अदा बेगम - भाग ४

Submitted by बिपिनसांगळे on 30 March, 2021 - 12:32

अदा बेगम - भाग ४
------------------------
महाराष्ट्रात बऱ्याच घडामोडी घडल्या होत्या. राजांच्या कारवाया चालूच होत्या . शांतता कशी ती नव्हती . शेवटी स्वराज्याचा यज्ञ जो मांडला होता.
शाहिस्तेखानाचा पराभव, जसवंतसिंहाचा पराभव, सुरत आणि अहमदनगरची लूट यामुळे औरंजेबाचा भडका उडाला होता. शिवाजीचा बंदोबस्त केला नाही तर दख्खन ताब्यातून जाईल हे जाणण्याइतका तो धूर्त होता.
महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी त्याने दरबारातला मोठा अनुभवी सरदार निवडला - मिर्झाराजे जयसिंग !
पातशहाने त्यांना भरपूर द्रव्य देऊन पाठवलं. मोठी फौज दिली आणि सोबतीला दिला दिलेरखान. तोही मातब्बर सरदार होता. युद्धनिपुण. लढाऊ बाण्याचा. अनेक लढायांचा अनुभव त्याच्या पाठीशी होता.
त्यांचीच एक तुकडी, अरिफखानाची , गोसाव्यांच्या जथ्याला आडवी गेली होती.
*******
महाराज राजगडावर होते. त्यावेळी नजरबाजांनी ही खबर आणली. सारे चिंतेत पडले. राजकारण करण्यात मिर्झाराजांची उमर सरली होती . पोक्त पण मोठा उमदा माणूस होता .
नजरबाज सांगू लागला. ती पूर्ण खबर अशी होती-
धूर्त दिलेरखान त्याच्या पाच हजार पठाणी स्वारांनिशी मिर्झाराजांना सामील झाला होता.त्याचं म्हणणं होतं कि राजांचे गड आधी ताब्यात घ्यायचे. तर मिर्झाराजांना ती मसलत काही पसंद नव्हती. त्यांना वाटत होतं कि चाकणचा किल्ला घेताना शाहिस्तेखानानं हात पोळून घेतले आहेत. पराभव तर झालाच ; पण फौज कामी आली.खर्च खूप झाला.पुन्हा तशी चूक नको.
तर दिलेरखानाचं म्हणणं होतं. गडच अगोदर ताब्यात घ्यायचे. त्यासाठी त्याने खास तोफखाना मागवला होता… सूरतहून. पोर्तुगिजांचा नवा , मारा कारीगर करणारा जहाल तोफखाना. आग ओतणारा लाव्हाच जणू !
शिवाजी महाराजांनी ठरवलं की तो नवा तोफखाना मोगलांच्या हातात पडू द्यायचा नाही. त्यांचा आधीचाच तोफखाना आग ओकत होता. त्यात हा आगीतून फुफाटा नको होता.जर जमलं असतं , तर पळवूनच आणला असता ; पण त्याच्या वजनामुळे तो आणणं वेळखाऊ होतं , अवघड होतं .
राजांनी ठरवलं - तोफखाना पुण्याला पोचायच्या आधीच तो गारद करायचा.
त्याची जबाबदारी सोपवण्यात आली हिरोजीवर .
आणि तो विडा त्याने मोठ्या आनंदाने आणि अभिमानाने उचलला !

*******

सुरतच्या पोर्तुगीजांनी त्यांच्या पुढच्या फायद्यासाठी मोगलांशी मसलत बांधली होती. म्हणून त्यांनी तोफखानाही पुरवायचा ठरवलं होतं. तोफा नवीन बांधणीच्या होत्या. मजबूत पण वजनाला कमी. त्याचा दारूगोळाही वेगळा होता.
पोर्तुगीजांनी नवा तोफखाना द्यायचं ठरवलं होतं, ते मोठ्या खुशीने ! कारण त्यांना राजांचा काटा परस्पर निघाला तर हवंच होतं . महाराजांचं आरमार त्यांना खुपत होतं . त्यांनी राजांची पुढची पावलं ओळखली होती. महाराज उसळत्या दर्याला कवेत घ्यायला निघाले होते . जे त्यांना भविष्यात जड जाणार होतं … त्यात राजांनी मालवणचा किल्ला बांधायला काढलेला होता - किल्ले सिंधुदुर्ग !
सुरतमधून तो नवा तोफखाना गलबतांवर चढवण्यात आला. तो अलिबागच्या आसपास उतरवून , तिथून तो पुण्याला आणि पुढे पुरंदरला पाठवण्यात येणार होता. पुरंदर किल्ल्याला दिलेरखानाचा वेढा होता .
पुरंदर किल्ला मोठा. किल्लेदार मुरारबाजी देशपांडे मोठ्या शर्थीने दिलेर खानाला झुंजवत होते.
इकडे , हिरोजी - माणकोजीची तुकडी निघाली. जय्यत तयारीने . बरोबर फक्त पाचशे निवडक स्वार होते. तर तोफखाना घेऊन येणाऱ्या बरकतखानकडे दोन हजारांचं माणूसबळ होतं.
बरकतखान - काळाकभिन्न ,धिप्पाड , बलदंड गडी ! रंगाला न शोभणारे रंगीबेरंगी कपडे व चोळणा घालणारा .
मांडव्याला तोफखाना उतरला आणि अलिबागहून मार्गस्थ झाला. थोडा पुढे जाताच , रात्र झाली आणि छावणी पडली. प्रवासाने थकलेली फौज खाऊन - पिऊन सुस्त झाली.
आणि रात्रीच्या अंधारात मराठ्यांची टोळधाड अवतरली. गाफील आणि सुस्त गनिमाचा खुर्दा उडू लागला. 'गनीम - मारो काटो'च्या आरोळ्या घुमू लागल्या .
पलित्यांच्या प्रकाशात हिरोजी- माणकोजी, दोघांची तलवार चमकत होती , तळपत होती . त्यांच्या तलवारीच्या पट्ट्यात कोणी टिकत नव्हतं . एकाच पळापळ. आरोळ्या ! किंकाळ्या ! हिरोजी बरकत खानाला शोधत होता.
पण नशीब जोरावर नव्हतं.एके ठिकाणी हिरोजीचा घोडा अडखळला व धडपडला. हिरोजी खाली पडला व फरफटत जाऊ लागला. न लढताच , तो जखमा झेलत ,खेचला जाऊ लागला. एके ठिकाणी त्याच डोकं आपटून त्याला खोक पडली . त्याचवेळी त्याचा अडलेला पाय सुटला . माणकोजीने ते पाहिलं. त्यानं घोडा थांबवला .
पण बरकतखानाच्या सैन्याने जोरदार हल्ला चढवला. त्यांना कळालं होतं - मरगठ्ठयांचा सरदार पडलाय म्हणून.
एकच धुमश्चक्री उडाली. हातघाईची लढाई उसळली. गतप्राण होऊन माणसं खाली पडू लागली. माणकोजी बेभानपणे तलवार चालवत होता . तो लढत लढत हिरोजी पासून लांब गेला.
मराठी फौजेला मोठा तडाखाच बसला .
माणकोजीला दुर्दैवाची जाणीव झाली. उरलेलं सैन्य घेऊन तो पळाला. शेवटी फौज वाचवणंही महत्त्वाचं होतं. घोडा जसा उडत होता तसं त्याचं काळीजही उडत होतं - हिरोजीसाठी. हिरोजीला सोडून त्याला पळावं लागलं होतं . तो धारातीर्थी पडलाय की जिवंत आहे, हे कळायला मार्ग नव्हता.
फौज पळाली तसा हिरोजीचा नाईलाज झाला .जखमी हिरोजी सावरला. त्याचा घोडा इमानी होता. तो त्याच्या आसपास घुटमळत होता. अंगावर आलेल्या एखाद दुसऱ्या शत्रूला कापत , तंबूच्या आडोशाने हिरोजी घोड्यावर बसला व त्याने घोडा सोडला. घोड्याला धन्यावरचं संकट उमगलं . तो चौखूर उधळला. लवकरच तो छावणीपासून लांब आला.
हिरोजीची शुद्ध हरपत चालली होती. त्याने घोड्याला इशारा केला व तो घोड्यावरच कोसळला. त्या इमानी , मुक्या प्राण्याला इशारा कळला होता.तो टपटप चालू लागला . किती वेळ ? कोणास ठाऊक ! गार वारा सुटलेला. सोबतीला अंधार अन खाच खळग्यांची वाट .
****

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

वाचतेय. कथा छान चालू आहे

मस्त रसाळ शब्दांत लिहीत आहात. सुरेखच.

शेवटी स्वराज्याचा यज्ञ जो मांडला होता. >> हे हिंदी वाक्यरचनेचं भाषांतर आहे. त्यामुळे खटकते.

मामी
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल खुप आभार .

तुम्ही वाक्यरचनेची चूक दाखवली ते बरं वाटलं . ती चूकच आहे . याचा अर्थ तुम्ही ते इतक्या बारकाईने वाचत आहात .

मागे ओझं या माझ्या कथेवर थोडा वाद झाला होता , तेव्हाही तुम्ही नेमकी संयमित प्रतिक्रिया नोंदवली होती . लेखकाला अशाच तर प्रतिक्रया अपेक्षित असतात . (फार कंमेंट करत नाही . दुसऱ्या एका धाग्यावर काही चर्चा चालू आहे - त्याचा संदर्भ ) .