द ग्रेट इंडिअन किचन

Submitted by मेधावि on 1 February, 2021 - 07:00

गेल्या दहा दिवसांत तीन सिनेमे पाहीले.
1. इज लव्ह इनफ ? "सर"
2. द लास्ट कलर
3. द ग्रेट इंडिअन किचन.

पहिले दोन सिनेमे आवडले ...

तिसरा सिनेमा.. (Neestream -मल्याळी भाषेतला इंग्रजी सबटायटल्सवाला) पाहून मात्र त्रास झाला. एक सण्णसणीत मुस्काटात बसली. हा चित्रपट संपत नाही. तो मानगुटीवर बसतो आणि छळतो. "अगदी फ्रंट ऑफ द माईंड" छळत रहातो. स्वैपाकघर आणि स्वैपाक ह्या विषयातले बारीक सारीक तपशील टिपून त्यावर एका पुरुषानं हा सिनेमा बनवलाय,त्याला साष्टांग प्रणाम.

Spoiler alert - ज्यांना पहिल्या  धारेचा सिनेमा बघायचाय त्यांनी इथून पुढे वाचू नये. पण लवकर बघा...

(एक डिस्क्लेमर - मी अजिबातच स्त्रीवादी नाही. स्वतः राबून घर सजवणं, स्वच्छ आणि सुंदर ठेवणं, छान छान पदार्थ बनवून दुस-याला खाऊ घालणं हे मला आवडतं. मी माझ्या आवडीसाठी ते करते, तरीसुद्धा सिनेमा पाहून मी गोंधळले आणि भांबावले आहे)

लास्ट अॅलर्ट!!!
ह्यापुढचं लेखन प्रचंड उत्कट असेल. ते कदाचित  असंबंद्धही होईल, पण विचारांचं घोंघावीकरण न थोपवता आणि त्याचं अजिबात सुबकीकरण न करता ते जसे येतील तसे ते इथे येतील.

एखाद्या व्यक्तीला कोणी सपासप आसूडाचे फटके मारत असेल तर त्याच्या वेदना पाहून बघणाराही कळवळतो.  पण ती व्यक्ती जर खूषीत ते फटके खात असेल तर? .... आनंदानं हे फटके खाणं म्हणजेच आपल्या आयुष्याची सार्थकता, कृतार्थता, परीपूर्णता असं तिला आणि तिच्या सर्व जिवलगांना वाटत असेल तर ?

आणि....... मीही त्यातलीच एक असेन तर?????
मीच काय,  निरक्षर ते डाॅक्टरेटपर्यंत शिकलेल्या, गरीब ते गडगंज श्रीमंतीत लोळणा-या माझ्या परिचयायल्या सर्वच्या सर्व  स्त्रिया दिसतायत् मला आत्ता डोळ्यापुढे. हे सगळं आमच्या, आपल्या  हाडीमाशी इतकं रुजलंय आणि तुम्ही आम्ही सर्वांनी ह्या प्रचंड प्रचंड भीषण वर्णव्यवस्थेला किती सहजपणे आत्मसात केलंय...आणि आणि "आज" एक पुरुष बोलतोय त्यावर..हॅट्स ऑफ टू हिम.

हा सिनेमा  पितृसत्ताक पद्धतीतल्या "स्त्री" ह्या सो काॅल्ड  "देवीच्या" कर्तव्यांवर, तिच्या अधिकारांवर, सुखी आणि संपन्न आयुष्याच्या  परंपरेनं रुजवलेल्या कल्पनांवर, व्याख्यांवर आणि "घरगुती हिंसाचाराच्या प्रकारांवर बोलतो. चित्रपट पहाताना एकापाठोपाठ एक एक सण्णसणीत कोरडे बसत रहातात अंगावर खण्णं..खण्णं..खण्णं करत  !!!!   पण तो थांबत नाही, वेगवान बनतो आणि बोलतच रहातो, बोलतच रहातो. मी ..पहातच रहाते....कण न् कण् एका क्षणी  "पेटत" असतो आणि पुढल्या क्षणी "विझत" असतो. एक मोठ्ठी  हतबलता साचून रहाते. हे सगळं बदलण्यासाठी आपण फार फार दुबळे आहोत असं वाटतं.  पटो...न...पटो.... मी तीच वाट पुढे चालणार असते.

हा चित्रपट फार महत्वाचा आहे. पहायलाच हवा असा.  रोजच्या जगण्यातल्या ब-याच बेसिक गोष्टींचं भान देतो तो. मानवता शिकवतो. आपल्या मायेच्या माणसांच्या आणि प्रेमाच्या कल्पना, जेवणाचे, वागण्याचे  मॅनर्स, म्हातारपणापर्यंत बाळगलेल्या आणि  कौतुकानं जोपासलेल्या  नाठाळ आणि त्रासदायक सवयी आणी चवी-ढवी ह्या सगळ्यावर प्रश्न उभे करतो.

चित्रपटाची सुरुवात.. , केरळमधल्या एका गावात एक लग्न ठरतंय. मुलगी काळीसावळी, स्मार्ट, हसरी, टिपिकल दाक्षिणात्य सुंदर काळेभोर बोलके डोळे आणि दाट कुरळे केस. तशी पहिल्यांदा पाहताना ती सुंदर वगैरे नाही वाटत पण हसली की फार गोड दिसते. नृत्याची आवड आहे तिला. नैपुण्यही आहे त्यात. हसरी, खेळकर फुलपाखरी आयुष्य जगणारी ही मुलगी.  बघायला येणारं स्थळही  तालेवार असावं. मुलीची आई भरपूर उत्साहानं राबते आहे, गोड आणि तिखट असे भरपूर तळीव पदार्थ (घरातच) बनवते आहे. सुंदर मोठ्ठा "आधुनिक" आणि कलात्मक पद्धतीनं सजवलेला दुमजली बंगला आहे त्यांचा. संपन्नता जाणवते सगळीकडे. वडील गल्फमधे नोकरी करत असल्याचं गप्पांमधून समजतं.  नातेवाईक, हास्यविनोद, गप्पा........ छान आनंदाचं वातावरण आहे.

बघण्याचा कार्यक्रम पार पडतोय. दोन्ही बाजूंचे लोक सधन वाटतात आणि खुशीत दिसतायत्. मुलामुलीला एकट्यानं एकमेकांशी काही बोलायचं तर बोला अशी परवानगी देऊनही  घरच्या सगळ्यांनी फिल्डींग लावली आहे. अशा परिस्थितीत संकोचल्यामुळे मुलामुलीचा फार संवाद होतच नाही. स्वभाव, विचार-आचार जाणून घेणं वगैरे काही घडताना दिसत नाही. पण दोघंही एकमेकावर अनुरक्त वाटतात. 

छान थाटामाटात लग्न होतं. हुंड्यात मिळालेली एक अलिशान कार ही दिसतेय दारात.  लाजत मुरडत नव्या नवरीचा कौतुकाचा गृहप्रवेश. प्रेमळ व शांत स्वभावाचे सासूसासरे आणि नवरा.  सासरचं घर किती सुंदर!!! वडिलोपार्जित असणार. टुमदार, कौलारू, खूप मोठ्ठं पण जुन्या पद्धतीचं.  दोन मजली, मागेपुढे भलं मोठ्ठं अंगण, जुन्या पद्धतीची कडी-कोयंडे असलेली लाकडी दारं,  शिसवी लाकडाचं फर्निचर, पितळी मोठी मोठी छान छान भांडी, मागेपुढे भरपूर झाडं. स्वैपाकघर  मोठ्ठं, मात्र अंधारं आणि साधं आहे. तिथं माॅड्युलर किचन नाहीये. साधा कडप्याचा ओटा, अॅल्युमिनीयमची भांड्यांची मांडणी, भिंतीवरचं ताटाळं, फळीवरचे डबे. स्वैपाकघरातच अजून एका भिंतीशी अजून एक ओटा आहे आणि त्यावर चक्क एक ढणढणती चूल आहे. वर वखारीची लाकडं रचलेली दिसतात.  चुलीवर (केरळमधे) भात शिजवतात ते भाताचं डेचकं. इतर भांडी आणि भात ढवळायचा मोठा डाव. बाकी स्वैपाक गॅसच्या शेगडीवर होतो पण भात मात्र अजूनही चुलीवरच शिजतो. मिक्सर आहे, पण वाटण मात्र पाट्यावरच होताना दिसतं. कायमचा फिक्स केलेला एक मस्त मोठ्ठा पाटा दिसतो.

मुलीच्या संसाराचा पहिला दिवस. नवरा चांगला वाटतो. सासूही प्रेमळ, शांत आणि कामसू आहे. मुलीला हळूहळू रुळूदे. लगेच कुठे कामं सांगायची? सासराही शांत आहे. घरात फारसा बोलतही नाही.

भांडी घासणं, उष्टं खरकटं काढणं, केरवारे, फरशी, अंगण झाडणं, पुसणं , भरपूर भाज्या, निवडणं, चिरणं, फोडणीस टाकणं....मोठ्या अलीशान पाट्यावर भरपूर नारळ वाटणं, चटणी, सांबार बनवणं. मांसाहारी पदार्थ बनवणं. वेळेवर डायनिंग टेबलवर सगळं अन्न मांडणं, गरमागरम सर्व्ह करणं.... विविधरंगी, विविध चवींचा, सुग्रास, तृप्त करणारा स्वैंपाक.. गृहलक्ष्मीनं, अन्नपूर्णेनं घर सांभाळावं, सजवावं, ते उबदार ठेवावं, कुटुंबाला छान खाऊ पिऊ घालून सुखात ठेवावं.  जेवताना स्वैपाकाचं आवर्जून कौतुक करणारी घरची माणसं.  पुरुषाच्या ह्दयाचा मार्ग पोटातूनच तर जातो ना....ह्या संसारला सुखी संसारच तर  म्हणतात ना?  

रोज सकाळी बिडाच्या तव्यावरचे गरमागरम डोसे, इडिअप्पम, पुट्टु आणि कडला करी, सांबार, पदार्थाला लाल मिरच्या, उडीद डाळ, भरपूर कढीपत्याची खमंग फोडणी. दुपारच्या जेवणातल्या वेगवेगळ्या भाज्या, भात... हळूहळू डोळ्यातून  ती चव आपल्या डोक्यात, मनात, आणि मग जिभेवर उतरायला लागते. चायला, आपण फूड चॅनेल बघतोय का काय असं वाटतं.

घरच्यांच्या आवडीनिवडी आणि चवीढवींचा विचार करत करत रोजचा स्वैपाक करणं, सकाळी दूध येण्यापासून सुरू झालेला दिवस, रात्रीची जेवणं झाली की ओटा टेबल आवरून, भांडी घासून मग श्रांत तनामनानं दिवा बंद करून बिछान्यावर अंग टाकणं ही त्या गृहलक्ष्मीची आनंदाची, सार्थकतेची, तृप्तीची कल्पना. लग्नानंतर सुरुवातीला  नवरा व सासरच्यांचं सगळं व्यवस्थित करणा-या ह्या घरोघरीच्या नायिका, नंतर मुलंबाळं, नातवंडं ह्यांच्यासाठी अविरत झिजतच असतात......झिजतच रहातात....मरेपर्यंत. आणि आपण म्हणतो...माझी आई/आजी फार फार प्रेमळ होती. माझ्यासाठी खूप केलं तिनं. तो तिच्यासाठीही सन्मानच असतो.

कथानायिकाही लग्नानंतर सासूच्या बरोबरीनं  सर्व जबाबदा-या उचलायचा प्रयत्न करताना दिसते.  एक आदर्श सून, बायको बनण्याचा प्रयत्न करताना दिसते.  हे सर्व करताना तिला मजा येते आहे, आत्मिक समाधान मिळतं आहे. पण ते निभवताना तिची दमछाक होतेय.

घरातला पुरुषवर्ग शांत, अबोल....पैसे मिळवून आणणं आणि बाहेरची कामं करणं हे पुरुषांचं काम. ते किचनमधे ढवळाढवळ करत नाहीत. आणि अचानक सासूला मुलीच्या बाळंतपणासाठी परदेशी जावं लागतं. आणि संपूर्ण घराची संपूर्ण जबाबदारी सुनेवर धाप्पकन् येऊन पडते.  माहेरी
फारशी स्वैपाकघरात न  वावरलेली ही मुलगी, पटापट सगळं शिकून अपेक्षांना उतरायच्या प्रतिक्षेत.

सकाळचा चहा, नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण, भांडी घासणं, केरवारे, अंगणाची झाडलोट, फरश्या पुसणे, जिने पुसणे..... न संपणारी आणि मारूतीच्या शेपटाप्रमाणं सतत वाढत जाणारी कामं आणि अपेक्षा. सास-यांना चुलीवरचाच भात, पाट्यावरची चटणी प्रिय आहे. कुकर, मिक्सरमधे ती चव येत नाहीये. ते प्रेमानं तिला सुचवू पहातात. तीही त्यांच्या मताचा आदर राखते, एक एक दिवस पुढे सरकतो तशी वेगवेगळ्या प्रसंगातून तिला येत जाणारी जाण, येणारा मानसिक आणि शारिरीक थकवा,  फ्रस्टेशन्, पुरुषांच्या प्रायोरिटीज,  एकत्र कुटुंबपद्धतीतल्या अपेक्षा, रोज येणारी वेगळी वेगळी आव्हानं. त्यावर मात करण्यासाठीची तिची ओढाताण आणि ह्या सगळ्यावर त्यावर तिनं दिलेलं उत्तर....ह्यावर बोलतो हा सिनेमा.

गरमागरम डोसे करून वाढायचे म्हणजे बरोबरीनं ती जेवू नाही शकत बाकीच्यांबरोबर. सगळ्यांचं खाणं झाल्यावर टेबलवर ताटाबाहेर काढून टाकलेल्या शेवग्याच्या शेंगांची सालं आणि इतर खरकटं  उचलताना तिला ढवळतं. जेवायला सुरुवात करताना नवरा व सास-यासाठी हिनं सुबकपणे मांडलेलं टेबल आणि आता ती आणि सासू जेवायला बसतानाचं टेबल ह्यात जमीन अस्मानाचं अंतर. सासू सरावलीये. तिला ह्याचं काहीच नाही वाटत. उलट ती नव-याच्या उष्ट्या ताटातच घेते वाढून. मुलीला मात्र हे जड जातंय. हाॅटेलमधे टेबल मॅनर्स पाळणारा नवरा घरात का पाळू शकत नाही? सतत भांडी घासण्याचा आणि उष्ट- खरकटं आवरण्याचा सीन येत रहातो. किती घरांमधे तुंबलेल्या सिंकमधे हात घालायचा प्रसंग घरच्या मुलांवर/ पुरुषांवर  येत असेल? दुस-या घरातनं आलेल्या मुलीनं मात्र हे पट्कन् आत्मसात करण्याची अपेक्षा ठेवली जाते.

घरोघरी नव-याच्या हातात डबा, रुमाल, पाकिट, मोबाईल देणा-या बायका आपण पहातोच की. त्यात कुठं काय वावगं वाटतं? नाॅर्मलच तर आहे की हे..
रांधा वाढा उष्टी काढा ह्यात तर मागच्या अनेक पिढ्या संपल्या. ह्यात काय एवढं मोठं? नाॅर्मलच आहे की हे सगळं..  "ह्याच" गृहितकांकडे हा सिनेमा परत एकदा नव्यानं बघायला लावतो. त्या गृहीतकांना मानवतेच्या निकषांवर परत एकदा तपासायला लावतो. मारहाण किंवा  शिवीगाळ म्हणजेच काही घरगुती हिंसाचार नाही फक्त. खूप व्यापक आहे ती कल्पना. पिढ्या न् पिढ्यांपासून होत असलेले काही अन्याय आता परंपरेच्या नावानं इतके मान्यताप्राप्त झाले आहेत की  मानवतेनच्या  दृष्टीकोनातूनही ते दूर करू शकत नाहीये आपण. म्हणून ही अस्वस्थता येते. ही अस्वस्थता कधी जाईल, कशी जाईल ते माहीत नाही पण  सिनेमाचा प्रेक्षक आपल्या ताटातलं उष्टं दुस-या कुणाला तरी साफ करायला टाकताना  दहा वेळा तरी विचार करून टाकेल  हे सुद्धा ह्या सिनेमाचं यशच म्हणावं लागेल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

'रिप्लेसमेंट' बाई आणली ह्याबद्दल कितीही संताप आला तरी असं घडतं हे सत्य आहे. म्हणूनच जास्त आवडलं. सिनेमात ड्रोन शॉट्स दाखवतात म्हणून अंगावर येतं. खर्‍या आयुष्यात कुणी अशा "बारीक-सारीक" कारणावरून सोडून गेली तर "मारतो की दारू पितो? गुणी आहे तो", "आम्ही नाही का काढलं/काढतं उष्ट" (उष्टंच्या जागी क्ष य काहीही भरा) अशा टेपा सुरू होतात. "दुसरी ही बाजू असते" ही अजून एक टेप... आणि क्लीन चिट मिळालेल्या त्या मुलाला पटकन दुसरी मुलगी मिळूनही जाते. Only the wearer knows where the shoe pinches. म्हणून ती सुटली ह्यात सर्व भरून पावलं. मग बाकी काही का होईना... दुसरीला असलं पटत असेल तर नांदावे तिने.
(अर्थात कालांतराने नायिकेला कुणी चांगला समजदार 'रिप्लेसमेंट' नाही तर 'डिझर्व्हिंग कँडीडेट' मिळावा आणि चांगले सहजीवन लाभावे पण सिनेमा आधीच संपतो. Happy )

शेवटचा नाच बघतानाचा आणि एकूणच तिच्या वावरण्यातला आत्मविश्वास छान वाटतो बघायला.

झुम मीटिंग करायला हवी होती >> Happy

ब्लॅक टी मध्ये इतके मसाले की तांदूळ घातला तर बिर्याणी देखील होई ल हा देखील उच्च कोटीचा विनोद आहे.
>> होय Lol पण मी हा (किंवा अशा प्रकारचा दुसरा) विनोद ऐकला होता आधी. अर्थात तरीही खूप हसायला आलं.

नाच गरजेचा होता.जितक्या तपशीलात आधीच्या अदृष्य बेड्या दाखवल्या तितक्या उत्कटतेने मोकळा श्वास दाखवणेही गरजेचे होते.
(मला एक।गोष्ट सौम्यपणे खटकली.नाचात सर्व बायका टू मच गोऱ्या दाखवल्या आहेत.कथा नायिकेच्या वर्णाच्या तजेलदार तरतरीत दाखवायला हव्या होत्या का?तो नाच मला साऊथ न वाटता मणिपुरी किंवा तत्सम पूर्व भारतीय वाटतो आहे.अर्थात ही खूपच बारीक खोड.पिक्चर सुंदरच आहे.प्रत्येक पुरुषाने शांत बसून पूर्ण बघावा.)

तो नाच मला वाट् ते आपल्या हिरॉइन ने सर्व शैलींचे मिक्स करून बनवला आहे. मुलींच्या कमरेचे आहे ते ओडिसी सारखे आहे. परत एकदा बघून व्य वस्थित लिहीते. ती जर केंद्रीय विद्यालय मध्ये शिकवत असेल तर गोर्‍या इतर प्रांतातल्या मुली असणे शक्य आहे. किंवा ट्रूप असू शकतो. आमच्या शाळेत पण खरे सुंदर व गोर्‍या मुलींनाच अश्या प्रे स्टिजिअस फोक डान्स प्रॉजेक्ट मध्ये घेत. तो एक बायस असेल. काल पाहिले तेव्हा
ती बाहेर पडते ह्याचाच आनंद इतका होता व तो नाच फास्ट म फास्ट संपून पण गेला.

आपण कसे इथे बसून आप्पम स्ट्यू, पुट्टु कडला करी नाविन्य म्हणून खातो तसे त्यांना चिकन करी रोटी वाटत असेल असे नवृयाच्या बोलण्यातून वाट्ते.

प्रत्येक पुरुषानेच का? अनेक स्त्रियांनाही बघायची गर्ज आहे की.

हा सिनेमा पाहिल्यावर आता ती कोथिंबीर वड्यांची गोष्ट वाचा. बघा खटकते का. की ती सुद्धा अशी ड्रोन शॉट्स झूम करून दाखवली तरच कळेल?

ह्या कथे ला पुढे अनेक फाटे आहेत. तुमचे खरकटे दुसृयाने का उचलावे, स्त्री म्हणजे घाणीचे आगर. त्या शिवाय अपर कास्ट लोकांची घाण हाताने उचलावी लागणारे मॅन्युअल स्केव्हेंजरस व ते काम ते करतात म्हणून ते घाणे रडे व खालच्या जातीचे, अस्पृश्य त्यांच्या अंगाला वास येतो. त्यांच्या स्त्रिया तर अजूनच खालच्या पातळीवर पण लैंगी क भूक भागवायला चालतील अश्या. सोवळे ओवळे काय कडक ह्याचेच कौतूक असणारा समाज. त्यात सामाजिक अन्याय झुंडीने करणारा... मग लोअर कास्ट हिंदू सुताराशी संबंध ठेव णा री डिवोर्सी अपर क्लास सिरीअन क्रिस्चन अमू आठवते .... त्याला कम्युनिस्ट ठरवून पोलीसात देउन मारूनच टाकतात.

गॉड्स ओन कंट्री!!

रिप्लेसमेंट मिळते यामध्ये डिमांड सप्लाय याला किती महत्व?

म्हणजे on one hand, 'मुलाचं लग्न करायचंय, चांगली मुलगी मिळायला हवी' असं बोलणारे लोक दिसतात. आणि दुसरीकडे या प्राण्याला लगेच दुसरी बायको मिळते.

भरत, आता वाचल्यावर असे जाणवते की माझे वाक्य विपर्यस्त स्वरुपात मांडले गेले. (या धाग्यावर गेले ४-५ तास फक्त बायकाच पिच्कर बद्दल लिहीत आहेत, म्हणून वाटले की पिक्चर पाहणारे पुरुष कमी असावेत. म्हणून 'पुरुषांनी पाहिला पाहिजे' असं लिहीलं गेलं)
कोथींबीर वड्या गोष्ट नीट आठवत नाही पण त्यावर बरेच प्रतिसाद आणि काहीतरी वाद होता इतकेच आठवते. वाचते मागे जाऊन.

नाही. मी चित्रपट क्वचित आणि तेही टीव्हीवर पाहतो.
नेटवरच्या मालिकाही पाहत नाही.
याबाबत जगाच्या मागे आहे.

ती शेवटला ते ड्रेनेज च पाणी चहा म्हणून देते तो सिन भयंकर आवडला... असच पहिजे त्या बाप लेकाना असं वाटलं.....

मला सर्वात जास्त तो टेबलवर शेवग्याच्या शेंगांचे उष्टे कचरा करण्याचा मुद्दा प्रचंड खटकला.
(आमच्याकडे खाण्यातील कढीपत्ता पाने अशी टेबलवर काढून ठेवण्याची पद्धत होती. मी खटकतंय सांगितल्यावर हळूहळू ही पद्धत बदलली गेली.त्यांनी खाऊन उरलेला शेवग्याचा अवशेष वगैरे गोष्टी पानाबाहेर हे कधीच केले नाही आणि करणार नाहीत. प्रत्येक घराचा 'संस्कार' व्याख्येचा लिनक्स किंवा युनिक्स सारखा एक वेगळा फ्लेवर असतो.त्यातले काही बग्स प्रयत्न पूर्वक काढून टाकावे लागतात. माझ्यातलेही बग्स निघतात, फिक्स होतात.)

असेही हे केरळी, तेलगू, तामिळ लोक खाण्याच्या बाबतीत अजागळ असतात. त्यांच्यासोबत जेवायला बसणे म्हणजे शिक्षाच.

I should feels something towards you, for foreplay.. या वाक्यावर भयाण राग आलेला आहे. इतर सर्व मुद्दे इतरांनी केलेत कव्हर.. पण सततचे manners वरून टोमणे आणि आता हे म्हणजे त्या मुलीने याच पॉईंटवर तिच्या नवऱ्याचा जीव घ्यायला हवा.

हो अजिंक्य.
अत्यंत वाईट वाक्य आहे ते. 'सासरची सगळी माणसं चांगली आहेत, फक्त जुन्या वळणाची आहेत' या अनेक रिव्ह्यू मध्ये वाचलेल्या वाक्याला या एका वाक्याने छेद बसतो आहे.
हा माणूसही अत्यंत टिपीकल मनोवृत्तीचा आहे.

शारिरीक संबंधांदरम्यान होणाऱ्या वेदनेची बायकोने तक्रार करणं, त्यावर उपाय म्हणून (कदाचित गुगल करून) फोरप्ले करायला सुचवणं हे जुन्या वळणाच्या पुरुषाला चालण्यासारखं नसणार. फोरप्ले हा शब्द तिला माहिती आहे हे कळल्यावर त्याची प्रतिक्रिया ' so you know everything about it' अशी येते. बायकोला हे माहिती असणं त्याला आवडत नाही. त्यातून तो रागाने तसं बोलतो किंवा किंमत न देण्याचा तो एक प्रकार असेल. 'तुला दुखत असेल तरी I don't care. मला हवं तसंच मी करणार ' टाईप. हाही एक त्याचा हक्क आणि तिचं कर्तव्यच.

ओळखीतल्या अनेकांना हा चित्रपट सुचवावासा वाटतोय!

उष्ट्याने जास्त फुटेज खाल्लं असलं, तरी अनेक मुद्द्यांना हात घालणारा हा चित्रपट आहे. उदा: MC ला वाईट, अमंगल समजणे. ज्या प्रोसेसमुळे तुम्ही जन्मला त्यालाच वाईट समजणं म्हणजे हिपोक्रसीची hight झाली. मॅरिटल रेप, हुंडा, बाईला नोकर समजणे, धार्मिक च्युतियागिरी सगळंच एकंदर भयाण आहे.

तो नवरा म्हणतो ना नव्या बायकोला, पहिले लग्न म्हणजे रिहर्सल होती. आता त्या चुका सुधारणार. म्हण जे बायको ला टाचे खालीच ठेवणार.

नीये भूविम गाणे युट्युब वर फारच लोकप्रिय आहे. एकेक मुलीं नी व टीम्स नी उत्तम नाच केलेले आहेत. जरू र बघा. नाच हा एक प्रकारे स्वतंत्र प्रकार आहे. आयटेम नंबर नव्हे पन कन्सेप्ट लेव्हल डान्स आहे. ड्रेस पण वेगळेच आहे. कपाळाची पट्टी भरतनाट्यम मधल्या सारखी आहे.
काही मुद्रा कथकच्या आहेत.

आणि पहिली बायको पंजाबी ड्रेस रोज घालायची, दुसरी साडीत दाखवली आहे. ही अजूनच गंमत आहे. सुधारलेल्या चुकांमध्ये 'साडीची सक्ती' पण अंतर्भूत झाले की काय?

ती पीरियड मध्ये असते तेव्हा तो ओफीस ला जाताना स्कूटर वरुन पडतो तेव्हा ती अय्यो अय्यो करत त्याला उठवते तर नालायक तीला कसे ढकलुन देतो... मी असते तर उलटी कनफड़ात दिली असती आणि पार तिथल्या च चिखलात लोळवला असता

Pages