माईंची एकसष्टी

Submitted by एविता on 26 February, 2021 - 07:15

माईंची एकसष्टी.

"मी आणि माझी छोटी बहीण अमृतवल्ली यांचं शिक्षण फार कष्टात झालं. आमच्या मोठ्या काकांनी आमची सगळी इस्टेट बळकावली आणि आम्हाला घराबाहेर काढलं. बाबा एका छोट्याश्या कंपनीत स्टोअर कीपर म्हणून काम करायचे. आम्ही लहानपणी बरेच हाल सोसले. आई इतरांच्याकडे स्वैपाक करायला जायची. अशा परिस्थितीत माझं शिक्षण झालं. इंग्रजी विषय घेऊन एम. ए. केलं आणि आणि नंतर शिमोगा इथल्या एका कॉलेज मध्ये लेक्चरर म्हणून मी नोकरीला सुरुवात केली. अमृतवल्लिने ही तेच केलं आणि त्यानंतर आमच्या घरात थोडीशी आर्थिक सुबत्ता आली."

माईंची एकसष्टी साजरी केली त्यावेळी त्या हे सांगत होत्या. इंग्रजी भाषेत. कानडी बोलत नव्हत्या. माईंनी लेक्चरर म्हणून पाच वर्ष काम केल्यावर त्यांचं लग्न झालं आणि त्यानंतर त्यांनी डॉक्टरेट मिळवली. त्यांच्या थिसिसचा विषय, "A Comparative Study of Conscious Feminism in the Selected Literature of William Shakespeare and George Bernard Shaw with Special Reference to Hamlet and Pygmalion." नंतर त्या विद्यापीठात इंग्रजीच्या HOD झाल्या आणि यथावकाश निवृत्त झाल्या.

त्या पुढे सांगू लागल्या, "मोठे काका उडाणटप्पू होते. गावातल्या गुंड लोकांसोबत भटकणे, वडिलांचा पैसा उडवणे हीच कामे ते करत असत. आजोबा फॉरेस्ट ऑफिसर होते दांडेलीला. त्यांचा वचक होता पण मोठ्या मुलाचे फार लाड केले गेले आणि तो बिघडला. शेवटी त्यांनी कंटाळून त्याला आणि त्यांच्याबरोबर माझ्या बाबांना पण सैन्यात दाखल केले. बेळगाव येथे मराठा लाईट इन्फंट्री या रेजिमेंट मध्ये त्यांचे प्रशिक्षण सुरू झाले. बाबांनी दुसऱ्या महायुध्दात भाग घेतला तर मोठे काका सैन्याचे प्रशिक्षण अर्धवट सोडून परत घरी आले. वर्षभरात आजोबा गेले आणि त्यानंतर मोठया काकांना रान मोकळे झाले."

माई पुढे बोलू लागल्या, " घरात त्यांचाच वचक. घरात तो एकच पुरुष आणि आम्ही चार बायका. आजीला तर तो जुमानत नव्हता. माझ्या आईला तर खूप त्रास द्यायचा. तुझा नवरा काय युद्धातून परत येणार नाही. तुम्ही आता या घरातून निघा. इथे तुमचा आता काही संबंध नाही असे म्हणत तो रोज काहितरी भांडण उकरून काढायचा. आईला त्रास देण्यासाठी काडेपेटीत विंचू घालून ठेवायचा. कंदील लपवून ठेवायचा. सामान आणायला पैसे द्यायचाच नाही. कपडे फाडून टाकायचा. युद्ध संपलं आणि बाबा आले. इथली परिस्थिती बघितली आणि सगळं
मोठ्या काकांना देऊन टाकून आम्ही बाहेर पडलो."

माई थांबल्या. " नको त्या आठवणी. संपलय ते सगळं आता. पण एक सांगते, आयुष्यात खूप
बिकट प्रसंग येतात, आणि अशा प्रसंगांची मालिकाच सुरू होते. देव वगैरे खोटं आहे हे नक्की, असं वाटू लागतं. शारीरिक आणि भावनिक त्रास नकोसा होतो. विश्वासघात, दुःख, अपेक्षाभंग, छळवणूक, विरह, अपमान अशा गोष्टींमुळे आपण नकारात्मक होऊन जातो. बाण लावून प्रत्यंचा खेचावी आणि धनुष्याची दोरी तुटून जावी, गाणं म्हणायला मंचावर उभं राहावं आणि घसा बसावा, स्टेशनवर गाडी पकडायला जावं आणि आपल्या समोरून ती निघून जावी. किती चिडीला येईल माणूस... अख्खी दुनियाच आपल्या विरुद्ध उभी ठाकली आहे असे वाटणारे दिवस. काहीजण जीवनच संपवतात. आणि ह्याच वेळी, आई म्हणायची, अगं हीच तर परीक्षा आपल्याला द्यायची आहे, तावून सुलाखून बाहेर पडायचं आहे. दोन हात वादळा सोबत. ध्येय असच गाठायचं असतं. त्यातच गंमत आहे. आणि ध्येय गाठताना एक लक्षात ठेवायचं की ज्या लोकांनी आपल्याला त्रास दिला त्यांचा सूड उगवण्याची पात्रता त्यांच्या अंगी असणार नाही ते बघायचं. वहावत जायचं नाही. सूड उगवून स्वतःचं अस्तित्व मातीमोल करण्यापेक्षा जिथे आपल्या अस्तित्वाची जाण नाही तिथे उभं राहायचं नाही. आपलंच अस्तित्व एवढं उत्तुंग करायचं की तुम्ही जिथे जाल तिथे तुमचा सहवास इतरांना हवा हवासा वाटेल. काही लोकांचा जन्मच इतरांना तुच्छ लेखण्यासाठी, वाईट बोलण्यासाठी झालेला असतो. आपला जन्म त्यासाठी नाही. आपली जीव्हा, आपली जीभ, आपली वैखरी त्यासाठी नाही. आपला जन्म चांगले कार्य करण्यासाठी आहे. जो मनुष्य वेदना सहन करताना शांत राहतो त्याचा उत्कर्ष होतोच."

माई थांबल्या, " खूप बडबडले का मी?" त्या पुढे म्हणाल्या, " एकसष्टी. बापरे... माझ्या वाढत्या वयाची जाणीव करून दिली की तुम्ही मला..! मला आता बडबड बंद करायला शिकलं पाहिजे. हो ना?"

" नाही हो माई, " मी म्हणाले, " किती छान सांगता तुम्ही. इंग्रजी शब्द असे वापरता की शशी थरुर पण तुमच्याकडे शिकायला येईल."

" प्रोफेसर हेन्री हिगीन्स.." ऋषीन् म्हणाला, " नाही रे," अप्पा म्हणाले, " माझी एलिझा डूलिट्ल. माय फेअर लेडी." माई हसल्या. " I sold flowers, I didn't sell myself. Now you've made a lady of me, I'm not fit to sell anything else." माईंनी माय फेअर लेडी मधला डायलॉग म्हंटला. आम्ही सगळे जोरात हसलो. माईंनी माय फेअर लेडी इतक्या वेळा पाहिलाय की त्यांचे चित्रपटातले सगळे संवाद पाठ झालेत. ऑड्रे हेपबर्न म्हणजे त्यांचा जीव की प्राण.

" और वो क्या माई," इराने विचारले, " वो रेन इन स्पेन..."

" In Hertford,Hereford and Hampshire, hurricanes hardly happen' ... 'The rain in Spain stays mainly in the plain." माई नी उत्तर दिले.

" माई," ईशान म्हणाला, " आता ते गाणं होऊन जाऊ दे.."

" हो माई, " सगळ्यांनी एकच गिल्ला केला.

माईंनी घसा साफ केला आणि म्हणायला सुरुवात केली. " The rain in Spain stays mainly in the plain...... "

........

Group content visibility: 
Use group defaults

नको त्या आठवणी. संपलय ते सगळं आता. पण एक सांगते.......... जो मनुष्य वेदना सहन करताना शांत राहतो त्याचा उत्कर्ष होतोच."
>>> खूपच सहज सुंदर, मस्तच

एवि इज बॅक Happy . अगं सुरवात वाचताना वाटलं कि असं कुठे लहानपण एविताचं? बहिण कुठे आहे अमृतवल्ली नावाची? पुढे वाचत गेले आणि तेव्हाच कळलं कि मस्त असणारे लेख/गोष्ट.
खुप दिवसांनी माई भेटल्या. Happy

छान... "जो मनुष्य वेदना सहन करताना शांत राहतो त्याचा उत्कर्ष होतोच." माईंचे विचार सुद्धा छान.