भाषा : अपभ्रंश, बदल, मतांतरे इ.

Submitted by कुमार१ on 14 March, 2021 - 10:39

नुकताच मराठी म्हणींच्या धाग्यावर ‘उसापोटी कापूस जन्मला’ या म्हणीचा अर्थ विचारला गेला होता. त्यावर शोध घेताना मला रोचक माहिती मिळाली. वास्तविक सदर म्हणीत ‘कापूस’ शब्द नसून ‘काऊस’ हा शब्द आहे. त्याचा अर्थ ‘उसाच्या शेंड्याचा नीरस भाग किंवा कुचकामाचा माणूस’. ‘काऊस’ हा जरा विचित्र शब्द असल्याने याचा कापूस असा सोयीस्कर अपभ्रंश झाला असावा.

या निमित्ताने मनात एक कल्पना आली. वरील म्हणीप्रमाणेच आपल्या भाषेत अनेक शब्द, म्हणी अथवा वाक्प्रचार यांचे अपभ्रंश कालौघात रूढ होतात. त्याची अशी काही कारणे संभवतात :

१. एखादा मूळ शब्द उच्चारायला कठीण असतो
२. तो लोकांत खूप अपरिचित असतो, किंवा
३. भाषेच्या विविध बोली अथवा लहेजानुसार त्यात बदल संभवतात.

म्हणी आणि वाक्प्रचार हे कित्येक शतकांपासून भाषेत रूढ आहेत. तेव्हा त्यांचे विविध अपभ्रंश नक्की कधी झाले हे समजणे तसे कठीण असते. मात्र एकदा का ते रूढ झाले, की त्या पुढील पिढ्यांना तेच जणू मूळ असल्यासारखे भासतात. त्यातून बरेचदा संबंधित म्हणीचा अर्थबोध होत नाही. काहीसे बुचकळ्यात पडायला होते तर काही वेळेस काही शब्द हास्यास्पद भासतात. मग या अपभ्रंशांची नवनवीन स्पष्टीकरणे सामान्यांकडून दिली जातात आणि त्यातून काहीतरी नवेच रूढ होते. काही अपभ्रंशांच्याबाबत विविध शब्दकोश आणि भाषातज्ञात देखील मतांतरे अथवा मतभेद असतात. असे काही वाचनात आले की एखाद्या भाषाप्रेमीचे कुतूहल चाळवते. तो त्याचा अधिकाधिक शोध घेऊ लागतो. अशाच काही मजेदार बदल अथवा अपभ्रंशांची जंत्री करण्यासाठी हा धागा.

माझ्या माहितीतील काही उदाहरणांनी (संदर्भासह) सुरुवात करून देतो. नंतर इच्छुकांनी भर घालत राहावी.

१. आठराविश्वे दारिद्र्य
अर्थ : पूर्ण दारिद्र्य

आता १८ ‘विश्वे’ कोणती असा प्रश्न पडतो.
त्याची २ स्पष्टीकरणे मिळाली :

अ) वीस विश्वे (विस्वे) पैकीं अठराविश्वे म्हणजे जवळ जवळ पूर्ण दारिद्र्य. = १८/ २०
(https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BF%...)

ब) 'अठरा विसा' याचा अर्थ १८ x २० = ३६० दिवस, असा होतो. ३६० दिवस म्हणजे एक वर्ष. वर्षाचे सर्व दिवस, सदासर्वकाळ दारिद्रय घरात वसतीला असणे, यालाच 'अठरा विश्वे दारिद्रय' म्हणतात (हणमंते, श्री०शा० १९८० : संख्या-संकेत कोश. प्रसाद प्रकाशन, पुणे)
http://maparishad.com/content/%E0%A4%85%E0%A4%A0%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A...

आहे की नाही गम्मत ! गणितानुसारही चक्क २ वेगळे अर्थ झाले :
१८/२० आणि
१८ गुणिले २० !

२. पुराणातली वांगी पुराणात
अर्थ : उपदेश नुसता ऐकावा, करताना हवे ते करावे ( शब्दरत्नाकर).

आता इथे भाजीतील ‘वांगी ’ कुठून आली हा अगदी स्वाभाविक प्रश्न. मी यासाठी शब्दरत्नाकर व बृहदकोश दोन्ही पाहिले असता त्यात ‘वांगी’ च स्पष्ट लिहिलेले आहे. मात्र ‘वांगी’ हा वानगीचा अपभ्रंश असल्याचे संदर्भ मिळतात. उदा :

यातला मूळ शब्द ‘वानगी’ म्हणजे नमुना हा असावा, ज्याचा नंतर ‘वांगी’ हा अपभ्रंश झाला, असे काही भाषातज्ज्ञांचे मत आहे”.
https://www.loksatta.com/vishesh-news/scientific-research-in-indian-myth...

३. उंसाच्या पोटीं काऊस जन्मला
= हिर्‍याच्या पोटीं गारगोटी. [सं. कु + इक्षु]
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%B8

इथे कापूस या अपभ्रंशांने खरेच बुचकळ्यात पडायला होते. ऊस श्रेष्ठ असेल तर कापूस कनिष्ठ कसा?

४. परोक्ष
मूळ अर्थ :
एखाद्याच्या पाठीमागें, गैरहजेरींत; डोळ्या-आड; असमक्ष.
मात्र व्यवहारात त्याचा वापर बरोबर उलट अर्थाने ( समक्ष) केला जातो !
हा पाहा संदर्भ :

“अडाणी माणसें परोक्ष याचा समक्ष या अर्थीं उपयोग करतात व असमक्ष करितां अपरोक्ष योजतात”.
(https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%95%...)
. मेत(थ)कूट
याचा सर्वपरिचित अर्थ हा:

तांदूळ, निरनिराळ्या डाळी, मोहऱ्या, मेथ्या इ॰ एकत्र दळून केलेलें पीठ व त्यांत दहीं घालून तयार केलेलें एक रुचकर तोंडीलावणें.
यात मेथ्या असल्याने ते खरे मेथकूट आहे.

पण, ‘मेतकूट जमणे / होणे’ याचा उगम मात्र मित्र + कूट असा आहे.

मेळ; एकी; दृढ मैत्री. 'शिंदे, बाळोबा व भाऊ यांचें मेतकूट झालें होतें.' -अस्तंभा ९६. [सं. मिथः कूट; मित्र-प्रा. मित + कूट] (वाप्र)
दाते शब्दकोश
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%...

......
वानगीदाखल मी काही वर दिले आहे.
येउद्यात अजून असे काही. चर्चा रोचक असेल.
**************************************

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

"पाचावर धारण बसणे" ही म्हण घाबरणे या अर्थाने
>>>>
पहिल्या महायुद्धाच्या काळातील ती म्हण आहे.
तांदूळ इतके महाग झाले तर सैन्याची उपासमार होणार ही भीती मनात घर करून बसली असावी.
https://bruhadkosh.org/words?shodh=+%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3+

तुझ्या कामांत भट पडो ! - एखाद्याचे वाईट चिंतने
शेवटच्या बाजीरावाच्या कारकीर्दीत भटांचे राजकारणांत फार प्राबल्‍य असे व त्‍यामुळे काम बिघडे. त्‍यावरून वरील म्‍हण ही शापाप्रमाणें प्रचारात आली. कामांत भट पडल्‍यास काम नासणारच.
https://www.transliteral.org/dictionary/%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%9D%E0%A...

पण पण ....... इथे "भट" शब्दाचा अर्थ "ब्राह्मण" नसून "किडे किंवा अळ्या" असा आहे. तुझ्या कामात किडे पडो आणि ते नासो असा सन्दर्भ आहे मूळ . ही गोव्याकडची म्हण असून तिकडे भट हा शब्द प्रचलित होता /असेल.

जिद्दु
भट = किडा हे भन्नाटच !

हिंदीतील भटचा अर्थ हा :
भट-भट्टी = जाळून नाश करणारी

तुझ्या कामांत भट पडो >>> हे 'भाट' असावे का?
नदीच्या मध्ये काही ठिकाणी इतका गाळ जमतो की जमीन दिसू लागते.. याला मालवणीत भाट पडली असे म्हणतात.
शेजारी गोव्यात हाच शब्द असेल तर 'तुज्या कामात भाट पडो' असे वापरत असतील का? (मला माहीत नाही, म्हणून शंका)...

पदे,
नाही, ते भटच आहे :

पु. (गो.) लांकूड इ॰ पोंखरून नाश करणारा किडा. ॰पडप-अक्रि. किडे पडणें; अळ्या पडणें (लोणचें इ॰ कांत). भट पडो-उद्गा. जळो, मरो या अर्थीं, रागानें व तिरस्कारानें योजावायाचा शब्द (कदाचित भट म्हणजे लांकुड पोखरणारा किडा याच अर्थी येथें भट शब्द असून चुकीनें ब्राह्मण असा अर्थ घेतला गेला असवा). म्ह॰ तुम्हा कामांत भट पडो = कार्याचा नाश होवो.
https://bruhadkosh.org/words?shodh=+%E0%A4%AD%E0%A4%9F

बैल गेला अन झोपा केला ही नेहमीची म्हण आहे. त्याचा अधिकृत अर्थ इथे आहे
https://www.transliteral.org/dictionary/%E0%A4%AC%E0%A5%88%E0%A4%B2-%E0%...

पण मला एक भलतीच माहिती इथे मिळाली https://mr.quora.com/%E0%A4%AC%E0%A5%88%E0%A4%B2-%E0%A4%97%E0%A5%87%E0%A...
त्यांच्या मते ही म्हण मुळात
बाईल गेली अन झोपा केला अशी आहे.
बाईलचा अपभ्रंश बैल.
अर्थात ही माहिती ब्लॉगवरची आहे.

मालवणी भाषेत "शिरा पडांदे मेल्याच्या तोंडार" असा राग व्यक्त केला जातो. यातल्या "शिरा पडो" चा अर्थ किंवा व्युत्पत्ती काय असावी?

व्यत्यय,

हा एक इथला जुना प्र आहे :

शिरां पडो तुझ्या तोंडार... असं म्हणतात.. इथे तोंडात नाहि अर्थ होत तोंडावर असा होतो.. काट्याकुट्याची शिरटां असली कि जखमा होणारच ना..

Submitted by भावना गोवेकर on 31 January, 2019 - 11:54
.....
मी पण अजून शोधतो..

व्यत्यय,
हे एक सापडले :

शिरालपक्ष-पु. किड्यांचा एक वर्ग. या किड्यांच्या पंखास बारीक शिरा असतात. -प्राणिमो १०८.
(दाते शब्दकोश)

??? किडे पडो

अनागोंदी - झोल, भोंगळ कारभार
तुंगभद्रा नदीच्या काठावर वसलेले गाव 'आणेगुंदी' हे आधी विजयनगर साम्राज्याची राजधानी होते. नंतर तिथून ते हंपी येथे नेण्यात आले. सध्या ही वेगवेगळी असली तरी वैभवाच्याकाळी ती एकाच साम्राज्याची दोन ठिकाणे होती. आणेगुडी ह्या कन्नड शब्दाचा अर्थ हत्ती फिरण्याची जागा असा असून आणेगुंदी ह्याचा अनागोंदी हा मराठी अपभ्रंश आहे.
सुरुवातीला विजयनगरचे जे वैभव होते ते लयाला जाण्याचे कारण म्हणजे आणेगुंदी येथील राजाकडून केला गेलेला भोंगळ कारभार. हे राजे आम्ही फार शक्तिशाली असून सबंध हिंदुस्तानातील राजे आमचे मांडलिक आहेत असे सांगायचे आणि त्यांच्याकडून आम्हाला खंडण्या येतात असे सांगून ते सर्व जमाखात्यात दाखवायचे. आणि खर्चखात्यात तेवढ्याच रकमा नजराणे,देणग्या, आहेर अशा कारणाखाली खपवून जमा-खर्चाचा मेळ घालून दाखवत. पण प्रत्यक्षात काहीही जमा होत नसल्याने अशा भोंगळ कारभाराने लवकरच ते राज्य बुडाले. ह्या संदर्भाने अनागोंदी हे विशेषण भोंगळ हिशोब,कारभार,व्यवस्था यांच्या संदर्भात येते.

जिद्दू, छान.

व्यंकटेश माडगूळकरांनी ‘गद्धागाढव’ या अपभ्रंशाची व्युत्पत्ती फार छान समजून सांगितली आहे इथे :
https://books.google.co.in/books?id=NJI0AwAAQBAJ&pg=PT51&lpg=PT51&dq=%E0...

मूळ शब्द गडधू असून त्याचा अर्थ गावाची सीमा दाखवणारा दगड असा आहे.
हा शब्द अवघड असल्याने लोक त्या दगडाला सर्रास ‘गद्धागाढव’ म्हणू लागले !

>>>> आणेगुंदी ह्याचा अनागोंदी हा मराठी अपभ्रंश आहे.
त्या दगडाला सर्रास ‘गद्धागाढव’ म्हणू लागले !>>>>
दोन्ही भारीच.

व्यत्यय,
हा अर्थ मला एका कोकणातल्या मित्रांकडून समजला :

शिरा= बारीक काटेरी झुडपांच्या बारीक काठ्यांचा जुडगा
.....................
तर दुसऱ्या जाणकारांनी ही भर घातली :

चार पाचशे वर्षांपूर्वी काही ठिकाणी पुरलेल्या मृताला ( मासभक्षी प्राण्यांनी उकरून खाऊ नये म्हणून) काटेरी फांद्यानी (शिरा) झाकत.

तोंडावर शिरा पडो : मरो एकदाचा.

शिरा हा नपुंसक लिंगी बहुवचनी शब्द आहे. रा वरचा अनुस्वार गेल्या काही वर्षांत मराठीच्या प्रभावाने अनुच्चारित झाला आहे. महाराष्ट्रातल्या दक्षिण कोंकणपट्टीत आणि गोव्यात शिरां पडोत हा वाक्प्रचार आढळतो.
महाराष्ट्रातल्या मध्य कोंकणात देखील असे अनेक अनवट शब्द आहेत. साने गुरुजींच्या श्यामची आई किंवा श्री ना पेंडसेंच्या यशोदा, गारंबीचा बापू, तुंबाडचे खोत मध्ये असे अनेक स्थानिक शब्द सापडतात.

शिरां पडो वर मागे एकदा चर्चा झाली होती. कुमार१ तुमचा अर्थ जास्त योग्य वाटतोय. शिरां पडो घरावर असा एक व्हेरिएशन आहे. तोंडार नाही. तुझ्या घरास आग लागो असाही एक अर्थ असू शकतो. शीतळा पडो याचा पण शिरां पडो झाला असं वाटतंय. देवी आल्यावर अंगाची असह्य आग होते. आजकाल देवी राहिल्या नाही त्यामुळे तो संदर्भ लगेच लागत नाही. "शिरा पडो" बहुधा कुठल्यातरी रोगावरून आल्याची शक्यता आहे. ग्रामीण बोलीभाषेत सहसा राग शापवाणी उच्चारून व्यक्त करायची पद्धत होती.

याचे अनेक प्रकार आहेत

तुला आली पटकी
तुला मरी बसली
तुला लावगरा झाला

याचं अजून कठोर रूप म्हणजे "तुझा मुडदा बशीवला मसनात" हि खरे तर महाराष्ट्राची आद्य शिव्यांपैकी एक असेल. दहनाच्या आधी बसून पुरायची पद्धत होती. महाराष्ट्रात अजूनही काही जातीत शिल्लक आहे. "माती झाली" चा संदर्भ मेला आणि पुरल्याने माती झाली असा आहे.

अद्दल - शिक्षा, ठोकर,
बऱ्याच जणांना माहित नसेल पण अद्दल आणि न्याय हे समानार्थी शब्द आहे. अद्दल हा शब्द बाहेरून नंतर आला होता. न्यायालयात माणूस न्याय घेण्यास स्वतः जातो किंवा दुसऱ्याकडून खेचला जातो, तो ठोकर खाऊनच परत येतो. न्यायालयाची पायरी शहाण्या माणसाने चढू नये हा वाकप्रचार त्यातूनच आला आहे. पण हेच अद्दल घडणे म्हणजे न्याय मिळण्याऐवजी शिक्षा/धडा मिळणे या अर्थाने पुढे रूढ झाले आणि दोन्ही शब्द वेगळ्या अर्थाने वापरात यायला लागले.

हीरा , चिड्कू
माहितीपूर्ण प्रतिसाद.
जिद्दू
+१
मूळ शब्द अरबीतून आलाय.
अदल् = न्याय
>>>> आदिलशाह

याच्यातूनच पुढे अजून एक आठवले. 'जबाब/कबुलीजबाब' हा मराठी शब्द फारसी 'जवाब' मधून आला आहे आणि 'जाब' हा शब्द त्याचाच अपभ्रंश आहे.

छान चर्चा. धन्यवाद

मध्यंतरी दोन अपभ्रंश महाराष्ट्राच्या दोन वेगळ्या भागात विशेष प्रचलित असल्याचे अनुभवास आले.

१. कोल्हापूर भागात डांब ( ‘खांब’ वरून )

२. मराठवाड्यात पत्तुर (‘पर्यंत’ वरून)

छान आहे धागा. नवीन नवीन माहिती मिळतेय. पेण मध्ये 6 वर्षे राहूनही पेण नावाची माहिती नव्हती.

लोलक म्हणजे pendulum अशी माझी समजूत होती. पण हा शब्द प्रिझमसाठी मराठीत वापरतात आणि लंबक हा pendulum साठी वापरतात हे लक्षात आलं. खरं तर अर्थाच्या दृष्टीने लोलक म्हणजे लोलन (oscillation) करणारा. हिंदीत तो त्याच अर्थाने वापरतात. मग मराठीत लोलक = prism हा बदल का बरे झाला असेल?

ह पा ,
अशी गंमत आहे पहा :
लोलक m The pendant = लोंबणारा
(वझे शब्दकोश)

आंदोलक

पु. घड्याळाचा लंबक, लोलक. [सं.] !
दाते शब्दकोश

खेड्यात बैलाच्या साहाय्याने जी काही हत्यारे नांगर,कुळव इत्यादी वापरली जातात त्याला जो 'औत' शब्द वापरला जातो तो संस्कृत 'आयुध' चा अपभ्रंश 'आउत' आहे जो पुढे आउत चा 'औत' झाला.

Pages