कोविड च्या दिवसातली 'वासरी' (Covid diaries)

Submitted by Charudutt Ramti... on 2 May, 2021 - 00:54

मला ‘कोविड’ झाला, ही बातमी, ‘कशी काय कुणास ठाऊक?’ पण आमच्या हौ. सोसायटीत आणि एकंदरीत आमच्या परिचितांच्यात, ‘अमेझॉन च्या जंगलात वणवा पसरावा’ - तशी वणव्यासारखी पसरली. आणि मग फोन वर फोन सुरु झाले.

"तुझी HRCT व्हॅल्यू किती आहे रे? पटकन सांग, एक डॉक्टर मित्र ऑनलाईन आहे इकडे दुसऱ्या लाईनवर."

“अरे मी स्कॅनिंग केलेलं नाही अजून, डॉक्टरांनी गरज नाही म्हटलंय” – मी घसा (की नरडं?) ठणकत असतानांही कसा बसा बेंबीच्या देठापासून बोललो.

“आधी करून घे, डॉक्टरांचं काहीही ऐकू नकोस, त्यांना म्हणावं मला HRCT स्कॅन करायचाय म्हणजे करायचायच्च्च !” –

“अरेच्या? मला HRCT स्कॅन करायचाच्च्चे म्हणजे? मी कसा काय सांगणार डॉक्टरांना उलटा, माझा HRCT स्कॅन केला पाहिजे म्हणून ?, उद्या तू मला सांगशील, HRCT कारतोयसच तर त्याच्या बरोबर 'किडन्या' पण घे स्कॅन करून, काय आहे? एकात एक होऊन जाईल त्या निमित्ताने. सांग तसं डॉक्टरांना तुझ्या, " - काय कमाल creative लोक भेटतात माझ्यासारख्या एखाद्याला आयुष्यात? कौतुक वाटतं मला ह्यांचं.

“अरे कोव्हीड आहे तुला”

“अच्छा , कोव्हीड मध्ये, पेशंट ला ऑप्शन असतो काय, पॅथालॉजि चं मेन्यू कार्ड असावा तसा?” - माझा तिरकस पणा त्याला चांगलाच लागला.

"तुझ्या भल्यासाठी सांगतोय - नसेल पटत तर तुझी मर्जी, बस क्वारंटाईन मध्ये" - फोन कट. माझी शेवटी एकदाची सुटका.

करकोचा आणि बदकाच्या गोष्टीत कसं करकोच्याची का बदकाची मान उंच सुरईत आत रुतून वगैरे बसते तशी, माझी अर्धी मान स्टीम घ्यायच्या त्या विचित्र आकाराच्या equipment मध्ये रुतती की काय अश्या अवस्थेत मी असतानाच मला वरीलप्रमाणे फुकटचे आणि बऱ्याच अंशी चुकीचे सल्ले देणारे असे बरेच फोन यायला सुरुवात झाली.

आधी ठीक होतं नंतर नंतर हे follow up एवढे वाढले, की मला माझ्या ब्लड टेस्ट रिपोर्ट्स , आणि त्यातले हिमोग्राम चे मायक्रो ग्राम मधले आकडे तर प्लेटलेट्स चे लाखातले आकडे, घोकमपट्टी करून पाठ करायची वेळ येती की काय जागरणं करून अशी धास्ती वाटू लागली मला चक्क.

"अरे रिऍक्टिव्ह PCR ची व्हॅल्यू सांग " ,
"अरे तुझा डी डायमर किती आहे रे?"
"तुला रेमिडिसवीर शिवाय गत्यंतर नाही"
"शॉर्टेज आहे रे, नाही तर ऑक्सिजन सिलिंडर आणून ठेवला असता तिकडे, बॅकअप म्हणून, अरे कोविड मध्ये O२ saddanly ड्रॉप होतो हं !" मला हे ऐकल्यावर उगाचंच धाप लागून उगाचंच आपल्याला श्वास कमी पडतोय की काय असं वाटायला लागलं.
"तुझी लिव्हर मला खराब झाल्यासारखी वाटत्ये, पिवळा पडलायस बघ कसला?"

अरे देवा, हे माझ्या लिव्हर विषयी असले अशुभ भाष्य करणारे शुभचिंतक तू माझ्या नशिबी का लिहिलेस?

मला वैद्यकीय सल्ला देणाऱ्यांमध्ये ओळखीच्या फोन मध्ये सी.ए. ची प्रॅक्टिस करणाऱ्यांपासून पासून ते दिवाणी न्यायालयात वकिली करणाऱ्यांपर्यंत आणि ऑनलाईन कुकरी च्या क्लास्सेस घेणाऱ्या हिच्या मैत्रिणीच्या स्वतः काहीही 'न' करणाऱ्या नवऱ्यापासून ते पेन्शनर होऊन आता वीस वर्ष झाली "आता वेळ कसा घालवायचा?" असे मूलभूत प्रश्न असणाऱ्या माझ्या ओळखीच्या लांबच्या आजोबांपर्यंत, सगळे मला "करोनाशी मुकाबला कसा करावा? ह्या विषयी मुबलक सल्ले द्यायला पुढे सरसावले'. बरं ह्यांच्यापैकी एकाला ही करोना होऊन गेल्याचं मला आठवत नव्हतं. हे म्हणजे आजन्म ब्रम्हचारी आणि संन्यासी माणसानं 'मुलांना दुधाचे दात येत असताना लहान मुलांची घ्यायची काळजी' ह्याविषयी तीन तीन बाळंतपणं झालेल्या बायकांना उपदेश पर व्याख्यान देण्यासारखं आहे.

जसा माझा रिपोर्ट पॉसिटीव्ह आला आणि सायकल थ्रेशोल्ड व्हॅल्यू १९ आली, तसं माझे क्वारंटाईन चे चौदा दिवस सुरु झाले. मी होम क्वारंटाईनच होतो! ( ह्याला सुदैव म्हणायचं की दुर्दैव ते मला माहिती नाही, खरंतर नुसतंच 'दैव' म्हणणं अधिक योग्य ठरेल). तिकडे राज्यात लॉकडाऊन पडला आणि आमच्या घरात आणीबाणी डिक्लेर झाली. माझी रवानगी आर्थर रोड जेल मधल्या अंडा सेल मध्ये व्हावी तशी, आमच्या फ्लॅट मधल्या दोन पैकी एका बेडरूम मध्ये झाली. सगळ्या गोष्टींच्या वेळा ठरल्या, काढ्या पासून ते वाफे पर्यंत आणि दर दोन तासांनी O2 सॅच्युरेशन ते body टेम्परेचर, त्याचं तर एक दर दोन तासांनी नोंद ठेवायचं कोष्टकच बनलं.

नवरात्रीच्या नऊ दिवसात कश्या स्त्रिया वेगवेगळ्या रंगाच्या साड्या नेसून येतात, तसे हे चौदा दिवस. म्हणजे तुम्ही चार भिंतींच्या आत एकटेच असता आणि तुमच्या मनात मात्र चौदा दिवस वेगवेगळे विचार सहावारी ते नऊवारी आणि कॉटन ते गर्भरेशमी अश्या वैविध्यपूर्ण साड्या नेसून येत राहतात, तुम्ही तिच्याकडे पाहो वा न पाहो, विचारांची ललना साड्या बदलत राहते. सुदृढ व्यक्तीच्या मनात चोवीस तासात एकंदरीत साठ हजार विचार येतात असं एक संशोधन झालंय हे जर खरं असेल तर करोनाग्रस्त आणि होमक्वारंटाईन व्यक्तीच्या मनात चोवीस तासात साधारण अडीच तीन लाख विचार तरी सहज येऊन जात असतील असं माझं स्वतःच संशोधन आहे, गेल्या पंध्रवड्यातलं.

आता, ह्या चौदा दिवसातल्या माझ्या मनात उमटलेल्या विचारांचा हा 'संक्षिप्त आढावा'…

पहिल्या दिवशीचा विचार : बापरे , असे पुढचे चौदा दिवस कसे काढायचे?

दुसऱ्या दिवशीचा विचार : करोना टेस्ट ची एफिकसी ६८% आहे. म्हणजे १०० पैकी फक्त ६८ % टेस्ट चे रिझल्ट बरोबर आणि तब्बल ३२% चुकीचे असतात. माझी सुद्धा चुकीची असणार! टेस्ट चा result पॉझिटिव्ह असला तरी मी निगेटिव्हच असणार, आणि महत्वाचं म्हणजे असला जरी पॉझिटिव्ह तरी निगेटिव्ह विचार करून चालणार नाही, त्यामुळे आपला Swab जरी नेगेटिव्ह असला तरी Swabaविकच सॉरी स्वाभाविकच "टेस्ट चुकू शकते" असाच पॉझिटिव्ह विचार आपण केला पाहिजे. (त्यानतंर मला कधीतरी ‘पॉझिटिव्ह रिझल्ट’ म्हणजे ‘निगेटिव्ह आउटकम’ आणि निगेटिव्ह रिझल्ट म्हणजे पॉझिटिव्ह आउटकम, हे नक्की बरोबर आहे नं? ह्यात अतोनात कन्फयुजन होऊन कधी मस्त डोळा लागला ते समजलंच नाही.)

तिसरा दिवस : पुनर्जन्म असतो की नसतो, मृत्यू नंतर चे जीवन हीच खरी जीवनाची सुरुवात. आत्मा अमर आहे. श्री श्री रविशंकरांच्या नाही तर नाही , किमान ओशो रजनीशांच्या आश्रमात तरी एकदा जाऊन यायला हवं होतं. येता येता कोरेगाव पार्क मधून जर्मन बेकरीतुन “वॉलनट वाईन पेस्ट्री” सुद्धा आणता आल्या असत्या.

चौथा दिवस : सौ. ने केलेल्या मेथीच्या भाजीत तिखट मीठ कमी आहे की आपली जिभेची चव गेलीय? संध्याकाळी जेवायला काय असेल? कालच्या रात्रीसारखं परत जर भाजणीचं खमंग थालीपीठ आणि त्या खरपूस भाजलेल्या थालीपीठावर वितळणारं लोणी दिवसभर घरातलं काहीही काम न करता सुद्धा मिळत असल्यास हा क्वारंटाईन पिरियड चौदा दिवसानंतर डॉक्टरांना विनंती करून एकवीस दिवसाचा करून घ्यावा का?

पाचवा आणि सहावा दिवस : कंपनी गेली चुलीत, क्लाएंट गेला तेल लावत, टार्गेट्सला लागली आग आणि अप्रेझल गेलं उडत !

सातवा आठवा आणि नववा दिवस : माझ्या आत्मचरित्राचं मी ठरवलेलं नाव. "माझ्या जाणिवांची फुप्फुसं..."

दहावा दिवस : करोना चे ह्या देशातून समूळ उच्चाटन, हेच आता माझ्या आयुष्याचे एकमेव ध्येय. ( परिपाठादी काढा घेतलायस का सकाळी ? , दरवाज्याच्या पलीकडून सौ. चा वीज कडाडावी तसा आवाज : नाही नाही विसरलो , घेतो घेतो लगेच, त्यानंतर आपण सकाळी दिलेला काढा दुपारी घ्यायला विसरतो, त्यामुळे देशातून करोनाच्या उच्चाटनाची भाषा आपल्या तोंडी शोभत नाही, हा क्लेशदायी आत्मशोध.)

अकरावा आणि बारावा दिवस : लाईट बिल आणि मुन्सिपालटीची घरपट्टी आलीय, ती भरतो आजच्या आज म्हणजे ५% डिस्काउंट तरी मिळेल. आपण ह्या क्वारंटाईन च्या भानगडीत HDFC ह्या महिन्याचा होम लोन चा ई.एम.आय. ऑटो डेबिट पडला की नाही ? पाहायचंच विसरून गेलो की राव. अर्रर्र, ऑक्सिमीटर आणि त्या ऑक्सिजन सॅच्युरेशन लेव्हल च्या नादापायी माझ्या सिबिल स्कोर ची वाट लागायची. करोना काय अजून सहा आठ महिन्यात जाईल, बँकेचे हप्ते अजून आठ दहा वर्षे भरायचेत. “रामतीर्थकर उठा!”, पुरे झाला हा क्वारंटाईन पिरिअड आणि पुरे झाला हा आळस. मला दासबोधातली "आधी प्रपंच करावा नेटका, मग ध्यावे परमार्थ विवेका, येथे आळस करू नका , विवेकी हो !" ही रामदासांची ओवी आठवली, का कुणास ठाऊक?

चौदावा दिवस (रामनवमी) : (रामतीर्थंकरांचा चौदा दिवसांचा कारावास सुटला.) गांधीजींनी जसं फळांचा ज्यूस पिऊन २१ दिवसांचा उपोषण सोडलं तसं मी गाडीवरून डेक्कन पर्यन्त बाईक वरून एक रपेट मारून ताज्या फळांचा ज्यूस नाही किमान फॅन्टा किंवा माझा पिऊन माझा क्वारंटाईन का सोडू नये? (खरंतरं पुढचे तीन आठवडे मला शहाळ्याचं पाणी सुद्धा जपून जपून प्यावं लागणार होतं ! ) पण माझ्या क्वारंटाईन च्या शेवटच्या दिवसाचे हे बंडखोर विचार.

अश्या ह्या वैविध्य पूर्ण विचारांच्या चौदा दिवसांच्या क्वारंटाईन मधून बाहेर पडल्यावर आता मागे वळून पहिले की 'करोना च्या विषाणू कडे पाहण्याचा दृष्टिकोनच संपूर्णपणे बदलून जातो.' रेमिडिसवीर, फॅबिफ्लू, देशभर संपत आलेले ऑक्सिजन चे साठे, Vaccine हे वगैरे सगळे निव्वळ मनाचे कधी गंमतशिर तर कधी कातर असे भयप्रद खेळ वाटू लागतात. क्वारंटाईन मधले सतत बंद दरवाजे तुमचे सगळ्यात जवळचे मित्र बनतात ह्यापूर्वी कधीच सजीव न वाटलेल्या चार भिंती तुमच्या सगळ्यात जवळच्या मैत्रिणी बनून जातात.

बंद रूम च्या दरवाज्याच्या बाहेरून, बायको ने, अंगच्या रस सुटलेल्या वाफाळलेल्या दोन भाज्या, तव्यावरची गरम पोळी, गॅलरीच्या टीचभर बागेतल्या कुंडीत उगवलेल्या हिरवट लाल टोमॅटोची रसरशीत कोशिंबीर आणि खोकला असून पानात जरा खायला चव यावी म्हणून वाढलेली आंब्याची डाळ वाटून केलेली चटणी, असं साग्रसंगीत ताट हे आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख बनून उरतं. दर दोन तासांनी मोजलेली आणि ९५% च्या वरती असलेली तुमच्या फुफुसातली ऑक्सिजन ची पातळी हे आयुष्यातलं सगळ्यात एकमेव ध्येय बनून जातं, आणि "आज दिवसभर एकदाही कणकण आली नाही" हे तुमच्या जीवनातलं ब्रम्हवाक्य होऊन जातं . तुमचा रिपोर्ट पॉझीटीव्ह आल्यावर "आपणच आपल्या घरी आणखी कुणाला पसरवला नाही ना?" ह्या चिंतेपोटी आतड्याला पडलेला पीळ ह्या चौदा दिवसात सगळ्यात मोठा वेदना दाई ठरतो आणि ऐशी पंच्याऐशी औंश गरम पाण्याच्या मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करताना डोळ्यात दाटून आलेलं एकाकी पणाचं ओलसर दव हे तुम्ही सहन केलेल्या दिवसांच्या खडतर प्रवासाचं गमक सांगून जातं. परंतु ठरवलं तर मात्र करोना मध्ये तुम्ही १४ दिवस एकटे अजिबात नसता, कारण ह्या दोन आठवड्यात तुम्ही थोडं जरी स्वतः शी बोललात रोज अगदी पंधरा मिनिटं जरी, तर मात्र जीवनाच्या आसक्तीची अमृतवेल तुमच्या शरीरावर वाढून तुम्ही १४ दिवसानंतर बाहेर येता तेंव्हा त्या वेली गौतम बुद्धा सारख्या तुमच्या शरीरावर लगडलेल्या असतात आणि तुम्ही हिमालयातल्या एखाद्या तपस्वी साधू पुरुषासम आयुष्याचा वेगळा अन्वयार्थ प्राप्त झाल्यामुळे जीवनाकडे नवीन दृष्टीकोनातून पाहू लागता.

आयुष्य तेच, माणसं तीच, पण तीच माणसं तुम्हाला अजूनच वेगळी आणि अनोखी भासू लागतात, आणि तेच आयुष्य तुम्हाला अजूनच सुंदर भासू लागतं. बॉउंडरी वर पहिल्या पाच ओव्हर मध्ये Australian टीम च्या नवख्या फिल्डर कडून catch सुटावा आणि नंतर पुढे मग तेंडुलकरने चौकार आणि षटकार मारत जोरदार शतक ठोकावं तशी ही आता दुसरी Inning !

चारुदत्त रामतीर्थकर
१ मे २०२१, (पुणे)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

mi_anu, वावे आणि सुहृद, अभिप्रायाबद्दल धन्यवाद.

सुहृद : तुमचं विलगीकरण संपलं असावं बहुधा, एव्हाना. तुम्हाला रिकव्हरी साठी शुभेच्छा !

छान लिहिलंय
निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा!

छान