कांचिवरम सकाळ पेपर्स मधे प्रसिद्ध झालेला लेख - परिचय व रसास्वाद

Submitted by सतीशगजाननकुलकर्णी on 2 May, 2021 - 11:17


कांचिवरम

असा तू ये जवळी सांग ना रे जीवना आता, शहाणे होत जाताना तुझे चुकणे कुठे गेले . वैभव

कांचीवरम खर तर लहानपणापासून ऐकत असलेला आणि विशेषत: स्त्रियांच्या जिव्हाळ्याचा हा साडीचा प्रकार. त्याचमुळे या नावाचा चित्रपट आहे हे ऐकल्यावर कुतूहल वाढत गेले. “कांचीवरम” दिग्दर्शक प्रियदर्शन यांचा २००८ सालचा तामिळ भाषेतील स्वातंत्र्य पूर्व काळातील चित्रपट. या चित्रपटासाठी ५५ व्या “national film award”मध्ये बेस्ट फिल्म आणि बेस्ट अक्टर म्हणून प्रकाश राज यांना बक्षीस मिळाले होते.

सुरवातीलाच जेल मधून निर्विकार चेहऱ्याने एक कैदी, वार्धक्याकडे झुकलेला आणि बराचसा थकलेला, जेलर समोर उभा असलेला आपल्याला दिसतो. या कैद्याचे नाव आहे व्यंकटेश. याची सुटका जेलमधून फक्त दोन दिवसासाठी त्याच्या कांचीपुरम गावाला जाण्यासाठी झालेली आहे.
रात्रीची वेळ. मुसळधार पाउस. धीम्या गतीने जाणारी गाडी आणि हातात बेड्या ठोकलेला व्यंकटेश. गाडी एके ठिकाणी चहा घेण्यसाठी थांबते. आणि काहीच वेळात रेडीओवर सनईचे उदास संगीत लागते. संगीत ऐकतानाच कॅमेरा व्यंकटेशच्या डोळ्यावर स्थिरावतो. चष्म्याची एक काच फुटलेली आणि दुसरी चांगली काच आपल्याला दिसते. फुटलेली काच त्याच्या आयुष्यातील कटू आठवणी आहेत आणि चांगली काच सुखद आठवणी. सुख दु:खांचा हा प्रवास आपल्या समोर फ्लशबकने येतो.

व्यंकटेश हा कांचीपुरम मधील रेशमाच्या साड्या विणणारा सर्वसामान्य मजूर. त्या काळात रेशमाची साडी महाग वस्तू होती पण त्यापेक्षाही प्रतिष्ठेची, किंवा शुभ शकुनाची हि साडी मानली जायची. अनेक समजुती लोकांच्या मनात होत्या. कुणी निधन पावल्यावर त्याच्या अंत्यविधीच्या वेळी रेशमी कपड्यात जर त्याच्या देहाला अग्नी दिला तर आत्म्याला मोक्ष मिळते. किंवा नवी नवरी रेशमी साडीत घरी येते हे भाग्याचे आणि प्रतिष्ठेचे मानले जायचे.

व्यंकटेशने सुद्धा लग्न झाल्यावर त्याच्या वधूला तो रेशमी साडीत घरी घेऊन येईल असा निश्चय केलेला असतो. हॉटेल मध्ये बसल्यावर सनईचे उदास सूर ऐकत त्याला आपला भूतकाळ आठवतो. नुकतेच लग्न होऊन आपल्या पत्नीला घेऊन तो घरी आलेला आहे पण रेशमाच्या नव्हे तर साध्या साडीत. रेशमाच्या साडीचे स्वप्न त्याने बघितले असेल पण एक सर्वसामान्य कामगार तो पूर्ण करणे शक्यच नव्हते. त्या काळात या महागड्या साडीची किमत होती आठशे रुपये आणि व्यंकटेशची मजुरी होती सात रुपये. ही कथा आहे त्या मजुराची ज्याच्या आयुष्यात या रेशमाच्या साडी मुळे उलथापालथ झाली होती.

काही दिवसांचा काळ जातो. व्यंकटेश आणि त्याची बायको अनु ( श्रिया रेड्डी) यांचा संसार सुखात चाललेला असतो. गरिबीत सुद्धा आनंद मानणारे हे जोडपे आहे. मालकांच्या मुलीच्या लग्नात त्याने विणलेली साडी बघून जेव्हा मालक त्याला एक रुपयाचे बक्षीस देतात तेव्हा सुद्धा आपल्या पत्नीच्या.. अनुच्या केसात गजरा माळून तो आनंद साजरा करतो. आणि अनुचा आनंद आपल्या नवर्याला ज्या साडीसाठी बक्षीस मिळाले ती रेशमाची साडी बघण्यात आहे. पण गरिबी आणि श्रीमंती याच्यातील दरी इतकी दूर आहे कि अनुला ती साडी लांबून बघायला लागते. पण त्यातही तिला आनंदच आहे.

एक दिवस त्यांच्या आयुष्यात खराखुरा आनंदाचा प्रसंग घडतो. अनु आणि व्यंकटेश यांना मुलगी होते. पण त्या काळी एक प्रथा होती. प्रत्येक पित्याने बारशादिवशी आपल्या मुलीसाठी एखादी गोष्ट तिच्या साठी नक्की करेन असे वचन किंवा संकल्प सोडायचा असतो. व्यंकटेश संकल्प सोडतो. आपल्या मुलीचे कमलाचे लग्न करून ( शम्मू) रेशमी साडीतून सासरी पाठवेल.

त्याच्या या संकल्पाने सर्व गावात खळबळ उडते. संपूर्ण आयुष्यभर जरी मेहनत केली तरी जो संकल्प पूर्ण करणे शक्य नाही तो व्यंकटेशने का करावा? अनु सुद्धा संभ्रमित आहे. आपल्या नवऱ्याने हा कुवतीच्या बाहेरचा संकल्प का केला असावा?

अंधारलेल्या त्या रात्री मिणमिणत्या दिव्यात अनु स्वयंपाक करत आहे. डोळ्यात आश्रू आहेत ते आपल्या नवर्याने केलेल्या आवाक्याबाहेरच्या संकल्पाने. व्यंकटेश तिच्या मनाची घालमेल ओळखतो. आणि एक मटके घेऊन येतो. आपल्या कष्टाची पै आणि पै त्याने त्या मटक्यात साठवलेली असते. ते पैसे त्याने अनुला रेशमाची साडी घेण्यासाठी साठवले असतात पण कमी पडल्याने तो साडी घेऊ शकत नाही पण आता तो आपल्या लेकीच्या लग्नात हे स्वप्न पूर्ण करणार असतो. काही वेळापूर्वी ज्या डोळ्यात आश्रू असतात तिथे पुन्हा अश्रूच येतात पण आताचे हे आश्रू आनंदाचे आहेत. अनुच्या गालावर स्मित आहे डोळ्यात पाणी आणि त्याच्या डोळ्यातले पाणी बघत व्यंकटेश मात्र खदखदून हसत आहे.

पण व्यंकटेश आणि अनुचा आनंद हा फार काळ टिकत नाही. व्यंकटेशची बहिण तिच्या नवर्याच्या आर्थिक अडचणी मुळे त्याच्याकडे आलेली असते. जेव्हा तिचा नवरा या अडचणी सांगतो आणि आपल्या बहिणीची असाह्यता त्याच्या लक्षात येते तेव्हा तो एका निश्चयावर येतो.
फडताळात ठेवलेले ते मटके. जमिनीवर आपटून त्यातले पैसे तो आपल्या जीजाजीला देण्याचे ठरवतो. पैसे मोजणारा व्यंकटेश आणि त्याच्याकडे दु:खी नजरेने बघणारी अनु. आपल्या नवर्याच्या कृतीचे तिला आश्चर्य वाटले आहे पण त्यापेक्षाही तिच्या मनात वेदना आहे आपल्या मुलीच्या भवितव्याची, त्याने केलेल्या संकल्पाची. अनु त्याच्याकडे बघत असतानाच पाळण्यात असणार्या कमलाचे अस्फुट रडणे आपल्याला ऐकू येते. जणू तिलाही आपल्या भविष्याची काळजी आहे. पण तरीही व्यंकटेश बहिणीच्या कल्याणासाठी पैसे देऊन टाकतो. घरापासून दूर जाणारी व्यंकटेशची बहिण आणि तिचा नवरा, त्यांच्या पाठमोर्या आकृतीकडे बघत असणारा व्यंकटेश, घरावर लटकणारा कंदील , खिडकीतून बघत असणारी अनु आणि पाळण्याच्या हलक्याशा झोक्यावर शांत झोपलेली कमला. मन हेलावून टाकणारे दृश.

दिवसामागून दिवस जात आहेत. पण यातील प्रत्येक दिवशी व्यंकटेशला कमलासाठी केलेल्या संकल्पाचा विसर कधीच पडलेला नाही. आपला संकल्प पूर्ण करण्यसाठी कामावर गेल्यावर तो हळूहळू” रेशमाचे बंध” स्वत:च्या तोंडातून लपवून आणायचा. तपासणी डब्याची होईल पण तोंडात काय आहे हे कोण कशाला बघेल? आणि या रेशमाचे बंध व्यंकटेश आपल्या घराशेजारच्या अडगळीच्या खोलीत लपवून ठेवायचा. एका प्रकारे त्याने हे रेशमाचे केलेले “सेव्हिंग” होते. अशा प्रकारे त्याने बरेच रेशीम साठवले होते. रात्रीची वेळी झाली कि तो त्या अडगळीच्या खोलीत जायचा आणि घरात असणार्या हातमागावर साडी विणायचा. त्याचे स्वप्न एकच होते मुलीची रेशमाची साडी नेसून बिदाई !!

असे म्हणतात दैवापुढे देवाची सुद्धा मात्रा चालत नाही म्हणूनच देव वर एक मात्रा आहे आणि दैव वर दोन मात्रा आहे. मग दैव हे व्यंकटेशच्या बाबतीत निष्ठुर झाले तर त्यात नवल ते काय? त्या दिवशी व्यंकटेशच्या मालकांनी नवीन गाडी घेतली म्हणून सर्व गावकरी गाडी बघायला गेले होते. सर्वजण गाडीच्या मागे कुतूहलाने धावत असतात आणि त्या धकाबुकीत अनु चीरडते. आणि गंभीर जखमी होते गावाचे वैद्य हतबल आहेत. अनुला मृत्यूची चाहूल लागली आहे. तिला चिंता आहे कमलाची. व्यंकटेश तिला धीर देतो पण त्याच्याही मनात तिच्या मृत्यूची चाहूल आहेच.
अंधारलेल्या त्या रात्री हातात कंदील आणि तिला आपल्या बाहूत घेऊन त्या खोलीत जातो आणि तो कामलासाठी विणत असलेली साडी दाखवतो.“आपली मुलगी त्या साडीत किती चांगली दिसेल?” व्यंकटेश अनुशी बोलत आहे. अनुची नजर शुष्क पण तरीही गालावर किंचित हसू. साडीची वाऱ्यामुळे होणारी अलगद थरथर आणि काही क्षणातच अनु अखेरचा श्वास घेते. तिचाही अंत्यविधी रेशमाच्या साडीशिवाय.
दरम्यान अजून एक घटना घडते. त्या गावात एक लेखक राहण्यासाठी येतो. खर तर हा कम्युनिस्ट आहे. त्याला राहण्यसाठी जागा व्यंकटेशने दिलेली असते आणि त्याचमुळे त्या लेखकाचा सहवासही त्याला लाभलेला असतो. स्वाभाविकपणे व्यंकटेशचे विचार सुद्धा तसेच झालेले असतात. एक दिवस तो लेखक पोलिसांच्या गोळीबारात मरतो पण त्याचे विचार व्यंकटेशच्या मनात कायम ठेऊन.

रेशीम विणणाऱ्या सर्व कामगारांचे नेतृत्व व्यंकटेश करू लागतो. त्यांचे वेतन, त्यांना वयोमानानुसार होणारा त्रास, सर्व मागण्या तो आपल्या मालकापुढे ठेवतो. अर्थातच मागण्या फेकून दिल्या जातात. आणि सर्व कामगार संपावर जातात. पण याच दरम्यान व्यंकटेशच्या मित्राचा मुलगा रंगा आणि कमला यांचा विवाह ठरतो. तिथेही हुंड्याचा विषय निघतो आणि व्यंकटेश सांगतो तिला रेशमाच्या साडीत बिदाई देईन. पुन्हा तेच सर्वांना आश्चर्य. जी काळजी अनुला होती ती आता कमलाला आहे. पण व्यंकटेश मात्र चिंता विरहित आहे कारण इतक्या वर्षात चोरून रेशमाची साडी विणण्याचे काम सुरूच आहे.

मालक एखादी मागणी मान्य करतात. पण कामगारांना ते मान्य नाही. व्यंकटेशचे विचार अधिकच ज्वलंत होत असतात. त्याला कांचीपुरम मध्ये इतिहास घडवायचा असतो.पण कामगारांचा संप असल्याने एक गोष्ट व्यंकटेशच्या दृष्टीने वाईट घडत असते रेशमाचे बंध तो तोंडात लपवून त्याला चोरून आणता येत नसतात आणि त्यामुळे साडी विणण्याचे काम बंद असते. परिणामी, तो संप मागे घ्यायचे ठरवतो. पण कामगारांचा एक वर्ग मागे यायला तयार नसतो. अखेर संप मागे घेतात. आणि व्यंकटेशचा तो तोंडात लपवून रेशीम गाठी आणण्याचा दिनक्रम चालू होतो. पण एक दिवस त्याची चोरी पकडली जाते. कामगारांच्यात झटापट होते आणि त्याच्या तोंडातील रेशीम बाहेर पडते. प्रामाणिक व्यंकटेशची गद्दारी.!!
अखेर व्यंकटेश कांचीपुरममला सुटकेवर का आला आहे हे आपल्याला कळते. त्याची कमला पाय घसरून विहिरीत पडली आणि आता मरणोन्मुख अवस्थेत पडली आहे. त्या रात्री आपल्या मुलीची अवस्था बघून तिलाही तो विणत असणारी साडी दाखवतो जशी त्याने त्याच्या बायकोला दाखवली होती. तो चोर झाला, गद्दार झाला कारण तो आपल्या मुलीवर प्रेम करत होता. कदाचित तो प्रेम करत होता म्हणूनच तिची अवस्था त्याला बघवत नव्हती. तो आपल्या मुलीच्या भातात विष घालून तिचा जीव घेतो.

मुलीचे प्रेत आता त्याच्या सामोर आहे. व्यंकटेश दु:खी आहे पण एका तिरमिरीत उठतो आणि आपण विणलेली रेशमाची साडी घेऊन येतो. पण साडीने चेहरा झाकत असताना कधी पाय उघडे पडतात आणि पाय झाकत असताना चेहरा उघडा पडतो. या झटापटीतच त्याची जाण्याची वेळ होते. आणि वेड्याच्या भारात विचित्र हसत असतानाच चित्रपट संपतो.

प्रकाश राज यांचा उत्तम अभिनय या चित्रपटाचे वैशिठ्य आहे. आपले वडील, बायको किंवा मुलगी वारल्यावर व्यंकटेश ना तो प्रेत्तात गुंडाळू शकला ना त्यांना विवाहात तो साडी देऊ शकला. शेवटी मुलीच्या प्रेताला त्याने साडी पांघरली पण ती सुद्धा अर्धवट. हि एका बापाची जीवघेणी वेदना आहे. आपली बायको वारली असताना तिला लहानाचे मोठे करणे आणि स्वप्नाचा पाठपुरवा करत असताना आपल्या नितीमुल्यापासून बाजूला जाणे हे अप्रतिम रित्या त्यांनी साकार केले आहे. त्यांना साथ दिली आहे श्रिया रेड्डी व शम्मू यांनी

मुसळधार पावसातून कांचीपुरमला जाणारी गाडी आणि कुठेही खंडित न होता त्याचा सर्व आठवणींचा प्रवास आपल्याला सुद्धा हेलावून सोडतो याचे श्रेय अर्थातच दिग्दर्शकाचे.व्यंकटेशचे शेवटचे हसणे आपल्याला अस्वस्थ करते. खर तर त्याला रडायचे असावे पण इतके सहन केल्यावर ते डोळे रडणार कसे ? आपल्या न कळत आपल्याला वैभवची गझल आठवते “ रडू आले तरी रडत नाही हे डोळे समंजस काळजाच्या आतील तुटणे कुठे गेले ?

सतीश गजानन कुलकर्णी

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

बापरे, चित्रपटकथा वाचून अंगावर काटा आला.

आणि ह्या चित्रपटाला राष्ट्रीय पारितोषिक मिळालंय हे वाचून कपाळाला हात लावला. कथा लिहिणार्याबद्दल काहीही आक्षेप नाही, त्याने एकोणिसाव्या शतकातील कथा लिहिली असेलही. पण एकविसाव्या शतकात त्यावर चित्रपट काढणाऱ्याने तरी थोडा विचार करायचा. बायको गेली ती गेलीच पण मुलीच्या वेळी वेळीच जागृत होऊन तिच्या सुदृढीकरणावर भर दिला असता म्हणजे मराठीत तिला शिक्षणाने empower करून ती एकतर कांजीवरम विणकरांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणते किंवा ते जमले नाहीच तर निदान कुठेतरी नोकरी करून स्वतःच कांजीवरम विकत घेते व वडिलांची इच्छा पूर्ण करते असे दाखवले असते तर कालसुसंगत झाले असते. हा टिपिकल रडारडीचा चित्रपट बनवून गल्ला जमवला असेल पण राष्ट्रीय पातळीवर गौरवावे असा काहीही संदेश हा चित्रपट देत नाही. अभिनेता म्हणून चांगले काम केले असेलही पण बाकी काहीही नाही.