बटाट्याचं रायतं

Submitted by अगो on 16 November, 2009 - 12:03
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

बटाटे उकडून तयार असल्यास दहा मिनिटात होते.
साहित्यः २/३ मध्यम आकाराचे बटाटे.
बटाट्यांना चांगल्या प्रकारे लागेल ( अंगासरशी राहील ) इतके सावर क्रीम + १ मोठा चमचा दही
१ मोठी किंवा २ मध्यम आकाराच्या सांडगी मिरच्या ( वाळवणाच्या तळायच्या मिरच्या )
फोडणीसाठी १ टेबलस्पून तेल अंदाजे
कोथिंबीर बारीक चिरुन
मीठ
१ चमचा साखर ( किंवा आवडीप्रमाणे )
२ टेबलस्पून दाण्याचे कूट
आवडत असल्यास थोडी कांद्याची पात बारीक चिरुन ( १-२ टे.स्पून )

क्रमवार पाककृती: 

बटाटे उकडून त्याचे मध्यम आकाराचे तुकडे करावेत. ( मी आजकाल कुकरमध्ये उकडण्यापेक्षा आधी सोलून घेऊन तुकडे करते आणि पातेल्यात पाणी आणि थोडे मीठ घालून बटाटे उकडते. नंतर पाणी निथळून घेते. कुकर इतक्याच वेळात होतात आणि बटाटे चिकट होत नाहीत. खुटखुटीत राहतात )
एका भांड्यात बटाट्याच्या फोडी घालून त्यात सांडगी मिरची आणि तेल सोडून बाकीचे सगळे जिन्नस घालावेत. नीट मिसळून घ्यावे.
तेल तापवून त्यात देठ काढून चुरुन घेतलेली सांडगी मिरची घालावी. चुरा तळला गेला की फोडणी बटाट्याच्या रायत्यावर ओतून परत नीट ढवळून घ्यावे. झाकून ठेवावे म्हणजे फोडणीचा वास रायत्यात छान मुरतो.

वाढणी/प्रमाण: 
तीन-चार जणांना व्यवस्थित पुरते.
अधिक टिपा: 

कांद्याची पात वगळली तरी चालेल. पण घातली तर वेगळाच स्वाद येतो.
कांद्याची पात मी नेहेमी धुवून चक्क कात्रीने कापते पदार्थावर. सोपे पडते.
सावर क्रीम नसल्यास नुसत्या घट्ट दह्यात केली तरी चालते. भारतात राहणार्‍यांनी दह्याबरोबर एक चमचा साय घोटून घातली तर छान लागेल.

माहितीचा स्रोत: 
माझ्या सासूबाई गाजर आणि काकडीची कोशिंबीर सांडगी मिरचीची फोडणी देऊन करतात ( गाजराची दही न घालता.लिंबू पिळून.बाकी तशीच ) त्यावरुन मी हे बटाटा रायते करुन पाहिले.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो, मी आधी तुपातली फोडणी देऊनच करायचे. पण आईंच्या हातचं खाल्ल्यापासून त्यांचा बराच प्रभाव आहे माझ्या कुकींगवर Happy
सिंडी, सावर क्रीम मी इथे आल्यावरच वापरायला लागले. भारतात दहीच घालायचे. पण सावर क्रीमने पाणी सुटत नाही आणि एक आंबटसर चव येते, क्रीमी होते रायते म्हणून खूप आवडते.

अगो, ह्यात सांडग्या मिरच्यांऐवजी साऊथ इंडीयन स्टाईलच्या भरलेल्या मिरच्या चालायला हरकत नाही. नाही?

साऊथ इंडियन स्टाईलच्या भरलेल्या मिरच्या कशा असतात ? म्हणजे त्यात साधारण काय मसाले असतात ? आमच्या इथे नक्की मिळायला पाहिजेत.

सॉरी अगो. हा बीबी मी विसरुनच गेले होते.
साऊथ इंडियन भरलेल्या मिरच्या बुटक्या असतात सांडग्या मिरच्यांचा मानाने आणि रंगानेही फिकट असतात. ह्या मिरच्या दह्यात बुडवून वाळवलेल्या असत्तात. पण चवीला छान आहेत. एकदम झणझणीत. दही भाताबरोबर मस्त लागतात. इंडियन ग्रो. स्टोअरला जिथे लाल सुक्या मिरच्या असतात तिथे मिळायला हव्यात. नाही मिळाल्या तर मला सांग, मी पाठवते. Wink