दु:खी सुखदा

Submitted by निशिकांत on 4 April, 2021 - 07:40

दु:खी सुखदा---( वीक एंड लिखाण. )

कांही दिवसापूर्वी मी आणि माझी पत्नी एका हॉटेलमधे लंचसाठी गेलो होतो. जेवण घेत असताना आमच्या समोरच्या टेबलवर एक महिला पण जेवण घेत होती. माझे सारखे तिच्याकडे लक्ष जात होते. तिला कुठेतरी पाहिले आहे असे जाणवत आहे. खूप ताण दिला मेंदूला पण लक्षात येत नव्हते. जेवण संपल्यानंतर मी हात धुण्यासाठी बेसीनकडे निघालो. जाण्यासाठी रस्ता त्या महिलेच्या टेबलजवळूनच होता. जाता जाता तिचा घास घेत असलेला उजवा हात मला दिसला आणि डोक्यात लख्ख प्रकाश पडला. ती माझी वर्ग मैत्रीण सुखदा होती. आणि मी एकदम चाळीस वर्षे मागे गेलो आणि एक एक गोष्टी आठवायला लागल्या. मी दहावीच्या वर्गात असताना ती माझ्याच वर्गात शिकत होती.  वर्गात चाळीसच्या आसपास विद्यार्थी होते त्यात तब्बल पंधरा मुली होत्या.
शाळेत त्यावेळी वातावरण एकदम सोज्वळ होते. शिस्तबध्द. गप्पा, विनोद, थट्टा मस्करी या गोष्टींना वाव नव्हता. सुखदा लक्षात राहण्याचे आणखी एक कारण म्हणजे वर्गातील अजून एक विद्यार्थीनी प्रतिभा आणि तिची खूप खूप घट्ट मैत्री. त्या नेहमी सोबत असत. मी या दोघीपैकी एकीला एकटे कधीही शाळेत पाहिले नाही. त्यांची मैत्री सर्वांच्या चर्चेचा विषय होता. जसे न्यूयॉर्क वॉशिंग्टन ही नावे जगात जोडीने घेतली जातात तशी शाळेत सुखदा-प्रतिभा ही नावे जोडीने घेतली जायची. आम्ही सारे पाचवीत असतानाची घटना आहे. शाळेच्या स्नेहसंमेलनाच्या वेळी सर्व मुले दंगा करत होती. शिक्षक जवळपास नव्हते. एका वर्गाचे दार कांही मुले मुली आतून बाहेर ढकलत होते तर कांही बाहेरून आत ढकलत होते. या धावपळीत सुखदाचा उजवा हात खूप जोरात चेंगरला. वातावरण खूप गंभीर झाले. नंतर डॉक्टरकडे नेले आणि मलमपट्टी करण्यात आली. जखम ठीक तर झाली; पण तिच्या उजव्या हाताच्या तर्जनीचे नख निघाले होते. नंतर ते आलेच नाही. हा उजवा हात बघूनच मी तिला ओळखू शकलो. मी ही गोष्ट माझ्या पत्नीला सांगितली आणि आम्ही तिच्याशी बोलायचे ठरवले. आम्ही दोघे कॉरिडॉर मधे बसलो होतो. जसे ती जेवण करून आपल्या मुलीसोबत आली, मी पुढे होऊन विचारले "तू सुखदा ना?"तिला आश्चर्यच वाटले हे तिच्या चेहर्‍यावरील प्रश्नार्थक चिन्हावरून कळले. मी तिला नाव सांगून वर्गमित्र असल्याचे सांगताच तिला ओळख पटली. थोड्या गप्पा झाल्या. तिला आमच्या घरी यायचे आमंत्रण देऊन आमची भेट संपली. मोबाईल नंबर्सची देवाण घेवाण झाली.
यथावकाश ती एकटीच घरी आली; मुलीला आणले नाही तिने. आणि गप्पा सुरू झाल्या. पहिला प्रश्न सहाजीकच कशी आहेस आणि कसे काय चालले आहे हाच होता. ती थोडी गंभीर झाली आणि आपली कहाणी  उलगडू लागली.                          
तिने सांगितले की तिचे लग्न होवून ती छान सेटल झाली होती. तिचे लग्न झाल्यानंतर सात आठ महिन्यांनी प्रतिभाचे लग्न झाले होते. तिचे स्थळही छानच होते. दोघीही मैत्रिणी एकाच शहरात होत्या. सुखदा एका कंपनीत चांगल्या पगारावर कामाला होती. प्रतिभाने नोकरी वगैरे धरली नव्हती. मी मधेच मिष्किलपणे म्हणालो, अगं मी तुझं विचारतोय आणि तू मधे प्रतिभा प्रतिभा काय करतेस? या वर ती म्हणाली की शाळेत आम्ही खास मैत्रिणी होतो ना! आता माझ्याबद्दल सांगताना तिच्याबद्दल बोलणे अपरिहार्य आहे असे म्हणून तिने आवंढा गिळला. माझ्या मनात लगेच पाल चुकचुकली.
ती म्हणत होती की आमचे दोघींचेही प्रपंच सुरुळीत चालले होते. मला कांही दिवसांनी एक मुलगी पण झाली.चार पाच वर्षे झाली असतील लग्नाला. प्रतिभा आणि तिचे यजमान फिरायला म्हणून गेले आणि झालेल्या अपघातात तिचे मिस्टर दगावले. किती अनपेक्षित दु:खाचा डोंगर नाही का! प्रतिभाला फार एकटे एकटे वाटू नये म्हणून मी माझ्या मिस्टरांना सांगून तिच्याकडे एक महिना रहायला गेले. मी परत यायला निघाले तेंव्हा प्रतिभाने अक्षरशः हंबरडा फोडला. माझे काळीज पण पिळवटून निघाले. मी तिला थोडे दिवस माझ्याकडे रहायला बोलावले. ती आली पण. गप्पा गोष्टीतून दु:खाला गिलावा करणे चालू होते. मी, पती आणि मुलगी रोज शाळेला, कामाला निघून जायचो आणि प्रतिभा एकटी घरी असायची. कांही दिवसांनी मला ऑफिसमधे शाळेचा फोन आला की तुमच्या मुलीची तबियत बिघडली आहे. तिला घेऊन जा. माझ्या काळजात धस्स झालं. लागलीच गाडी काढली आणि शाळेत गेले. मुलीला घेऊन येतायेताच डॉक्टरांची अपॉइंट्मेंट घेतली. संध्याकाळी आठ वाजता डॉक्टरकडे जायचे होते. घरी येवून फ्लॅट्चे दार उघडले आणि माझ्या जीवनाचं दुर्दैवच माझ्या डोळ्यासमोर उभे होते. माझे पती आणि प्रतिभा! श्शी! मी सांगू पण शकत नाही. मी त्याच दिवशी मुलीला घेऊन घर सोडले. वीस एक वर्षे झाली आम्ही दोघी एकट्याच रहातोय. रहातोय म्हणजे काय? दिवस ढकलतोय. नाव सुखदा पण तिच्या वाट्याला दु:खच आले.
मी आणि माझी पत्नी सुन्न झालो. माझे कविमन तर विव्हळू लागले. मला एकूणच घृणा आली या प्रसंगाची. माणसे अशी का वागतात हा यक्षप्रश्न मला भेडसाऊ लागला.
या करूण आणि घृणास्पद कहाणीचा विचार करत करत एका रचनेने आकार घेतला जी मी खाली देत आहे. या रचनेतील शेवटचे कडवे या कथानकाच्या मध्यवर्ती कल्पनेशी विसंगत आहे. याला कारणही तसेच आहे. मनात दुसरा असाही विचार आला की जेथे पुरुषाचा पाय घसरतो तेथे एका स्त्रीचाही पाय घसरलेला असतो. यासाठी शेवटचे कडवे.

आवडते का बदाम राणी?

फ्यूजन होता परक्या स्त्रीशी
भावतात का ओंगळ गाणी?
स्त्रीलंपट चौकट राजाला
आवडते का बदाम राणी?

संकटातही देत साथ ती
प्रपंचामधे राबराबते
प्रेम एवढे ! वटपूजेला
सातजन्म ती साथ मागते
घरकी मुर्गी दाल बराबर
म्हणून का तिजशी बेमानी
स्त्रीलंपट चौकट राजाला
आवडते का बदाम राणी?

नका विचारू कोणाच्या तो
वळणावरती चालत आहे?
शोध सावजांचा घेण्याची
जुनी पुरानी आदत आहे
फुले हुंगणे, वडिलोपार्जित
जपलेली रीत खानदानी
स्त्रीलंपट चौकट राजाला
आवडते का बदाम राणी?

मुलगी किंवा नात वयाने
मनी नांदतो चंचल पारा
विकृतीच ही ! कुठे मिळावा?
सावजास या जगी सहारा
धोका टाळुन जगावयाची
ससेहोलपट केविलवाणी
स्त्रीलंपट चौकट राजाला
आवडते का बदाम राणी?

आरक्षित हे क्षेत्र नसावे
पुरषांसाठी असे वाटते
स्त्रीही आता मागे नाही
चित्र भयावह उरी दाटते
मादक राणी, गुलाम दिसता
शिंपित असते गुलाबपाणी
स्त्रीलंपट चौकट राजाला
आवडते का बदाम राणी?

निशिकांत देशपांडे, पुणे.
मो.क्र. ९८९०७ ९९०२३

   

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमच्या कविता छानच असतात नेहमी. पण ही कविता, का कुणास ठाऊक, तितकी भावली नाही. त्यामागची घटना मात्र फार भयानक आहे आणि तुमची भावनाही समजू शकतो.