दिगंत : भाग १५

Submitted by सांज on 14 April, 2021 - 05:25

....

काही माणसांचा नुसता आवाज ऐकला तरी बरं वाटायला लागतं. अनिकेत त्यातलाच. किती दिवसांनी आज बोलले त्याच्याशी. खूप हलकं वाटतंय.

आज पुन्हा नव्याने विचार करावासा वाटतोय सगळ्याचा. सुरुवात अर्थात जॉब स्विच करण्यापासून. Resume अपडेट केला पाहिजे. ठरवलंय आता, एखाद्याचं कॅरक्टर वर येणं जीव गेला तरी सहन करायचं नाही कधी.

World is full of some detestable people, who, by their scabrous behaviour, make it an impossible place for women to live in.. and I as a woman must now learn how to deal with it.

संहिता,

हम्पी.

.....

रियाला आज अलार्मची गरज भासली नाही. कोणी न उठवता ती अगदी वेळेवर उठली. फ्रेश झाली. आणि गाढ झोपलेल्या संहितासाठी चिठ्ठी लिहून मंदिराच्या दिशेने निघाली.

सकाळी सहा-सव्वा सहाच्या सुमारास कोदंडराम मंदिराच्या घाटावर वाहणारी तुंगभद्रा पाहत अनुराग उभा होता. एक-दोन पूजर्‍यांचा पायरव सोडला तर वातावरण अगदी शांत होतं. हम्पी हळू-हळू जागं होऊ लागलं होतं. पाठमोर्‍या उभ्या अनुरागला रियाने दुरूनच ओळखलं. हळूच त्याच्याशेजारी जाऊन ती उभी राहिली. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. एक आल्हाददायक स्मित दोघांच्या गाली उमटलं. काही न बोलता कोपर्‍यावर त्याच्या इशार्‍याची वाट पाहत उभ्या डोंगीवाल्याला त्याने हात केला. तो लागलीच त्याची डोंगी वल्हवत हे दोघे उभे होते तिथे आला. ते पाहून रिया आतून खूप आनंदली. पण काही बोलली नाही.

अनुराग डोंगीत उतरला. मागे वळून त्याने रियाला हात दिला. तिने क्षणभर त्याच्याकडे पाहिलं. आणि मग काही न बोलता त्याचा हात धरून तीही डोंगीत उतरली. दोघे खाली बसले. डोंगीवाल्याने नाव वल्हवायला सुरुवात केली आणि ते नदीवर तरंगू लागले.

क्षणातच रियाला काल आणि आजच्या सफरीमधला फरक जाणवला. कालचा अनुभव कितीही सुरेख असला तरी बोलून चालून शेवटी तो तलावच. साठलेला किंवा खरंतर साठवलेला. पण आज? आज ही वाहणारी जीवंत नदी होती.. प्राचीन, पुरातन तुंगभद्रा! त्यात सकाळची नीरव शांतता. दैवी वाटावं असं दृश्य आणि वातावरण.. सूर्योदयाच्या अगदी आधीची वेळ, अस्फुट पण आशेने पुरेपूर भरलेल्या पुसट होत जाणार्‍या अंधाराने व्यापलेली. घाटासोबत मागे पडत चाललेलं मंदिर, नदीच्या कुशीत शिरणारी त्यांची सुरेख नाव, काठाला असलेले अजस्त्र दगड, मधूनच दिसणारी मंदिरं.. सगळं इतकं इतकं सुंदर वाटत होतं रिया स्वत:ला विसरून गेली. तिच्या चेहर्‍यावरचा ओसंडून वाहणारा आनंद आणि समाधान अनुराग टिपत होता.

काहीवेळाच्या शांततेनंतर अनुराग नदीच्या प्रवाहाकडे पाहत बोलू लागला..

“मला आठवतय त्यादिवशी मी ऑफिस मध्ये होतो. चार-पाच महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे. प्रेझेंटेशनची तयारी चालू होती. इतक्यात मला बाबांचा फोन आला. ‘एक स्थळ आहे. मंडळी ओळखीची आहेत. तुला मुलीचा फोटो आणि डिटेल्स पाठवलेयत. पाहून घे. आणि कळव.’ मी फोन ठेवला. त्याक्षणी खरंतर तो मला माझ्या कामात व्यत्यय वाटला होता. पण फोन कट केला आणि वरचं नोटिफिकेशन दिसलं. ‘baba has sent an image’. पाहूया तरी म्हणून मी तो ओपन केला. आणि खरं सांगतो, त्या फोटोकडे पाहतच राहिलो. नाही. तो सुंदर होता वगैरे म्हणून नाही. आजकाल सगळ्याच मुलींचे फोटो सुंदर दिसतात. पण, तो फोटो क्लिक झाला होता आत कुठेतरी. नंतर प्रेझेंटेशन झालं.. कामं सुरुच होती.. पण डोक्यात तो फोटो ठाण मांडून बसलेला. वेळ मिळाल्यावर, डिटेल्स वाचले. ‘रिया सामंत. सो अँड सो अँड सो qualifications.. ऊंची.. गोत्र.. etc.’ मग रीतसर तुझी प्रोफाइल पाहिली, वाचली. का माहित नाही, तू वेगळी वाटलीस.”

रिया त्याचं बोलणं ऐकत होती.. तो पुढे बोलू लागला..

“तुला खरं सांगू, मुलगी अशी हवी, तशी हवी, करियरीस्टिक हवी, घर सांभाळणारी हवी, असे असे इंटेरेस्ट्स हवेत असं माझं सुरुवाती पासूनच काही नव्हतं. मुलगी पाहिल्याबरोबर क्लिक व्हायला हवी बास. तारा जुळल्या सारख्या वाटल्या पाहिजेत. मग बाकीच्या गोष्टी काय जुळतात आपोआप किंवा जुळवून घेण्याची अनिवार इच्छाशक्ति तरी होते. तुझा फोटो पाहिल्यावर तसं वाटलं होतं. पुढे मग मी इंट्रेस्ट कळवला पण तुझ्या घरून असं समजलं की तू एक्झॅम झाल्यावर ठरवणारेस. सो मग, माझ्या घरच्यांनी दुसरी स्थळं पहायला सुरुवात केली. एक-दोघींना मी भेटलो देखील. पण, तू काही मनातून हलत नव्हतीस. तेव्हाच ठरवलं होतं, एकदा भेटायचच. त्यात मग काही दिवसांपूर्वी तुझ्याघरून निरोप आणि तुझा नंबर मिळाला..”

त्याने तिच्याकडे पाहिलं. ती जराशी हसली आणि तिने नजर नदीवर वळवली.

“त्या दिवशी फोन वर तू फिरकी घेतेयस हे कळलं होतं मला. पण राग येण्याऐवजी कुतूहलच जास्त वाटलं. तुझ्या घरी फोन करून कन्फर्म केलं, तू नक्की हम्पी मध्येच आहेस की नाही ते. आणि मग सरळ निघून आलो.. काय होईल, तू कशी react होशील, काही कल्पना नव्हती. पण तू नॉर्मल react झालीस. आणि मग तुझं लग्न न करण्या मागचं कारण समजल्यावर दोन गोष्टी घडल्या. एक, तुझी तुझ्या स्वप्नांप्रती असलेली निष्ठा दिसली. आवडली. आणि दोन, तुझ्या भिरभिर डोळ्यांमधली भिती, आणि प्रामाणिकपणाही जाणवला. फोटो पाहून तुझ्याविषयी जे वाटलं होतं तेच भेटल्यावरही वाटलं. आणि मागच्या दोन दिवसात ते प्रकर्षाने वाटतच राहिलं. तुला माझ्याविषयी नक्की काय वाटतं ते माहीत नाही. तुझ्या वागण्यातून तू त्याचा फारसा अंदाज येऊही देत नाहीस..

मी आज इथे तुला बोलावलं, हे सगळं तुझ्याशी बोलतोय ते केवळ या सगळ्या गोष्टी मनात ठेऊन मला निरोप घ्यायचा नव्हता. मग मी पूर्ण प्रयत्न केले नाहीत असं मला वाटत राहिलं असतं..”

त्याने त्याची नजर आता तिच्यावरून नदीवर वळवली. आणि तिने नदीवरून त्याच्यावर.. तो सगळं खूप मनापासून बोलतोय हे तिला जाणवत होतं. त्याच्या त्या शांत, संयत बोलण्या-वागण्याने तिच्या मनातले सारे संभ्रम आता हळूहळू गळून पडू लागले होते.

नावाड्याने नाव एका विशाळ दगडाखाली नेली. त्या मोठ्या दगडाचा अर्धा भाग काठावरच्या दगडांत रूतलेला आणि अर्धा पाण्यावर आला होता. अधांतरी. पाणी आणि दगडामध्ये पुरुष-दीड पुरुष अंतर. खाली पाणी, वर भलामोठा दगड अशी ती जागा. रियाला अतिशय गार वाटलं.

बाहेर येता येता ती बोलायला लागली,

“अनुराग.. मला हे असं तुझ्या सारखं छान छान बोलायला जमत नाही. पण, इतकंच म्हणेन की, मलाही आवडायला लागलंय तुझ्या सोबत असणं..”

आणि कालच्या संभाषणाचा धागा जोडत, त्याच्या डोळ्यांत पाहत म्हणाली,

“..आणि आणखी एक उडी मारुन पहायलाही आवडेल मला..”

त्याने चमकून तिच्याकडे पाहिलं. त्याला समजलं ती कोणत्या उडी विषयी बोलतेय ते. हा त्याच्यासाठी सुखद धक्का होता..

“खरंच?” तो आनंदातिशयाने म्हणाला.

तिने गोड हसत मान हलवली.

"हो, स्वीकारायचं ठरवलंय, जे वाटतंय ते. स्वप्नं तर आहेतच. पण, त्यांच्या मागे धावताना सोबत कोणीतरी आहे हे फीलिंग छान आहे खूप.. I would love to feel it.. and to let myself fall in love too.."

त्याने खोलवर तिच्या डोळ्यांत पाहिलं. यावेळी तिथे त्याला भीती दिसली नाही. compassion दिसलं. आत्मविश्वास दिसला.

एवढ्यात दगडांआडून सूर्य हलकेच वर आला. सारी तुंगभद्रा केशरात न्हाऊन निघाली. आणि मग तिच्याकडे पाहणार्‍या अनुरागचं लक्ष रियाने उगवत्या मोहक सूर्याकडे वळवलं..

क्रमश:

सांज
https://chaafa.blogspot.com/

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त भाग हा ही
आधीच्या भागात डोंगी काय असावं ते नजरेसमोर आले नव्हते.
पण आता फोटो बघून कळतंय, पहिल्यांदा चढताना थोडी धाकधूक वाटेल Happy