आठवणींचा ठेवा ...कळशी

Submitted by मनीमोहोर on 1 May, 2021 - 02:05
घागर, हंडा

नळ सोडला की पाणी हजर हे सुख अगदी अलीकडच्या काळातलं. अर्थात ते ही सगळ्यांना नाहीच. पाण्यासाठी वणवण फिरून पाणी साठवणे आणि ते पाणी फार काळजीपूर्वक वापरणे हेच खरे वास्तव.

पाणी साठवण्यासाठी मातीच्या मडक्या / रांजणापासून सुरू झालेला प्रवास वाटेत तांब्या पितळ्याच्या आणि स्टीलच्या हंडे, कळश्या, पिंपांचा थांबा घेत आता सर्व व्यापी प्लास्टिक पर्यंत आलाय. पन्नास साठ वर्षांपूर्वी घराघरात दिसणारी तांब्या पितळ्याची पाणी साठवणाची भांडी आता सहज सुलभ आणि स्वस्त प्लॅस्टिक मुळे जवळ जवळ हद्दपारच झाली आहेत.

परवा माळा आवरताना मला ही तांब्याची कळशी दिसली आणि असंख्य आठवणी मनात दाटून आल्या. आईने मला लग्नात दिली होती ही कळशी. माहेरून आल्यामुळे माझी लाडकी होतीच पण तिचा घाट ही माझा आवडताच होता. तिच्या गळ्यावर आणि कमरेवर असलेल्या पितळी पट्ट्या तिचं सौंदर्य खुलवतात अस मला वाटे. कळशीच तोंड जरी लहान असलं तरी थोडी कलती केली की पाणी काढून घेता येत असे अगदी सहज. बरेच दिवस वापरत ही होते मी . मुळात तांबं चांगलं असल्याने ती स्वच्छ आणि चकचकीत ठेवण्यासाठी फार मेहनत घ्यावी लागत नसे मला.

शनिवारी दुपारी, विशेषतः उन्हाळ्यात ऑफिसमधून घरी आले की फ्रिज मधलं पाणी न पिता ह्या कळशीतलच पाणी मी पीत असे. कळशी खूप जाड असल्याने बाहेरची उष्णता आतल्या पाण्यापर्यंत पोचत नसे. त्यामुळे पाणी मस्त नैसर्गिक गार रहात असे. हे पाणी प्यायलं की जीव कसा अगदी थंड होत असे. शेवटी त्या पाण्याचे चार थेंब डोळ्यांना लावले की उन्हाचा सगळा ताप नाहीसा होऊन एकदम फ्रेश वाटत असे. पुढे काळाच्या ओघात पाणी चोवीस तास मिळू लागलं पाणी साठवण्याची गरज उरली नाही, फ्रिजची सवय झाली, प्लॅस्टिकच्या पाण्याच्या बाटल्या वापरणं पाणी सांडण्याची भीती नसल्याने अधिक सोयीचं वाटू लागलं, वाढत्या संसाराच्या व्यापात ती कळशी घासण कठीण वाटू लागलं आणि तिची पाठवणी माळ्यावर केली गेली.

ह्या सगळ्या आठवणींमुळे कळशी बद्दलच माझं प्रेम फारच उचंबळून आलं आणि माझ्या ही नकळत कळशी माळ्यावरून खाली आली. जरासं चिंच मीठ लावताच पहिल्या सारखी चमकू लागली. जणू कोणीतरी जिवा भावाचं प्रेमाचं माणूस खूप दिवसांनी भेटावं असा आनन्द मला झाला. दोन दिवसांनी कळशी पाण्याने भरली आणि तिच्यातलं गार पाणी पिताना तेच सुख परत उपभोगलं.

मला खात्री आहे वर्ष सहा महिन्यांत हा उत्साह ओसरेल, कळशी दोन चार महिने न वापरता तशीच सैपाकघरात पडून राहिल आणि एक दिवस आवरा आवरी करताना परत तिची रवानगी माळ्यावर होईल. असं जरी असलं तरी आज तिच्या मुळे मला मिळणारा आनन्द खूप मोठा आहे ह्यात शंका नाही.

( आत्ताच्या मुलाना कदाचित कळशी हा शब्द ही माहीत नसेल ,त्यांच्या साठी फोटो ही दिलाय ☺️)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलंय हळुवार आठवण. गंमत म्हणजे माझ्याकडे पण सेम अशीच कळशी आहे वास्तुशांती ला घेतलेली. सध्या माळ्यावरच. पण दोन वर्षांपूर्वी तांब्याचा फिल्टर घेतलाय. जुन्या पद्धतीचा . जड आहे, घासायला ही वेळ लागतो. पण अजून वापरतेय.

आत्ताच्या मुलाना कदाचित कळशी हा शब्द ही माहीत नसेल ,त्यांच्या साठी फोटो ही दिलाय >>> खरंय. आपण रांजण, घंगाळ, तपेलं, काथवट या गोष्टी बघितल्यात तरी.
मी आजेसासुबाई वापरायच्या ती पितळी परात ही रोज वापरते. कणिक फु प्रो त मळते पण भाकरी त्या परातीत करते . मला फार आवडते ती. रोज वापरून वापरून ती चकचकीत दिसते सोन्याची असल्यासारखी.

मस्त लेख.
मनीमोहोर मला ही आईने माझ्या लग्नात सेम कळशी दिली आहे.

कळशी की घागर हा आम्हा शाळेत जाणाऱ्यासाठी प्रेसटीज चा प्रश्न असे... तुझी अजून घागर खांद्यावर घ्यायची ताकत नाही तू कळशी ने पाणी भर म्हटले की वाईट वाटत असे... पुढच्या वर्षी तरी घागर उचलता येऊ दे अशी प्रार्थना करत असू...

नेहेमीप्रमाणे सुखद आठवणी जागृत करणारा लेख>>>११११
आमच्याकडेही अशीच कळशी आहे गावी
लहानपणी गावी पाणी भरताना, डोक्यावर हंडा आणि दोन्ही हातात दोन कळश्या अस पाणी आणताना जाम भारी फिलींग यायचं. शेतात दिवसभर काम करताना, मोठ्ठी कळशी भरून बाहेरून ओलं कापड लावून सावलीत ठेवली की दिवसभर पाण्याची सोय होई.
आमच्याकडे लग्नात मुलीच्या आत्याने नवरदेवाला कळशी देण्याची पद्धत आहे.
त्यामुळे खूप कळश्या, हंडे घरी असत आणि त्याचा वापर देखील होत असे. कालौघात सगळं मागे पडलं. आता आत्याबाई मॉडर्न गिफ्ट देतात.

अतिशय सुरेख लिहीलं आहे. माझ्या लहानपणी गावी आजीकडे गेल्यावर थोड्या अंतरावरून विहिरीवरून पाणी आणावं लागत असे. त्याकरता बाई होती पण आई, काकी जमेल तसा हातभार लावायच्या. मला पण हौस, आजीने मला एक छोटं क्युट पितळी भांडं, त्याला ती बटलई म्हणत असे, दिलं होतं. ती म्हणायची तू मोठी झाल्यावर कळशी देईन पाणी आणायला.
पण दुर्दैवाने मी मोठी होण्याआधी आजी गेली. आता घरोघरी नळ आहेत पण माझी बटलई मात्र गहाळ झाली कुठे तरी

माझ्या आजोळी आजीच्या काळी अशी पाण्याची एक मातीची कळशी होती. तिला अरुंद तोंड होतं, वर झाकण होतं आणि साईडने एक हत्तीसारखी सोंड होती. ती कलती करुन त्या सोंडेतून पाणी घ्यायचं.आजी त्याला केळी म्हणायची. मला खूप आवडे ती. कालौघात ती पण कुठे गायब झाली. मी खूप ठिकाणी नर्सरी मध्ये वगैरे पाहते पण तसं काही मला दिसलं नाही कुठे. खरंच किती जीव असतो आपल्या बायकांचा भांड्या कुंड्यांमध्ये !

छान लेख!
पण असं काही वाचलं की आईचे ३ जड आणि मोठ्ठे पितळेचे डबे मोडीत काढल्याचे दु:ख ताजेतवाने होते.कारण असे जड डबे घ्यायचे तर तसे मिळायचेही नाहीत.उगा बिचारे माळ्यावर राहिले असते असं आता वाटते.पण त्यावेळी आईही देऊन टाक म्हणाली होती.कारण बरीच भांडी,डबे ,पिंप इ.सुनेला सांगून विकले होते.

आमच्याकडे अशी ठोक्याची नाही आहे , पण छोटीशी तांब्याची कळशी आहे .
आईने मला लग्नात दिलेली .
कोण वापरणार ? कोण घासणार, कुठे ठेवणार म्हणून एक-दोन वर्षे माळ्यावर पडून होती.
नंतर नविन घरात कीचन मोठं आहे म्हणून काढली खाली . आता रोजच्या वापरात आहे .