हॅशटॅग True Image

Submitted by कविन on 18 April, 2021 - 09:23

“स्मोकिंग झोनमधे भेट ५ मिनिटात” व्हॉट्स ॲपवर अभ्याचा मेसेज फ्लॅश झाला तेव्हा नेमका आमचा मास्तर माझ्या बाजूलाच होता. त्याने एक शेलका लूक दिला आणि परत लाल शाईने गोल केलेल्या कंटेन्टकडे लक्ष वेधून घेत “Mr Pratik correct it and send it back in next five minutes” असं ऐकवून आणि फाईल माझ्या डेस्कवर जवळजवळ आपटून तो निघून गेला. या दोघांनाही पाच मिनिटाचं काय ऑब्सेशन आहे देव जाणे!

“मास्तर पेटलाय. आग विझवून आलोच.” अभ्याला असा रिप्लाय पाठवून मी कामाला लागलो.
त्यात आमच्या बॉसचा चेहरा पाहीला तरी कोणीही सांगेल 'आग्यावेताळ' का काय म्हणतात तो हाच आणि आम्ही पडलो गरीब बिचारे वेठबिगारी.

फायर-एस्टींगविशर ज्या त्वरेने आग विझवायच्या कामाला लागेल तस्सा अगदी मी ही आग विझवायच्या कामाला लागलो. फक्त माझा 'फायर-एस्टींगविशर मोड' हा अजिबात सर्व्हिसींग न केलेल्या इन्स्टृमेन्ट इतकाच फास्ट होता, त्यामुळे पाचाची पंधरा मिनिटे घेत एकदाचे बदल करुन फाईल पाठवून दिली आणि स्मोकिंग झोनकडे वळलो. मी पोहोचेपर्यंत महाशयांनी दुसरी सिगारेट पेटवली होती.

“मरशील मेल्या तोंडाच्या कॅन्सरने” मी त्याच्या हातातल्या सिगारेटकडे बघत म्हंटलं

“आज माफ आहे सगळं. आज डोकं फुटलय माझं” त्याने मला असं ऐकवलं पण माझ्या चेहऱ्याकडे बघून शिस्तीत सिगारेट विझवून फेकून दिली.

“आता बोल. काय झालय?” मी विचारलं.

“काय होणार? स्मिताच्या घरी समजलय सगळं. काल राडा झाला तिच्याकडे”

“आईच्चान! आता?”

“आता काय? भेटायला बोलावलय मला आज.”

“ठीके की मग. तसही आज ना उद्या लग्नाचं ठरवायला भेटणार होतासच ना?”

“पट्या! अरे ते अजून एखाद वर्षाने सांगणार होतो आम्ही घरी. आत्ता जाऊन काय सांगणार? नोकरी होती चांगली पण चार दिवसांपुर्वीच रिझाईन केलय आणि मित्रासोबत पार्टनरशीपमधे व्यवसाय सुरु करतोय. सध्या मंथली इन्कमची खात्री नाही पण व्यवसायात जम बसला की खिशात पैसा असेल, हे सांगू? आधीच तिच्या भावाचं आणि माझं वाकडं आहे. तो तर अजिबातच सपोर्ट करणार नाही आम्हाला.”

“तू त्याची पाचर मारुन ठेवलीस, आता तो तुझी मारतोय”

“तू त्याचा मित्र आहेस की माझा?.”

“दोघांचा”

“पण आत्ता माझ्या बाजूला उभा आहेस तर माझ्याच बाजूने बोल ना.”

“ओके बॉस. पण तरी, कर्मा रिटर्न्स मेरे दोस्त. कॉलेजमधे छळलयत त्याला, आता भोगा”

“अरे! कॉलेज संपून जमाना झाला आता. कॉलेजमधे असतात आपापले गृप्स आणि असतात त्यांची आपापसात इक्वेशन्स. त्यात आम्ही रायव्हल गृपवाले आणि कॉलेज इलेक्शन म्हणजे अटीतटीची लढाई मानणारे गरम रक्त अंगात. त्याने निवडणूकीत मला हरवले आणि “

“आणि त्याच्या गुलबकावलीला पटवून तू त्याला मात देऊन स्कोअर सेटल केलेस.” मी वाक्य पुर्ण करत ऐकवलं त्यावर त्याचं नेहमीच वाक्य आलंच, “ती त्याच्याबाबत सिरियस असती तर तिने मला हो म्हंटलं असतं का?.”

ते ही बरोबर होतच म्हणा. पण ती ठिणगी अजून धुमसत होती म्हणून तर आता यांच्या लग्नात ही अग्निपरिक्षा मधे आली होती. मी म्हंटलं तसं त्याला पण ते काही त्याच्या पचनी पडलेलं नव्हतं. त्याच्या मते स्मिताच्या भावाने स्कोअर सेटलिंगसाठी बहिणीच्या भावनांशी खेळणं चूक आहे.

“चूकच आहे त्याचं वागणं पण कॉलेजमधे दोन ब्रेक अप्स झालेत तुझे, त्यातला एक तर त्याला आवडणाऱ्या मुलीशी झालाय. तेव्हा, तुला रिलेशनशीपबद्दल गाभिर्य नाही असं तो म्हणतो ते काही अगदीच हवेतलं मत नाही ना!”

“अरे! पण मधे किती वर्ष गेली? त्यात काहीच बदललं नसेल का? मुळात स्मिता आणि मला एकमेकांचा पास्ट माहिती आहे. आम्हाला काही प्रॉब्लेम नाही तर त्याला का असायला हवा?”

“सगळं मान्य. पण जर तुम्हाला सगळ्यांच्या संमतीने लग्नं करायचं आहे म्हणताय तर तुला त्याच्या गुड बुक्समधे प्रवेश मिळवायला लागणार. त्याच्याशी वाकड्यात जाण्यापेक्षा गोडीगुलाबीने घे. तो राजी तर आई बाबाही राजी. आणि म्हणत असशील तर दोघांना समोरासमोर बसवून कान उपटणी करतो दोघांची. बोल तू फक्त. करुयाच राजी त्याला”

“तो कसला राजी होतोय. त्याला माझ्यात काही चांगले कधी दिसलेय? ’बेजबाबदार, गांभिर्य नसलेला नालायक माणूस' आहे मी त्याच्यामते.”

“तू बेजबाबदार? अरे ऑफीसमधे ज्या मोजक्या लोकांबद्दल आग्यावेताळाचही मत चांगलं आहे अशापैकी तू एक. उलट तुझ्या एफिशिएन्सीचे दाखले ऐकवत आम्ही कसे कामचुकार पोटार्थी पाट्याटाकू आहोत हे आम्हाला ऐकवत असतो बॉस.”

“पण त्याच्या नजरेला हे कुठे दिसतं? तिथे मी त्याच्या बहिणीसाठी नालायकच ठरतो. मुळात मी 'खरा' कसा आहे? हे जाणून घेण्यात त्याला अजिबात रस नाही. त्याने मत बनवलं आहे आणि तेच बरोबर आहे, हे त्याने ठरवले आहे.”

“Its ok. तुम्ही भेटाल एकमेकांना तेव्हा समजेलच त्याला हे सगळं. तुला वाटतय तितका तोही वाईट नाहीये”

“मग मी नालायक आहे का त्याला वाटतोय तसा?”

“असं म्हंटलय का मी? तो भडक डोक्याचा आहे हे मान्य, पण त्याला जे वाटतय ते बदलायचा प्रयत्न करता येईल आपल्याला आणि पटेल त्याला”

“मी ओळखून आहे ना त्याला पुरता. नाहीच पटायचं त्याला काही.”

“अरे! तू नको टेन्शन घेऊस इतकं. पटवशील रे तू तिच्या वडीलांनाही. भावाचं काय घेऊन बसलास इतकं. जा बिंधास्त”

“तंगडं मोडून हातात देईन, परत त्या हरामखोराचे नाव सुद्धा घेतलेस तर.” असं जो स्वत:च्या बहिणीला ऐकवू शकतो, तो मला घरी बोलवून काय पायघड्या घालून स्वागत करणार आहे का?”

“मी बोलतो म्हंटलं ना तुला. तुला वाटतं तितकाही गुंडा नाहीये तो. इन्फॅक्ट रात्रीबेरात्री केव्हाही बोलवा, मदतीला येईलच अशी खात्री देता येईल अशा यादीतला मित्र आहे तो.”

“ते फक्त तुझ्याबाबतीत. बाकीच्यांमधे ‘रावडी राठोड’ म्हणूनच प्रसिद्ध आहे तो.”

“बरं पण आता पुढे काय? घरीच बोलावलय ना? आईबाबा असताना काही तो तुझं तंगडं मोडत नाही हे नक्की”

“तुला मस्करी सुचतेय? पण तो काहीही करु शकतो. मी चांगला ओळखून आहे त्याला. You don't know his true self"

“True self? बरं काय आहे मग 'his true self'?”

“गुंडं. गुंडं आहे तो पक्का. स्वत:ला पार्टीचा कार्यकर्ता म्हणवतो पण पार्टीच्या नावाखाली सदानकदा कुणा ना कुणाशी पंगेच घेत फिरतो. लाठीकाठीशिवाय बोलतच नाही कधी. माझं सोड. तू आपल्या कॉमन फ्रेंड्सपैकी कोणालाही विचार”

“गुलबकावलीला विचारु?”

“विचार की. ती ही त्याला गरम डोक्याचाच म्हणेल.”

“ती तर तुलाही फ्लर्टी, कमिटमेन्ट फोबिक असं काय काय म्हणायची”

“ओ! कम ऑन. तुला माहिती आहे, हे खरं नाहीये”

“मी माझं नाही, तिचं तुझ्याबद्दलचं मत सांगितलं. तसं तर माझं त्याच्याबद्दलही चांगलं मत आहे. His True Self is not of Gunda as per me. पण तुला तो गुंड वाटतो. नाही का?”

“तुझा मुद्दा काय आहे? मी त्याला ओळखायला चुकलोय?”

“अजिबात नाही.”

“मग? तू चुकलायस?”

“असही नाही”

“मग काय?डोक्याचं दही व्हायच्या आत सांग साध्या सरळ शब्दात”

“मुद्दा इतकाच आहे की तू ज्याला True self म्हणतोयस ते खरतर Perceived Self आहे. म्हणजे माणसाला तो जसा दिसतो आणि इतर जसे दिसतात, ती असते 'perceived self image'. प्रत्यक्षात ती व्यक्ती जशी आहे त्या इमेजला म्हणतात 'रिअल सेल्फ' आणि त्या व्यक्तीला जसं दिसावं वाटत असतं, त्याला म्हणतात 'आयडीयल सेल्फ'. हे असं मी नाही हा, the father of humanistic psychology ग्रेट 'कार्ल रॉजर्स' यांनी म्हणून ठेवलय. पण खरं सांगू रिअल रिअल म्हणतात तो ॲक्च्युअली आपल्या मनाचा आभासच असू शकतो. त्यात हे पर्सिव्ह्ड आणि आयडीयल सेल्फ कधी कुठे किती ओव्हरलॅप होत असतील आपल्यालाही समजत नसेल. असं आपलं मला वाटतं”

“बरं माझ्या अभ्यासू मित्रा. भलेही इमेज इकडे तिकडे झाली असेल, तरी मुळात तो उद्या राडाच करायच्या तयारीत आहे हे तर नक्की.”

“असं काही होत नाही रे टोकाचं. थोडे वाद, थोडी हमरीतुमरी होईल नाही असं नाही पण तुला वाटतय तितकं काही होईल असं मला वाटत नाही.”

“सुचलं कुठून रे पण हे ॲनालीसिस तुला?”
“अरे गेल्यावर्षी तुला त्या शॉर्टफ़िल्म कन्सेप्ट बद्दल बोललो नव्हतो का?”

“तू कृपालला भेटून दाखवणार होतास ती?”

“येस्स, मेमरी शार्प आजे तुझी.”

“साल्या पट्या मला वाटलं तू माझ्या प्रश्नावर सोल्युशन देतोयस. ढोल्या तू तर तुझ्या स्क्रिप्टमधेच बुडालायस.”

“ये स्क्रिप्ट नही भाया ये तो जीवन सार है।“

“भेंडी! परत जड शब्द वापरलेस ना आज तर बघ.”

“अभ्या लेका एकतर मित्र म्हणून तुला चिअर-अप करतोय. स्मिताच्या भावालाही मी सांभाळेन म्हणतोय. तरी मलाच बांबू?”

“सॉरी यार, आज डोकं आऊट आहे.”

“चला आता डेस्कवर परत जाऊ, खविस चवताळेल, इतका वेळ डेस्क रिकामा बघितला तर. आधीच आम्ही कामचुकार पाट्या टाकू.”

“दहा बारा मिनिटं आहेत रे अजून ब्रेक संपायला. बॉसचं टेन्शन सोड, मै हू ना!”

“ओ डुप्लिकेट शाहरुख खान, पेपर तुम्ही टाकलायत. आम्हाला दिवस काढायचेत इथे”

“जाऊ रे चहा पिऊन. आहे वेळ अजून. त्यातून आज शुक्रवार. विकेंडला तो ही नाही जात लवकर डेस्कवर. चल तू. आणि तसही आज एन्जॉय करतो शेट्टीचा कडक चाय आणि समोसा. सोमवारी मोडलेलं तंगडं घेऊन कुठल्यातरी हॉस्पिटलमधे पडलेलो असेन” त्याने माझ्या पाठीवर थाप मारत म्हंटलं

“इतकी वेळ नाही येणार तुझ्यावर. तू कॉलेजमधे होतास तसा फ्लर्टी नाहीस, त्याच्या बहिणीला सुखात ठेवशील हे जर का त्याला पटलं तर का तोडेल तो तुझं तंगडं?. तो तुला तिच्या योग्यतेचा समजत नाही हा इश्यु आहे तुमच्यात. याचाच अर्थ त्याला दिसणारा तुझा चेहरा वेगळा आहे.”

“हरदासाची कथा मूळ पदावर तसय तुझं पट्या. तुला मुखवटा घालून वावरतो वगैरे जडजंबाल म्हणायचय का?” त्याने मला थांबवत विचारलं

“मुखवटा? कदाचित हो कदाचित नाही?”

“म्हणजे? तूच कन्फ़्युज अजूनही थीमबाबत?”

“तसं नाही. म्हणजे मुखवटा आपण धारण करतो तेव्हा मुखवट्याच्या आत एक चेहरा आहे हे मुखवटा धारण करणाऱ्याला माहिती असतं किंवा असू शकतं. पण मी म्हणतोय ते हे की मुखवट्याविनाही प्रत्येकाचा एकच एक असा खरा चेहरा नसतो. खरतर “खरा चेहरा” असं काहीच नसतं. प्रत्येकाला दिसतो तो चेहरा वेगळा असु शकतो आणि प्रत्येकच चेहरा त्याच्या पुरता खरा असू शकतो पण तरी तोच तेव्हढा खरा नसतो.”

“हे फार जड होतय हा आता.”

“म्हणजे मला मी जसा दिसतो तसाच तुला दिसेनच असं नाही. या दोन्ही प्रतिमा वेगळ्या असू शकतात किंबहुना असतातच मोस्टली. मी ’ही’ थीम इमॅजीन करताना डोळ्यापुढे आणलेला एक छोटा सिनेमा ऐकवतो तुला. कदाचित त्यामुळे समजावणं सोपं होईल मला.”

“इर्शाद!

“तर या सिनेमाचा फोकस आहे ’आपला हिरो राज याच्या चेहऱ्याचे प्रतिबिंब’.”

“ओSsके! ऐकतोSय”

“सीन १: आपला हिरो राज त्याच्या घरात बेडरुममधे आरशासमोर उभा आहे. आरशावर बरेच फरांटे आहेत त्यामुळे त्याला त्याचा चेहरा ’नीट’ दिसत नाहीये. तो फडक्याने आरसा पुसतो. त्याला चेहरा नीट दिसतो. खुश होऊन शीळ घालत तो केस विंचरतो.
इथे मजा बघ हा!”

“कुठे बघू” त्याने चहाची ऑर्डर देत भंकस करत विचारलं

“तुला ऐकण्यात इन्टरेस्ट आहे की नाही?” मी चिडून विचारलं

“वोक्के बॉस. सॉरी. पुन्हा नाही टोकणार. ऐकव तू पुढचं” त्याने कान पकडत म्हंटलं

“मग भंकस पुरे.” मी दीर्घ श्वास घेऊन नॉर्मल होऊन पुढचं ऐकवायला सुरवात केली.
“आपल्याला राजची पाठ दिसेल रुममधे. म्हणजे कॅमेरा असेल त्याच्या मागे.” मी टेबलावरच्या चमचे आणि ग्लासलाच प्रॉपर्टीम्हणून वापरत सीन सांगायला सुरवात केली. त्याने चहाचा घोट घेत नुसतं हम्म म्हणत लक्ष आहे असं सुचीत केलं.

“आणि जो काही चेहरा दिसेल त्याचा, तो दिसेल फक्त आरश्यातून. इथे सीन कट होईल पहिला. मग पुढे सगळं कार्टून्समधे दिसतं तसं स्पिड डबल होऊन घडेल. राज बाहेर जाईल. तो बाहेर पडताना बाबा त्याच्याकडे बघतील. तेव्हा कॅमेरा बाबांच्या मागे असेल. त्यांच्या खांद्यावरुन राजकडे फोकस... आपल्याला राजचा चेहरा वळू असतो ना वळू..”

“म्हणजे माजलेला बैल?”

“परफेक्ट, तसाच दिसेल चेहरा आपल्याला.”

“माणसाच्या जागी बैलाचा चेहरा?” अतिरंजीत नाही होणार हे?” त्याने विचारलं

“ह्म्म! इम्प्रोव्हायझेशनमधे काही अजून चांगलं सुचतय का बघू. इथे वळू की अजून काही हे महत्वाचे नाहीये. मुख्य मुद्दा हा आहे की बाबांच्या नजरेतून जेव्हा चेहरा दिसेल तेव्हा तो चेहरा आणि आधी आपल्याला दिसलेला चेहरा एकच नसेल. दोन्ही चेहरे वेगळे असतील.”

“बर. पुढे?”

“राज गेटमधून बाहेर पडताना त्यांच्या वरच्या मजल्यावर रहाणारी एक तरुणी रिक्शातून उतरत असेल. राज काहीतरी फ्लर्टी कमेंट करेल. ती पण स्वीटसं हसेल. राजकडून परस्पर ऑ्टोकरता सुट्टे पैसे मागून घेईल आणि जाताना ’थॅन्क्स ब्रो’ म्हणून निघून जाईल. हे म्हणताना कॅमेरा तिच्या मागून आपल्याला राजचा चेहरा दाखवेल तो असेल उल्लूचा. असेच मग पुढे कधी घमेंडी, कधी टपोरी, कधी भित्रा ससा कधी अजून काही असे वेगवेगळे चेहरे आपल्याला दाखवत राहील कॅमेरा पण तो पहिल्यांदा दिसलेला आरशातला चेहरा नाही दिसणार. कामं आटपून राज घरी येईल. परत तो आरसा पुसण्याचा सीन होईल मग परत तो जुना चेहरा आपल्याला दिसेल आणि मग एक ट्विस्ट”

“वो क्या?”

“कॅमेरा ॲन्गल असा असेल की आपल्याला राजचा चेहरा आरशातही दिसेल आणि समोरुनही दिसेल. समोरुन म्हणजे आरशाच्या जागी जर आपण उभे राहिलो तर आपल्याला जसा दिसेल तसा.”

“म्हणजे बिंब प्रतिबींब असं सांग ना साध्या शब्दात”

“करेक्ट. फक्त हे बिंब आणि प्रतिबिंब दोन्ही सेम नसेल.”

“व्हॉट? डोक्यावर पडलायस का? मी आरशात बघितले तर माझे बिंब प्रतिबिंब माझेच असणार की एक माझे आणि एक अमिताभ बच्चनचे असणार?”

“तुला तू अमिताभसारखा दिसत असशील तर तुला प्रतिबिंब त्याचेच दिसेल”

“तू बरा आहेस ना? नाही राडा माझ्या आयुष्यात झालाय मित्रा. फ्युज माझा उडायला हवा. तुझा का उडलाय?”

“अरे म्हणजे इथे अमिताभ बच्चन एक प्रतिक म्हणून घे रे. तुझ्या नजरेत जर तू अमिताभ सारखा बीग बॉस असशील तर तू स्वत:ला तसेच बघशील आरशात. आणि माझ्या लेखी तू “बाई वाड्यावर या म्हणणारा निळू फुले असशील” किंवा अभिनयातला ठोकळा विश्वजीत असशील तर मला तू तसाच दिसशील.”

“निळू फुले आणि विश्वजीत? काय रेंज आहे! हाण तू आता मला” त्याने एकीकडे समोसा खात ऐकवलं.

“अरे म्हणजे जे माझ्या नजरेला दिसेल तीच इमेज माझ्या मनात उमटेल आणि पक्की होईल रे. आता राज जे प्रतिबिंब आरशात बघतोय ते त्याच्या नजरेला दिसणारी त्याची इमेज आहे. आणि समोरुन जे आपल्याला दिसेल ते आपल्या नजरेतली प्रतिमा असेल. म्हणून तर म्हणतोय खरी प्रतिमा, one true image असे काही नसते. राजचं प्रत्येकाला दिसणारं प्रतिबिंबं वेगळे असते कारण ते त्यांना ’दिसलेल्या राजच’ प्रतिबिंब असते. आणि राजला त्याचं स्वत:च म्हणून दिसणारं प्रतिबिंबं वेगळं असतं कारण ते त्याला दिसलेलं त्याचं प्रतिबिंब असतं.”

“sounds interesting.”

“interesting sound करतय ठिक आहे, पण कळतय का नक्की मला काय म्हणायचं आहे?”

“बस काय मित्रा कळतय की.”

“कळतय? मग आता काय मत आहे तुझं, तिच्या भावाच्या खऱ्या इमेजबद्दल म्हणजे तुझ्या मनातल्या त्याच्याबद्दलच्या हॅशटॅग True image बद्दल रे?"

“तू मुद्दा लावून धरण्यात पटाईत आहेस. ठिक आहे. मी करेन विचार तुझ्या कंसेप्टचा आणि त्याच्याबद्दलच्या माझ्या मताचा. खुश?

"Good. प्रगती आहे. मग आता उद्या मिठाई खाऊनच येणार तर साडवाच्या हातून" मी डोळे मिचकावत म्हंटलं त्यावर त्याने, "do not mock me." म्हणत मला उगाच राग आल्याच भासवत म्हंटलं तसं मी पण, "व्हय महाराजा" म्हणत कान पकडत त्याची उगाच भंकस केली.

"उद्याचा आमचा एपिसोड नंतर ड्राफ्ट करु, आत्ता चहा एंजॉय करु", म्हणत त्याने मलाच विषय परत या थीमवर नेत या राज कंसेप्टचा “The End” काय? हे विचारलं.

“ह्म्म! The end म्हणजे फिल्म जेव्हा संपते तेव्हा राजचे दोन चेहरे दिसत रहातात एक आरशातला राजला दिसणारा राजचा चेहरा आणि दुसरा आपल्याला आरशात दिसणारा राजचा चेहरा आणि खाली एक पाटी फ्लॅश होईल “Who we really are?” आणि फिल्मचं टायटल असेल - 'हॅशटॅग True Image' " मी गार झालेला चहा एका घोटात संपवत ऐकवलं.

“ओके. कूल. पण हे जे काय स्क्रिप्ट आहे त्याचा ड्राफ़्ट तू कृपापला भेटून ऐकवणार होतास. त्याचं काय झालं?”

“ऐकवली ना कन्सेप्ट त्याला”

“मग? पुढे?”

“पुढे काही नाही. कन्सेप्ट आवडली पण एक्झीक्युट करायला अवघड आहे म्हणाला. वेगवेगळे ठोकळा स्क्रिप्ट्स सुरवातीला,मधे, नंतर वगैरे जोडत मध्यभागी ही थीम ठेवून पण ड्राफ़्ट लिहून पाहिले. पण एक्झीक्युट करता येईल असे सोल्युशन अजून तरी नाही मिळालय.”

“मिळेल रे एक दिवस. सुरुवात, मध्य शफल करत लिहून पहा सोल्युशन मिळेपर्यंत. तसही the end पेक्षा त्या आधीचे true image या हॅशटॅग लावत मनात जे बिंब प्रतिबिंब उमटतं ते त्रयस्थ बनून बघण्याच्या खेळात गंमत आहे.", त्याने पाठीवर थाप मारत म्हंटलं
“ह्म्म! बघू कसं जमतय” बील चुकतं करुन वॉशरुमकडे जाताना मी अर्ध त्याला अर्ध स्वतःला ऐकवत म्हटलं.

वॉशबेसीनपाशी आमचा मास्तर उर्फ अग्यावेताळ तोंडावर सपासप पाणि मारत उभा असलेला दिसला. त्याने चेहऱ्यासोबत अख्ख्या आरशालाही अंघोळ घातली असावी बहुतेक. पाण्याच्या ओघळाच्या रेघा आरशावर अजूनही दिसत होत्या.

"आता हा माझ्या कामचुकारपणावर शिक्कामोर्तब करणार हे नक्की" मी अभ्याला ऐकवलं.

तोपर्यंत बॉसची पाठ होती आमच्याकडे. पण ज्याक्षणी त्याचं माझ्या चेहऱ्याकडे लक्ष गेलं, त्याच क्षणी माझही लक्ष आधी त्याच्या कपाळावरच्या आठ्यांकडे आणि मग त्याच्या मागे उभं राहून डोळे मिचकावणऱ्या अभ्याकडे गेलं. अर्धा-पाव मिनिट एक प्रतिबिंब दुसऱ्या प्रतिबिंबाला बघत उभे राहिले आणि त्या अर्धा-पाव मिनिटात तिघांच्याही मनात ’काहीतरी’ उमटून ’काहीतरी’ पक्केही झाले ते ही अगदी हॅशटॅग “True Image” या शिक्क्यासोबतच फक्तं या खेळात अजूनही '’दी एन्ड’ची पाटी लागायची बाकी होती.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बोर झालो थोडक्यात. >>>> सॉरी कविन पण ह्याला अनुमोदन. Happy
सुरुवातीला लक्ष देऊन वाचली पण तेच ते येत राहिलं आणि नक्की 'गोष्ट' काय आहे ते न समजल्याने बोर झाल. मग पुढे पटापट स्करोल केलं पण फार काही घडलं असं वाटलं नाही. Happy

अरे सॉरी कशाला

एकेका कथेला पकडीत यायला (लेखकाच्या पकडीत) लागतो वेळ, हि त्यातलीच एक माझ्यासाठी. दोनेक वर्ष या थीमवर डायलॉग्ज आणि स्क्रिनप्ले लिहून पहावा तसे वेगवेगळे तुकडे जोडून लिहून पाहिले पण अजूनही ते येता येता निसटतेय. शेवटी कथा फॉर्ममध्ये तुकडे जोडून पाहिले.

जमेल एक दिवस तिचा तिचा नेमका फॉर्म सापडला की जमेल तोपर्यंत प्रयोग सुरु रहाणार Lol कधीकधी प्रतिसादातूनही क्लिक होऊन फॉर्म मिळून जातो असा पुर्वीचा अनुभव आहे.

गंमत म्हणून ३-४ ड्राफ्टपैकेर एक इथेच प्रतिसादात डकवते स्क्रिनप्ले फॉर्मॅट मधला

__________
*Draft००४*
(Concept: there is no true face as such. What we see is reflection of our thoughts / perception about ourself/ about others)

प्रतिक आणि अभय दोघे ऍड एजन्सीमधे इलस्ट्रेटर म्हणून कामाला आहेत. दोघांमधे प्रियामुळे वाद आहेत. प्रतिकचं म्हणणं आहे प्रिया फ़क्तं अभयला वापरुन घेतेय कामासाठी. तिचा खरा चेहरा अभयला दिसतच नाहीये. तर अभयचं म्हणणं आहे की असं काही नाही आहे.
या दोघांच्या मैत्रीत प्रिया नावाच्या चेहऱ्याने वादळ आणलय. आज तासाभरचा ब्रेक मिळालाय त्यांना आणि त्या ब्रेकमधे खरतर कॅन्टीनमधे खाऊन घेऊन मग लास्ट वीकमधे शॉर्टलिस्ट केलेल्या शॉर्टफ़िल्म बघायचा प्लॅन होता त्यांचा पण त्याआधीच ते प्रिया नामक वादळावरून वाद घालत बसलेत. चलो झांक के देखते है उनके विन्डोमे

 ----

तू चुपचाप बैठ यहा पे. किसी को फ़ोन लगाने की जरुरत नही है । गलत तुम नही वो  है। इस्तमाल कर रही है वो तुझे बस। अकल के अंधे भेजे मे ये हायलाईट कर ले।

प्रतिक महाराज, हा हा ग्यानी तो सिर्फ़ आप हो ना इस दुनियामे। हमे तो कुछ नही समझता।

नही समझता है, इसिलिये समझा रहे है दोस्त के नाते। और तुम्हे तो असली नकली की परख ही नही है, अरे कुछ लोग दिखते है वैसे होते नही है

अरे नही याऽऽर. गलत समझ रहा है तू. माना के वो थोडी इमॅच्युअर है

थोडी?

थोडी जादा.. ओके नाऊ?

साउंड्स बेटर

थोडी जादा इमॅचुअर है पर वो चीटर नही हो सकती

गुड जोक.

छोड ना ये सब. हम क्युं बेहेस कर रहे है लेकीन?

मै कहा बेहेस कर रहा हू? मै तो सिर्फ़ तुझे उसका असली चेहरा दिखा रहा हू।

बस भी कर अब. एक घंटे का ब्रेक है, उसके बाद मिटींग रखी है बॉसने.

हा हा! और उसमेसे आधा घंटा तो तेरे प्रियाने बरबाद किया है।

आय एम सॉरी। उसकी तरफ़से भी। चल अब उपरही मंगवा लेते है कुछ और एखाद फ़िल्मभी देख लेते है।
---------------------------

 Thank God!  ही दोघं भांडण थांबवून फ़िल्मकडे वळली. आता यांच्यासोबत निवांत फ़िल्म बघाता येईल आपल्यालाही.
_______________

प्रतिक, चल ये वाली देखते है

लगा तू कोई भी

---

एका सिनेमाची फ़्रेम येते. फ़्रेममधे एक आरसा दिसतो त्या आरश्यात " Who we really are?/ #True image टायटलची लाईन दिसते. (टायटल पाठोपाठ दिसणारा सीन) राज आपला हिरो ज्याचा फ़क्त हात दिसतो. तो आरश्यावर डाग दिसतात म्हणून फ़डक्याने आरसा पुसतो मग त्याला त्याचा चेहरा दिसतो. तो मजेत शीळ घालतो त्याचं प्रतिबिंब पाहून

 या फ़िल्मचा बेस आहे राजच्या चेहऱ्याचं प्रतिबिंब. आणि फ़िल्म घडतेय फ़्लॅश स्वरुपातल्या तुकड्यांमधून दिसणाऱ्या दृष्यातून

 राजला त्याचं प्रतिबिंब स्मार्ट हॅन्डसम भासतं. पण त्याचवेळी त्याच्या वडीलांना मात्र उंडारायला शिकलेल्या आणि जबाबदारीची जराही जाणीव नसलेल्या राज कडे बघून त्याच्या जागी गावात उधळलेल्या वळूचं प्रतिबिंब दिसत असतं.

राज घरातून बाहेर पडतो आणि गेटबाहेर येतो तेव्हाच त्यांच्या सोसायटीत रहाणारी प्रिती ऑटोमधून उतरत असते. राज उगाचच फ़्लर्टींग करत असतो. ती मात्रं याचा फ़ायदा घेऊन त्याच्याकडून सामानही उतरवून घेते आणि ऑटो वाल्याचे पैसेही त्याला द्यायला लावते सुट्‍टे नाहीत असा बहाणा करत. राजला फ़ार भाव दिल्यासारखं वाटत असतं तेव्हा पण प्रत्यक्षात तिच्या नजरेसमोर त्याचं प्रतिबिंब हे बकऱ्याचं असतं.

 तो पुढे जातो. एका वळणावर त्याचा धक्का एका काकुंना लागतो आणि त्यांच्या हातातलं सामान घाली रस्त्यावर पडतं. त्यामुळे त्याच्यावर चिडून त्या त्याला अद्वातद्वा बोलतात. हे बोलत असताना त्याचं त्या काकुंच्या पुढे प्रतिबिंब एका गाढवाचं असतं.

 तो परत घरी येतो त्यावेळेस संध्याकाळ झालेली असते. पुन्हा तो आरश्यासमोर उभा रहातो . पुन्हा सकाळसारखा आरसा क्लिअर नसतो म्हणून आधी प्रतिबिंब दिसत नसतं नीट मग तो आरसा पुसतो आणि आपल्याला प्रतिबिंब दिसतं.

 पण आता आपल्याला दोन वेगळे चेहरे दिसतात. एक चेहरा जो राजला त्याचं प्रतिबिंब म्हणून दिसत असतो तो आणि दुसरा आपल्याला राजचा म्हणून दिसणारा चेहरा असतो तो.

 दोन्ही चेहरे वेगळे असतात कारण मुळात खरा चेहरा असा काही प्रकारच अस्तित्वात नसतो. राजच प्रत्येकाला दिसणारं प्रतिबिंब वेगळं असतं कारण ते त्यांना दिसलेल्या राजचं प्रतिबिंब असतं तसच राजला त्याचं स्वत:च म्हणून दिसणारं प्रतिबिंबही वेगळं असतं कारण ते त्याला दिसलेलं त्याचं प्रतिबिंब असतं. आणि आपल्याला दिसलेला आरशा समोरचा खरा राज वेगळा असतो कारण तो राज हे आपल्या नजरेला दिसलेलं राजचं प्रतिबिंब असतं.

----

फ़िल्म जेव्हा संपते तेव्हा राजचे दोन चेहरे दिसत रहातात एक आरशातला राजला दिसणारा आणि दुसरा आपल्याला आरशात बघणारा राज जसा दिसतो तो चेहरा. आणि हे दोन चेहरे दिसतात तेव्हा प्रतिक आणि अभयही एकमेकांकडे बघतात

 शेवटी स्क्रीनवर फ़क्तं टायटल रहातं "Who we really are?/ #True image

 त्यावचेळी प्रिया बाजूने पास होते. तिच्याकडे एकाचवेळी दोघे बघतात आणि एकमेकांकडे बघून फ़क्तं हसतात

आणि त्याचवेळी मागून आवाज येतो. चलो गाईज ब्रेक खतम. मिटींग के लिये बुलाया है

----------------

दि एन्ड हो गया भाई ये खिडकी बंद करो और चलो कामपे

खिडकी बंद होते. बंद खिडकीवर पाटी येते "दि एन्ड"

 

काँसेप्ट आवडला दोन्हींमधला पण कथा म्हणून उतरताना काही तरी राहून गेलं असे वाटत राहते. पहिल्या कथे मधे मित्रांची आपापसात झालेल्या इंटरॅक्शन मधे बॉस संदर्भात आलेला भाग नि शेवटी बॉस चा आलेला पॅरा नीट जुळलेत.

संकल्पना उत्कृष्ट वाटली.
राजची गोष्ट एवढ्या सविस्तरपणे नको होती असं माझं मत. अभ्या आणि प्रतीक, दोघांचेच संवाद पुरले असते.

धन्यवाद महेंद्र, असामी आणि वावे

@वावे, हो परत विचार करता मलाही असेच वाटले म्हणजे त्याच फुटेज कमी करुन त्यात जे सांगायचेय ते प्रतिक अभ्या प्रसंगात अजून थोडी भर घालून हायलाईट करता येईल.

अजून प्रयत्न करेन. ही कल्पना झटकली तरी दोन वर्ष अधूनमधून डोकं वर काढतेच आहे म्हणजे बऱ्या आकारात आल्याशिवाय मनातून जाणार नाही तशीही