पगडंडी

Submitted by ज्येष्ठागौरी on 10 April, 2021 - 09:53

पगडंडी
माझ्या एका निवृत्त सहकाऱ्यांनी मी कधीतरी अस्वस्थ असताना, मला त्यांच्या अस्सल दाक्षिणात्य हेलात काहीशा जड पण कानाला अतिशय गोड वाटणाऱ्या आवाजात Madam , if you can,take long walks, don't listen to anything, don't talk , just walk! असा सल्ला दिला.त्यावेळी थोडा मानला आणि अलीकडे जास्त मानते आणि त्यातले शारीर फायदे हा एकमेव उद्देश न राहता हळुहळू त्यातल्या इतर गोष्टी सुखदपणे सामोऱ्या यायला लागल्या.मुळात मी चालताना त्याच्या फायद्यांचा विचार करणं सोडलं.इतरांशीच नाही पण स्वतःशीही स्पर्धा सोडली.त्यातून काही मिळेल ही आशा सोडली आणि मग एक एक सुंदर अनुभव यायला लागले, जेंव्हा जेंव्हा चालते तेंव्हा तेंव्हा...कधी गाणं ऐकत कधी कोणाचं भाषण ऐकत आणि बऱ्याचदा आपल्या मनातल्या उलट सुलट विचारांची आवर्तन खेळवत असताना खूप काही हाती लागायला लागलं.
चालताना बऱ्याच नकारात्मक भावना निघून जातात हा माझा अनुभव आहे.भूतकाळ आणि भविष्यकाळातही एक फेरा मारला जातो पण पाय वर्तमानात असतात त्यामुळे त्याला एक वेगळी लय असते खरी.
स्व दि.बा.मोकाशी यांचं एक पुस्तक वाचलं होतं'अठरा लक्ष पावलं'पूर्वी वाचलं होतं त्याची आठवण झाली.नवऱ्यानं मनगटावर पावलं मोजणारं घड्याळ आणून दिलं आणि प्रत्येक पावलाचाच काय पण झोपेतल्या गाढ आणि हलक्या निद्रेचाही हिशेब कोणीतरी ठेवायला लागलं. तसंही आपण घड्याळाच्या काट्याला बांधले असतोच पण आता जास्त बांधले गेले पण तरीही हे बंधन आवडलं. कधीतरी मला ते न बांधताही मजा येते चालायला. चालायचे रस्ते वेगवेगळे असतात,कधी क्लबचा ट्रॅक असतो.कधी साधा रस्ता! क्लबच्या ट्रॅकवर सगळे ऋतू अगदी स्पष्ट कळतात. त्यांच्यातले ढोबळ आणि सूक्ष्म बदल टिपता येतात. पावसाळ्यात होणारा चिखल, प्राजक्ताच्या फुलांचा मंद पण स्पष्ट सुवास, संध्याकाळी चालले तर फुलणारी रातराणी,दर थोड्या वेळाने तिचा गडद होत जाणारा गोड वास.अगदी पहाटे असेल तर चिट्ट अंधार शांततेत ओघळताना होणारा फुलाचा आवाज किंवा गळणाऱ्या पानाचा आवाज,त्याच्यामागच्या समर्पणाच्या भावना,आधी तेज असणारा चंद्र मग फिकट होत जाणारा.उजळत जाणारी प्राची.वेगवेगळे पक्षी त्यांची बोली ते बाहेरच्या रस्त्यावरच्या चहावाल्याच्या पहिला घाणा ते झाडणाऱ्या लोकांचे झाडूचे आवाज.सगळं टिपता यायला लागलं आणि मग ह्या विश्वामधला आपण अगदी सुईच्या टोकावरचा बिंदू आहोत ही जाणीव प्रखर झाली.अशी जाणीव मला व्हावी म्हणून माझ्या सुहृदानी हा सल्ला दिला असावा का!त्यावेळी मला ते समजणं आवश्यक आहे हे त्यांना समजलं होतं की काय!
मी कोणाच्या बरोबर चालत नाही.बोलत तर नाहीच नाही.मला स्वतःच्या तालात चालायला आवडतं. समुद्रावर चालणं आणि पन्हाळ्याच्या डोंगरातल्या रस्त्यांवर हे दोन्ही परस्पर विरोधी पण enriching अनुभव असतात हे नक्की. शेतातून चालणारी पायवाट म्हणजे आमच्या हिंगण्याच्या शेतात बांधावरून चालतानाची तारांबळ होणारी आठवली.जरा पाऊस पडला की चपलेला लागलेली ढेकळं आणि ती वजनदार चप्पल आठवली.ती वाट खूप गोड होती,तारांबळ व्हायची कधी एखादा काटा मोडायचा पायात पण तरीही.ती वळणावळणाची पगडंडी! एक छोटी पायवाट,संकरा रास्ता!पगडंडी मातीशी इमान राखणारी एक लहान वाट.ना डांबर ना तुफान वेग ना सरळ रेघ.अगदी साधीसुधी,नागमोडी लोकांच्या जाण्यायेण्यानं तयार झालेली.अगदी दोघे तिघे एकत्र जाऊ शकतील एवढीच पण तिचं असणं फार गोड असतं. ह्यावर चालणारा मागच्यासाठी रेंगाळणारा असतो.मला हा खूप मोठा गुण वाटतो.शहरी भागात राहूनही अशा पायवाटा पाहायला मिळाल्या असल्यानं त्यांचं एक आकर्षण मनात आहे आणि त्या मातीच्या काही आठवणीही! तशी पगडंडी कशाचीही असू शकते. विचारांची,भावनांची,प्रेमाची, मूल्यांची,तत्वांची, आठवांची,संस्कारांची,व्रताची.आपली एक छोटी पायवाट.माझ्या मनातही माझ्याबरोबर असते. सतत. हमरस्त्यावर चालतानाची शिदोरी म्हणा ना!त्या पायवाटेचा वेग मला मानवेल इतकाच असतो,ती मला पुरतं ओळखत असते.बऱ्याचदा एकटीच मी त्या वाटेवर माझ्या तालात असते,माझे विचार, माझ्या भावना आणि माझी मतं ही फक्त माझी असतात. कधीतरी एखादी जवळची व्यक्ती त्याच वाटेवर भेटते आणि अनुभवता येते. बऱ्याचदा हमरस्ता आजमावायला लागतोच लागतो पण तरीही मनात ही पगडंडी असते.कधी सुस्त पावलांनी ओढत जाणारी ,कधी निवांत ललित लयीत पावलं टाकणारी आणि कधी आपल्या भन्नाट वेगात ती आपल्याबरोबर असते.मनात एक आपल्या आवाजातलं गाणं असतं, पावलांमध्ये झिम्मा असतो.आपल्या तालातला.. हमरस्त्याचा वेग असह्य झाला की मी तिच्याकडे वळून बघते,ती असतेच मंद हसत ,आपल्याला समांतर तरीही आपल्या वेगाने चालू देणारी, आपल्या विचारात मग्न ठेवू पाहणारी,छोटीशी 'पतली गली'! मी तिचाच आसरा घेते.एखादं डेरेदार झाडंही असतं तिच्या सोबतीत. त्याच्याखाली दोन घटका बसते मी थकले की..भले वेडीवाकडी असेल पण ती माझी अगदी आपली वाटते मला.माझ्या चुकलेल्या क्षणांना ती कधी फटकारते मग मोठ्या मनानं माफ करते,जवळ घेते,मी पडले तरी मला लागू देत नाही आणि उठायला मदत करते.माझी प्रगती होत असताना मला तिच्यावरची पाऊलं दिसतच नाहीत पण ती मात्र जपून ठेवते ती सगळं.बऱ्याचदा संघर्ष होतो नेहमीच्या वाटेत आणि पगडंडीत!तिच्यावर चालत असताना मला माझं स्वत्व अगदी लख्ख दिसतं. माझ्या भल्याबुऱ्यासकट अगदी आरसा दाखवत राहते आणि राहते समांतर पण तरीही घट्ट भेटत राहते.हाकेच्या अंतरावर असते ती.ही मनाची अगदी छोटीशी पायवाट अगदी समृद्ध असते.मागे वळून बघितलं की कुठून आलो तेही लख्ख दिसतं.आपल्या मुळाशी घट्ट ठेवते..मूल्यांशी तडजोड करु देत नाही. तिच्यात एक शहाणं मन असतं.त्या पगडंडीवरुन चालणारं आणि हुंदडणारंही!एकाच वेळी खूप शहाणं आणि खूप वेडं. खूप घट्ट आणि हळवं,खूप उडणारं पण जमिनीवर घट्ट असणारं.अगदी खूप मोठ्या समूहात वावरताना विचारांचा आणि भावनांचा कल्लोळ दाटला की हमरस्त्यावरून उतरून हळूच 'पतली गली' सापडून त्यावर आपली चाल आपल्याला चालता येतेच.
Take long walksहळुहळू उमजतंय,पूर्ण समजणार नाही कदाचित,नसेना! ह्या अगदी परिचित अशा पगडंडीवर आता पुन्हा पहिलं पाऊल टाकून मला journey within हे वाटणं आवडलं..आणि गंतव्य (destination) एक प्रकारे ठाऊक आहे कारण ते निश्चित आहे आणि एक प्रकारे त्याची माहितीही नाही अशा दोन वाटा असतात.ठाऊक आहे आणि नाही अशा ! मला एक लॅटिन शब्द आठवला. quo vadis (को वाडीस) ह्या शब्दाचा उपयोग एका चपला बूट बनवणाऱ्या कंपनीनं करुन घेतला होता.त्यांच्या एका पुरुषांसाठीच्या सँडलचं नाव quo vadis ठेवलं होतं.
माझे परदेशी असणारे काका भारतातून परत जाताना हेच quo vadis घेऊन जायचे, तेंव्हा त्यांनी त्या शब्दाचा अर्थ मला सांगितला होता..त्या शब्दाचा अर्थ "कुठे जाणार?" आत्ता त्याचा वेगळा अर्थ जाणवतोय !आजकाल
खरंतर हा प्रश्न अनेकदा फार मनात येत राहतोय 'कुठे जाणार' आणि त्याचं एक निश्चित उत्तर अगदी आत माहिती असलं तरी वेगवेगळ्या वळणांवर तो वेगवेगळे मायने ठेवतो!पगडंडीही वेगवेगळ्या वळणावर आपल्याला हाच प्रश्न विचारते आणि विचारणार आहे आणि त्याचं उत्तरही पगडंडीवर चालताना हळुहळू मिळत जाणार आहे, तुकड्या तुकड्यात सापडत जाणार आहे.मनातल्या विचारांची एक पगडंडी सतत साथ देत राहणार आहे नक्की.हमरस्ता अगदी पूर्णपणे सोडता येण्याची हिम्मत नसेल माझ्यात कदाचित, पण माझ्या मनातली पायवाट मातीची घट्ट आहे!quo vadis चं उत्तर देणारी आणि वळून बघितल्यावरही दिसणारी ही पतली गली मला खूप दूरवर साथ देईल हे निश्चित!खूप वर्षांपूर्वी पालखी येते तेंव्हा दोन तीनदा आळंदी पुणे चालत आले होते. पहिल्यांदा आळंदीजवळ पालखीचं दर्शन झालं तेंव्हा दोन क्षण स्तब्ध व्हायला झालं, खिळल्यासारखं.तो सजवलेला रथ आणि त्याच्या आजूबाजूचं वातावरण एकदम वेगळं , विशेष काहीतरी वाटलं,रथाला हात लावल्यावर काहीतरी झंकारलं आत, झिणझिणलं आणि मग आपोआप ओढली गेले त्या सागरात,त्या अफाट गर्दीचा भाग होऊन चालताना, अनेक भावनांबरोबर एक वेगळी कधीही न अनुभवलेली भावना मनात साथ करत राहिली. एकरूपतेची.हमरस्ताही "भक्तीचा आणि समर्पणाचा आणि मीपण निघून गेल्याचा" आणि पायवाटही त्याच भावनांची ! कुठलाही संघर्ष नाही,दुमत नाही,फक्त अद्वैत! त्यादिवशी हमरस्ता आणि पगडंडी हातात हात घालून एकत्र मार्गक्रमण करत होते.नक्कीच!
©ज्येष्ठागौरी

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिले आहे. आवडले.
एक सुंदर अनुभव यायला लागले, जेंव्हा जेंव्हा चालते तेंव्हा तेंव्हा...कधी गाणं ऐकत कधी कोणाचं भाषण ऐकत आणि बऱ्याचदा आपल्या मनातल्या उलट सुलट विचारांची आवर्तन खेळवत असताना खूप काही हाती लागायला लागलं.
चालताना बऱ्याच नकारात्मक भावना निघून जातात हा माझा अनुभव आहे.>> अगदी

छान लिहिलंय! चालायची विशेष आवड नाहीये पण एका विशिष्ट लयीतलं चालणं मेडिटेटिव्ह होत असणार हे जाणवलं. करून बघायला पाहिजे!

ज्येगौ, नेहमीप्रमाणे छान लिहीलंय. मलाही चालायला भयंकर आवडतं .. आवडतं म्हणण्यापेक्षा व्यसनच जडलंय म्हणायला हरकत नाही गेली पस्तीस वर्षे नियमीत सकाळी चालायला जाते आणि तेही एकटीनेच त्यामुळे फार रिलेट झालं

खूप अचूकपणे चालणे या प्रक्रियेत होणाऱ्या मनोव्यापाराचा वेध घेतला आहे तुम्ही.

तळजाई किंवा वेताळ टेकडीवर तास दीड तास चालत , वनराई , पक्षी , आकाश , सूर्य यांच्याशी संवाद करत भटकण हा सुखाचा परमावधी।..
एकटा असलो तर तुम्ही वर्णन केल्याप्रमाणे " आपला संवाद आपणाशी" असतो... बरोबर मित्र असेल तर कला , आविष्कार , या गोष्टींंवर , चित्रपट , शास्त्रीय विषयावर किंवा कशावरही विचार आणि अनुभवाची देवाणघेवाण....
अतिशय रमवणारा विरंगुळा...
.

>>>>>>ह्यावर चालणारा मागच्यासाठी रेंगाळणारा असतो.मला हा खूप मोठा गुण वाटतो.
खूप छान वाक्य आहे. लेख आवडला.
मला असं इन्टॅन्जिएबल म्हणजे अमूर्त काही मिळत नाही परंतु चालताना मूड सुधारत जातो व दुसर्‍या दिवशीदेखील फार सकारात्मक राहतो हे जाणवलेले आहे.

लेख आवडला.

चालताना मूड सुधारत जातो ......+१.

खरंच खूप छान लिहीलंय!
मला आवडतं एकटं चालायला >>
मलाही... स्वतःच्याच नादात, आपला आपल्याशी संवाद... मन हलकं करतो... आणि सोबत आजूबाजूला निसर्ग असेल तर... ते चालणं, विचार, सगळंच आनंदी होतं...