चुकामूक ( कथा)

Submitted by pintee on 26 March, 2021 - 13:10

चुकामूक

' अरे.. या..या...अलभ्य लाभ. रजनी अग, कोण आलंय पाहिलंस का?' राघवच्या या हाकेने मी हातातले काम ठेवूनच बाहेर आले. आम्हाला दोघांनाही माणसांची खूप आवड. सतत आला - गेला असला की आम्ही मनापासून खुश असतो. त्यातून या करोनाच्या काळात एकमेकांना भेटणं बंदच झालं होते. त्यामुळे कोणीतरी आल्याचा मनापासून आनंद झाला होता.
बाहेर येऊन बघते तो काय दारात निखिल आणि पल्लवी उभे होते. पंधराच दिवसापूर्वी लग्न झालेले. पल्लवीच्या अंगावर लग्नाची नव्हाळी अगदी दिसून येत होती. निखिल देखील सुखावल्या सारखा दिसत होता.
आल्या - आल्या मला जवळ घेऊन म्हणाला " ही बघ, ही माझी रजनी मामी. मी नेहमी जिच्याबद्दल तुला सांगत असतो ना तीच ही. नुकतेच दोघेजण कॅनडाहून . माझ्या भावाकडून, निरंजनच्या घरून आलेत. म्हणूनच आपल्या लग्नाला पण नव्हते. आणि हा माझा मामा राघव...."
पल्लवी देखील कौतुकाने हसून म्हणाली "खरंच मामी, निखिलने इतकं सांगितलंय ना तुमच्या दोघां विषयी … तुमचं घर म्हणजे त्याला आपलंच घर वाटतं. तुम्ही करता ते सतार वादनाचे कार्यक्रम, समाजसेवेची आवड, तुमचे सुगरणपण, नीटनेटकेपणा या सगळ्याचे त्याला खूप कौतुक आहे."
" हो..हो..जरा दम तर खा " मी त्या दोघांकडे कौतुकाने बघत त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला. निखिल आणि निरंजन दोघे तसे बरोबरच वाढले. शिक्षणासाठी म्हणून निरंजन परदेशी गेल्यावर निखीलच आमचा मानसपुत्र झाला.पल्लवीशी मात्र माझा जुजबी परिचय होता.तिचे माहेर नागपूरचे पण दोघांची ओळख झाली. झाली म्हणेपर्यंत दोघांचे शुभमंगल देखील झाले.अगदी 'झट मंगनी पट ब्याह.' त्यांना भेटायला आम्ही त्यांच्या घरी जाणारच होतो पण निखिलला तेवढा दम कुठला निघायला.आम्ही आलो हे समजल्यावर लगेच तो आम्हाला भेटायला आला होता.
निखिलच्या आवडीच्या नारळाच्या करंज्या आणि साबुदाण्याची खिचडी घेऊन मी बाहेर आले तेव्हा राघव नुकत्याच बघितलेल्या जपानी अवॉर्ड विनिंग सिनेमा विषयी त्या दोघांशी बोलत होता. पल्लवीला वेगवेगळ्या भाषेतील सिनेमा बघण्याची आवड होती. त्या दोघांची चर्चा निखिल कौतुकाने ऐकत होता.मला बघून त्याने पाण्याचे ग्लास आतून आणले आणि कॉफी डी कोकशनला पण लावली.
" मामा - मामी, आम्ही मुद्दामच आज वेळ काढून आलोत. लग्न झाल्यावर सगळ्यांना भेटायला आम्ही जाणारच आहोत पण सगळ्यात पहिल्यांदा आम्ही तुमच्याकडे आलो कारण मला तुम्हाला दोघांनाही एक प्रश्न विचारायचा होता. गेली अनेक वर्ष मी तुम्हाला दोघांना बघतो आहे.तुमचा संसार बघतो आहे तर तुमच्या यशस्वी संसाराचे रहस्य काय? आम्हाला काहीतरी टिप्स द्या ना."
निखिलच्या या प्रश्नाने मी अंतर्मुख झाले आणि राघव कडे बघू लागले. तो पण माझ्याकडेच बघत होता 'काय बोलायचं आता' , असा भाव त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. ' तुमचा प्रेमविवाह आहे का ? ' या प्रश्नाला आम्ही सरावलो होतो. लग्नानंतर इतक्या वर्षांनी देखील आमच्यावर लव बर्डस, मेड फॉर ईच अदर अशी कौतुकाने; काहीवेळा असूयेने टीका होत होती पण म्हणून आदर्श आणि यशस्वी संसार?
" अरे वेड्या, भूत, पऱ्या आणि आदर्श संसार या सगळ्या कविकल्पना असतात " राघवने विनोदाच्या अंगाने प्रश्न टाळण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी देखील झाला.
राघव
निखिलच्या प्रश्नावर मी विचार करत होतो. त्यापुढच्या गप्पात माझे लक्षच नव्हते. रजनी माझी बायको. गेली अनेक वर्षे आम्ही बरोबर आहोत. तिला मी अंतर्बाह्य ओळखतो असे मला वाटते पण हे खरं आहे का?
माझ्या भल्या बुऱ्या दिवसात तिने मला साथ केली. माझ्या माणसांना तिने जीव लावला. अगदी माझ्यापेक्षाही आधी आज सगळे तिचाच विचार करतात. माझ्यापेक्षा तिला आधिक मानतात.याची जाणीव मला आहे. तिच्या कलागुणांचा रास्त अभिमान देखील आहे. तिने आमच्या दोन्ही मुलांना चांगले संस्कार दिले. मी तिला फक्त पैसा पुरवला पण तिने केलेल्या नियोजनामुळे आम्हाला नंतरच्या काळात आर्थिक अडचणी कधीच आल्या नाहीत. खरंच एक गृहिणी म्हणून आपली सगळी कर्तव्य तिने पूर्ण केली.
तरीही आमचे सहजीवन परिपूर्ण आहे असे मी म्हणणार नाही. मला एका सुखाला अज्ञानातून म्हणा किंवा अजाणतेपणे म्हणा पण तिने वंचित ठेवले. लैंगिक सुख हा सहजीवनाचा पाया पण त्यात ती कमी पडली. अनेकदा सुचवून, कधी रागवून, एखाद्या वेळेस स्पष्ट बोलून देखील तिने कधी त्याकडे लक्षच दिले नाही.
पण हे तरी खरे आहे का? आज अनेक वर्षे झाल्यावर या सगळ्याचा विचार एका वेगळ्या दृष्टीने करावासा वाटतो आहे.
आमचे लग्न झाले त्यावेळी आमची परिस्थिती अगदी बेतास बेत होती. केवळ ३ खोल्यांचा फ्लॅट त्यात कॉलेजला जाणारा भाऊ,बाळंतपणासाठी आलेली बहीण. आणि आई बाबा. या सगळ्यात निवांतपणा मिळायचा नाही. तिची या गर्दीत कुचंबणा होत असे. दिवसभर सगळ्यांबरोबर हसून खेळून वागणाऱ्या रजनीची रात्री घुसमट होत असे. तिचे माहेर गडगंज. तिला स्वतः ला वेगळी खोली होती. ती तिने मनापासून सजवली होती.पण आमच्याकडे तिला सुरुवातीला खूप तडजोड करावी लागली.अनेकदा आपल्या इच्छा तिला दाबून ठेवाव्या लागल्याच असणार मला त्यावेळी या गोष्टीची जाणीवच नव्हती.
वर्षभरात झाला निरंजन आणि चार वर्षात जान्हवी .मग तर ती खूप बदलून गेली. तिच्यातील प्रेयसी कुठेतरी हरवली. राहिली ती फक्त आई. त्यावेळी मी नोकरी करून स्वतः चा व्यवसाय करत होतो. अनेकदा मला तिची आवश्यकता वाटायची, सगळे ताण तिच्या मिठीत संपतील असे वाटायचे. खूप आसुसून तिची वाट बघायचो. पण ती यायची खूप उशिरा आल्यावर इतकी दमलेली असायची की मी जवळ घेताच झोपून जायची.कधी बाहेर फिरायला जायचं का विचारलं तर मुलांच्या परीक्षेचे नाहीतर आई बाबांच्या तब्येतीचे कारण सांगायची.खूप घुसमट व्हायची माझी त्यावेळी. तिला काही समजावून सांगावं तर माझा अहंकार आड यायचा.
याचवेळी माझ्या आयुष्यात मधुरा आली. माझ्या मित्राची, विकासची ती बायको. पण विकास त्याच्या नोकरीमुळे बराच काळ जहाजावर असायचा. मैत्रीच्या नात्याने जवळ आलेल्या मधुराच्या आकर्षणात मी कसा अडकलो माझे मलाच समजले नाही. म्हणता म्हणता मैत्रीच्या पलीकडे आमचे नाते गेले.रजनीच्या वागण्याने दुखवल्यामुळे मी मधुराच्या जवळ गेलो असे मी स्वतः ला बजावत होतो. माझ्या बेबंदपणाचे सगळे खापर मी रजनीवर फोडले. मधुराच्या वागण्याचा, मोकळेपणाचा मोह पडला हे कबूल करायच्या ऐवजी पुरुष हा स्वैर असतोच असे समर्थन मी करत राहिलो. रजनी दोन मुलांना घेऊन कुठे जाणार, तेही अर्थार्जनाचा ठोस मार्ग नसताना अशी एक भावना देखील होती .या काळात आमचे सेक्स लाईफ पूर्णपणे उध्वस्त झाले होते.मला रजनीची गरज उरली नव्हती तिनेही कधी पुढाकार घेतला नाही. अचानक मधुराने विकासाकडे जाण्याचा निर्णय घेतला मी तिला पुन्हा - पुन्हा विचार बदल म्हणून सांगत होतो. पण तिचा निर्णय ठाम होता. खूप एकटेपणा वाटला होता मला.पण मलाही घर होते.बायको मुलं होती.
पण पुलाखालून खूप पाणी वाहून गेलं होतं. रेल्वेच्या वेटींग रूम मधील प्रवासी आपापली गाडी आली की निघून जातात तशी घराची अवस्था होती. आधी आई बाबा गेले.जान्हवी लग्न करून बेंगलोरला तर निरंजन परदेशी निघून गेला होता.
रजनीच्या आयुष्याला आता स्थैर्य आले होते. कामाला बायका होत्या. पैसे कमावणे ही गरज राहिली नव्हती. स्वतःचा असा मोकळा वेळ तिला मिळू लागला होता. स्वतः ला हवे तितके सतारीचे कार्यक्रम ती करत होती.वेगवेगळ्या स्तरातील बायकांसाठी काम करणाऱ्या ' अनुबंध ' या संस्थेचे काम ही करत होती.
या काळात बाहेरच्या आघाडीवर यशस्वी होतानाच घराकडे विशेषतः माझ्या सगळ्या गरजांकडे ती लक्ष पुरवत होती.तिचा मेनोपोज जवळ येत होता म्हणून म्हणा किंवा आपल्या चुका सुधारायच्या म्हणून म्हणा ती सेक्समध्ये पुढाकारही घेत होती. पण जीवनातील या टप्प्यावर माझे प्राधान्य माझ्या व्यवसायाला होते. माझ्या धंद्याचा तो उतरता काळ होता. अतिशय ताण- तणाव असल्यामुळे इच्छा असली तरी मला तिला साथ देता येत नव्हती.
निखिलच्या प्रश्नाने सगळा भूतकाळ माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला. त्याला मी एकच सांगणार होतो, पुरुषांच्या दृष्टीने संसार म्हणजे 'चुकामूक'. दात आहेत तर चणे नाहीत आणि चणे आहेत तर दात नाहीत आणि खाण्याची इच्छा कधी संपत नाही अशी अवस्था. ही चुकामूक टळली तर संसार यशस्वी झालाच.
रजनी
निखिल आणि पल्लवी गेले. खूप गोड होती पल्लवी.मला माझे दिवस आठवले. अशीच कोवळी,भाबडी होते लग्नाच्या वेळी. आई- बाबांनी मुलगा कसा हवा असे विचारले तेव्हा म्हणाले " माझी नोकरी, व्यवसाय, शिक्षण याविषयी कसलीच अपेक्षा नाही पण नवरा प्रामाणिक, एकनिष्ठ असला पाहिजे बास." माझ्या या उत्तराकडे बाबा एकाच वेळी कौतुकाने आणि त्याचवेळी चिंतेने माझ्याकडे बघत होते. माझा जिद्दी स्वभाव त्यांना नवीन नव्हता. राघवच्या स्थळाला तसा त्यांचा विरोधच होता. पण मला त्याचा स्वभाव आवडला होता आणि त्याच्या ' माझ्या आयुष्यातली एकमेव मुलगी तू आहेस.' या शब्दाने तर माझ्यावर जादूच केली होती. काहीशा हट्टाने मी त्याला हो म्हणाले. लग्न माझ्या इच्छेने झाले होते तेव्हा कोणत्याही गोष्टीत तक्रार करण्याचा प्रश्नच नव्हता.
पण लग्नानंतर छोट्या घरात ,एकत्र कुटुंबात वावरताना मला किती अडचणी आल्या; माझ्या मनाचे कोपरे किती वेळा चुरगळले गेले याची त्याला कल्पनाच नसावी याचा खूप त्रास व्हायचा. एक विरुध्द अनेक असे अनेकदा घडायचे. वेगळ्या वातावरणातून, विचारातून मी आले होते तेव्हा मला कुटुंबात सामावून घ्यायला वेळ दिला पाहिजे हे कोणाच्याच लक्षात आले नाही. सगळेजण एकत्र गप्पा मारत बसायचे पण मी आले की विषय बदलायचे नाहीतर उठून जायचे.अगदी साध्या साध्या प्रसंगात देखील मला वेगळे ठेवले जायचे. एखादा नवीन पदार्थ कौतुकाने करावा सगळ्यांना हातात नेऊन द्यावा. पण,' तू घेतलास का?' ' चांगला झाला आहे ' हे सांगावेसे कोणाला वाटायचे नाही.एखादा बिघडलेल्या पदार्थाचे मात्र अनेकवेळा दाखले दिले जात असत.आज हे सगळे आठवले की हसू येतं. पण त्या - त्या वेळी अनेकदा एकटीनेच डोळ्यातून पाणी काढले आहे मी. खरं तर ही माझ्या एकटीच्या घरातली परिस्थिती नव्हती. आमच्या वेळच्या सगळ्याच मुली कमी अधीक प्रमाणात यातूनच तावून सुलाखून बाहेर पडायच्या.
गरज संपल्यावर प्रत्येकजण घरट्यातून बाहेर उडून गेले.मी मात्र माझ्या पिल्ल्यांच्या भविष्याकडे बघून दिवस काढत होते.राघवने नोकरी सोडायचा एकतर्फी घेतलेला निर्णय मला पटला नव्हता.तरीही मी त्याला साथ दिली. सुदैवाने तो निर्णय यशस्वी झाला. व्यवसायाच्या पायऱ्या भराभर चढत तो यशाकडे वाटचाल करत होता. मी मात्र घर, मुलं सांभाळत जेवढे जमेल तेवढेच कार्यक्रम करत होते.सतार खरं तर माझी जीवाभावाची सखी पण माझ्या कुटुंबानंतर. वेळ मिळेल तेव्हाच मी तिला जवळ करत होते.पण तिने मात्र माझी साथ कधी सोडली नाही.गरजेच्या वेळी पैसा, नाव मिळवून देत माझा एकटेपणा दूर करण्याचे श्रेय तिलाच जाते. विशेषतः जेव्हा मधुराच्या प्रकरणाची कुणकुण मला लागली. तेव्हा मी मोडून पडले होते तेव्हा माझ्या या सखीनेच मला सावरले.
माहेरचा आधार काही झालं तरी घ्यायचा नाही या माझ्या जिद्दी स्वभावाला पहिल्यांदाच मुरड घालून मी आईकडे गेले. घरातल्या अनेक अडचणी मी सहन केल्या होत्या. सगळ्या परिस्थितीला हसतमुखाने सामोरी गेले होते. घरातील मोठी सून म्हणून जबाबदारीने सगळी कर्तव्य पार पडली होती.पण राघवने केलेली ही अवहेलना सहन करणे मला शक्य होत नव्हतं . स्वतः च्या अस्तित्वाला तडा जाणारा क्षण होता तो.आईच्या कुशीत शिरून धाय मोकलून रडताना तिने मला एक गोष्ट सांगितली होती.एका साधूची. अनेक काळ मौन बाळगून तपश्चर्या करणाऱ्या साधुला एक गावकरी विचारतो," महाराज, स्त्री आणि पुरुष यांच्या कामेच्छा वेगवेगळ्या का असतात यात स्त्रीची किती आणि पुरुषाची किती? " न बोलता साधू आपल्या झोळीतून मूठभर तांदूळ काढून त्याच्या हातात देतात आणि समोरच्या धुनीत हात घालून चिमुटभर राख त्याच्या दुसऱ्या हातात टेकवतात. त्याचा शिष्य त्याला सांगतो "अरे, बाबाने तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. स्त्रीची वासना मूठभर तांदळा एवढीच असते. थोडक्यात तिचे पोट भरते. पण पुरुषाची मात्र पार त्याची राख होईपर्यंत त्याच्या सोबत राहते."
आईने पुढे सांगितले , "लग्नाच्या वेळी मी तुला काही सांगितले नाही पण आता सांगते, 'संसार म्हणजे चुका- मूक.' घरातल्या सगळ्यांच्या चुका मूकपणे स्वीकारायचा आजन्म वसा. उतायचे नाही, मातायचे नाही दिलेला वसा टाकायचा नाही. सगळ्यांची आई होऊन हा वसा आपल्याला साधायचा असतो तरच तुमचा संसार सुफळ, संपूर्ण होतो."
आईच्या बोलण्याचा प्रत्यय मला आजही येतो सगळ्यांच्या चुका मूकपणे सांभाळत राहिले म्हणून माझा संसार टिकला. तो यशस्वी आहे का ते मला माहीत नाही पण माझ्या मुलांसाठी त्यांच्या चुका मूकपणे स्वीकारणारा एक दरवाजा कायम उघडा आहे याची खात्री त्या दोघांनाही आहे.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

Sad नि:शब्द!!
फार ताकदीने लिहीली आहे ही कथा. या भावना अशा डिसेंट शब्दात मला तरी उतरवता आल्या नसत्या.

" महाराज, स्त्री आणि पुरुष यांच्या कामेच्छा वेगवेगळ्या का असतात >>>> अरे देवा!!! डॉक्टरला विचारावं ना असलं काही आणि साधू पण असला कमतीला भरती की त्याला उत्तर माहिती असतं.... साधू कसला संधीसाधूच असावा.... साधूला काय विचारायचं काय नाही ह्याची काही मार्गदर्शक तत्त्वे (गाईडलाईन्स) आहेत की नाही??!!!
जाऊ द्या, छान आहे. पुढील लेखनास शुभेच्छा....

अहो ताई जुना काळ तो. Specialist चे खूळ बोकाळले नव्हते तेव्हा आपले आध्यात्मिक असो किंवा प्रापंचिक असो सगळ्या प्रश्नांची उत्तरे साधू सज्जनांकडे मिळतील असे वाटायचे लोकांना. फ्रेंड, फिलॉसॉफर,गाईड अशी भूमिका निभावत असत ते. हल्ली आसाराम बापू , राम रहीम मुळे आपला दृष्टिकोन बदलला आहे.
प्रतिक्रिये बद्दल आभारी आहे

स्त्री आणि पुरुष स्वभावाचे उत्तम चित्रण केले आहे.....
साधूने सांगितले ते biological शास्त्रीय सत्य आहे. ...आई झाल्यानंतर स्त्री च्या अंतरगात अमूलाग्र बदल घडतो...ती आईच्या भूमिकेत च रमते... पुरुषा चे तसे होत नाही.
त्यामुळे एकमेकांना समजून घेऊन पुढे जाणे आवश्यक असते...

बन्या - अर्र नाही आवडली प्रतिक्रिया, कुणाच्या धार्मिक भावना दुखावायच्या नव्हत्या. उलट अशा गोष्टी वैद्यकीय आहेत एवढेच. आता काढून टाकता येत नाही. तेव्हा क्षमस्व.