अमेरिकन गठुडं!--२

Submitted by सुरेशकुलकर्णी on 25 January, 2021 - 22:58

आम्ही आमच्या नंबरची सीट हुडकून त्यावर बसलो. एका 'हवाईसुंदरी'च्या मदतीने, हिची हातातली बॅग आणि माझी लॅपटॉपची बॅकसॅक, सीटवरील रॅक मध्ये सारून दिल्या. सीटवर पाघरायची शाल, एक चिटूर्नि उशी, आणि हेडफोनचे पाकीट होते. समोरच्या सीटच्या पाठीवर एक मॉनिटर होता. खूप 'प्रयत्न-प्रामादा'(Trail -error साठी हा शब्द कोठेतरी वाचला होता. कसा आहे?) नंतर, या स्क्रीनने माझी पंधरा तास करमणूक केली होती. दोन सिनिमे मी पहिले, एक त्यानेच दाखवला!
'कंटाळवाणा प्रवास आहे, करमणूकी साठी गाणी आणि व्हिडीओ सोबत असू द्या', म्हणून केदारने काही गाणी आणि व्हिडीओ मोबाईलमध्ये डाऊनलोड करून दिली होती. त्याची आठवण झाली. तटकन जागेवरून उठलो. कारण ईयरफोनची वायर लॅपटॉप सोबत त्या सॅक मधेच राहिली होती. हॅटरॅक कशीबशी उघडली, वायर काढून घेतली, सॅक पुन्हा रॅकमध्ये सारली, पण ते रॅक वर ढकलून बंद करणे जमेना. आमची साधी उंची, आणि उच्य विचार सरणी. पण अमेरिकेच्या उच्य राहणीचा हा पहिला झटका होता, दुसरा झटका माझ्या मागे उभा होता, नव्हे होती! डोम काळ्या कपड्यातील, सहा फुटी आफ्रिकन 'ब्युटी'! तो माझ्या डोक्यावरील रॅकचा प्रॉब्लेम, तिने चुटकी सरशी सोडवला. पहिल्यादा मुक्रीला अभिताभ बरोबर स्क्रीन शेयर करताना, जो कॉम्प्लेक्स आला असेल, तसा मला तिची उंची बघून आला!
या विमानात बरेचशे आफ्रिकन अमेरिकन आणि दोन गोऱ्या 'हवाई सुंदरी' होत्या. एक 'हवाई सुंदर' पण होता! बोलणं कोणाचंच कळलं नाही पण, चेहऱ्यावरील रुंद, नितळ हास्य, व्यावसायिक असले तरी, सुखावून जायचे! मधेच कधीतरी विमानाची गती काही सेकंड वाढली होती, पण क्षणात ते स्थिरावले होते. 'टेकऑफ' इतका सुखद असेल असे वाटले नव्हते. जोरका झटका धीरेसे लगे, यालाच म्हणतात का?
मी हळूच बायकोकडे पहिले, ती डोक्याला मफलर बांधून झोपी गेली होती! हिच्या हुकमी झोपेचा, कधी कधी मला हेवा वाटतो. अंगावर चार दोन मुरमुऱ्याचे दाणे पडले होते. पर्समध्ये दडवून तिने चिवड्याचा फक्य मारल्या होत्या तर!
मी समोरच्या मॉनिटर वर 'track your journy'च्या आयकॉन दिसला. त्याला क्लिक केला. त्यावर विमानाचे सध्याचे लोकेशन आणि जगाचा नकाशा दिसतो. त्यात नाईट मोड करून पहिले, आमचे विमान जगाच्या अंधाऱ्या भागाकडे प्रवास करत होते! म्हणजे रात्री कडून रात्री कडेच! मला भारतात होणारी रात्र येथेच भेटत होती! समजा, उद्या मला कोणी विचारले कि, 'कधी पोहंचलात?', तरी 'आज निघून काल पोहंचलो!' हे माझे उत्तर, भलेही लोक मान्यकरणार नाहीत, पण सयुक्तिक असेल!
प्रवासांतर्गत खाण्या पिण्याची उत्तम सोया होती. फ्रुटस आणि सलाड छान होते. ट्रॉलीवरून देखण्या 'वारुणीच्या'फौजा जाताना पाहून मात्र, खूप वाईट वाटले. कधी नव्हे इतका, दारू सोडल्याचा पश्चाताप झाला. एकदा वाटले घ्यावी थोडीशी, पण हिम्मत झाली नाही!
भलेही आम्ही अंधाऱ्या भागाकडे प्रवास केला असला तरी, सूर्यप्रकाशाने आम्हास गाठलेच. न्यूयार्कला विमान लँड झाले तेव्हा सकाळचे पाच (अमेरिकेतील) वाजले होते. क्षितिजाचा रंग बदलत होता. या विमानातून उतरून ऑस्टिनच्या विमानात बसायचे. त्या साठी येथे आम्हा दोघानाच्या व्हीलचेयरची सोया आधीच केली होती. आणि मुंबईलाच आम्हाला न्यूयार्क - ऑस्टिनचा बोर्डिंग पास पण दिला होता.
आम्ही आमच्या हॅण्डबॅग्ज घेऊन विमानाबाहेर जाण्यासाठी सज्ज झालो.
०००
न्यूयार्कला विमानातून बाहेर आल्याबरोबर व्हीलचेरवाले पॅसेंजरच्या नावाच्या पाट्या घेऊन उभेच होते. आता काय फक्त आपल्या नावाच्या व्हीलचेयरवर बसायचे, आणि मग तो ऑस्टिनच्या विमानापर्यंत नेवून सोडणार होता. कसलं काय? आमच्या नावाचा चेयरवाला दिसेना! याला म्हणतात नशीब 'पांडू'! ऑस्टिनच्या विमानाला फक्त दोन तासाचा अवधी होता. जवळच्या लोकांना विचारण्याचा प्रयत्न केला. त्यांचे बोलणे कळेना! सगळं जग ' संपर्क क्षेत्राच्या बाहेर, पुन्हा प्रयत्न करा!' या स्टेजला येऊन ठेपले. एका आफ्रिकन अमेरिकन चेयरवाल्याला चिचारले. 'somebody will come ' म्हणाला. पण 'नोबडी', कोणीच दिसेना. पोराला फोन लागेना. आंतरराष्ट्रीय विमानतळावर रेंज नसते! wifi मोबाईलला कसा जोडतात माहित नाही. त्यामुळे व्हाट्स अप पण निकामी. त्यात भर हिला इंग्रजी कळत नाही आणि मला तुटक मुटके इंग्रजी बोलता येते, पण ऐकायची सवय नाही! काय करावे कळेना. एक लहान चणीची कोकणस्थि गोरेपण असलेली पोरगी, चेयरीची जुडगी घेऊन आमच्या चेहऱ्यावरचे उडणाराने रंग आणि भाव पहात होती. 'तुम्ही याच म्हणजे युनायटेडच्या फ्लाईटने आलात का?' तिने विचारले? मी माझ्या जवळचे, ऑस्टिनचे बोर्डिंगचे पास दाखवले. ते पाहून तिला आमच्या अडचणींची कल्पना आली असावी. 'Having only one chair!' ती म्हणाली. शेजारच्या एका भल्या अमेरिकन माणसाने 'Take atleast Aunty!' म्हणून तिला सांगितले. तिने कबूल केले. देव पावला. मी त्या भल्या गृहस्थाचे आभार माने पर्यंत, ती पोरगी हिला घेऊन निघाली सुद्धा. 'बॅगेज?' मी विचारले. 'have to colect. came from Mumbayi?' 'आमची मुंबई!' मी गमतीने म्हटले. 'mumbai ,mumbai ' ती दोनचारदा तोंडातल्या तोंडात पुट्पुली. आमची वरात बॅगेज बेल्ट कडे निघाली. मुलाने 'बॅगेज परस्पर ऑस्टिनच्या विमानात जाईल' सांगितले होते. हि म्हणत होती कि बॅगेज कलेक्ट करून ऑस्टिनच्या बेल्टवर टाकावे लागते!
मंगळीपौर्णिमेला आई तुळजाभवानीच्या देवळात असते त्या पेक्ष्या ज्यास्त गर्दी, या न्यूयार्क आंतरराष्ट्रीय विमानतळावर होती. जगभरातल्या व्यस्त विमानतळांपैकी एक, याची जाणीव झाली. जगातल्या अनेक जाती, वंशांचे, आकाराचे, रंगाचे, अंगकाठीच्या लोकांचे, येथे एक भव्य संमेलच भरल्याचे मला वाटून गेले. ती पोरगी मात्र व्हील चेयर सफाईने ढकलत, ढकलत कसलं पळवत, त्या गोंधळातून मार्ग काढत होती. मी एकीकडे विमानतळाची भव्यता पहात होतो, तर दुसरीकडे व्हीलचेयरवर नजर ठेवून भरभर चालण्याचा प्रयत्न करत होतो. कसे बसे बॅगेज घेतले, व्हिसा पासपोर्टचा आणि ईमाग्रेशनचा सोपस्कार आटोपला. या पोरीची चपळाई वाखाणण्या सारखी होती. तीने छोटी बॅग मोठी बॅग व्हील चेयरच्या हुकला अश्या अडकावल्याकी त्या, पाळलेल्या कुत्र्या सारख्या तिच्या मागे निघाल्या! माझ्या हाती फक्त दोन पासपोर्ट आणि दोन बोर्डिंग पास होते. अनेक जागी तिने बायपास करून आम्हास पुढे नेले. तिच्या मागे जाताना मात्र माझी भंबेरी उडत होती. आता या विमानतळाला सतराशे साठ लॉबीजसं, कैक लिफ्ट, एक्सेलेटर्स. 'सातशे खिडक्या, नऊशे दार! कोण्या वाटन गेली ती नार?' हि अवस्था येऊ नये म्हणून मी झटत होतो.
अनेक लिफ्ट मध्ये ये जा होत होती. येथे फक्त गरजू लोक लिफ्ट वापरतात. खूप कमी लोक लिफ्ट मध्ये असायचे. शिवाय लिफ्टला दोन दार होते. एका दराने आत आले कि बाहेर येताना समोरचे दार उघडायचे. व्हील चेयर फिरवून घ्यावी लागायची नाही.
शेवटी एअर रेल ट्रेनने आमच्या इस्पित टर्मिनल आलो. वेळ खूप कमी होता, आणि बॅग्ज कार्गोत गेल्या नव्हत्या, कारण तेथे भयानक रष! आमच्या या सारथ्याने काय करावे? ती सरळ त्या काउंटरला गेली जेथे न्यूयार्कचे लोकल पॅसेंजर ऑस्टिनला जात होते. त्या कार्गो पॉइंटवर तेथील ऑफिसरला विनंती करून आमच्या बॅगा लोड करून टाकल्या! आणि आम्हास ऑस्टिनच्या विमानाच्या दारात सोडले!
परमेश्वर अशी 'माणुसकी' आणि अशी 'माणसं' मदतीसाठी पेरून ठेवत असावा, हा माझा समाज दृढ होत चाललाय! त्या पोरींचे मनापासून आभार मानले. टीप पण दिली.
"Thanks and Bye, Mumbai!" नाजूकपणे हात हलवून विमानाच्या दारा पासून ती निघून गेली आणि आम्ही अमेरिकेच्या डोमॅस्टिक फ्लाईट मध्ये शिरलो.
०००
(क्रमशः )
सु र कुलकर्णी. आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय. पुन्हा भेटूच. Bye.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पाने उलटता उलटता 'गठुडं' दिसलं. आधी उचकायचा कंटाळा केला. पण पहिला भागच मस्त वाटला. आता हा दुसरा भाग वाचला. तोही छान वाटला. आता पुढच्या भागांची वाट पाहतो.