द ग्रेट इंडिअन किचन

Submitted by मेधावि on 1 February, 2021 - 07:00

गेल्या दहा दिवसांत तीन सिनेमे पाहीले.
1. इज लव्ह इनफ ? "सर"
2. द लास्ट कलर
3. द ग्रेट इंडिअन किचन.

पहिले दोन सिनेमे आवडले ...

तिसरा सिनेमा.. (Neestream -मल्याळी भाषेतला इंग्रजी सबटायटल्सवाला) पाहून मात्र त्रास झाला. एक सण्णसणीत मुस्काटात बसली. हा चित्रपट संपत नाही. तो मानगुटीवर बसतो आणि छळतो. "अगदी फ्रंट ऑफ द माईंड" छळत रहातो. स्वैपाकघर आणि स्वैपाक ह्या विषयातले बारीक सारीक तपशील टिपून त्यावर एका पुरुषानं हा सिनेमा बनवलाय,त्याला साष्टांग प्रणाम.

Spoiler alert - ज्यांना पहिल्या  धारेचा सिनेमा बघायचाय त्यांनी इथून पुढे वाचू नये. पण लवकर बघा...

(एक डिस्क्लेमर - मी अजिबातच स्त्रीवादी नाही. स्वतः राबून घर सजवणं, स्वच्छ आणि सुंदर ठेवणं, छान छान पदार्थ बनवून दुस-याला खाऊ घालणं हे मला आवडतं. मी माझ्या आवडीसाठी ते करते, तरीसुद्धा सिनेमा पाहून मी गोंधळले आणि भांबावले आहे)

लास्ट अॅलर्ट!!!
ह्यापुढचं लेखन प्रचंड उत्कट असेल. ते कदाचित  असंबंद्धही होईल, पण विचारांचं घोंघावीकरण न थोपवता आणि त्याचं अजिबात सुबकीकरण न करता ते जसे येतील तसे ते इथे येतील.

एखाद्या व्यक्तीला कोणी सपासप आसूडाचे फटके मारत असेल तर त्याच्या वेदना पाहून बघणाराही कळवळतो.  पण ती व्यक्ती जर खूषीत ते फटके खात असेल तर? .... आनंदानं हे फटके खाणं म्हणजेच आपल्या आयुष्याची सार्थकता, कृतार्थता, परीपूर्णता असं तिला आणि तिच्या सर्व जिवलगांना वाटत असेल तर ?

आणि....... मीही त्यातलीच एक असेन तर?????
मीच काय,  निरक्षर ते डाॅक्टरेटपर्यंत शिकलेल्या, गरीब ते गडगंज श्रीमंतीत लोळणा-या माझ्या परिचयायल्या सर्वच्या सर्व  स्त्रिया दिसतायत् मला आत्ता डोळ्यापुढे. हे सगळं आमच्या, आपल्या  हाडीमाशी इतकं रुजलंय आणि तुम्ही आम्ही सर्वांनी ह्या प्रचंड प्रचंड भीषण वर्णव्यवस्थेला किती सहजपणे आत्मसात केलंय...आणि आणि "आज" एक पुरुष बोलतोय त्यावर..हॅट्स ऑफ टू हिम.

हा सिनेमा  पितृसत्ताक पद्धतीतल्या "स्त्री" ह्या सो काॅल्ड  "देवीच्या" कर्तव्यांवर, तिच्या अधिकारांवर, सुखी आणि संपन्न आयुष्याच्या  परंपरेनं रुजवलेल्या कल्पनांवर, व्याख्यांवर आणि "घरगुती हिंसाचाराच्या प्रकारांवर बोलतो. चित्रपट पहाताना एकापाठोपाठ एक एक सण्णसणीत कोरडे बसत रहातात अंगावर खण्णं..खण्णं..खण्णं करत  !!!!   पण तो थांबत नाही, वेगवान बनतो आणि बोलतच रहातो, बोलतच रहातो. मी ..पहातच रहाते....कण न् कण् एका क्षणी  "पेटत" असतो आणि पुढल्या क्षणी "विझत" असतो. एक मोठ्ठी  हतबलता साचून रहाते. हे सगळं बदलण्यासाठी आपण फार फार दुबळे आहोत असं वाटतं.  पटो...न...पटो.... मी तीच वाट पुढे चालणार असते.

हा चित्रपट फार महत्वाचा आहे. पहायलाच हवा असा.  रोजच्या जगण्यातल्या ब-याच बेसिक गोष्टींचं भान देतो तो. मानवता शिकवतो. आपल्या मायेच्या माणसांच्या आणि प्रेमाच्या कल्पना, जेवणाचे, वागण्याचे  मॅनर्स, म्हातारपणापर्यंत बाळगलेल्या आणि  कौतुकानं जोपासलेल्या  नाठाळ आणि त्रासदायक सवयी आणी चवी-ढवी ह्या सगळ्यावर प्रश्न उभे करतो.

चित्रपटाची सुरुवात.. , केरळमधल्या एका गावात एक लग्न ठरतंय. मुलगी काळीसावळी, स्मार्ट, हसरी, टिपिकल दाक्षिणात्य सुंदर काळेभोर बोलके डोळे आणि दाट कुरळे केस. तशी पहिल्यांदा पाहताना ती सुंदर वगैरे नाही वाटत पण हसली की फार गोड दिसते. नृत्याची आवड आहे तिला. नैपुण्यही आहे त्यात. हसरी, खेळकर फुलपाखरी आयुष्य जगणारी ही मुलगी.  बघायला येणारं स्थळही  तालेवार असावं. मुलीची आई भरपूर उत्साहानं राबते आहे, गोड आणि तिखट असे भरपूर तळीव पदार्थ (घरातच) बनवते आहे. सुंदर मोठ्ठा "आधुनिक" आणि कलात्मक पद्धतीनं सजवलेला दुमजली बंगला आहे त्यांचा. संपन्नता जाणवते सगळीकडे. वडील गल्फमधे नोकरी करत असल्याचं गप्पांमधून समजतं.  नातेवाईक, हास्यविनोद, गप्पा........ छान आनंदाचं वातावरण आहे.

बघण्याचा कार्यक्रम पार पडतोय. दोन्ही बाजूंचे लोक सधन वाटतात आणि खुशीत दिसतायत्. मुलामुलीला एकट्यानं एकमेकांशी काही बोलायचं तर बोला अशी परवानगी देऊनही  घरच्या सगळ्यांनी फिल्डींग लावली आहे. अशा परिस्थितीत संकोचल्यामुळे मुलामुलीचा फार संवाद होतच नाही. स्वभाव, विचार-आचार जाणून घेणं वगैरे काही घडताना दिसत नाही. पण दोघंही एकमेकावर अनुरक्त वाटतात. 

छान थाटामाटात लग्न होतं. हुंड्यात मिळालेली एक अलिशान कार ही दिसतेय दारात.  लाजत मुरडत नव्या नवरीचा कौतुकाचा गृहप्रवेश. प्रेमळ व शांत स्वभावाचे सासूसासरे आणि नवरा.  सासरचं घर किती सुंदर!!! वडिलोपार्जित असणार. टुमदार, कौलारू, खूप मोठ्ठं पण जुन्या पद्धतीचं.  दोन मजली, मागेपुढे भलं मोठ्ठं अंगण, जुन्या पद्धतीची कडी-कोयंडे असलेली लाकडी दारं,  शिसवी लाकडाचं फर्निचर, पितळी मोठी मोठी छान छान भांडी, मागेपुढे भरपूर झाडं. स्वैपाकघर  मोठ्ठं, मात्र अंधारं आणि साधं आहे. तिथं माॅड्युलर किचन नाहीये. साधा कडप्याचा ओटा, अॅल्युमिनीयमची भांड्यांची मांडणी, भिंतीवरचं ताटाळं, फळीवरचे डबे. स्वैपाकघरातच अजून एका भिंतीशी अजून एक ओटा आहे आणि त्यावर चक्क एक ढणढणती चूल आहे. वर वखारीची लाकडं रचलेली दिसतात.  चुलीवर (केरळमधे) भात शिजवतात ते भाताचं डेचकं. इतर भांडी आणि भात ढवळायचा मोठा डाव. बाकी स्वैपाक गॅसच्या शेगडीवर होतो पण भात मात्र अजूनही चुलीवरच शिजतो. मिक्सर आहे, पण वाटण मात्र पाट्यावरच होताना दिसतं. कायमचा फिक्स केलेला एक मस्त मोठ्ठा पाटा दिसतो.

मुलीच्या संसाराचा पहिला दिवस. नवरा चांगला वाटतो. सासूही प्रेमळ, शांत आणि कामसू आहे. मुलीला हळूहळू रुळूदे. लगेच कुठे कामं सांगायची? सासराही शांत आहे. घरात फारसा बोलतही नाही.

भांडी घासणं, उष्टं खरकटं काढणं, केरवारे, फरशी, अंगण झाडणं, पुसणं , भरपूर भाज्या, निवडणं, चिरणं, फोडणीस टाकणं....मोठ्या अलीशान पाट्यावर भरपूर नारळ वाटणं, चटणी, सांबार बनवणं. मांसाहारी पदार्थ बनवणं. वेळेवर डायनिंग टेबलवर सगळं अन्न मांडणं, गरमागरम सर्व्ह करणं.... विविधरंगी, विविध चवींचा, सुग्रास, तृप्त करणारा स्वैंपाक.. गृहलक्ष्मीनं, अन्नपूर्णेनं घर सांभाळावं, सजवावं, ते उबदार ठेवावं, कुटुंबाला छान खाऊ पिऊ घालून सुखात ठेवावं.  जेवताना स्वैपाकाचं आवर्जून कौतुक करणारी घरची माणसं.  पुरुषाच्या ह्दयाचा मार्ग पोटातूनच तर जातो ना....ह्या संसारला सुखी संसारच तर  म्हणतात ना?  

रोज सकाळी बिडाच्या तव्यावरचे गरमागरम डोसे, इडिअप्पम, पुट्टु आणि कडला करी, सांबार, पदार्थाला लाल मिरच्या, उडीद डाळ, भरपूर कढीपत्याची खमंग फोडणी. दुपारच्या जेवणातल्या वेगवेगळ्या भाज्या, भात... हळूहळू डोळ्यातून  ती चव आपल्या डोक्यात, मनात, आणि मग जिभेवर उतरायला लागते. चायला, आपण फूड चॅनेल बघतोय का काय असं वाटतं.

घरच्यांच्या आवडीनिवडी आणि चवीढवींचा विचार करत करत रोजचा स्वैपाक करणं, सकाळी दूध येण्यापासून सुरू झालेला दिवस, रात्रीची जेवणं झाली की ओटा टेबल आवरून, भांडी घासून मग श्रांत तनामनानं दिवा बंद करून बिछान्यावर अंग टाकणं ही त्या गृहलक्ष्मीची आनंदाची, सार्थकतेची, तृप्तीची कल्पना. लग्नानंतर सुरुवातीला  नवरा व सासरच्यांचं सगळं व्यवस्थित करणा-या ह्या घरोघरीच्या नायिका, नंतर मुलंबाळं, नातवंडं ह्यांच्यासाठी अविरत झिजतच असतात......झिजतच रहातात....मरेपर्यंत. आणि आपण म्हणतो...माझी आई/आजी फार फार प्रेमळ होती. माझ्यासाठी खूप केलं तिनं. तो तिच्यासाठीही सन्मानच असतो.

कथानायिकाही लग्नानंतर सासूच्या बरोबरीनं  सर्व जबाबदा-या उचलायचा प्रयत्न करताना दिसते.  एक आदर्श सून, बायको बनण्याचा प्रयत्न करताना दिसते.  हे सर्व करताना तिला मजा येते आहे, आत्मिक समाधान मिळतं आहे. पण ते निभवताना तिची दमछाक होतेय.

घरातला पुरुषवर्ग शांत, अबोल....पैसे मिळवून आणणं आणि बाहेरची कामं करणं हे पुरुषांचं काम. ते किचनमधे ढवळाढवळ करत नाहीत. आणि अचानक सासूला मुलीच्या बाळंतपणासाठी परदेशी जावं लागतं. आणि संपूर्ण घराची संपूर्ण जबाबदारी सुनेवर धाप्पकन् येऊन पडते.  माहेरी
फारशी स्वैपाकघरात न  वावरलेली ही मुलगी, पटापट सगळं शिकून अपेक्षांना उतरायच्या प्रतिक्षेत.

सकाळचा चहा, नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण, भांडी घासणं, केरवारे, अंगणाची झाडलोट, फरश्या पुसणे, जिने पुसणे..... न संपणारी आणि मारूतीच्या शेपटाप्रमाणं सतत वाढत जाणारी कामं आणि अपेक्षा. सास-यांना चुलीवरचाच भात, पाट्यावरची चटणी प्रिय आहे. कुकर, मिक्सरमधे ती चव येत नाहीये. ते प्रेमानं तिला सुचवू पहातात. तीही त्यांच्या मताचा आदर राखते, एक एक दिवस पुढे सरकतो तशी वेगवेगळ्या प्रसंगातून तिला येत जाणारी जाण, येणारा मानसिक आणि शारिरीक थकवा,  फ्रस्टेशन्, पुरुषांच्या प्रायोरिटीज,  एकत्र कुटुंबपद्धतीतल्या अपेक्षा, रोज येणारी वेगळी वेगळी आव्हानं. त्यावर मात करण्यासाठीची तिची ओढाताण आणि ह्या सगळ्यावर त्यावर तिनं दिलेलं उत्तर....ह्यावर बोलतो हा सिनेमा.

गरमागरम डोसे करून वाढायचे म्हणजे बरोबरीनं ती जेवू नाही शकत बाकीच्यांबरोबर. सगळ्यांचं खाणं झाल्यावर टेबलवर ताटाबाहेर काढून टाकलेल्या शेवग्याच्या शेंगांची सालं आणि इतर खरकटं  उचलताना तिला ढवळतं. जेवायला सुरुवात करताना नवरा व सास-यासाठी हिनं सुबकपणे मांडलेलं टेबल आणि आता ती आणि सासू जेवायला बसतानाचं टेबल ह्यात जमीन अस्मानाचं अंतर. सासू सरावलीये. तिला ह्याचं काहीच नाही वाटत. उलट ती नव-याच्या उष्ट्या ताटातच घेते वाढून. मुलीला मात्र हे जड जातंय. हाॅटेलमधे टेबल मॅनर्स पाळणारा नवरा घरात का पाळू शकत नाही? सतत भांडी घासण्याचा आणि उष्ट- खरकटं आवरण्याचा सीन येत रहातो. किती घरांमधे तुंबलेल्या सिंकमधे हात घालायचा प्रसंग घरच्या मुलांवर/ पुरुषांवर  येत असेल? दुस-या घरातनं आलेल्या मुलीनं मात्र हे पट्कन् आत्मसात करण्याची अपेक्षा ठेवली जाते.

घरोघरी नव-याच्या हातात डबा, रुमाल, पाकिट, मोबाईल देणा-या बायका आपण पहातोच की. त्यात कुठं काय वावगं वाटतं? नाॅर्मलच तर आहे की हे..
रांधा वाढा उष्टी काढा ह्यात तर मागच्या अनेक पिढ्या संपल्या. ह्यात काय एवढं मोठं? नाॅर्मलच आहे की हे सगळं..  "ह्याच" गृहितकांकडे हा सिनेमा परत एकदा नव्यानं बघायला लावतो. त्या गृहीतकांना मानवतेच्या निकषांवर परत एकदा तपासायला लावतो. मारहाण किंवा  शिवीगाळ म्हणजेच काही घरगुती हिंसाचार नाही फक्त. खूप व्यापक आहे ती कल्पना. पिढ्या न् पिढ्यांपासून होत असलेले काही अन्याय आता परंपरेच्या नावानं इतके मान्यताप्राप्त झाले आहेत की  मानवतेनच्या  दृष्टीकोनातूनही ते दूर करू शकत नाहीये आपण. म्हणून ही अस्वस्थता येते. ही अस्वस्थता कधी जाईल, कशी जाईल ते माहीत नाही पण  सिनेमाचा प्रेक्षक आपल्या ताटातलं उष्टं दुस-या कुणाला तरी साफ करायला टाकताना  दहा वेळा तरी विचार करून टाकेल  हे सुद्धा ह्या सिनेमाचं यशच म्हणावं लागेल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

हे राहिलं:
कपडे वॉशिंग मशिन मध्ये धुतेस? लवकर खराब होतात. माझे तरी हताने धूत जा Happy

मुलीची आई पण अशीच रुळलेली आहे. तीच सगळं बनवताना दाखवलिये सुरुवातीला. मला हे अस्संच लागतं वाले बरेच आडमुठे लोक पाहिलेत आजुबाजुला. ते लाड ज्यांच्या बायका न कुरकुरता सांभाळतात ते संसार यशस्वी झाले असं म्हणायची पद्धत आहे.

छान चर्चा सुरू आहे.
सगळ्यांचे प्रतिसाद आवडले.
कविन यांची कविता आणि निबंध दोन्ही आवडले.

अनु Happy
आणखी बरेच आहेत असे . ती आत्या येते तेन्व्हाही , चिडत नाहीत , आता काय सांगायचं हीला , असा अभिर्भाव असतो .
तुळशीची पाणं हुंगत असते तेन्व्हाही .

रच्याकने , तो लग्न ठरवायला जातो तो मित्र असतो का? बिर्याणी बनवणारा , बायकोसाठी चहा बनवणारा?

अगदी वर्श दीड वर्शा मागे अपर्णा राम तीर्थ कर बाई ( कै.) हीच विचारसरणी कशी बरोबर आहे व आजकालच्या मुली!!! टाइप भाषणे देत असत व ती एका वर्गात( जो पॅट्रार्की सपोर्ट करतो व त्याचे बेनिफिट्स एंजॉय करतो ) भयानक प्रसिद्ध होती. पण शतको शतके एका जिवं त माणसावर होणारे अत्याचार ह्या बद्दल ब्र सुद्धा न काढता सहनच केले पाहिजेत व तेच ग्लोरिफाय होते हे बरोबर नाही.

बघितला काल रात्री. सुंदर पदार्थांपेक्षा त्या सिंकमध्ये तुंबलेलं पाणी जास्त लक्षात राहिलं. त्या दुसऱ्या बायकोने साडी नेसलेली काही दिसली नाही मला, ती ड्रेसमध्येच होती. एकदाच दाखवली ना ती.
सासरे पेटीत दागिने ठेवतात व पेटी तिजोरीत. तिने लग्नात आणलेले दागिने असतात का ते.
ती दूध घेऊन येणारी मुलगी तिला शेवटी काय देते जेव्हा ती बाजूला बसलेली असते.
ती कामाला बोलावलेली बाई म्हणते की पाळी असली तरी ती स्वयंपाक करायला जाते, कोणाला कळतंय. हे मला फार उपहासात्मक वाटले. जीवाचा आटापिटा करून सासरा आणि नवरा सोवळे पाळतात पण ती बाई त्यांचा सो कॉल्ड धर्म बुडवतच असते.
सासऱ्याला तोंडावर पंच मारावा असा होता तो. म्हणे बाईने घरात बसणे शुभ आहे (auspicious असं भाषांतर दिसलं मला)
त्यांची मुलगीही परदेशात नोकरी करतच असेल पण तिच्या सासरच्या लोकांना ते पटते आणि त्यांच्या मर्जीने ती वागते हे उत्तर असणारच. ती बिचारी सासू मुलीकडे गेल्यावरही रांधा वाढाच करत असते, स्वयंपाकघर बदलते इतकेच. सुनेला ती नोकरी साठी प्रयत्न कर पण माझे नाव घेऊ नकोस म्हणते, तिनेही कधीतरी नोकरीसाठी विषय काढला असेल आणि नवऱ्याचे उत्तर तिला माहिती असेल.

टाइप भाषणे देत असत व ती एका वर्गात( जो पॅट्रार्की सपोर्ट करतो व त्याचे बेनिफिट्स एंजॉय करतो ) भयानक प्रसिद्ध होती.>>>> त्या बाईचा लहानपणापासूनच ब्रेन वॅाश केलाय असे वाटते इतके टोकाचे ती बोलते. मुलीला-सुनेला फार त्रास देत असेल.

काल बघितला आणि आवडला. वरील चर्चा ही चांगली आहे.
हे कधी बदलणार? बदलायला इन्सेंटिव्ह काय? हेच विचार चित्रपट संपल्यावर डोक्यात आले.
तर हे आपल्या आणि जवळच्यांच्या वाट्याला येणार नाही याची मुलींनी (हो) काळजी घेणे, त्यासाठी सदैव आपल्या पायावर आर्थिकदृष्ट्या उभे असणे. प्रत्येक स्त्री पुरुषाला आपल्या न्याय्य हक्कांची जाणीव असणे आणि ते मिळवण्यास प्रयत्न करणे. आपल्या मुलांना समानता म्हणजे काय ते आई वडिलांनी शिकवणे, शिक्षणात असमानता असणार्‍या ज्या ज्या गोष्टी असतील त्या बदलायाचा सतत प्रयत्न करणे, आमच्या काळी असंच शिकवायचे, ही विदेशी फ्याडं आहेत, असल्या टीकेला तोंड देत शाळेत नकळत्या वयात धर्म इ. चे शिक्षण न देणे इ. करत रहाणे असंच वाटलं. सिस्टिम बदलणे वैयक्तिकरित्या आपल्याला शक्य नाही असं मनाला वाटत असेल तर सिस्टिम बदलणार्‍या ज्या घटना अधेमध्ये घडत असतात त्यांना सपोर्ट करणे. रिग्रेसिव्ह विचार कदापि पुढे न ढकलणे.
फुले, कर्वे आणि आजच्या जगात शबरीमाला सारख्या घटना घडतील तेव्हा व्होकल सपोर्ट देणे. सगळ्या जगाचं राहू दे, आपण याचा बळी न पडणे इतकं अनेकांनी केलं की बदलेल.
मला ती त्याला धडा शिकवण्याच्या फंदात न पडता आपलं आयुष्य आनंदात जगू लागली (आणि त्याला आणखी एक बकरी मिळाली) हा शेवट फार आवडला. त्याला दुसरी बायको मिळण्याचा भाग सत्यपरिस्थितीला धरून आणि पहिला भाग लढा टाईप असता तर तो तकलादू वाटला असता, आणि आयुष्यात परस्युट ऑफ हॅपिनेस सगळ्यात महत्त्वाचा म्हणून.

काल पाहिला. अंगावर आला. माझ्यासारख्या vocal व्यक्तीला खूपच संयम बाळगून पाहावा लागला.
लग्नानंतर सुरुवातीच्या दिवसात आपण छान छान वाटावं म्हणून न पटलेल्या गोष्टी एक्सेप्ट करण टाळायला हवं.
सासू जर गावाला गेली नसती तर ती यात दिवसेंदिवस मुरून वेगवेगळ्या कारणांनी अजून अडकून पडली असती का?
गोष्टी शंभर टक्के अंगावर आल्या नसत्या तर तिला त्यातली गंभीर का जाणवली असते का?

सासरचे वाईट म्हणण्यापेक्षा insensurive म्हणावेत का?

मी कुठलाही अन्याय टोकाला जाईपर्यंत सहन करू शकत नाही,
त्यामुळे इतका काळ न बोलणं मला पचायला फार जड गेलं.
अर्थात अशी माणसे ही असतातच की.

ह्या पिक्चर च्या निमित्ताने अगदी एक्स्ट्रीम नसेल तरी subtle desxrimination अनेक पातळ्यांवर दिसत राहतं ते बायकांना तरी जाणवेल का?
हा प्रश्न राहून राहून पडला.
म्हणजे एक तरी बर्थडे पार्टी बाबा लोक आयोजित करताना दिसतात का?
कुठल्याही कार्यक्रमानंतर शेवटची पंगत घरातल्या बायका पुरुषांची का दिसत नाही अनेक ठिकाणी? इथे बाई आणि पुरुष असा फरक न करता काम करू शकणारे आणि काम न करू शकणारे (physic disability) असे गट होऊ शकतात का?
घरकाम करणाऱ्या पुरुषांवर चे, आपल्या हक्काबद्दल जागरुक aसल्यामुळे कजाग वाटणाऱ्या बायकांबद्दल, बायकांना पॉलिटिक्स आर्थिक वगैरे बाबींमध्ये कळतच नसेल असे गृहीत धरून येणारे हिणकस फॉरवर्ड आणि त्यात मजा वाटणार या बायका एवढे तरी कमी होईल का?

नानबा Happy
Happy इथे कोथिंबीरवडी धाग्यावर म्हणा किंवा रेसिपीजच्या/घरगुती धाग्यांवर पुरूष आयडी लिहीत नाहीत अशी तक्रार येते. रास्तही आहे. पण आर्थिक धाग्यांवर स्त्रिया लिहीत नाहीत. क्वचित एखादी वर्णिता, सोनाली व्यवस्थित प्रश्न्/उत्तरे मांडून जाते. जोवर घरात, सोशल मिडीयावर हे बदलत नाही तोवर आर्थिक बाबीत काही कळत नाही असे फॉर्वर्ड्स येणारच. 'डिस्पोजेबल' नसण्यात आपल्या आर्थिक सामर्थ्याचा फार मोठा वाटा आहे.

आता "वैयक्तिक तुमचं" असं ऐकण्याची हौस असणार्‍यांना - मला ही नाही कळत पण आर्थिक गुंतवणूकीतले आज. पाच वर्षात परिस्थिती वेगळी असेल आणि त्या दृष्टीन पावले उचलायची माझी तयारी आहे. घरात ते मायबोलीवर व्यवस्थित समजून सांगणारे लोक आहेत.

सासू जर गावाला गेली नसती तर ती यात दिवसेंदिवस मुरून वेगवेगळ्या कारणांनी अजून अडकून पडली असती का?
गोष्टी शंभर टक्के अंगावर आल्या नसत्या तर तिला त्यातली गंभीर का जाणवली असते का?>> Exactly माझ्याही मनात हा विचार आला होता Happy
उषा हे नाव तेवढं आहे त्या कामाला येणाऱ्या बाईचं. बाकी कुणाला नावं नसावीत.
दागिन्यांचं मलाही नीट कळलं नाही.

टिपिंग पॉईंट यावाच लागतो. थप्पड मध्ये ती सगळ्यांसमोर दिलेली थप्पड होती, इथे हळूहळू वाढत जाणारा कोंडमारा आहे. तिला जॉब करू दिला असता, तर बाकीचं सगळं सोसून ती राहिली असती कारण कोंडमार्‍यातील वाफ बाहेर पडायला एक छिद्र मिळालं असतं. सासू बाहेर गेल्याने पारड्याची दुसरी बाजू एकदमच हलकी झाली, सगळंच एकटीवर पडलं आणि कोंडमारा अशक्य होऊ शकला. नाहीतर दु:ख बोलून कमी होतं, प्रेमाचा हात फिरला की कमी होतं. असं म्हणतातच ना. ते सासूने केलं असतं. जे वाईटातलं चांगलं असतं पण तेच आणखी वाईट असतं. Happy

सुरुवातीच्या सीन मध्ये नाचाची प्रॅक्टीस करताना तिच्या डोळ्यातली स्वप्नं आणि नंतर घरातली कामं करुन करुन विझलेले तिचे हतबल डोळे. या नायिकेचं काम छान झालंय.
(एक कळलं नाही, इतक्या वेळा तुंबलेलं सिंक हाताने साफ करावं लागतंय पण आधी सर्व खरकटं ओल्या कचर्‍यात टाकणे, किंवा सिंक वर नीट मोठं गाळणं/जाळी ठेवून खरकटं त्यात अडकेल असं पाहणं हे मात्र केलेलं दिसत नाही. काम बरंच सोपं होतं.अर्थात हे सगळीकडेच शक्य असतं असं नाही.
मला बुफे जेवणाच्या इथले वापरलेली ताटं ठेवायचे कंटेनर बघवत नाहीत. पाण्याचे पाण्यासाहित ग्लास, खरकटं, प्रचंड प्रमाणात उरलेलं खाणं टाकलेल्या ताटल्या.अगदी खरकटं काढायलाही हरकत नसते. पण हे काम करणार्‍याला जास्तीत जास्त कठीण होईल असं नकळत केलं जातं. उदा. हॉटेल मध्ये फिंगर बोल च्या पाण्यात टिश्यू चे बोळे टाकणे.)

आई ताटात पाणी सोडून ते स्ट्रेनर सारखं मोठं गाळणं असतं त्याने ताट त्यात ओतून खरकटं गाळण्यात काढून ओल्या कचऱ्यात टाकते.ते गाळणं यासाठी राखीव आहे.सिंक च्या ड्रेन ला थेट लावायच्या प्लास्टिक जाळ्या मिळतात.पण बरेचदा भारतीय खरकट्या चे प्रमाण व व्याप्ती इतकी असते की ती चिमुकली जाळी काढताना खरकट्याशी बरीच भावनिक आणि शारीरिक गुंतवणूक लागते.मोठ्या गाळण्याने कुठेही हात न लावता बेस्ट काम होते.
शक्यतो ताट साफ करावे, खरकटे(भात शिते सोडता) असूच नये पण लहान मुले, किंवा टिपिकल शेवग्याच्या शेंगा सारखा प्रकार असला तर खरकटे होतेच.

हा धागा कोणत्या गॄपमधे आहे ते न पहाता, हा टीव्हीवरचा कार्यक्रम आहे असेच समजत होते. Lol

आता खूपच प्रतिसाद आलेत त्यात स्पॉयलर असतील असे समजून वाचत नाही. तर हा कुठे उपलब्ध आहे पहायला ते प्लीज कोणीतरी सांगा.

प्राईम वर आता सब टायटल्स सह आहे.
अमितव, तुमच्या देशात व्हर्लपूल चा २४ तासात कंपोस्ट बनवणारा कंपोस्ट मेकर लगे हाथ घेऊन टाका. रास्त किंमतीत मिळत असेल(सर्व गोष्टी कंपोस्ट कडे वळवण्याची माझी हातोटी केस उपटवणारी आहे.आता अवांतर आवरते.)

ते व्हर्लपूलचं कायच्या काय महाग आणि वीजखाऊ आहे ( तेच ना?)
सिंक तुंबतं कारण खालचा पाईप तुंबलाय. त्यामुळेच तो फाटून गळतोय.
आता फारच कीस काढतोय आपण एकेका गोष्टीचा असं मला वाटायला लागलंय Proud
खरं म्हणजे मला त्या नवऱ्याचा किंवा सासऱ्यांचा राग असा नाही आला. त्यांची घडणच तशी आहे. 'हे असंच असतं आणि असायला हवं' असं वाटणारी माणसं आजूबाजूला पाहिलेली आहेत. त्यापैकीच ते आहेत.

हो, तेच ते व्हर्लपूल झेरा.त्यांचे कंपोस्ट कल्चर पण १९ डॉलर चे आहेत.जिथे बनलं तिथे स्वस्त असेल, हापूस रत्नागिरीत स्वस्त असतात तसं Happy
शेवटचं अवांतर
(एकच उत्तरः गरम उकळते पाणी किंवा किवी ड्रेनेक्स)

त्यासाठी त्यांना ss चा बॉटल trap लावावा लागेल... मूवी मध्ये दखवलेल्या प्लास्टिक पाईप ची गरम पाणी किवा ड्रेनेक्स ने क्यूअर होणार नाही असली वाट लागते

हो आमचा एक सिंक पाईप ड्रेनेक्स टाकल्यावर अक्षरशः वितळला होता.खूप चांगल्या प्रतीचे ड्रेन पाईप लागतात, ड्रेनेक्स टाकायचे असेल तर.

माणसांचा राग येऊन उपयोग नाही. माणसं त्या पेट्रिआर्कल व्यवस्थेचे वाहक आहेत. प्रत्येकच माणुस त्या व्यवस्थेविषयी विचार करून आपले वागणे ठरवण्याइतका प्रगल्भ नसतो. त्यातही पुरूषांना फायद्याची असलेली ही व्यवस्था ते का म्हणून बदलू बघतील? ( काही सन्माननीय अपवाद वगळता). म्हणून महीलांना तरी पेट्रिआर्कल व्यवस्थेचा राग येणं, ती बदलायचा प्रयत्न करणं, किमान तसा प्रयत्न करणार्यांना साथ देणं हे तरी करायला पाहीजे. जातधर्म हे पेट्रिआर्कल व्यवस्थेचे खांब आहेत. त्यांना सामाजिक, राजकीय सपोर्ट देऊ नये. त्यातून पिसणारे हमखास लोक म्हणजे स्त्रिया आणि निम्नजातीय. वरवर विचार केला तर कशाचाच कशाची परस्परसंबंध लागणार नाही आणि फक्त माणसांवर चीड येईल. हे बरोबर नाही.
या सिनेमातली माणसे व्हीलन नाहीत, पितृसत्ताक व्यवस्थाच व्हीलन आहे. ती रोजच्या आयुष्यात प्रतूयेक महिलेला त्रासदायक आहे पण त्याचं खापर त्या त्या माणसांवर ( सासु, सासरचे लोक, नवरा, इव्हटीजर इ) फोडून काहिच होणार नाही. फेमिनिस्ट आणि लिबरल विचार हे दोनच पथदर्शक आहेत जे पेट्रिआर्कल व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवत आहेत.
परंतु साब्रीमाला प्रकरणात इथलूयाच किती स्त्रिया "पण गरजच काय मंदीरात जायची, त्या टमक्या धर्मातही स्त्रियांना वाईटच वागवलं जातं, आपला धर्म विज्ञानवादी आहे म्हणून त्या दिवसातली वाईट ऊर्जा दूर ठेवायला तशी प्रथा आहे, आमच्या प्रथा जपल्या गेल्याच पाहीजे" असले युक्तिवाद करत होत्या. वरवर सगळे युक्तिवाद बरोबर वाटतात पण त्यानी होतं काय की व्यवस्था तशीच रहाते, स्त्रियांना निम्न ठरवणारी. बदल होत नाही आणि आहेच मग "माझी सासु असा त्रास देते, सासरचे वाईटच वागवतात" वगैरे पर्सनल, मायक्रोलेवल रडारडी. त्यातनं काय हासील होतं हे सर्वांनाच माहीते.

आज फायनली पाहिला हा पिक्चर. आवडला. कमीत कमी संवाद, नुसत्या दिवसभर चालणार्‍या कामांच्या आवाजातून तिच्या मनातल्या गोष्टी उघड होत राहतात. नायिकेचा चेहरा, डोळे अगदी बोलके आहेत. काही न बोलता तिच्या सगळ्या भावना ती व्यक्त करत राहते. एक अनुभव म्हणून हा पिक्चर खूपच आवडला. स्पेशली घरातल्या बायकांची सकाळची कामे चालू आहेत आणि पॅरलली घरातले पुरूष निवांत योगा वगैरे त्यांची लाइफस्टाइल जगत आहेत हे सीन्स आल्टरनेट करून दाखवलेत ते फार आवडलं.
त्यांच्या घरी सगळी कामं घरातली बाईच करताना दाखवली आहे ते का ते कळलं नाही. तिच्या पिरीअड्सच्या दिवसांत त्यांना बाईने काम केलेलं चालतंय. मग एरवी निदान झाडू, भांडी, धुणी वगैरे करायला बाई का ठेवली नसेल? हा कसला अट्टाहास? इतरही अनेक प्रश्न पडले आहेत. उत्तरं मिळाली नाहीत तर इथे लिहेन.

सासरा आणि नवरा नक्की कसली पूजा करत असतात. काय प्रकरण आहे ते. >>> अय्यप्पाची बहुधा. त्यांना शबरीमाला तीर्थयात्रेला जायचं असतं त्या संबंधातच काहीतरी चालू असतं ते बहुधा.

मी हे सगळं स्वतः अनुभवलेलं आहे.....विशेषतः चार दिवसांची शिवाशिव, शिळं अजिबतच न खाणं, अति देव देव व सोवळं, सून म्हणजे अगदीच टाचेखालची , सेवेच्या अपेक्षा... ...........

पण तरीही माझ्यात बेसिन खालचं खरकटं पाणी नवर्‍याच्या तोंडा वर फेकून बाहेर पडायची हिंमत नव्हती कधीच! :- आणि तिने काहीही स्पष्टीकरण दिलं नाही..म्हणून सासरचे म्हणायला मोकळे... बै बै. .काय हिला कमी होतं...... सासरा अगदी देव माणूस, इतकं चांगलं घर........! आता असतात काही लोक जरा कर्मठ...................... प्रत्येकाचा विचार आहे तो ? म्हणून काय लगेच घर सोडून जायचं? Happy

आणि बाई कामाला लावणे हा मार्ग आहेच की. मी ह्या लोकांचे विचार नाही बदलू शकले...पण बायका लावल्या.......!!

आज परत धावता पाहिला (मी धावत नव्हते, पिक्चर धावला)
शेवटी दुसरी बायको आहे तिने पण पंजाबी ड्रेसच घातला आहे. तिच्या ओल्या केसांचं गुंडाळलेलं फडकं, शरीरयष्टी, आणि अगदी ड्रेसचा रंगही पहिल्या बायकोच्या स्वयंपाकघरातल्या त्या पहिल्या दिवशीचाच आहे.

यातला ड्रेन साफ करण्याचा अनुभव आजच घेतल्याने देजावू झाले. अर्थात माझ्याकडे चोक रिमूव्हर होता त्यामुळे जे काही यक्क वाटायचे ते त्याला वाटले. Happy

या पिक्चर मध्ये बाकीचं दाखवलं असतं तर सासरचे नक्कीच 'तिची मानसिक स्थिती चांगली नव्हती, म्हणून आम्हीच सोडले' वगैरे सांगत असतील नव्या बघायला आलेल्या मुलींना Happy

Pages