आतल्या आत

Submitted by अनन्त्_यात्री on 21 February, 2021 - 09:50

संदर्भचौकटी मोडून पडल्या तेव्हा
मी अधांतराचा धरला अलगद हात
मग रिक्तपणाने भरलो काठोकाठ
अन् ओसंडून सांडलो आतल्या आत

धगधगून निखारे विझून गेले तेव्हा
मी हिमपातावर कसून केली मात
मग पलित्यातळिच्या अंधारात बुडालो
अन् लखलख तेजाळलो आतल्या आत

भ्रमनिरास बनले जगणे सगळे तेव्हा
मी सुखस्वप्नांचा सहज सोडला हात
जरी भोवतालच्या कोलाहली विस्कटलो
उलगडलो अवघा पुन्हा आतल्या आत

Group content visibility: 
Use group defaults