऊन रमेश म्हणाला,"परत कधी मला एकट्याला सोडून गेलात तर, तुमची काशी करून टाकेन!". भीतीमुळे त्याचा आवाज कापरा झाला होता.त्यानं दिलेल्या शिव्यांचा आज आम्हाला अजिबात राग आला नाही,"कशी जिरवली म्हणून, आम्ही तिघेही गालातल्या गालात हसत होतो.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप सुंदर लिहिली आहे कथा...
डोळ्यांसमोर कथा घडतेयं असं वाचताना वाटलं..
छान वर्णनशैली..!

येस्स! एकदम झकास वर्णन. कुठेतरी आपण चित्र पाहीलेले असते. पण तुमच्या लिखाणा मधून तो डोह, चांदणी रात्र, देऊळ, पार, शेत सगळे डोळ्यासमोर आले. मस्त अनूभव्.

रुपालीजी, रश्मीजी, वावेजी, मृनालीजी आपले सर्वांचे मनापासून आभार.आपण दिलेल्या प्रतिसादामुळे लिहायला हुरुप येतो.