तुझं माझं नातं...

Submitted by Swati Karve on 22 February, 2021 - 12:26

तुझं माझं नातं...

तुझं माझं नातं,
कधी एखाद्या डोहा प्रमाणे,
स्थिर, शांत, गंभीर...
कधी एखाद्या नदी सारखं अवखळ,
पण तेवढंच प्रांजळ आणी निखळ.
कधी स्फटिकासारखं, पारदर्शी, नितळ
तर कधी अगदी स्पष्ट, रोखठोक, सरळ...

कधी मनात अनेक प्रश्न निर्माण करणाऱ्या,
धुक्यातल्या नागमोड्या पायवाटी सारखं.
तर कधी सूर्य मावळतीला आलेला असताना,
मनाला अनामीक हुरहुर लावणाऱ्या,
त्या कातरवेळी सारखं.

कधी अत्यंत नाजूक, हळुवार, तरल,
पांढऱ्या शुभ्र, प्राजक्ताच्या फुलांसारखं,
तर कधी सैरभैर झालेल्या मनाला,
शांत करुन, अंतरीक बळ देणाऱ्या,
देवापाशी तेवणाऱ्या समईच्या,
सात्विक ज्योती सारखं...

कधी आपल्या सुगंधाने देहभान
विसरायला लावणाऱ्या,
बेधुंद करणाऱ्या,
ऐन बहरातं असलेल्या,
रातराणीच्या वेलिसारखं...
तर कधी मनात दरवळत राहणाऱ्या
अबोलीच्या मंद सुगंधा सारखं, अबोल...
पण अबोल असूनही अथांग, खोल...

कधी मतभेद, रुसवे-फुगवे,
कधी गैरसमज, टोमणे,
कधी सुखावणारा गोडवा,
तर कधी जीव टांगणीला
लावणारा अबोला...

काय काय पाहिलंय आपल्या नात्याने,
सारंच शब्दात सांगता येणार नाही,
ऐवढे चढ-उतार, वळणं आड-वळणं,
येऊनही, तुझ्यात गुंतत जाणं मात्र
तसूभरही कमी झालं नाही...

माझ्या मनात, विचारात,
अगदी प्रत्येक श्वासात,
किती खोलवर रुजलायस तू,
कसं सांगू तुला...
खरंतर मी ही स्वतःला
जेवढं ओळखत नाही,
तेवढं तू ओळखतोस मला.

दिवसागणिक आपल्याबरोबर,
आपल्यातलं नातंही परिपक्व होतं,
मुरत चाललंय...
सुरवातीला एखाद्या छोट्याश्या, नाजूक,
रोपट्याप्रमाणे असलेल्या नात्याने,
आता मात्र एखाद्या वटवृक्षाप्रमाणे,
अवघं अंतरंग व्यापून टाकलयं!

- स्वाती

Group content visibility: 
Public - accessible to all site users