सहनशीलतेची परिसीमा---( वीक एंड लिखाण )

Submitted by निशिकांत on 20 March, 2021 - 12:06

आजच्या वीक एंड लिखाणाचा उगम आधीच्या याच सदराखाली लिहिलेल्या लिखाणाला आलेल्या एका प्रतिसादात आहे. कुठे आणि केंव्हा विषय मिळेल हे सांगता येत नाही. पुष्कळ वेळेस विषय शोधूनही सापडत नाही तर कधी सहजच सुचतो. आहे की नाही मजा!
शोभा ही एका उच्चमध्यमवर्गीय समाजात रहाणारी महिला. दोन लेकरांची आई. इतर मुलीप्रमाणे तिने या घरात जेंव्हा सून म्हणून प्रवेश केला, तिची जीवनाबद्दलची स्वप्ने गुलाबी, भावनात्मक होती. जीवन सुरळीतपणे चालले होते. काळाच्या ओघात जीवनाच्या वेलीवर दोन फुले पण उमलली. एकत्र कुटुंब असल्यामुळे शोभाला कामाचा खूप ताण पडत असे ज्या बद्दल तिने स्वतःला पण कधी शिकायत केली नाही.
आपल्या रिवाजानुसार तिला घरातील सर्व कामे आहोरात्र बघावी लागायची. संसाराची पालखी व्यवस्थित चालण्यासाठी ती या पालखीची भोई झाली होती. शरीर कामाने थकले तरीही मनाची उभारी मात्र वाखाणण्याजोगी होती.
घरात सतत कामात व्यग्र असूनही तिने कविता करायचा जुना छंद, जमेल तितका जोपासला होता. छान कविता करून ती फेसबुकवर पोस्ट करत असे. तिच्या रचनेला बर्‍यापैकी प्रतिसाद पण मिळतात. कामाचा व्याप आणि कवितांचा छंद असूनही अजून एक अवघड गोष्ट मनावर घेतली आहे तिने. तिला आता गझला शिकायच्या आहेत. तिच्या अपेक्षांचा आवाका आणि जिद्द पाहून मी चकित झालोय अक्षरशः . तिला जे जे करायचे ते तिला करायला मिळावे असे मला मनापासून वाटते.
कोरोनाच्या या काळात शोभाची कामे अजूनच वाढली आहेत. भाज्या आणल्यावर त्या फ्रीजमधे जायच्या. आता त्या निर्जंतुक करण्यासाठी स्वच्छ धुणे, सुकवणे, जास्तीची करावी लागणारी स्वच्छता इत्यादी भरीची कामे पण आलीच. एका अर्थाने कामाच्या बाबतीत घराची ती सर्वेसर्वा होती, हे सारे किती जिकिरीचे असते याची कल्पनाच केलेली बरी.
एकदा तिला खूप सर्दी झाली, शिंका येणे, घशात खवखव, नाक वहाणे या शिकायती सुरू झाल्या. आठ दिवस हे चालू होते. कोणीही त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. तिनेच समोरच्या औषधाच्या दुकानातून कांही गोळ्या आणून घ्यायला सुरू केल्या; पण फारसा फरक पडत नव्हता. घरातील स्त्री ही घर चालवण्याच्या बाबतीत सर्वे सर्वा असते पण घरात तिची काळजी घेण्यासाठी ती कुणाचीच नसते असे तिला पदोपदी जाणवत होते. कोरोनाचा प्रादुर्भाव असताना या शिकायतीकडे गंभीरपणे बघायला हवे होते. पण तसे झाले नाही.
एकेदिवशी शोभा स्वयंपाक करत होती. डोळ्यात चुरचूर, शिंका, डोके दुखणे चालूच होते तरीही तिचे स्वयंपाक करणे चालूच होते. हॉलमधे तिचे सासरे पेपर वाचत बसले होते. इतक्यात त्यांचा मोबाईल खणाणला. त्यांनी बोलायला सुरू केले. फोन त्यांच्या मुलीचा म्हणजेच शोभाच्या नणंदेचा होता. सासरे आपल्या मुलीला फोनवर म्हणत होते;
"हॅबलो, कशी आहेस बेटा! का गं? तुझा आवाज बसल्यासारखा वाटतोय? खोकला पण येतोय! बेटा काळजी घे. पटकन डॉक्टरकडे जा. हयगय करू नकोस. प्रकृतीस जप. करोना टेस्ट पण पटकन करून घे. मला खूप काळ्जी वाटते गं तुझी. संध्याकाळी चाचण्या झाल्यानंतर मला फोन करून सारे कांही कळव. मी वाट बघतो तुझ्या फोनची; नसता मीच करेन फोन. ओके बेटा. बाय. काळजी घे. "
हे सर्व शोभाला स्पष्ट ऐकू येत होते.
तिचे डोके सुन्न झाले. कदाचित सहाजिक असेल पण हा भेदभाव बघून ती हादरलीच. ती सहनशीलतेची परिसीमा असून सुध्दा आज पुरती खचली होती. आधी तिचे नाक वहात होते सर्दीने. आता डोळेही वाहू लागले बिचारीचे.
हे लिखाण करत असताना उगीच मनात विचार आला. या जगात खूप सरळ वागणार्‍याची खरेच कदर होते का? का नुसतेच शोषण? आणि खालील चार ओळी सुचल्या.

जास्त सरळ वागल्यास
त्रास पण होतो कधी
रामकाठी बाभळी
तोडती इतरा अधी

निशिकांत देशपांडे, पुणे.
मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users