अमेरिकेतील कृष्णवर्णीयांचा इतिहास - स्लेव्हरी ते ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर चळवळ (भाग ६)

Submitted by मो on 16 February, 2021 - 17:48

अमेरिकेतील कृष्णवर्णीयांचा इतिहास - स्लेव्हरी ते ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर चळवळ (भाग ५)

मे १९५४ मधील ब्राउन व्हर्सेस बोर्ड ऑफ एज्युकेशन खटल्यातील निकालाद्वारे सर्वोच्च न्यायालयाने शाळेमधील सेग्रिगेशन रद्द केले आणि दक्षिणेत कृष्णवर्णीयांना आशेचा किरण दिसला. वर्णभेद, विभक्तीकरण, असमानता या बाबतीत फारसा बदल झाला नसला तरी शहरांमध्ये कृष्णवर्णीयांनी त्याबद्दल आपापल्या परीने निषेध नोंदवण्यास सुरुवात केली होती. मात्र १९५५ च्या ऑगस्ट महिन्यात अशी एक घटना घडली ज्यामुळे वर्णभेदी दक्षिणेत कृष्णवर्णीय समाज न्याय या गोष्टीपासून किती दूर आहे हे सार्‍या देशाने परत पाहिले. १९५५ साली उन्हाळ्याच्या सुटीमध्ये एमेट टिल नावाचा १४ वर्षांचा मुलगा शिकागोहून आपल्या नातेवाईकांना भेटायला मिसिसिपी राज्यातल्या एका छोट्या खेड्यात गेला. जायच्या आधी एमेटच्या आईने त्याला शिकागो आणि मिसिसिपीमधील परिस्थितीतील फरक सांगून तिथे जास्त काळजीपूर्वक वागायला सांगितले होते. तिथे असताना एके दिवशी एमेट आपल्या मित्रांबरोबर किराणा मालाच्या दुकानात गेला आणि कॅरोलाईन ब्रायंट या दुकानदाराच्या गोर्‍या पत्नीने एमेटवर तो छेडछाड करत असल्याचा आरोप केला. दक्षिणेत कृष्णवर्णीयाने गोर्‍या स्त्रीशी कोणत्याही प्रकारची सलगी करण्यास पाहणे हा फारच गंभीर गुन्हा होता. त्या दुकानात नक्की काय घडले हे कधीच स्पष्ट झाले नाही. पण तो आरोप एमेटने ठामपणे नाकारला. या घटनेनंतर कॅरोलाईनचा पती रॉय आणि त्याच्या भावाने एमेटचे घरातून जबरदस्तीने अपहरण केले, आणि हाल करुन शेवटी त्याला गोळी घालून ठार मारले. तीन दिवसांनी एमेटचा मृतदेह जवळच्या नदीत सापडला. दक्षिणेतील वर्णभेदी, दडपशाही करणार्‍या समाजाने एमेटचा जीव घेतला. शिकागोला त्याच्या अंत्यविधीला हजारो लोकांनी गर्दी केली. कित्येक वार्ताहरांनी ही घटना त्यांच्या वृत्तपत्रांद्वारे देशासमोर आणली. १४ वर्षीय एमेटच्या कृर हत्येने सारा देश हादरला. त्याच्या हत्येने दक्षिणेतील राज्यांमधील असलेला भयंकर वंशभेद आणि कृष्णवर्णीयांची बिकट परिस्थिती परत एकदा संपूर्ण देशासमोर आली. सप्टेंबर महिन्यात गोर्‍या लोकांच्या ज्युरीने रॉय आणि त्याच्या भाऊ निर्दोषी असल्याचा निर्णय दिला. कृष्णवर्णीयांना ज्युरीची भूमिका पार पाडण्याचा हक्क दक्षिणेत दिला जात नसे त्यामुळे न केलेल्या गुन्ह्याकरता कृष्णवर्णीयांना दोषी ठरवून शिक्षा देणे आणि केलेल्या गुन्ह्याकरता गोर्‍या व्यक्तीला निर्दोषी ठरवणे हे गोर्‍या ज्युरीच्या गटाला सहज शक्य होत असे. खरी साक्ष देण्याकरता कृष्णवर्णीय पुढे येण्यासही घाबरत असत. कायद्याचे भय नसल्याने दक्षिणेतील गोरे कित्येकदा कायदा आपल्या हातात घेत. कृष्णवर्णीयांविरुद्ध गुन्हा कबूल केला तरी त्यांना शिक्षा होत नसे. या खटल्याच्या निकालाकरता देशभरातून कित्येक वार्ताहर मिसिसिपीत पोहोचले होते आणि सर्वांनीच दक्षिणेतील न्यायदानाची पद्धत पाहिली. एमेट टिलच्या मृत्यूनंतर संपूर्ण देशातील कृष्णवर्णीय चिडले, हतबल झाले आणि जास्त संघटीतही झाले.

याच काळात अमेरिकेतील अ‍ॅलाबामा राज्यातील माँटगोमेरी गावातील एका छोट्या चर्चमध्ये मार्टिन ल्युथर किंग ज्युनिअर नावाचा २५ वर्षाचा तरुण धर्मोपदेशकाचे काम करण्याकरता दाखल झाला. थिऑलॉजी या विषयात उच्चशिक्षण घेतलेल्या मार्टिनसमोर खूप उज्जव भवितव्य होते, पण मोठ्या गावात काम करण्यापेक्षा छोट्या गावातील चर्चमध्ये काम करुन जनजागृती करण्याची त्याची इच्छा होती. अ‍ॅलाबामा राज्यात मोठ्या प्रमाणात कृष्णवर्णीय लोक राहत आणि दक्षिणेतील सर्वात जास्त सेग्रिगेटेड राज्य म्हणून अ‍ॅलाबामा कुप्रसिद्ध होते. रोझा पार्क्स ही माँटगोमेरीमध्येच NAACP (National Association for the Advancement of Colored People) च्या शाखेची सचिव म्हणून काम करत असे. तिचा रोजचा प्रवास बसने असे. दक्षिणेतील इतर गावांप्रमाणेच माँटगोमेरीतल्या सार्वजनिक बसेस सेग्रिगेटेड होत्या, बसमध्ये समोरची बाजू श्वेतवर्णीयांकरता तर मागची कृष्णवर्णीयांकरता राखीव असे. १ डिसेंबर १९५५ साली काम संपवून आपल्या राखीव जागेवर बसून घरी जात असताना श्वेतवर्णीयांच्या जागा भरल्याने बसचालकाने रोझाला तिची जागा श्वेतवर्णीय प्रवाशाकरता खाली करायला सांगितले. अशी घटना काही पहिल्यांदा घडत नव्हती. कृष्णवर्णीयांना त्याच्या राखीव जागा श्वेतवर्णीयांना द्यायला लागायचे प्रसंग अधुन मधुन घडायचे. माँटगोमेरीमध्ये काही महिन्यापूर्वीच असा प्रसंग घडला होता आणि नकार दिल्यामुळे एका शाळकरी कृष्णवर्णीय मुलीला अटकही करण्यात आली होती. रोझाने तिची जागा देण्यास नकार दिला आणि तिला अटक झाली. मितभाषी, सौम्य स्वभावाच्या रोझाला अटक झाल्याची बातमी वार्‍यासारखी पसरली आणि सर्वांनाच तिच्या या धाडसाचे फार आश्चर्य वाटले. असमनतेच्या वागणुकीमुळे, श्वेतवर्णीयांच्या दांभिकतेमुळे कृष्णवर्णीय समाज चिडलेला होता. न्यायाने वागणार्‍या रोझाच्या अटकेचा निषेध करण्याकरता माँटगोमेरीतल्या कृष्णवर्णीय समाजाने एकत्र येऊन तिला पाठिंबा देण्याचे आणि तिच्या अटकेला आव्हान देण्याचे ठरवले. येत्या आठवड्यातील सोमवारी रोझावर कोर्टात खटला भरला जाणार होता. तिच्या अटकेचा निषेध करण्यासाठी त्या दिवशी सर्व कृष्णवर्णीयांनी सार्वजनिक बस वर बहिष्कार टाकावा असे ठरवण्यात आले. रातोरात पत्रकं छापून सर्व कृष्णवर्णीयांमध्ये वाटली गेली. रविवारी कृष्णवर्णीयांच्या वेगवेगळ्या चर्चमध्ये धर्मगुरुंनी याबद्दल लोकांना माहिती दिली. डिसेंबरचा महिना होता, भरपूर थंडी पडलेली होती आणि बहुतांशी कृष्णवर्णीय गरीब असल्याने कामाच्या ठिकाणी जाण्याकरता सार्वजनिक बसवर अवलंबून होते, तरीही चालत आणि शक्य होते त्यांनी एकत्र गाडीने जाऊन त्या दिवशी सर्व बसेस वर बहिष्कार टाकला. माँटगोमेरीतले गोरे यामुळे आश्चर्यचकित झाले, कृद्ध झाले पण लोकांनी काही बेकायदेशीर काम न केल्याने सुरुवातीला गप्प बसले. त्या आठवड्यात गुरुवारीही हेच घडले, आणि कोणीही बसने गेले नाही. पुढचा पूर्ण आठवडा हेच घडले. लोक एकमेकांना मदत करत, कित्येक मैल चालत कामाच्या ठिकाणी जात राहिले, पण रोझाला पाठींबा देण्याकरता सेग्रिगेटेड बसने जाणे सर्वांनी बंद केले. आठवड्याचे महिने झाले आणि महिन्याचे एक वर्ष पण माँटगोमेरीतल्या कृष्णवर्णीयांमध्ये क्रांतीचे वारे शिरले होते. ३८५ दिवस बसमध्ये एकही कृष्णवर्णीय चढला नाही. त्या काळातल्या दक्षिणेत हे फार धैर्याचे काम होते. कृष्णवर्णीयांच्या शांत, शिस्तबद्ध निषेधाची बातमी पूर्ण देशभर झाली आणि त्यांना पाठिंबा मिळू लागला. बसकंपनीचे मुख्य प्रवासी हे कृष्णवर्णीय असल्याने त्यांचे फार मोठे आर्थिक नुकसान झाले. शेवटी कृष्णवर्णीयांच्या या शांततापूर्ण दबावतंत्राचा विजय झाला आणि १९५६ मध्ये जिल्हातील कोर्टाने निवाडा देऊन माँटगोमेरीतील सार्वजनिक बसमधील सेग्रिगेशन बंद केले. त्या काळात ही फार अद्भूत घटना होती. सर्वोच्च न्यायालयाला मध्ये न आणता फक्त चळवळीच्या मार्गातून, जिल्हा कोर्टाच्या माध्यमातून कृष्णवर्णीयांनी हा विजय मिळवला होता. या शांततामय पद्धतीने चालवल्या चळवळीचे नेतृत्व मार्टिन ल्युथर किंग ज्युनिअरने केले. या काळात कित्येक कृष्णवर्णीयांना मारहाण झाली, घरे जाळली गेली, रोझा पार्क्सला जिवे मारण्याच्या धमक्या आल्या, किंगच्या घरावर हल्ला झाला, त्याला अटकही करण्यात आली, पण कुठल्याही दबावतंत्राला बळी न पडता संघटित आणि अहिंसावादी मार्गाने माँटगोमेरीतील कृष्णवर्णीयांनी आपला हक्क मिळवला.

rosaparks_collage.jpg
(स्रोत - blackoutloud.wordpress.com)

हा अहिंसावाद आणि सविनय कायदेभंगाचे (civil disobedience) तत्त्व अमेरिकेतील कृष्णवर्णीयांच्या नागरी हक्क चळवळीत (Civil Rights Movement) आले कुठून? अहिंसावादी मार्गाने चळवळ पुढे नेण्याचे श्रेय हे पूर्णपणे मार्टिन ल्युथर किंग ज्युनिअरचे आहे. कॉलेजमध्ये असताना किंगने महात्मा गांधींनी भारतात सुरु केलेल्या अहिंसावादी चळवळीविषयी वाचले आणि त्याने तो भारावून गेला. त्याच्या जीवनावर गांधीजींच्या अहिंसावादी तत्त्वाचा फार मोठा प्रभाव पडला. कृष्णवर्णीयांनी सुरु केलेल्या चळवळीचे रुपांतर जर शांततामय, अहिंसावादी चळवळीमध्ये केले तर ती पुढे नेण्यास याचा खूप फायदा होईल याची किंगची खात्री होती. अमेरिकेतील नागरी हक्क चळवळीमध्ये सविनय कायदेभंग, अहिंसावाद आणून त्याने या चळवळीचे स्वरुपच पालटले. या आधी समान हक्क मिळवण्याकरता झालेल्या चळवळींमध्ये लोकांचा सहभाग तसा कमी प्रमाणात असायचा. पण लोकांना चळवळीचे नवे स्वरुप पसंत पडले आणि अधिकाधिक लोकांनी अशा प्रकारच्या शांततामय चळवळीमध्ये सामील व्हायला सुरुवात केली. माँटगोमेरीमधील यशस्वी चळवळीनंतर या मार्गाने आपल्याला आपला हक्क मिळवता येईल याबद्दल कृष्णवर्णीयांना विश्वास वाटायला सुरुवात झाली होती. त्या काळात वर्तमानपत्रे आणि टेलिव्हिजन यामुळे त्यांची चळवळ देशातील सर्व लोकांसमोर पोहोचली होती, तिला देशभरातील लोकांची सहानुभूती मिळाली. एका छोट्या गावात जनजागृती करण्याच्या हेतूने आलेला किंग माँटगोमेरीतील अहिंसावादी चळवळीनंतर पूर्ण राष्ट्रात प्रसिद्ध झाला. जगातील इतर देशांमध्येही त्याच्याबद्दल, बदलेल्या स्वरुपातील नागरी हक्क चळवळीबद्दल लिहून यायला लागले.

त्या काळात नागरी हक्क चळवळीद्वारे कृष्णवर्णीयांच्या हक्कांकरता लढणारे नेते हे वेगवेगळ्या विचारसरणीचे होते. NAACP करता वर्षानूवर्ष काम केलेले नेते हे कोर्ट आणि कायद्याद्वारे हक्क मिळवण्याच्या मताचे होते. कोर्ट आणि कायद्याद्वारे जाण्याची प्रक्रिया जरी कायमस्वरुपी बदल आणणारी असली तरी ती संथ, वेळखाऊ होती. तसेच ती कुशल वकिलांवर अवलंबून असे. थरगूड मार्शल, फिलीप रँडॉल्फ वगैरे नेते या मार्गाचा अवलंब करणारे होते. मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर, रॅल्फ अ‍ॅबरनॅथी आणि त्यांचे सहकारी हे सर्व कृष्णवर्णीयांनी एकत्र येऊन शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करुन, अधिकाधिक लोकांचा पाठिंबा मिळवून अन्यायाला आव्हान द्यावे या मताचे होते. या मार्गात अनेक धर्मोपदेशक सहभागी होते आणि ते चर्चद्वारे सर्वसामान्यांमध्ये चळवळीबद्दल प्रबोधन करत. कृष्णवर्णीय लोक हे मूळतः भाविक, नियमितपणे चर्चमध्ये जाणारे असल्याने या मार्गाबद्दल जनजागृती करणे धर्मगुरुंना सोपे जाई. परंतु हा ही मार्ग काही लोकांकरता संथ होता. ३०० वर्षाच्या इतिहासात दबून राहिल्याने आतापर्यंत काही फायदा झाला नाही, किंबहुना आपल्यावरील दडपशाही वाढतच आहे, त्यामुळे आपला हक्क आता ओरबाडून घेतल्याशिवाय पर्याय नाही हे या गटातील लोकांचे मत बनले होते. मार्टीन ल्युथर किंगच्या अहिंसावादी तत्त्वाखाली सुरु असलेली नागरी हक्क चळवळ ही या गटाला पसंत नव्हती. अहिंसावादी चळवळींना विरोध करणार्‍या गटांनी 'ब्लॅक पॉवर' नावाखाली चळवळ चालवली. स्वसंरक्षणाकरता आणि स्वतःची ओळख बनविण्याकरता कृष्णवर्णीयांनी हिंसेच्या मार्गाचा अवलंब करण्यास हरकत नाही अशी त्यांची विचारसरणी होती. स्टोकली कारमायकल, माल्कम एक्स, ह्युई न्युटन, बॉबी सील या मार्गाला पाठींबा देणारे कार्यकर्ते होते. या गटांनी 'ब्लॅक पॉवर' अंतर्गत 'ब्लॅक पँथर पार्टी' (ह्युई न्युटन, बॉबी सील),' नेशन ऑफ इस्लाम' (माल्कम एक्स) इत्यादी नावाखाली या चळवळी चालवल्या. पण मार्ग कोणताही असो, आपल्याला समानतेची वागणूक मिळावी, विभक्तीकरण रद्द व्हावे आणि अमेरिकेन घटनेने दिलेले सर्व हक्क आपल्याला मिळावेत हाच सर्वांचा हेतू होता. त्यामुळे या तिन्हीही गटातील लोकांनी आपापल्या मार्गांनी या करता प्रयत्न केले.

मार्टिन ल्युथर किंग ज्युनियरच्या आगमनानंतर नागरी हक्क चळवळीमध्ये चैतन्य आले. तो अतिशय प्रभावशाली वक्ता होता. त्याने आणि त्याच्या सहकार्‍यांनी मिळून ही चळवळ संपूर्ण दक्षिणेत सर्वसामान्यंपर्यंत पोहोचली. १९५५ ते १९६५ च्या कालावधीत दक्षिणेत विविध गावांमध्ये मोठ्या प्रमाणात शांततामय मोर्चे, बहिष्कार, संप या गोष्टी सुरु झाल्या. काही चळवळींमध्ये कृष्णवर्णीयांबरोबर त्यांचे उत्तरेतील श्वेतवर्णीय समर्थकही सामील होत होते. पण त्याचबरोबर दक्षिणेतील श्वेतवर्णीयांचा संयम सुटत होता. 'इतकी वर्ष आपल्या वर्चस्वाने दडपून टाकलेल्या या लोकांमध्ये एवढे धैर्य आले कुठून? आणि समानतेची भाषा करताहेत म्हणजे काय? श्वेतवर्णीय नेहेमीच सर्वश्रेष्ठ होते आणि आहेत, आणि ही काळी लोक कधीही त्यांची बरोबरी करु शकणार नाहीत!' अशा विचारांचे दक्षिणेतील गोरे ही आंदोलने बघून खवळून जायचे. हिंसा केली तर विरोध चटकन चिरडून टाकता येतो, पण शांततापूर्ण आंदोलनाने नवा प्रश्न उभा राहिला. चिरडून टाकायचे तरी कसे. तरीही कित्येक आंदोलकांवर नियमितपणे दगडफेक, लाठीचार्ज होत असे. पण परत नव्या जोमाने नवीन ठिकाणी आंदोलने सुरु होत. तो काळ दक्षिणेत कमालीचा तणावाचा होता. नागरी हक्क चळवळीतील नेते हे शांततामय आंदोलनांव्यतिरिक्त केंद्रातील राजकारण्यांबरोबर, वकीलांबरोबर नागरी हक्क कायदा पास करुन घेण्याकरता काम करत होते. यावेळेला आपला हक्क मिळवण्याकरता त्यांची सर्व बाजूंनी तयारी सुरु होती. १९६० साली जॉन एफ केनडी हा डेमोक्रॅटीक पार्टीचा उमेदवार अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदासाठी निवडून आला. केनडीचा वर्णभेद, विभक्तीकरण याला आधीपासूनच विरोध होता. दक्षिणेतील नागरिकांच्या, पोलिसांच्या निर्दयी वागणूकीचा तो वेळोवेळी निषेध करत असे. केनेडीच्या कारकिर्दीत दक्षिणेतील कृष्णवर्णीयांना मुख्य धारेत आणण्याकरता काही सकारात्मक तरी बदल होतील अशी आशा सर्वांना वाटायला सुरुवात झाली.

अ‍ॅलबामा राज्यातील बर्मिंगहॅम हे त्या काळी देशातील सर्वात जास्त सेग्रिगेटेड शहर होते. जानेवारी १९६३ साली राज्यपालपदाची शपथ घेतलेला जॉर्ज वॉलेस याने तर “Segregation now, segregation tomorrow, segregation forever!” असे त्याच्या शपथविधीच्या भाषणातच म्हटले होते. खरं तर १९५८ साली वर्णभेदाविरुद्ध जरा मवाळ भूमिका घेतल्याने तो राज्यपालपदाची निवडणूक हरला होता. अ‍ॅलबामामध्ये निवडणूक जिंकण्याकरता काय करायला हवे हे व्यवस्थित कळल्यामुळे, पुढील ४ वर्ष कट्टरतेच्या सर्व पातळ्या पार करत, निवडणूक जिंकून १९६३ साली तो राज्यपालपदी रुजु झाला. अ‍ॅलाबामामधील परिस्थिती त्या काळात खूप तणावाची होती. सेग्रिगेशनला विरोध करण्याकरता प्रत्येक आठवड्यात राज्यभर वेगवेगळ्या ठिकाणी शांततामय मोर्चे निघत. एप्रिल १९६३ मध्ये मार्टिन ल्युथर किंग ज्युनिअरला बर्मिंगहॅममधील सार्वजनिक सुविधांमधील विभक्तीकरण रद्द व्हावे या करता केलेल्या शांततामय मोर्चाच्या दरम्यात अटक करण्यात आली होती. त्याच वर्षी मे महिन्यात सेग्रिगेशनला विरोध करण्यासाठी बर्मिंगहॅममधील उच्चमाध्यमिक आणि कॉलेजच्या मुलांनी केलेल्या शांततापूर्ण आंदोलनावर पोलिसांनी लाठीचार्ज केला, त्यांच्यावर कुत्री सोडली, उच्च दाबाचे पाण्याचे फवारे सोडले. अ‍ॅलाबामाच्या राज्यपालाचा, राजकारण्यांचा, पोलिसांचा या सर्व दडपशाहीला पाठींबाच होता. थोड्याच वेळात आपल्या हक्काकरता लढणार्‍या विद्यार्थ्यांवर कुत्री सोडल्याची घटना घरोघरी लोकांनी टेलिव्हिजनवर पाहिली. दुसर्‍या दिवशी ही बातमी वर्तमानपत्राद्वारे देशाच्या कानाकोपर्‍यात पोहोचली. शांततामय मार्गाने जाणार्‍या मुलांविरुद्ध पोलिसांचे क्रौर्य पाहून देशातल्या लोकांना धक्का बसला.

birmingham-collage.png

(स्रोत - apushcanvas.pbworks.com)

केनडीने सर्वसमावेशक नागरी हक्क कायद्याचा मसुद्यावर (Comprehensive civil rights legislation) काम सुरु केलेले होते, मात्र मे महिन्यातील बर्मिंगहॅमच्या घटनेनंतर मात्र त्याने जाहीर केले की आता मात्र हा मसुदा तो तातडीने अमेरिकेतील काँग्रेसकडे मंजुरीकरता पाठवणार आहे. बर्मिंगहॅममधील घटनेनंतर चक्रे फिरली आणि सर्वसमावेशक नागरी हक्क कायद्याचा मसुदा काँग्रेसकडे मंजुरीसाठी गेला.

ऑगस्ट १८६३ मध्ये लिंकनने गुलामांना मुक्त केले आणि त्यानंतर शंभर वर्षांनीदेखील ह्या मुक्त झालेल्या गुलामाचे वंशज समानतेचा दर्जा मिळवण्याकरता झगडत होते. १९६३ मधील ऑगस्ट महिन्यात सर्व अमेरिकेतून अडीच ते तीन लाख कृष्णवर्णीय आणि त्यांचे श्वेतवर्णीय समर्थक वॉशिंग्टन डिसी येथील लिंकनच्या स्मारकासमोर जमा झाले. कित्येक लोक हालअपेष्टा सहन करुन, अनेक दिवस प्रवास करुन कृष्णवर्णीयांविरुद्ध होणार्‍या अन्यायाचा निषेध करण्याकरता एकत्र जमले होते. या दिवशी मार्टिन ल्युथर किंग ज्युनियरने दिलेले भाषण इतिहासातल्या प्रसिद्ध भाषणांपैकी एक आहे. लिंकन स्मारकाच्या पायथ्याशी उभे राहून किंगने दिलेले 'I have a dream' हे भाषण ऐकून लोकांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. (या भाषणाची एक झलक इथे पाहता येईल). किंगचं स्वप्न फार मोठं नव्हतं. अमेरिकेच्या संस्थापकांनी जवळपास २०० वर्षांपूर्वी 'All men are created equal' म्हटलं होतं आणि तीच समानता त्याला अमेरिकेच्या सर्व कृष्णवर्णीय नागरीकांकरता हवी होती. त्याला रंग, वंश याची तमा न बाळगता सर्व छोटी मुले एकत्र खेळायला, शाळेत जायला हवी होती. प्लँटेशनचे मालक आणि त्यांचे गुलाम यांचे वंशज खांद्याला खांदा लावून एकत्र काम करताना पाहायचे होते. दक्षिणेतील राज्यांमधील दडपशाहीचे रुपांतर हे स्वातंत्र्य आणि समानतेत झालेले बघायचे होते.

MLK-at-March-on-Washington-crop.jpg
(स्रोत - today.tamu.edu)

केनडीने अमेरिकेन काँग्रेसमध्ये मंजुरीकरता पाठवलेल्या Comprehensive civil rights legislation वर काम चालू असतानाच २२ नोव्हेंबर १९६३ रोजी टेक्सास राज्यातील डॅलस शहरात मारेकर्‍याने त्याची गोळी घालून हत्या केली. केनडीच्या हत्येने देश शोकात बुडाला. सिव्हील राईट्स चळवळीला पाठिंबा हे जरी हत्येचे कारण नसले तरी केनडीच्या हत्येने या मसुद्याच्या मंजुरीकरता उशीर होतो की काय अशी शंका लोकांना वाटायला लागली. परंतु जुलै १९६४ साली हा मसुदा मंजूर होऊन राष्ट्राध्यक्ष लिंडन जॉन्सन यांच्या सहीने त्याचे कायद्यात रुपांतर झाले. या कायद्यानुसार देशभरात वंश, रंग, धर्म, लिंग किंवा राष्ट्रीय उत्पत्तीच्या आधारे भेदभाव करण्यावर बंदी घालण्यात आली. नोकरीचे ठिकाण, सार्वजनिक ठिकाणे, अनुदानीत कार्यक्रम आणि इतर अनेक ठिकाणी लिंग आणि वंश यानुसार कोणत्याही भेदभाव करणे बेकायदेशीर ठरवण्यात आले. या कायद्यानंतर मतदानाच्या वेळी केली जाणारी दडपशाही आणि शाळांमधील विभक्तीकरण यांच्याविरोधात कारवाई करणे केंद्रसरकारला सोपे झाले. या कायद्याने अमेरिकेतील सर्व राज्यांमधील सेग्रिगेशन हे नेहेमीकरता बंद झाले. १८६८ साली अमेरिकेचे नागरीकत्व मिळालेल्या दक्षिणेतील कृष्णवर्णीयांना शेवटी १९६४ साली कायद्याने समानता मिळाली.

अमेरिकेतील नागरी हक्क चळावळीमधील मार्टिन ल्युथर किंग ज्युनियरचे योगदान वादातीत आहे. त्याच्या अहिंसावादी तत्त्वाने या चळवळीला नवे स्वरुप मिळाले. दक्षिणेतील राज्यांमध्ये लोकांच्या बरोबरीने तो स्वतः सतत चळवळीत सामील झाला. किंगने ही चळवळ शिस्तबद्ध केली. कायदेतज्ञांना बरोबर घेऊन नवीन कायदे आणण्याकरता धडपड केली. त्याच्या योगदानामुळे लाखो लोकांचे आयुष्य कायमचे बदलले. किंगच्या या महान कार्याकरता त्याला डिसेंबर १९६४ साली शांततेच्या नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

MLK_Nobel.jpg
(स्रोत - greenvilleonline.com)

कायद्याने संपूर्ण अमेरिकेतील सेग्रिगेशन बंद झाले असले तरी दक्षिणेत अनेक ठिकाणी त्याची अंमलबजावणी सुरु झाली नव्हती किंवा अतिशय संथपणे सुरु होती आणि तो हक्क पूर्णपणे मिळेपर्यंत दक्षिणेत आंदोलने सुरु होतीच. अनेक वर्षे दक्षिणेतील कित्येक राज्यांमध्ये कृष्णवर्णीयांना दहशतीने मतदानाकरता नोंदणी करण्यापासून मज्जाव केला जायचा. अ‍ॅलाबामामधील सेल्मा आणि जवळपासच्या गावात मिळून ५०% कृष्णवर्णीय लोक राहत पण त्यांच्यातले फक्त २% लोक मतदानाकरता नाव नोंदवू शकले होते. कृष्णवर्णीयांना मतदान करण्यापासून थांबवण्याकरता अ‍ॅलाबामामध्ये अनेकदा दहशतीचा मार्ग वापरला जात असे. १९६४ च्या सेग्रिगेशन बंद करण्याच्या कायद्यानंतरही कृष्णवर्णीयांना जेंव्हा मतदानाकरता नोंदणी करण्याकरता अडथळे आणले जाऊ लागले तेंव्हा त्याचा निषेध करण्याकरता २५ वर्षीय जॉन लुईस याने सेल्मातील रहिवाश्यांना घेऊन शांततापूर्ण आंदोलन करण्याचे ठरवले. जॉन लुईसने मार्टीन ल्युथर किंग ज्युनियरबरोबर काही वर्षे काम केले होते. त्याला अशा प्रकारचे मोर्चे नेण्याचा अनुभव होता. सेल्मापासून ५४ मैलावर असलेल्या माँटगोमेरी या राजधानीच्या शहरी मोर्चा नेऊन राज्यपालासमोर हा मुद्दा नेण्याचे लोकांनी ठरवले. ७ मार्च १९६५ हा दिवस नागरी हक्काच्या इतिहासात 'Bloody Sunday' म्हणून ओळखला जाईल याची तेंव्हा कोणालाही कल्पना नव्हती. ६०० मोर्चेकर्‍यांना घेऊन सेल्मा गावातून या मोर्चाची शांततेत सुरुवात झाली. असा मोर्चा निघणार आहे याची राज्यसरकार आणि प्रसारमाध्यमांना आधीच कल्पना होती. जसे मोर्चेकर्‍यांनी अ‍ॅलाबामा नदीवरील मोठा पूल ओलांडायला सुरुवात केली तसे त्यांना पुलापलिकडे पोलिसप्रमुख, अनेक पोलिस, घोड्यांवर स्वार असलेले राज्य सैनिक, आणि इतर श्वेतवर्णीय लोक कन्फेडरेट झेंडे घेउन उभे असलेले दिसले. पोलिसांकडे मोठ्या काठ्या, दंडुके, गॅस मास्क आणि इतर शस्त्रे होती. जसा हा स्त्रिया, पुरुष आणि मुले असलेला लोंढा संथगतीने पुढे सरकू लागला तसे पोलिस त्यांना मारायच्या पावित्र्यात उभे राहिले. सर्व लोकांना परतायची आज्ञा देऊन लोक जेंव्हा शांतपणाने पुढे येत राहिले तेंव्हा कोणालाही थोडीही संधी न देता ते या आंदोलकांवर धावून आले. नि:शस्त्र मुले, स्त्रिया, वृद्ध यांच्यावर काठ्या, लाठ्या, दंडुके यांनी हल्ला करुन, स्वतःला वाचवण्याकरता पळून जाण्याचा प्रयत्न करणार्‍या लोकांवर घोड्यावरुन गाठून हल्ला करुन त्यांना रक्तबंबाळ केले. जॉन लुईसलाही त्यांनी जबर मारहाण केली. या वेळी हजर असलेल्या वर्तमानपत्र, टिव्ही छायाचित्रकारांनी ही घटना चित्रीत केली, आणि टिव्हीवर चालू असलेला कार्यक्रम थांबवून ती देशातील लोकांना दाखवली. या क्रौर्याने लोकांना चिडले, व्यथित झाले. कायद्याने हक्क मिळूनही दक्षिणेत कृष्णवर्णीयांचे आयुष्य अजुनही बदलत नव्हते. त्यानंतर मात्र ४ दिवसांनी परत पोलिसांच्या आणि राजकारण्यांच्या नाकावर टिच्चुन सेल्मा ते माँटगोमेरी असा मोर्चा काढण्यात आला ज्यात जवळपास २५,००० लोक सामील झाले. केंद्रसरकारने लोकांच्या संरक्षणाकरता सैनिक तैनात केले. लोकांच्या दबावाखाली अ‍ॅलाबामाच्या राज्यपालाला झुकावे लागले, आणि अ‍ॅलाबामा राज्यात कृष्णवर्णीयांना शेवटी मतदानाकरता नोंदणी करता येऊ लागली. या घटनेनंतर दक्षिणेत हळूहळू बदल येण्यास सुरुवात झाली.

selma-collage.jpg

(स्रोत - history.com)

हा बदल पूर्ण झालेला पाहणे मात्र या चळवळीच्या शिल्पकाराच्या नशिबी नव्हते. एका शांततामय मोर्चाचे नेतृत्व करण्यासाठी टेनिसी राज्यातील मेंफिस या शहरात आलेल्या मार्टिन ल्युथर किंग ज्युनियरची ४ एप्रिल १९६८ साली गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. आयुष्यभर शांतता, अहिंसावादाची शिकवण देणार्‍या किंगचा शेवट मात्र हिंसेने झाला. किती तरी काम बाकी होते. आता दक्षिणेनंतर किंगने त्याचा मोर्चा उत्तर आणि पश्चिमेतील राज्यांकडे वळवला होता. तिथे विभक्तीकरण जरी नसले तरी गरिबी, चांगल्या शिक्षणाचा, संधींचा अभाव यामुळे कृष्णवर्णीयांचा विकास खुंटला होता. किंगला आता फक्त कृष्णवर्णीयांकरताच नव्हे तर सर्व गरिबांना समान संधी मिळावी याकरता काम करायचे होते. त्याच्या मृत्यूने ते काम अर्धवट राहिले. जसे लिंकन जिवंत असता तर कदाचित दक्षिणेची पुनर्बांधणी वेगळ्या प्रकारे घडली असती आणि देशाचे चित्र वेगळे असते असे म्हटले जाते, तसेच जर किंग जिवंत असता तर कृष्णवर्णीयांची, दुर्बल आर्थिक घटकांची परिस्थिती कदाचित सध्यापेक्षा वेगळी असती असे म्हटले जाते. उण्यापुर्‍या ३९ वर्षांच्या आयुष्यात मार्टिन ल्युथर किंग ज्युनियरने किती लोकांचे आयुष्य बदलले होते! कृष्णवर्णीयांना समानता मिळवून देण्याच्या ध्येयाने तो झपाटला होता. कित्येकदा जिवे मारण्याच्या धमक्या मिळूनही किंगने आपले कार्य चालूच ठेवले होते. आपल्या ध्येयाकरता तो जगला आणि त्याच करता त्याने स्वतःचे बलिदान दिले.

किंगच्या मृत्यूने देशभर शोककळा पसरली. समानतेचा हक्क मिळाल्यावर शिक्षण आणि आर्थिक विकास यातूनच आपल्या समाजाची उन्नती होऊ शकते हे वेळोवेळी कृष्णवर्णीयांना सांगून त्याने त्यांच्यासमोर पुढचा मार्ग आखून दिला होता. १९७० च्या दशकात सर्व राज्यांमधील सेग्रिगेशन पूर्णपणे बंद झाले होते, कृष्णवर्णीयांचा मतदानातील सहभाग वाढला होता. १९७० च्या दशकापासून अमेरिकेतील दक्षिणेतील राज्यांमधील कृष्णवर्णीय मुख्य प्रवाहात येण्यास सुरुवात झाली. पांढरपेश्या नोकर्‍यांमध्ये कृष्णवर्णीयांचे प्रमाण वाढले. विद्यार्थ्यांमध्ये उच्चशिक्षणाचे प्रमाण वाढले. राजकारणात कृष्णवर्णीयांचा सहभाग वाढला. कला, विज्ञान, लेखन, मनोरंजन, राजकारण, कायदा आणि इतर अनेक क्षेत्रात कृष्णवर्णीयांची संख्या वाढायला लागली. १९८० च्या दशकामध्ये कृष्णवर्णीय हे अनेक कार्यक्षेत्रात श्वेतवर्णीयांच्या खांद्याला खांदा लावून काम करत होते. अजूनही काम बाकी होतेच, पण मार्टिन ल्युथर किंग ज्युनियरचे स्वप्न सत्यात उतरायला सुरुवात झाली होती...

(स्रोत -
पुस्तके
A History of Us - Joy Hakim ११ पुस्तकांचा संच
Us and Them: A History of Intolerance in America - Jim Carnes
A People's History of the United States - Howard Zinn
वेबसाईट्स
http://history.org
https://en.wikipedia.org)

-----

अमेरिकेतील कृष्णवर्णीयांचा इतिहास - स्लेव्हरी ते ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर चळवळ (भाग ७)

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

मो, इथे अनेकांनी म्हटल्या प्रमाणे प्रतिक्रिया नाही म्हणून विचलित होऊ नका
माझ्या सारखे अनेक आहेत की जे सुन्न होऊन काय प्रतिक्रिया द्यावी असा विचार करत असावेत..

लेखन तर अप्रतिम, ओघवते, तटस्थ आणि कुठलाही अभिनवेश नसलेले, पण वाचतोय ते केवळ अस्वस्थ करणारे आहे

BLM चे हिंसक रूप पटले नव्हते आणि व्यक्तिशः मला ते चळवळीकडे झुकण्यापेक्षा political जास्त वाटले..
ते जे काही असेल, संघर्ष तर पूर्णपणे खरा आहे..

मो, तुझ्या या सिरिजमूळे कित्येक वर्षांनी रोज मायबोलीवर लॉग इन करायला लागले आहे.
या विषयाबद्दल खूप वरवर ची माहिती होती... एखाद - दुसऱ्या पुस्तकातून, काही चित्रपटांमधून जे काही समजलं असेल तेवढंच आणि खूप तुटक. असा सलग इतिहास पहिल्यांदाच वाचायला मिळाला. Thank you.

पुणेकर जोशी, सहमत!

मार्टिन ल्युथर किंग यांच्या हत्येनंतर क्रुष्णवर्णिय लोकांना त्यांचे हित जपणारा व पुढे नेणारा एकही चांगला व प्रभावी नेता लाभला नाही ही अतिशय खेदाची बाब आहे. बराक ओबामा व कमला हॅरीस हे अमेरिकेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष झाले खरे पण ते ब्लॅक लोकांचे पुढारी किंवा त्यांचे काम ब्लॅक लोकांचे अमेरिकन समाजात स्थान चांगले करण्याबाबत खुप वाखाणण्यासारखे आहे असे म्हणता येणार नाही.

नाही म्हटले तरी एक ब्लॅक ( मिक्स्ड का होइना) प्रेसिडंट म्हणुन ओबामाने एफर्डेबल केअर अ‍ॅक्ट( उर्फ ओबामा केअर)पास करुन घेउन गरीबांना हेल्थ इन्शुरंस मिळेल याची मात्र तजविज केली. तो लॉ फक्त गरीब काळ्या लोकांसाठीच फायद्याचा नाही तर अमेरिकेतल्या सगळ्याच गरीब वर्गाच्या फायद्याचा आहे पण त्या सोशली लिबरल प्रोग्रामने मात्र रिबब्लिकन पार्टीच्या रेसिस्ट लिडर्स व समर्थकांच्या पोटात शुळ उठले आहे. तो लॉ कधी एकदा रिपेल करता येइल यासाठी ती पार्टी कंबर कसुन काम करत आहे. त्यात ब्लॅक लोकांचा थोडा फायदा होत आहे, त्यांना हेल्थ इन्श्युरंस सारखी मुलभुत गोष्ट सरकारच्या मदतीने मिळत आहे हे बघुन अमेरिकेतल्या काळ्या लोकांचा द्वेष करणार्‍या तमाम व्हाइट रेसिस्ट लोकांच्या डोक्यात तिडीक जात आहे व त्यांच्या पोटात मळमळत आहे. त्यासाठी मग ओबामाकेअर कसा फ्री मार्केट इकॉनॉमी तत्वावर चाललेल्या अमेरिकेतल्या महागड्या हेल्थ इन्श्युरंस कंपनींच्या फ्रिडम वर गदा आणत आहे वगैरे असा खोटा प्रचार( प्रोपोगँडा) करुन ज्या लोकांना अमेरिकेतला हेल्थ इंश्युरंस पद्धतीचे काडीमात्र ज्ञान नाही अश्या लोकांची व्यवस्थित दिशाभुल ही रेसिस्ट मंडळी पद्धतशीर करत आहेत.

असो. या भागात तु एमेट टील व त्याचा खुन का व कसा झाला व त्याचा खुन करणारा व्हाइट माणुस कसा निर्दोष सुटला याबाबत लिहीले आहेस. पण तसे काळ्या लोकांचे खुन व त्यांचे लिंचींग याने अमेरिकेतल्या दक्षिण राज्यांचा इतिहास ओतप्रोत भरलेला आहे. ( इथे परत एकदा “ मिसिसीपी बर्निंग“ या चित्रपटाचा उल्लेख करावाच लागेल. दक्षिणेत ब्लॅक लिंचिंग कसे चालायचे, तिथले पोलिस, मेयर, जजेस कसे वागायचे वगैरे गोष्टींचे अतिशय प्रभावी चित्रण या चित्रपटात केलेले आहे. डॅनिअल डिफो, जिन हॅकमन व फ्रॅन्सिस मॅकडरमंड या तिघांचा अभिनय अप्रतिमच आहे यात वादच नाही पण चित्रपटाचा विषय,कथा व कथेची मांडणी इतकी प्रभावी आहे की त्याने हा चित्रपट आपल्या मनात कायमचे घर करुन जातो)

व्हाइट पोलिसांनी केलेल्या जॉर्ज फ्लॉइडच्या खुनाने ब्लॅ़क लाइव्ह्ज मॅटर चळवळीला वेग पकडला असला तरी तुझ्या पुढच्या लेखात असे बरेच निरपराध काळ्या लोकांचे पोलिसांनी केलेले खुन व ते खुन केलेले सगळे व्हाइट पोलिस कसे निर्दोष सुटले हे वाचकांपुढे येइल अशी आशा आहे.

मो या तुझ्या या सुंदर लेखमालेतुन अमेरिकेत काळ्या लोकांचा द्वेष सिस्टिमॅटीकली शतकानु शतके कसा चालु आहे हे वाचकांना कळुन येत आहे. यु हॅव्ह पर्फेक्टली सेट द स्टेज टु अंडरस्टँड द ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर मुव्हमेंट!

मो, खूप छान सुरु आहे लेखमाला. जोडीला मुकुंद यांचे प्रतिसादही खूप माहितीपूर्ण! ही फक्त पोच. मी अजून मागल्या भागांमधेच रेंगाळतेय. कारण वाचून, त्यावर उलट सुलट विचार करुन मनाला एक प्रकारचा थकवा येतो. अर्थात 'हे थकवा येणे' मी चांगल्या अर्थाने म्हणत आहे.

मो, अतिशय माहितीपूर्ण लेखमाला. आतापर्यंत थोडीशी तुटक माहिती होती. Twelve years a slave वाचले होते. पण इतका सविस्तर इतिहास आणि तोसुद्धा मराठीत लिहिल्याबद्दल खूप खूप आभार. माझ्या तुटपुंज्या माहितीमधल्या बऱ्याच गाळलेल्या जागा भरल्या जात आहेत. मुकुंद यांचे प्रतिसादही उत्तम. सर्व प्रिंट करून पुन्हा वाचणार आणि संग्रही ठेवणार. आणखी असे विषय लिहिलेत तर फार आवडेल. मी सुद्धा बऱ्याच वर्षांनी लॉग इन केले आहे हा प्रतिसाद लिहिण्याकरता! पु भा प्र.

सर्वांना धन्यवाद!

पुणेकर_जोशी, BLM समजावून घ्यायची असेल तर हा सगळा इतिहास समजावून घेणे खूप महत्त्वाचे आहे असे मला वाटते. BLM जरी २०१३ साली सुरु झाली तरी तेंव्हा माझे या विषयावर तेवढे वाचन नव्हते. जे झाले ते वाईट झाले, पोलिस ब्रुटॅलिटीबद्दल लोक मोर्चे काढत आहेत एवढीच माहिती. त्यानंतरही अशा केसेस होत राहिल्या, प्रत्येक मृत्यूनंतर मोर्चा, निदर्शनं, काही दिवस त्याचा मिडीयामध्ये पाठपुरावा, परत नवी केस होईपर्यंत सगळं शांत आणि परत हेच चक्र. नंतर या विषयावर (एकंदरीत अमेरिकेच्या इतिहासावर) वाचन जसं वाढत गेलं तशी या मागचा इतिहास कळला. त्याची पुनरावृत्ती आणि या सगळ्यामागचा अफ्रिकन अमेरिकन लोकांचा राग, त्यांची मानसिकता जास्त कळायला लागली. तरीही मी तिर्‍हाईतच होते. ऑफिसमध्ये जेंव्हा अफ्रिकन अमेरिकन कलिगबरोबर याबद्दल थोडी चर्चा व्हायला लागली (सुरुवातीला बिचकत) तेंव्हा लक्षात आलं की यांच्या मनात अजुनही किती वादळ आहे. तसं पहायला गेलं तर कित्येकांचे आई, वडील, आजी, आजोबा आणि आधीच्या पिढीचे नातेवाईक सिव्हील राईट चळवळ जगले होते, तो इतिहास त्यांच्या मनात अजुनही ताजा होता. आताची पिढी ही इतिहासाला कवटाळून बसली नसली तरी हा इतिहास ऐकत./वाचत ते मोठे झाले आहेत, याचा त्रागा, त्रास त्यांना झालेला/होतो आहे. परत हा भेदभाव, त्यांच्या प्रति असलेली वागणूक दिसली की सगळं उफाळून येत असणारच. चळवळीतली लुटालूट मलाही पटली नसली तर चळवळी मागची मानसिकता समजून घ्यायला या ६ भागांमध्ये जे लिहिलेलं आहे त्याची खूप मदत झाली. जानेवारीतल्या कॅपिटॉलच्या दंगलीनंतर माझ्या कॉलेजच्या मैत्रिणीने त्याची तुलना एले मध्ये घडलेल्या BLM नंतरच्या मॉल लूटींगशी केली. मला फार आश्चर्य आणि वाईटही वाटलं. माहिती नसताना किती पटकन जज करतो आपण. या समजात अजुनही खूप प्रॉब्लेम्स आहेत, आणि सगळ्याच समाजामध्ये स्वार्थी, संधीसाधू लोक असतात, तसंच चूक ते चूकच, पण तरीही वरवरच्या माहितीवर आपण किती पटकन व्यक्त होतो. लोकांना एक लेबल लावतो. असो. हे लेख वाचल्यावर कृष्णवर्णीयांचा इतिहास आणि थोडी मानसिकता समजून घ्यायला मदत झाली तर मला आनंदच होईल.

मार्टिन ल्युथर किंग यांच्या हत्येनंतर क्रुष्णवर्णिय लोकांना त्यांचे हित जपणारा व पुढे नेणारा एकही चांगला व प्रभावी नेता लाभला नाही ही अतिशय खेदाची बाब आहे. >> मुकुंद, तुमच्याबरोबर अगदी सहमत.
आणि हो, तुम्ही म्हणताय मी फक्त एमेट टिलबद्दल लिहिलंय पण इतिहास अशा कित्येक नावांनी भरला आहे. त्याच्या केसचा उल्लेख फक्त एक प्रातिनिधीक उदाहरण आहे. इन फॅक्ट, सिव्हिल राइट्स मुव्हमेंटमधीलदेखील मी मोजकी उदाहरणं आणि मोजक्याच लोकांची नावं लिहिली आहेत, खरं तर ती यादीही खूप मोठी आहे. महत्त्वाच्या/(फेमस) घटना लिहायचा प्रयत्न केलाय पण बर्‍याच गोष्टी सुटल्या ही आहेत. तुमचे सगळे प्रतिसाद नेहेमी प्रमाणे छान. मिसिसीपी बर्निंग पाहिलाय. त्यातील ताण अक्षरशः सहन होत नाही. फार भयानक इतिहास आहे हा, आणि तो लेखनाच्या माध्यमापेक्षा या दृकश्राव्य माध्यमातून अधिक अंगावर येतो.

आतापर्यंत सगळं तटस्थपणे लिहायचा प्रयत्न केला आहे कारण मला सगळी माहिती फक्त लोकांसमोर ठेवायची आहे. हा इतिहास तटस्थपणे लिहिणं थोडं अवघड जातं कारण बर्‍याच भावना मनात येतात, पण पुणेकर_जोशी तुमचा प्रतिसादाने ते तसंच लोकांसमोर येतंय हे दिसलं. थँक्स.

पुढचा भाग शेवटचा असेल. विकेंडला टाकेन.

परत एकदा सर्व वाचकांना धन्यवाद आणि पुणेकर_जोशी, अल्पना, punekarp, मुकुंद, स्वाती२, स्मिताके तुम्हाला प्रतिसादाबद्दल खास धन्यवाद. Happy

मस्त लिहिला आहेस हा भाग.
ह्यातली ६०, ७० च्या दशकातली सालं बघून वाटलं की हे आत्ता आत्तापर्यंत घडत होतं की! म्हणजे दुसर्‍या महायुध्दानंतर अमेरिका जागतिक महासत्ता म्हणून पुढे आली पण स्वतःच्या पायाखाली काय जळतय हे बघितलं नाही!.

सुरेख लेखमाला!
एमेट टिलविषयी वाचलं होतं तेव्हा कळलं की त्याच्यावर आरोप करणार्‍या बाईने नंतर खूप वर्षांनी त्याने काही चुकीचं केलं नाही, आपण खूप exaggerate केलं अशी कबुली दिली होती Sad
कदाचित लेखमालेत पुढे जोर्ज स्टिनीचाही उल्लेख येईल. या १४ वर्षाच्या मुलाला electric chair मधे मारण्याची शिक्षा दिली होती. त्याच्यावरचे आरोपही खोटे असल्याचं सांगितलं जातं. या घटनेवर आधारित Carolina Skeletons हा एक अप्रतिम चित्रपट आहे.

म्हणजे दुसर्‍या महायुध्दानंतर अमेरिका जागतिक महासत्ता म्हणून पुढे आली पण स्वतःच्या पायाखाली काय जळतय हे बघितलं नाही!. >> पराग, चांगला पॉइंट. याबद्दल मी लिहिले नाही. सिव्हील राईट अ‍ॅक्ट मंजुर व्हायला जशी सिव्हील राइट मूव्हमेंट कारणीभूत होती, तशी थोडीफार जगातून होणारी छि थु आणि त्याबद्दल वाटणारी लाज, तातडीने बदलाची गरज ही कारणेही होती. दुसर्‍या महायुद्धानंतर जेंव्हा अमेरिका महासत्ता म्हणून पुढे आली तसं अनेक देशातून तिथे अल्पसंख्यांकांना दिल्या जाणार्‍या वर्तणुकीबद्दल आश्चर्य आणि टिका होऊ लागली. त्यामुळे कायद्याने सेग्रिगेशन बंद करणे प्रायॉरिटीचे झाले. केनडीच्या आधी आयझेनहावर राष्ट्राधक्ष होता, त्याच्या काळात १९५७ मध्ये ही एक सिव्हील राईट अ‍ॅक्ट पास झाला ज्याने कुठल्याही नागरिकाला मतदान करण्यास अडथळा आणणार्‍यावर कायद्याने कारवाई करणे हे फेडरल अधिकार्‍यांना शक्य झाले. सिव्हिल राइट्स च्या बाबतीत रिकन्स्ट्रकशन नंतर केलेला हा पहिला कायदा होता. हा फार बेसिक कायदा होता, पण तरी ती सुरुवात होती. इंटरनॅशन प्रेशर हा नक्कीच मोठे कारण होते.
अजुन एक म्हणजे जॉन एफ केनेडीपेक्षाही त्याचा भाऊ रॉबर्ट केनडी यांनी सिव्हील राईट्सला खूप पाठिंबा दिला. रॉबर्टलाही अफ्रिकन अमेरिकन लोकांमध्ये लोकप्रिय होता, आणि १९६८ साली त्याला डेमोक्रॅटीक पक्षाची उमेदवारी कदाचित मिळालीही असती. पण मार्टीन ल्युथर किंगला मारल्यानंतर २ महिन्याच रॉबर्ट केनडीला ही गोळ्या घालून मारले. कदाचित तो राष्ट्राध्यक्ष झाला असता तर अफ्रिकन अमेरिकन लोकांकरता त्याने इफेक्टीव्हली काम केले असते.

एमेट टिलविषयी वाचलं होतं तेव्हा कळलं की त्याच्यावर आरोप करणार्‍या बाईने नंतर खूप वर्षांनी त्याने काही चुकीचं केलं नाही, आपण खूप exaggerate केलं अशी कबुली दिली होती Sad>> चीकू, बरोबरंय. मी पण ते वाचलं. कित्येकदा अफ्रिकन अमेरिकेन लोकांना न केलेल्या गुन्ह्याकरता आपला प्राण द्यावा लागला आहे. एखाद्या गोर्‍याने गुन्हा करुन जर त्यांच्यावर नाव टाकले तरीसुद्धा (बेसिकली कुठलाही आळ त्यांच्यावर आल्यावर) त्यांना स्वतःची सुटका करुन घेणे शक्य होत नसे. अशाही अनेक केसेस झालेल्या आहेत की कुठल्यातरी गुन्ह्याकरता कृष्णवर्णीयाला तुरुंगात टाकले, आणि कोर्ट केस व्हायच्या आधीच गोर्‍यांच्या जमावाने कायदा स्वतःच्या हातात घेऊन तुरुंगातून त्यांना पळवून देऊन लिंच केले. यात कित्येकदा जेलरच सहभागी असे. अर्थातच कोणालाच यात शिक्षा होत नसे.
जॉर्ज स्टीनीबद्दल मी वाचले नव्हते. अशी इतकी जास्त उदाहरणं आहेत. मन सुन्न होतं.

मो, अग आम्हाला कसले धन्यवाद देतेस? उलट आम्ही वाचकच तुझ्या या सुंदर लेखमालीकेसाठी तुझे उतराई आहोत! मला वाटत की मराठीत या विषयावर झालेले व इतके सुंदर असे हे पहिलेच लिखाण असेल.

मी तुला तुझ्या पहिल्याच भागाला प्रतिसाद देताना म्हटले होते की या विषयाची व्याप्ती फार मोठी आहे. फ्रँकली मी तेव्हा जरा साशंकच होतो की तु कितपत हा विषय कव्हर करु शकशील. बट फुल क्रेडिट टु यु! तु फारच सुंदर रित्या व सुसुत्रितपणाने हा विषय तुझ्या लेखांद्वारे वाचकांपुढे सादर केलास. या विषयाची ज्यांना सविस्तर माहीती नव्हती त्यांना हा विषय तु तुझ्या या सुंदर लेखमालेद्वारे तु निट उलगडुन दाखवलास.

हे सगळे लिहीताना काय कव्हर करु व काय सोडुन देउ या बाबत तुझी होणारी घालमेल स्पष्ट जाणवत होती. पण तु जे काही लिहीले आहेस त्याने हा विषय सखोल समजायला वाचकांना नक्कीच मदत झाली असणार यात वाद नाही.

तुझ्या काल सकाळच्या ११: ५५ च्या पोस्टमधे पुणेकर जोशींना संबोधुन लिहीलेल्या तुझ्या अख्या पहिल्या मोट्ठ्या पॅरॅग्राफशी संपुर्ण सहमत! कुड नॉट हॅव्ह सेड एनी बेटर! खासकरुन मलाही लोक जेव्हा ६ जानेवारीला कॅपिटल वर झालेल्या दंगलीला ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर चळवळीशी तुलना करतात तेव्हा त्या लोकांच्या अज्ञानाची किव कराविशी वाटते. ६ जानेवारीचे दंगलखोर रेसिस्ट मुर्ख लोक एका सत्तांध कॉन आर्टिस्टच्या निवडणुकीबद्दलच्या धादांत खोट्या आरोप व कॉन्स्पिरसी थिअरीजवर विश्वास ठेउन व्हाइस प्रेसिडेंटचा खुन करायला आले होते. त्या दंगलीची बरोबरी ब्लॅक लाइव्झ मॅटर चळवळीशी करणे म्हणजे तु या लेखमालेत सादर केलेल्या ब्लॅक लोकांना गेली ४०० वर्षे या देशात मिळत असलेल्या वागणुकीच्या इतिहासाचा ढळढळीत अपमान आहे.

तु म्हणालीस की तुझे हे लेख वाचल्यावर क्रुष्णवर्णियांचा इतिहास व त्यांची मानसीकता समजायला थोडी मदत झाली तर तुला आनंद होईल. मलाही तसे झाले तर खुप आनंद होइल. पण दुर्दैवाने अमेरिकेत जे काही बेगडी रेसिस्ट लोक आहेत ( ट्रंप व त्याचे समर्थक) त्यांना गेली ४०० वर्षे हे जे काही अमेरिकेत घडत आलेले आहे त्याने काहीही फरक पडलेला नाही. उलट ट्रंपसारखे भस्मासुर अजुनच कडवे व्हाइट सुप्रिमिस्ट बनुन हा इतिहास असाच पुढे चालुन द्यायच्या तयारीत आहेत.

असो. रॉबर्ट केनेडी बद्दल खुप काही लिहीण्यासारखे आहे पण थोडक्यात मी असे म्हणेन की त्याचा मोठा भाउ जॉनेफ केनेडी याची हत्या ही अमेरिकेसाठी एक खुप मोठी ट्रॅजीडी होती पण रॉबर्ट केनेडीची १९६८ मधली हत्या ही अमेरिकेसाठी त्याहुनही मोठी ट्रॅजीडी होती. रॉबर्ट केनेडी निक्सनला हरवुन १९६८ मधे अमेरिकेचा अध्यक्ष होण्याचे पुरेपुर चांसेस होते व तसे झाले असते तर अमेरिकेचा इतिहास, खासकरुन क्रुष्णवर्णिय व सिव्हिल राइट्स मुव्हमेंटचा इतिहास आज वेगळा असला असता हे जे तु म्हणालीस त्याच्याशी मी पुर्ण सहमत आहे.

परत एकदा.. ही तुझी लेखमाला मायबोलिच्या काही निवडक व उत्तम लेखमालेच्या पंगतीत जाउन बसणार हे नक्की! अश्या लिखाणामुळे मायबोलि एक दर्जेदार मराठी साईट म्हणुन टिकुन आहे.

अप्रतिम मालिका मो. किती प्रचंड अभ्यास केला आहेस व तळमळीने लिहिले आहेस. कधी होणार असल्या वाईट विचारसरणीत बदल?
तुझ्यासाठी इथुनंच एकटीच टाळ्या वाजवते झालं.
अजुनही काही लिहायचे झाल्यास, जास्तीची माहिती सदरात नवा धागा कर व मूड झाल्यास लिहीत रहा.