द ग्रेट इंडिअन किचन

Submitted by मेधावि on 1 February, 2021 - 07:00

गेल्या दहा दिवसांत तीन सिनेमे पाहीले.
1. इज लव्ह इनफ ? "सर"
2. द लास्ट कलर
3. द ग्रेट इंडिअन किचन.

पहिले दोन सिनेमे आवडले ...

तिसरा सिनेमा.. (Neestream -मल्याळी भाषेतला इंग्रजी सबटायटल्सवाला) पाहून मात्र त्रास झाला. एक सण्णसणीत मुस्काटात बसली. हा चित्रपट संपत नाही. तो मानगुटीवर बसतो आणि छळतो. "अगदी फ्रंट ऑफ द माईंड" छळत रहातो. स्वैपाकघर आणि स्वैपाक ह्या विषयातले बारीक सारीक तपशील टिपून त्यावर एका पुरुषानं हा सिनेमा बनवलाय,त्याला साष्टांग प्रणाम.

Spoiler alert - ज्यांना पहिल्या  धारेचा सिनेमा बघायचाय त्यांनी इथून पुढे वाचू नये. पण लवकर बघा...

(एक डिस्क्लेमर - मी अजिबातच स्त्रीवादी नाही. स्वतः राबून घर सजवणं, स्वच्छ आणि सुंदर ठेवणं, छान छान पदार्थ बनवून दुस-याला खाऊ घालणं हे मला आवडतं. मी माझ्या आवडीसाठी ते करते, तरीसुद्धा सिनेमा पाहून मी गोंधळले आणि भांबावले आहे)

लास्ट अॅलर्ट!!!
ह्यापुढचं लेखन प्रचंड उत्कट असेल. ते कदाचित  असंबंद्धही होईल, पण विचारांचं घोंघावीकरण न थोपवता आणि त्याचं अजिबात सुबकीकरण न करता ते जसे येतील तसे ते इथे येतील.

एखाद्या व्यक्तीला कोणी सपासप आसूडाचे फटके मारत असेल तर त्याच्या वेदना पाहून बघणाराही कळवळतो.  पण ती व्यक्ती जर खूषीत ते फटके खात असेल तर? .... आनंदानं हे फटके खाणं म्हणजेच आपल्या आयुष्याची सार्थकता, कृतार्थता, परीपूर्णता असं तिला आणि तिच्या सर्व जिवलगांना वाटत असेल तर ?

आणि....... मीही त्यातलीच एक असेन तर?????
मीच काय,  निरक्षर ते डाॅक्टरेटपर्यंत शिकलेल्या, गरीब ते गडगंज श्रीमंतीत लोळणा-या माझ्या परिचयायल्या सर्वच्या सर्व  स्त्रिया दिसतायत् मला आत्ता डोळ्यापुढे. हे सगळं आमच्या, आपल्या  हाडीमाशी इतकं रुजलंय आणि तुम्ही आम्ही सर्वांनी ह्या प्रचंड प्रचंड भीषण वर्णव्यवस्थेला किती सहजपणे आत्मसात केलंय...आणि आणि "आज" एक पुरुष बोलतोय त्यावर..हॅट्स ऑफ टू हिम.

हा सिनेमा  पितृसत्ताक पद्धतीतल्या "स्त्री" ह्या सो काॅल्ड  "देवीच्या" कर्तव्यांवर, तिच्या अधिकारांवर, सुखी आणि संपन्न आयुष्याच्या  परंपरेनं रुजवलेल्या कल्पनांवर, व्याख्यांवर आणि "घरगुती हिंसाचाराच्या प्रकारांवर बोलतो. चित्रपट पहाताना एकापाठोपाठ एक एक सण्णसणीत कोरडे बसत रहातात अंगावर खण्णं..खण्णं..खण्णं करत  !!!!   पण तो थांबत नाही, वेगवान बनतो आणि बोलतच रहातो, बोलतच रहातो. मी ..पहातच रहाते....कण न् कण् एका क्षणी  "पेटत" असतो आणि पुढल्या क्षणी "विझत" असतो. एक मोठ्ठी  हतबलता साचून रहाते. हे सगळं बदलण्यासाठी आपण फार फार दुबळे आहोत असं वाटतं.  पटो...न...पटो.... मी तीच वाट पुढे चालणार असते.

हा चित्रपट फार महत्वाचा आहे. पहायलाच हवा असा.  रोजच्या जगण्यातल्या ब-याच बेसिक गोष्टींचं भान देतो तो. मानवता शिकवतो. आपल्या मायेच्या माणसांच्या आणि प्रेमाच्या कल्पना, जेवणाचे, वागण्याचे  मॅनर्स, म्हातारपणापर्यंत बाळगलेल्या आणि  कौतुकानं जोपासलेल्या  नाठाळ आणि त्रासदायक सवयी आणी चवी-ढवी ह्या सगळ्यावर प्रश्न उभे करतो.

चित्रपटाची सुरुवात.. , केरळमधल्या एका गावात एक लग्न ठरतंय. मुलगी काळीसावळी, स्मार्ट, हसरी, टिपिकल दाक्षिणात्य सुंदर काळेभोर बोलके डोळे आणि दाट कुरळे केस. तशी पहिल्यांदा पाहताना ती सुंदर वगैरे नाही वाटत पण हसली की फार गोड दिसते. नृत्याची आवड आहे तिला. नैपुण्यही आहे त्यात. हसरी, खेळकर फुलपाखरी आयुष्य जगणारी ही मुलगी.  बघायला येणारं स्थळही  तालेवार असावं. मुलीची आई भरपूर उत्साहानं राबते आहे, गोड आणि तिखट असे भरपूर तळीव पदार्थ (घरातच) बनवते आहे. सुंदर मोठ्ठा "आधुनिक" आणि कलात्मक पद्धतीनं सजवलेला दुमजली बंगला आहे त्यांचा. संपन्नता जाणवते सगळीकडे. वडील गल्फमधे नोकरी करत असल्याचं गप्पांमधून समजतं.  नातेवाईक, हास्यविनोद, गप्पा........ छान आनंदाचं वातावरण आहे.

बघण्याचा कार्यक्रम पार पडतोय. दोन्ही बाजूंचे लोक सधन वाटतात आणि खुशीत दिसतायत्. मुलामुलीला एकट्यानं एकमेकांशी काही बोलायचं तर बोला अशी परवानगी देऊनही  घरच्या सगळ्यांनी फिल्डींग लावली आहे. अशा परिस्थितीत संकोचल्यामुळे मुलामुलीचा फार संवाद होतच नाही. स्वभाव, विचार-आचार जाणून घेणं वगैरे काही घडताना दिसत नाही. पण दोघंही एकमेकावर अनुरक्त वाटतात. 

छान थाटामाटात लग्न होतं. हुंड्यात मिळालेली एक अलिशान कार ही दिसतेय दारात.  लाजत मुरडत नव्या नवरीचा कौतुकाचा गृहप्रवेश. प्रेमळ व शांत स्वभावाचे सासूसासरे आणि नवरा.  सासरचं घर किती सुंदर!!! वडिलोपार्जित असणार. टुमदार, कौलारू, खूप मोठ्ठं पण जुन्या पद्धतीचं.  दोन मजली, मागेपुढे भलं मोठ्ठं अंगण, जुन्या पद्धतीची कडी-कोयंडे असलेली लाकडी दारं,  शिसवी लाकडाचं फर्निचर, पितळी मोठी मोठी छान छान भांडी, मागेपुढे भरपूर झाडं. स्वैपाकघर  मोठ्ठं, मात्र अंधारं आणि साधं आहे. तिथं माॅड्युलर किचन नाहीये. साधा कडप्याचा ओटा, अॅल्युमिनीयमची भांड्यांची मांडणी, भिंतीवरचं ताटाळं, फळीवरचे डबे. स्वैपाकघरातच अजून एका भिंतीशी अजून एक ओटा आहे आणि त्यावर चक्क एक ढणढणती चूल आहे. वर वखारीची लाकडं रचलेली दिसतात.  चुलीवर (केरळमधे) भात शिजवतात ते भाताचं डेचकं. इतर भांडी आणि भात ढवळायचा मोठा डाव. बाकी स्वैपाक गॅसच्या शेगडीवर होतो पण भात मात्र अजूनही चुलीवरच शिजतो. मिक्सर आहे, पण वाटण मात्र पाट्यावरच होताना दिसतं. कायमचा फिक्स केलेला एक मस्त मोठ्ठा पाटा दिसतो.

मुलीच्या संसाराचा पहिला दिवस. नवरा चांगला वाटतो. सासूही प्रेमळ, शांत आणि कामसू आहे. मुलीला हळूहळू रुळूदे. लगेच कुठे कामं सांगायची? सासराही शांत आहे. घरात फारसा बोलतही नाही.

भांडी घासणं, उष्टं खरकटं काढणं, केरवारे, फरशी, अंगण झाडणं, पुसणं , भरपूर भाज्या, निवडणं, चिरणं, फोडणीस टाकणं....मोठ्या अलीशान पाट्यावर भरपूर नारळ वाटणं, चटणी, सांबार बनवणं. मांसाहारी पदार्थ बनवणं. वेळेवर डायनिंग टेबलवर सगळं अन्न मांडणं, गरमागरम सर्व्ह करणं.... विविधरंगी, विविध चवींचा, सुग्रास, तृप्त करणारा स्वैंपाक.. गृहलक्ष्मीनं, अन्नपूर्णेनं घर सांभाळावं, सजवावं, ते उबदार ठेवावं, कुटुंबाला छान खाऊ पिऊ घालून सुखात ठेवावं.  जेवताना स्वैपाकाचं आवर्जून कौतुक करणारी घरची माणसं.  पुरुषाच्या ह्दयाचा मार्ग पोटातूनच तर जातो ना....ह्या संसारला सुखी संसारच तर  म्हणतात ना?  

रोज सकाळी बिडाच्या तव्यावरचे गरमागरम डोसे, इडिअप्पम, पुट्टु आणि कडला करी, सांबार, पदार्थाला लाल मिरच्या, उडीद डाळ, भरपूर कढीपत्याची खमंग फोडणी. दुपारच्या जेवणातल्या वेगवेगळ्या भाज्या, भात... हळूहळू डोळ्यातून  ती चव आपल्या डोक्यात, मनात, आणि मग जिभेवर उतरायला लागते. चायला, आपण फूड चॅनेल बघतोय का काय असं वाटतं.

घरच्यांच्या आवडीनिवडी आणि चवीढवींचा विचार करत करत रोजचा स्वैपाक करणं, सकाळी दूध येण्यापासून सुरू झालेला दिवस, रात्रीची जेवणं झाली की ओटा टेबल आवरून, भांडी घासून मग श्रांत तनामनानं दिवा बंद करून बिछान्यावर अंग टाकणं ही त्या गृहलक्ष्मीची आनंदाची, सार्थकतेची, तृप्तीची कल्पना. लग्नानंतर सुरुवातीला  नवरा व सासरच्यांचं सगळं व्यवस्थित करणा-या ह्या घरोघरीच्या नायिका, नंतर मुलंबाळं, नातवंडं ह्यांच्यासाठी अविरत झिजतच असतात......झिजतच रहातात....मरेपर्यंत. आणि आपण म्हणतो...माझी आई/आजी फार फार प्रेमळ होती. माझ्यासाठी खूप केलं तिनं. तो तिच्यासाठीही सन्मानच असतो.

कथानायिकाही लग्नानंतर सासूच्या बरोबरीनं  सर्व जबाबदा-या उचलायचा प्रयत्न करताना दिसते.  एक आदर्श सून, बायको बनण्याचा प्रयत्न करताना दिसते.  हे सर्व करताना तिला मजा येते आहे, आत्मिक समाधान मिळतं आहे. पण ते निभवताना तिची दमछाक होतेय.

घरातला पुरुषवर्ग शांत, अबोल....पैसे मिळवून आणणं आणि बाहेरची कामं करणं हे पुरुषांचं काम. ते किचनमधे ढवळाढवळ करत नाहीत. आणि अचानक सासूला मुलीच्या बाळंतपणासाठी परदेशी जावं लागतं. आणि संपूर्ण घराची संपूर्ण जबाबदारी सुनेवर धाप्पकन् येऊन पडते.  माहेरी
फारशी स्वैपाकघरात न  वावरलेली ही मुलगी, पटापट सगळं शिकून अपेक्षांना उतरायच्या प्रतिक्षेत.

सकाळचा चहा, नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण, भांडी घासणं, केरवारे, अंगणाची झाडलोट, फरश्या पुसणे, जिने पुसणे..... न संपणारी आणि मारूतीच्या शेपटाप्रमाणं सतत वाढत जाणारी कामं आणि अपेक्षा. सास-यांना चुलीवरचाच भात, पाट्यावरची चटणी प्रिय आहे. कुकर, मिक्सरमधे ती चव येत नाहीये. ते प्रेमानं तिला सुचवू पहातात. तीही त्यांच्या मताचा आदर राखते, एक एक दिवस पुढे सरकतो तशी वेगवेगळ्या प्रसंगातून तिला येत जाणारी जाण, येणारा मानसिक आणि शारिरीक थकवा,  फ्रस्टेशन्, पुरुषांच्या प्रायोरिटीज,  एकत्र कुटुंबपद्धतीतल्या अपेक्षा, रोज येणारी वेगळी वेगळी आव्हानं. त्यावर मात करण्यासाठीची तिची ओढाताण आणि ह्या सगळ्यावर त्यावर तिनं दिलेलं उत्तर....ह्यावर बोलतो हा सिनेमा.

गरमागरम डोसे करून वाढायचे म्हणजे बरोबरीनं ती जेवू नाही शकत बाकीच्यांबरोबर. सगळ्यांचं खाणं झाल्यावर टेबलवर ताटाबाहेर काढून टाकलेल्या शेवग्याच्या शेंगांची सालं आणि इतर खरकटं  उचलताना तिला ढवळतं. जेवायला सुरुवात करताना नवरा व सास-यासाठी हिनं सुबकपणे मांडलेलं टेबल आणि आता ती आणि सासू जेवायला बसतानाचं टेबल ह्यात जमीन अस्मानाचं अंतर. सासू सरावलीये. तिला ह्याचं काहीच नाही वाटत. उलट ती नव-याच्या उष्ट्या ताटातच घेते वाढून. मुलीला मात्र हे जड जातंय. हाॅटेलमधे टेबल मॅनर्स पाळणारा नवरा घरात का पाळू शकत नाही? सतत भांडी घासण्याचा आणि उष्ट- खरकटं आवरण्याचा सीन येत रहातो. किती घरांमधे तुंबलेल्या सिंकमधे हात घालायचा प्रसंग घरच्या मुलांवर/ पुरुषांवर  येत असेल? दुस-या घरातनं आलेल्या मुलीनं मात्र हे पट्कन् आत्मसात करण्याची अपेक्षा ठेवली जाते.

घरोघरी नव-याच्या हातात डबा, रुमाल, पाकिट, मोबाईल देणा-या बायका आपण पहातोच की. त्यात कुठं काय वावगं वाटतं? नाॅर्मलच तर आहे की हे..
रांधा वाढा उष्टी काढा ह्यात तर मागच्या अनेक पिढ्या संपल्या. ह्यात काय एवढं मोठं? नाॅर्मलच आहे की हे सगळं..  "ह्याच" गृहितकांकडे हा सिनेमा परत एकदा नव्यानं बघायला लावतो. त्या गृहीतकांना मानवतेच्या निकषांवर परत एकदा तपासायला लावतो. मारहाण किंवा  शिवीगाळ म्हणजेच काही घरगुती हिंसाचार नाही फक्त. खूप व्यापक आहे ती कल्पना. पिढ्या न् पिढ्यांपासून होत असलेले काही अन्याय आता परंपरेच्या नावानं इतके मान्यताप्राप्त झाले आहेत की  मानवतेनच्या  दृष्टीकोनातूनही ते दूर करू शकत नाहीये आपण. म्हणून ही अस्वस्थता येते. ही अस्वस्थता कधी जाईल, कशी जाईल ते माहीत नाही पण  सिनेमाचा प्रेक्षक आपल्या ताटातलं उष्टं दुस-या कुणाला तरी साफ करायला टाकताना  दहा वेळा तरी विचार करून टाकेल  हे सुद्धा ह्या सिनेमाचं यशच म्हणावं लागेल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

पण आताच्या पिढीतली (आत्ता शाळा कॉलेजमध्ये असलेली) मुलं लग्न झाल्यावर बायकोला गृहीत धरणार नाहीत अशी मला आशा आहे. किंवा मुली स्वतःला गृहीत धरू देणार नाहीत.

यातले अनेकजण - अनेक स्त्रीपुरुष - हे फेमिनिस्ट असतीलच असं नाही. LGBT /कम्युनिस्ट/ सोशालिस्ट /स्वघोषित लिबरल व्यक्ती किंवा विशिष्ट समूहाच्या हक्कांसाठी चळवळ करणारा व्यक्ती हा बाय डिफॉल्ट फेमिनिस्ट धरता येणार नाही.>> बरोबर आहे. म्हणूनच वेगवेगळी नावे मेन्शन केली आहेत. परंतु ते सर्व वेगवेगळ्या हक्काथसाठी सध्याच्या व्यवस्थेविरूद्ध लढत आहेत हा काॅमन बंध आहे.
डाव्याउजव्यांनी एकत्र यावे हे आदर्श असले तरी उजवे मुळातच "स्टेटस को" मोडू नये या मताचे असल्याने ते पितृसत्ताक व्यवस्थाही मोडण्यास पुर्णपणे कमिटेड असु शकत नाही. हां वरवरचे बॅन्डेड उपाय ते सपोर्ट करतात, तेही केव्हा? जेव्हा क्रांतीकारक विचार समाजात रूजून एलिट वर्गात पाॅप्युलर होऊ लागतो, तेव्हा. जेव्हा तो क्रांतीकारी विचार मांडला जातो तेव्हा फक्त प्रोग्रेसिव्ह लिबरलच साथ देतात.
उदा. सती, केशवपन बंद, विधवाविवाह यास तेव्हाच्या उजव्यांचा विरोधच होता. आता तो स्टॅन्ड एम्बॅरॅसिंग झाला म्हणून मारूनमुटकून का होईना पण उजवेही त्याला सपोर्ट करतात अन दाखवतात असं की पहा, पहा आम्हीपण सुधारणावादी आहोत. मुळात सुधारणा घडून गेल्यावर यांचे वरातीमागून घोडे येते शो पुरते.
आताच्या काळातले उदाहरण बघितले तर साबरिमालावर उजव्यांची भुमिका स्त्रीविरोधीच आहे. फारतर "पण मंदीरात जायचेच कशाला, देव घरी नाही का," अशी पळपुटी भुमिका ते घेऊन आहेत. पन्नास वर्षानंतर जेव्हा साबरीमाला इशु रहाणारच नाही तेव्हा, तेव्हाचे उजवे "प्रत्येक महीलेलाही प्रत्येक मंदीरात जायचा अधिकार आहे आणि आम्हालाही तो मान्य आहेच" असं म्हणतील. {{जसं आज सतीप्रथा वाईटच होती (जेनुइन लोक) ती प्रथाच नव्हती/ ती काही जबरदस्ती नव्हती (डिनायल वाले लोक) असे युक्तीवाद करतात. }} पण आज काय स्थिती आहे? कोण लढतेय त्या हक्कासाठी? प्रोग्रेसिव्ह लिबरल, स्त्रीवादीलोक.
तुम्ही आणि इतरांनीही विचार करून पहा की या मुद्द्यावर तुम्ही कोणती बाजु पकडली आहे? अन्याय्य सिस्टीमची की न्याय्य हक्काची? आणि मगच इतरांना "स्वघोषित" लिबरल टायटल द्या. सतत उपहास करून त्यांचं खच्चीकरण करणं हे शेवटी कुणाला फायद्याचं आहे? महीलांना की पितृसत्ताक व्यवस्थेला?

एकटीसाठी नाही सगळ्यांसाठी मुळ्याचं सांबार करायचं. एक दिवस रागाने आवडत नाही म्हणून मुलांनी/इतर प्रौढांनी हात नाही लावला तर नाही लावला. More for me.... झोपले उपाशी तर झोपले, खाल्ले कॉर्नफ्लेक्स तर खाल्ले, केला स्वतः मऊ भात तर केला .... माझी खानावळ आज मूळाच वाढणार !! ...... पण आई झाल्यावर असं वागलं तर कैकयी ठरू ना!! पुरेसं अन्न नसताना त्याग करावा लागला तर समजू शकतं. आईच काळीज स्वतः उपाशी राहणार. पण चारी ठाव अन्न उपलब्ध असताना इतरांनी अजिबात अ‍ॅडजस्ट करायचं नाही ह्याला काय अर्थ आहे.
>>> अ गदी. मी मला भूक लागली की खाते माझे माझे.. स्वैपाकाला बाई (इथेही बाई! पण बँगलोरला बाबा होता, तिथे बाबाज प ण स्वैपाक करत असल्याने) असल्याने सतत करत रहावे लागत नाही. पण लॉकडाऊन पासून बाई नसतात तेव्हा नवरा वा मी कुणीही करतो. मूड/ बँडविड्थ नुसार. हे नवर्‍याने एखादे दिवशी केले/ मदत केली अशा कॅटेगरीत नसून जवाबदारी घेऊन करणे अशा कॅटेगरीत असते.
सासुबाईंना तब्येतीमुळे फारसे काही करायला होत नाही.. पण त्या पूर्वी करायच्या.
ब हुतेकदा चहा सासरे करतात (कधी कधी मी आ णि नवरा करतो, पण त्यांच्या वेळा ठरलेल्या असतात, त्या त्या वेळेला ते सर्वांनाच करता त.)

ऑफिसच्या आणि मुलांच्या बँड विथ नुसार आम्ही (मी आणि नवरा) भांडी घा सतो ( मावशी लॉकडाऊन मधे नव्हत्या त्यामुळे आणि आता सक्तीचा क्वारंटाईन असल्याने), पण सास र्‍यांनी स्वतःहून मुख्य जबाबदारी घेतली आहे भांड्यांची. आम्ही जमेल तशी घासतोच, पण बॉटमलाईन त्यांनी घेतली आहे. आम्ही करायला गेलो तरी "अरे, हे माझे एक काम आहे, ते तुम्ही का घेता" असे म्हणतात. ( त्यांचे वय लक्षात घेऊन आम्ही जमेल तशी करण्याचा प्रयत्न करतो)
येस, तुंबलेले सिंक सुद्धा कुणीही काढते.

मुले लहान असल्याने - छोटीचे सगळेच करावे लागते, फुल टा ईम लक्ष द्यावे लावते, ती अनेक उचापती करते त्या निस्तराव्या लागतात - ह्यात माझा नव रा आणि मी एक्वल पार्टनर आहोत. पहिले नऊ महिने/ एक वर्ष मी प्रायमरी होते. तेव्हा माझी झोप व्हा यची नाही आणि नवरा सकाळी उठूनही पळायला जायचा त्या मुळे वाद व्हायचे (मला रात्री उठायला लागा यचे फीडिंग + ती रडायची तेव्हा, तर पहाटे बाकीचे उठल्यावर झोप मिळावी ही माझी अपेक्षा असायची. त्याला पळायची लत लागलेली असल्याने त्याला पळायला जायचे असायचे, जे मला माझ्या दृष्टीने अनफेअर वाटायचे). ते ही इव्हेन्च्युअली त्याला पटले आणि हे चित्रही बदलले. आता घरी व्यायाम आणि पळणे ह्याचे गणित बसवले आहे त्याने व्यवस्थित.
मुलगीही २ वर्षाची होत आल्याने रात्रीचे उठणेही नगण्य झाले आहे.
असे काही क्षण वगळता, माझा नवरा प्रत्येक गोष्टीत इक्वल पार्टनर आहे.

बेसिक ट्रान्स्परन्सी आणि एकमेकांची स्पेस ठेवून, घरात ल्या जबाबदा र्‍यांचे नियोजन करून दोघांनाही सर्व बाबीत निर्णय, विचार आणि आचार स्वातंत्र्य आहे.

आपले विचार पहिल्या पासून क्लियर असतील, आप ल्या विचारांबद्दल आपण गरज पडल्यास अ‍ॅसर्टिव असू आणि समोरचा सेंसिबल असेल तर चित्र चांगले असते. योग्य ती तडजोड करायची आपलीही तयारी हवी ( उदा. माझा नवरा गिफ्ट व गैरे घेत नाही - म्हणजे स्पेशियल ऑकेजन्स ना पण घे ईलच असे नाही, प ण दैनंदिन आयुष्यात एकदम सेंसिटिवली आणि सेंसिबली वागतो. त्याच्या प्रेमा ची पद्धत माझ्या सारखीच हवी हा हट्ट मी ही धरत नाही, मी माझ्या अंतप्रेरणेनुसार वागते. अर्थात हे शहाणपण यायला लग्नापूर्वी काही आणि लग्नानंतर काही काळ जावा लागला :D).

मी ,मुलगा हाताने खूप वेळ जेवत बसायचा म्हणून नेहमी दोन्ही मुलांना आधी भरवून घ्यायचे नंतर मी आणि नवरा एकत्रच बसायचो जेवायला >> आमची थोरली भरवूनही इतकी वेळ लावते की आम्ही आमचे जेवून घेतो आणि मग तिला भरवतो - असे करायचो मधला काळ Happy
आता ती जराशी सुधारलीये आणि धाकटी तिच्यापेक्षा बरी आहे.
त रीही, ज्याला भूक लागली आहे त्याने आधी खाऊन घ्यावे - हे नैसर्गिक नाही का? जितके आहे तितक्या प्रमाणात वाढून घ्यावे - इतरांसा ठी ठेवावे. शिळेही वाटून खावे आणि नैवेद्याचे ताटही. ( सासूबाईंचे पोट ठीक नसते, त्यांना आणि अगदी छोट्याला शिळं देत नाही, बाकीचे वाटून घेतो. खूप शिळे राहू नये म्हणून प्रयत्न करतो.).

हे सर्व आम्ही महान असे सांगण्याकरता लिहित नाहिये.
खरेतर हे सर्व ऑर्गॅनिकली होते आणि व्हायलाही हवे, पण आजू बाजूला इत क्या रिग्रेसिव केसेस दिसतात की हे वेगळे मांडावे लागते.
सगळी कडे असेच चित्र दिसेल तो सुदिन. म्हणजे प्रत्येकाने प्रत्येक काम रोज करायलाच हवे असे नाही, पण केवळ बाई आणि पुरुष ह्या फरकापायी आपले घरातले स्थान कमी/ जास्त होऊ नये. नको त्या/ न घेतलेल्या जबाबदार्‍या कम्पल्सरी अंगावर येऊन पडू नयेत (केवळ जेंडर मु ळे). इतकेच.

तळटीपः आम्ही सगळे कोरोना मुळे होम क्वारंटाईन आहोत, मी सगळ्यात पहिल्यांदा क्वारंटाईन झाले, तेव्हा ओला क चरा खाली माती टाकून तसाच वरून टाकलेला. काल मी आणि सास र्‍यांनी मिळून तीन घरगुती कम्पोस्ट बीन तयार केल्या. ह्यात ते तयार करण्याचा उत्साह माझा असल्याने, माती आणि एक्झिस्टिंग कचर्‍याचे लेयर करण्याचे काम मी केले. मला उत्साह असल्याने ते इतर कुणी करावे असे मला वाटले नाही - ते घाण असले तरी. इथे स्वयंप्रेरणेने घेतलेली जबाबदारी आणि लादलेली जबाबदारी ह्यातला फरक स्पष्ट होतो.

चांगली चर्चा चालू आहे. हा पिक्चर वीकेंडला बघेन.

वावे, जिज्ञासा , सुनीती तुमचे प्रतिसाद आवडले.सुनीती तुमचा शबरीमालावरील प्रतिसाद बुल्स आय आहे.

स्वयंप्रेरणेने घेतलेली जबाबदारी आणि लादलेली जबाबदारी>> हा ऑपरेटिव्ह पॉइण्ट आहे. समजून मदत करायला हवी काम करायला हवे. मला ब्रश हातात मिळाला नाही म्हणून दात घासले नाहीत उशीर झाला म्हणून उख्डायचे म्हणजे अजून मेंटली लाडावलेला बच्चाच आहे हा.

बायकांची वजने वाढतात कारण त्या असे जे पदार्थ इतर कोणी खा णार नाही ते पण खातात. एका प्रकार च्या डेस्परेशन मध्ये. जळके टोस्ट दोशे, ओव्हर इटिंग चेक करताना तुम्ही असे पदार्थ जे टाकून दिले पाहिजेत ते पण खाता का ते चेक करा असे एका वेट लॉस पुस्तकात वाचले होते.

वजन वाढले की रुपात बेढब पण येते त्याबद्दलही नवर्‍याची बोलणी खावी लागतात. असे हे दुष्ट चक्र आहे.

स्वयंप्रेरणेने घेतलेली जबाबदारी आणि लादलेली जबाबदारी>> हा ऑपरेटिव्ह पॉइण्ट आहे. समजून मदत करायला हवी काम करायला हवे. मला ब्रश हातात मिळाला नाही म्हणून दात घासले नाहीत उशीर झाला म्हणून उख्डायचे म्हणजे अजून मेंटली लाडावलेला बच्चाच आहे हा. >> हा हा. अगदी.. जिथे लोकं असे स्वयंप्रेरणेने काम करत नाहीत, तिथे त्यांची जबाबदारी अजिबात घेऊ नये. Happy

माझ्या आईची एक मैत्रिण अशी नवर्‍याला ब्रशला पेस्ट लावून ब्रश हातात द्यायची. मला हे समजूच शकत नाही...

घरात अनेक कामे असतात - जोपर्यंत घरातले सर्व सदस्य घर स्वतःचे आहे हे समजून यथाशक्ती कॉन्ट्रिब्युट करताहेत, तोपर्यंत काहीच प्रोब्लेम नाही.. तुम्ही माझे ते वाक्य माझ्या बाकी पोस्ट च्या अनुषंगाने वाचा. ते सर्वजण सेंसिबल आणि रिस्पॉन्सिबल आहेत हे धरून आलेले वाक्य आहे..

जिथे सर्व कामे तूच कर अशी वृ त्ती असेल तिथे मी अजिबातच असे काही करायला/म्हणायला जाणार नाही...

अ‍ॅक्युअली हा अपब्रिंगिंग आणि जिथे वाढलो त्याचा परिणाम होत असेल, ते ब्रश, चपला वगैरे जाऊद्या - मला हे एकाच माणसाने सकाळ संध्याकाळ साग्रसंगीत स्वैपाक/ भांडी घासणे / घर पुसणे / हाता ने कपडे धुणेक/ भात चुलीवर करणे (दुसर्‍याच्या जीवावर) हे देखील समजू शकत नाही. आधीच "तेरे को बोलना है तो बोल, नही तो मे फोन रख रहा हू" असे आमिर खान सारखे ठासून सांगावे अशा मताची मी आहे. Lol
भीड भिकेची बहिण असते Happy

जाई, हीरा, धन्यवाद!
सुनिती, सनव, अमा, मी_अनु, नानबा चांगले मुद्दे आणि चर्चा!
कोणत्याही प्रकारची समानता ही सध्याच्या प्रचलित धर्मांना हात न लावता आणणे शक्य नाही. विशेषतः पितृसत्ताक/पुरूषसत्ताक पद्धत हा सर्व धर्मांचा पाया आहे. मला नेहमीच हा प्रश्न पडतो की सगळ्या धर्मांचे प्रेषित पुरूषच कसे? एकाही स्त्रीला प्रेषिताचा दर्जा का मिळाला नाही? हिंदू धर्मात प्रेषित ही संकल्पना नसली तरी ब्रह्मा विष्णू महेश हे तिघे ही पुरूषच आहेत. जगाचा डोलारा चालवणारी आदीशक्ती आहे पण रिमोट कंट्रोल कोणाच्या हातात आहे तर पुरूषांच्या!
सेपिअन्स मध्ये या पुरूषसत्ताक पद्धतीला पाठिंबा देणारा कोणताही जीवशास्त्रीय वा समाजशास्त्रीय पुरावा नाही हे वाचलं तेव्हा फार चिडचिड झालेली!
आता या हजारो वर्षे रूजलेल्या संकल्पना चुटकीसरशी बदलणार नाहीतच पण सातत्याने, थोडा थोडा का होईना योग्य दिशेने बदल घडत राहीला पाहिजे.

किती जणींनी आपल्या नवऱ्याला , घरातल्या पुरुषांना हा सिनेमा पहायला सांगितला?
-----
कोथिंबीर वड्या झाल्यावर त्या करणारी बाई एका प्लेटमध्ये वाढून नवऱ्याला देते आणि कश्या झाल्या विचारते. ती स्वतः: खाते का? तुम्ही खाल्ल्या म्हणजे माझं पोट भरलं असं म्हणत नाही हेच खूप झालं.
-----

सुनीती चर्चा करीत असलेल्या मुद्द्यांवर - जसे डावे, , इ.इ.स्त्रीपुरुष समानता मानत असतीलच असे नाही तसंच स्त्री-पुरुष समानतेच्या आग्रही स्त्रिया किंवा पुरुष जाती पाळत असतील, निम्न वर्गाला तुच्छ लेखत असतील.
एल्जीबीटीमध्ये सुद्धा कट्टर धर्मवादी लोक दिसतात.
त्यामुळे एका विशिष्ट अन्यायाबद्दल जागरूक असलेली व्यक्ती दुसऱ्या प्रकारचा अन्याय करत असेल हे शक्य आहे.
स्वतः: अन्यायग्रस्त , उपेक्षित, शोषित असूनही इतरांच्या दु:खाची जाणीव असतेच असं नाही.

किती जणींनी आपल्या नवऱ्याला , घरातल्या पुरुषांना हा सिनेमा पहायला सांगितला?
>> नवर्‍याने आधी पाहिला आणि त्याला आवडलयाने मला पहायला सांगितला. पुन्हा एकत्रच पाहिला.

कोथिंबीर वड्या झाल्यावर त्या करणारी बाई एका प्लेटमध्ये वाढून नवऱ्याला देते आणि कश्या झाल्या विचारते. ती स्वतः: खाते का? तुम्ही खाल्ल्या म्हणजे माझं पोट भरलं असं म्हणत नाही हेच खूप झालं. >> माझ्या ओळखीच्या बायका खातात. Happy न खाणार्‍याही अनेक असतातच.

त्यामुळे एका विशिष्ट अन्यायाबद्दल जागरूक असलेली व्यक्ती दुसऱ्या प्रकारचा अन्याय करत असेल हे शक्य आहे.
स्वतः: अन्यायग्रस्त , उपेक्षित, शोषित असूनही इतरांच्या दु:खाची जाणीव असतेच असं नाही. >> हे पटले.
ज्या काळात अस्पृश्यता मानली जायची, मला नेहमी प्रश्न पडायचा की हे कुणालाच चुकीचे जाणवले नसेल का? हा प्रश्न पहाताना मला त्या प्र श्नाचे उत्तर मिळाल्यासारखे वाटले. " हे असेच असते" असे वाटणे आणि सेंसिटिविटी ची कमत रता.
स्वामींच्या चरित्रात उल्लेख आहेत, ते कुणाकडे ही जेवायचे आणि पंगतीला कुणालाही घेऊन बसायचे - त्यामुळे चिंतोपंत टोळ म्हणून त्यांच्या एका भक्ताच्या मनात किंतु आला, स्वामी समर्थ उठून चालू पडले.
एकदा (त्या काळी) एका मुसलमान भक्तालाही त्यांनी चोळप्पांच्या घरी जेवायला बसवलेले. त्या काळात ते एकदमच क्रांतीकारक असावे.
अशाच एकनाथ महाराजांच्या गोष्टीही आहेत.

म्हणजे ज्याचं मन विशाल झालय त्याला अशा गोष्टी कळतात. त्या मुख्य विचार धारेच्या विरुद्ध असतील तरी..
बाकी सगळे डबक्यात अडकून पडतात. जोपर्यत कुठले फुले, आंबेडकर, कर्वे, साने गुरुजी, सेनापती बापट, अण्णाभाऊ साठे, सावरकर - ह्या प्रथांना धडका मारत नाहित.
हा पिक्चर बघताना हीच नावे आठवली. ह्यांचे आपल्या सगळ्यांवर किती उपकार आहेत हे जाणवले.

मी सांगितला
आम्ही एखाद्या वीकेंड ला एकत्र बघू.
मला यातून एक बाजूचा मुद्दा लक्षात आला तो म्हणजे काही नवरे/सासरे/सासवा/आया अश्या पण असतील ज्या चित्रपटातल्या परिस्थिती चा गैरफायदा घेतील "बघा तेथे बिचारीला चुलीवर भात, हाताने कपडे धुणे, जिने पुसणे इतकं करायला लागायचं.तरी किती शांत होती.तुमच्याकडे कामाला बाया असून, साधी भात आमटी कुकरमध्ये, कपडे मशीन मध्ये धुवायचे असून इतक्या कुरकुरता" Happy
इंटरनेट सर्च आणि चित्रपटातील सर्व मुद्दे आपल्याला हवे तसे वळवता येतात.उद्या मी 'पोलिओ लस घेणे कसे मूर्खपणाचे' असे सर्च केले तरी मला 100 लिंक मिळतील.

नवरे/सासरे/सासवा/आया अश्या पण असतील ज्या चित्रपटातल्या परिस्थिती चा गैरफायदा घेतील "बघा तेथे बिचारीला चुलीवर भात, हाताने कपडे धुणे, जिने पुसणे इतकं करायला लागायचं.तरी किती शांत होती.तुमच्याकडे कामाला बाया असून, साधी भात आमटी कुकरमध्ये, कपडे मशीन मध्ये धुवायचे असून इतक्या कुरकुरता" >> Lol

Hayla!

भरत काही कोथिंबीर वड्या सोडायला तयार नाहीत Proud Light 1

मी नवऱ्याबरोबर बसूनच बघितला. त्यालाही आवडला. 'आरसा दाखवलाय' ही त्याची प्रतिक्रिया.
(त्याने एका मल्याळम कलीगला सांगितलं हा पिक्चर बघितला असं. तर त्यावर तो म्हणाला की exaggerated दाखवलंय. Wink )

त्यामुळे एका विशिष्ट अन्यायाबद्दल जागरूक असलेली व्यक्ती दुसऱ्या प्रकारचा अन्याय करत असेल हे शक्य आहे.
स्वतः: अन्यायग्रस्त , उपेक्षित, शोषित असूनही इतरांच्या दु:खाची जाणीव असतेच असं नाही.>> बरोबर!!

मी व पत्नीने एकत्र पाहिला. मुलगी व जावयास एकत्र पाहण्यास सांगितले.
..सकाळी उठल्या बरोबर ज्याला गाद्या रिकाम्या मिळतात तो गुंडाळतो... रादर मेक्स द बेड्स...
...चहा कॉपीची तयारी व बनवणे... अस्मादिक
... ब्रेक फास्ट बनवणे.... तयारी.... ५०% ५०%
सो ऑन.... प्रत्येक गोष्ट शेअर करतो.... आधी डायपर बदलणे ते शी काढणे ..... ते संडास साफ करणे.... मूड व उपलब्धता.....
माझे वडिल असे नव्हते.... ते या पिक्चरचे हिरो बनू शकले असते.......
मी असा का झालो???????

कोणत्याही प्रकारची समानता ही सध्याच्या प्रचलित धर्मांना हात न लावता आणणे शक्य नाही.
+१
कट्टर धार्मिकता आणी मिसोजिनी यांचे अतूट नाते जगभर आहे.
मग कुठे स्त्रियांना कार चलवू न देणे असेल,
कुठे आबोर्शन वर बंदी आणून त्यांना मनाविरुद्ध बाळ जन्मला घालायची सक्ती असेल,
कुठे विमानात आपल्या शेजारी महिला असेल तर तिला जागा बदलयला लावणे असेल ( तीला पिरियड्स असले तर ?)
अमेरिके सारख्या देशात आजही अ‍ॅबॉर्शन का निवडणूकीतला मुद्दा असू शकतो हे कट्टर धार्मिक लोकांचीच कृपा !

कट्टर धार्मिक लोक स्त्रीयांना आपली संख्या वाढवण्याचे माध्यम या नजरेतून पहातात. मग अ‍ॅबॉर्शन वर बंदी आणणे, स्त्रीया कमवू लागल्या की घटस्फोट होतात अशी विधाने करणे, लव्ह जिहाद चा बागुलबुवा करणे, बुरख्याची सक्ती करणे असे प्रकार होतात.

धर्मात सुधारणा व्हायला पाहिजेच. त्याबद्दल वाद नाही.

अबोर्शनच्या मुद्द्यावर अमेरिकेत डेम्स योग्य बोलतात, जीओपी चुकीची बाजू घेतात. तेच बुरखा प्रथा, 'ट्रान्स' पुरुषांना स्त्रियांच्या खेळात भाग घेऊ देणे यात रिपब्लिकन्स योग्य भूमिका घेतात, लिबरल्स चूक ठरतात.
दोन्हीकडे सोयीनुसार भूमिका घेतल्या जातात. भारतातही हेच दिसतं.
म्हणूनच across the political isles समानतावाद्यांचा दबावगट हवा असं मला वाटतं.

माझे वडिल असे नव्हते.... ते या पिक्चरचे हिरो बनू शकले असते.......
मी असा का झालो???????>>कदाचित पाहिल्या वाक्यात तुम्हीच उत्तर दिलं आहे,
माझे सासरे सुद्धा आता थोडेफार सुधारले असले तरी पुरुषसत्ताक पद्धती वापरणारे,सासूला अजूनही अगदी आमच्या समोर ,नातवंडांसमोर शिव्या,त्यांच्या माहेरचा उद्धार करतात,टॉवेल पासून सगळं हातात,घरखर्च पैसे मोजून मापून,नवरा लहान असताना एकाही गोष्टीत ,घरकामात सासूला मदत नाहीच,हल्ली मात्र करतात मदत.
पण नवरा एकदम उलट झाला आहे,स्वतः तर नाहीच पण मुलांनीही माझ्याशी उद्धट बोललेलं त्याला चालत नाही, त्याला स्वतः ला जेवण बनवणं जमत नाही आणि आवडत तर त्याहून नाही पण बाकीची आवराआवर आणि ते तुंबलेले सिंक,बेसिन ,मुलाची शी सगळं तोच बघतो,त्यात माझा वाटा 10 ते 15 टक्के असतो

कदाचित लहानपणी वडिलांचं वागणं बघून तशा वागण्याचा अति तिटकारा आला असेल ,तुमच्याही बाबतीत असच असू शकेल

अमा सुनिधी नानबा मी अनु प्रतिसाद पटले. आमच्या घरी अजूनही सासू बाई सासर्याच्या आधी जेवत नाहीत , समोर पोळीचा डबा असूनही पोळी घाला (वाढा नव्हे ). असे प्रकार . तर समोरच्याचे जेवण होइपर्यत बसून राहणे (खरकट्या हाताने ) हे अजून एक . सुदैवानं आम्ही दोघे आणि मुलगा राहतो त्यामुळे असे होत नाही. ज्याला भूक लागेल तो जेवतो , generally मी आणि मुलगा आधी नवरा नांतर त्याच्या ऑफिस schedule मुळे. पण हो नवऱ्याला कामाची सवय नाही, आणि या बाबतीत माझ्या प्रयन्तांना यश आले नाही. पाहुणे येणार असतील तर मग दोघेही मदत करतात . मुलाला वय ९ आता पासून तंबी दिलीय कि रात्रीची काही कामे जशे गाद्या घालणे , पाणी नेणे , वगैरे. ८वित गेल्यावर रविवार चा nasthaa करायचा . नो excuse

सनव +१
दोन मुद्दे (धर्म आणि समानता) एकत्र आणले की गरज नसताना ध्रुविकरण होत जाते आणि परंपरावादी लोकांचे फावते.
अधार्मिक माणूसही आळशी असूच शकतोच. आळस करायचा, धर्मबिर्म पाळायचा तर तो पैशाच्या स्वरुपात मोबदला देवुन हवा तितका पाळा. उष्ट खरकटं उचलायला कामवाला/ ली मिळाली तर माझं काहीही म्हणणं नाही. टेबलावर टाका की जमिनीवर टाका. पण त्या काम करणार्‍या व्यक्तीला ते काम नाकारण्याचा हक्क मात्र असलाच पाहिजे. त्याला कामगार कायदे लागू झालेच पाहिजेत.
शेवटी हे जग भांडवलशाहीवर चालते (चालावे). आळस करण्यात माझ्यामते काहीच चूक नाही, पण त्याची किम्मत मात्र मोजली पाहिजे. लग्न केलंय म्हणजे घरकाम करायला आणि रात्री शय्यासोबत करायला पार्टनर आलाय आणि मग त्याला धर्म, परंपरा, संस्कृती, इतिहासातील सूड इ. काय काय चिकटवून तेच करत ठेवणे यात धर्म महत्त्वाचा नाही. त्या समिकरणातून धर्म बाहेर काढला तरी शून्य फरक पडेल. त्याची जागा आणखी काही तरी गोष्ट घेईल.
ज्यांना धर्मात सुधारणा करायच्या असतील त्या त्यांनी जरुर करा. पण हे जे घडतंय ते मलातरी सोयिस्कर शक्ती प्रदर्शन वाटतं. आणि त्यासाठी सोयिस्कर रित्या घेतलेला धर्माचा आधार. धर्म गेला तर आधार बदलेल फक्त.

धर्म गेला तर आधार बदलेल फक्त.>>
विचार करण्यासारखा मुद्दा आहे. म्हणूनच धर्म हद्दपार करणे हे सोलुशन नाही, काळानुरूप बदलणे हे आहे.

परंतु समानतेचा विषय निघाला की पेट्रिआर्की, वर्णव्यवस्था आणि त्यानुषंगाने धर्माची चर्चा होणं अपरिहार्य आहे कारण ते एकात एक गुंतलेले विषय आहेत. आज भारतात कायद्याने महीला-पुरूष समान आहेत मग नक्की अशी कोणती गोष्ट आहे जिच्या आधाराने discrimination सुरू आहे?प्रथा-परंपरा, राइट? त्या कुठून आल्या? धर्मातून. धर्माने निःसंदिग्ध म्हणावं की सर्व समान आहेत. म्हणजे तोंडदेखले म्हणणे नव्हे तर त्याआधारे कायद्यात बदल, सामाजिक सुधरणा इ.

आज कुठलाही धर्म निःसंदिग्ध पणे का म्हणत नाही की महीलेचे नाव-आडनाव-जात-धर्म-गोत्र हे मुलांना मिळायला हरकत नाही किंवा लग्नानंतर मुलींनीच आईवडीलांना सोडून जायला हवं असं नाही वगैरे? जर असे बदल धर्मात झाले तर "वंशाचा दिवा, म्हातारपणची काठी, अग्नी द्यायला-मोक्षप्राप्तीला मुलगाच" असले विचार बदलून समाज जास्त इगालिटेरिअन होईल. मला हिंदु धर्म माहीत आहे म्हणून मी त्यातली उदा घेतलेय. लगेच "टमक्या धर्माला काही बोलायची हिंमत नाही" रेकॉर्ड प्लीज कोणी वाजवू नका. आय डोन्ट केअर अबाउट ढमुकटमुक धर्म. जो माझा धर्म आहे त्याची सुधारणा मला महत्वाची कारण त्याचा फायदा मला होणार. तरी इतरही धर्मांनी या सुधारणा केल्याच पाहीजेत यात वाद नाही.

आज पिक्चर बघून झाला,छोट्या छोट्या गोष्टी अतिशय छान दाखवल्या आहेत,जवळपास बऱ्याच घरातलं प्रतिनिधीक चित्रच म्हणता येईल,वरवर बघणार्याला यात काही वावगं वाटणार नाही,"त्यात काय चेष्टा मस्करी करणारा व्यवस्थित कमावणारा नवरा,अतिशय शांत सासरा,मोबाइल लॅपटॉप वापरते म्हणजे मोकळीक ही आहे खूप,हॉटेलिंग पण करतात,मग काय त्रास आहे, घरचं व्यवस्थित आहे मग नोकरीची गरजच काय, देवाचं करणारं घराणं आहे म्हणजे सोवळं तर असणारच न,हिला काय काहीच त्रास नको का,सुख टोचतय हिला फक्त"आणि अजून काय काय........
तिची घुसमट खूप छान जाणवली

म्हणूनच धर्म हद्दपार करणे हे सोलुशन नाही, काळानुरूप बदलणे हे आहे.//
+10000

परंतु समानतेचा विषय निघाला की पेट्रिआर्की, वर्णव्यवस्था आणि त्यानुषंगाने धर्माची चर्चा होणं अपरिहार्य आहे कारण ते एकात एक गुंतलेले विषय आहेत. //

तुमचा मुद्दा कळतोय आणि त्यात तथ्य आहे. पण यावर फोकस केल्याने गोष्टी उगाचच complicate होतात आणि ध्रुवीकरण होतं.
अमेरिकेत स्त्रीवादी चळवळीत जशा उजव्या आणि डाव्या स्त्रिया एकत्र आल्या तशाच गोऱ्या आणि काळ्या स्त्रिया एकत्र आल्या. त्याचवेळी तिथे वर्णभेदाबद्दल चळवळ सुरू होती. काळे पुरुष काळ्या स्त्रियांना सांगू लागले की तुम्ही कशाला गोऱ्या स्त्रियांबरोबर चळवळ करताय, तुम्ही आमच्यासोबत सिव्हिल राईट्स चळवळीत झोकून द्या. ते जास्त महत्वाचं आहे. (आणि ते झालं की तुम्हाला तुमचे हक्क आपोआप मिळतीलच की. ) पण वास्तविक आफ्रिकन देश जिथे काळ्या पुरुषांचीच पूर्ण सत्ता आहे तिथेही स्त्रियांची स्थिती वाईटच आहे. त्यामुळे इतर चळवळीचं बायप्रॉडक्ट म्हणून स्त्रियांना हक्क मिळतील याची शून्य खात्री आहे.
इतर कोणतीही चळवळ असं म्हणत नाही की आपण आपले मुद्दे बाजूला ठेवून स्त्रियांच्या प्रश्नाला प्राधान्य देऊ. उलट स्त्रियांकडूनच अपेक्षा असते की तुमचे मुद्दे तूर्तास बाजूला ठेवा, दुसरे मुद्दे जास्त महत्वाचे आहेत.
(क्लासिक टिळक- आगरकर डिबेट हेही एक उदाहरण आहे.)

त्यामुळे स्त्रीपुरुषसमानतावाद्यांनी इतरांसाठी फूट सोल्जर न बनता आपले मुद्दे लावून धरावे.त्यात कम्युनिस्ट विरुद्ध उजवे असं काही सोवळंओवळं पाळू नये. ईस्ट इंडिया कंपनी टोकाची उजवी, भांडवलवादी, साम्राज्यवादी होती. पण भारतीय स्त्रियांचं भलं करून गेली.

शेवटी हे जग भांडवलशाहीवर चालते (चालावे). >> चालते हे बरोबर आहे. पण चालावे हे मला तितके बरोबर वाटत नाही. भांडवलशाहीकडे स्त्रियांच्या प्रश्नांची उत्तरे आहेत का? माझ्या मते नाही. कारण भांडवलशाही व्यवस्था ही पुरूषसत्ताक पद्धतीचेच एक रूप आहे.
काही दिवसांपूर्वी एका रोचक पुस्तकाबद्दल ऐकलं - Who cooked Adam Smith's dinner? By Katrine Marcal
मी पुस्तक वाचलेले नाही पण इथे (https://www.thehindubusinessline.com/blink/read/the-woman-who-cooked-ada...) त्याचा थोडक्यात परिचय दिला आहे.
आधुनिक अर्थशास्त्राचा जनक मानला जाणारा ॲडम स्मिथ अविवाहित होता आणि स्वतःच्या आई सोबत रहात असे जी त्याच्या जेवणाखाण्याची काळजी घेत असे. पण जेव्हा त्याने आपले प्रसिद्ध पुस्तक The wealth of nations लिहीले तेव्हा त्याला आपली आई आणि इतर लाखो स्त्रियांचे आर्थिक योगदान दिसले नाही. आजही घरकामाला भांडवलशाही व्यवस्थेत काहीही मूल्य नाही.
Had capitalism been a solution to inequality, the wealth would have been more equally distributed between the genders which could not be farther from the reality.

कोणत्याही प्रकारची समानता ही सध्याच्या प्रचलित धर्मांना हात न लावता आणणे शक्य नाही. >> asahamat.
Mazya dharmat he jithe arthik swatantrya ahe tithe ghadatana disate.

पाहिला चित्रपट. खरच बारीकसारीक छान दाखवलय.
चेहरा बोलतू त्या मुलीचा. स्वयंपाक करताना, बाहेर पदार्थ आणून देताना एक ताण जाणवतो तिच्या चेहर्‍यावर. नृत्य करताना आणि बघताना डोळ्यात हसू दिसतं.

चालते हे बरोबर आहे. पण चालावे हे मला तितके बरोबर वाटत नाही. भांडवलशाहीकडे स्त्रियांच्या प्रश्नांची उत्तरे आहेत का? माझ्या मते नाही. कारण भांडवलशाही व्यवस्था ही पुरूषसत्ताक पद्धतीचेच एक रूप आहे.>> बरोबर. आर्थिक भांडवल जगभर कोणाकडे आहे? एलिट पुरूषांकडे.मग या व्यवस्थेतून पैशाचे, सत्तेचे केंद्रीकरण कोणाकडे होणार हे स्पष्ट आहे. पण दुसरी पर्यायी चांगली व्यवस्था सध्या नाही हेही खरंच.

Pages